समाधानी राहण्याचे रहस्य शिकणे
समाधानी राहण्याचे रहस्य शिकणे
फिलिप्पै येथील ख्रिश्चनांना लिहिलेल्या उत्तेजनदायक पत्रात, प्रेषित पौलाने लिहिले: “आहे त्या स्थितीत मी समाधानी राहण्याचे शिकलो आहे. . . . कोणत्याही वेळी आणि सर्व परिस्थितीत तृप्त राहण्याचे व भुकेले राहण्याचे, भरपूर बाळगण्याचे आणि अपूरेपणात राहण्याचे अशा सर्व परिस्थितीत राहण्याचे रहस्य मी शिकलो आहे.”—फिलिप्पैकर ४:११, १२, ईजी-टू-रीड व्हर्शन.
पौलाचे समाधानी राहण्याचे रहस्य काय होते? आपल्या काळातील राहणीमानाचा खर्च आणि आर्थिक अस्थिरता पाहता, खऱ्या ख्रिश्चनांनी देवाच्या सेवेत केंद्रित राहण्याकरता समाधानी राहण्यास शिकणे निश्चितच फायदेकारक आहे.
आपल्या पत्रात आधी, पौलाने आपल्या पूर्वीच्या यशस्वी कारकीर्दीचे वर्णन केले. तो म्हणाला: “जर दुसऱ्या कोणाला देहावर भरवसा ठेवावा असे वाटते तर मला अधिक वाटणार. मी तर आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएल लोकांतला, बन्यामीन वंशातला, इब्य्रांचा इब्री; नियमशास्त्रदृष्टीने परूशी; आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा; नियमशास्त्रातील नीतिमत्त्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे.” (फिलिप्पैकर ३:४-६) शिवाय, आवेशी यहूदी या नात्याने पौलाला जेरूसलेममधील मुख्य याजकांकडून एक नेमणूक मिळाली होती आणि त्यांचा त्याला पूर्ण पाठिंबा होता. यामुळे यहूदी व्यवस्थेत त्याला राजनैतिक, धार्मिक आणि अर्थातच आर्थिकदृष्ट्या सत्ता आणि प्रतिष्ठा मिळण्याची आशा होती.—प्रेषितांची कृत्ये २६:१०, १२.
परंतु, पौल एक आवेशी ख्रिस्ती सेवक बनला तेव्हा एक मोठा बदल घडला. सुवार्तेकरता त्याने आपली यशस्वी कारकीर्द व पूर्वी तो महत्त्वपूर्ण समजत असलेल्या सर्व गोष्टी सोडून दिल्या. (फिलिप्पैकर ३:७, ८) त्याचा उदरनिर्वाह आता कसा होणार? सेवक म्हणून त्याला वेतन मिळणार होते का? त्याच्या व्यक्तिगत गरजा कशा पूर्ण होणार होत्या?
पौलाने कसलाही मोबदला न घेता आपले सेवाकार्य केले. ज्यांची तो सेवा करत होता त्यांच्यावर आपला बोजा पडू नये म्हणून करिंथमध्ये असताना तो अक्विल्ला व प्रिस्किल्ला यांच्यासोबत राहुट्या करत होता; स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याने इतरही कामे केली. (प्रेषितांची कृत्ये १८:१-३; १ थेस्सलनीकाकर २:९; २ थेस्सलनीकाकर ३:८-१०) पौलाने तीन विस्तृत मिशनरी यात्रा केल्या होत्या आणि भेट देण्याची गरज असलेल्या मंडळ्यांकडेही तो प्रवास करून जायचा. देवाच्या सेवेत पूर्णपणे व्यापलेला असल्यामुळे त्याच्याजवळ फार कमी भौतिक वस्तू होत्या. सहसा बांधव त्याला मूलभूत गोष्टी पुरवायचे. परंतु, काही वेळा प्रतिकूल परिस्थितींमुळे त्याला काही गोष्टींची उणीव भासायची. (२ करिंथकर ११:२७; फिलिप्पैकर ४:१५-१८) असे असतानाही पौलाने कधी आपल्या दशेबद्दल तक्रार केली नाही किंवा इतरांच्या सुखसोयींचा हेवा केला नाही. सह ख्रिश्चनांच्या हिताकरता त्याने स्वच्छेने आणि आनंदाने कष्ट केले. किंबहुना, पौलाने येशूच्या सुप्रसिद्ध शब्दांना उद्धृत केले: “घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे.” आपल्या सर्वांकरता किती उल्लेखनीय उदाहरण!—प्रेषितांची कृत्ये २०:३३-३५.
