कोरियात एका खास भाषेच्या समूहाची सेवा
कोरियात एका खास भाषेच्या समूहाची सेवा
एकोणीसशे सत्त्याण्णव सालच्या उन्हाळ्यात अत्यंत उत्साही परंतु काहीसा शांत समूह यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रांतीय अधिवेशनाकरता एकत्रित झाला होता. कर्णबधिरांकरता हे कोरियातले पहिलेवहिले अधिवेशन होते. अधिवेशनातील उपस्थिती १,१७४ पर्यंत गेली. भाषणे, मुलाखती आणि एका नाटकाचा समावेश असलेला सबंध कार्यक्रम कोरियन संकेत भाषेत सादर करण्यात आला आणि संमेलन गृहातल्या कोणत्याही कोपऱ्यातून दिसू शकेल अशा एका मोठ्या पडद्यावर तो प्रक्षेपित करण्यात आला. कित्येक स्वयंसेवकांच्या अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांचे शेवटी सार्थक झाले होते!
पृथ्वीवरील परादीसात “बहिऱ्यांचे कान खुले होतील,” असा एक समय येईल. (यशया ३५:५) पण त्या परादीसात जीवन अनुभवण्याकरता सर्वांनी, अर्थात बहिऱ्यांनीसुद्धा आधी आत्मिक परादीसात म्हणजेच देवाच्या आशीर्वादित लोकांच्या समृद्ध आध्यात्मिक स्थितीत प्रवेश केला पाहिजे. त्यांनी यहोवाला आपले जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतला पाहिजे आणि त्याच्याकडून मिळणारे शिक्षण आत्मसात केले पाहिजे.—मीखा ४:१-४.
थेंबे थेंबे. . .
एकोणीसशे साठच्या दशकात कर्णबधिरांना थोड्याफार प्रमाणात प्रचार करण्यात आला होता. पण १९७० च्या दशकानंतरच त्यांच्यापैकी काहींनी कोरियाची राजधानी सेउल येथे यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना उपस्थित राहण्यास सुरवात केली. अतिशय जलद गतीने लिहिता येत असलेले एक ख्रिस्ती बंधू भाषणांतील मुख्य मुद्दे व शास्त्रवचने, त्यांच्यासाठी फळ्यावर लिहीत.
तेजोन शहरात, १९७१ साली एका साक्षीदाराने आपल्या कर्णबधिर मुलाला व त्याच्या कर्णबधिर मित्रमैत्रिणींना राज्याच्या संदेशाविषयी शिकवण्यास सुरवात केली. या समूहातून अनेक आवेशी तरुण पुढे आले व आज ते संकेत भाषेच्या क्षेत्रात आधारस्तंभ बनून सेवा करत आहेत.—जखऱ्या ४:१०.
संतोषाने पुढे होणारे तरुण
कर्णबधिर जनांना यहोवा व येशू ख्रिस्त यांच्याविषयी ज्ञान घेऊन जीवनाच्या मार्गावर चालता यावे म्हणून अधिक स्वयंसेवकांनी बराच परिश्रम करण्याची आवश्यकता होती. योहान १७:३) हे साध्य करण्याकरता बऱ्याच यहोवाच्या साक्षीदारांनी संकेत भाषा शिकून घेतली आहे आणि त्यांना अनेक समाधानकारक अनुभव आले आहेत.
(पंधरा वर्षांच्या पार्क इन्सन नावाच्या एका मुलाने संकेत भाषा शिकायचे ठरवले. यासाठी त्याने एका नक्षीकामाच्या कारखान्यात काम सुरू केले. या कारखान्यात २० कर्णबधिर माणसे काम करत होती. बहिऱ्यांची भाषा आणि त्यांची विचार करण्याची पद्धत आत्मसात करण्यासाठी आठ महिने पार्कने त्यांच्यासोबत काम केले. पुढच्या वर्षी तो एक सामान्य पायनियर, अर्थात एक पूर्ण वेळेचा राज्य प्रचारक बनला व बायबलच्या सत्याविषयी आस्था असलेल्या कर्णबधिर व्यक्तींच्या एका समूहासोबत कार्य करू लागला. या समूहाने भराभर प्रगती केली आणि लवकरच ३५ व्यक्तींनी रविवारच्या सभांना उपस्थित राहण्यास सुरवात केली.—स्तोत्र ११०:३.
