व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आधुनिक ग्रीक भाषेत बायबल छापण्यासाठी संघर्ष

आधुनिक ग्रीक भाषेत बायबल छापण्यासाठी संघर्ष

आधुनिक ग्रीक भाषेत बायबल छापण्यासाठी संघर्ष

स्वतंत्र विचारांचे माहेरघर या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या ग्रीसमध्ये सामान्य लोकांच्या भाषेत बायबलचा अनुवाद करण्याचा इतिहास एक प्रदीर्घ व कडा संघर्ष राहिला आहे हे ऐकून तुम्हाला आश्‍चर्य वाटेल. पण समजण्यास सुलभ असलेले ग्रीक बायबल छापण्याकरता कोणाचा विरोध असावा? कोणाला हे काम बंद करावेसे वाटेल?

एखाद्याला वाटेल की, ग्रीक भाषिकांना खास अधिकार आहेत कारण पवित्र शास्त्रवचनांचा बराचसा भाग मूलतः त्यांच्याच भाषेत लिहिण्यात आला होता. परंतु, आधुनिक ग्रीक भाषा, इब्री शास्त्रवचनांच्या सेप्टुआजिंट अनुवादातील व ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांतील ग्रीक भाषेपेक्षा फार वेगळी आहे. किंबहुना, गेल्या सहा शतकांपासून बहुतांश ग्रीक भाषिकांना बायबलची ग्रीक भाषा परक्या भाषेसारखीच वाटते. जुन्या शब्दांऐवजी नवीन शब्द आले आहेत आणि शब्दसंग्रह, व्याकरण व वाक्यरचना पूर्णपणे बदलली आहे.

तिसऱ्‍या ते सोळाव्या शतकांदरम्यानच्या ग्रीक हस्तलिखितांच्या एका संग्रहातून ग्रीक भाषेच्या एका नंतरच्या रूपात सेप्टुआजिंटचा अनुवाद करण्याचा प्रयत्न केला होता याला पुष्टी मिळते. तिसऱ्‍या शतकात, निओसिझेरियाचे बिशप (सा.यु. २१३-२७० च्या सुमारास), ग्रेगरी यांनी सेप्टुआजिंटमधून उपदेशकाच्या पुस्तकाचा अनुवाद साध्या ग्रीकमध्ये केला. मासेदोनियात राहणारा एक यहुदी, टोबायस बेन एलिएझर याने ११ व्या शतकात, सेप्टुआजिंटच्या पेन्टेट्यूकमधील काही भागांचा अनुवाद सामान्य ग्रीकमध्ये केला. त्याने मासेदोनियन यहुदी लोकांच्या फायद्याकरता इब्री लिपीचा देखील वापर केला कारण ते फक्‍त ग्रीक भाषा बोलत होते पण इब्री लिपी वाचत होते. अशाप्रकारचे संपूर्ण पेन्टेट्यूक (बायबलची पहिली पाच पुस्तके) १५४७ साली कॉन्स्टंटीनोपल येथे प्रकाशित करण्यात आले.

अंधःकारात मंद प्रकाश

बायझंटाईन साम्राज्यातील ग्रीक भाषिकांचे प्रदेश १५ व्या शतकात ऑटोमन लोकांच्या हाती पडल्यावर तेथील बहुतांश लोकांना शिक्षण मिळेनासे झाले. ऑटोमन साम्राज्याची ऑर्थोडॉक्स चर्चवर खास मर्जी होती तरीही चर्चने आपल्या कळपाकडे दुर्लक्ष करून त्यांना गरीब, अशिक्षित शेतकरी बनू दिले. ग्रीक लेखक टॉमस स्पीलिओस यांनी म्हटले: “आपल्या सदस्यांना इस्लामच्या आक्रमणापासून आणि रोमन कॅथलिक प्रसारापासून सुरक्षित ठेवणे हे ऑर्थोडॉक्स चर्चचे आणि त्याच्या शिक्षण व्यवस्थेचे प्रमुख ध्येय होते. परिणामस्वरूप, ग्रीक शिक्षण काहीसे निष्क्रिय झाले होते.” अशा आशाहीन वातावरणात, बायबल चाहत्यांना बायबलमधील स्तोत्रसंहिता या पुस्तकातून त्रासलेल्या लोकांना विसावा आणि सांत्वन देण्याची गरज भासली. १५४३ पासून १८३५ पर्यंत, सामान्य प्रचारातील ग्रीक भाषेत स्तोत्रसंहितेचे १८ अनुवाद उपलब्ध होते.

