‘माझ्या वचनात राहा’
‘माझ्या वचनात राहा’
“तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहा.”—योहान ८:३१.
१. (अ) येशू स्वर्गात परत गेला तेव्हा तो पृथ्वीवर काय सोडून गेला? (ब) आपण कोणते प्रश्न विचारात घेणार आहोत?
ख्रिस्ती धर्माचा संस्थापक, येशू ख्रिस्त, स्वर्गात परतला तेव्हा तो या पृथ्वीवर आपण लिहिलेले ग्रंथ, आपण बांधलेले स्मारक किंवा गोळा केलेली अमाप संपत्ती सोडून गेला नाही. तर त्याने आपल्यामागे आपल्या शिष्यांना सोडले होते आणि त्याचे शिष्य होण्याकरता काही अटी देखील घालून दिल्या होत्या. किंबहुना, योहानाच्या शुभवर्तमानात आपल्याला अशा तीन अटी सापडतात ज्या येशूचा शिष्य होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने पूर्ण केल्या पाहिजेत. या अटी कोणत्या आहेत? आपण त्या कशा पूर्ण करू शकतो? आणि आज आपण ख्रिस्ताचे शिष्य म्हणवण्यास योग्य आहोत याची खात्री आपण कशी करू शकतो? *
२. शिष्य होण्याकरता, योहानाच्या शुभवर्तमानात लिहिल्याप्रमाणे एक महत्त्वाची अट कोणती?
२ मृत्यू होण्याच्या सुमारे सहा महिन्यांआधी येशू जेरूसलेमला गेला आणि एका आठवड्यापर्यंत चालणाऱ्या मंडपांच्या सणाकरता एकत्रित झालेल्या लोकांना त्याने प्रचार केला. परिणामस्वरूप, अर्धा सण आटोपल्यावर “बऱ्याच जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.” येशू प्रचार करत राहिला; आणि त्यामुळे, सणाच्या शेवटल्या दिवशी पुन्हा एकदा “पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.” (योहान ७:१०, १४, ३१, ३७; ८:३०) तेव्हा, येशूने या नव्याने विश्वास ठेवलेल्या लोकांना उद्देशून, आपले शिष्य होण्याकरता आवश्यक असलेली एक महत्त्वाची गोष्ट कोणती हे सांगितले. प्रेषित योहानाने आपल्या शुभवर्तमानात त्याविषयी अशाप्रकारे लिहिले आहे: “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहा.” (तिरपे वळण आमचे.)—योहान ८:३१.
३. ‘येशूच्या वचनात राहण्याकरता’ कोणता गुण आवश्यक आहे?
३ त्या नव्या लोकांचा विश्वास पुरेसा नव्हता असे येशूला सुचवायचे नव्हते. उलट त्यांच्याजवळ येशूचे खरे शिष्य होण्याची सुसंधी होती हे तो दाखवत होता; पण ते त्याच्या वचनात राहिले, व त्यांनी धीर धरला तरच हे शक्य होते. त्यांनी त्याचे वचन स्वीकारले होते खरे, पण आता त्यांनी त्यात कायम राहणे गरजेचे होते. (योहान ४:३४; इब्री लोकांस ३:१४) आपल्या अनुयायांनी धीर धरावा हे येशूला इतके महत्त्वाचे वाटत होते की आपल्या प्रेषितांसोबतचे त्याचे शेवटले संभाषण जे योहानाच्या शुभवर्तमानात लिहिलेले आहे, त्यात त्याने दोनदा त्यांना असे म्हणून आर्जवले की, “माझ्या मागे चालत राहा.” (योहान २१:१९, २२, NW) सुरवातीच्या बऱ्याच ख्रिश्चनांनी असेच केले. (२ योहान ४) धीर धरण्यास त्यांना कशामुळे साहाय्य मिळाले?
४. सुरवातीच्या ख्रिश्चनांना कशामुळे धीर धरणे शक्य झाले?
