शाफान व त्याच्या कुटुंबाशी तुमचा परिचय आहे का?
शाफान व त्याच्या कुटुंबाशी तुमचा परिचय आहे का?
बायबल वाचताना कधी शाफान व त्याच्या नामचीन घराणाऱ्यातील काही सदस्यांच्या संदर्भात काही वाचल्याचे तुम्हाला आठवते का? हे कोण लोक होते? काय करीत होते? आणि त्यांच्यापासून आपल्याला काय शिकायला मिळते?
बायबलमध्ये शाफानची ओळख, “शाफान बिन असल्या बिन मशुल्लम” या शब्दांत सा.यु.पू. ६४२ सालादरम्यान योशियाने केलेल्या खऱ्या उपासनेच्या पुनर्स्थापनेच्या संदर्भात आपल्याला करून देण्यात आली आहे. (२ राजे २२:३) पुढच्या ३६ वर्षांदरम्यान, सा.यु.पू. ६०७ साली जेरूसलेमचा नाश होईपर्यंत आपल्याला शाफानच्या चार मुलांची अर्थात, अहीकाम, एलासा, गमऱ्या आणि याजना तसेच त्याचे दोन नातू मीखाया आणि गदल्या यांची देखील ओळख करून देण्यात येते. (तक्ता पाहा.) एन्सायक्लोपेडिया जुडायका स्पष्टीकरण देते की “शाफानच्या घराण्याची [यहुदाच्या राज्यात] मक्तेदारी होती आणि योशीयाच्या काळापासून बंदिवासात जाईपर्यंत राजाच्या शास्त्र्याचे पद त्यांनी भूषवले.” बायबलमध्ये शाफान व त्याच्या कुटुंबाविषयी दिलेली माहिती आपल्याला हे समजून घेण्यास मदत करेल की त्यांनी कशाप्रकारे यिर्मया संदेष्ट्याला आणि यहोवाच्या खऱ्या उपासनेला पाठबळ दिले.
शाफान खऱ्या उपासनेला पाठबळ देतो
सा.यु.पू. ६४२ साली राजा योशीया २५ वर्षांचा असताना शाफान हा राजाचा चिटणीस आणि लेखक म्हणून सेवा करत असल्याचा उल्लेख आहे. (यिर्मया ३६:१०, पं.र.भा.) या कार्यात काय अंतर्भूत होते? वर उल्लेख केलेल्या संदर्भ ग्रंथात असे म्हटले आहे की राजाच्या सेवेतील लेखक व चिटणीस हा राजाचा खासगी सल्लागार असे; आर्थिक व्यवहारांचा त्याच्यावर जिम्मा असे आणि तो राजदूतकामात कुशल तसेच परराष्ट्रीय कारभार, आंतरराष्ट्रीय कायदा आणि व्यापारविषयक करार यांसारख्या क्षेत्रांत वाकबगार असे. त्याअर्थी, राजाचा चिटणीस या नात्याने शाफान यहुदातील सर्वात वजनदार पुरुषांत गणला जात असे.
दहा वर्षांआधी, अद्याप वयाने लहान असतानाच योशीया, “आपला पूर्वज दावीद याच्या देवाच्या भजनी लागला.” शाफान अर्थातच योशीयापेक्षा वयाने मोठा होता आणि त्यामुळे तो त्याला उत्तम आध्यात्मिक सल्ला आणि खऱ्या उपासनेच्या पुनर्स्थापनेकरता योशीयाने हाती घेतलेल्या पहिल्या मोहिमेत पूर्ण पाठिंबा देण्याच्या स्थितीत होता. *—२ इतिहास ३४:१-८.
मंदिराच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना, तेथे “नियमशास्त्राचा ग्रंथ” गवसला आणि “शाफानाने तो राजास वाचून दाखविला.” राजाने त्यातील शब्द ऐकले तेव्हा त्याला धक्का बसला आणि त्याने त्या मजकुराविषयी विचारण्याकरता लगेच आपल्या विश्वासू माणसांचे एक शिष्टमंडळ हुल्दा संदेष्ट्रीकडे पाठवले. शाफान व त्याचा पुत्र अहीकाम यांनाही त्या शिष्टमंडळात सामील करण्याद्वारे राजाने त्यांच्यावर विश्वास प्रकट केला.—२ राजे २२:८-१४; २ इतिहास ३४:१४-२२.
स्वतः शाफानने काय केले यासंबंधी हा शास्त्रवचनांतील एकुलता एक अहवाल आहे. बायबलच्या इतर वचनांत त्याचा केवळ अमुक व्यक्तीचा पिता किंवा आजोबा म्हणून उल्लेख आढळतो. शाफानच्या वंशजांचा यिर्मया संदेष्ट्याशी जवळून संपर्क आला.
