पहिल्याने राज्य मिळवण्यास झटणे—सुरक्षित व आनंदी जीवन
जीवन कथा
पहिल्याने राज्य मिळवण्यास झटणे—सुरक्षित व आनंदी जीवन
जेथा सुनल यांच्याद्वारे कथित
न्याहारीनंतर आम्ही रेडिओवर अशी घोषणा ऐकली: “यहोवाचे साक्षीदार बेकायदेशीर आहेत, आणि त्यांच्या कार्यावर बंदी आणण्यात आली आहे.”
एकोणीसशे पन्नासचे वर्ष. विशीत असलेल्या आम्ही चार जणी डॉमिनिकन रिपब्लिक येथे यहोवाच्या साक्षीदारांचे मिशनरी म्हणून सेवा करत होतो. आदल्या वर्षीच आम्ही तेथे आलो होतो.
मिशनरी सेवा हे माझ्या जीवनाचे खरे ध्येय नव्हते. लहानपणी मी चर्चला जायचे. परंतु, पहिल्या महायुद्धादरम्यान माझ्या वडिलांनी चर्चला जाणे सोडून दिले. १९३३ साली एपिस्कोपल चर्चमध्ये माझे नाव नोंदले गेले त्या दिवशी बिशपने बायबलमधून एकच वचन वाचले आणि मग ते राजकारणाविषयी बोलू लागले. माझी आई इतकी निराश झाली की त्यानंतर ती कधीच चर्चला गेली नाही.
आमच्या जीवनशैलीत बदल
माझे आईवडील, विल्यम कार्ल आणि मेरी ॲडम्स यांना पाच मुले होती. त्यांपैकी तीन मुले होती, डॉन, जोएल आणि कार्ल. माझी बहीण जॉय ही धाकटी आणि मी थोरली होते. मी एकदा शाळेतून घरी आले तेव्हा आईला यहोवाच्या साक्षीदारांची एक पुस्तिका वाचत असलेले पाहिले; तेव्हा मी कदाचित १३ वर्षांची असेन. त्या पुस्तिकेचे नाव होते, राज्य, जगाची आशा (इंग्रजी). ती मला म्हणाली, “हेच सत्य आहे.”
बायबलमधून शिकत असलेल्या गोष्टी आमची आई आम्हाला सांगायची. तिच्या बोलण्याने आणि आदर्शाने तिने आमच्यावर येशूचा पुढील सल्ला बिंबवला: “पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा.”—मत्तय ६:३३.
ती सांगत असलेल्या गोष्टी मला सारख्या आवडत नव्हत्या. एकदा मी म्हणाले, “आई, तू मला हा प्रचार करायचा बंद कर, नाहीतर मी तुला भांडी घासून देणार नाही.” पण ती वेगळ्या मार्गाने आम्हाला त्या गोष्टी सांगतच राहिली. ती आम्हा सर्व मुलांना नियमितपणे क्लॅरा
रायन हिच्या घरात चालणाऱ्या बायबल अभ्यासांकरता घेऊन जायची; क्लॅरा रायनचे घर आमच्या अमेरिकेतील एल्महर्स्ट, इलिनॉईस येथील घरापासून अगदी जवळ होते.क्लॅरा पियानो देखील शिकवायची. तिचे विद्यार्थी वार्षिक संगीतोत्सवात भाग घ्यायचे तेव्हा ती देवाच्या राज्याविषयी आणि पुनरुत्थानाच्या आशेविषयी बोलायची. मला संगीताची आवड होती कारण सात वर्षांची असल्यापासून मी व्हायोलिन वाजवायला शिकले होते; त्यामुळे मी क्लॅराचे ऐकायचे.