४ जवळजवळ सात दशके ख्रिस्ताचा एक विश्वासू शिष्य राहिलेल्या प्रेषित योहानाने एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले. विश्वासू ख्रिश्चनांना त्याने असे म्हणून शाबासकी दिली, की “तुम्ही बलवान आहा. तुमच्या ठायी देवाचे वचन राहते आणि त्या दुष्टाला तुम्ही जिंकले आहे.” ख्रिस्ताच्या त्या शिष्यांनी धीर धरला, किंवा दुसऱ्या शब्दांत ते देवाच्या वचनात राहिले कारण देवाचे वचन त्यांच्यात राहिले. त्यांना या वचनाबद्दल मनापासून कदर होती. (१ योहान २:१४, २४) त्याचप्रमाणे आज, ‘शेवटपर्यंत टिकून राहण्याकरता’ देवाचे वचन आपल्यात आहे की नाही याची आपण खात्री केली पाहिजे. (मत्तय २४:१३) आपण हे कसे करू शकतो? येशूने दिलेल्या एका दृष्टान्तात याचे उत्तर सापडते.
‘वचन ऐकणे’
५. (अ) येशूने एका दृष्टान्तात कोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनींचा उल्लेख केला आहे? (ब) येशूच्या दृष्टान्तातील बी व जमीन कशास सूचित करतात?
५ येशूने एका बी पेरणाऱ्याचा दृष्टान्त दिला आणि हा दृष्टान्त मत्तय, मार्क आणि लूक यांच्या शुभवर्तमानांत आढळतो. (मत्तय १३:१-९, १८-२३; मार्क ४:१-९, १४-२०; लूक ८:४-८, ११-१५) हे उतारे वाचताना तुम्हाला दिसून येईल की या दृष्टान्तात एक खास मुद्दा आहे. तो असा की, एकच प्रकारचे बी वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनींवर पडते आणि प्रत्येक वेळी याचा वेगवेगळा परिणाम होतो. पहिल्या प्रकारची जमीन कठीण, दुसरी पुरेशी माती नसलेली आणि तिसरी काटेरी झुडुपांची होती. पण चवथ्या प्रकारची जमीन अगदी वेगळी आहे, ती ‘चांगली जमीन’ आहे. स्वतः येशूने स्पष्टीकरण दिल्यानुसार बी म्हणजे देवाच्या वचनात सापडणारा राज्याचा संदेश असून जमीन म्हणजे लोकांच्या अंतःकरणाच्या वेगवेगळ्या स्थितींचे प्रतीक आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनींवरून सूचित केल्या जाणाऱ्या लोकांत काही समान गोष्टी आहेत, पण चांगली जमीन ज्या लोकांना सूचित करते त्यांच्यात असे एक वैशिष्ट्य आहे जे त्यांना इतर सर्वांहून वेगळे असल्याचे दाखवते.
६. (अ) येशूच्या दृष्टान्तातील चवथ्या प्रकारची जमीन इतर तीन प्रकारच्या जमिनींपेक्षा कशाप्रकारे वेगळी आहे आणि याचा काय अर्थ होतो? (ब) ख्रिस्ताचे शिष्य या नात्याने धीर दाखवण्याकरता कशाची आवश्यकता आहे?
६ लूक ८:१२-१५ येथील अहवाल दाखवतो की चारही उदाहरणांत लोक ‘वचन ऐकतात.’ पण ‘सालस व चांगल्या अंतःकरणाचे’ लोक केवळ ‘वचन ऐकण्यात’ समाधान मानत नाहीत. ते त्यास “धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात.” चांगली जमीन मऊ आणि खोल असल्याने मुळे अगदी खोलवर जाऊ शकतात आणि त्यामुळे बिजाला अंकुर फुटतो आणि ते फळ उत्पन्न करते. (लूक ८:८) त्याचप्रकारे चांगल्या अंतःकरणाचे लोक देवाचे वचन समजून घेतात, त्याची कदर करतात आणि त्यास आत्मसात करतात. (रोमकर १०:१०; २ तीमथ्य २:७) देवाचे वचन त्यांच्यात राहते. परिणामस्वरूप, ते धीराने पुष्कळ फळ उत्पन्न करतात. याचा अर्थ, ख्रिस्ताचे शिष्य या नात्याने धीर धरण्याकरता देवाच्या वचनाबद्दल मनःपूर्वक कदर असणे अत्यावश्यक आहे. (१ तीमथ्य ४:१५) पण आपण देवाच्या वचनाबद्दल अशी मनःपूर्वक कदर कशी उत्पन्न करू शकतो?
मनोवृत्ती आणि अर्थपूर्ण मनन
७. सालस मनाचा संबंध कशाशी जोडला जातो?
