केवळ एक प्रथा की लाच?
केवळ एक प्रथा की लाच?
पोलंडमधील काही कॉलेजांत, परीक्षेत आपल्याला चांगले मार्क मिळावेत या आशेने, विद्यार्थ्यांमध्ये पैसे गोळा करून आपल्या शिक्षकांसाठी बक्षीस खरेदी करण्याची प्रथा आहे. म्हणून, कॅटरझिना नामक एका ख्रिस्ती तरुणीसमोर “मी पैसे देऊ की नको?” असा मोठा प्रश्न उभा राहिला. तिच्या मित्रमैत्रिणींचा असा तर्क आहे: “ही सर्वसामान्य प्रथा आहे. पैसे दिल्याने तुझं काही बिघडणार नाही. उलट, तुलाच खूप फायदा होणार आहे, मग त्यात इतका विचार कशाला करायचा?”
कॅटरझिना कबूल करते: “पहिल्या वर्षी मीही पैसे गोळा करण्यात भाग घेतला. पण नंतर मला जाणीव झाली, की याद्वारे मी लाच देण्याच्या प्रथेचे समर्थन केले होते; आणि लाच देण्याचा बायबल निषेध करते.” लाच देण्या-घेण्याचा यहोवा किती कडाडून विरोध करतो हे दर्शवणारी शास्त्रवचने तिला आठवली. (अनुवाद १०:१७; १६:१९; २ इतिहास १९:७) कॅटरझिना म्हणते: “मित्रमैत्रिणींच्या दबावाला बळी पडणे किती सोपं असतं हे मला समजलं. मी या गोष्टीचा पुन्हा एकदा विचार केला आणि तेव्हापासून या प्रथेत कधीच भाग घेतला नाही.” गेल्या तीन वर्षांपासून, इतर विद्यार्थ्यांनी तिची थट्टा केली तरीसुद्धा ती काहींना समजावून सांगू शकली, की ती “बक्षीस” देण्यासाठी पैसे गोळा करण्याच्या या प्रथेत आपल्या बायबल आधारित मतांमुळे भाग घेऊ शकत नाही.
काहींनी कॅटरझिनाला स्वार्थी, तुसडी म्हटले. ती म्हणते: “अजूनही काही विद्यार्थी माझ्याबरोबर व्यवस्थित बोलत नाहीत. पण इतर अनेक विद्यार्थी माझ्या दृष्टिकोनामुळे माझा आदर करतात याचा मला आनंद वाटतो.” कॅटरझिनाला सर्वजण, दररोजच्या जीवनात बायबल तत्त्वांचे पालन करणारी यहोवाची साक्षीदार म्हणून ओळखतात.