व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तर्कशुद्ध विचार करा सुज्ञतेने वागा

तर्कशुद्ध विचार करा सुज्ञतेने वागा

तर्कशुद्ध विचार करा सुज्ञतेने वागा

पुढील दृश्‍य डोळ्यासमोर आणा: जेरूसलेममधील धार्मिक शत्रू आपला छळ करून शेवटी आपल्याला ठार मारतील याविषयी येशू सांगत आहे. त्याचा जवळचा मित्र प्रेषित पेत्र याला यावर विश्‍वास बसत नाही. तो येशूला बाजूला नेतो आणि त्याला अक्षरशः खडसावतो. पेत्राने असे प्रामाणिक व खरी चिंता असल्यामुळे केले यात काही शंका नाही. पण पेत्राच्या विचारपद्धतीबद्दल येशूला काय वाटते? येशू त्याला म्हणतो, “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा. तू मला अडखळण आहेस; कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टींकडे आहे.”—मत्तय १६:२१-२३.

हे ऐकून पेत्राला केवढा धक्का बसला असेल! आपल्या प्रिय धन्याला मदत देण्याऐवजी व त्याच्या पाठीशी असण्याऐवजी तो त्याच्याकरता “अडखळण” बनतो. हे कसे घडले? पेत्र कदाचित मानवी विचारपद्धतीच्या एका सामान्य त्रुटीला बळी पडला असावा—त्याला जसे हवे होते तसाच विश्‍वास करणे.

फाजील आत्मविश्‍वास बाळगू नका

फाजील आत्मविश्‍वासी प्रवृत्ती ही तर्कशुद्ध विचार करण्याच्या क्षमतेला एक धोका असू शकते. प्रेषित पौलाने प्राचीन करिंथमधील सह ख्रिश्‍चनांना अशी ताकीद दिली: “आपण उभे आहो असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून संभाळावे.” (१ करिंथकर १०:१२) पौलाने असे का म्हटले असावे? मानवांची विचारपद्धती किती लवकर बदलू शकते—अगदी ख्रिश्‍चनांची मने देखील ‘बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता ह्‍यांपासून भ्रष्ट होऊ’ शकतात याची कदाचित त्याला जाणीव असावी.—२ करिंथकर ११:३.

पौलाच्या पूर्वजांची संपूर्ण पिढी अशारितीने भ्रष्ट झाली होती. त्या वेळी यहोवाने त्यांना म्हटले: “माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत; माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत.” (यशया ५५:८) ते “आपल्या दृष्टीने ज्ञानी” झाले होते व याचा परिणाम वाईट झाला. (यशया ५:२१) म्हणून, आपण स्वतः तर्कशुद्ध विचारपद्धत राखून असे संकट कसे टाळू शकतो याचे परीक्षण करणे शहाणपणाचे ठरेल.

दैहिक विचारसरणीपासून सावधान

करिंथमधील काहींची अत्यंत दैहिक विचारसरणी होती. (१ करिंथकर ३:१-३) देवाच्या वचनापेक्षा त्यांनी मानवी तत्त्वज्ञानाला अधिक महत्त्व दिले. यात शंका नाही की, त्या काळातील ग्रीक विचारवंत लोक अत्यंत बुद्धिमान होते. देवाच्या नजेरत मात्र ते मूर्ख होते. पौलाने म्हटले: “‘मी ज्ञान्यांचे ज्ञान नष्ट करीन, व बुद्धीमतांची बुध्दि व्यर्थ करीन,’ असा शास्त्रलेख आहे. ज्ञानी कोठे राहिले? शास्त्री कोठे राहिले? ह्‍या युगाचे वाद घालणारे कोठे राहिले? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरविले की नाही?” (१ करिंथकर १:१९, २०) या विचारवंतांना ‘जगाच्या आत्म्याची’ प्रेरणा मिळत होती, देवाच्या आत्म्याची नव्हे. (१ करिंथकर २:१२) त्यांचे तत्त्वज्ञान व त्यांच्या कल्पना यहोवाच्या विचारसरणीच्या एकवाक्यतेत नव्हत्या.

अशा दैहिक विचारपद्धतीचा मूळ उगम दियाबल सैतान आहे ज्याने हव्वेला फसवण्याकरता सर्पाचा उपयोग केला. (उत्पत्ति ३:१-६; २ करिंथकर ११:३) त्याचा अजूनही आपल्याला धोका आहे का? होय! देवाच्या वचनानुसार, सैतानाने इतपत ‘लोकांची मने आंधळी’ केली आहेत की आता तो ‘सर्व जगाला ठकवत’ आहे. (२ करिंथकर ४:४; प्रकटीकरण १२:९) त्याच्या डावपेचांविषयी सावध असणे किती महत्त्वाचे आहे!—२ करिंथकर २:११.

