वेदी उपासनेत तिचे काय स्थान?
वेदी उपासनेत तिचे काय स्थान?
वेदी, ही तुमच्या उपासनेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे असे तुम्हाला वाटते का? ख्रिस्ती धर्मजगताच्या चर्चेसला जाणाऱ्या अनेकांच्या जीवनात, वेदी अथवा ऑल्टरला फार महत्त्व असते. परंतु उपासनेत वेदीचा वापर करण्याविषयी बायबल काय सांगते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
बायबलमध्ये पहिल्या वेदीचा जो उल्लेख आला आहे तो, जलप्रलयानंतर जहाजाबाहेर आल्यावर नोहाने पशू अर्पण करण्यासाठी बांधलेल्या वेदीचा उल्लेख आहे. *—उत्पत्ति ८:२०.
बाबेलमध्ये भाषेचा गोंधळ झाल्यानंतर मानवजात संपूर्ण पृथ्वीच्या पाठीवर पांगली. (उत्पत्ति ११:१-९) ईश्वराचे नामस्मरण करण्याच्या उपजत प्रवृत्तीमुळे मानवांनी, ते ज्याला ओळखत नव्हते अशा देवाजवळ जाण्याचा प्रयत्न केला, अंधारात ‘चाचपडतात’ तसे ते त्याला शोधू लागले. (प्रेषितांची कृत्ये १७:२७; रोमकर २:१४, १५) नोहाच्या दिवसापासून पुष्कळ लोकांनी आपापल्या दैवतांसाठी वेद्या बांधल्या आहेत. वेगवेगळ्या धर्माच्या व संस्कृतीच्या लोकांनी खोट्या उपासनेसाठी वेद्यांचा उपयोग केला आहे. खऱ्या देवापासून दुरावल्यामुळे काही लोकांनी वेद्यांचा उपयोग बहुतेकदा, अतिशय भयानक अशा प्रथांसाठी जसे की नरबळी आणि मुलांचा बळी देण्यासाठी केला आहे. यहोवाची उपासना करण्याचे सोडून दिल्यावर इस्राएलच्या काही राजांनी बआलसारख्या खोट्या दैवतांसाठी वेद्या बांधल्या. (१ राजे १६:२९-३२) पण मग, खऱ्या उपासनेत वेद्यांच्या वापराविषयी काय?
इस्राएलमधील वेद्या आणि खरी उपासना
नोहानंतर इतर विश्वासू पुरुषांनी खरा देव यहोवा याची उपासना करण्यासाठी वेद्या बांधल्या. अब्राहामने शखेम, बेथेलजवळील एका ठिकाणी, हेब्रोन आणि मोरिया पर्वतावर जेथे इसहाकाऐवजी देवाने दिलेल्या एका एडक्यास त्याने अर्पण केले तेथे वेद्या बांधल्या. नंतर, इसहाक, याकोब आणि मोशेनेही देवाची उपासना करण्यासाठी आपणहून वेद्या बांधल्या.—उत्पत्ति १२:६-८; १३:३, १८; २२:९-१३; २६:२३-२५; ३३:१८-२०; ३५:१, ३, ७; निर्गम १७:१५, १६; २४:४-८.
इस्राएल लोकांना आपले नियमशास्त्र दिल्यानंतर देवाने त्यांना एक निवासमंडप अर्थात काढता-घालता येण्याजोगा एक तंबू ज्याला ‘दर्शनमंडप’ असेही संबोधण्यात आले आहे ते तयार करण्याची आज्ञा दिली; देवाजवळ जाण्याचा हा प्रमुख मार्ग असावयाचा होता. (निर्गम ३९:३२, ४०) निवासमंडपात किंवा दर्शनमंडपात दोन वेद्या होत्या. होमार्पणांसाठी असलेली वेदी बाभळीच्या लाकडाची असून ती पितळेने मढवलेली होती; ही वेदी प्रवेशद्वाराजवळ बांधण्यात आली होती आणि त्यावर प्राणी अर्पिले जात. (निर्गम २७:१-८; ३९:३९; ४०:६, २९) दुसरी एक वेदी जी धूपवेदी होती ती देखील बाभळीच्या लाकडाची होती परंतु ती सोन्याने मढवलेली होती आणि ती निवासमंडपाच्या आत अतिपवित्राच्या अंतरपटासमोर बांधण्यात आली होती. (निर्गम ३०:१-६; ३९:३८; ४०:५, २६, २७) दिवसातून दोनदा, सकाळी व संध्याकाळी या वेदीवर खास प्रकारचे धूप जाळले जाई. (निर्गम ३०:७-९) राजा शलमोनाने बांधलेल्या कायमच्या मंदिराची रचना ही हुबेहूब निवासमंडपाप्रमाणे होती; या मंदिरातही दोन वेद्या होत्या.