पाहता पाहता, आम्ही मुले देखील आईसोबत शिकागोच्या पश्चिमेकडे मंडळीच्या सभांना जाऊ लागलो. हा प्रवास दूरचा होता; आम्हाला बस धरून नंतर टॅक्सीने जावं लागायचं. पण, पहिल्यांदा राज्य मिळवण्यास झटण्याचा काय अर्थ होतो हे समजण्याकरता आम्हाला चांगले प्रशिक्षण मिळाले. १९३८ मध्ये, आईचा बाप्तिस्मा होऊन तीन वर्षांनी मी तिच्यासोबत शिकागोतील यहोवाच्या साक्षीदारांच्या एका अधिवेशनाला गेले. त्या प्रसंगासाठी रेडिओटेलिफोनद्वारे एकमेकांना जोडण्यात आलेल्या ५० शहरांपैकी ते एक शहर होते. तेथे ऐकलेल्या गोष्टींनी माझे हृदय स्पर्शून गेले.
आणि तेथील संगीतानेही माझ्या अंतःकरणाच्या तारा छेडल्या गेल्या. १९३८ साली मी पदवीधर झाले आणि वडिलांनी, शिकागोतील अमेरिकन कन्झर्व्हेटरी ऑफ म्यूझिक येथे शिक्षण घेण्याची माझ्यासाठी व्यवस्था केली होती. म्हणून पुढील दोन वर्षे मी संगीताचा अभ्यास केला, दोन ऑर्केस्ट्रांमध्ये वादन केले आणि त्या क्षेत्रात नाव कमवण्याचे माझे ध्येय होते.
माझे व्हायोलिन शिक्षक, हर्बट बटलर हे अमेरिकेत राहण्यासाठी युरोप सोडून आले होते. म्हणून मी त्यांना रेफ्यूजीझ * ही पुस्तिका वाचायला दिली. त्यांनी ती वाचली देखील, आणि पुढील आठवडी आमचा वर्ग झाल्यानंतर ते म्हणाले: “जेथा तू फार छान वादन करतेस, आणि तू अभ्यास पुढे चालू ठेवलास तर तुला एखाद्या रेडिओ ऑर्केस्ट्रात किंवा संगीत शिकवण्याचं काम मिळू शकेल.” मग मी दिलेल्या पुस्तिकेवर बोट ठेवून ते म्हणाले, “पण, मला वाटतं की तुझं मन यात अडकलं आहे. मग, तू हेच आपल्या जीवनाचं ध्येय का करत नाहीस?”
मी यावर गंभीर विचार केला. संगीत शाळेत पुढे शिकण्याऐवजी मी जुलै १९४० रोजी डेट्रॉईट, मिशिगन येथे भरवल्या जाणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिवेशनाला जाण्याचे आईचे निमंत्रण निवडले. आम्ही तेथे ट्रेलर छावणीत तंबूंमध्ये राहिलो. अर्थात, मी सोबत व्हायोलिन
नेले होते आणि अधिवेशनातल्या ऑर्केस्ट्रात मी वादन केले. पण त्या ट्रेलर छावणीत माझी भेट अनेक पायनियरांसोबत (पूर्ण-वेळेचे सुवार्तिक) झाली. ते सगळे किती आनंदी दिसत होते! मी बाप्तिस्मा घेण्याचा आणि पायनियर सेवेकरता अर्ज देण्याचा निर्णय घेतला. माझं संपूर्ण आयुष्य पूर्ण वेळेच्या सेवेत घालवण्यासाठी मी मदतीकरता यहोवाकडे प्रार्थना केली.मी माझ्याच गावात पायनियरींग सुरू केली. त्यानंतर, मी शिकागोत सेवा केली. १९४३ साली मी केन्टक्कीला गेले. त्या सालाच्या उन्हाळ्यात, प्रांतीय अधिवेशनाच्या जरा आधीच मला गिलियड प्रशालेच्या दुसऱ्या वर्गात उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले; तेथे मला मिशनरी कार्याचे प्रशिक्षण मिळणार होते. सप्टेंबर १९४३ मध्ये हा वर्ग सुरू होणार होता.