यानंतर सेउल शहरात पहिल्यांदा पूर्णपणे संकेत भाषेत सादर केल्या जाणाऱ्या ख्रिस्ती सभांचे आयोजन करण्यात आले. बंधू पार्क इन्सन या वाढत्या गटासोबत खास पायनियर म्हणून कार्य करू लागले. आता त्यांनी संकेत भाषेवर बऱ्यापैकी प्रभुत्व मिळवले होते. काही महिन्यांदरम्यान ते बहिऱ्या व्यक्तींसोबत २८ गृह बायबल अभ्यास चालवायचे. यांपैकी बऱ्याच जणांनी प्रगती केली व ते यहोवाचे साक्षीदार बनले.
स्वयंसेवकांच्या सक्रिय प्रयत्नांमुळे १९७६ साली ऑक्टोबर महिन्यात पहिली संकेत भाषा मंडळी सेउल शहरात स्थापन करण्यात आली; या मंडळीत ४० प्रचारक व २ सामान्य पायनियर होते. यामुळे कोरियाच्या इतर शहरांतही या कार्याला जोर आला. अनेक कर्णबधिर सुवार्ता ऐकण्यास आतुर होते आणि कोणीतरी त्यांना भेट द्यावी म्हणून ते जणू थांबूनच होते.
कर्णबधिरांसोबत कार्य
पण या कर्णबधिर लोकांशी संपर्क कसा साधण्यात आला असा कदाचित तुम्ही विचार करत असाल. ओळखीच्या लोकांनी दिलेल्या पत्त्यांच्या साहाय्याने बऱ्याच जणांशी संपर्क साधला गेला. तसेच स्थानिक तांदुळ विक्रेत्यांशी संपर्क साधण्यात आला आणि त्यांनीही बहिऱ्या लोकांची नावे व पत्ते पुरवले. काही सरकारी कार्यालयांनीही ही माहिती मिळवण्यात सहकार्य केले. बहिरे लोक जेथे राहात होते त्या क्षेत्रात अगदी पूर्णपणे कार्य करण्याचा प्रयत्न इतका यशस्वी ठरला की चार संकेत भाषा मंडळ्यांची स्थापना करण्यात आली. बऱ्याच ख्रिस्ती तरुणांना संकेत भाषा शिकण्याचे प्रोत्साहन देण्यात आले.
ज्यांनी संकेत भाषा शिकून घेतली होती अशा खास पायनियर सेवकांना यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तराने या मंडळ्यांसोबत कार्य करण्याकरता नेमले. अलीकडेच या मंडळ्यांमध्ये नेमण्यात आलेल्या सेवा प्रशिक्षण प्रशालेच्या पदवीधरांनी देखील बरेच आध्यात्मिक प्रोत्साहन पुरवले आहे.
अर्थात, या कार्यात बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते. या क्षेत्रात कार्य करायचे म्हणजे कर्णबधिर लोकांची विचारसरणी समजून घेण्याचा खास प्रयत्न करणे आवश्यक आहे. या लोकांचे विचार व कृती अत्यंत सडेतोड असतात. यामुळे काही अनपेक्षित गोष्टी घडतात आणि त्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. शिवाय कर्णबधिर लोकांसोबत साक्षीदार गृह बायबल अभ्यास चालवतात तेव्हा त्यांना त्यांच्या स्वतःच्या भाषेवर प्रभुत्व मिळवण्यास मदत करावी लागते आणि वैयक्तिक वाचन व अभ्यास वाढवण्याचे त्यांना प्रोत्साहन द्यावे लागते.
दररोजच्या कार्यांत बहिऱ्या लोकांना अशा कित्येक कठीण परिस्थितींना तोंड द्यावे लागते ज्याविषयी इतरांना कल्पनाही नसेल. सरकारी कार्यालयांत, इस्पितळांत तसेच साधे व्यवहार पार पाडणेही त्यांच्यासाठी अत्यंत कठीण होऊन बसते. जवळपासच्या मंडळ्यांतल्या साक्षीदारांनी योहान १३:३४, ३५.