‘खरा मंडप’ आणि लाक्षणिक वेदी
यहोवाने इस्राएल राष्ट्राला नियमशास्त्र दिले तेव्हा त्याने त्यांना, लोकांच्या जीवनावर नियंत्रण ठेवणारे आणि अर्पणे व प्रार्थना यांद्वारे त्याच्याजवळ कसे जायचे यांसंबंधीचे नियमच केवळ दिले नाहीत. तर या नियमशास्त्रातील अनेक व्यवस्था, प्रेषित पौलाने म्हटल्याप्रमाणे ‘नमुना,’ “दृष्टांतरूप” किंवा ‘चांगल्या गोष्टींची छाया’ होत्या. (इब्री लोकांस ८:३-५; ९:९; १०:१; कलस्सैकर २:१७) दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, नियमशास्त्रातील अनेक पैलूंनी इस्राएली लोकांना ख्रिस्त येईपर्यंत केवळ मार्गदर्शनच पुरवले नाही तर येशू ख्रिस्ताद्वारे पूर्ण होणाऱ्या देवाच्या उद्देशांची एक पूर्वझलकही दिली. (गलतीकर ३:२४) नियमशास्त्रातील पैलूंचे भविष्यसूचक महत्त्व होते. जसे की, वल्हांडणाचे कोकरू येशू ख्रिस्ताला पूर्वसूचित करत होते; या कोकराचे रक्त इस्राएली लोकांच्या तारणासाठी चिन्ह म्हणून उपयोगात आणले जाई. येशू ख्रिस्त “जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोंकरा” आहे व पापापासून आपल्याला मुक्त करण्यासाठी त्याचे रक्त वाहण्यात आले होते.—योहान १:२९; इफिसकर १:७.
निवासमंडप आणि मंदिरातील सेवा यांच्याशी संबंधित असलेल्या पुष्कळ गोष्टी आध्यात्मिक वास्तविकतांना चित्रित करणाऱ्या होत्या. (इब्री लोकांस ८:५; ९:२३) खरे तर, ‘माणसाने नव्हे तर प्रभूने घातलेल्या खऱ्या मंडपाविषयी’ पौलाने लिहिले. तो पुढे लिहितो, की: “ख्रिस्त हा पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टींसंबंधी प्रमुख याजक होऊन आला व जो हातांनी केलेला नाही, म्हणजे ह्या सृष्टीतला नाही अशा अधिक श्रेष्ठ व पूर्ण मंडपातून” आला. (इब्री लोकांस ८:२; ९:११) ‘अधिक श्रेष्ठ व पूर्ण मंडप’ म्हणजे यहोवाच्या महान आध्यात्मिक मंदिराची व्यवस्था. शास्त्रवचनांच्या भाषाशैलीवरून असे सूचित होते, की महान आध्यात्मिक व्यवस्था ही अशी व्यवस्था आहे जिच्याद्वारे मानव, येशू ख्रिस्ताच्या प्रायश्चित्त बलिदानाच्या आधारावर यहोवाला प्रार्थना करू शकतात.—इब्री लोकांस ९:२-१०, २३-२८.
नियमशास्त्रातील काही तरतूदी व व्यवस्था या अधिक महान, अधिक अर्थपूर्ण अशा आध्यात्मिक वास्तविकतांना सूचित होतात हे देवाच्या वचनातून आपल्याला समजते तेव्हा बायबल हे खरोखरच ईश्वरप्रेरणेने लिहिण्यात आले आहे यावर आपला विश्वास आणखी पक्का होतो. शिवाय, यामुळे शास्त्रवचनांतील अनोख्या ईश्वरी बुद्धीबद्दलही आपली गुणग्राहकता वाढते.—रोमकर ११:३३; २ तीमथ्य ३:१६.