अहीकाम व गदल्या
आपण याआधीच पाहिल्याप्रमाणे, शाफानचा पुत्र अहीकाम याचा पहिल्यांदा उल्लेख हुल्दा संदेष्ट्रीकडे पाठवण्यात आलेल्या शिष्टमंडळाच्या संदर्भात आढळतो. एका संदर्भ ग्रंथात असे म्हटले आहे: “इब्री बायबलमध्ये अहीकामच्या पदाचा स्पष्ट उल्लेख केलेला नसला तरीसुद्धा, तो एक उच्च पदस्थ अधिकारी होता यात शंका नाही.”
त्या घटनेच्या १५ वर्षांनंतर यिर्मयाचे जीवन धोक्यात होते. यहोवा जेरूसलेमचा नाश करणार असल्याचे त्याने लोकांना बजावून सांगितले तेव्हा, “याजकांनी, संदेष्ट्यांनी व सर्व लोकांनी यिर्मयास पकडून म्हटले, तू मेलाच पाहिजेस.” मग काय घडले? अहवालात पुढे असे म्हटले आहे: “शाफानाचा पुत्र अहीकाम याचे यिर्मयाला पाठबळ होते, म्हणून तो लोकांच्या हाती लागला नाही, व त्यांनी त्याला ठार मारिले नाही.” (यिर्मया २६:१-२४) यावरून काय दिसून येते? दी अँकर बायबल डिक्शनरी यात असे म्हटले आहे: “या घटनेवरून अहीकामच्या चलतीची तर खात्री पटतेच पण शाफानच्या घराण्यातील इतर सदस्यांप्रमाणेच त्याला देखील यिर्मयाविषयी सहानुभूती होती हे देखील यावरून सूचित होते.”
सुमारे २० वर्षांनंतर, म्हणजे सा.यु.पू. ६०७ साली बॅबिलोन्यांनी जेरूसलेमचा नाश करून बहुतेक लोकांना बंदिवासात नेल्यानंतर शाफानचा नातू आणि अहीकामचा पुत्र गदल्या यास यहुदी शेषजनांवर अधिपती नियुक्त करण्यात आले. त्याने देखील शाफानच्या घराण्यातील इतरांप्रमाणे यिर्मयाची काळजी घेतली का? बायबलमधील अहवाल असे सांगतो: “तेव्हा यिर्मया निघून मिस्पा एथे गदल्या बिन अहीकाम याजकडे गेला व . . . त्यांच्यामध्ये जाऊन राहिला.” काही महिन्यांतच गदल्या यास ठार मारण्यात आले आणि अवशिष्ट यहुद्यांनी मिसर देशात जाताना यिर्मयाला आपल्यासोबत नेले.—यिर्मया ४०:५-७; ४१:१, २; ४३:४-७.
गमऱ्या व मीखाया
शाफानचा पुत्र गमऱ्या आणि नातू मीखाया यांनी यिर्मया पुस्तकातील ३६ व्या अध्यायातील घटनांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. सा.यु.पू. ६२४ च्या सुमारास यहोयाकीम राजाच्या पाचव्या वर्षी या घटना घडल्या. यिर्मयाचा चिटणीस बारूख याने यहोवाच्या मंदिरातील, “शाफानाचा पुत्र गमऱ्या लेखक याच्या दिवाणखान्यात,” ग्रंथात लिहिलेली यिर्मयाची वचने वाचून दाखविली. तेव्हा “मीखाया बिन गमऱ्या बिन शाफान याने त्या ग्रंथातली परमेश्वराची सर्व वचने ऐकली.”—यिर्मया ३६:९-११.
मीखायाने आपल्या पित्याला व इतर सर्व सरदारांना या ग्रंथपटाविषयी सांगितले आणि त्या सर्वांना त्यातील मजकूर ऐकण्याची उत्सुकता होती. त्यांची काय प्रतिक्रिया होती? “ती सर्व वचने ऐकल्यावर ते भयभीत होऊन एकमेकांकडे वळले व बारुखास म्हणाले: ‘आम्ही ही सर्व वचने राजाला अवश्य सांगू.’” पण राजाशी बोलण्याआधी त्यांनी बारूखला असा सल्ला दिला की: “जा, यिर्मया व तू लपून राहा; तुम्ही कोठे राहाल हे कोणाला कळू देऊ नका.”—यिर्मया ३६:१२-१९.
त्यांनी अपेक्षा केल्याप्रमाणेच राजाने ग्रंथपटातील संदेश यिर्मया ३६:२१-२५) जेरमाया—ॲन आर्कियोलॉजिकल कम्पॅनियन या पुस्तकात पुढील निष्कर्षात्मक विधान केले आहे: “गमऱ्या हा यहोयाकीम राजाच्या दरबारात यिर्मयाचा कडा समर्थक होता.”