समाधानी असण्याचा अर्थ
पौलाच्या आनंदाला त्याची समाधानी वृत्ती प्रामुख्याने कारणीभूत होती. परंतु, समाधानी असण्याचा काय अर्थ होतो? सोप्या भाषेत म्हणायचे तर, त्याचा अर्थ मूलभूत गोष्टींमध्ये तृप्त असणे असा होतो. याविषयी पौलाने आपल्या सेवेतील साथीदार, तीमथ्य याला म्हटले: “चित्तसमाधानासह भक्ति हा तर मोठाच लाभ आहे. आपण जगात काही आणिले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही; आपल्याला अन्नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे.”—१ तीमथ्य ६:६-८.
पौलाने समाधानी असण्याचा संबंध भक्तीशी जोडला याकडे लक्ष द्या. त्याने हे ओळखले की, खरा आनंद ईश्वरी भक्तीने प्राप्त होतो, अर्थात, देवाच्या सेवेला प्रथम स्थान दिल्याने प्राप्त होतो; भौतिक वस्तू किंवा संपत्ती मिळवल्याने प्राप्त होत नाही. “अन्नवस्त्र” हे ईश्वरी भक्तीच्या मार्गावर राहण्यासाठी केवळ एक माध्यम होते. त्यामुळे, समाधानी राहण्याचे पौलाचे रहस्य, कोणत्याही परिस्थितीत यहोवावर विसंबून राहणे, हे होते.
आज अनेक लोकांना खूप चिंता आहेत आणि ते दुःखी आहेत कारण या रहस्याविषयी त्यांना ठाऊक नाही किंवा ते त्याकडे दुर्लक्ष करतात. समाधानी राहण्याऐवजी त्यांनी पैशावर आणि पैशातून खरेदी करता येणाऱ्या वस्तूंवर आपला भरवसा ठेवण्यास पसंत केले आहे. जाहिरात उद्योग आणि प्रसारमाध्यमातून लोकांना असे भासवले जाते की, सर्वात अत्याधुनिक आणि उत्कृष्ट उत्पादने आपल्याजवळ असल्याशिवाय—आणि तेही होता होईल तितक्या लवकर ती मिळवल्याशिवाय—आपण १ तीमथ्य ६:९, १०.
आनंदी होऊ शकत नाही. परिणामतः, पुष्कळ लोक पैशांच्या व भौतिक गोष्टींच्या मागे लागतात. पण आनंद आणि समाधान मिळवण्याऐवजी ते “परीक्षेत, पाशांत आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्या अशा मुर्खपणाच्या व बाधक वासनांत सापडतात.”—त्यांनी रहस्य शिकले आहे
आजच्या काळात, ईश्वरी भक्तीने जगणे आणि समाधानी, आनंदी व तृप्त असणे खरोखर शक्य आहे का? निश्चितच आहे. किंबहुना, लाखो लोक आज असेच आहेत. त्यांनी स्वतःजवळ जितक्या भौतिक गोष्टी आहेत त्यात आनंदी राहण्याचे रहस्य शिकले आहे. ते आहेत यहोवाचे साक्षीदार ज्यांनी स्वतःचे जीवन देवाला समर्पित करून त्याची इच्छा करण्यासाठी व सर्व ठिकाणच्या लोकांना त्याचा उद्देश शिकवण्यासाठी स्वतःला वाहून घेतले आहे.
ज्यांनी प्रशिक्षण घेऊन देवाच्या राज्याची सुवार्ता अपरिचित देशांमध्ये मत्तय २४:१४) बहुतेक वेळा, त्यांना ज्या देशांमध्ये पाठवले जाते तेथील राहणीमान त्यांना सवय असते तसे उत्कृष्ट दर्जाचे नसते. उदाहरणार्थ, १९४७ साली एका आशियाई देशात मिशनरी आले तेव्हा युद्धाचे परिणाम अद्यापही दिसत होते आणि काही मोजक्या घरांमध्येच विजेच्या दिव्यांची सोय होती. अनेक देशांमध्ये, इलेक्ट्रिक वॉशिंग मशिनऐवजी एका खरबरीत फळीवर किंवा नदीकाठच्या खडकावर एक-एक करून कपडे धुवावे लागत होते. पण मिशनरी, लोकांना बायबलची सत्ये शिकवण्यासाठी आले होते, म्हणून स्थानीय परिस्थितींशी त्यांनी जुळवून घेतले आणि सेवाकार्यात व्यस्त झाले.
