काहींची कशी आठवण केली जाते
काहींची कशी आठवण केली जाते
सुमारे तीन हजार वर्षांआधी, दावीद इस्राएलचा राजा शौल याच्यापासून पळ काढत होता. दावीदाने नाबाल नावाच्या एका धनाढ्य गुराख्याकडे काही लोक पाठवून आपल्याला अन्न-पाणी द्यावे अशी विनंती केली. खरे तर, दावीदाने नाबालच्या कळपांचे संरक्षण केले होते म्हणून नाबालवर दावीदाचे ऋण होते. परंतु, नाबालने दावीदाला कसलीही मदत करण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर तो दावीदाच्या लोकांवर खेकसला. नाबाल आगीशी खेळत होता कारण दावीद हा अन्याय सहन करणारा नव्हता.—१ शमुवेल २५:५, ८, १०, ११, १४.
मध्य पूर्वेतील रीतीरिवाजानुसार पाहुण्यांना आणि अनोळखी लोकांना पाहुणचार दाखवला जात असे; परंतु, नाबालची मनोवृत्ती एकदम उलट होती. तर मग, नाबालने कसले नाव कमवले? बायबलमधील अहवालानुसार तो “कठोर व वाईट चालीचा” आणि “अधम” होता. त्याच्या नावाचा अर्थ “निर्बुद्ध” असा होतो आणि या नावाप्रमाणेच तो होता. (१ शमुवेल २५:३, १७, २५) लोकांनी तुम्हाला असेच आठवावे असे तुम्हाला वाटते का? इतरांसोबत व्यवहार करताना तुम्ही कठोर व कठीण आहात का, खासकरून असहाय लोकांसोबत तुम्ही तसे वागता का? की तुम्ही दयाळू, पाहुणचार दाखवणारे आणि विचारशील आहात?
अबीगईल—बुद्धिमती स्त्री
आपल्या कठोर मनोवृत्तीमुळे नाबाल संकटात सापडला. दावीद व त्याच्या ४०० पुरुषांनी आपल्या तरवारी घेतल्या आणि ते नाबालला धडा शिकवण्यासाठी निघाले. नाबालची पत्नी अबीगईल हिने जे घडले त्याविषयी ऐकले. यामुळे युद्ध होईल याची तिला जाणीव होती. तिने काय करावे? तिने घाईघाईने अन्न व अन्नसाठा तयार केला आणि ती दावीद व त्याच्या पुरुषांना भेटायला गेली. त्यांना भेटल्यावर तिने दावीदाला विनवणी केली की त्याने विनाकारण रक्तपात करू नये. दावीद मान्य झाला. त्याने तिची विनंती ऐकली आणि दया दाखवली. या घटनेनंतर काही काळातच नाबाल मरण पावला. नंतर, दावीदाने अबीगईलचे उत्तम गुण पाहून तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले.—१ शमुवेल २५:१४-४२.
अबीगईलने कोणते नाव कमवले? मूळ इब्री भाषेत व्यक्त केल्याप्रमाणे ती “विचारी” किंवा “हुशार” होती. यावरून स्पष्ट दिसते की ती शहाणी होती, तिला व्यावहारिक बुद्धी होती; केव्हा काय करावे याची तिला जाणीव होती. एकनिष्ठा दाखवून तिने आपल्या मूर्ख पतीला आणि त्याच्या घराण्याला अरिष्टापासून वाचवले. कालांतराने, ती मरण पावली पण एक बुद्धिमती स्त्री म्हणून तिने चांगले नाव कमवले.—१ शमुवेल २५:३.
पेत्र कसा होता?
