यहोवाचा तुम्ही प्रामाणिकपणे शोध करीत आहात का?
यहोवाचा तुम्ही प्रामाणिकपणे शोध करीत आहात का?
एका ख्रिस्ती मनुष्याला, ट्रेनमधील सहप्रवाशांना, बायबलमधून सुवार्ता सांगण्याची मनापासून इच्छा होती. (मार्क १३:१०) पण भयामुळे त्याचे धैर्य होत नव्हते. त्याने हार मानली नाही. त्याने याविषयी कळकळीने प्रार्थना केली आणि संभाषण सुरू करण्यात पुढाकार घेण्याच्या बाबतीत कार्य केले. यहोवा देवाने या मनुष्याची विनंती ऐकली आणि साक्ष देण्याकरता त्याला बळ दिले.
यहोवाचा शोध घेताना आणि त्याचे आशीर्वाद मागताना अशाप्रकारच्या प्रामाणिकपणाची आवश्यकता आहे. प्रेषित पौलाने म्हटले: “देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे.” (इब्री लोकांस ११:६) यहोवाचा केवळ शोध घेणे पुरेसे नाही. ‘झटून शोध करणे’ असे भाषांतरीत केलेल्या ग्रीक क्रियापदाचे रूप, गंभीर व संपूर्ण मनाने केलेल्या प्रयत्नांना सूचित करते. यामध्ये, एखाद्याचे संपूर्ण हृदय, मन, जीव आणि शक्ती यांचा समावेश होतो. आपण प्रामाणिकपणे यहोवाचा शोध करणारे असू तर आपण बेपर्वाईने, निरुत्साहाने, आळशीपणे वागणार नाही. त्याऐवजी आपण पूर्ण उत्साहाने त्याचा शोध करू.—प्रेषितांची कृत्ये १५:१७.
यहोवाचा ज्यांनी प्रामाणिकपणे शोध केला
संपूर्ण मनाने यहोवाचा शोध करणाऱ्यांची पुष्कळ उदाहरणे शास्त्रवचनांमध्ये आहेत. त्यांपैकी एक होता, याकोब; पहाट होईपर्यंत तो, मानवी रूप धारण केलेल्या देवाच्या एका दूताबरोबर परिश्रमपूर्वक झोंबी करीत राहिला. म्हणूनच याकोबाला इस्राएल (देवाबरोबर झगडणारा) हे नाव देण्यात आले, कारण तो देवाबरोबर ‘झगडला,’ अर्थात देवाबरोबर त्याने झोंबी केली; किंवा हट्ट केला; तो प्रयत्न करीत राहिला, आशीर्वादासाठी देवदूताच्या मागे लागला. त्याच्या प्रामाणिक प्रयत्नाबद्दल देवदूताने त्याला आशीर्वादित केले.—उत्पत्ति ३२:२४-३०.
आणखी एक उदाहरण एका गालीलच्या स्त्रीचे आहे जिला १२ वर्षे रक्तस्रावाचा त्रास होत असल्यामुळे, “पुष्कळ हाल” सोसावे लागले होते. असा आजार झाल्यामुळे नियमशास्त्रानुसार ती इतर लोकांना शिवू शकत नव्हती. तरीपण तिने येशूला भेटायला जाण्यासाठी आपले सर्व धैर्य एकवटले. ती मनात सारखी अशी म्हणत राहिली, की “केवळ ह्याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन.” कल्पना करा, येशूच्या मागे ‘पुष्कळ लोक चालले आहेत आणि त्याच्याभोवती गर्दी करीत आहेत’ आणि अशा गर्दीत ती शिरते. येशूच्या बाह्य वस्त्रांना शिवल्याबरोबर तिला जाणवते की तिच्या रक्ताचा झरा लगेच सुकला—तिचा दीर्घकाळचा आजार बरा झाला होता! येशू जेव्हा विचारतो: “माझ्या कपड्यांना कोण शिवले?” तेव्हा ती खूप घाबरली. पण येशू तिला अगदी प्रेमाने सांगतो: “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे; शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो.” तिला तिच्या प्रयत्नांचे प्रतिफळ मिळाले.—मार्क ५:२४-३४; लेवीय १५:२५-२७.