प्रचार करण्यासाठी मिशनरी बनून जाण्याची तयारी दाखवली आहे त्यांचे उदाहरण पाहा. (इतरांनी पूर्ण-वेळेची सेवा स्वीकारली आहे किंवा सुवार्तेचा अद्याप प्रचार झालेला नाही अशा भागांमध्ये ते राहायला गेले आहेत. आडुल्फो यांनी मेक्सिकोतील विविध भागांमध्ये ५० हून अधिक वर्षांपर्यंत पूर्ण-वेळेची सेवा केली आहे. ते म्हणतात: “प्रेषित पौलाप्रमाणे माझी पत्नी व मी परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकलो आहोत. उदाहरणार्थ, एक मंडळी—जिला आम्ही भेट द्यायचो—फार दूरवर होती; तिच्या आसपास कोणतेही शहर किंवा बाजार नव्हता. बांधवांचे जेवण म्हणजे, एक टोर्टिला, डुकराची थोडी चरबी, मीठ आणि एक कपभर कॉफी; आणि बांधव त्यात संतुष्ट होते. त्यांना दिवसातून तीनदा हेच, म्हणजे तीन टोर्टिला, खायला मिळायचे. मग आम्हीसुद्धा त्यांच्यासारखेच जगायला शिकलो. ५४ वर्षांमध्ये यहोवाची पूर्ण-वेळ सेवा करत असताना मला अशाप्रकारचे अनेक अनुभव आले.”
फ्लोरेंटिनो आणि त्यांच्या कुटुंबाला अत्यंत अडचणीत दिवस काढावे लागले. आपल्या लहानपणच्या दिवसांची आठवण काढून ते सांगतात: “माझे वडील एक बडे व्यापारी होते. त्यांच्याजवळ पुष्कळ जमीन होती. आमच्या किराणा मालाच्या दुकानाचे काउंटर मला अजून आठवते. तिथला गल्ला ५० सेंटीमीटर रुंद आणि २० सेंटीमीटर खोल होता आणि त्यात चार कप्पे होते. त्यात आम्ही प्रत्येक दिवसाचे पैसे गोळा करायचो. दिवसाच्या शेवटी, तो गल्ला नेहमी पैशांनी आणि नोटांनी भरलेला असायचा.
“मग अचानक आमचा धंदा मंद झाला आणि आम्ही एकदम गरीब झालो. आमच्या घराशिवाय आमच्याजवळ होते नव्हते ते सर्व गेले. शिवाय, माझ्या एका भावाचा अपघात झाला आणि त्यात त्याचे दोन्ही पाय लुळे पडले. ते पूर्वीचे दिवस गेले होते. काही काळापर्यंत मी फळे आणि मांस विकण्याचे काम केले. मी कापूस, द्राक्षे आणि अल्फाल्फा यांची कापणी करण्याचे व शेताला पाणी देण्याचेही काम केले. काही लोक मला ऑलराउंडर म्हणायचे. माझी आई आम्हाला सांत्वन देत म्हणायची, ‘आपल्याजवळ सत्य आहे. आपल्यासारखे फार कमी लोक आध्यात्मिकरित्या श्रीमंत आहेत.’ अशाप्रकारे मी श्रीमंतीही अनुभवली आणि गरिबीचे दिवसही पाहिले. आता मला यहोवाची पूर्ण-वेळ सेवा करून सुमारे २५ वर्षे झाली आहेत आणि पदोपदी मला याचा प्रत्यय येतो की मी यहोवाची सेवा पूर्ण-वेळ करण्याचा निवडलेला मार्ग सर्वात उत्तम मार्ग आहे.”
बायबल आपल्याला अगदी ठासून सांगते की, “ह्या जगाचे बाह्य स्वरूप लयास जात आहे.” या कारणास्तव ते आपल्याला आर्जवते: “जे आनंद करितात त्यांनी आनंद करीत नसल्यासारखे; जे विकत घेतात त्यांनी आपणाजवळ काही नसल्यासारखे; आणि जे ह्या जगाचा उपयोग करितात त्यांनी त्याचा उपयोग पूर्णपणे करीत नसल्यासारखे असावे.”—१ करिंथकर ७:२९-३१.
त्यामुळे, आपल्या जीवनशैलीचे जवळून परीक्षण करण्याचा हाच समय आहे. तुमच्याजवळ कमतरता असल्यास, आपल्या स्थितीविषयी मनात राग बाळगणे, इतकेच नव्हे तर कटू होणे आणि लोकांचा हेवा करू लागणे या प्रवृत्तीपासून सावध राहा. दुसऱ्या बाजूला पाहता, तुमच्याजवळ भौतिक वस्तू असतील तर तुमच्या जीवनात त्यांना योग्य जागी ठेवा जेणेकरून त्यांचे नियंत्रण तुमच्यावर राहणार नाही. प्रेषित पौलाने सल्ला दिल्याप्रमाणे, “चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपल्या उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी.” असे केल्यास तुम्ही देखील म्हणू शकाल की तुम्ही समाधानी राहण्याचे रहस्य शिकला आहात.—१ तीमथ्य ६:१७-१९.
[९ पानांवरील चित्र]
इतरांवर बोजा बनू नये म्हणून पौलाने स्वतः कष्ट केले
[१० पानांवरील चित्रे]
‘चित्तसमाधानासह भक्तिच्या’ जीवनात हजारो लोकांना आनंद मिळत आहे