प्रेमळपणे मदत पुरवल्यामुळे बहिऱ्या लोकांना खऱ्या बंधुत्वाचा आस्वाद घेता आला आहे.—अनौपचारिक साक्षकार्याचे परिणाम
कोरियाच्या दक्षिणेतील एक मुख्य बंदर शहर पुसान येथे एका साक्षीदाराला दोन बहिरे पुरुष भेटले ज्यांनी एका चिटोऱ्यावर असे लिहिले: “आम्हाला परादीस आवडते. सार्वकालिक जीवनाविषयी सांगणाऱ्या वचनांबद्दल आम्हाला जाणून घ्यायचे आहे.” बांधवांनी त्यांचा पत्ता लिहून घेतला आणि त्यांची भेट घेण्याची व्यवस्था केली. बंधू त्यांना भेटायला गेले तेव्हा त्यांना एका खोलीत अनेक बहिरे लोक आढळले जे राज्य संदेश ऐकण्याकरता थांबून होते. या अनुभवाने त्या बांधवाला संकेत भाषा शिकण्याची प्रेरणा दिली. लवकरच पुसान शहरात संकेत भाषेची मंडळी स्थापन करण्यात आली.
त्या मंडळीतल्या एका बांधवाला एकदा दोन बहिरे एकमेकांशी संकेत भाषेत बोलताना दिसले. ते त्यांच्याजवळ गेले आणि ते आताच एका धार्मिक सभेला जाऊन आल्याचे कळले तेव्हा बांधवाने त्यांना त्याच दिवशी दुपारी २ वाजता राज्य सभागृहात येण्याचे आमंत्रण दिले. ते दोघे सभेला आले आणि त्यांच्यासोबत बायबल अभ्यास सुरू करण्यात आला. यानंतर काही काळाने ते दोघे आपल्या २० कर्णबधिर मित्रांसोबत एका प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहिले. त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी यहोवाला आपले जीवन समर्पित केले आहे. दोन जण आज संकेत भाषिक मंडळीचे वडील आहेत आणि एक सेवा सेवक आहे.
दृढ निर्धाराचे गोड प्रतिफळ
काही बहिरे लोक संकेत भाषिक मंडळ्यांपासून बरेच दूर राहात असल्यामुळे त्यांना बायबलमधून नियमित आध्यात्मिक अन्न पुरवण्याकरता दृढ निर्धाराने बरीच मेहनत घ्यावी लागते. उदाहरणार्थ, एका बेटावर राहणाऱ्या ३१ वर्षीय माणसाचा मच्छीमारीचा धंदा होता. त्याच्या धाकट्या भावाशी यहोवाच्या साक्षीदारांनी संपर्क साधला होता आणि त्याच्या या भावाकडून त्याला बायबलचा संदेश ऐकण्याची संधी मिळाली. आपली आध्यात्मिक भूक तृप्त करण्याकरता हा कर्णबधिर कोळी बोटीने १६ किलोमीटरचा प्रवास करून कोरियाच्या दक्षिण तटावरील टांगयंग शहरी जायचा. मासान सिटीच्या संकेत भाषा मंडळीच्या एका खास पायनियरला भेटण्याकरता तो हा प्रवास करीत असे. दर सोमवारी हा खास पायनियर केवळ या कर्णबधिर कोळ्याचा बायबल अभ्यास घेण्याकरता ६५ किलोमीटरचा प्रवास करत असे.
मासान सिटी येथे होणाऱ्या रविवारच्या सभेला उपस्थित राहण्याकरता या कर्णबधिर बायबल विद्यार्थ्याला बोटीने १६ किलोमीटर प्रवास करून मग आणखी ६५ किलोमीटर बसने जावे लागत. त्याच्या निर्धारी वृत्तीचे गोड प्रतिफळ त्याला मिळाले. काही महिन्यांत त्याने संकेत भाषेत चांगलीच प्रगती केली होती, बरीच कोरियन अक्षरे शिकून घेतली होती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यहोवासोबत नाते जोडण्याचा एकमेव मार्ग त्याने आत्मसात केला होता. सभा व नियमित साक्षकार्याचे महत्त्व ओळखून, तो संकेत भाषिक मंडळीच्या क्षेत्रात राहायला गेला. हे सोपे होते का? नाही. दर महिन्याला ३,८०० डॉलर मिळवून देणारा आपला मच्छीमारीचा धंदा त्याला बंद करावा लागला, पण त्याचा दृढ निर्धार व्यर्थ ठरला नाही. सत्यात प्रगती केल्यानंतर त्याचा बाप्तिस्मा झाला आणि आज तो आपल्या कुटुंबासोबत आनंदाने यहोवाची सेवा करत आहे.