त्या सालाच्या उन्हाळ्यात भरवलेल्या अधिवेशनादरम्यान मी एका साक्षीदार बहिणीसोबत राहिले; तिने मला तिच्या मुलीच्या कपाटातून वाटेल त्या वस्तू घेण्याची मोकळीक दिली होती. तिची मुलगी लष्करात भरती झाली होती आणि तिने आपल्या आईला तिच्या सगळ्या वस्तू इतरांना द्यायला सांगितले होते. ही तरतूद माझ्याकरता येशूच्या पुढील अभिवचनाची पूर्णता ठरली: “तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.” (मत्तय ६:३३) गिलियडचे पाच महिने कसे गेले ते काही कळलेच नाही, आणि जानेवारी ३१, १९४४ रोजी पदवीधर झाल्यावर मला मिशनरी सेवा कधी सुरू करेन असे झाले होते.
त्यांनी देखील पूर्ण वेळेची सेवा निवडली
आईने १९४२ साली पायनियर सेवा सुरू केली होती. त्या वेळी, माझे तीन भाऊ आणि माझी बहीण अद्याप शाळेत होते. सहसा आई त्यांना शाळेत भेटायची आणि त्यांना सेवेत सोबत घेऊन जायची. तिने त्यांना घरातले काम देखील करायला शिकवले. ती स्वतः, दुसऱ्या दिवशी सेवेत जाता यावे म्हणून आदल्या रात्री उशिरापर्यंत इस्रीची आणि इतर आवश्यक कामे उरकून घ्यायची.
जानेवारी १९४३ मध्ये, मी केन्टक्कीत पायनियरींग करत होते तेव्हा माझा भाऊ डॉन याने देखील पायनियरींग सुरू केली. यामुळे बाबांची निराशा झाली कारण त्यांना वाटत होते की त्यांनी व आईने जसे कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले तसेच त्यांच्या सर्व मुलांनीही शिक्षण पूर्ण करावे. जवळजवळ दोन वर्षे पायनियरींग केल्यावर डॉनला ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयाचा सदस्य या नात्याने पूर्ण वेळेच्या सेवेचे आमंत्रण मिळाले.
जोएलने घरी असतानाच जून १९४३ मध्ये पायनियरींग सुरू केली. त्या वेळी, त्याने बाबांना एका अधिवेशनाला बोलवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो फसला. परंतु, जोएलला जेव्हा त्याच्या क्षेत्रात बऱ्याच प्रयत्नांनंतर एकही गृह बायबल अभ्यास मिळाला नाही तेव्हा बाबा त्याच्यासोबत “सत्य तुम्हाला बंधमुक्त करील” या इंग्रजी पुस्तकातून अभ्यास करायला तयार झाले. ते प्रश्नांची उत्तरे पटापट द्यायचे परंतु ते जोएलकडून पुस्तकात सांगितलेल्या गोष्टींसाठी शास्त्रवचनांचा आधार मागायचे. यामुळे जोएलला बायबल सत्ये आपलीशी करता आली.
ज्याप्रमाणे सिलेक्टिव्ह सर्व्हिस बोर्डाने डॉनला धार्मिक सेवक म्हणून सूट दिली होती त्याचप्रमाणे आपल्यालाही सूट द्यावी असे जोएलला खूप वाटत होते. पण जोएल फार तरुण होता हे बोर्डाने पाहिल्यावर त्यांनी त्याला धार्मिक सेवक म्हणून नेमले नाही तर लष्कर सेवेसाठी दाखल होण्याची सूचना पाठवली. त्याने भरती होण्यास नकार दिला तेव्हा त्याला अटक करण्यासाठी वॉरंट काढण्यात आले. एफबीआयने त्याला शोधून काढल्यावर तो तीन दिवस कुक काउंटी तुरुंगात होता.
