व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा आपल्या दररोजच्या गरजा भागवतो

यहोवा आपल्या दररोजच्या गरजा भागवतो

यहोवा आपल्या दररोजच्या गरजा भागवतो

“मनात अस्वस्थ राहू नका; कारण . . . तुम्हास त्यांची गरज आहे हे तुमच्या पित्याला ठाऊक आहे.”—लूक १२:२९, ३०.

१. यहोवा प्राणिमात्रांच्या गरजा कशाप्रकारे पुरवतो?

एखाद्या चिमणीला किंवा दुसऱ्‍या एखाद्या पक्ष्याला कधी तुम्ही धुळीत आपल्या चोचीने काहीतरी शोधताना पाहिले आहे का? जमिनीवर चोच मारून या बिचाऱ्‍या चिमणीला काय खायला मिळत असेल असा विचार तुमच्या मनात कदाचित आला असेल. डोंगरावरील प्रवचनात येशूने दाखवले, की यहोवा पक्ष्यांच्याही गरजा भागवतो आणि त्यावरून आपण काहीतरी शिकू शकतो. त्याने म्हटले: “आकाशातील पाखरांकडे निरखून पाहा; ती पेरणी करीत नाहीत, कापणी करीत नाहीत की कोठारात साठवीत नाहीत; तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो; तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहा की नाही?” (मत्तय ६:२६) यहोवा अतिशय अद्‌भुतरित्या आपल्या सर्व प्राणिमात्रांना खावयास देतो.—स्तोत्र १०४:१४, २१; १४७:९.

२, ३. येशूने आपल्याला रोजच्या भाकरीसाठी प्रार्थना करण्यास शिकवले यावरून कोणते आध्यात्मिक धडे घेता येतात?

मग “आमची रोजची भाकर आज आम्हास दे,” अशी विनंती येशूने त्याच्या आदर्श प्रार्थनेत का समाविष्ट केली? (मत्तय ६:११) या साध्याशा विनंतीवरून अतिशय अर्थपूर्ण आध्यात्मिक सत्ये आपण शिकू शकतो. सर्वप्रथम, यहोवा एक महान अन्‍नदाता आहे याची आपल्याला आठवण करून दिली जाते. (स्तोत्र १४५:१५, १६) मानव पेरणी करतात व मशागत करतात पण वाढ करणे केवळ देवाच्याच हातात आहे; मग ती आध्यात्मिक असो अथवा शारीरिक. (१ करिंथकर ३:७) आपण जे खातो व पितो ते देवानेच दिलेले आहे. (प्रेषितांची कृत्ये १४:१७) दररोजच्या गरजा पुरवण्याची देवाजवळ विनंती करण्याद्वारे या गोष्टींची आपल्याला कदर आहे, हे आपण दाखवतो. अर्थात, देवाला प्रार्थना केली म्हणजे आपली काम करण्याची जबाबदारी संपली असे नाही; काम करणे शक्य आहे तोवर आपण ते केलेच पाहिजे.—इफिसकर ४:२८; २ थेस्सलनीकाकर ३:१०.

दुसरे म्हणजे, “रोजची भाकर आज आम्हास दे” या प्रार्थनेवरून असे सूचित होते की भविष्याबद्दल आपण अनावश्‍यक काळजी करू नये. येशूने पुढे म्हटले: “ह्‍यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, असे म्हणत चिंता करीत बसू नका. कारण ही सर्व मिळविण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला ह्‍या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्‍याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. ह्‍यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला; ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे.” (मत्तय ६:३१-३४) “रोजची भाकर आज आम्हास दे” ही प्रार्थना साधी जीवनशैली राखण्याचे व “चित्तसमाधानासह भक्‍ति” करण्याचे प्रोत्साहन देते.—१ तीमथ्य ६:६-८.

दररोजचे आध्यात्मिक अन्‍न

४. येशूच्या व इस्राएलांच्या जीवनातील कोणत्या घटनांनी आध्यात्मिक अन्‍न ग्रहण करण्याच्या महत्त्वावर भर दिला?