७ बायबलमध्ये चांगल्या व सालस मनाचा संबंध सहसा कशाशी जोडला जातो याकडे लक्ष द्या. “न्यायीचे मन उत्तर द्यायला विचार करते.” (तिरपे वळण आमचे.) (नीतिसूत्रे १५:२८, पं.र.भा.) “माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत.” (तिरपे वळण आमचे.) (स्तोत्र १९:१४) “माझ्या मनचे विचार सुज्ञतेचे असणार.” (तिरपे वळण आमचे.)—स्तोत्र ४९:३.
८. (अ) बायबल वाचताना आपण काय करण्याचे टाळावे व काय करण्याचा प्रयत्न करावा? (ब) देवाच्या वचनावर प्रार्थनापूर्वक मनन केल्याने आपल्याला कोणते फायदे मिळतात? (“सत्यात स्थिर झालेले” या पेटीतील माहितीचा समावेश करा.)
८ या बायबल लेखकांप्रमाणे आपणही देवाच्या वचनाबद्दल व त्याच्या कार्यांबद्दल कृतज्ञतेने आणि प्रार्थनापूर्वक मनन व विचार केला पाहिजे. बायबलचे किंवा बायबलवर आधारित प्रकाशनांचे वाचन करत असताना आपण अशा पर्यटकांप्रमाणे असू नये जे घाईगडबडीत एका प्रेक्षणीय स्थळावरून दुसऱ्या स्थळावर जातात, क्षणाक्षणाला फोटो घेतात पण खऱ्या अर्थाने देखावे पाहात नाहीत. उलट, बायबलचा अभ्यास करताना आपण जणू थांबून एकेक देखावा आपल्या नजरेतून मनात उतरवला पाहिजे. * वाचलेल्या गोष्टींवर शांतपणे विचार करत असताना देवाचे वचन आपल्या हृदयावर परिणाम करते. ते आपल्या भावनांना स्पर्श करते आणि आपल्या विचारांना आकार देते. आपल्या सर्वात अंतरंग भावना प्रार्थनेतून देवाला सांगण्याची ते आपल्याला प्रेरणा देते. याप्रकारे, यहोवासोबतचे आपले नाते अधिक घनिष्ट होते आणि त्याच्याविषयीचे प्रेम आपल्याला कठीण परिस्थितीतही येशूचे अनुकरण करत राहण्यास प्रवृत्त करते. (मत्तय १०:२२) स्पष्टपणे, आपल्याला शेवटपर्यंत विश्वासू राहायचे असल्यास, देवाच्या विचारांवर मनन करणे जरूरीचे आहे.—लूक २१:१९.
९. आपले हृदय नेहमी देवाचे वचन ग्रहण करण्यास उत्सुक राहावे म्हणून आपण काय करू शकतो?
९ येशूच्या दृष्टान्तातून दिसून येणारी आणखी एक गोष्ट म्हणजे, बीजाची अर्थात देवाच्या वचनाची वाढ होताना मार्गात बरेच अडथळे येतात. म्हणूनच, विश्वासू शिष्य या नात्याने टिकून राहण्याकरता आपण (१) दृष्टान्तात दिलेल्या निकृष्ट जमिनीवरून कोणते अडथळे सूचित होतात ते ओळखले पाहिजे आणि (२) सुधारणा करण्याकरता किंवा हे अडथळे टाळण्याकरता पावले उचलली पाहिजेत. अशाप्रकारे आपले हृदय राज्याचे बीज ग्रहण करण्यास नेहमी उत्सुक आणि फलदायी राहू शकेल.
“वाटेवर”—प्रपंचात तल्लीन
१०. येशूच्या दृष्टान्तातील पहिल्या प्रकारच्या जमिनीचे वर्णन करा आणि त्याचा अर्थ स्पष्ट करा.
१० सर्वप्रथम, काही बी “वाटेवर” पडले आणि “ते तुडविले गेले.” (लूक ८:५) शेतातून जाणाऱ्या वाटेवरील जमीन सहसा वाटसरूंच्या पायांखाली सतत तुडवली जात असल्यामुळे कठीण झालेली असते. (मार्क २:२३) त्याचप्रकारे, जगातील गोष्टींच्या व्यापात जे लोक अनावश्यक वेळ व शक्ती खर्च करतात त्यांना देवाच्या वचनाबद्दल मनःपूर्वक कदर उत्पन्न करण्याकरता वेळच उरत नाही. ते कानांनी वचन ऐकतात खरे पण त्यावर मनन करत नाहीत. त्यामुळे त्यांचे हृदय प्रतिसाद देऊ शकत नाही. आणि या वचनाबद्दल त्यांच्या मनात प्रेम निर्माण होण्याआधीच “सैतान येऊन त्यांच्या अंतःकरणातून वचन काढून घेतो.” (लूक ८:१२) हे टाळता येऊ शकते का?
