“मला अनुसरावे”
“मला अनुसरावे”
“ह्याचकरिता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे; कारण ख्रिस्तानेहि तुम्हांसाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हांकरिता कित्ता घालून दिला आहे.”—१ पेत्र २:२१.
१, २. एक शिक्षक म्हणून येशूच्या परिपूर्ण उदाहरणाचे अनुकरण करणे का अशक्य नाही?
येशू ख्रिस्त पृथ्वीवर होऊन गेलेला सर्वश्रेष्ठ शिक्षक होता. शिवाय, तो परिपूर्ण होता; मनुष्य या नात्याने त्याच्या सबंध जीवनात त्याने एकदाही पाप केले नाही. (१ पेत्र २:२२) पण एक शिक्षक म्हणून त्याने घालून दिलेला कित्ता अतिशय उच्च दर्जाचा असल्यामुळे, अपरिपूर्ण मानव त्याचे अनुकरण करू शकत नाहीत असा याचा अर्थ होतो का? मुळीच नाही.
२ याआधीच्या लेखात आपण पाहिल्याप्रमाणे येशूची शिकवण प्रेमावर आधारित होती. आणि प्रेम असा गुण आहे जो आपण सर्वजण आत्मसात करू शकतो. देवाचे वचन वारंवार आपल्याला इतरांबद्दल आपले प्रेम वाढवण्याचे प्रोत्साहन देते. (फिलिप्पैकर १:९; कलस्सैकर ३:१४) यहोवा कधीही मानवांकडून, त्यांना करता येणार नाहीत अशा गोष्टींची अपेक्षा करत नाही. उलट, “देव प्रीति आहे” आणि त्याने आपल्याला स्वतःच्या प्रतिरूपात बनवले आहे, त्यामुळे आपणही प्रीती दाखवावी अशा रितीने त्याने आपली रचना केली असे म्हणता येईल. (१ योहान ४:८; उत्पत्ति १:२७) त्यामुळे या लेखाच्या मुख्य शास्त्रवचनात प्रेषित पेत्राचे शब्द वाचताना आपण आत्मविश्वास बाळगू शकतो. आपण येशूच्या पावलांवर पाऊल ठेवून अवश्य चालू शकतो. “मला अनुसरावे,” या स्वतः येशूने दिलेल्या आज्ञेचे आपण पालन करू शकतो. (लूक ९:२३) ख्रिस्ताने दाखवलेल्या प्रीतीचे, अर्थात त्याने ज्या सत्यांविषयी शिकवले त्यांवर आणि ज्या लोकांना त्याने शिकवले त्यांच्यावर दाखवलेल्या प्रीतीचे आपण कशाप्रकारे अनुकरण करू शकतो हे आपण पाहू या.
शिकत असलेल्या सत्यांविषयी प्रीती उत्पन्न करणे
३. काहींना अभ्यास करणे कठीण का जाते पण नीतिसूत्रे २:१-५ यात काय प्रोत्साहन देण्यात आले आहे?
३ इतरांना आपण ज्या सत्यांविषयी शिकवतो ती प्रिय वाटण्याकरता ही सत्ये शिकून घेण्याची आपल्याला आवड असली पाहिजे. आजच्या जगात ही आवड सहजासहजी निर्माण होत नाही. अपुरे शिक्षण आणि लहानपणी लागलेल्या वाईट सवयींमुळे काहीजणांची अभ्यासू वृत्ती कायमची नष्ट होते. पण यहोवाकडून शिकून घेणे आवश्यक आहे. नीतिसूत्रे २:१-५ यात असे म्हटले आहे: “माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारिशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेविशील, आपला कान ज्ञानाकडे देशील, आणि आपले मन सुज्ञानाकडे लावशील, जर तू विवेकाला हाक मारिशील, सुज्ञतेची आराधना करिशील, जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध करिशील, व गुप्त निधींप्रमाणे त्याला उमगून काढिशील, तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल.”
४. मन ‘लावण्याचा’ काय अर्थ होतो आणि कशाप्रकारचा दृष्टिकोन यासाठी आपल्याला सहायक ठरेल?
