सामान्य लोकांची यहोवा काळजी घेतो
सामान्य लोकांची यहोवा काळजी घेतो
यहोवाचे लक्ष आपल्याकडे जावे म्हणून आपण असामान्य किंवा उल्लेखनीय असण्याची गरज आहे का? अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष, अब्राहाम लिंकन यांनी एकदा असे म्हटल्याचे सांगितले जाते, की “प्रभूला सामान्य लोक आवडतात. म्हणूनच त्याने इतके सामान्य लोक बनवले आहेत.” पुष्कळांना वाटते, की त्यांच्याजवळ खास असे काही गुण नाहीत. सामान्य म्हटले तर “गरीब, कनिष्ठ दर्जाचे लोक” असा काहीजण अर्थ काढतील. तसेच, “सामान्य” या शब्दावरून “विशेष हक्क नसलेले किंवा खास दर्जा नसलेले,” “सामान्य दर्जापेक्षा खालचा” किंवा “दुय्यम प्रतीचा” असेही सूचित होऊ शकते. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या लोकांमध्ये राहायला आवडते? उद्धट, हेकेखोर, गर्विष्ठ लोकांमध्ये? यापेक्षा, मैत्रीपूर्ण, लीन, नम्र, प्रामाणिक व इतरांमध्ये प्रेमळ आस्था दाखवणाऱ्या लोकांमध्ये तुम्हाला राहायला आवडणार नाही का?
आज जगात, भावनिकरीत्या शोषण व थट्टा ही सर्वसाधारण गोष्ट असली तरी, देव व्यक्तिगतपणे आपल्यामध्ये आस्था घेतो यावर काहींना विश्वास बसत नाही. या नियतकालिकाच्या एका वाचकाने म्हटले: “मी अशा एका कुटुंबात लहानाचा मोठा झालो जिथं एकमेकांना प्रेम व्यक्त केलं जायचं नाही. मला कमी लेखले जात, माझी थट्टा केली जात आणि माझ्यावर लोक हसत. त्यामुळे माझ्या जीवनाच्या त्या सुरवातीच्या काळातच मी निरुपयोगी आहे असे मला वाटू लागले होते. माझ्या गतजीवनाच्या खोलवर रुजलेल्या भावना अजूनही माझ्या मनात असल्यामुळे माझ्यावर संकट येते तेव्हा मी निरुत्साहित होतो.” परंतु देवाला व्यक्तिगतपणे सामान्य लोकांमध्ये आस्था आहे असा विश्वास करण्यासाठी अनेक कारणे आहेत.
सामान्य लोकांमध्ये देव आस्था घेतो
राजा दाविदाने लिहिले: “परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे; त्याची थोरवी अगम्य आहे.” (स्तोत्र १४५:३) तथापि यहोवा थोर असला तरी, प्रेमळ व कनवाळुपणे आपली काळजी घेण्यास तो कचरत नाही. (१ पेत्र ५:७) उदाहरणार्थ, स्तोत्रकर्त्याने म्हटले: “परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करितो.”—स्तोत्र ३४:१८.
जगात सौंदर्य, नावलौकिक किंवा धनसंपत्ती यांकडे लोक आकर्षित होतात परंतु देव या गोष्टींना महत्त्व देत नाही. इस्राएल राष्ट्राला देवाने दिलेल्या नियमशास्त्रातून, गरीब, अनाथ, विधवा आणि विदेशी लोकांबद्दल देवाला असलेली करुणामय आस्था व्यक्त झाली. इजिप्टमध्ये क्रूर वागणूक मिळालेल्या इस्राएली लोकांना देवाने सांगितले: “उपऱ्याला छळू नको किंवा त्याच्यावर जुलूम करू नको, . . . कोणा विधवेला किंवा पोरक्याला गांजू नका. तुम्ही त्यांना कोणत्याहि प्रकारे गांजिले आणि त्यांनी माझ्याकडे गाऱ्हाणे केले तर मी त्यांचे गाऱ्हाणे अवश्य ऐकेन.” (निर्गम २२:२१-२४) याशिवाय, यशया संदेष्ट्याने गरीब लोकांबद्दल यहोवाला काळजी आहे यावर आपला विश्वास अशाप्रकारे व्यक्त केला: “निर्दय लोकांचा झपाटा भिंतीवर आदळणाऱ्या वादळाप्रमाणे आहे; पण तू दुर्बलास दुर्ग, लाचारांस विपत्काली आश्रय, वादळांत निवारा, उन्हात सावली, असा झालास.”—यशया २५:४.
देवाचे हुबेहूब “प्रतिरूप” असलेल्या येशू ख्रिस्ताने, आपल्या संपूर्ण सेवाकार्यादरम्यान सर्वसामान्य लोकांबद्दल मनापासून आस्था दाखवून आपल्या अनुयायांपुढे उदाहरण मांडले. (इब्री लोकांस १:३) ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारख्या, . . . गांजलेल्या व पांगलेल्या’ लोकसमुदायांना पाहून येशूला “कळवळा आला.”—मत्तय ९:३६.