बाबांनी त्याची सुटका करण्यासाठी आमचे घर जामीन म्हणून दिले. त्यानंतर, अशा परिस्थितीत अडकलेल्या इतर
तरुण साक्षीदारांकरताही त्यांनी तेच केले. माझे बाबा हा अन्याय पाहून इतके भडकले की, अपील करणे शक्य आहे का हे पाहण्यासाठी ते जोएलसोबत वॉशिंग्टन, डी.सी. येथे गेले. शेवटी, जोएलला सेवक म्हणून ठरवण्यात आले आणि त्याची केस रद्द करण्यात आली. मी माझ्या मिशनरी नेमणुकीत असताना, बाबांनी मला पत्रात असे लिहिले, “माझ्या मते, या विजयाचे श्रेय यहोवालाच जाते!” ऑगस्ट १९४६ च्या शेवटी जोएलला देखील ब्रुकलिन येथील मुख्यालयाचा सदस्य बनण्याचे आमंत्रण मिळाले.कार्लने १९४७ साली उच्च शाळा संपवण्याआधी शाळेच्या सुट्ट्यांदरम्यान अनेकदा पायनियरींग केली होती आणि नंतर त्याने सामान्य पायनियर सेवा सुरू केली. तेव्हा बाबांची प्रकृती ढासळत होती, म्हणून कार्लने दुसऱ्या एका ठिकाणी पायनियर नेमणूक स्वीकारेपर्यंत त्यांना व्यापारात मदत केली. १९४७ च्या शेवटी कार्ल देखील डॉन आणि जोएल यांच्यासोबत ब्रुकलिन मुख्यालयातील बेथेल कुटुंबाचा सदस्य म्हणून सेवा करू लागला.
शाळा संपवल्यावर जॉय देखील पायनियरींग करू लागली. मग १९५१ साली, तीसुद्धा आपल्या भावांसोबत बेथेलला गेली. तिने हाऊसकिपींग आणि वर्गणी विभागात काम केले. १९५५ साली, तिने बेथेल कुटुंबाचाच एक सदस्य रॉजर मोर्गन याच्याशी विवाह केला. सुमारे सात वर्षांनंतर त्यांनी स्वतःचे कुटुंब वाढवण्याचे ठरवले आणि त्यांनी बेथेल सोडले. कालांतराने त्यांना दोन मुले झाली आणि ती देखील यहोवाची सेवा करत आहेत.
सगळी मुले पूर्ण वेळेच्या सेवेत उतरल्यावर आईने बाबांना प्रोत्साहन दिले आणि बाबांनी यहोवाला आपले जीवन समर्पित करून १९५२ साली बाप्तिस्मा घेतला. पुढील १५ वर्षे, आजारपणामुळे अनेक मर्यादा असूनही आपल्या मृत्यूपर्यंत ते इतरांसोबत राज्याच्या सत्याविषयी सांगण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत राहिले.
बाबांच्या आजारपणामुळे संक्षिप्त काळासाठी सुटी घेतल्यावर आईने मरेपर्यंत पायनियरींग चालू ठेवली. तिच्याकडे कधी कार नव्हती; किंवा सायकलही नव्हती. उंचीने कमी असलेली आई सगळीकडे पायीच जात असे; ती सहसा दूर गावांमध्ये जाऊन बायबल अभ्यास चालवायची.
मिशनरी क्षेत्रात
गिलियड प्रशालेतून पदवीधर झाल्यावर, आमच्यातील काही जणांनी प्रवासाकरता कागदपत्रे मिळेपर्यंत न्यूयॉर्क सिटीच्या उत्तर भागात एक वर्षापर्यंत पायनियरींग केली. शेवटी, १९४५ मध्ये आम्ही आमच्या नेमणुकीवर निघालो; आम्हाला क्यूबाला पाठवण्यात आले होते आणि तेथे हळूहळू आम्हाला एका वेगळ्या जीवनशैलीशी जुळवून घ्यावे लागले. आमच्या प्रचारकार्याला उत्तम प्रतिसाद मिळत होता आणि बघता बघता आमच्या सर्वांजवळ भरपूर बायबल अभ्यास होते. कित्येक वर्षे आम्ही तेथे सेवा केली. त्यानंतर आम्हाला डॉमिनिकन रिपब्लिक येथे पाठवण्यात आले. एकदा एका स्त्रीने मला तिच्या एका ग्राहकाशी भेटायला गळ घातली; ही ग्राहक सुझॅन एन्फ्रॉ नावाची एक फ्रेंच स्त्री होती जिला बायबल समजून घेण्यासाठी मदत हवी होती.