४ वरील वचनांपैकी १-४ वचनांत आपल्याला वारंवार केवळ ‘स्वीकारण्याचे’ आणि ‘आपल्याजवळ साठवून ठेवण्याचेच’ नव्हे तर ‘शोध करण्याचे’ व ‘उमगून काढण्याचे’ देखील प्रोत्साहन देण्यात आले आहे. पण हे सर्व करण्याची प्रेरणा आपल्याला कशामुळे मिळाली पाहिजे? “आपले मन सुज्ञानाकडे लाविशील” या वाक्यांशाकडे लक्ष द्या. एका संदर्भग्रंथात म्हटल्याप्रमाणे हे शब्द “केवळ लक्ष देण्याकरताच प्रोत्साहन देत नाहीत, तर एक विशिष्ट मनोवृत्ती विकसित करण्याची मागणी करतात: देवाच्या शिकवणुकी आत्मसात करण्यास उत्सुक अशी मनोवृत्ती.” यहोवाच्या शिकवणुकी आत्मसात करण्याकरता ग्रहणशील व उत्सुक मनोवृत्ती विकसित करण्याकरता कशाची आवश्यकता आहे? योग्य दृष्टिकोनाची. “देवाविषयीचे ज्ञान,” “रुप्याप्रमाणे” व “गुप्त निधीप्रमाणे” आहे असा आपला दृष्टिकोन असायला पाहिजे.
५, ६. (अ) कालांतराने काय घडण्याची शक्यता आहे आणि हे घडू नये म्हणून काय करता येईल? (ब) बायबलमध्ये सापडलेल्या ज्ञानाच्या खजिन्यात आपण का भर पाडत राहू शकतो?
५ असा दृष्टिकोन विकसित करणे कठीण नाही. उदाहरणार्थ, तुम्ही आधीच काही प्रमाणात “देवाविषयीचे ज्ञान” आत्मसात केले आहे. यात विश्वासू मानवांना परादीस पृथ्वीवर सार्वकालिक जीवन देण्याच्या यहोवाच्या उद्देशाविषयीचे सत्य समाविष्ट आहे. (स्तोत्र ३७:२८, २९) तुम्ही पहिल्यांदा सत्य शिकला तेव्हा साहजिकच ते तुम्हाला एका अस्सल खजिन्यासारखे वाटले असावे, असे ज्ञान ज्यामुळे तुमच्या मनात व हृदयात उज्ज्वल आशा व आनंद निर्माण झाला. पण आता? काळाच्या ओघात, त्या खजिन्याविषयी तुमची कदर कमी झाली आहे का? मग, यावर दोन उपाय तुम्ही करू शकता. पहिल्यांदा, पुन्हा तीच कदर निर्माण करण्याचा प्रयत्न करा; म्हणजे यहोवाने शिकवलेले प्रत्येक सत्य, अनेक वर्षांपूर्वी शिकलेले असले तरीसुद्धा, ते मोलाचे का वाटते याचा नियमितपणे विचार करा.
६ दुसरे पाऊल म्हणजे, खजिन्यात भर पाडत राहा. समजा, जमीन खोदताना अचानक तुम्हाला हिरा सापडला, तर तुम्ही तो खिशात टाकून तेथून निघून जाल का? की तेथे आणखी काही सापडते का म्हणून तुम्ही खोदत राहाल? देवाच्या वचनात असंख्य मोलवान सत्ये आहेत जी रूपे व बहुमोल खजिन्यातील वस्तूंप्रमाणे आहेत. तुम्हाला कितीही सापडली तरी आणखी सापडू शकतात. (रोमकर ११:३३) सत्याचा एखादा नवीन पैलू शिकायला मिळतो तेव्हा स्वतःला विचारा: ‘हे इतके मोलवान का आहे? यातून मला यहोवाच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल किंवा त्याच्या उद्देशांबद्दल अधिक समज प्राप्त होते का? येशूच्या पावलांवर पाऊल टाकून चालण्यास सहायक ठरेल असे व्यावहारिक मार्गदर्शन यात आहे का?’ अशा प्रश्नांवर मनन केल्यामुळे यहोवाने तुम्हाला शिकवलेल्या सत्यांविषयी तुमची प्रीती वाढत जाईल.
आपण शिकवत असलेल्या सत्यांविषयी प्रीती प्रदर्शित करणे
७, ८. बायबलमधून शिकलेल्या सत्यांविषयी आपल्याला प्रीती वाटते हे इतरांना दाखवण्याचे काही मार्ग कोणते आहेत? एक उदाहरण द्या.