आपण सा.यु. पहिल्या शतकाचे उदाहरण घेऊन येशूच्या १२ प्रेषितांचा विचार करू या. पूर्वी गालीलमध्ये मच्छीमारी करणारा पेत्र किंवा कैफा हा सर्वांच्या आधी बोलणारा आणि कार्य करणारा असा होता यात शंका नाही. त्याचे भारदस्त व्यक्तिमत्त्व होते आणि तो इतरांपुढे आपल्या भावना व्यक्त करण्यास घाबरत नव्हता. उदाहरणार्थ,
येशूने आपल्या शिष्यांचे पाय धुतले त्या प्रसंगाची आठवण करा. पेत्राचे पाय धुण्याची पाळी आली तेव्हा त्याची काय प्रतिक्रिया होती?पेत्र येशूला म्हणाला: “प्रभुजी, आपण माझे पाय धुता काय?” येशूने त्याला उत्तर दिले: “मी करितो ते तुला आता कळत नाही; ते तुला पुढे कळेल.” पेत्र म्हणाला: “तुम्हाला माझे पाय कधीहि धुवावयाचे नाहीत.” पेत्राची ही जोरदार परंतु उतावळेपणाने केलेली प्रतिक्रिया पाहा. याला येशूने कशी प्रतिक्रिया दाखवली?
येशूने म्हटले: “मी तुला न धुतले तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही.” त्यावर शिमोन पेत्र म्हणाला: “प्रभुजी, माझे केवळ पाय धुऊ नका, तर हात व डोकेहि धुवा.” आता पेत्र दुसऱ्या टोकाला गेला! पण पेत्र कसा होता हे लोकांना ठाऊक होते. त्याच्यात कपट किंवा फसवेपणा नव्हता.—योहान १३:६-९.
पेत्राचा विचार केल्यास, त्याने देखील सर्वसाधारण मानवांच्या हातून होणाऱ्या चुका केल्या. उदाहरणार्थ, लोकांनी त्याला आरोपी ठरवलेल्या नासरेथकर येशूचा अनुयायी म्हटले तेव्हा त्याने त्यांच्यासमोर तीनदा ख्रिस्ताला नाकारले. पेत्राला आपली चूक कळली तेव्हा तो ढसाढसा रडला. आपले दुःख आणि आपल्याला झालेला पस्तावा व्यक्त करण्यास तो कचरला नाही. शिवाय, पेत्राने नकार दिल्याचा हा अहवाल शुभवर्तमानाच्या लेखकांनीही नमूद केला हे महत्त्वाचे आहे—कदाचित पेत्रानेच ही माहिती दिली असावी! आपल्या चुका कबूल करण्यास तो नम्र होता. हा सद्गुण तुमच्यात आहे का?—मत्तय २६:६९-७५; मार्क १४:६६-७२; लूक २२:५४-६२; योहान १८:१५-१८, २५-२७.
ख्रिस्ताला नाकारून त्याला केवळ दोन-चार आठवडे झाले तेव्हा पवित्र आत्मा त्याच्यात आला आणि त्याने पेन्टेकॉस्ट रोजी यहुद्यांच्या एका समूहाला धैर्याने प्रचार प्रेषितांची कृत्ये २:१४-२१.
केला. पुनरुत्थित येशूला त्याच्यावर भरवसा होता याचा हा ठोस पुरावा होता.—दुसऱ्या एका प्रसंगी, पेत्र एका वेगळ्या पद्धतीने फसला. प्रेषित पौलानुसार, अँटियोकमध्ये काही यहुदी बांधव येण्याआधी पेत्र विदेश्यांमध्ये मनमोकळेपणाने वावरत होता. पण जेरूसलेमहून ‘सुंता झालेले लोक’ आले तेव्हा त्यांना “भिऊन” तो विदेश्यांपासून वेगळा राहू लागला. पौलाने पेत्राचे हे दुटप्पी वागणे उघड केले.—गलतीकर २:११-१४.
असे असले तरी, येशूचे बहुतेक अनुयायी त्याला सोडून जायला तयार होते त्या आणीबाणीच्या प्रसंगी शिष्यांपैकी कोण धैर्याने बोलला? हा प्रसंग, येशूने आपल्या शिष्यांना एक नवीन गोष्ट प्रकट केली तेव्हाचा होता; ही गोष्ट त्याचे मांस खाण्याच्या व त्याचे रक्त पिण्याच्या अर्थासंबंधाने होती. तो म्हणाला होता: “तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही.” हे ऐकून येशूचे बहुतांश शिष्य अडखळले आणि ते म्हणाले: “हे वचन कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो?” मग काय झाले? “ह्यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्या बरोबर चालले नाहीत.”—योहान ६:५०-६६.