स्वीकारला नाही, उलट तो फाडून आगीत टाकला. शाफानचा पुत्र गमऱ्या याच्यासहित इतर काही सरदारांनी ‘तो पट जाळू नये म्हणून राजाला विनंति केली, पण त्याने त्यांचे ऐकले नाही.’ (एलासा व याजना
सा.यु.पू. ६१७ साली बॅबिलोनने यहुदा राज्याचा ताबा घेतला. ‘सर्व सरदार, सर्व पराक्रमी, कारागीर व लोहार’ यांच्यासहित संदेष्टा यहेज्केल यालाही हजारो यहुद्यांसोबत बंदिवासात नेण्यात आले. मत्तन्या, ज्याचे नाव बॅबिलोन्यांनी बदलून सिदकीया ठेवले त्याला बॅबिललोनच्या राजाने आपल्या गैरहजरीत राज्य करण्यास यहुदावर नेमले. (२ राजे २४:१२-१७) नंतर सिदकीयाने बॅबिलोनला एक शिष्टमंडळ पाठवले ज्यात शाफानचा पुत्र एलासा देखील होता. यिर्मयाने एलासाच्या हाती बंदिवासातील यहुद्यांकरता यहोवाकडून एक महत्त्वाचा संदेश असलेले पत्र सुपूर्त केले.—यिर्मया २९:१-३.
अशारितीने बायबलमधील अहवाल दाखवतो की शाफान, त्याचे तीन पुत्र आणि त्याचे दोन नातू यांनी आपल्या उच्च पदांचा खऱ्या उपासनेला आणि विश्वासू संदेष्टा यिर्मया यास पाठबळ देण्याकरता उपयोग केला. शाफानचा पुत्र याजना याच्याविषयी काय? शाफानच्या कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणे त्याने केले नाही, तर त्याने मूर्तिपूजेत सहभाग घेतल्याचे दिसून येते. बॅबिलोनमधील बंदिवासाच्या सहाव्या वर्षी, म्हणजे सा.यु.पू. ६१२ च्या सुमारास संदेष्टा यहेज्केलाला एक दृष्टान्त झाला ज्यात त्याला ७० पुरुष जेरुसलेममधील मंदिरात मूर्तींसमोर धूप अर्पण करताना दिसले. यांपैकी एक होता याजना; केवळ त्याचाच नावाने उल्लेख करण्यात आला आहे. यावरून असे सूचित होते की तो या लोकांमध्ये प्रमुख होता. (यहेज्केल ८:१, ९-१२) याजनाच्या उदाहरणावरून दिसून येते की केवळ एका देवभीरू कुटुंबात संगोपन झाल्यामुळे एक व्यक्ती यहोवाची विश्वासू उपासक बनेलच असे सांगता येत नाही. प्रत्येक व्यक्ती आपापल्या कृतीकरता जबाबदार आहे.—२ करिंथकर ५:१०.
शाफान व त्याच्या कुटुंबाची वंशावळ
शाफान व त्याचे कुटुंब जेरूसलेममधील घटनांमध्ये सहभागी झाले तोपर्यंत यहुदात मुद्रांचा वापर सर्रास होऊ लागला होता. महत्त्वाच्या दस्तऐवजांवर सह्या करण्याकरता मुद्रांचा वापर केला जात असे. या मुद्रा मौल्यवान रत्ने, धातू, हस्तिदंत किंवा काचेच्या असत. सहसा त्यांवर मुद्रेच्या मालकाचे नाव, त्याच्या वडिलांचे नाव आणि कधीकधी मालकाचे पद देखील कोरलेले असे.
इब्री भाषेतील अशा शेकडो मातीच्या मुद्रा सापडल्या आहेत. प्राचीन इब्री मुद्रित लेखांच्या विषयावरील
तज्ज्ञ प्राध्यापक नाहमान आवीगाद सांगतात: “इब्री मुद्रित लेखांपैकी केवळ या मुद्रांवरील कोरीव लेखांतच बायबलमधील व्यक्तींचा उल्लेख आढळतो.” शाफान किंवा त्याच्या घराण्यातील इतरांचा उल्लेख असलेल्या मुद्रा सापडल्या आहेत का? होय, पृष्ठ १९ व २१ वरील चित्रांत आढळणाऱ्या मुद्रांवर शाफान व त्याचा पुत्र गमऱ्या यांची नावे कोरलेली आहेत.विद्वानांचे असेही म्हणणे आहे की कदाचित शाफानच्या कुटुंबातील आणखी चार व्यक्तींचा मुद्रांवरील लेखात उल्लेख आहे. या व्यक्ती म्हणजे, शाफानचा पिता अजल्या, शाफानचा पुत्र अहीकाम, शाफानचा पुत्र गमऱ्या आणि एका कोरीव लेखात गदल्या “दरबारातील प्रमुख” असल्याचा उल्लेखही आढळतो. या मुद्रांपैकी चवथी मुद्रा शाफानचा नातू गदल्या याच्या मालकीची असून, त्याचा पिता अहीकाम याचा त्यावर उल्लेख आढळत नाही. मुद्रा लेखावरील त्याच्या पदवीवरून असे सूचित होते की तो राज्यातील सर्वात उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपैकी होता.