११. आपल्या हृदयाची स्थिती कठीण जमिनीप्रमाणे होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो?
११ वाटेवरील नापीक जमिनीसारखे आपले हृदय होऊ नये म्हणून बरेच काही करता येण्यासारखे आहे. पायांखाली तुडवली जाणारी व त्यामुळे कठीण झालेली जमीन नांगरल्यास व त्यावरील वर्दळ दुसरीकडे वळवल्यास ती मऊ व सुपीक बनू शकते. त्याचप्रकारे, देवाच्या वचनाचा अभ्यास व त्यावर मनन करण्याकरता वेळ काढल्याने एका व्यक्तीचे अंतःकरणही चांगल्या व फलदायी जमिनीसारखे होऊ शकते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रापंचिक गोष्टींमध्ये अनावश्यक शक्ती व वेळ खर्च न करणे. (लूक १२:१३-१५) त्याऐवजी, जीवनातील “श्रेष्ठ” गोष्टींविषयी विचार करण्याकरता आवर्जून वेळ काढणे जरूरीचे आहे.—फिलिप्पैकर १:९-११.
“खडकाळीवर”—भयभीत होणे
१२. येशूच्या दृष्टान्तात उल्लेख केलेल्या दुसऱ्या प्रकारच्या जमिनीत उगवलेले रोपटे खरे तर कोणत्या कारणामुळे वाळून जाते?
१२ दुसऱ्या प्रकारच्या जमिनीवर बी पडते, तेव्हा पहिल्या वेळेस घडले त्याप्रमाणे ते केवळ जमिनीवर राहात नाही. तर ते मूळ धरते आणि त्याचे रोपही उगवते. पण मग ऊन पडताच हे रोप सूर्याच्या प्रखर किरणांमुळे वाळून जाते. पण एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष द्या. रोप वाळण्याचे खरे कारण सूर्याची किरणे नाहीत. कारण सूर्याची किरणे तर चांगल्या जमिनीतून उगवलेल्या रोपावरही पडतात, पण ते वाळत नाही—उलट, ते आणखी वाढते. हा फरक कशामुळे? येशू याचे स्पष्टीकरण देतो. तो सांगतो की हे रोपटे “माती खोल नसल्यामुळे” आणि “ओलावा नसल्यामुळे” वाळते. (मत्तय १३:५, ६; लूक ८:६) जमिनीच्या वरच्या थराच्या खालोखाल असलेला पहिला खडकाळ थर अर्थात “खडकाळी,” मुळांना खोलवर जाऊन ओलावा व स्थैर्य मिळवू देत नाही. आणि माती खोल नसल्यामुळे हे रोप वाळून जाते.
१३. कोणत्या प्रकारच्या व्यक्ती उथळ जमिनीप्रमाणे असतात आणि ते ज्याप्रकारे प्रतिसाद देतात त्यामागचे मूळ कारण काय असते?
१३ दृष्टान्ताचा हा भाग अशा व्यक्तींना सूचित करतो जे “वचन आनंदाने ग्रहण करितात,” आणि “काही वेळपर्यंत” आवेशाने येशूचे अनुकरण करतात. (लूक ८:१३) पण सूर्याच्या प्रखर किरणांप्रमाणे ‘संकटाला किंवा छळाला’ तोंड द्यावे लागताच ते इतके भयभीत होतात की ते आपला आनंद व मनोबल गमावून बसतात आणि शेवटी ख्रिस्ताचे अनुकरण करण्याचे सोडून देतात. (मत्तय १३:२१) पण विरोध हे त्यांच्या भयाचे केवळ वरकरणी कारण होय. कारण शेवटी काही झाले तरी, ख्रिस्ताच्या लाखो शिष्यांना कितीतरी प्रकारच्या संकटांना तोंड द्यावे लागते, पण तरीसुद्धा ते विश्वासू राहतात. (२ करिंथकर २:४; ७:५) काहीजणांच्या बाबतीत, भयभीत होऊन सत्याचा मार्ग सोडून देण्यामागचे खरे कारण म्हणजे त्यांचे अंतःकरण खडकाप्रमाणे कठीण झालेले असते; आणि त्यामुळे ते सकारात्मक व आध्यात्मिक गोष्टींविषयी सखोल विचार करू शकत नाहीत. परिणामस्वरूप, यहोवाबद्दल व त्याच्या वचनाबद्दल त्यांना वाटणारी कदर केवळ वरकरणी असते आणि विरोधाला तोंड देण्याइतकी ती पुरेशी नसते. असे घडू नये म्हणून काय करता येईल?