संपूर्ण ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचा पहिला ग्रीक अनुवाद, कलीपलीसचा ग्रीक मठवासी, मॅक्सिमस कालीपोलीटीस याने १६३० साली तयार केला. हे काम, कॉन्स्टंटीनोपलचा धर्मगुरू आणि ऑर्थोडॉक्स चर्चमधील भावी धर्मसुधारक सिरिल ल्युकारस याच्या निर्देशनाखाली आणि मदतीने पार पडले. तथापि, चर्चमध्ये ल्युकारसचे अनेक विरोधक होते आणि ते धर्मसुधारणेचे कसलेही प्रयत्न स्वीकारायला किंवा बोली भाषेत बायबलचे भाषांतर करण्यास संमती द्यायला तयार नव्हते. * त्याला विश्‍वासघातकी ठरवून फाशी देण्यात आली. तरीही, मॅक्सिमसच्या अनुवादाच्या सुमारे १,५०० प्रती १६३८ साली छापण्यात आल्या. या अनुवादाच्या प्रतिसादात, ३४ वर्षांनी एका ऑर्थोडॉक्स धर्मगुरूने जेरुसलेममध्ये असे घोषित केले की, शास्त्रवचने “सामान्य लोकांनी वाचू नयेत तर योग्य संशोधन केल्यावर गहन आध्यात्मिक गोष्टींचा अभ्यास करणाऱ्‍यांनीच फक्‍त वाचावीत.” याचा अर्थ, शास्त्रवचने केवळ शिक्षित पादरी वर्गानेच वाचावीत.

सन १७०३ मध्ये, लेझवॉस द्वीपावरील एक ग्रीक मठवासी, सराफिम याने लंडनमध्ये मॅक्सिमस अनुवादाची पुनरावृत्ती छापण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांच्या राजकचेरीतून आर्थिक मदत मिळण्याची आशा राहिली नाही तेव्हा त्याने स्वतःचा पैसा घालून पुनरावृत्ती छापली. आवेशपूर्ण प्रस्तावनेत सराफिम याने “प्रत्येक देवभक्‍त ख्रिश्‍चनाला” बायबल वाचण्याची गरज आहे यावर जोर दिला आणि “लोकांना अज्ञानात ठेवून स्वतःची गैरवर्तणूक झाकण्याचा प्रयत्न” करत असल्याचा आरोप त्याने चर्चच्या उच्च श्रेणीतील पादरी वर्गावर केला. याचा व्हायचा तोच परिणाम झाला; त्याच्या विरोधकांनी रशियात त्याला अटक करवली आणि सायबेरियाला बंदिवासात पाठवले जेथे १७३५ साली तो मरण पावला.

त्या काळातील ग्रीक भाषिकांच्या तीव्र आध्यात्मिक भूकेविषयी भाष्य करताना, मॅक्सिमस अनुवादाच्या नंतरच्या एका पुनरावृत्तीविषयी एका ग्रीक पाळकाने पुढील विधान मांडले: “इतरांसोबत ग्रीक भाषिकांनी देखील आवडीने व उत्कंठेने हे पवित्र बायबल स्वीकारले. त्यांनी ते वाचले. त्यांच्या जखमा भरून आल्यासारखे त्यांना वाटले आणि देवावरील त्यांचा विश्‍वास . . . प्रज्वलित झाला.” परंतु, धार्मिक गुरूंना अशी भीती होती की, लोकांना बायबल समजू लागले तर पादरी वर्गाचे गैरशास्त्रवचनीय विश्‍वास आणि कृती उघडकीस येतील. त्यामुळे १८२३ मध्ये आणि नंतर पुन्हा १८३६ मध्ये, कॉन्स्टंटीनोपलमधील चर्चच्या मुख्य कार्यालयाने अशा सर्व बायबल अनुवादांना जाळून टाकण्याचा हुकूम दिला.