दररोजच्या भाकरीकरता प्रार्थना करताना आपल्याला दररोजच्या आध्यात्मिक अन्‍नाचीही आठवण झाली पाहिजे. दीर्घकाळ उपवास केल्यानंतर भुकेने व्याकूळ असतानाही येशूने दगडांच्या भाकरी करण्याच्या सैतानाने आणलेल्या मोहाचा प्रतिकार केला. त्याने म्हटले: “‘मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्‍वराच्या मुखातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनाने जगेल’ असा शास्त्रलेख आहे.” (मत्तय ४:४) येशूने येथे मोशेचे शब्द उद्धृत केले; मोशेने इस्राएलांना म्हटले होते, “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्‍वराच्या मुखातून निघाणाऱ्‍या प्रत्येक वचनाने जगेल ह्‍याची जाणीव तुला व्हावी म्हणून त्याने तुला लीन केले, तुझी उपासमार होऊ दिली, आणि तुला किंवा तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्‍ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले.” (अनुवाद ८:३) यहोवाने ज्याप्रकारे मान्‍ना पुरवला त्यावरून इस्राएलांना केवळ शारीरिक अन्‍नच नव्हे तर आध्यात्मिक धडे देखील शिकायला मिळाले. पहिली गोष्ट म्हणजे, त्यांना केवळ “एकएका दिवसाला पुरेल इतके जमा करावे” असे सांगण्यात आले होते. त्यापेक्षा जास्त त्यांनी जमा केले तर त्यात किडे पडून त्याला दुर्गंध येऊ लागे. (निर्गम १६:४, २०) पण सहाव्या दिवशी मात्र असे घडत नव्हते, कारण या दिवशी त्यांना शब्बाथ दिवशीही पुरावा म्हणून दुप्पट मान्‍ना घेण्याची आज्ञा होती. (निर्गम १६:५, २३, २४) अशारितीने मान्न्याच्या तरतुदीने त्यांना आज्ञाधारकतेचे महत्त्व पटवून दिले आणि त्यांना याची जाणीव करून दिली की त्यांचे जीवन केवळ भाकरीवर नव्हे तर ‘परमेश्‍वराच्या मुखातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनावर’ अवलंबून होते.

५. यहोवा आपल्याला दररोज आध्यात्मिक अन्‍न कशाप्रकारे पुरवतो?

त्याचप्रकारे आपण देखील यहोवाने आपल्या पुत्राच्या माध्यमाने पुरवलेले आध्यात्मिक अन्‍न दररोज ग्रहण केले पाहिजे. हे अन्‍न पुरवण्याकरता येशूने एका “विश्‍वासू व बुद्धिमान दासाला,” विश्‍वासाच्या घराण्याला “यथाकाळी खावयास” देण्यासाठी नेमले आहे. (मत्तय २४:४५) हा विश्‍वासू दास वर्ग बायबल अभ्यासाच्या साधनांच्या रूपात विपुल मात्रेत आध्यात्मिक अन्‍न पुरवण्यासोबतच आपल्याला दररोज बायबल वाचन करण्याचेही प्रोत्साहन देतो. (यहोशवा १:८; स्तोत्र १:१-३) येशूप्रमाणेच दररोज यहोवाच्या इच्छेविषयी जाणून घेऊन ती पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न करण्याद्वारे आपणही आध्यात्मिक पोषण मिळवू शकतो.—योहान ४:३४.

पापांची क्षमा

६. कोणत्या ऋणांविषयी आपण क्षमा मागितली पाहिजे आणि कोणत्या अटींवर यहोवा हे ऋण माफ करण्यास तयार होतो?

आदर्श प्रार्थनेतील पुढची विनंती ही आहे: “जसे आम्ही आपल्या ऋण्यांस ऋण सोडिले आहे तशी तू आमची ऋणे आम्हास सोड.” (मत्तय ६:१२) याठिकाणी येशू आर्थिक ऋणांची गोष्ट करत नव्हता. तर आपल्या पापांच्या क्षमेविषयी तो विचार करत होता. लूकच्या अहवालातील आदर्श प्रार्थनेत ही विनंती अशाप्रकारे मांडली आहे: “आम्हाला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हीहि आपल्या प्रत्येक ऋण्याला क्षमा करितो.” (लूक ११:४) आपण पाप करतो तेव्हा एका अर्थाने आपण यहोवाचे ऋणी बनतो. पण जर आपण मनःपूर्वक पश्‍चात्ताप करून वाईट मार्गातून ‘वळलो’ व ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर क्षमायाचना केली तर आपला प्रेमळ पिता आपले हे ऋण ‘पुसून टाकण्यास’ किंवा रद्द करण्यास तयार आहे.—प्रेषितांची कृत्ये ३:१९; १०:४३; १ तीमथ्य २:५, ६.