होमार्पणाच्या वेदीचे देखील भविष्यसूचक मूल्य आहे. ती कदाचित देवाच्या ‘इच्छेला’ किंवा येशूचे परिपूर्ण मानवी बलिदान स्वीकारण्याच्या तयारीला सूचित करत असावी.—इब्री लोकांस १०:१-१०.
नंतर पौल, इब्री लोकांस या पुस्तकात हे लक्षवेधक विधान करतो: “आपल्याला अशी वेदी आहे की जिच्यावरचे खाण्याचा अधिकार मंडपाची सेवा करणाऱ्यांना नाही.” (इब्री लोकांस १३:१०) येथे तो कोणत्या वेदीविषयी बोलत होता?
पुष्कळ कॅथलिक भाष्यकारांचा असा दावा आहे, की इब्री लोकांस १३:१० मध्ये उल्लेखिण्यात आलेली वेदी ही युखारिस्टसाठी अर्थात मासच्या दरम्यान ख्रिस्ताच्या बलिदानाचे नविनीकरण करणाऱ्या ‘विधीसाठी’ वापरण्यात येणारी वेदी आहे. परंतु या वचनाच्या पार्श्वभूमीवरून तुम्हाला दिसून येईल की पौल येथे ज्या वेदीची चर्चा करत होता ती वेदी लाक्षणिक वेदी आहे. पुष्कळ विद्वान, या वचनातील “वेदी” ही लाक्षणिक अर्थाने वापरण्यात आली आहे असे म्हणतात. जेसूइट पंथाचे अनुयायी, जुझेप्पा बोन्सीरव्हन यांच्या मते, “[इब्रीकरांना लिहिलेल्या] पत्रातील लाक्षणिकतेशी हे अगदी अचूकरीत्या जुळते.” ते म्हणतात: “ख्रिस्ती भाषेत, ‘वेदी’ हा शब्द सुरवातीला लाक्षणिक अर्थाने वापरण्यात आला आहे आणि आइरिनियस आणि विशेषकरून टर्टूलियन व सेंट सायप्रियन यांच्यानंतर मात्र तो युखारिस्टला लागू होऊ लागला; खासकरून युखारिस्टविधीच्या मेजाला तो सूचित होऊ लागला.”
“कॉन्स्टंटिनियन युगात बॅसिलिका बांधल्या गेल्या” तेव्हा वेद्यांचा वापर वाढू लागला, असे एका कॅथलिक मासिकात म्हटले आहे. रिविस्टा डी आर्कियोलोझीया क्रिस्टान्या (ख्रिस्ती पुरातत्त्वीय उजळणी) यात म्हटले आहे की, “एवढे मात्र निश्चित की, पहिल्या दोन शतकांत, उपासनेचे एक ठराविक ठिकाण होते याचा पुरावा नाही पण, खासगी घरांतील खोल्यांत ख्रिस्ती सभा होत असल्याचा पुरावा आहे, . . . उपासना झाल्यानंतर त्या दररोजच्या उपयोगासाठी वापरल्या जाई.”
ख्रिस्ती धर्मजगतातील वेदींचा वापर
ला चिविल्टा काटोलिका नावाचे एक कॅथलिक मासिक म्हणते, की “वेदी ही केवळ चर्च इमारतीचाच नव्हे तर जिवंत चर्चचा देखील केंद्र बिंदू आहे.” परंतु, येशू ख्रिस्ताने अशा एकाही धार्मिक विधीची स्थापना केली नाही जो वेदीवर पार पाडायचा होता; किंवा, वेदीचा उपयोग करून विधी पार पाडण्याची त्याने आपल्या शिष्यांनाही आज्ञा दिली नाही. मत्तय ५:२३, २४ येथे आणि इतरत्र येशूने वेदीचा जो उल्लेख केला आहे तो, यहुद्यांमध्ये प्रचलित असलेल्या धार्मिक प्रथांना सूचित करतो; परंतु, आपल्या अनुयायांनी वेदीचा उपयोग करून देवाची उपासना करावी असे त्याने सुचवले नाही.