या आणीबाणीच्या वेळी, येशूने आपल्या १२ प्रेषितांना असा मार्मिक प्रश्न विचारला: “तुमचीहि निघून जाण्याची इच्छा आहे काय?” त्यावर पेत्राने उत्तर दिले: “प्रभुजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत; आणि आम्ही विश्वास ठेवला आहे व ओळखिले आहे की देवाचा पवित्र तो पुरुष आपण आहा.”—योहान ६:६७-६९.
पेत्राने कसले नावलौकिक कमवले? त्याच्याविषयीचे अहवाल वाचल्यावर, त्याचे प्रामाणिक आणि निष्कपट व्यक्तिमत्त्व, त्याची एकनिष्ठा आणि स्वतःच्या चुका कबूल करण्याची त्याची तयारी पाहून कोणीही प्रभावित होईल. त्याने किती उत्तम नावलौकिक कमवले!
लोकांना येशूविषयी काय लक्षात राहिले?
येशूने पृथ्वीवर केवळ साडे तीन वर्षे सेवाकार्य केले. पण, त्याचे अनुयायी त्याची काय म्हणून आठवण करतात? तो परिपूर्ण होता, पापरहित होता म्हणून तो लोकांपासून दूर राहायचा का? तो देवाचा पुत्र होता म्हणून तो लोकांवर अधिकार गाजवायचा का? त्याने धमकावून किंवा जबरदस्ती करून आपल्या अनुयायांना आपल्या आज्ञेत ठेवले का? तो इतक्या गंभीर प्रवृत्तीचा होता का, की त्याच्याजवळ विनोदबुद्धी नव्हती? दुबळे, आजारी किंवा मुलांकरता त्याच्याजवळ वेळ नव्हता इतका तो व्यस्त होता का? त्या काळचे पुरुष सर्रासपणे करीत त्याप्रमाणे इतर जातीच्या लोकांना आणि स्त्रियांना त्याने कमी लेखले का? अहवाल आपल्याला काय सांगतो?
येशूला लोक आवडत होते. त्याच्या सेवाकार्याचा अभ्यास केल्यावर हे स्पष्ट होते की, अनेक प्रसंगी त्याने अपंग व आजारी लोकांना बरे केले. गरजवंतांना मदत करण्यासाठी तो झटला. लहान मुलांमध्येही त्याने रस दाखवला; त्याने आपल्या शिष्यांना म्हटले: “बाळकांस माझ्याजवळ येऊ द्या; त्यांना मनाई करू नका.” मग येशूने “त्यांना कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला.” तुम्ही मुलांकरता वेळ काढता का? की तुम्ही इतके दंग असता की त्यांच्याकडे तुमचे लक्षही जात नाही?—मार्क १०:१३-१६; मत्तय १९:१३-१५.
येशू पृथ्वीवर होता तेव्हा यहुदी लोक धार्मिक विधी-नियमांखाली दबले गेले होते; हे विधी-नियम नियमशास्त्रातील अपेक्षांव्यतिरिक्त देण्यात आले होते. त्यांचे धार्मिक नेते लोकांवर ओझी लादत होते पण ते स्वतः मात्र त्या ओझ्यांस बोट देखील लावत नव्हते. (मत्तय २३:४; लूक ११:४६) येशू यांच्यापासून किती वेगळा होता! तो म्हणाला: “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन.”—मत्तय ११:२८-३०.
येशूसोबत सहवास राखून लोकांना तजेला प्राप्त होत असे. आपल्या शिष्यांवर दडपण आणून आपल्या भावना त्यांनी व्यक्त करू नयेत असे त्यांनी कधी केले नाही. तर, त्यांच्या मनातल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी त्याने प्रश्न विचारले. (मार्क ८:२७-२९) ख्रिस्ती पर्यवेक्षकांनी स्वतःला असे विचारावे: ‘सह-विश्वासूंना माझ्याविषयी असेच वाटते का? इतर वडील माझ्यासमोर आपले मत खरोखर व्यक्त करतात का, की ते असे करण्यास घाबरतात?’ पर्यवेक्षक मैत्रीपूर्ण असतात, इतरांचे ऐकतात आणि लवचीक असतात तेव्हा दिलासा मिळत नाही का? समंजसपणा नसला तर सहसा मनमोकळेपणाने चर्चा होत नाही.
