व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अलेक्झांडर सहावा रोमचा अविस्मरणीय पोप

अलेक्झांडर सहावा रोमचा अविस्मरणीय पोप

अलेक्झांडर सहावा रोमचा अविस्मरणीय पोप

“कॅथलिक दृष्टिकोनातून अलेक्झांडर सहावा याचे खंडन कितीही कडक शब्दांत करावे तितके कमीच आहे.” (गेशिकटे देर पॅपस्टे झाइटडेम आउसगाँग देस मिटअलॉलटर्स [मध्ययुगाच्या शेवटापासून पोपांचा इतिहास]) “त्याचे खासगी जीवन अगदी अक्षम्य आहे . . . त्याचे पोपपद चर्चला कलंक ठरले आहे. अशा प्रकारच्या घृणित कृत्यांची सवय असूनही बोर्जिया कुटुंबाच्या समकालीन लोकांकरता त्यांचे गुन्हे अत्यंत दहशत पसरवणारे होते, ज्यांचे परिणाम, चारहून अधिक शतकांनंतरही पूर्णतः विसरण्यात आलेले नाहीत.”—लेगलीझ ए ला रनासॉन्स (१४४९-१५१७) (चर्च आणि प्रबोधनकाळ).

रोमन कॅथलिक चर्चसंबंधीच्या प्रसिद्ध ऐतिहासिक ग्रंथात एका पोपची व त्याच्या कुटुंबाची इतकी कडक टीका का करण्यात आली आहे? त्यांची टीका करावी असे त्यांनी काय केले? रोममध्ये भरवण्यात आलेल्या ई बोर्जे—लॉरटे डेल पोटारे (बोर्जिया कुटुंब—सत्तेची कला) नावाच्या एका प्रदर्शनात (ऑक्टोबर २००२-फेब्रुवारी २००३) पोपांकडे असलेल्या अधिकारांविषयी, खासकरून, रॉड्रिगो बोर्जिया किंवा अलेक्झांडर सहावा (पोप १४९२-१५०३) याने आपल्या अधिकाराचा ज्या पद्धतीने वापर केला त्याविषयी विचार करायला एक संधी मिळाली.

अधिकारात येणे

रॉड्रिगो बोर्जियाचा जन्म १४३१ साली, सध्या स्पेनमध्ये असलेल्या अरागॉन राज्यात एका मोठ्या घराण्यात झाला. त्याचे मामा व व्हॅलेन्शियाचे बिशप, ऑल्फोन्सो द बोर्जिया यांनी स्वतः आपल्या भाच्याच्या शिक्षणाकडे लक्ष दिले आणि तो किशोर वयात असतानाच त्याला एक्लेसियॅस्टिकल बेनिफाइस (वेतन असलेले पादरी पद) मिळण्याची खात्री केली. तोपर्यंत कार्डिनल झालेल्या ऑल्फोन्सोच्या देखरेखीखाली, १८ वर्षांचा रॉड्रिगो, इटलीला गेला आणि तेथे त्याने कायद्याचा अभ्यास केला. ऑल्फोन्सो जेव्हा पोप कॅलिक्सटस तिसरा बनला तेव्हा त्याने रॉड्रिगो आणि आणखी एका भाच्याला कार्डिनल केले. पेरे ल्वीस बोर्जिया याला विविध शहरांवर अधिपती नेमण्यात आले. लवकरच रॉड्रिगोला चर्चचा उप-मुख्याधिकारी म्हणून नियुक्‍त करण्यात आले; विविध पोपांच्या राज्यात तो या पदी राहिला ज्याकरवी त्याने भरमसाट पगार, धनसंपत्ती, अधिकार मिळवला आणि एखाद्या राजपुत्रासारखा तो ऐषारामात जगला.

रॉड्रिगो हुशार, वाक्‌चतुर, कलांचा आश्रयदाता व आपली उद्दिष्टे साध्य करण्यास सक्षम होता. पण, त्याचे अनेक स्त्रियांसोबत अनैतिक संबंध होते; त्याच्यासोबत शेवटपर्यंत राहिलेल्या त्याच्या रखेलीपासून त्याला चार मुले झाली आणि इतर स्त्रियांपासूनही त्याला आणखी मुले झाली. पोप पियस दुसरे यांनी त्याला “स्वैराचाराचा” नाद आणि “अनियंत्रित सुखोपभोग” याकरता त्याचे ताडन केले परंतु रॉड्रिगोने आपला मार्ग बदलला नाही.