‘माणसांच्या धूर्तपणाबद्दल’ जागृत असा

प्रेषित पौलाने ‘माणसांच्या धूर्तपणाविषयी’ देखील सावध केले. (इफिसकर ४:१४) त्याला “कपटी कामदार” भेटले जे सत्य सादर करण्याचा आव आणायचे परंतु खरे पाहता सत्याचा विपर्यास करत होते. (२ करिंथकर ११:१२-१५) आपला हेतू साध्य करण्यासाठी हे लोक, निवडक पुरावे, भावनांना चेतवणारी भाषा, मार्गभ्रष्ट करणारी अर्ध सत्ये, कपटाचे सूचक उल्लेख आणि धडधडीत लबाडी हिचाही उपयोग करू शकतात.

काही मतप्रचारक इतरांचे नाव खराब करण्यासाठी सहसा “पंथ” यासारखे शब्द वापरतात. युरोपच्या मंत्रिमंडळाच्या विधानसभेत सादर केलेल्या शिफारस पत्रात, नवीन धार्मिक गटांची तपासणी करणाऱ्‍या अधिकाऱ्‍यांनी “हा शब्द न वापरलेला बरा,” असे सुचवण्यात आले. का? काहींच्या मते, पंथ या शब्दाचा अत्यंत नकारात्मक अर्थ निघतो. अशाचतऱ्‍हेने, ग्रीक विचारवंतांनीही प्रेषित पौलावर तो “बडबड्या” किंवा शब्दशः “बिया वेचणारा” असल्याचा खोटा आरोप लावला. यावरून ते असे सुचवत होते की, तो रिकामटेकड्या माणसाप्रमाणे वटवटा होता, इकडूनतिकडून वेचलेले ज्ञान जणू बरळत होता. पण खरे पाहता, पौल, ‘येशू व पुनरुत्थान ह्‍यांविषयींच्या सुवार्तेची घोषणा करीत’ होता.—प्रेषितांची कृत्ये १७:१८.

मतप्रचारकांच्या युक्‍त्‌या यशस्वी ठरतात का? होय. इतर राष्ट्रांविषयी व धर्मांविषयी लोकांचा गैरसमज करून जातीय व धार्मिक द्वेष निर्माण करण्याचे ते मुख्य कारण ठरले आहेत. अनेकांनी, नावडत्या अल्पसंख्यांकांना कमी लेखण्यासाठी त्यांचा उपयोग केला आहे. अडॉल्फ हिटलरने यहुदी व इतर लोक “अधम,” “दुष्ट” आणि राष्ट्राला “धोका” आहेत असे दाखवून अशा पद्धतींचा परिणामकारकतेने उपयोग केला. अशा धूर्तपणाने आपली विचारशक्‍ती कधीही दूषित होऊ देऊ नका.—प्रेषितांची कृत्ये २८:१९-२२.

स्वतःची फसवणूक करू नका

स्वतःची फसवणूक करणेही फार सोपे आहे. उलट, आपली मते त्यागणे किंवा त्यांबद्दल शंका करणे कठीण असू शकते. का? कारण आपल्या दृष्टिकोनांशी आपण भावनिकरित्या जोडले जातो. मग चुकीचा तर्क करून अर्थात खोटे विचार व गैरसमज खरे आहेत हे दाखवण्यासाठी सबबी शोधून आपण स्वतःची फसवणूक करू शकतो.

पहिल्या शतकातील काही ख्रिश्‍चनांच्या बाबतीत असेच घडले. देवाचे वचन त्यांना माहीत होते, पण त्याचा प्रभाव त्यांनी स्वतःच्या विचारसरणीवर होऊ दिला नाही. शेवटी, त्यांनी खोट्या युक्‍तिवादामुळे “स्वतःची फसवणूक” करून घेतली. (याकोब १:२२, २६) स्व-फसवणुकीच्या या प्रकाराला आपण बळी पडलो आहोत याचे एक चिन्ह म्हणजे आपल्या विश्‍वासांबद्दल शंका निर्माण केली जाते तेव्हा राग येणे. रागवण्याऐवजी खुल्या मनाने विचार करणे आणि इतरांचे म्हणणे ऐकून घेणे शहाणपणाचे ठरेल—आपले मत खरे आहे अशी आपल्याला अगदी खात्री वाटत असते तेव्हासुद्धा.—नीतिसूत्रे १८:१७.