७ इतरांना शिकवताना, देवाच्या वचनातून शिकलेली सत्ये आपल्याला प्रिय वाटतात हे आपण कसे दाखवू शकतो? येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करून, आपण प्रचार व शिकवण्याच्या कार्यात बायबलवर पूर्णपणे विसंबून राहावे. अलीकडील काळात, सबंध जगातील देवाच्या लोकांना सार्वजनिक सेवाकार्यात बायबलचा अधिकाधिक उपयोग करण्यास प्रोत्साहित करण्यात आले आहे. या सूचनेचे पालन करताना, तुम्ही बायबलमधून जे दाखवत आहात ते तुम्हाला मोलवान वाटते हे घरमालकाला दाखवण्याचे मार्ग शोधा.—मत्तय १३:५२.
८ उदाहरणार्थ, मागच्या वर्षी न्यू यॉर्क शहरात झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर एक ख्रिस्ती बहीण सेवाकार्यात भेटणाऱ्या लोकांना स्तोत्र ४६:१, ११ ही वचने दाखवत होती. या भयंकर घटनेतून आपण कशाप्रकारे सावरत आहात असे ती आधी लोकांना विचारायची. मग त्यांचे लक्षपूर्वक ऐकून घेतल्यावर ती त्यांना म्हणायची: “या कठीण काळात मला ज्या वचनाने खरोखर सांत्वन दिले आहे ते मी तुम्हाला दाखवू का?” फार कमी लोकांनी तिला नकारार्थी उत्तर दिले आणि यामुळे तिला अनेक लोकांशी चर्चा करण्याची संधी मिळाली. वयाने लहान असलेल्या मुलामुलींशी बोलताना हीच बहीण सहसा म्हणते: “मी जवळजवळ ५० वर्षांपासून बायबलविषयी शिकवत आले आहे. पण आजपर्यंत मला अशी एकही समस्या आढळली नाही जी सोडवण्याकरता हे पुस्तक मदत करत नाही.” प्रामाणिक, उत्साही मनोवृत्तीने बोलल्यामुळे आपण लोकांना हे दाखवतो की देवाच्या वचनातून आपण जे शिकलो त्याबद्दल आपल्याला कदर आणि प्रीती वाटते.—स्तोत्र ११९:९७, १०५.
९, १०. आपल्या विश्वासासंबंधी प्रश्नांची उत्तरे देताना बायबलचा उपयोग करणे का महत्त्वाचे आहे?
९ लोक आपल्याला आपल्या विश्वासांविषयी प्रश्न विचारतात तेव्हा आपल्याला देवाच्या वचनाबद्दल प्रीती आहे हे दाखवण्याची उत्तम संधी आपल्याकडे असते. येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करून आपण आपली उत्तरे केवळ आपल्या स्वतःच्या विचारांच्या आधारावर देत नाही. (नीतिसूत्रे ३:५, ६) उलट आपण उत्तर देताना बायबलचा उपयोग करतो. आपल्याला कोणीतरी प्रश्न विचारेल आणि आपल्याला त्याचे उत्तर देता येणार नाही अशी तुम्हाला भीती वाटते का? या भीतीवर मात करण्यासाठी तुम्ही पुढील दोन व्यावहारिक सूचनांचे पालन करू शकता.
१० आपल्याकडून होईल तितकी चांगली तयारी करा. प्रेषित पेत्राने लिहिले: “ख्रिस्ताला प्रभु म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना; आणि तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा; तरी ते सौम्यतेने व भीडस्तपणाने द्या.” (१ पेत्र ३:१५) तुम्ही आपल्या विश्वासांचे समर्थन करण्यास तयार आहात का? उदाहरणार्थ, बायबलच्या विरोधात असलेल्या एखाद्या प्रथेचे पालन तुम्ही का करत नाही असे कोणी विचारल्यास, फक्त “आमच्या धर्मात चालत नाही” असे म्हणण्यात समाधान मानू नका. अशाप्रकारे उत्तर दिल्याने असे सूचित होते जणू तुम्ही इतरांना तुमच्याकरता निर्णय घेऊ देता आणि त्यामुळे तुम्ही एका गुप्त धर्मपंथाचे (कल्ट) सदस्य आहात असा लोकांचा ग्रह होऊ शकतो. यापेक्षा असे म्हणणे अधिक श्रेयस्कर ठरेल, की “देवाचे वचन, बायबल याला परवानगी देत नाही” किंवा “मी ज्या देवाची उपासना करतो त्याला हे आवडणार नाही.” आणि यानंतर त्याची सयुक्तिक कारणे तुम्ही समजावून सांगू शकता.—रोमकर १२:१.