दुसऱ्या एका प्रसंगी, एक कनानी बाई, आपल्या मुलीला बरे करावे म्हणून येशूपुढे गयावया करते. येशू तिला उत्तर मत्तय १५:२२-२८.
देतो, की मुलांचे अन्न घरच्या कुत्र्यांना घालणे ठीक नव्हे. त्याच्या बोलण्याचा असा अर्थ होतो, की तो पात्र यहुद्यांना सोडून गैर-इस्राएली लोकांकडे लक्ष देऊ शकत नव्हता. त्याच्या दाखल्याचा अर्थ समजून देखील ती स्त्री त्याला विनवणी करते: “खरेच, प्रभूजी; तरी घरची कुत्रीहि आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूर खातात.” तिचा भक्कम विश्वास आणि प्रामाणिकपणा पाहून येशू असे म्हणावयास प्रवृत्त होतो: “बाई, तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ होवो.”—आतापर्यंत आपण पाहिलेल्या या व्यक्तींनी त्यांच्या प्रयत्नांत चिकाटी दाखवली नसती तर काय झाले असते? सुरवातीला आलेल्या अडचणीत किंवा त्यांना नाकारण्यात आले तेव्हा त्यांनी जर हार मानली असती तर त्यांना आशीर्वाद मिळाले असते का? नाही! या उदाहरणांवरून, येशू जो मुद्दा शिकवू इच्छित होता तो आपल्याला स्पष्टपणे कळतो. तो मुद्दा असा, की अविचल ‘आग्रह’ उचित आहे, इतकेच नव्हे तर यहोवाचा शोध घेण्याकरता आवश्यकही आहे.—लूक ११:५-१३.
“त्याच्या इच्छेप्रमाणे”
चमत्कारिकपणे बरे झालेल्यांच्या वर उल्लेख केलेल्या उदाहरणांत, बरे होण्यासाठी, प्रामाणिकपणा हीच केवळ एक अपेक्षा होती का? नाही. त्यांच्या विनंत्या देवाच्या इच्छेच्या सामंजस्यात असणे आवश्यक होते. येशूला, तो देवाचा पुत्र, वचनयुक्त मशीहा आहे हे एका उल्लेखनीय मार्गाने शाबीत करण्यासाठी चमत्कार करण्याची शक्ती देण्यात आली होती. (योहान ६:१४; ९:३३; प्रेषितांची कृत्ये २:२२) शिवाय, येशूने केलेले चमत्कार, ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राजवटीत यहोवा पृथ्वीवरील मानवजातीवर जे महान आशीर्वाद वर्षवणार आहे त्यांची पूर्वझलक होते.—प्रकटीकरण २१:४; २२:२.
पण आता खऱ्या धर्माच्या लोकांकडे, बरे करण्याची किंवा वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलण्याची चमत्कारिक शक्ती असावी ही देवाची इच्छा नाही. (१ करिंथकर १३:८, १३) आपल्या दिवसांसाठी त्याची अशी इच्छा आहे, की राज्याची सुवार्ता सर्व पृथ्वीवर ऐकवली जावी जेणेकरून ‘सर्व माणसे सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचतील.’ (१ तीमथ्य २:४; मत्तय २४:१४; २८:१९, २०) देवाच्या सेवकांनी देवाच्या इच्छेच्या सामंजस्यात प्रामाणिकपणे प्रयत्न केले तरच ते, आपल्या विनंत्या ऐकल्या जातील अशी अपेक्षा करू शकतात.