तसेच, येशूने कोणत्या प्रकारच्या लोकांना आपले शिष्य होण्यास निवडले ते पाहा—“निरक्षर व अज्ञानी” समजल्या जाणाऱ्या लोकांना त्याने निवडले. (प्रेषितांची कृत्ये ४:१३) येशूच्या मृत्यूनंतर त्याचे शिष्य सर्व प्रकारच्या लोकांना देवाचे वचन ऐकण्यास आमंत्रित करू लागले. “कोणी विश्वास न ठेवणारा किंवा अशिक्षित माणूस” देखील ख्रिस्ती मंडळीत येऊन विश्वासू बनू शकत होता असे प्रेषित पौलाने लिहिले. (१ करिंथकर १४:२४, २५) जगाच्या स्तरांनुसार प्रसिद्ध असलेल्या लोकांनाच केवळ निवडण्यापेक्षा देवाने अनेक साध्यासुध्या, साधारण लोकांना आपल्या सेवेसाठी निवडले. प्रेषित पौलाने म्हटले: “बंधुजनहो, तुम्हास झालेले पाचारणच घ्या; तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन, असे पुष्कळ जण नाहीत; तरी ज्ञान्यांस लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले, आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले; आणि जगातील जे हीनदीन, जे धिक्कारलेले व जे शून्यवत अशांना देवाने ह्या करिता निवडले की, जे आहे ते त्याने रद्द करावे, म्हणजे देवासमोर कोणाहि मनुष्याने अभिमान बाळगू नये.”—१ करिंथकर १:२६-२९.
आजही देवाला पूर्वीप्रमाणेच आपल्या सर्वांमध्ये प्रामाणिक आस्था आहे. “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे” अशी देवाची इच्छा आहे. (१ तीमथ्य २:४) जर देवाने मानवजातीवर इतके प्रेम करून त्यांच्याकरता आपल्या पुत्राला प्राण अर्पण करण्याकरता पृथ्वीवर पाठवले, तर आपल्यावर कोणी प्रेम करीत नाही किंवा आपण निरुपयोगी आहोत असा विचार करण्यास आपल्याजवळ कसलेच कारण उरत नाही. (योहान ३:१६) आपल्या कनिष्ठ आध्यात्मिक बांधवाबरोबर आपण ज्याअर्थी व्यवहार करतो त्याअर्थी ते खुद्द येशू ख्रिस्ताला केल्यासारखे आहे, ही महत्त्वाची गोष्ट येशूने आपल्या अनुयायांना दाखवून दिली. तो म्हणाला: “ज्याअर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले, त्याअर्थी ते मला केले आहे.” (मत्तय २५:४०) जगाच्या दृष्टीत आपण कसेही असलो तरी, सत्यावर आपले प्रेम असेल तर देवाच्या नजरेत आपण बहुमोल आहोत.
देवाबरोबर घनिष्ठ नातेसंबंध जोडल्यावर फ्रान्सिस्कु * नावाच्या ब्राझीलमधील एका अनाथ मुलाला असेच वाटले. तो म्हणतो: “यहोवाशी आणि त्याच्या संघटनेशी माझी ओळख झाल्यावर, माझ्या मनात असलेल्या असुरक्षिततेच्या आणि बुजरेपणाच्या भावनांवर मात करायला मला मदत मिळाली. यहोवाला आपल्या प्रत्येकामध्ये आस्था आहे हे मी शिकलो.” यहोवा, फ्रान्सिस्कुला एका खऱ्या पित्यासारखा झाला.
तरुणांबद्दल काळजी
यहोवा, गट या नात्याने नव्हे तर प्रत्येक तरुणामध्ये मनापासून आस्था घेतो. अर्थात, तरुण असो अथवा वृद्ध, आपण स्वतःला श्रेष्ठ समजू नये. आपल्याजवळ काही कला असतील, गुण असतील ज्यांचा पुढे देव उपयोग करू शकतो. आपल्या कलांचा व गुणांचा पूर्णपणे उपयोग करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या बाबतीत सुधारणा करावी लागेल, प्रशिक्षण घ्यावे लागेल हे यहोवाला माहीत आहे. उदाहरणार्थ, १ शमुवेल याच्या १६ व्या अध्यायातील अहवालाची नोंद घ्या. शमुवेल संदेष्ट्याला, इस्राएलचे राज्यपद स्वीकारण्यास इतर भावी उमेदवार अधिक पात्र वाटले तेव्हा यहोवाने, आपण इस्राएलचा भावी राजा म्हणून इशायचा सर्वात १ शमुवेल १६:७.