सुझॅन यहुदी होती आणि हिटलरने फ्रान्सवर कब्जा केला तेव्हा तिच्या पतीने तिला आणि त्यांच्या दोन मुलांना दुसऱ्या एका देशात पाठवले होते. सुझॅन शिकत असलेल्या गोष्टी लगेच इतरांना सांगू लागली. सर्वात आधी सुझॅनची भेट माझ्याशी घालून दिलेल्या स्त्रीला तिने सुवार्ता सांगितली
आणि मग फ्रान्समधून आलेली तिची एक मैत्रीण, ब्लॉन्श हिला सांगितली. दोघींनी प्रगती करून बाप्तिस्मा घेतला.सुझॅनने मला विचारले, “मी माझ्या मुलांना मदत करण्यासाठी काय करावे?” तिचा मुलगा डॉक्टरकी करत होता आणि मुलगी बॅले नृत्य शिकत होती आणि तिला न्यूयॉर्क येथील रेडिओ सिटी म्यूझिक हॉलमध्ये नृत्य करण्याची मनीषा होती. सुझॅनने त्यांना टेहळणी बुरूज आणि सावध राहा! या मासिकांच्या वर्गण्या पाठवल्या. परिणामस्वरूप, सुझॅनचा मुलगा, त्याची पत्नी आणि त्याच्या पत्नीची जुळी बहीण हे सगळे साक्षीदार बनले. सुझॅनचा पती, ल्वी याला यहोवाच्या साक्षीदारांमध्ये आपली पत्नी आवड घेत आहे याची चिंता वाटत होती कारण तोपर्यंत डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये आमच्या कार्यावर सरकारने बंदी आणली होती. परंतु, संपूर्ण कुटुंब अमेरिकेला राहायला गेले तेव्हा तो देखील कालांतराने साक्षीदार बनला.
बंदीतही सेवा
१९४९ साली आम्हाला डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये नेमणूक देण्यात आल्यावर काही काळातच यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर बंदी घालण्यात आली तरीपण मनुष्यांपेक्षा शासक या नात्याने देवाची आज्ञा मानण्याचा आमचा निर्धार होता. (प्रेषितांची कृत्ये ५:२९) येशूने आपल्या अनुयायांना सूचना दिल्याप्रमाणे आम्ही राज्याची सुवार्ता इतरांना सांगून देवाच्या राज्याला पहिल्याने मिळवण्यास झटत राहिलो. (मत्तय २४:१४) पंरतु, प्रचारकार्यात, “सापांसारखे चतुर व कबुतरासारखे निरुपद्रवी” होण्यास आम्ही शिकलो. (मत्तय १०:१६) उदाहरणार्थ, माझे व्हायोलिन यात फार कामी आले. मी बायबल अभ्यास चालवायला जायचे तेव्हा व्हायोलिन सोबत न्यायचे. माझे विद्यार्थी व्हायोलिन वादक झाले नाहीत, पण अनेक कुटुंबे यहोवाचे सेवक मात्र बनले!
बंदी घालण्यात आल्यावर, आम्हा चार मुलींना—मॅरी ॲन्योल, सोफिया सोव्हिक आणि एडीथ मोर्गन आणि मी—सॅन फ्रान्सिस्को दे माकोरीस येथील मिशनरी गृहातून सान्तो डोमिंगो राजधानीतल्या शाखेत हलवण्यात आले. पण दर महिन्याला मी संगीत शिकवायला आमच्या पूर्वीच्या नेमणुकीच्या ठिकाणी जात असे. यामुळे मी माझ्या व्हायोलिनच्या पेटीत आपल्या ख्रिस्ती बांधवांकरता आध्यात्मिक अन्न घेऊन जात असे आणि येताना त्यांच्या साक्षकार्याविषयी माहिती आणत असे.