१४. आपले हृदय उथळ जमिनीप्रमाणे होऊ नये म्हणून एका व्यक्तीने कोणती पावले उचलली पाहिजेत?
१४ एका व्यक्तीने खात्री केली पाहिजे की तिच्या अंतःकरणात खडकासमान अडथळे तर नाहीत. हे बऱ्याच काळापासून जोपासलेले कटुत्व, प्रत्यक्ष न दिसून येणारा स्वार्थ किंवा अशाचप्रकारच्या कठोर पण वरवर दिसून न येणाऱ्या भावना असू शकतात. अशाप्रकारचा अडथळा आधीपासूनच असल्यास, देवाच्या वचनाच्या शक्तीने त्यास दूर करता येते. (यिर्मया २३:२९; इफिसकर ४:२२; इब्री लोकांस ४:१२) यानंतर प्रार्थनापूर्वक मनन केल्याने या व्यक्तीच्या हृदयात ‘वचन मुळावले’ जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. (याकोब १:२१) अशारितीने त्या व्यक्तीला निराशेला तोंड देण्याची शक्ती आणि परीक्षा आल्या तरी खंबीर राहण्याचे धैर्य मिळते.
“काटेरी झाडांमध्ये”—दुविधेत असणे
१५. (अ) येशूने उल्लेख केलेली तिसऱ्या प्रकारची जमीन खासकरून लक्ष देण्याजोगी का आहे? (ब) तिसऱ्या प्रकारच्या जमिनीच्या बाबतीत शेवटी काय घडते आणि का?
१५ तिसऱ्या प्रकारची अर्थात काटेरी झुडपे असलेली जमीन खासकरून लक्ष देण्यासारखी आहे कारण काही बाबतीत ती चांगल्या जमिनीसारखीच आहे. चांगल्या जमिनीप्रमाणे, काटेरी झुडपांची जमीन बिजाला मूळ धरून उगवू देते. सुरवातीला, या दोन्ही प्रकारच्या जमिनीत नव्या रोपट्याची सारखीच वाढ होते. पण कालांतराने अशी परिस्थिती निर्माण होते ज्यामुळे हळूहळू रोपाची वाढ खुंटते. या जमिनीत काटेरी झुडपे उगवतात. नवे रोपटे या जमिनीतून वर येऊ लागताच ‘त्याबरोबर वाढणारी काटेरी झाडे’ त्यासोबत चुरस करू लागतात. काही काळ दोन्ही रोपे पोषण, प्रकाश व जागेसाठी चढाओढ करतात पण शेवटी काटेरी झाडे रोपट्यावर वरचढ होतात आणि ‘त्याची वाढ खुंटवतात.’—लूक ८:७.
१६. (अ) कोणत्या प्रकारच्या व्यक्ती काटेरी झुडपांच्या जमिनीसारख्या असतात? (ब) तीन शुभवर्तमान वृत्तान्तांनुसार काटे कशास सूचित करतात?—तळटीप पाहा.