सन १४९२ मध्ये पोप इनसंट आठवे यांचा मृत्यू झाल्यावर चर्चमधील कार्डिनल एका वारसदाराला नियुक्‍त करण्यासाठी एकत्र जमले. यात काहीच शंका नाही की, रॉड्रिगो बोर्जिया याने मोठमोठ्या देणग्या समोर ठेवून व उघडरित्या उपेक्षा करून आपल्या सोबतीच्या कार्डिनल्सकडून भरपूर मते गोळा केली जेणेकरून त्या गुप्त सभेत पोप अलेक्झांडर सहावा म्हणून त्याची नियुक्‍त केली जावी. त्याला इतर कार्डिनलांनी मते दिली तेव्हा त्याने त्यांना काय दिले? चर्चमध्ये अधिकारस्थान, राजमहाल, किल्ले, शहरे, योगिगृहे आणि ज्यांतून भरमसाट वेतन मिळेल असे बिशपच्या अधिकाराखालचे प्रदेश त्याने त्यांना दिले. अलेक्झांडर सहाव्याच्या राज्यशासनाला एका चर्च इतिहासकाराने “कुप्रसिद्धीचा काळ आणि रोमन चर्चवरील कलंक” असे का म्हटले हे आता तुमच्या लक्षात येईल.

ऐहिक राजपुत्रांसारखा अधिकार

चर्चचा सर्वश्रेष्ठ धर्मप्रमुख या नात्याने त्याच्याजवळ असलेल्या आध्यात्मिक सत्तेमुळे अलेक्झांडर सहावा याने अमेरिकेतील नव्याने शोधलेल्या क्षेत्रांपैकी असलेल्या स्पेन व पोर्तुगालच्या विभाजनासंबंधीची समस्या सोडवली. त्याच्या राजकीय वर्चस्वामुळे तो मध्य इटलीत क्षेत्रे असलेल्या पोपच्या राज्यांचा प्रमुख बनला आणि प्रबोधनकाळातील इतर कोणत्याही शासकाप्रमाणे तो राज्यशासन करत असे. अलेक्झांडर सहावा याच्या शासनात, त्याच्या पूर्वी आणि नंतर झालेल्या पोपांच्या शासनांप्रमाणेच, लाचलुचपत, आप्तेष्टांबाबत पक्षपात आणि एकापेक्षा अधिक संशयी मृत्यू होत होते.

या क्षुब्धतेच्या काळात प्रतिस्पर्धी सत्ता इटलीतील क्षेत्रे मिळवण्यासाठी संघर्ष करत होती आणि पोप देखील यांत सामील होता. त्याने स्थापिलेल्या व नंतर संपुष्टात आलेल्या त्याच्या राजकीय योजना आणि मैत्रीसंबंध त्याचा अधिकार वाढवण्यासाठी, त्याच्या मुलांच्या कारकीर्दीला बढावा देण्यासाठी आणि बोर्जिया घराण्याला इतरांपेक्षा श्रेष्ठ करण्यासाठी होते. त्याचा मुलगा ह्वॉन याने कॅस्टीलच्या राजाच्या नात्यातल्या एका बहिणीशी विवाह केला; त्याला स्पेनच्या गॅन्डीयाचा ड्यूक बनवण्यात आले. त्याचा दुसरा मुलगा, जोफ्रे याचा विवाह नेपल्सच्या राजाच्या नातीशी झाला.