“देवाविषयीचे ज्ञान” खोदून काढा

आपली विचारपद्धती तर्कशुद्ध असण्यासाठी आपण काय करू शकतो? यासंबंधी बरीच मदत उपलब्ध आहे पण त्याकरता कार्य करण्यास आपण इच्छुक असले पाहिजे. सुज्ञ राजा शलमोनाने म्हटले: “माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारिशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेविशील, आपला कान ज्ञानाकडे देशील, आणि आपले मन सुज्ञानाकडे लावशील, जर तू विवेकाला हाक मारिशील, सुज्ञतेची आराधना करिशील, जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध करिशील, व गुप्त निधीप्रमाणे त्याला उमगून काढिशील, तर परमेश्‍वराच्या भयाची तुला जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल.” (नीतिसूत्रे २:१-५) होय, देवाच्या वचनातील सत्ये आपल्या मनात व हृदयात साठवण्याचा आपण व्यक्‍तिगतरित्या प्रयत्न केला तर आपल्याला खरी बुद्धी, सूक्ष्मदृष्टी आणि समज प्राप्त होईल. अशारितीने, आपण चांदीपेक्षा किंवा इतर कोणत्याही भौतिक धनापेक्षा मूल्यवान गोष्टी खोदत असू.—नीतिसूत्रे ३:१३-१५.

तर्कशुद्ध विचारपद्धतीकरता बुद्धी आणि ज्ञान हे घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. देवाचे वचन म्हणते, “ज्ञान तुझ्या चित्तात प्रवेश करील, आणि विद्या तुझ्या जिवाला रम्य वाटेल; विवेक तुझे रक्षण करील, समंजसपणा तुला संभाळील; म्हणजे कुमार्गापासून, विवेकशून्य गोष्टी करणाऱ्‍या मनुष्यांपासून, तो तुला दूर ठेवील; ते सरळपणाचे मार्ग सोडून अंधकाराच्या मार्गांनी चालतात.”—नीतिसूत्रे २:१०-१३.

विशेषतः तणावाच्या किंवा धोक्याच्या काळात आपण देवाच्या विचारांनुसार आपली विचारपद्धत असू देणे महत्त्वाचे आहे. राग किंवा भय यांसारख्या तीव्र भावनांमुळे कदाचित आपण तर्कशुद्ध विचार करणार नाही. शलमोन म्हणतो, “जुलूम केल्याने शहाणा वेडा बनतो.” (उपदेशक ७:७) इतकेच काय तर, “परमेश्‍वरावर रुष्ट” होण्याची देखील शक्यता असते. (नीतिसूत्रे १९:३) ते कसे? आपल्या समस्यांसाठी देवाला दोषी ठरवण्याद्वारे आणि त्या समस्यांची सबब देऊन देवाच्या नियमांचे व तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्‍या गोष्टी करण्याद्वारे. आपल्यालाच सर्वकाही माहीत आहे असा विचार करण्याऐवजी शास्त्रवचनांचा उपयोग करून आपल्याला मदत देण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या सुज्ञ सल्लागारांचे आपण नम्रतेने ऐकून घेऊ या. आणि आवश्‍यक असल्यास, आपल्याला ठामपणे वाटणारे काही विचार चुकीचे आहेत असे कळल्यावर ते सोडून देण्यास आपण तयार असू या.—नीतिसूत्रे १:१-५; १५:२२.

‘देवाजवळ मागत राहा’

आपण गोंधळविणाऱ्‍या आणि संकटमय काळात राहतो. योग्य निर्णयशक्‍ती हवी असेल आणि सुज्ञतेने कार्य करायचे असेल तर यहोवाच्या मार्गदर्शनासाठी नियमित प्रार्थना करणे आवश्‍यक आहे. पौल लिहितो, “कशाविषयीहि चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” (फिलिप्पैकर ४:६, ७) गोंधळविणाऱ्‍या समस्या हाताळण्यासाठी किंवा संकटप्रसंगी योग्य कार्य करण्यासाठी आपण बुद्धीने उणे पडत असू तर आपण ‘देवाला मागत राहू या कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो.’—याकोब १:५-८.

सह-ख्रिश्‍चनांनी सुज्ञतेने वागण्याची गरज आहे याची जाणीव राखून प्रेषित पेत्राने ‘त्यांचे निर्मळ मन जागृत करण्याचा’ प्रयत्न केला. त्यांनी “पवित्र संदेष्ट्यांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आणि प्रभू तारणारा ह्‍याने . . . दिलेल्या आज्ञेची आठवण” ठेवावी असे त्याला वाटत होते. (२ पेत्र ३:१, २) आपण असे केले आणि यहोवाच्या वचनानुसार आपली विचारसरणी ठेवली तर आपले विचार तर्कशुद्ध असतील आणि आपले वागणे सुज्ञतेचे असेल.

[२१ पानांवरील चित्रे]

प्रारंभिक ख्रिश्‍चनांनी आपल्या विचारशक्‍तीवर तत्त्वज्ञानी कारणमीमांसेचा नव्हे तर ईश्‍वरी बुद्धीचा प्रभाव होऊ दिला

[चित्राचे श्रेय]

तत्त्वज्ञानी डावीकडून उजवीकडे: एपीक्यूरीस: Photograph taken by courtesy of the British Museum; सिसेरो: Reproduced from The Lives of the Twelve Caesars; प्लेटो: Roma, Musei Capitolini

[२३ पानांवरील चित्रे]

प्रार्थना आणि देवाच्या वचनाचा अभ्यास आवश्‍यक