सॅन फ्रान्सिस्को दे माकोरीस येथील बांधवांनी तटस्थतेची ख्रिस्ती भूमिका घेतल्याबद्दल त्यांना सान्तिआगो येथे तुरुंगात डांबण्यात आल्यावर त्यांना पैसे तसेच शक्य असल्यास, बायबल देण्याकरता व त्यांची विचारपूस करून त्यांच्या कुटुंबांना त्यांची माहिती देण्याकरता मला पाठवले जात असे. सान्तिआगोच्या तुरुंगात, पहारेकऱ्यांनी माझ्या हातात व्हायोलिनची पेटी पाहिल्यावर त्यांनी विचारले, “याची काय गरज आहे?” मी म्हणाले, “हे त्यांच्या करमणुकीसाठी आहे.”
मी जी गाणी वाजवायचे त्यांपैकी एक गाणे नात्सी बंधनागृहात असलेल्या एका साक्षीदाराने लिहिलेले होते. हे गाणे यहोवाच्या साक्षीदारांच्या गीत पुस्तकातील २९ क्रमांकाचे गाणे आहे. हे गाणे तुरुंगातल्या बांधवांनी शिकावे म्हणून मी ते खास वाजवत होते.
मला कळाले की, बहुतेक साक्षीदारांना सरकारी प्रमुख, ट्रुजिलो याच्या एका मळ्यात पाठवण्यात आले होते. मला सांगण्यात आले की हे ठिकाण बस मार्गापासून दूर होते. मला एक घोडा देईल आणि माझ्यासोबत एका लहान मुलालाही पाठवेल.
म्हणून दुपारच्या वेळी मी बसमधून उतरले आणि त्या ठिकाणी कसे जायचे ते विचारले. एका छोट्याशा दुकानाच्या मालकाने डोंगरांपलीकडे बोट दाखवून म्हटले की, मी माझी व्हायोलिन त्याच्याजवळ ठेवल्यास तोत्या डोंगरांपलीकडे आम्हाला एका नदीतून जावे लागले; आम्ही दोघे घोड्यावर बसलो आणि तो घोडा नदीतून पोहत गेला. तेथे पोहंचल्यावर आम्हाला पोपटांचा एक झुंड दिसला; त्यांचे हिरवट निळे सप्तरंगी पंख सूर्यप्रकाशात चमकत होते. ते दृश्य अविस्मरणीय होते! मी प्रार्थना केली; “यहोवा बापा, या सुंदर पक्ष्यांसाठी तुझे आभार मानते.” शेवटी, संध्याकाळी चार वाजता आम्ही त्या मळ्यात पोहंचलो. तेथील पहारेकरी फार चांगला होता; त्याने मला बांधवांशी बोलायला अनुमती दिली शिवाय मी त्यांच्यासाठी आणलेल्या वस्तू आणि एक लहानसे बायबल देखील त्यांना देण्याची परवानगी दिली.
परतताना अंधार पडला होता; मी सतत प्रार्थना करत होते. आम्ही दुकानात पोचलो तेव्हा पावसात चिंब भिजलो होतो. शेवटची बस निघून गेल्यामुळे मी दुकानदाराला माझ्याकरता एक ट्रक थांबवायला सांगितले. पण, या ट्रकमधल्या दोन माणसांसोबत जाणे सुरक्षित होते का? एकाने विचारले: “तुम्ही सोफियाला ओळखता का? तिने माझ्या बहिणीचा अभ्यास घेतला होता.” यहोवाने माझ्या प्रार्थनेचे उत्तर दिले असे मी समजून घेतले. त्यांनी मला सान्तो डोमिंगोपर्यंत सुरक्षित आणले.
१९५३ साली, न्यूयॉर्कच्या यँकी स्टेडियममध्ये भरवलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाकरता डॉमिनिकन रिपब्लिकमधून आलेल्यांपैकी मी एक होते. माझं संपूर्ण कुटुंब, माझे बाबासुद्धा तेथे आले होते. डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये प्रचारकार्य कसे चालले होते त्यावरील एका अहवालानंतर माझी मिशनरी सोबतीण मॅरी ॲन्योल आणि मला, बंदीत कशाप्रकारे प्रचार केला जातो याचे प्रात्यक्षिक करून दाखवायचा एक लहान भाग देण्यात आला होता.