येशू हा देवाचा पुत्र असला तरी त्याने आपल्या शक्तीचा किंवा अधिकाराचा कधी गैरवापर केला नाही. उलट, त्याने आपल्या ऐकणाऱ्यांसोबत कारणमीमांसा केली. परुशांनी त्याला एक चलाख प्रश्न विचारला तेव्हाही असेच घडले. त्यांनी त्याला विचारले: “आपल्याला काय वाटते हे आम्हास सांगा कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?” येशूने त्यांना एक नाणे दाखवायला सांगून असे विचारले: “हा मुखवटा व हा लेख कोणाचा?” ते म्हणाले, “कैसराचा.” तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “तर मग कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरा.” (मत्तय २२:१५-२१) ही साधी कारणमीमांसा त्यांच्याकरता पुरेशी होती.
येशूला विनोदबुद्धी होती का? येशूने जेव्हा, ‘सुईच्या नाकातून उंटाला जाणे सोपे परंतु देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे सोपे नाही’ असे म्हटले तेव्हा काही वाचकांना यात विनोदबुद्धीची झलक दिसू शकेल. (मत्तय १९:२३, २४) एखादा उंट, खरोखर सुईच्या नाकातून जाण्याचा प्रयत्न करत आहे ही कल्पना एक अतिशयोक्ती आहे. अशा अतिशयोक्ती अलंकाराचे आणखी एक उदाहरण म्हणजे, आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ पाहणे पण स्वतःच्या डोळ्यातले मुसळ न दिसणे. (लूक ६:४१, ४२) यावरून दिसते की, येशू काही कडक शिस्तीचा भोक्ता नव्हता. तो स्नेही आणि मैत्रीपूर्ण होता. आज ख्रिस्ती, विनोदबुद्धी दाखवतात तेव्हा काही प्रसंगी त्यांचा तणाव कमी होऊ शकतो.
स्त्रियांबद्दल येशूचा कळवळा
येशूच्या समोर स्त्रियांना कसे वाटत होते? अनेक स्त्रिया त्याच्या विश्वासू अनुयायी होत्या; त्याची आई, मरीया देखील त्यांच्यापैकी होती. (लूक ८:१-३; २३:५५, ५६; २४:९, १०) स्त्रिया येशूसोबत इतक्या मनमोकळेपणाने वागायच्या की, एकदा “पापी स्त्री” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका बाईने आपल्या अश्रुंनी त्याचे पाय धुतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले. (लूक ७:३७, ३८) आणखी एक स्त्री, जिला कित्येक वर्षांपासून रक्तस्राव होत होता ती बरी व्हावी म्हणून गर्दीतून पुढे येऊन त्याच्या वस्त्रांना शिवली. येशूने तिच्या विश्वासाची प्रशंसा केली. (मत्तय ९:२०-२२) होय, स्त्रिया मनमोकळेपणाने येशूकडे जाऊ शकत होत्या.
आणखी एका प्रसंगी, येशू विहिरीजवळ एका शोमरोनी स्त्रीशी बोलला. ती इतकी चकित झाली की तिने विचारले: “आपण यहूदी असता माझ्यासारख्या शोमरोनी स्त्रीजवळ प्यावयाला पाणी मागता हे कसे?” त्या काळी यहुदी लोक शोमरोनी लोकांसोबत कसलाही संबंध ठेवत नव्हते. येशूने तिला ‘सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याच्या झऱ्याविषयी’ एक अद्भुत सत्य सांगितले. तो स्त्रियांशी बोलायला कचरत नव्हता. आपल्याविषयी योहान ४:७-१५.