काही जण असा विचार करतील, ‘देवाचा उद्देश काहीही झाला तरी पूर्ण होणारच आहे तर आपण कशाला इतके परिश्रम घ्यायचे?’ मानव परिश्रम करोत अगर न करोत, यहोवा आपला उद्देश पूर्ण करीलच हे खरे असले तरीसुद्धा, त्याची इच्छा पूर्ण करण्यात जे भाग घेतात अशांवर यहोवा संतुष्ट होतो. यहोवाची तुलना आपण अशा माणसाबरोबर करू शकतो, जो घर बांधणार आहे. त्याच्या मनात घराची ब्लूप्रिंट आहे परंतु तो, स्थानीयरीत्या उपलब्ध असलेले बांधकाम साहित्य निवडतो. तसेच, आज यहोवाच्या मनात एक प्रकल्प आहे जो पूर्ण करायचा आहे आणि हा प्रकल्प सिद्धीस नेण्याकरता त्याला, आपणहून पुढे येणाऱ्या त्याच्या सेवकांचा उपयोग करण्यात आनंद वाटतो.—स्तोत्र ११०:३; १ करिंथकर ९:१६, १७.
तोशियो नावाच्या एका तरुणाच्या अनुभवाचा विचार करा. उच्च माध्यमिक शाळेत गेल्यावर, त्याला त्याच्या अनोख्या क्षेत्रात होता होईल तितकी साक्ष द्यायची होती. तो नेहमी स्वतःजवळ बायबल बाळगायचा आणि ख्रिस्ती या नात्याने एक उत्तम उदाहरण असण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करायचा. त्याच्या शाळेच्या पहिल्या वर्षाच्या शेवटी, वर्गापुढे भाषण देण्याची एक संधी त्याच्यापुढे आपणहून चालत आली. तोशियोने मदतीसाठी यहोवाला प्रार्थना केली आणि “पायनियरींग—माझे जीवनध्येय,” असे शीर्षक असलेले भाषण तो वर्गासमोर उभा राहून देत असताना सर्व विद्यार्थी किती लक्षपूर्वक ऐकत होते हे पाहून त्याला खूप आनंद वाटला. त्याने सांगितले, की तो यहोवाच्या साक्षीदारांचा एक पूर्ण वेळेचा सेवक होऊ इच्छितो. वर्गातील एक विद्यार्थी त्याच्याबरोबर बायबलचा अभ्यास करायला तयार झाला आणि त्याने प्रगती करून बाप्तिस्माही घेतला. आपल्या प्रार्थनांच्या सामंजस्यात तोशियोने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे त्याला फळ मिळाले!
तुम्ही कितपत प्रामाणिक आहात?
तुम्ही देखील विविध मार्गांनी दाखवून देऊ शकता, की तुम्ही प्रामाणिकपणे यहोवाचा शोध करीत आहात व त्याचे आशीर्वाद मिळवू पाहत आहात. सर्वप्रथम, तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी करू शकता, जसे की ख्रिस्ती सभांची चांगल्याप्रकारे तयारी करू शकता. तयारी केलेल्या उत्तरांद्वारे, प्रेरणादायक भाषणांद्वारे आणि प्रभावकारक प्रात्यक्षिकांद्वारे तुम्ही, यहोवाचा किती कसून शोध घेत आहात हे प्रदर्शित करता. तुमच्या सेवेचा दर्जा सुधारूनही तुम्ही तुमचा प्रामाणिकपणा प्रदर्शित करू शकता. घरमालकाशी मैत्रीपूर्ण संभाषण करण्याचा आणि तुमच्या क्षेत्रात लागू होणाऱ्या प्रभावकारी प्रस्तावनांचा उपयोग करण्याचा तुम्ही प्रयत्न कसा करू शकता? (कलस्सैकर ३:२३) पूर्ण मनाने प्रयत्न करण्याद्वारे एक ख्रिस्ती बांधव, सेवा सेवक अथवा वडील या नात्याने नेमणुका स्वीकारू शकेल. (१ तीमथ्य ३:१, २, १२, १३) स्वतःला उपलब्ध केल्यामुळे तुम्हाला देण्यामुळे मिळणाऱ्या आनंदाचा अनुभव घेता येईल. तुम्ही कदाचित, शाखा बांधकाम प्रकल्पात किंवा यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरात सेवा करण्यासाठी अर्ज भरू शकता. तुम्ही अविवाहित बंधू असल्यास, उत्तम मेंढपाळ होण्याकरता आध्यात्मिक मनोवृत्तीच्या पुरुषांना प्रशिक्षित करणाऱ्या सेवा प्रशिक्षण प्रशालेत आपले नाव नोंदवण्यास तुम्हाला आवडेल. तुम्ही विवाहित असाल तर, यहोवाची अधिक सेवा करण्याची तुमची मनापासूनची इच्छा व्यक्त करण्याचा हा एक मार्ग म्हणजे मिशनरी सेवेत प्रवेश करणे. राज्य प्रचारकांची अधिक गरज असलेल्या ठिकाणी राहायला जाणे तुम्हाला शक्य होऊ शकते.—१ करिंथकर १६:९.
