गरीब आणखी गरीब होतात
गरीब आणखी गरीब होतात
“ज्या समाजातले बहुतांश लोक गरीब आणि हलाखीत दिवस काढत आहेत तो समाज आनंदी व सुखसंपन्न असू शकत नाही.”
अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ यांनी १८ व्या शतकात हे विधान केले होते. त्यांच्या शब्दांची सत्यता आज विशेषकरून दिसत आहे अशी अनेकांना खात्री वाटते. श्रीमंत आणि गरीब यांच्यातला फरक अधिक स्पष्ट झाला आहे. फिलिपाईन्समध्ये, लोकसंख्येतील एक तृतीयांश लोक दर दिवशी १ डॉलरपेक्षा (यु.एस.) कमी पैशांत गुजराण करतात; श्रीमंत राष्ट्रांमध्ये १ डॉलर केवळ काही मिनिटांमध्ये कमवला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ह्यूमन डेव्हेलपमेंट रिपोर्ट २००० यात म्हटले आहे, “जगातील अति श्रीमंत असलेल्या ५% लोकांची मिळकत सर्वात गरीब असलेल्या ५% लोकांच्या मिळकतीपेक्षा ११४ पटीने अधिक आहे.”
काहीजण तुलनात्मकरित्या आरामदायी जीवन जगतात तर लाखो लोक जागा दिसेल तेथे बेकायदेशीरपणे झोपड्या बांधून राहतात. इतरांना तर तेही जमत नाही; ते सरळ रस्त्यावर राहतात. त्यांच्याजवळ जमिनीवर अंथरायला केवळ एखाद्या पुठ्याचा किंवा प्लास्टिकचा तुकडा असतो. पुष्कळजण, कचरा कुंड्यांमध्ये धुंडाळून, वजनदार ओझी उचलून किंवा हातगाड्यांवर भंगार गोळा करून कशीबशी जगतात.
श्रीमंत व गरीब यांच्यातील असमानता केवळ विकसनशील देशांतच आढळत नाही, तर वर्ल्ड बँकेनुसार, “सर्व देशांमध्ये ‘गरिबांच्या वसत्या’ पाहायला मिळतात.” बांगलादेशापासून अमेरिकेपर्यंत, काहीजण कितीही श्रीमंत असले तरी तेथे असे लोक असतात ज्यांना पोटापाण्याची किंवा राहण्याची सोय करायला संघर्ष करावा लागतो. द न्यू यॉर्क टाईम्स यात २००१ यु.एस. जनगणना कार्यालयाचा अहवाल देण्यात आला होता; त्यामध्ये असे दाखवण्यात आले की, अमेरिकेत श्रीमंत आणि गरीब यांच्यातले अंतर वाढत चालले आहे. त्यात म्हटले होते: “मागील वर्षी देशाच्या एकूण मिळकतीतील निम्मा भाग सर्वात संपन्न असलेल्या एक पचमांश लोकसंख्येला मिळाला . . . सर्वात गरीब असलेल्या एक पचमांश लोकसंख्येला त्यातला ३.५ टक्के भाग मिळाला.” इतर असंख्य देशांमध्ये हीच गत आहे किंवा तेथील परिस्थिती यापेक्षाही बिकट आहे. वर्ल्ड बँकेच्या एका अहवालात असे दिसून आले की, जागतिक लोकसंख्येतील सुमारे ५७ टक्के लोक दर दिवशी २ डॉलरपेक्षा कमी पैशांवर गुजराण करतात.
या समस्येत भर म्हणजे, २००२ साली, काही एक्झेकिटिव्ह संशयास्पद मार्गांनी धनी झाल्याचे अहवाल ऐकून लाखो लोक अस्वस्थ झाले होते.
धडधडीतरित्या कसलीही बेकायदेशीर गोष्ट घडली नसली तरी अनेकांच्या मते, फोर्च्यून पत्रिकेत म्हटल्याप्रमाणे, या कंपनीतले अधिकारी “असाधारण प्रमाणात आणि किळसवाणे वाटेल इतके श्रीमंत झाले होते.” जगातल्या परिस्थितीचा विचार करता, असंख्य लोक गरिबीत दिवस काढत असताना इतक्या मोठ्या रक्कमेची, काही व्यक्तींच्या बाबतीत तर, कोट्यवधी डॉलर्सच्या घरात जाणाऱ्या पैशाची सबब कशी दिली जाऊ शकते असा काहींना विचार पडतो.गरिबी कायमची?
याचा अर्थ गरिबांच्या परिस्थितीविषयी काही पावले उचलली जात नाहीत असे नाही. सद्हेतू बाळगणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांनी आणि मदत संस्थांनी बदल करण्यासाठी निश्चितच प्रस्ताव मांडले आहेत. परंतु, वस्तुस्थिती निराशाजनक आहे. ह्यूमन डेव्हेलपमेंट रिपोर्ट २००२ म्हणतो की, सुधारणा करण्याचे अनेक प्रयत्न केले जात असतानाही “अनेक देश गेल्या १०, २० आणि काही बाबतीत तर ३० वर्षांपासून गरीब आहेत.”
याचा अर्थ गरिबांची स्थिती आशाहीन आहे का? तुम्ही पुढचाही लेख वाचावा असा आम्ही आग्रह करतो. त्यात, सध्या सहायक ठरेल अशा व्यावहारिक सुज्ञानाविषयी त्याचप्रमाणे तुम्ही विचार केला नसेल अशा उपायांविषयी सांगितले आहे.