१६ कोणत्या प्रकारच्या व्यक्ती काटेरी झुडुपे असलेल्या जमिनीसारख्या आहेत? येशूने याविषयी स्पष्ट केले: “काटेरी झाडांमध्ये पडलेले हे आहेत की, ते ऐकतात, आणि संसाराच्या चिंता, धन व विषयसुख ह्यात आयुष्यक्रमण करीत असता त्यांची वाढ खुंटते व ते पक्व फळ देत नाहीत.” (लूक ८:१४) पेरणाऱ्याचे बी आणि काटे दोन्ही एकाच वेळी जमिनीत वाढत असल्याप्रमाणे काही व्यक्ती देवाचे वचन आणि “विषयसुख” या दोन्ही गोष्टी एकाच वेळी मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. देवाच्या वचनाचे सत्य त्यांच्या हृदयात पेरले जाते खरे पण वचनाशी चुरस करणाऱ्या इतर गोष्टी त्यांचे लक्ष आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करू लागतात. या लोकांचे लाक्षणिक हृदय विभाजित असते. (लूक ९:५७-६२) यामुळे ते देवाच्या वचनाबद्दल प्रार्थनापूर्वक व अर्थपूर्ण विचार करण्याकरता पुरेसा वेळ देत नाहीत. ते देवाचे वचन पूर्णपणे आत्मसात करत नाहीत आणि त्यामुळे संकटात टिकून राहण्याकरता लागणारी मनःपूर्वक गुणग्राहकता त्यांच्यात नसते. हळूहळू जगिक स्वार्थ त्यांच्या आध्यात्मिक कार्यांवर इतके वरचढ ठरतात की आध्यात्मिकदृष्ट्या त्यांची ‘वाढ खुंटते.’ * यहोवावर पूर्ण मनाने प्रेम न करणाऱ्यांचा किती दुःखद शेवट होतो!—मत्तय ६:२४; २२:३७.
१७. येशूच्या दृष्टान्तात उल्लेख केलेल्या लाक्षणिक काट्यांमुळे आपली आध्यात्मिक वाढ खुंटू नये म्हणून आपण जीवनात कोणते निर्णय घेतले पाहिजेत?
१७ भौतिक चिंतांपेक्षा आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य दिल्यास, जगाच्या सुखदुःखांमुळे आपली आध्यात्मिक वाढ खुंटण्याचे आपण टाळू शकतो. (मत्तय ६:३१-३३; लूक २१:३४-३६) बायबलचे वाचन व आपण जे वाचतो त्यावर विचार करण्याकडे आपण कधीही दुर्लक्ष करू नये. जीवनातील अनावश्यक गोष्टी शक्य तितक्या कमी केल्यामुळे आपल्याला एकाग्र होऊन प्रार्थनापूर्वक मनन करण्याकरता अधिक वेळ मिळेल. (१ तीमथ्य ६:६-८) देवाच्या काही सेवकांनी असेच केले आहे. फलदायी रोपट्याला अधिक पोषण, प्रकाश व जागा मिळावी म्हणून त्यांनी जणू त्यांच्या जमीनसदृश्य हृदयातून काटेरी झाडे उपटून टाकली आहेत आणि आज ते यहोवाचे आशीर्वाद अनुभवत आहेत. २६ वर्षांची सॅन्ड्रा म्हणते: “सत्यात असल्यामुळे मला मिळालेल्या आशीर्वादांबद्दल मी मनन करते तेव्हा मला जाणीव होते की जगात मिळवलेल्या कोणत्याच गोष्टीशी त्यांची तुलना करता येणार नाही!”—स्तोत्र ८४:११.
१८. आपण देवाच्या वचनात राहून ख्रिस्ती या नात्याने कशाप्रकारे टिकून राहू शकतो?
१८ आपण सर्वजण, तरुण असोत वा वृद्ध, देवाच्या वचनात आणि ख्रिस्ताचे शिष्य या नात्याने टिकून राहू शकतो, अट एवढीच आहे की देवाचे वचन आपल्यात राहिले पाहिजे. तर मग, आपल्या लाक्षणिक हृदयाची जमीन कधीही कठीण किंवा उथळ होऊ नये, आणि काटेरी झुडुपे त्यावर उगवू नयेत तर ती नेहमी मऊ व खोल राहावी म्हणून आपण प्रयास करू या. असे केल्यास, आपण देवाचे वचन पूर्णपणे आत्मसात करून ‘धीराने फळ देत राहू शकू.’—लूक ८:१५.
[तळटीपा]
^ परि. 1 या लेखात आपण यातील पहिल्या अटीवर विचार करू. उरलेल्या दोन पुढच्या दोन लेखात स्पष्ट केल्या जातील.