धारिष्ट अनुवादक

तीव्र विरोध व बायबल ज्ञानाविषयी उत्कंठेच्या या वातावरणात, एका महत्त्वपूर्ण व्यक्‍तीचे आगमन झाले जो आधुनिक ग्रीक भाषेतील बायबलच्या अनुवादामध्ये महत्त्वाचा ठरणार होता. या धैर्यवान व्यक्‍तीचे नाव होते, नेओफिटोस वामवास. तो सुप्रसिद्ध बहुभाषाविज्ञ आणि महशूर बायबल विद्वान होता; त्याला “राष्ट्राचे शिक्षक” यांपैकी एक मानले जात होते.

वामवासला स्पष्ट दिसत होते की, लोकांच्या आध्यात्मिक अडाणीपणासाठी ऑर्थोडॉक्स चर्च मुख्यतः जबाबदार होते. त्याचा असा पक्का विश्‍वास होता की, लोकांमध्ये आध्यात्मिक जागृती निर्माण करण्यासाठी त्या काळात प्रचारात असलेल्या ग्रीकमध्ये बायबलचे भाषांतर होणे आवश्‍यक होते. १८३१ साली, इतर विद्वानांच्या मदतीने त्याने साहित्यिक ग्रीकमध्ये बायबलचा अनुवाद करायला सुरवात केली. त्याचा संपूर्ण अनुवाद १८५० साली प्रकाशित झाला. ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चकडून त्याला पाठिंबा न मिळाल्यामुळे त्याने ब्रिटिश आणि परदेशी बायबल संस्था (बीएफबीएस) यांच्या सहकार्याने आपल्या अनुवादाचे प्रकाशन व वितरण कार्य पार पाडले. चर्चने त्याला “प्रोटेस्टंट” हे नाव दिले आणि त्याला बहिष्कृत केले.

वामवास यांनी किंग जेम्स व्हर्शनच्या आधारे अनुवाद केला आणि त्यातल्या चुका देखील तशाच उतरवल्या गेल्या कारण त्या काळात बायबलचा व्यासंग व भाषाज्ञान सीमित होते. तरीही, अनेक वर्षांपर्यंत, लोकांना उपलब्ध असलेले आधुनिक ग्रीकमधील बायबलची उणीव याच अनुवादाने पूर्ण केली. मनोरंजक गोष्ट अशी की, यात देवाचे व्यक्‍तिगत नाव चार वेळा “इओव्हा” या रूपात सापडते.—उत्पत्ति २२:१४; निर्गम ६:३; १७:१५; शास्ते ६:२४.

या सुलभ बायबल अनुवादाविषयी आणि समजण्यास सोपे असलेल्या बायबलच्या इतर भाषांतरांविषयी लोकांची सामान्य प्रतिक्रिया काय होती? याला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला! एका ग्रीक द्वीपावरील एका बोटीत, बीएफबीएसच्या एका बायबल विक्रेत्याकडे मुलांनी भरलेल्या इतक्या बोटी [बायबल] घ्यायला येत होत्या की शेवटी त्याला . . . [बोटीच्या] कप्तानला बोट सुरू करायला सांगावे लागले” नाहीतर त्याची सगळी पुस्तके एकाच ठिकाणी संपली असती! पण, विरोधकही मूग गिळून बसले नव्हते.

ऑर्थोडॉक्स पाळकांनी आपल्या लोकांना असे अनुवाद न घेण्याची ताकीद दिली. उदाहरणार्थ, अथेन्स शहरात बायबले जप्त करण्यात आली. १८३३ साली, क्रेटच्या ऑर्थोडॉक्स बिशपने एका मठात सापडलेल्या ‘नव्या करारांची’ होळी केली. एका पाळकाने एक प्रत लपवून ठेवली आणि जवळपासच्या गावांतल्या लोकांनी ते बिशप द्वीप सोडून जाईपर्यंत आपापल्या प्रती लपवून ठेवल्या.