११. संशोधनाचे कोणते साधन आपल्याला देवाच्या वचनातील सत्यासंबंधी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार राहायला मदत करू शकते?
११ एखाद्या प्रश्नाचे उत्तर देण्यास आपण असमर्थ आहोत असे वाटत असल्यास, शास्त्रवचनीय चर्चा या पुस्तिकेचा अभ्यास करण्याकरता तुम्ही काही वेळ खर्च करू शकता. * सहसा ज्यांविषयी विचारले जाते असे विषय निवडा आणि मग त्यांवर काही शास्त्रवचनीय मुद्दे पाठ करण्याचा प्रयत्न करा. चर्चेसाठी पवित्रशास्त्र विषय पुस्तिका आणि बायबल सहज सापडेल अशा ठिकाणी ठेवा. या दोन्ही प्रकाशनांचा उपयोग करण्यास कचरू नका. कदाचित तुम्ही त्या व्यक्तीला सांगू शकता की तुमच्याजवळ एक संशोधनाचे साधन आहे ज्याचा तुम्ही बायबलमधून उत्तरे शोधून काढण्याकरता उपयोग करू इच्छिता.
१२. बायबलविषयीच्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहीत नसल्यास आपण काय उत्तर देऊ शकतो?
१२ अनावश्यक काळजी करू नका. कोणत्याही अपरिपूर्ण मनुष्याला सर्व प्रश्नांची उत्तरे देता येणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला ज्याचे उत्तर माहीत नाही असा एखादा बायबलविषयीचा प्रश्न विचारला जातो तेव्हा तुम्ही पुढील आशयाचे उत्तर देऊ शकता: “तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला आहे. खरे सांगायचे तर मला याचे उत्तर माहीत नाही. पण बायबलमध्ये या विषयी मार्गदर्शन असेल याची मला खात्री आहे. बायबल विषयांवर संशोधन करायला मला आवडते, त्यामुळे या तुमच्या प्रश्नांबद्दल मी अभ्यास करून नंतर तुम्हाला याचे उत्तर देईन.” अशाप्रकारे प्रामाणिक, विनम्र मनोवृत्ती राखल्यास आपण अधिक चर्चेकरता मार्ग मोकळा करू शकतो.—नीतिसूत्रे ११:२.
आपण ज्यांना शिकवतो त्या लोकांविषयी प्रीती बाळगा
१३. आपण ज्यांना प्रचार करतो त्या लोकांविषयी सकारात्मक मनोवृत्ती बाळगणे का गरजेचे आहे?
१३ येशूने ज्या लोकांना शिकवले त्यांविषयी त्याला प्रीती होती. याबाबतीत आपण त्याचे अनुकरण कसे करू शकतो? प्रकटीकरण १६:१४; यिर्मया २५:३३) पण कोण जिवंत राहील आणि कोण राहणार नाही हे आपल्याला माहीत नाही. तो न्याय भविष्यात केला जाईल आणि यहोवाने ज्याला नियुक्त केले आहे तो अर्थात येशू ख्रिस्त हा न्याय करेल. तो न्याय केला जाईपर्यंत आपण प्रत्येक व्यक्तीला यहोवाचा संभाव्य सेवक समजतो.—मत्तय १९:२४-२६; २५:३१-३३; प्रेषितांची कृत्ये १७:३१.
जगातल्या लोकांविषयी आपण कधीही असंवेदनशील वृत्ती बाळगू नये. ‘सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाची लढाई’ अधिकच जवळ येऊ लागली आहे आणि मनुष्यजातीतील कोट्यवधी लोकांचा नाश होईल हे कबूल आहे. (१४. (अ) आपल्याला लोकांबद्दल खरोखर सहानुभूती वाटते का याचे आपण कशाप्रकारे परीक्षण करू शकतो? (ब) इतरांबद्दल सहानुभूती आणि वैयक्तिक आस्था आपण कोणत्या व्यावहारिक मार्गांनी दाखवू शकतो?