एखादी नेमणूक तुम्ही कोणत्या प्रकारची मनोवृत्ती बाळगून पूर्ण करता हे सर्वात महत्त्वाचे आहे. तुम्हाला कोणतीही जबाबदारी दिल्यास, ती प्रामाणिकपणे, आवेशाने व “सालस मनाने” पूर्ण करा. (प्रेषितांची कृत्ये २:४६; रोमकर १२:८) तुम्हाला मिळालेली नेमणूक ही, यहोवाची स्तुती करण्याची तुम्हाला किती उत्कंठा आहे हे व्यक्त करण्याची एक संधी समजा. मदतीसाठी सतत यहोवाला प्रार्थना करीत राहा आणि तुमच्या परीने प्रयत्न करीत राहा. तुम्हाला निश्चितच त्याचे गोड फळ मिळेल.
प्रामाणिक प्रयत्नांचे प्रतिफळ
ट्रेनमधल्या सहप्रवाशांना प्रचार करताना मनात येणाऱ्या भयावर मात करण्यासाठी प्रार्थना करणारा लेखाच्या सुरवातीला ज्याचा उल्लेख करण्यात आला आहे तो ख्रिस्ती बांधव आठवतो का? या बांधवाच्या मनापासून असलेल्या इच्छेवर यहोवाने आशीर्वाद दिला. त्याने संभाषण सुरू करण्याकरता मित्रत्वाच्या भावनेने व विशिष्ट विषय निवडण्याचा प्रयत्न केला. तणावपूर्ण मानवी नातेसंबंधांविषयी चिंता असलेल्या एका मनुष्याला साक्ष देण्याकरता हा बंधू बायबलचा प्रभावीपणे उपयोग करू शकला. या बांधवाने, ट्रेनमध्येच या मनुष्याला दिलेल्या भेटींमुळे एक गृह बायबल अभ्यास सुरू झाला. यहोवाने या बांधवाला त्याच्या प्रामाणिक प्रयत्नांचे प्रतिफळ दिले!
तुम्ही देखील प्रामाणिकपणे यहोवाचा शोध घेत राहिला तर असेच परिणाम उपभोगाल. तुम्ही नम्र होऊन चिकाटी दाखवली आणि तुम्हाला मिळणारे कोणतेही ईश्वरशासित कार्य पूर्ण मन लावून केल्यास यहोवा आपल्या उद्देशांच्या सामंजस्यात तुमचा उपयोग करील आणि तुमच्यावर विपुल आशीर्वादांचा वर्षाव करील!
[२६ पानांवरील चित्र]
या स्त्रीने चिकाटी दाखवली नसती तर?
[२७ पानांवरील चित्र]
आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही यहोवाकडे गयावया करीत राहता का?
[२८ पानांवरील चित्रे]
तुम्ही प्रामाणिकपणे यहोवाचा शोध करीत आहात हे कसे दाखवू शकता?