व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

मेलेल्यांखातर बाप्तिस्मा घेणे म्हणजे काय?

स्वर्गीय पुनरुत्थानाविषयी लिहिताना, प्रेषित पौलाने एक अतिशय मनोरंजक उतारा लिहिला. मराठी संदर्भासहित भाषांतरात आपण असे वाचतो: “असे नसल्यास मेलेल्यांखातर जे बाप्तिस्मा घेतात ते काय करितील? जर मेलेले मुळीच उठविले जात नाहीत तर त्यांच्याखातर ते बाप्तिस्मा का घेतात? मग आता मृतांच्या वतीने बाप्तिस्मा घेतात त्यांचे काय? मृतांचे पुनरुत्थान होणार नसेल तर त्यांच्या वतीने बाप्तिस्मा घेण्याचे प्रयोजन काय?” सुबोध भाषांतरात हा उतारा अशाप्रकारे भाषांतरीत केलेला आहे: “आता पुनरुत्थान नाही, तर तुमच्यापैकी काही जणांनी मृतांच्यावतीने बाप्तिस्मा घेण्यात काय अर्थ आहे? एके दिवशी मृत झालेले पुन्हा जिवंत होतील असा तुमचा विश्‍वास नसेल तर बाप्तिस्मा घेण्याची तरी काय गरज आहे?”—१ करिंथकर १५:२९.

बाप्तिस्मा न घेताच मरण पावलेल्या लोकांखातर जिवंत लोकांनी बाप्तिस्मा घ्यावा, असे पौल या वचनात सुचवत होता का? या आणि इतर बायबल भाषांतरांमध्ये हे वचन जसे अनुवादित करण्यात आले आहे त्यावरून तर असेच वाटते. परंतु, या दोन्ही शास्त्रवचनांचे आणि पौलाने वापरलेल्या मूळ ग्रीक वचनाचे जवळून परीक्षण केल्यास वेगळा निष्कर्ष सूचित होतो. पौलाचा असा अर्थ होता, की अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा बाप्तिस्मा अशा एका जीवनशैलीत होतो ज्यात, ख्रिस्ताप्रमाणे ते त्यांच्या मृत्यूपर्यंत एकनिष्ठ राहतील. नंतर, ख्रिस्ताप्रमाणेच आत्मिक जीवनासाठी त्यांचे पुनरुत्थान होईल.

या निष्कर्षास बायबलचा आधार आहे. रोमकरांना पत्र लिहिताना पौलाने लिहिले: “आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला, ह्‍याविषयी तुम्ही अजाण आहा काय?” (रोमकर ६:३) फिलिप्पैकरांना लिहिलेल्या पत्रात पौलाने स्वतःविषयी असे म्हटले की “[ख्रिस्ताच्या] दुःखाची सहभागिता ह्‍यांची, त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून द्यावी; म्हणजे कसेहि करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे.” (फिलिप्पैकर ३:१०, ११) पौल येथे हे दाखवत होता, की ख्रिस्ताच्या एका अभिषिक्‍त अनुयायाच्या जीवनशैलीत, परीक्षेत एकनिष्ठ राहणे, दररोज मृत्यूचा सामना करणे, आणि शेवटी मृत्यूपर्यंत एकनिष्ठ राहणे व नंतर स्वर्गीय पुनरुत्थान या गोष्टींचा समावेश होतो.

बाप्तिस्मा झालेल्यांच्या संदर्भात मृत्यूचा थेट उल्लेख करणारी ही व इतर शास्त्रवचने, जे मरण पावलेत त्यांच्या नव्हे तर जे जिवंत आहेत व ज्यांचा बाप्तिस्मा झाला आहे अशांना सूचित करतात. पौलाने सह-अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना असेही लिहिले: “तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर पुरले गेला, आणि ज्याने त्याला मेलेल्यातून उठविले त्या देवाच्या कृतीवरील विश्‍वासाच्या द्वारे त्याच्याबरोबर उठविलेहि गेला.”—कलस्सैकर २:१२.

पहिले करिंथकर १५:२९ या वचनाचा अनेक बायबल आवृत्तींमध्ये, “खातर” किंवा “ च्या वतीने” असे ज्याचे भाषांतर करण्यात आले आहे त्या ग्रीक शब्दप्रयोगाचा अर्थ “ च्या उद्देशाने” असाही होऊ शकतो. यास्तव, इतर बायबल वचनांच्या एकवाक्यतेत, न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिप्चर्स यांमध्ये या वचनाचे अचूक भाषांतर करण्यात आले आहे: “मेलेल्यांप्रमाणे होण्याच्या उद्देशाने जे बाप्तिस्मा घेतात ते काय करतील? मेलेले जर अगदीच उठवले जात नाहीत तर ते लोक अशांप्रमाणे होण्याच्या उद्देशाने बाप्तिस्मा कशाला घेतात?”