धाकटा पुत्र दावीद याला का निवडले त्याची कारणे स्पष्ट करीत म्हटले: “तू त्याच्या [दावीदाचा थोरला भाऊ] स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केले आहे; मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते; मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो.”—यहोवा आपल्यात मनापासून आस्था बाळगतो हा भरवसा आज तरुण लोक बाळगू शकतात का? ॲना नावाच्या ब्राझीलच्या एका तरुण स्त्रीचे उदाहरण घ्या. इतर तरुणांप्रमाणेच ॲना देखील जगात चाललेला भ्रष्टाचार व अन्याय पाहून निराश झाली होती. मग तिचे वडील तिला आणि तिच्या बहिणींना आपल्यासोबत ख्रिस्ती सभांना घेऊन जाऊ लागले. कालांतराने, ती देवाच्या वचनातून जे काही शिकत होती ते तिला आवडू लागले. बायबल आणि ख्रिस्ती प्रकाशने वाचायला व यहोवा देवाला प्रार्थना करायला ॲनाला आवडू लागले. हळूहळू, तिचा देवाबरोबर घनिष्ठ नातेसंबंध जुळला. ती म्हणते: “माझ्या घराजवळच्या टेकडीवर सायकलीनं जाऊन सूर्यास्त पाहायला मला खूप आवडायचे. मी यहोवाला प्रार्थना करू लागले, त्याच्या दयाळुपणाबद्दल, उदारतेबद्दल त्याचे आभार मानले आणि मी त्याच्यावर किती प्रेम करते हे मी त्याला बोलून दाखवले. यहोवा देव आणि त्याचे उद्देश माहीत झाल्यावर मला मानसिक शांती मिळाली, सुरक्षिततेची भावना माझ्यात निर्माण झाली.” तुम्ही देखील यहोवाच्या प्रेमळ काळजीवर मनन करण्यासाठी वेळ काढता का?
आपल्या पार्श्वभूमीमुळे कदाचित आपल्याला यहोवाबरोबर जवळचा नातेसंबंध जोडणे शक्य होत नसेल, हे मान्य आहे. लिडियाचे उदाहरण घ्या. एकदा तिने आपल्या वडिलांना, तिला अतिशय काळजी वाटत होती अशा खासगी गोष्टीविषयी सांगितले, तेव्हा तिच्या वडिलांनी तिला “वेडीच आहेस” असे म्हणून धुडकावून लावले. आपण ही समस्या विसरून जावी असे आपल्या वडिलांना वाटते, हे तिला समजत होते तरी लिडिया म्हणते: “बायबलचा अभ्यास केल्यावर मला, मी ज्याची आतुरतेने वाट पाहत होते ते कितीतरीपटीने मिळाले होते. यहोवाच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे मी त्याला माझा सख्खा मित्र बनवले. आता, मला असा प्रेमळ व समजुतदार पिता मिळाला आहे ज्याला मी माझ्या भावना आणि माझ्या मनात असलेले भय निसंकोचपणे व्यक्त करू शकते. विश्वातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीबरोबर मी तासन्तास बोलू शकते, ही खात्री बाळगून की तो निश्चित माझे ऐकतो.” फिलिप्पैकर ४:६, ७ सारख्या बायबलमधील वचनांनी तिला यहोवाची प्रेमळ काळजी अनुभवण्यास मदत केली. ती वचने म्हणतात: “कशाविषयीहि चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.”
आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारी मदत
यहोवा आपल्या प्रत्येक सेवकाची तसेच संपूर्ण जगभरातील मंडळ्यांची देखील काळजी घेतो. आपणही आपल्या स्वर्गीय पित्याबद्दल आपल्याला असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याच्याबरोबर वेळ काढून बोलले पाहिजे. त्याच्याबरोबर आपला जो नातेसंबंध आहे त्याला आपण केव्हाही क्षुल्लक समजू नये. दावीदाने सतत यहोवाबरोबर असलेल्या आपल्या नातेसंबंधाची जाणीव ठेवली. तो म्हणाला: “हे परमेश्वरा, तुझे मार्ग मला दाखीव; तुझ्या वाटा मला प्रगट कर. तू आपल्या सत्पथाने मला ने, मला शिक्षण दे, कारण तूच माझा उद्धारक देव आहेस; मी तुझी नित्य प्रतीक्षा करितो.”—स्तोत्र २५:४, ५.
देवाबरोबर घनिष्ठ नातेसंबंध जोडण्याची कल्पना तुम्हाला कदाचित नवीन वाटेल. तुमच्या कोणत्याही समस्या असल्या तरी, तुम्ही ही खात्री बाळगू शकता, की सर्वसमर्थ देव त्याच्या इच्छेच्या सामंजस्यानुसार तुम्हाला मदत करील. १ योहान ५:१४, १५) यास्तव, आपली परिस्थिती आणि गरजा यांचा विचार करून स्पष्ट व नेमक्या प्रार्थना करायला शिका.
(मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी शलमोन राजाने केलेली प्रार्थना, आपल्या गरजा ओळखण्याच्या महत्त्वावर जोर देते: ‘या देशावर दुष्काळ, मरी, शेते, करपून टाकणारा वारा अथवा भेरड, टोळ अथवा नाकतोडे ही आली, अथवा शत्रूंनी त्यांच्या एखाद्या शहरास वेढा घातला अथवा दुसरी कोणतीहि आपत्ती अथवा रोग त्यांजवर आला, तर एखादा इस्राएल किंवा तुझे सगळे इस्राएल लोक आपणांस होणारे क्लेश किंवा दु:ख ओळखून जी प्रार्थना किंवा विनवणी करितील, ती तू स्वर्गातून ऐक, प्रत्येकाच्या वर्तनाप्रमाणे त्यांस फळ दे.’ (२ इतिहास ६:२८-३०) होय, आपल्याला “होणारे क्लेश किंवा दुःख” आपणच ‘ओळखतो.’ तेव्हा, आपल्या खरोखरच्या गरजा आणि इच्छा काय आहेत हे आपण कबूल करणे किती महत्त्वाचे आहे. असे केल्यास यहोवा तुमचे “मनोरथ पूर्ण करील.”—स्तोत्र ३७:४.
यहोवाबरोबर आपला नातेसंबंध दृढ करा
साधारण माणसांस आपल्याबरोबर नातेसंबंध ठेवू देण्यास यहोवाला आनंद वाटतो. त्याचे वचन आपल्याला अशी हमी देते: “मी तुम्हाला पिता असा होईन, आणि तुम्ही मला पुत्र व कन्या अशी व्हाल, असे सर्वसमर्थ प्रभु म्हणतो.” (२ करिंथकर ६:१८) खरेच, आपण यशस्वी होऊन सार्वकालिक जीवन प्राप्त करावे असे यहोवाला आणि त्याच्या पुत्राला अर्थात येशूला वाटते. कुटुंबात, नोकरीच्या ठिकाणी, ख्रिस्ती मंडळीत आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास आपल्याला मदत करायला यहोवा तयार आहे हे जाणणे खरोखर किती उत्तेजन देणारे आहे!
तरीपण, आपल्या सर्वांना कठीण काळाचा सामना करावा लागतो. आजारपण, कौटुंबिक समस्या, कमी पगार किंवा इतर समस्यांमुळे आपण दुःखी होऊ. आपल्यासमोर परीक्षा येते तेव्हा तिचा सामना कसा करायचा हे कदाचित आपल्याला कळणार नाही. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्यावर येणारे वाढते दबाव, दुष्ट आरोप करणारा दियाबल सैतान याच्याकडून येतात; सैतान देवाच्या लोकांविरुद्ध आध्यात्मिक युद्ध लढत आहे. परंतु आपल्याला समजून घेणारा एक जण आहे; तो आपल्याला यहोवाबरोबर चांगला नातेसंबंध विकसित करायला मदत करतो. तो दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द येशू ख्रिस्त आहे जो सध्या स्वर्गात उच्च पदावर आहे. त्याच्याविषयी आपण असे वाचतो: “आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूति वाटत नाही, असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता; तरी निष्पाप राहिला. तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी साहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ.”—इब्री लोकांस ४:१५, १६.
देवाची मर्जी प्राप्त करण्यासाठी आपल्याला नामवंत असण्याची किंवा श्रीमंत असण्याची गरज नाही हे जाणून आपल्याला किती दिलासा मिळतो! कठीण परिस्थितीत असताना देखील स्तोत्रकर्त्यासारखी प्रार्थना करा: “मी तर दीन व दरिद्री आहे; तरी प्रभूला माझी चिंता आहे; माझा साहाय्यकारी व माझा मुक्तिदाता तू आहेस.” (स्तोत्र ३१:९-१४; ४०:१७) यहोवा नम्र आणि साधारण लोकांवर प्रेम करतो ही खात्री बाळगा. होय, आपण ‘आपल्या सर्व चिंता त्याच्यावर टाकू या कारण तो आपली काळजी घेतो.’—१ पेत्र ५:७.
[तळटीप]
^ परि. 10 काही नावे बदलण्यात आली आहेत.
[२९ पानांवरील चित्रे]
येशूचे अनेक अनुयायी निरक्षर व अज्ञानी होते
[३० पानांवरील चित्र]
ख्रिस्ती आपला विश्वास भक्कम करण्यासाठी झटतात
[३१ पानांवरील चित्रे]
देवाची मर्जी प्राप्त करण्यासाठी आपल्याला नामवंत असण्याची गरज नाही