जॉर्ज फूट मूर (१८५१-१९३१) नावाच्या एका अमेरिकन इतिहासकाराने असे लिहिले: “ख्रिस्ती उपासनेतील मुख्य गोष्टी बहुधा सारख्याच होत्या, परंतु कालांतराने, दुसऱ्या शतकाच्या मध्यात जस्टीनने वर्णन केल्याप्रमाणे साध्यासुध्या विधींचे रूपांतर भव्य आणि दिखाऊ उपासनापद्धतींत झाले.” कॅथलिक विधी आणि सार्वजनिक धार्मिक समारंभ इतके वाढले आहेत व क्लिष्ट झाले आहेत, की कॅथलिक सेमिनरींमध्ये लिटर्जी नावाच्या विषयाखाली त्यांचा अभ्यास केला जातो. मूर पुढे म्हणतात: “ख्रिस्ती पाळक आधीच्या याजकांचे वारसदार आहेत असे मानण्यात येऊ लागल्यानंतर सर्व विधींसंबंधी असलेला हा प्रघात, जुन्या कराराच्या प्रभावामुळे अधिकच वाढला. प्रमुख याजकाचा भपकेदार झगा, इतर याजकांचे विधीच्या वेळी घालण्याचे पोशाख, धार्मिक मिरवणुकी, स्तोत्रे गाणाऱ्या लेवीयांचे गायक-समूह, झुलत्या धूपपात्रांतून वर जाणारा धूपाचा लोट—हे सर्व धार्मिक उपासनेसंबंधी ईश्वराने दिलेला एक आदर्श आहे असे समजले जात होते; त्यामुळे, चर्चला प्राचीन मूर्तीपूजक धर्मांबरोबर बरोबरी करण्यात काही गैर वाटले नाही.”
तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, की विविध चर्चेसमधील उपासनेत होणारे पुष्कळ विधी, समारंभ, वापरले जाणारे पोशाख व इतर वस्तू या, शुभवर्तमानाच्या ख्रिस्ती शिकवणुकींनुसार नव्हे तर यहुदी व मूर्तीपूजक धर्मांतील प्रथा व विधींनुसार आहेत. एनचिक्लोपिडिआ कॅटोलिका म्हणतो, की कॅथलिक धर्माला “वेदीचा वापर करण्याचा वारसा यहुदी धर्मातून व काही अंशी मूर्तीपूजक धर्मांतून मिळाला आहे.” मिनुकिउस फेलिक्स नावाच्या सा.यु. तिसऱ्या शतकातील एका समर्थकाने असे लिहिले, की ख्रिस्ती लोकांचे ‘मंदिर नव्हते किंवा वेद्या नव्हत्या.’ रिलिजिओनी ए मिटी (धर्म आणि दंतकथा) नावाच्या विश्वकोशाच्या शब्दकोशाने देखील काहीसे असेच म्हटले: “आरंभीच्या ख्रिश्चनांनी, स्वतःला यहुदी व मूर्तीपूजक उपासनेपासून वेगळे असे दाखवण्यासाठी वेदींचा उपयोग करण्यास नाकारले.”
दररोजच्या जीवनात आणि प्रत्येक देशांत स्वीकारण्यात आली पाहिजेत व लागू केली पाहिजेत अशा तत्त्वांवर ख्रिस्ती धर्म प्रामुख्याने आधारित असल्यामुळे, पृथ्वीवर एक पवित्र शहर असण्याची किंवा वेद्या असलेले प्रत्यक्ष मंदिर असण्याची किंवा खास पदावरील भिन्न पोषाख घालणाऱ्या मानवी याजकांची गरज उरली नाही. येशूने म्हटले: “तुम्ही पित्याची उपासना ह्या डोंगरावर व यरुशलेमेतहि करणार नाही अशी वेळ येत आहे. . . . खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करितील.” (योहान ४:२१, २३) पुष्कळ चर्च क्लिष्ट विधी आणि वेदींचा वापर करत आहेत खरे परंतु खऱ्या देवाची उपासना कोणत्या पद्धतीने केली पाहिजे याविषयी येशूने जे म्हटले त्याकडे मात्र ते दुर्लक्ष करीत आहेत.
[तळटीप]
^ परि. 3 त्याच्याही पूर्वी, काईन व हाबेलने वेदींवर यहोवाला आपापली अर्पणे सादर केली असावीत.—उत्पत्ति ४:३, ४.