प्रवासी कार्यातील खास आनंद
त्या वर्षाच्या उन्हाळ्यात माझी भेट रुडॉल्फ सुनल यांच्याशी झाली; पुढील वर्षी ते माझे पती बनले. त्यांचे कुटुंब ॲलेघनी, पेन्सिल्व्हानियात पहिले महायुद्ध सुरू होऊन फार काळ झाला नव्हता तेव्हा साक्षीदार बनले होते. दुसऱ्या महायुद्धात ख्रिस्ती तटस्थतेमुळे काही काळ तुरुंगात घालवल्यावर त्यांनी ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथे बेथेल सेवा केली. आमच्या विवाहानंतर लागलीच त्यांना प्रवासी पर्यवेक्षक म्हणून मंडळ्यांना भेटी देण्यासाठी आमंत्रण देण्यात आले. पुढील १८ वर्षे मी त्यांच्यासोबत विभागीय कार्यात होते.
आमच्या या कार्यात आम्ही पेन्सिल्व्हानिया, पश्चिम व्हर्जिनिया, न्यू हॅम्पशायर, मॅसेच्यूसेट्स आणि इतर ठिकाणी गेलो. आम्ही सहसा ख्रिस्ती बांधवांसोबत त्यांच्या घरी राहत होतो. त्या सर्वांना जाणून घेणे आणि त्यांच्यासोबत यहोवाची सेवा करणे हा एक खासप्रकारचा आनंद होता. आम्हाला दाखवण्यात आलेले प्रेम आणि पाहुणचार नेहमी मनापासून व खरा होता. जोएलने माझी पूर्वीची मिशनरी सोबतीण, मॅरी ॲन्योल हिच्याशी लग्न केल्यावर त्यांनी तीन वर्षे प्रवासी कार्यात घालवली आणि त्या दरम्यान पेन्सिल्व्हानिया व मिशिगन येथील मंडळ्यांना भेटी दिल्या. नंतर, १९५८ मध्ये, जोएलला पुन्हा एकदा मॅरीसोबत बेथेल कुटुंबाचा सदस्य होण्याकरता आमंत्रण मिळाले.
कार्लला बेथेलमध्ये राहून सुमारे सात वर्षे झाल्यावर
त्याला अधिक अनुभवाकरता विभागीय कार्यासाठी नेमण्यात आले. नंतर तो गिलियड प्रशालेचा प्रशिक्षक बनला. १९६३ साली त्याने बॉबीशी विवाह केला; ती बेथेलमध्ये ऑक्टोबर २००२ साली तिचा मृत्यू होईपर्यंत विश्वासूपणे सेवा करत राहिली.बेथेलमध्ये घालवलेल्या अनेक वर्षांमध्ये, डॉन वेळोवेळी शाखा दफ्तरांमध्ये व मिशनरी क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्यांची सेवा करण्यासाठी इतर देशांमध्ये जात असे. त्याच्या नेमणुकांमुळे तो पौर्वात्य देश, आफ्रिका, युरोप आणि अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये गेला आहे. डॉनची प्रिय पत्नी, डलोरस सहसा त्याच्यासोबत प्रवास करत असते.
आमची परिस्थिती बदलते
फार काळापर्यंत आजारी राहिल्यावर माझे बाबा मरण पावले; पण मरण्याआधी बाबांनी मला सांगितले की, आम्ही सर्वांनी यहोवा देवाची सेवा निवडली याचा त्यांना खूप आनंद वाटत होता. ते म्हणाले की, त्यांच्या इच्छेनुसार आम्ही कॉलेज शिक्षण घेतले असते तर आम्हाला इतके आशीर्वाद मिळाले नसते जितके आम्हाला आता मिळत होते. मी आईला माझ्या बहिणीच्या अर्थात जॉयच्या जवळपास राहायला जाण्यासाठी मदत केल्यावर, आम्ही पतीपत्नीने न्यू इंग्लंडमध्ये पायनियर नेमणूक स्वीकारली ज्यामुळे आम्ही त्यांच्या आईजवळ असू कारण तिला आमची गरज होती. त्यांची आई वारल्यानंतर माझी आई आमच्यासोबत १३ वर्षे राहिली. त्यानंतर, जानेवारी, १८, १९८७ साली वयाच्या ९३ वर्षी तिने आपली पार्थिव नेमणूक पूर्ण केली.