लोक शंका करू लागतील असे त्याला वाटले नाही.—येशूची लोक त्याच्या उत्तम गुणांसाठी व त्याने दाखवलेल्या आत्म-त्यागी वृत्तीसाठी देखील आठवण करतात. तो ईश्वरी प्रीतीचे प्रत्यक्ष स्वरूप होता. येशूचे अनुयायी होण्याची इच्छा असलेल्या सर्वांकरता त्याने आदर्श मांडला आहे. त्याच्या उदाहरणाचे तुम्ही किती जवळून अनुकरण करता?—१ करिंथकर १३:४-८; १ पेत्र २:२१.
आधुनिक काळातील ख्रिश्चनांची कशी आठवण केली जाते?
आधुनिक काळात, हजारो विश्वासू ख्रिस्ती मरण पावले आहेत; पुष्कळजण वृद्ध होऊन तर इतरजण ऐन तारुण्यातच. परंतु त्यांनी चांगले नाव कमवले होते. वृद्धापकाळी मरण पावलेल्या क्रिस्टलसारख्या काहींनी प्रेमळ आणि मनमिळाऊ असल्याचे नाव कमवले आहे. तर चाळीशीत मरण पावलेल्या डर्कसारख्या काहींनी आनंदी व सहयोगी वृत्ती असल्याचे नाव कमवले आहे.
काहीजण स्पेनमधील होसेसारखे आहेत. १९६० च्या दशकात, त्या देशात यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रचार कार्यावर बंदी होती त्या वेळी होसे विवाहित होते आणि त्यांना तीन लहान मुली होत्या. बार्सिलोना येथे त्यांना एक स्थायी नोकरी होती. पण त्या वेळी, दक्षिण स्पेनमध्ये प्रौढ ख्रिस्ती वडिलांची गरज होती. होसे यांनी आपली चांगली नोकरी सोडली आणि आपल्या कुटुंबासोबत ते मलागा येथे राहायला गेले. मग त्यांना आर्थिक अडचण सहन करावी लागली आणि पुष्कळदा त्यांना काम मिळत नसे.
तरीपण, होसे यांनी विश्वासूपणे आणि विश्वसनीयतेने सेवाकार्य केले आणि आपली पत्नी कार्मेला हिच्या सहकार्याने त्यांनी इतरांकरता आदर्श राहील असे आपल्या मुलींचे संगोपन केले. त्या प्रदेशात ख्रिस्ती अधिवेशने भरवण्यासाठी मदत हवी असायची तेव्हा होसे नेहमी तयार असायचे. दुःखाची गोष्ट अशी की, पन्नाशीत असताना त्यांना एक भयंकर आजार जडला आणि त्यात ते मरण पावले. पण, त्यांनी विश्वसनीय, मेहनती वडील, प्रेमळ पती व पिता असल्याचे नाव कमवले.
तेव्हा, तुमची कशी आठवण केली जाईल? तुम्ही काल मरण पावला असता तर आज तुमच्याविषयी लोकांनी काय म्हटले असते? हा प्रश्न आपल्या प्रत्येकाला सुधारण्यासाठी प्रेरणा देऊ शकेल.
चांगले नावलौकिक कमवण्यासाठी आपण काय करू शकतो? आपण प्रीती, सहनशीलता, ममता, सौम्यता आणि इंद्रियदमन यासारखे आत्म्याचे फळ प्रदर्शित करण्यात सातत्याने सुधार करू शकतो. (गलतीकर ५:२२, २३) निश्चितच, “सुवासिक अत्तरापेक्षा [उत्तम] नावलौकिक बरा; जन्मदिनापेक्षा मृत्युदिन बरा.”—उपदेशक ७:१; मत्तय ७:१२.
[५ पानांवरील चित्र]
अबीगईलने बुद्धिमती स्त्री असल्याचे नाव कमवले
[७ पानांवरील चित्र]
पेत्र उतावीळ होता तरीपण त्याच्या प्रामाणिकपणासाठी लोक त्याची आठवण करतात
[८ पानांवरील चित्र]
येशूने मुलांकरता वेळ काढला