१४ येशूप्रमाणेच आपणही लोकांबद्दल सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करतो. स्वतःला आपण विचारू शकतो: ‘मला लोकांबद्दल दया वाटते का, ज्यांची या जगाच्या धार्मिक, राजकीय किंवा व्यापारी घटकांकडून फसवणूक केली जात आहे? आपल्या संदेशाबद्दल ते बेपर्वा मनोवृत्ती दाखवत असतील, तर असे त्यांना का वाटते हे समजून घेण्याचा मी प्रयत्न केला का? मी स्वतः आणि आज यहोवाची विश्वासूपणे सेवा करत असलेले इतरजणही एकेकाळी असाच विचार करत होते याची जाणीव ठेवतो का? त्यानुसार मी माझ्या प्रचाराची पद्धत बदलली आहे का? की हे लोक बदलणारच नाहीत असे म्हणून मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो?’ (प्रकटीकरण १२:९) आपण दाखवत असलेली सहानुभूती प्रामाणिक आहे हे लोकांना जाणवते तेव्हा ते आपल्या संदेशाला अधिक चांगला प्रतिसाद देण्याची शक्यता आहे. (१ पेत्र ३:८) आपण लोकांबद्दल खरी सहानुभूती बाळगल्यास आपण साहजिकच त्यांच्याबद्दल अधिक आस्था दाखवण्यास प्रेरित होऊ. त्यांचे प्रश्न आणि त्यांनी व्यक्त केलेले विचार आपण आठवणीत ठेवू शकतो. मग आपण पुन्हा त्यांच्याकडे जातो तेव्हा त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांबद्दल आपण विचार करत होतो हे आपण त्यांना दाखवू शकतो. जर त्यांना काही तातडीची गरज असेल तर आपण काही व्यावहारिक मदत देखील देऊ शकतो हे त्यांना सांगा.
१५. आपण लोकांच्या चांगल्या गुणांकडे का लक्ष दिले पाहिजे आणि आपण असे कशाप्रकारे करू शकतो?
१५ येशूप्रमाणे आपण लोकांच्या चांगल्या गुणांकडे लक्ष देतो. एखादी स्त्री कदाचित एकट्याने आपल्या मुलांचे संगोपन करण्याचा प्रशंसनीय प्रयत्न करत असेल. एखादा पुरुष आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी संघर्ष करत असेल. एखादी वयोवृद्ध व्यक्ती आध्यात्मिक गोष्टींबद्दल अभिरूची दाखवत असेल. आपण ज्या लोकांना भेटतो त्यांच्या अशा चांगल्या गुणांकडे आपण लक्ष देतो का? असे केल्यामुळे आपण आपसांत असलेल्या समानतेवर जोर देत असतो आणि यामुळे राज्याविषयी साक्ष देण्याकरता मार्ग मोकळा होऊ शकतो.—प्रेषितांची कृत्ये २६:२, ३.
प्रीती दाखवण्याकरता नम्रता आवश्यक
१६. आपण ज्यांना प्रचार करतो त्यांच्याशी विनम्रपणे व आदरपूर्वक वागणे का महत्त्वाचे आहे?
१६ आपण ज्यांना शिकवतो त्यांच्याविषयी आपल्याला प्रीती असल्यास बायबलच्या या सूज्ञ इशाऱ्याकडे लक्ष देण्यास आपण प्रेरित होऊ: “ज्ञान फुगविते, प्रीति उन्नति करिते.” (१ करिंथकर ८:१) येशूजवळ भरपूर ज्ञान होते, पण तो कधीही गर्विष्ठपणे वागला नाही. आपल्या विश्वासांबद्दल इतरांना सांगताना वाद घालण्याच्या अविर्भावात किंवा आपण फारच श्रेष्ठ आहोत अशा अविर्भावात बोलण्याचे टाळा. आपले ध्येय हे लोकांच्या मनाचा ठाव घेऊन आपल्याला प्रिय वाटणाऱ्या सत्यांकडे त्यांनाही आकर्षित करण्याचे आहे. (कलस्सैकर ४:६) आठवणीत असू द्या, पेत्राने ख्रिस्ती लोकांना उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असण्याचा सल्ला दिला तेव्हा त्याने “ते सौम्यतेने व भीडस्तपणाने द्या” अशी देखील आठवण करून दिली. (१ पेत्र ३:१५) आपण विनम्रपणे आणि आदरपूर्वक वागलो तर आपण सेवा करत असलेल्या देवाकडे लोकांना आकर्षित करणे आपल्याला अधिक सोपे जाईल.