काही वर्षांनी कॉर्फ्यू बेटावर, वामवास यांच्या बायबलच्या अनुवादावर ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चच्या होली सायनॉडने बंदी घातली. त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आणि त्याच्या सर्व प्रती नष्ट करण्यात आल्या. चीओस, सायरोस आणि मायकोनोस या बेटांवर, स्थानीय पाळकांच्या विरोधामुळे बायबलची पुस्तके जाळण्यात आली. पण बायबलच्या अनुवादावर आणखी बंदी पुढे यायची होती.

राणी बायबलमध्ये रस घेते

अठराशे सत्तरच्या दशकात, ग्रीसची राणी ओल्गा हिच्या लक्षात आले की, सामान्य ग्रीक जनतेला बायबलविषयी फार कमी ज्ञान होते. शास्त्रवचनांच्या ज्ञानामुळे जनतेला समाधान आणि विसावा मिळेल असे वाटल्यामुळे तिने वामवास आवृत्तीपेक्षा सोप्या भाषेत बायबलचे भाषांतर करवून घेण्याचा प्रयत्न केला.

अनधिकृतपणे, या कार्यासाठी अथेन्सचे आर्चबिशप आणि होली सायनॉडचे प्रमुख यांनी राणीला उत्तेजन दिले. तिने अधिकृत मान्यता मिळवण्यासाठी होली सायनॉडला अर्ज दिल्यावर मात्र, तो अमान्य करण्यात आला. तरीपण तिने हार मानली नाही आणि दुसऱ्‍यांदा अर्ज दिला, पण तोही १८९९ साली नाकारण्यात आला. याकडे दुर्लक्ष करून, तिने स्वखर्चाने एका आवृत्तीच्या सीमित प्रती छापण्याचा निर्णय घेतला. १९०० साली हे साध्य झाले.

कट्टर विरोधक

सन १९०१ मध्ये, ॲक्रोपॉलीस या प्रमुख अथेनियन बातमीपत्रात लिव्हरपूल, इंग्लंड येथे काम करणारे अनुवादक, अलेक्झांडर पालीस, यांनी डेमॉटिक ग्रीक भाषेत केलेल्या मत्तयाच्या शुभवर्तमानाच्या अनुवादाचे प्रकाशन करण्यात आले. पालीस व त्यांच्या सहकार्यांचा, ‘ग्रीक लोकांना शिक्षित’ करावे आणि अवनतीतून “राष्ट्राला वर येण्यास मदत” करावी हा हेतू होता.

हा अनुवाद “राष्ट्राच्या सर्वात मौल्यवान पूज्य वस्तूंची निंदा,” व पवित्र शास्त्राचा अपमान आहे असे ऑर्थोडॉक्स थिओलॉजीच्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या प्राध्यापकांनी म्हटले. कॉन्स्टंटीनोपलचे धर्मगुरू इओआकीम तिसरे यांनी सदर भाषांतराबद्दल नापसंती व्यक्‍त करणारा दस्तऐवज काढला. या वादविषयाने राजकीय स्वरूप घेतले आणि विरोधी राजकीय पक्षांनी त्याचा धूर्तपणे निमित्त म्हणून उपयोग केला.

अथेनियन बातमीपत्राच्या काही प्रभावशाली लोकांनी पालीस अनुवादावर आक्रमण करायला सुरवात केली आणि त्या अनुवादाचे समर्थक “नास्तिक,” “विश्‍वासघातकी,” “विदेशी शक्‍तींचे गुप्तहेर,” व ग्रीक समाजाला कमकुवत करण्याचा हेतू बाळगणारे आहेत असे ते त्यांच्याबद्दल बोलू लागले. १९०१ साली नोव्हेंबर ५ ते ८ दरम्यान ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चच्या पुराणमतवादी गटांनी चेतवल्यामुळे विद्यार्थ्यांनी अथेन्समध्ये दंगली केल्या. त्यांनी ॲक्रोपॉलीसच्या कार्यालयांवर हल्ला केला, राजमहालाभोवती प्रदर्शने केली, अथेन्स विद्यापीठावर कब्जा केला आणि सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी केली. दंगलींच्या शेवटी, सैन्यासोबत झालेल्या संघर्षात आठ लोक ठार झाले होते. दुसऱ्‍या दिवशी, राजाने आर्चबिशप प्रोकोपीओसला राजीनामा द्यायला सांगितला आणि दोन दिवसांनी संपूर्ण मंत्रीमंडळाने राजीनामा दिला.