७. आपण दररोज पापांच्या क्षमेकरता प्रार्थना का केली पाहिजे?

एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, आपण यहोवाच्या नीतिमान दर्जांपर्यंत पोचण्यास उणे पडतो तेव्हा आपण पाप करतो. उपजत पापी वृत्तीमुळे आपण सर्वजण बोलण्यात, वागण्यात व विचारांत चुकतो किंवा जे करायला हवे ते करत नाही. (उपदेशक ७:२०; रोमकर ३:२३; याकोब ३:२; ४:१७) तेव्हा, दिवसभरात आपण जाणीवपूर्वक पाप केलेले असो वा नसो, आपल्या दररोजच्या प्रार्थनेत पापांच्या क्षमेकरता विनंती करणे महत्त्वाचे आहे.—स्तोत्र १९:१२; ४०:१२.

८. क्षमेकरता प्रार्थना केल्यावर आपण काय करण्यास प्रवृत्त व्हायला हवे आणि यामुळे कोणता फायदेकारक परिणाम घडून येईल?

क्षमा मिळावी अशी प्रार्थना केल्यानंतर, ख्रिस्ताने सांडलेल्या रक्‍ताच्या उद्धार करण्याच्या शक्‍तीवर विश्‍वास ठेवून प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण, पश्‍चात्ताप व पापकबुली करणे आवश्‍यक आहे. (१ योहान १:७-९) आपली प्रार्थना मनःपूर्वक आहे हे शाबीत करण्यासाठी आपण क्षमेची विनंती करण्यासोबतच “पश्‍चात्तापास शोभतील अशी कृत्ये” केली पाहिजेत. (प्रेषितांची कृत्ये २६:२०) असे केल्यास यहोवा आपल्या पापांची क्षमा करण्यास तयार असेल असा विश्‍वास आपण बाळगू शकतो. (स्तोत्र ८६:५; १०३:८-१४) परिणामस्वरूप आपल्याला एक अनोखी मनःशांती प्राप्त होईल, म्हणजेच “सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती” मिळेल जी “[आपली] अंतःकरणे व [आपले] विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” (फिलिप्पैकर ४:७) पण पापांची क्षमा मिळवण्याकरता आपण आणखी काय केले पाहिजे याविषयी येशूच्या आदर्श प्रार्थनेतून आपण आणखी बरेच काही शिकू शकतो.

क्षमा मिळवण्याकरता, आपण क्षमा केली पाहिजे

९, १०. (अ) आदर्श प्रार्थनेनंतर येशूने पुढे कोणते स्पष्टीकरण दिले आणि यामुळे कोणत्या गोष्टीवर भर देण्यात आला? (ब) क्षमाशील असण्याच्या गरजेविषयी येशूने पुढे कशाप्रकारे स्पष्ट केले?

लक्ष देण्याजोगी गोष्ट म्हणजे आदर्श प्रार्थनेतील, “जसे आम्ही आपल्या ऋण्यांस ऋण सोडिले आहे तशी तू आमची ऋणे आम्हास सोड,” केवळ या विनंतीबद्दलच येशूने स्पष्टीकरण दिले. प्रार्थना संपवल्यावर त्याने पुढे म्हटले: “जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधाची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाहि क्षमा करील; परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताहि तुमच्या अपराधाची क्षमा करणार नाही.” (मत्तय ६:१४, १५) अशारितीने येशूने अगदी स्पष्ट केले की यहोवाकडून आपल्याला क्षमा मिळणे हे आपण इतरांना क्षमा करण्यास तयार आहोत किंवा नाही यावर अवलंबून आहे.—मार्क ११:२५.