फ्रान्ससोबत नातेसंबंध मजबूत करण्यासाठी पोपला पाठिंब्याची गरज होती तेव्हा त्याने लुक्रेटस्या या आपल्या १३-वर्षांच्या मुलीचे एका आर्गोनी उमरावाशी जमलेले लग्न मोडले आणि त्याऐवजी तिला मिलानचा ड्यूक असलेल्या एका नातेवाईकाला दिले. या विवाहाचा राजकीयदृष्ट्या काहीच फायदा झाला नाही तेव्हा एक निमित्त शोधून तो मोडण्यात आला आणि मग लुक्रेटस्याचा विवाह एरागॉनच्या ऑल्फोन्सोशी करण्यात आला जो प्रतिस्पर्धी साम्राज्याचा सदस्य होता. दरम्यान, लुक्रेटस्याचा महत्त्वकांक्षी व निष्ठुर भाऊ, सेझारे बोर्जिया याने फ्रान्सचा लुई बारावा याच्याशी मैत्रीसंबंध जोडले; यामुळे, त्याच्या बहिणीचा अलीकडेच एका एरागॉनी व्यक्‍तीशी झालेल्या विवाहामुळे एक पंचाईत झाली. मग यावर उपाय? एका सूत्रानुसार, तिचा दुर्दैवी पती, ऑल्फोन्सो याला “सेंट पीटर [बॅसिलिकाच्या] पायऱ्‍यांवर खून करण्याच्या हेतूने आलेल्या चौघांनी जखमी केले. तो बरा होत असताना, सेझारेच्या एका सेवकाने त्याचा गळा आवळून त्याला ठार मारले.” लष्करीदृष्ट्या नवीन मैत्रीसंबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असलेल्या पोपने, फेराराच्या शक्‍तिशाली ड्यूकच्या मुलाशी लुक्रेटस्याचा तिसरा विवाह ठरवला; तोपर्यंत ती २१ वर्षांची झाली होती.

सेझारेच्या कारकीर्दीचे वर्णन, “दुष्टाईचा रक्‍तरंजित अहवाल” असे केले जाते. त्याच्या वडिलांनी सेझारेला १७ वर्षांचा असताना कार्डिनल नेमले होते; परंतु चर्चच्या मामल्यांपेक्षा तो युद्धाकरता अधिक योग्य ठरला असता कारण तो कावेबाज, महत्त्वाकांक्षी आणि इतर काहींप्रमाणे भ्रष्ट होता. चर्चमधील पद प्राप्त केल्यानंतर त्याने एका फ्रेंच राजकन्येशी विवाह केला व अशाप्रकारे तो व्हॅलेन्टीनोसचा ड्यूक बनला. त्यानंतर, फ्रेंच सैन्याच्या पाठिंब्याने त्याने उत्तर इटलीवर कब्जा करण्यासाठी वेढा घालण्याची व खून पाडण्याची जणू मोहीमच हाती घेतली.

सेझारेचे हेतू साध्य करण्यासाठी त्याला फ्रेंच लष्कराचा पाठिंबा मिळावा म्हणून पोपने फ्रान्सच्या लुई बारावा याला आपल्या सोयीनुसार परंतु निंदास्पद घटस्फोट घेण्यास सूट दिली; यामुळे तो ब्रिटनीच्या ॲनशी विवाह करू शकला व स्वतःच्या राज्यात तिच्या अधिकाराखालील प्रदेश जोडू शकला. एका संदर्भानुसार, पोपने “स्वतःच्या कौटुंबिक सदस्यांच्या ऐहिक फायद्यांकरता चर्चची प्रतिष्ठा व सिद्धान्तांचे दर्जे त्यागले.”

पोपच्या अतिरेकाची टीका

बोर्जिया घराण्याच्या अतिरेकामुळे त्यांचे अनेक शत्रू बनले व त्यांची टीका करण्यात आली. पोप सहसा टीका करणाऱ्‍यांकडे दुर्लक्ष करत असे परंतु टीका करणाऱ्‍या एका व्यक्‍तीकडे मात्र दुर्लक्ष करता आले नाही; ती व्यक्‍ती होती गिरोलामो सॅव्होनारोला. तो एक डॉमिनिकन धर्मगुरू, अतिशय आवेशी सुवार्तिक व फ्लोरेन्सचा राजकीय नेता होता. त्याने पोपच्या दरबारात चाललेल्या दुष्कृत्यांचे त्याचप्रमाणे पोपचे आणि पोपच्या राजनीतीचेही खंडन केले व त्याला काढून टाकले जावे आणि चर्चमध्ये सुधार व्हावा अशी मागणी तो करत असे. सॅव्होनारोला मोठ्याने ओरडून असे म्हणत असे: “चर्च नेतेहो, . . . रात्री तुम्ही आपल्या रखेलींकडे जाता आणि सकाळी पवित्र विधी करता.” त्याने नंतर म्हटले: “[ते धर्मगुरू] वेश्‍येसमान आहेत, त्यांची ख्याती चर्चला कलंकित करणारी आहे. मी सांगतो, हे लोक, ख्रिस्ती विश्‍वास पाळत नाहीत.”