कर्णबधिरांकरता भाषांतर
राज्याची सुवार्ता सहसा तोंडी सांगितली जाते. पण अधिक अचूकपणे हा संदेश देवाच्या वचनातून सांगण्याकरता बायबलच्या शिकवणुकी अधिक कायमस्वरूपी माध्यमात सादर करणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच पहिल्या शतकात वडिलधारी पुरुषांनी पुस्तके व पत्रे लिहिली. (प्रेषितांची कृत्ये १५:२२-३१; इफिसकर ३:४; कलस्सैकर १:२; ४:१६) आपल्या काळात आध्यात्मिक अन्न पुस्तकांच्या व इतर ख्रिस्ती प्रकाशनांच्या माध्यमाने मुबलक प्रमाणात पुरवण्यात आले आहे. या प्रकाशनांचा शेकडो भाषांतून अनुवाद करण्यात आला आहे व यांत कित्येक संकेत भाषांचाही समावेश आहे. कोरियन संकेत भाषेत अनुवाद करण्याकरता येथील शाखा दफ्तरात एक संकेत भाषा अनुवाद विभाग कार्यरत आहे. एक व्हिडिओ विभाग देखील आहे जेथे संकेत भाषेचे व्हिडिओ तयार केले जातात. या तरतुदींमुळे सबंध कोरियाच्या मंडळ्यांतील कर्णबधिर सुवार्ता उद्घोषकांना व आस्थेवाईक लोकांना आध्यात्मिक पोषण प्राप्त होते.
अनेकजण संकेत भाषेत निपुण झाले आहेत आणि अनेकांनी व्हिडिओ तयार करण्यासही हातभार लावला आहे पण या भाषेतील सर्वात उत्तम अनुवादक कर्णबधिर आईवडिलांची मुले असतात. यांनी बालपणापासूनच संकेत भाषा आत्मसात केली आहे. ते केवळ अचूक संकेतच करत नाहीत, तर आपल्या हातांच्या व चेहऱ्यावरील हावभावांवरून ते संदेशात जणू जीव ओततात आणि अशाप्रकारे व्यक्तीच्या अंतःकरणापर्यंत हा संदेश पोहंचवतात.
याआधी सांगितल्याप्रमाणे संकेत भाषेतील अधिवेशने व संमेलने आता कोरियात नियमितपणे आयोजित केली जातात. याकरता बरीच मेहनत घ्यावी लागते व खर्चही भरपूर करावा लागतो. पण या सभांना उपस्थित राहणारे या तरतुदींबद्दल कृतज्ञ आहेत. संमेलने समाप्त झाल्यानंतरही अनेकजण आणखी थोडा वेळ बांधवांचा सहवास मिळावा आणि मिळालेल्या उत्तम आध्यात्मिक अन्नाविषयी आणखी थोडा वेळ चर्चा करता यावी म्हणून बराच वेळ त्या ठिकाणी घुटमळतात. निश्चितच या खास प्रकारच्या गटासोबत सेवा करणे आव्हानात्मक आहे, पण ऐवजात मिळणारे आध्यात्मिक आशीर्वाद कित्येक पटीने जास्त मोलवान आहेत.
[१० पानांवरील चित्र]
कोरियात तयार करण्यात आलेले संकेत भाषेतील व्हिडिओ: “देव आपल्याकडून काय अपेक्षितो?,” “आपल्या आध्यात्मिक वारशाची कदर करणे,” “आपल्या काळाकरता इशारेवजा उदाहरणे,”
आणि “देवाच्या अधिकाराला मान देणे”
[१० पानांवरील चित्र]
खालून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने: कोरिया शाखा दफ्तरात संकेत भाषेचा एक व्हिडिओ तयार करताना; ईश्वरशासित संज्ञांकरता संकेत निश्चित करताना; संकेत भाषेचा भाषांतर गट; व्हिडिओ तयार करत असताना संकेत करणाऱ्याला प्रॉम्प्ट करताना