१० यहोवाकडून क्षमेची अपेक्षा करताना आपणही इतरांना क्षमा करण्यास तयार असले पाहिजे हे दाखवण्याकरता दुसऱ्‍या एका प्रसंगी येशूने एक दाखला दिला. त्याने एका राजाची गोष्ट सांगितली. या राजाच्या एका दासावर फार मोठे ऋण होते, पण राजाने मोठ्या मनाने ते सोडले. पण याच दासाने आपल्या एका सोबत्याचे लहानसे ऋण सोडण्यास नकार दिला तेव्हा राजाने त्याला कडक शिक्षा केली. या दाखल्याच्या शेवटी येशूने म्हटले: “म्हणून जर तुम्ही प्रत्येक जण आपआपल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताहि त्याप्रमाणेच तुमचे करील.” (मत्तय १८:२३-३५) शिकावयाचा धडा अगदी स्पष्ट आहे: यहोवाने आपल्यापैकी प्रत्येकाच्या पापाचे जे ऋण सोडले आहे ते दुसऱ्‍या एखाद्या मनुष्याने आपल्याविरुद्ध केलेल्या चुकीपेक्षा अगणित पटीने मोठे आहे. शिवाय, यहोवा दररोज आपल्याला क्षमा करतो. तेव्हा इतरजण एखाद्या वेळी आपल्याविरुद्ध काही चूक करतात तेव्हा आपण नक्कीच त्यांना क्षमा केली पाहिजे.

११. यहोवाने आपल्याला क्षमा करावी अशी जर आपण अपेक्षा करत असू तर मग प्रेषित पौलाने दिलेल्या कोणत्या सल्ल्याचे आपण पालन करू आणि यामुळे कोणते चांगले परिणाम घडून येतील?

११ प्रेषित पौलाने लिहिले: “एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीहि एकमेकांना क्षमा करा.” (इफिसकर ४:३२) एकमेकांना क्षमा केल्यामुळे ख्रिस्ती बांधवांमध्ये शांती टिकून राहते. पौलाने पुढे असे आर्जवले: “तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहा, म्हणून करुणायुक्‍त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा; एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्‍हाणे असल्यास आपसात क्षमा करा; प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीहि करा. पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीति ती ह्‍या सर्वांवर धारण करा.” (कलस्सैकर ३:१२-१४) “जसे आम्ही आपल्या ऋण्यांस ऋण सोडिले आहे तशी तू आमची ऋणे आम्हास सोड,” ही येशूने शिकवलेली प्रार्थना वरील सर्वकाही सूचित करते.

मोहात पडल्यावर संरक्षण

१२, १३. (अ) आदर्श प्रार्थनेतील पुढच्या विनंतीचा काय अर्थ होऊ शकत नाही? (ब) मोठा भुलविणारा कोण आहे आणि परीक्षेत न आणण्याच्या प्रार्थनेचा काय अर्थ होतो?

१२ येशूच्या आदर्श प्रार्थनेतील पुढची विनंती ही आहे: “आम्हास परीक्षेत आणू नको.” (मत्तय ६:१३) यहोवाने आपल्याला परीक्षेत पाडू नये अशी विनंती करण्यास येशू सांगत होता का? असे असू शकत नाही कारण शिष्य याकोबाने देवप्रेरणेने असे लिहिले: “कोणाची परीक्षा होत असता, देवाने मला मोहात घातले असे त्याने म्हणू नये; कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडीत नाही.” (याकोब १:१३) शिवाय स्तोत्रकर्त्यानेही लिहिले: “हे परमेशा, तू अधर्म लक्षात आणिशील, तर हे प्रभू, तुझ्यापुढे कोण टिकाव धरील?” (स्तोत्र १३०:३) आपण केव्हा चूक करतो हे पाहण्यासाठी यहोवा टपून बसत नाही आणि मुद्दामहून आपल्याला खाली पाडण्याचा तर तो मुळीच प्रयत्न करत नाही. मग आदर्श प्रार्थनेतील या विनंतीचा काय अर्थ होतो?

१३ आपल्याला खाली पाडण्याचा, वेगवेगळे डावपेच रचून आपल्याला पाप करायला लावण्याचा इतकेच काय तर आपल्याला चक्क गिळंकृत करण्याचा प्रयत्न करणारा दियाबल सैतान आहे. (इफिसकर ६:११) तो मोठा भुलविणारा आहे. (१ थेस्सलनीकाकर ३:५) परीक्षेत न आणण्याची प्रार्थना करताना आपण यहोवाला अशी विनंती करतो की परीक्षाप्रसंगात आल्यावर त्याने आपल्याला पडू देऊ नये. आपण त्याला प्रार्थना करतो की आपल्यावर “सैतानाचे वर्चस्व” होऊ नये व आपण मोहांना बळी पडू नये म्हणून त्याने आपली मदत करावी. (२ करिंथकर २:११) आपल्याला “परात्पराच्या गुप्त स्थली” राहता यावे; म्हणजेच जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत यहोवाच्या सार्वभौमत्वाला मान देणाऱ्‍यांना यहोवा जे आध्यात्मिक संरक्षण पुरवतो ते आपल्याला मिळावे अशी आपण प्रार्थना करतो.—स्तोत्र ९१:१-३.

