वाचकांचे प्रश्न
वाचकांचे प्रश्न
जलप्रलयानंतर नोहाने कबुतराला तारवातून बाहेर सोडले तेव्हा त्या कबुतराने आपल्या चोचीत ‘जैतुनाच्या झाडाचे पान’ आणले. त्या कबुतराला हे पान कुठे मिळाले?
बायबलमध्ये म्हटले आहे, की “पृथ्वीवर पाण्याचा अतिशय जोर झाला व त्याने सगळ्या आकाशाखालचे सर्व उंच पर्वत बुडविले.” (उत्पत्ति ७:१९) प्रलयाचे पाणी ओसरू लागल्यावर नोहाने एकेका आठवड्याच्या अंतराने तीन वेळा एका कबुतराला बाहेर पाठवले. दुसऱ्यांदा जेव्हा नोहाने कबुतराला बाहेर पाठवले तेव्हा ते “कबुतर त्याजकडे आले, तो त्याच्या चोचीत जैतून झाडाचे नुकतेच खुडलेले पान आहे असे त्याला दिसले, नोहा त्यावरून समजला की आता पृथ्वीवरचे पाणी आटले आहे.”—उत्पत्ति ८:८-११.
अर्थात, पृथ्वीवरला एक अमुक भाग पाण्याखाली किती वेळ होता हे कळण्याचा मार्ग आता नाही. कारण, जलप्रलयामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागात बरेच बदल घडून आले यात काही शंका नाही. परंतु, पुष्कळ झाडे नष्ट झाली याचा अर्थ बहुतेक भाग पाण्याखाली असावा. तरीपण हे स्पष्ट होते, की काही झाडे जगली कारण, पाणी ओसरल्यानंतर या झाडांना नवीन पालवी फुटली.
जैतुनाच्या झाडांविषयी द न्यू बायबल डिक्शनरी म्हणते: “जैतुनाचे झाड छाटल्यास त्याच्या मुळांपासून नवीन पालवी फुटते; एका वेळी चार पाच नवीन खोड फुटू शकतात. मरायला टेकलेली जैतुनाची झाडे सहसा अशीच पुन्हा उगवतात.” असे दिसते, की “या झाडांमधील जगण्याची कुवत कधीच नाहिशी होत नाही,” असे द न्यू शाफ-हर्टसोक एन्सायक्लोपिडिआ ऑफ रिलिजियस नॉलेज म्हणतो. जलप्रलयाच्या पाण्याची क्षारता व तापमान यांविषयीची सविस्तर माहिती आज कोणाही मानवाला माहीत नाही. त्यामुळे, जैतुनाच्या झाडांवर व इतर वनस्पतींवर त्यांचा काय परिणाम झाला असावा यांबद्दल आपण खात्रीने काही सांगू शकत नाही.
परंतु, जंगली जैतुनाचे झाड उंच डोंगरांवरील थंड तापमानात जगू शकत नाही. ते सहसा, ३,००० फूटांपेक्षा कमी उंचीवर ५० डिग्री फॅरेनहाईटपेक्षा अधिक सरासरी तापमान असलेल्या भागांत वाढते. “म्हणूनच, नुकत्याच तोडून आणलेल्या पानावरून नोहाने असा निष्कर्ष काढला, की खालच्या खोऱ्यांतले पाणी ओसरत चालले आहे,” असे द फ्लड रिकन्सिडर्ड या पुस्तकात म्हटले आहे. एका आठवड्यानंतर नोहाने जेव्हा पुन्हा एकदा कबुतराला बाहेर सोडले तेव्हा ते परतले नाही; यावरून असे सूचित झाले असावे, की भरपूर वनस्पती उगवली असावी आणि कबुतराला कदाचित राहण्यासाठी जागा मिळाली असावी.—उत्पत्ति ८:१२.