^ परि. 8 बायबलमधून वाचलेल्या एखाद्या उताऱ्यावर प्रार्थनापूर्वक विचार अथवा मनन करण्याकरता, तुम्ही स्वतःला पुढील प्रश्न विचारू शकता: ‘यातून यहोवाचा आणखी एक किंवा अनेक गुण दिसून येतात का? बायबलच्या मुख्य विषयाशी या माहितीचा काय संबंध आहे? याचा मी स्वतःच्या जीवनात किंवा इतरांना मदत करण्यासाठी कसा उपयोग करू शकतो?’
^ परि. 16 येशूच्या दृष्टान्ताच्या तिन्ही शुभवर्तमान वृत्तान्तांनुसार या जगातील सुखदुःखांमुळे बीजाची वाढ खुंटते: “प्रपंचाची चिंता,” “द्रव्याचा मोह,” “इतर गोष्टींचा लोभ,” व “विषयसुख.”—मार्क ४:१९; मत्तय १३:२२; लूक ८:१४; यिर्मया ४:३, ४.
तुमची उत्तरे काय आहेत?
• आपण ‘येशूच्या वचनात राहणे’ का गरजेचे आहे?
• आपण देवाच्या वचनाला आपल्या हृदयात कसे राहू देऊ शकतो?
• येशूने उल्लेख केलेल्या चार वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनींवरून कोणत्या प्रकारच्या व्यक्ती सूचित होतात?
• देवाच्या वचनावर विचार करण्याकरता तुम्ही कशाप्रकारे वेळ काढू शकता?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१० पानांवरील चौकट/चित्र]
‘सत्यात स्थिर झालेले’
बऱ्याच वर्षांपासून ख्रिस्ताचे शिष्य असलेल्या अनेकांनी दाखवून दिले आहे की ते ‘सत्यात स्थिर झालेले’ आहेत. (२ पेत्र १:१२) त्यांना कशामुळे टिकून राहण्यास मदत मिळते? त्यांचे मनोगत त्यांच्याच शब्दात ऐका.
“मी दररोज दिवसाच्या शेवटी बायबलचा काही भाग वाचते व प्रार्थना करते. मग वाचलेल्या भागावर काही वेळ मी विचार करते.”—जीन, १९३९ मध्ये बाप्तिस्मा झाला.
“यहोवा इतका महान असूनही आपल्यावर प्रेम करतो याबद्दल मनन केल्यामुळे मला सुरक्षिततेची जाणीव होते आणि विश्वासू राहण्याचे सामर्थ्य मिळते.”—पॅट्रिशा, १९४६ मध्ये बाप्तिस्मा झाला.
“बायबल अभ्यासाच्या चांगल्या सवयींना जडून राहिल्याने आणि ‘देवाच्या गहन गोष्टींमध्ये’ गढून गेल्याने मला यहोवाची सेवा अखंड करत राहण्यास साहाय्य मिळाले आहे.”—१ करिंथकर २:१०; ॲना, १९३९ मध्ये बाप्तिस्मा झाला.
“मी माझ्या मनाचे व हेतूंचे परीक्षण करण्याच्या उद्देशाने बायबलचे व बायबलवर आधारित प्रकाशनांचे वाचन करते.”—झेल्डा, १९४३ मध्ये बाप्तिस्मा झाला.
“कधीकधी मी एकटाच फिरायला जातो आणि यहोवाला प्रार्थना करून त्याच्याशी बोलतो. त्याच्याजवळ मन मोकळं करतो. हे माझ्यासाठी सर्वात आनंदाचे क्षण असतात.”—रॅल्फ, १९४७ मध्ये बाप्तिस्मा झाला.
“मी दैनिक वचनावर विचार करून आणि बायबलचा एक भाग वाचून दिवसाची सुरवात करते. यामुळे दररोज मला मनन करण्याकरता काहीतरी नवीन मिळते.”—मारी, १९३५ मध्ये बाप्तिस्मा झाला.
“बायबलच्या एखाद्या पुस्तकाच्या एकेका वचनाचे स्पष्टीकरण देणाऱ्या चर्चा मला जणू टॉनिकसारख्या वाटतात.”—डॅन्यल, १९४६ मध्ये बाप्तिस्मा झाला.
तुम्ही देवाच्या वचनावर प्रार्थनापूर्वक विचार करण्याकरता केव्हा वेळ काढता?—दानीएल ६:१०ब; मार्क १:३५; प्रेषितांची कृत्ये १०:९.
[१३ पानांवरील चित्र]
आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य दिल्याने आपण ‘धीराने फळ देत राहू’