१४. परीक्षेत असताना आपण यहोवाकडे मदत मागितल्यास तो आपल्याला सोडून देणार नाही याविषयी प्रेषित पौल कशाप्रकारे आपल्याला आश्‍वासन देतो?

१४ आपण खात्री बाळगू शकतो की जर ही आपली मनस्वी इच्छा असेल आणि ती आपल्या प्रार्थनेतून व कृतींतून व्यक्‍त होत असेल, तर यहोवा कधीही आपल्याला सोडून देणार नाही. प्रेषित पौल आपल्याला आश्‍वासन देतो: “मनुष्याला सहन करिता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही; आणि देव विश्‍वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्‍तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायहि करील, ह्‍यासाठी की, तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे.”—१ करिंथकर १०:१३.

“आम्हास वाइटापासून सोडीव”

१५. वाइटापासून सोडवण्याची प्रार्थना करणे आज अधिकच महत्त्वपूर्ण का आहे?

१५ ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांच्या सर्वात विश्‍वसनीय हस्तलिपींत येशूच्या आदर्श प्रार्थनेचे शेवटले शब्द हे आहेत: “आम्हास वाइटापासून सोडीव.” * (मत्तय ६:१३) या अंतकाळात दियाबलापासून संरक्षण मिळणे अधिकच गरजेचे आहे. सैतान व त्याचे दुरात्मे, “देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयी साक्ष देणारे” अभिषिक्‍त शेषजन आणि ‘मोठ्या लोकसमुदायातील’ त्यांचे सोबती यांच्यासोबत लढाई करत आहेत. (प्रकटीकरण ७:९; १२:९, १७) प्रेषित पेत्राने ख्रिश्‍चनांना अशी आज्ञा केली: “सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रु सैतान हा गर्जणाऱ्‍या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो; त्याच्याविरुद्ध विश्‍वासात दृढ असे उभे राहा.” (१ पेत्र ५:८, ९) सैतान आपले साक्षकार्य थांबवू इच्छितो आणि पृथ्वीवरील आपल्या धार्मिक, व्यापारिक व राजकीय प्रतिनिधींच्या माध्यमाने तो आपल्याला घाबरविण्याचा प्रयत्न करतो. पण आपण दृढ राहिल्यास यहोवा आपल्याला सोडवील. शिष्य याकोबाने लिहिले: “देवाच्या अधीन व्हा; आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हांपासून पळून जाईल.”—याकोब ४:७.

१६. परीक्षेत असलेल्या आपल्या सेवकांना मदत करण्यासाठी यहोवा कोणाचा उपयोग करतो?

१६ यहोवाने आपल्या पुत्रावर परीक्षा येऊ दिल्या. पण येशूने देवाच्या वचनाच्या साहाय्याने सैतानाचा प्रतिकार केल्यावर यहोवाने त्याला बळ देण्याकरता आपल्या देवदूतांना पाठवले. (मत्तय ४:१-११) त्याचप्रकारे आपण विश्‍वासाने प्रार्थना करतो आणि यहोवाला आपला आसरा बनवतो तेव्हा तो आपल्याला मदत करण्याकरता त्याच्या देवदूतांचा उपयोग करतो. (स्तोत्र ३४:७; ९१:९-११) प्रेषित पेत्राने लिहिले: “भक्‍तिमान लोकांस परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान लोकांस शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते.”—२ पेत्र २:९.

कायमची सुटका जवळ आली आहे

१७. आदर्श प्रार्थनेत, येशूने वेगवेगळ्या गोष्टींचे योग्य स्थान आपल्याला कशाप्रकारे दाखवले?