१७, १८. (अ) सेवक या नात्याने आपल्या पात्रतेसंबंधी टीकात्मक मनोवृत्ती बाळगणाऱ्यांना आपण कसा प्रतिसाद द्यावा? (ब) बायबल विद्यार्थ्यांकडे बायबलच्या प्राचीन भाषांचे ज्ञान असणे आवश्यक का नाही?
१७ लोकांना आपले ज्ञान किंवा शैक्षणिक पात्रता दाखवून त्यांच्यावर छाप पाडण्याची गरज नाही. तुमच्या क्षेत्रातील लोक विशिष्ट पदव्या नसलेल्या व्यक्तीकडून काहीही ऐकण्यास नकार देत असल्यास त्यांच्या वृत्तीमुळे निराश होऊ नका. येशूने रब्बींच्या प्रसिद्ध शाळांतून शिक्षण घेतले नसल्यामुळे त्याच्याविषयी आक्षेप घेण्यात आला तेव्हा येशूने त्याकडे लक्ष दिले नाही; तसेच आपल्या ज्ञानाने लोकांचे मन जिंकण्याचा प्रयत्न करून तो त्याकाळातील सर्वसामान्य मतांचा गुलाम बनला नाही.—योहान ७:१५.
१८ ख्रिस्ती सेवकांकरता प्रापंचिक शिक्षणापेक्षा नम्रता आणि प्रीती हे गुण कैक पटीने महत्त्वाचे आहेत. महान शिक्षक, यहोवा २ करिंथकर ३:५, ६) आणि ख्रिस्ती धर्मजगतातील पाळकवर्गाचे म्हणणे काहीही असले तरीसुद्धा, देवाच्या वचनाचे शिक्षक होण्याकरता आपल्याला बायबलच्या प्राचीन भाषांचे ज्ञान घेण्याची गरज नाही. यहोवाने बायबल इतक्या सुस्पष्ट रितीने प्रेरित केले आहे की कोणीही त्यातील मोलवान सत्यांविषयी समजू शकतो. ही सत्ये हजारो भाषांत अनुवाद केल्यानंतरही जशीच्या तशीच राहतात. तेव्हा प्राचीन भाषांचे ज्ञान प्रसंगी उपयोगी पडत असले तरीसुद्धा ते आवश्यक नाही. शिवाय, भाषांचे ज्ञान असल्यामुळे गर्व निर्माण होऊन एक व्यक्ती खऱ्या ख्रिश्चनांकरता आवश्यक असलेला एक गुण गमावू शकते.—१ तीमथ्य ६:४.
आपल्याला सेवाकार्याकरता पात्रता देतो. (१९. आपले ख्रिस्ती सेवाकार्य एकप्रकारची सेवा आहे असे आपण का म्हणू शकतो?
१९ आपल्या ख्रिस्ती सेवेकरता नम्र मनोवृत्ती असणे गरजेचे आहे हे निर्विवाद आहे. आपण नियमितपणे विरोध, उपेक्षा आणि छळ होण्याची जोखीम घेत असतो. (योहान १५:२०) पण विश्वासूपणे आपली सेवा केल्यामुळे आपण एक महत्त्वपूर्ण सेवा करत असतो. आपण नम्रपणे या कार्याद्वारे इतरांची सेवा करत राहिल्यास आपण येशू ख्रिस्ताने लोकांबद्दल दाखवलेल्या प्रीतीचे अनुकरण करत असू. विचार करा: दुर्लक्ष करणाऱ्या किंवा विरोध करणाऱ्या हजार लोकांना प्रचार केल्यानंतर जर आपल्याला एक मेंढरासमान व्यक्ती सापडणार असेल, तर ती सर्व मेहनत सार्थक ठरेल की नाही? निश्चितच! तेव्हा हार मानू नका, कार्य करत राहा कारण आपण अजून संदेश न ऐकलेल्या मेंढरांसमान व्यक्तींची विश्वासूपणे सेवा करत आहोत. यहोवा व येशू अंत येण्याआधी अशा अनेक मोलवान व्यक्तींना शोधून त्यांना मदत करण्याचा मार्ग मोकळा करतील यात शंका नाही.—हाग्गय २:७.
२०. कोणते काही मार्ग आहेत ज्यांतून आपण आपल्या उदाहरणाने शिकवू शकतो?