सॅव्होनारोलाचे तोंड बंद करण्यासाठी पोपने त्याला कार्डिनलचे पद दिले परंतु ते त्याने नाकारले. पोपविरोधी राजनीतीमुळे किंवा सॅव्होनारोलाच्या प्रचारामुळे शेवटी त्याचा अंत झाला. त्याला बहिष्कृत करण्यात आले, अटक करण्यात आली, त्याचा छळ करून त्याच्याकडून कबूली घेण्यात आली आणि नंतर फाशी देऊन जाळण्यात आले.

गंभीर प्रश्‍न

इतिहासात घडलेल्या या घटनांमुळे काही महत्त्वाची प्रश्‍ने उपस्थित होतात. पोपच्या या कारस्थानांचे व वर्तनाचे कसे स्पष्टीकरण दिले जाऊ शकते? इतिहासकारांचे याविषयी काय मत आहे? याचे विविध प्रकारे स्पष्टीकरण दिले जाते.

अनेकांचा असा विश्‍वास आहे की, अलेक्झांडर सहावा याच्या कार्यांना ऐतिहासिक पार्श्‍वभूमीत पाहण्याची आवश्‍यकता आहे. त्याच्या राजनैतिक व धार्मिक कार्यहालचालींमागे, शांती राखणे, प्रतिस्पर्धी राज्यांमध्ये समतोल राखणे, मित्र राष्ट्रांनी पोपचे समर्थन करावे म्हणून त्यांच्याशी मैत्रीचे संबंध मजबूत करणे आणि तुर्कांकडील धोक्याविरुद्ध ख्रिस्ती धर्मजगताच्या राजांना एकत्रित ठेवणे ही इच्छा होती असे म्हटले जाते.

परंतु त्याच्या वर्तनाविषयी काय? एक विद्वान म्हणतात, “चर्चच्या प्रत्येक कालखंडात वाईट ख्रिस्ती आणि लायक नसलेले पादरी पाहण्यात आले आहेत. यांना पाहून कोणाला धक्का बसू नये म्हणून खुद्द ख्रिस्ताने याचे भाकीत केले; इतकेच नव्हे तर त्याने आपल्या चर्चची तुलना एका शेताशी केली ज्यात चांगले गहू आणि निदण दोन्ही वाढतात, किंवा एका जाळ्याशी केली ज्यात चांगले व वाईट दोन्ही प्रकारचे मासे असतात; तसेच त्याने आपल्या प्रेषितांमध्ये यहूदासारख्या व्यक्‍तीलाही सहन केले.” *

तेच विद्वान पुढे म्हणतात: “ज्याप्रमाणे एखाद्या सदोष कोंदणाने एखाद्या रत्नाचे मूल्य कमी होत नाही त्याचप्रमाणे एका धर्मगुरूच्या पापी वर्तनाने त्याच्या शिकवणीबद्दल . . . प्रतिकूल मत बनत नाही. . . . सोने स्वच्छ हातांनी दिले काय किंवा अशुद्ध हातांनी दिले काय, ते सोनेच राहते.” एक कॅथलिक इतिहासकार म्हणतात की, प्रामाणिक कॅथलिक धर्मपंथीयांनी अलेक्झांडर सहावा याच्या बाबतीत येशूने शास्त्री परुशांसंबंधी दिलेला सल्ला लागू करायला हवा होता: ‘त्यांचे सांगणे ऐका, पण कृतीप्रमाणे करू नका.’ (मत्तय २३:२, ३) पण ही कारणमीमांसा तुम्हाला खरोखर पटते का?

हा खरा ख्रिस्ती धर्म आहे का?

ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्‍यांची पारख करण्यासाठी येशूने एक साधेसोपे तत्त्व दिले: “त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल. काटेरी झाडांवरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडांवरून अंजीर काढतात काय? त्याप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते. चांगल्या झाडाला वाईट फळे येणे शक्य नाही आणि वाईट झाडाला चांगली फळे येणे शक्य नाही. ह्‍यास्तव तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल.”—मत्तय ७:१६-१८, २०.

येशूने प्रस्थापित केलेल्या खऱ्‍या ख्रिस्ती धर्माचे दर्जे व त्याच्या अनुयायांनी आपल्या उदाहरणांनी सिद्ध केलेले दर्जे शतकानुशतकांपासून धर्मगुरूंनी पाळले आहेत का व सध्या ते हे दर्जे पाळत आहेत का? आपण केवळ दोन क्षेत्रे पाहू या—राजनीतीमधील सहभाग आणि जीवनशैली.