आपल्याकरता कोणता धडा?
शाफान व त्याच्या घराण्याने, स्वतःच्या उच्च पदाचा खऱ्या उपासनेला व विश्वासू संदेष्टा यिर्मया यास पाठबळ देण्याकरता उपयोग करण्याच्या बाबतीत उत्तम उदाहरण आपल्यासमोर ठेवले आहे. आपणही यहोवाच्या संस्थेला आणि सहविश्वासू उपासकांना पाठबळ पुरवण्याकरता आपल्या साधनसंपत्तीचा व प्रभावाचा उपयोग करू शकतो.
आपण नियमित बायबल वाचतो आणि केवळ त्यावरच समाधान न मानता त्याचे बारकाईने परीक्षण करून शाफान व त्याच्या कुटुंबियांसारख्या यहोवाच्या प्राचीन काळातील उपासकांशी ओळख करून घेतो तेव्हा आपल्याला मोठे समाधान प्राप्त होते आणि त्यासोबतच आपला विश्वासही मजबूत होतो. ते देखील आपल्यासमोर असलेल्या अनुकरणीय ‘साक्षीरूपी मेघात’ सामील आहेत.—इब्री लोकांस १२:१.
[तळटीप]
^ परि. 6 शाफान योशीयापेक्षा बऱ्याच वर्षांनी मोठा असावा कारण योशीया २५ वर्षांचा असताना शाफानचा पुत्र अहीकाम हा एक प्रौढ पुरुष होता.—२ राजे २२:१-३, ११-१४.
[२२ पानांवरील चौकट]
हुल्दा—एक प्रभावशाली संदेष्ट्री
मंदिरात सापडलेल्या ‘नियमशास्त्राच्या ग्रंथातील’ मजकूर ऐकल्यानंतर राजा योशीया याने शाफान व चार इतर उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना या ग्रंथाविषयी ‘परमेश्वरास प्रश्न’ करण्यास पाठवले. (२ राजे २२:८-२०) या अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला ग्रंथाविषयीची माहिती कोठे सापडली? त्या काळात, यिर्मया, आणि कदाचित नहूम व सफन्या हे यहुदातच राहात होते. हे तिघेही संदेष्टे व बायबलमधील पुस्तकांचे लेखक होते. पण तरीसुद्धा राजाचे शिष्टमंडळ त्यांच्याकडे न जाता संदेष्ट्री हुल्दा हिच्याकडे गेले.
जेरूसलेम—ॲन आर्कियोलॉजिकल बायोग्रफी या पुस्तकात असे विधान आढळते: “या अहवालातील एक खास गोष्ट म्हणजे यातील स्त्री-पुरुषांचा पैलू अगदीच दुर्लक्षित राहतो. सर्व पुरुष सदस्यांचे शिष्टमंडळ नियमशास्त्राच्या ग्रंथपटाचा अर्थ समजून घेण्याकरता एका स्त्रीकडे तो नेतात ही गोष्ट कोणालाही खटकली नाही. तिने त्या ग्रंथात प्रभूचेच वचन असल्याचे घोषित केले तेव्हा या प्रश्नावर निर्णय देण्याच्या तिच्या अधिकाराविषयी कोणीही शंका घेतली नाही. प्राचीन इस्राएलात स्त्रियांच्या भूमिकेविषयी अभ्यास करणारे बरेच विद्वान या अहवालाकडे सहसा दुर्लक्ष करतात.” अर्थात, तिने घोषित केलेला संदेश यहोवाने कळवलेला होता.
[२१ पानांवरील रेखाचित्र/चित्र]
शाफानची वंशावळ
मशुल्लम
↓
अजल्या
↓
शाफान
↓ ↓ ↓ ↓
अहीकाम एलासा गमऱ्या याजना
↓ ↓
गदल्या मीखाया
[२० पानांवरील चित्र]
गमऱ्या व इतरांनी यहोयाकीम राजाला यिर्मयाचा ग्रंथपट न जाळण्याची विनंती केली
[२२ पानांवरील चित्र]
याजना शाफानच्या घराण्याचा सदस्य असूनही एका दृष्टान्तात त्याला मूर्तिपूजा करताना पाहण्यात आले
[१९ पानांवरील चित्राचे श्रेय]
Courtesy Israel Antiquities Authority
[२१ पानांवरील चित्राचे श्रेय]
Courtesy Israel Antiquities Authority