रक्ताचे पावित्र्य राखण्यात मदत
राज्य घोषकांचा वृत्तान्त
रक्ताचे पावित्र्य राखण्यात मदत
संपूर्ण जगभरात यहोवाच्या सेवकांनी रक्ताच्या पावित्र्यासंबंधी देवाला विश्वासूपणा दाखवला आहे. (प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९) विश्वासू आणि बुद्धिमान दास वर्गाने ख्रिस्ती बंधुसमाजाला मदत दिली आहे. (मत्तय २४:४५-४७) फिलिपाईन्समध्ये याचे काय परिणाम झाले ते पाहू या.
फिलिपाईन्सच्या शाखेचा पुढीलप्रमाणे अहवाल आहे: “१९९० मध्ये आम्हाला कळवण्यात आले की, ब्रुकलिन बेथेलचे प्रतिनिधी फिलिपाईन्समध्ये एक चर्चासत्र भरवण्यासाठी येणार आहेत. विविध आशियाई शाखांमधील अर्थात कोरिया, तायवान आणि हाँगकाँग येथून बांधवांना निमंत्रण देण्यात आले होते. त्या त्या शाखांमध्ये इस्पितळ माहिती सेवा सुरू करणे व इस्पितळ सहकार्य समितींची व्यवस्था करणे हा या चर्चासत्राचा हेतू होता. फिलिपाईन्समध्ये या समित्या प्रथम चार प्रमुख शहरांमध्ये प्रस्थापित करण्यात आल्या.” रक्तासंबंधाने ख्रिस्ती भूमिकेला सहयोग देण्याची इच्छा दाखवणाऱ्या डॉक्टरांना शोधणे हा या समितींचा प्रयत्न असणार होता. रक्तासंबंधाने काही समस्या उद्भवल्यासही ते बांधवांची मदत करणार होते.
रमिक्यो यांना बागियो येथील इस्पितळ सहकार्य समितीत काम करण्यासाठी निवडण्यात आले. काही काळाने, ही सेवा डॉक्टरांच्या नजरेत येऊ लागली. रमिक्यो एका प्रसंगाविषयी आठवून सांगतात की, इस्पितळ सहकार्य समितीसोबत डॉक्टरांच्या एका सभेत रक्त नाकारणाऱ्या साक्षीदार रुग्णांना कसला उपचार द्यावा हे त्यांना जाणून घ्यायचे होते. रमिक्यो म्हणाले: “डॉक्टरांनी एकामागोमाग एक प्रश्न विचारायला सुरवात केली आणि मला उत्तर देता येईनासे झाले कारण त्यांचे प्रश्न तांत्रिक स्वरूपाचे होते.” या समस्येला नीट हाताळण्यासाठी त्यांनी यहोवाला प्रार्थना केली. रमिक्यो पुढे म्हणतात: “प्रत्येक प्रश्नानंतर, इतर डॉक्टर हात वर करून त्या सारख्याच परिस्थितीत त्यांनी काय केले हे सांगू लागले.” रमिक्योला ही मदत मिळाल्याचा फार आनंद झाला कारण हे प्रश्न-उत्तराचे सत्र दोन तासांपर्यंत चालले.
सध्या त्या संपूर्ण देशात २१ समित्या आहेत आणि एकूण ७७ बांधव त्या समित्यांमध्ये कार्य करत आहेत. डॅनिलो नावाचे वैद्यकीय डॉक्टर असलेले एक साक्षीदार म्हणतात: “डॉक्टरांना याची जाणीव होत आहे की, साक्षीदार रुग्णांच्या पाठीशी त्यांची काळजी घेणारी एक संघटना आहे.” एक डॉक्टर सुरवातीला एका बांधवावर रक्ताविना शस्त्रक्रिया करायला कचरत होते. आपला बांधव मात्र डगमगला नाही. शेवटी शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ती यशस्वी ठरली. इस्पितळ माहिती सेवाने असा अहवाल दिला: “बांधवाच्या तब्येतीत झालेली सुधारणा पाहून डॉक्टर चकित झाले. ते म्हणाले: ‘आतापासून तुमच्या सदस्यांपैकी कोणालाही अशाप्रकारची शस्त्रक्रिया रक्त न घेता करायची असल्यास मी आनंदाने ती करीन.’”