आईने आपल्या सर्व मुलांना यहोवावर प्रेम करण्यास व त्याची सेवा करण्यास शिकवल्यामुळे तिच्या मित्रमैत्रिणी तिची वाहवाह करायचे तेव्हा आई नेहमी नम्रपणे म्हणायची: “मला चांगली ‘जमीन’ मिळाली म्हणून हे झालं.” (मत्तय १३:२३) आमचे पालक, आवेश आणि नम्रतेचा आदर्श मांडणारे देवभीरु पालक होते हा आमच्याकरता किती मोठा आशीर्वाद ठरला!
राज्य अजूनही पहिल्या स्थानी
आम्ही देवाच्या राज्याला आमच्या जीवनात अजूनही पहिल्या स्थानी ठेवत आहोत आणि देण्यासंबंधी येशूचा सल्ला देखील आम्ही लागू केला आहे. (लूक ६:३८; १४:१२-१४) यहोवाने मोठ्या हाताने आमच्या गरजा भागवल्या आहेत. आमचे जीवन अत्यंत सुरक्षित आणि आनंदी राहिले आहे.
रूडी आणि मला अजूनही संगीतात रस आहे. संगीताची आवड असलेले इतरजण आमच्या घरी एखाद्या संध्याकाळी येतात आणि आम्ही सगळे मिळून आमची वाद्ये वाजवतो तेव्हा खूप छान वाटते. परंतु, संगीत हे माझं क्षेत्र नाही. तो माझ्या जीवनाला आनंद देणारा एक छंद आहे. आमच्या पायनियर सेवेचे प्रतिफळ पाहून, आम्ही कित्येक वर्षांमध्ये मदत केलेल्या लोकांना पाहून माझ्या पतीला आणि मला खूप आनंद वाटतो.
सध्या माझी प्रकृती चांगली नसली तरी मी म्हणू शकते की पूर्ण वेळेच्या सेवेत घालवलेली ६० हून अधिक वर्षे आमच्या जीवनातली आनंदी आणि सुरक्षित वर्षे ठरली आहेत. दररोज सकाळी मी उठते तेव्हा कित्येक वर्षांआधी मी पूर्ण वेळेच्या सेवेत पदार्पण केले त्या वेळी यहोवाने माझ्या प्रार्थनेचे उत्तर दिल्याबद्दल मी त्याचे आभार मानते आणि मग मी असा विचार करते, ‘आज मी पहिल्यांदा राज्य मिळवण्यास कशी झटू शकते?’
[तळटीप]
^ परि. 14 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले परंतु सध्या छापले जात नाही.
[२४ पानांवरील चित्र]
आमचे कुटुंब, १९४८ साली (डावीकडून उजवीकडे): जॉय, डॉन, आई, जोएल, कार्ल, मी व बाबा
[२५ पानांवरील चित्र]
आईने सेवाकार्यात आवेशाचा आदर्श मांडला
[२६ पानांवरील चित्र]
आज कार्ल, डॉन, जोएल, जॉय आणि मी, ५० हून अधिक वर्षांनंतर
[२७ पानांवरील चित्र]
डावीकडून उजवीकडे: डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये मिशनरी असताना मी, मॅरी ॲन्योल, सोफिया सोव्हिक आणि एडीथ मोर्गन
[२८ पानांवरील चित्र]
मॅरीसोबत (डावीकडे) यँकी स्टेडियममध्ये, १९५३
[२९ पानांवरील चित्र]
विभागीय कार्यात माझ्या पतीसोबत