येशू हा कोणी राजनैतिक राजा नव्हता. त्याचे राहणीमान इतके साधेसोपे होते की, त्याने कबूल केल्याप्रमाणे त्याला “डोके टेकावयास” ठिकाण नव्हते. त्याचे राज्य “ह्‍या जगाचे नव्हते,” आणि ज्याप्रमाणे ‘तो जगाचा नव्हता’ तसे त्याच्या शिष्यांनीही ‘जगाचे राहायचे नव्हते.’ अशाप्रकारे येशूने आपल्या काळातील राजनीतीत भाग घेण्यास नकार दिला.—मत्तय ८:२०; योहान ६:१५; १७:१६; १८:३६.

परंतु, कित्येक शतकांपासून सर्वसामान्य लोकांचे हाल होत असतानाही धार्मिक संघटनांनी सत्ता व भौतिक लाभ मिळवण्याकरता राजकीय नेत्यांशी जवळीक साधली नाही का? त्याचप्रमाणे, बहुतेक पादरी ऐषारामाचे जीवन जगतात परंतु ते ज्यांची सेवा करतात ते लोक गरिबीत दिवस कंठत आहेत हे देखील खरे नाही का?

येशूचा सावत्र भाऊ याकोब याने म्हटले: “अहो अविश्‍वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हांस ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे.” (याकोब ४:४) “देवाचा वैरी” का म्हणून? पहिले योहान ५:१९ म्हणते: “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.”

अलेक्झांडर सहावा याच्या नैतिकतेविषयी बोर्जियाच्या काळातील एका इतिहासकाराने लिहिले: “त्याची जीवनशैली सुखविलासी होती. त्याला लाज किंवा खरेपणा, विश्‍वास किंवा धर्म ठाऊक नव्हता. अनिवार लोभ, अति महत्त्वाकांक्षीपणा, अमानवी क्रूरता आणि आपल्या बहुत मुलांची प्रगती होण्याची तीव्र भावना यांनी तो झपाटला होता.” अर्थात, धर्मगुरूंमध्ये बोर्जिया एकटाच अशा वृत्तीचा नव्हता.

अशा वर्तनाविषयी शास्त्रवचने काय म्हणतात? प्रेषित पौलाने प्रश्‍न केला: “अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हाला ठाऊक नाही काय? फसू नका; जारकर्मी, . . . व्यभिचारी, . . . लोभी ह्‍यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.”—१ करिंथकर ६:९, १०.

रोममध्ये अलीकडे बोर्जिया घराण्यावर भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाचा एक हेतू, “या थोर व्यक्‍तींना त्यांच्या ऐतिहासिक पार्श्‍वभूमीत पाहणे . . . त्यांना समजून घेणे” हा होता; “परंतु त्यांना दोषमुक्‍त ठरवणे किंवा त्यांना दोषी ठरवणे असा [त्यामागील हेतू] मुळीच नव्हता” असे घोषित करण्यात आले. उलट, हे प्रदर्शन पाहायला आलेल्यांना कोणते निष्कर्ष काढायचे ते त्यांच्यावर सोडण्यात आले होते. तुम्ही काय निष्कर्ष काढला आहे?

[तळटीप]

^ परि. 20 या दृष्टान्तांचे अचूक स्पष्टीकरण प्राप्त करण्यासाठी पाहा टेहळणी बुरूज, फेब्रुवारी १, १९९५, पृष्ठे ५-६, व सप्टेंबर १, १९९२, पृष्ठे १९-२४.

[२६ पानांवरील चित्र]

रॉड्रिगो बोर्जिया, पोप अलेक्झांडर सहावा

[२७ पानांवरील चित्र]

लुक्रेटस्या बोर्जियाच्या वडिलांनी आपली सत्ता वाढवण्यासाठी तिचा उपयोग केला

[२८ पानांवरील चित्र]

सेझारे बोर्जिया महत्त्वाकांक्षी आणि नीतिभ्रष्ट होता

[२९ पानांवरील चित्र]

जिरोलामो सॅव्होनारोलाचे तोंड बंद करणे शक्य नव्हते म्हणून त्याला फाशी देऊन जाळण्यात आले