२० इतरांची सेवा करण्याची तयारी दाखवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे स्वतःच्या आदर्शावरून शिकवणे. उदाहरणार्थ, “आनंदी देव” यहोवा याची सेवा करणे हे जीवनात सर्वाधिक समाधान देणारे आहे असे आपल्याला लोकांना शिकवायचे आहे असे समजा. (१ तीमथ्य १:११, NW) आपल्या शेजाऱ्यांबरोबर, शाळासोबत्यांबरोबर, सहकाऱ्यांबरोबर आपण कसे वागतो आणि व्यवहार करतो हे ते पाहतील तेव्हा आपण आनंदी आणि समाधानी आहोत हे त्यांना दिसून येईल का? त्याचप्रकारे, या दुष्ट, असंवेदनशील जगात ख्रिस्ती मंडळी एखाद्या मरूवनाप्रमाणे आहे असे आपण आपल्या बायबल विद्यार्थ्यांना शिकवतो. पण आपण आपल्या मंडळीतल्या सर्वांवर प्रेम करतो आणि एकमेकांसोबत शांती कायम राखण्याकरता झटतो हे त्यांना सहजासहजी दिसून येते का?—१ पेत्र ४:८.
२१, २२. (अ) आपल्या सेवेसंबंधी आत्म परीक्षण केल्यामुळे आपल्याला कोणत्या संधींचा फायदा उचलण्याचे प्रोत्साहन मिळू शकते? (ब) टेहळणी बुरूजच्या पुढील अंकात कशाविषयी चर्चा केली जाईल?
२१ आपल्या सेवाकार्याप्रती उत्सुक मनोवृत्ती आपल्याला स्वतःचे परीक्षण करण्यास मदत करेल. प्रामाणिकपणे असे केल्यामुळे बऱ्याच जणांना दिसून आले आहे की ते पूर्ण वेळेची सेवा सुरू करून किंवा अधिक गरज असलेल्या ठिकाणी जाऊन आपली सेवा वाढवण्याच्या स्थितीत आहेत. इतरांनी एखादी नवीन भाषा शिकून स्वतःच्याच क्षेत्रात परदेशातून येऊन स्थाईक झालेल्या एखाद्या वाढत्या समाजाची सेवा करायचे ठरवले आहे. तुम्हाला यांपैकी काही करणे शक्य असल्यास याविषयी काळजीपूर्वक व प्रार्थनापूर्वक विचार करा. सेवेला वाहून घेतल्यामुळे जीवनात आनंद, समाधान व मनःशांती मिळते.—उपदेशक ५:१२.
२२ तेव्हा, आपण जी सत्ये शिकवतो त्यांबद्दल आणि ज्या लोकांना शिकवतो त्यांच्याबद्दल वाटणारी प्रीती अधिकाधिक वाढवून आपण सर्व प्रकारे येशू ख्रिस्ताचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू. या दोन मार्गांनी प्रीती विकसित केल्यामुळे व प्रदर्शित केल्यामुळे आपण ख्रिस्तासमान शिक्षक होण्याकरता एक उत्तम पाया घालू. पण त्यानंतर आपण कशाप्रकारे प्रगती करू शकू? टेहळणी बुरूजच्या पुढील अंकातील लेख मालिकेत येशूने वापरलेल्या विशिष्ट शिक्षण पद्धतींविषयी चर्चा केली जाईल.
[तळटीप]
^ परि. 11 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• येशूचे उदाहरण अत्युच्च दर्जाचे असले तरीही आपण त्याचे पालन करू शकतो याविषयी आपण का आश्वस्त राहू शकतो?
• बायबलमधून शिकलेल्या सत्यांविषयी आपल्याला प्रीती आहे हे आपण कशाप्रकारे दाखवू शकतो?
• ज्ञानात प्रगती करत असताना नम्र राहणे का महत्त्वाचे आहे?
• ज्या लोकांना आपण शिकवू इच्छितो त्यांच्याबद्दल आपण कोणत्या काही मार्गांनी प्रीती व्यक्त करू शकतो?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१६ पानांवरील चित्रे]
तयार राहण्याकरता आपल्या परीने प्रयत्न करा
[१६, १७ पानांवरील चित्रे]
तुम्ही “देवाविषयीचे ज्ञान” साठवून ठेवल्यास, बायबलचा परिणामकारकरित्या उपयोग करू शकाल
[१८ पानांवरील चित्र]
आपण लोकांना सुवार्ता सांगण्याद्वारे त्यांच्याबद्दल प्रीती प्रदर्शित करू शकतो