१७ आदर्श प्रार्थनेत, येशूने वेगवेगळ्या गोष्टींचे योग्य स्थान दाखवले. सर्वप्रथम आपल्याला यहोवाच्या महान व पवित्र नावाच्या पवित्रीकरणाची काळजी असली पाहिजे. हे मशीही राज्याद्वारे साध्य केले जाईल; त्यामुळे आपण प्रार्थना करतो की हे राज्य यावे व त्याने सर्व अपरिपूर्ण मानवी राज्यांचा व सरकारांचा नाश करावा आणि स्वर्गात आहे त्याप्रमाणे पृथ्वीवरही देवाच्या इच्छेप्रमाणे घडवून आणावे. परादीस पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची आपली आशा, यहोवाच्या नावाच्या पवित्रीकरणावर आणि त्याच्या नीतिमान सार्वभौमत्वाचा सबंध विश्‍वात स्वीकार केला जाण्यावर अवलंबून आहे. या सर्वात महत्त्वाच्या गोष्टींबद्दल प्रार्थना केल्यानंतर आपण आपल्या दैनंदिन गरजांबद्दल, आपल्या पापांच्या क्षमेसाठी आणि परीक्षांपासून व वाईटापासून अर्थात, दियाबल सैतानाच्या डावपेचांपासून सोडवण्याबद्दल प्रार्थना करू शकतो.

१८, १९. येशूची आदर्श प्रार्थना आपल्याला जागृत राहण्यास आणि आपली आशा “शेवटपर्यंत दृढ” राखण्यास कशी मदत करते?

१८ वाइटापासून व त्याच्या भ्रष्ट व्यवस्थीकरणापासून आपली पूर्णपणे सुटका होण्याचा काळ जवळ येत आहे. सैतानाला पूर्ण कल्पना आहे की या पृथ्वीवर, खासकरून यहोवाच्या विश्‍वासू सेवकांवर ‘संताप’ व्यक्‍त करण्याकरता त्याच्याजवळ ‘थोडाच काळ’ उरला आहे. (प्रकटीकरण १२:१२, १७) ‘युगाच्या समाप्तीच्या’ संयुक्‍त चिन्हात येशूने अनेक रोमांचक घटनांविषयी भाकीत केले; यांपैकी काही भविष्यात घडणार आहेत. (मत्तय २४:३, २९-३१) या घटना घडताना आपण पाहू तेव्हा सुटकेची आपली आशा अधिकच उज्ज्वल होईल. येशूने म्हटले: “ह्‍या गोष्टींस आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा; कारण तुमचा मुक्‍तिसमय जवळ आला आहे.”—लूक २१:२५-२८.

१९ येशूने आपल्या शिष्यांना दिलेली ही संक्षिप्त प्रार्थना आपल्याला मार्गदर्शन पुरवते की शेवट जवळ येत असताना आपण आपल्या प्रार्थनांत कोणत्या गोष्टींचा समावेश करावा. आपण शेवटपर्यंत यहोवावर भरवसा ठेवू की तो आपल्या सर्व दैनंदिन गरजा—आध्यात्मिक व शारीरिक—सातत्याने पुरवील. प्रार्थनापूर्वक वृत्तीने सावध राहिल्यामुळे आपल्याला ‘आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरता’ येईल.—इब्री लोकांस ३:१४; १ पेत्र ४:७.

[तळटीप]

^ परि. 15 इंग्रजी भाषेतील किंग जेम्स व्हर्शन यांसारखी काही जुनी भाषांतरे प्रभूच्या प्रार्थनेच्या शेवटी देवाच्या स्तुतीकरता ही अभिव्यक्‍ती जोडतात: “राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्वकाळ तुझी आहेत; आमेन.” जेरोम बिब्लिकल कॉमेन्ट्री यात असे म्हटले आहे: “ही स्तुतीपर अभिव्यक्‍ती . . . बहुतेक विश्‍वासार्ह [हस्तलिपींत] आढळत नाही.”

उजळणी

• “रोजची भाकर” देण्याच्या विनंतीवरून कोणत्या गोष्टी सूचित होतात?

• “जसे आम्ही आपल्या ऋण्यांस ऋण सोडिले आहे तशी तू आमची ऋणे आम्हास सोड,” ही प्रार्थना समजावून सांगा.

• आम्हाला परीक्षेत आणू नकोस अशी विनंती आपण यहोवाला करतो तेव्हा तिचा काय अर्थ होतो?

• “आम्हास वाइटापासून सोडीव” अशी प्रार्थना करणे का गरजेचे आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्रे]

आपल्याला क्षमा मिळावी म्हणून आधी आपण इतरांना क्षमा केली पाहिजे

[१३ पानांवरील चित्राचे श्रेय]

Lydekker