एका महिन्यानंतर विद्यार्थ्यांनी पुन्हा प्रदर्शने केली आणि जाहीरपणे पालीस अनुवादाची एक प्रत जाळली. या अनुवादाच्या वितरणाविरुद्ध एक ठराव त्यांनी संमत केला आणि भविष्यात अशा कोणत्याही प्रयत्नासाठी कडक शिक्षा देण्याची मागणी केली. बायबलच्या कोणत्याही आधुनिक ग्रीक भाषेतील अनुवादावर बंदी आणण्यासाठी हे एक निमित्त ठरले. तो खरोखर अंधकारमय समय होता!

“प्रभूचे वचन सर्वकाळ टिकते”

आधुनिक ग्रीक भाषेतील बायबलचा उपयोग करण्यावरची बंदी १९२४ साली रद्द करण्यात आली. तेव्हापासून, ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्च लोकांपासून बायबल दूर ठेवण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. दरम्यानच्या काळात, यहोवाच्या साक्षीदारांनी इतर देशांप्रमाणे ग्रीसमध्येही बायबल शिक्षणाचे कार्य जोराने सुरू केले आहे. १९०५ सालापासून, हजारो ग्रीक भाषिकांना बायबलच्या सत्याचे ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून त्यांनी वामवास अनुवादाचा उपयोग केला आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये, अनेक विद्वानांनी आणि प्राध्यापकांनी आधुनिक भाषेत बायबल तयार करण्यासाठी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत. आज, बायबलचे संपूर्ण किंवा निम्मे उपलब्ध असलेले सुमारे ३० अनुवाद आहेत जे सामान्य ग्रीक लोकांना समजण्यासारखे आहेत. यामध्ये, १९९७ साली ग्रीक भाषेत प्रकाशित झालेले पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर अत्यंत मोलवान ठरले आहे; जगभरातील ग्रीक भाषा बोलणाऱ्‍या १.६ कोटी लोकांसाठी ते फायद्याचे ठरले आहे. यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेला देवाच्या वचनाचा हा अनुवाद सुलभ, समजण्यास सोपा आणि मूळ मजकुराशी अगदी तंतोतंत जुळणारा आहे.

आधुनिक ग्रीक भाषेत बायबल उपलब्ध करण्यासाठी झालेल्या संघर्षातून एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे, मानवांनी कितीही विरोध केला तरी “प्रभूचे वचन सर्वकाळ टिकते.”—१ पेत्र १:२५.

[तळटीप]

^ परि. 7 सिरिल ल्युकारसविषयी अधिक माहितीकरता, टेहळणी बुरूज, फेब्रुवारी १५, २०००, पृष्ठे २६-९ पाहा.

[२७ पानांवरील चित्र]

सिरिल ल्युकारस यांनी १६३० साली संपूर्ण ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांच्या पहिल्या ग्रीक अनुवादाचे निर्देशन केले

[चित्राचे श्रेय]

Bib. Publ. Univ. de Genève

[२८ पानांवरील चित्रे]

सोप्या ग्रीकमधील काही अनुवाद: स्तोत्रसंहिता छापली: (१) १८२८ साली इलारियोन यांनी, (२) १८३२ साली वामवास यांनी, (३) १६४३ साली ज्यूल्यानस यांनी. “जुना करार” छापला: (४) १८४० साली वामवास यांनी

महाराणी ओल्गा

[चित्राचे श्रेय]

बायबल: National Library of Greece; महाराणी ओल्गा: Culver Pictures

[२६ पानांवरील चित्राचे श्रेय]

पपायरस: Reproduced by kind permission of The Trustees of the Chester Beatty Library, Dublin

[२९ पानांवरील चित्राचे श्रेय]

पपायरस: Reproduced by kind permission of The Trustees of the Chester Beatty Library, Dublin