तुम्ही देवाचे मन आनंदित करू शकता
तुम्ही देवाचे मन आनंदित करू शकता
आपल्या कार्यांमुळे देव आनंदी किंवा दुःखी होऊ शकतो का? देवाला आनंद वाटू शकतो का? काहींना वाटते की देव केवळ एक शक्ती आहे. व्यक्तिभावरहित शक्ती आनंदित होण्याची आपण कधी अपेक्षा करू शकतो का? कधीच नाही. परंतु, बायबलमध्ये देवाविषयी काय सांगितले आहे ते पाहा.
येशू ख्रिस्त म्हणाला, “देव आत्मा आहे.” (योहान ४:२४) आत्मा एक प्रकारचे जीवन असून ते मानवांपेक्षा वेगळे असते. मानवी दृष्टीला आत्मा दिसत नसला तरी त्याचे एक शरीर असते—“आध्यात्मिक शरीर.” (१ करिंथकर १५:४४; योहान १:१८) बायबलमध्ये रूपकाचा उपयोग करून देवाला डोळे, कान, हात वगैरे असल्याचेही सांगितले आहे. * देवाला एक नाव देखील आहे—ते आहे यहोवा. (स्तोत्र ८३:१८, पं.र.भा.) तेव्हा, बायबलमध्ये सांगितलेला देव एक आत्मिक व्यक्ती आहे. (इब्री लोकांस ९:२४) “तो जिवंत देव, सनातन राजा आहे.”—यिर्मया १०:१०.
एक जिवंत व्यक्ती या नात्याने, यहोवा विचार करू शकतो आणि कार्य करू शकतो. त्याला गुण आहेत, भावना आहेत, आवडीनिवडी आहेत. इतकेच नव्हे तर, बायबलमध्ये पुष्कळशा गोष्टी दिल्या आहेत ज्यांमधून त्याची पसंत-नापसंत स्पष्ट होते. मानवांनी बनवलेले देव केवळ आपल्या मानवी निर्मात्यांचे गुण किंवा वैशिष्ट्ये दाखवत असतात परंतु सर्वशक्तिमान देव, यहोवा, मानवांमध्ये त्याने निर्माण केलेल्या भावनांचा स्वतः उगम आहे.—उत्पत्ति १:२७; यशया ४४:७-११.
यहोवा ‘आनंदी देव’ आहे यात शंका नाही. (१ तीमथ्य १:११, NW) त्याला केवळ आपल्या निर्मिती कार्यांबद्दल आनंद वाटत नाही तर आपला उद्देश पूर्ण करण्यातही त्याला आनंद वाटतो. संदेष्टा यशयाद्वारे यहोवा घोषित करतो: “माझा मनोरथ मी पूर्ण करीन . . . मी बोलतो तसे घडवूनहि आणितो, मी योजितो ते शेवटास नेतो.” (यशया ४६:९-११) स्तोत्रकर्त्याने गायिले: “परमेश्वराला आपल्या कृतीपासून आनंद होवो!” (स्तोत्र १०४:३१) पण यहोवाला आणखी एका गोष्टीमुळे आनंद मिळतो. तो म्हणतो: “माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर.” (नीतिसूत्रे २७:११) याचा काय अर्थ होतो त्याचा विचार करा: आपण देवाला आनंदित करू शकतो!
आपण देवाचे मन कसे आनंदित करू शकतो
कुटुंबप्रमुख नोहा याने यहोवाचे मन कसे आनंदित केले ते पाहा. “नोहावर परमेश्वराची कृपादृष्टि” झाली कारण तो “आपल्या काळच्या लोकांमध्ये . . . सात्विक मनुष्य होता.” त्या काळातील दुष्ट लोकांच्या एकदम उलट, नोहाचा विश्वास आणि त्याची आज्ञाधारकता देवाला इतकी प्रसन्न करणारी होती की असे म्हणता येऊ शकत होते की, “नोहा देवाबरोबर चालला.” (उत्पत्ति ६:६, ८, ९, २२) “आदरयुक्त भयाने [नोहाने] आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले.” (इब्री लोकांस ११:७) यहोवा नोहावर संतुष्ट होता म्हणून त्या काळच्या क्लेशदायक मानवी इतिहासातून त्याने त्याला व त्याच्या कुटुंबाला वाचवून आशीर्वादित केले.
कुलपिता अब्राहाम यालाही यहोवाच्या भावनांची फार जाणीव होती. सदोम आणि गमोराच्या नीतिभ्रष्टतेमुळे ती नगरे नष्ट केली जातील असे यहोवाने त्याला सांगितले त्या वेळी देवाच्या विचारपद्धतीविषयी त्याला किती गहिरी समज होती हे स्पष्ट झाले. अब्राहाम यहोवाला चांगला ओळखत होता म्हणूनच तो असे म्हणाला की, देव दुष्टासोबत नीतिमानाला कधीही ठार मारणार नाही. (उत्पत्ति १८:१७-३३) कित्येक वर्षांनी, देवाच्या मार्गदर्शनानुसार, अब्राहामाने “इसहाकाचे अर्पण केले” कारण त्याला “मेलेल्यांतून देखील उठवावयास देव समर्थ आहे हे त्याने मानले.” (इब्री लोकांस ११:१७-३३; उत्पत्ति २२:१-१८) अब्राहामाला देवाच्या भावना इतक्या चटकन कळत होत्या आणि त्याने इतका मजबूत विश्वास व आज्ञाधारकता प्रदर्शित केली की, “त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले.”—याकोब २:२३.
प्राचीन इस्राएलच्या राजा दावीदाने देखील देवाचे मन आनंदित करण्याचा प्रयत्न केला. त्याच्याविषयी यहोवा म्हणाला: “दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे, तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल.” (प्रेषितांची कृत्ये १३:२२) धिप्पाड गल्याथाचा सामना करण्याआधी, दावीदाने देवावर पूर्ण भरवसा ठेवला आणि इस्राएलच्या राजा शौलाला तो म्हणाला: “ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडविले तोच मला ह्या पलिष्ट्यांच्या हातातून सोडवील.” दावीदाने यहोवावर भरवसा ठेवल्यामुळे यहोवाने त्याला आशीर्वादित केले आणि त्यास गल्याथाचा वध करण्यास समर्थ केले. (१ शमुवेल १७:३७, ४५-५४) दावीदाची कार्येच नव्हे तर ‘त्याच्या तोंडचे शब्द व त्याच्या मनचे विचारही यहोवाला मान्य असावेत’ असे त्याला वाटत होते.—स्तोत्र १९:१४.
आपल्याबद्दल काय? आपण यहोवाला कसे संतुष्ट करू शकतो? यहोवाच्या भावनांची आपल्याला जितकी अधिक जाणीव असेल तितकेच देवाचे मन आनंदित करण्याबद्दल आपण दक्ष असू. आपण बायबल वाचतो तेव्हा देवाच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे म्हणजे “आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी ह्यांच्याद्वारे [आपण] त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे; अशा हेतूने की, [आपण] सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे.” (कलस्सैकर १:९, १०) ज्ञान मिळवले तर मग विश्वास मजबूत करायला मदत होते. हे आवश्यक आहे कारण “विश्वासावाचून [देवाला] संतोषविणे अशक्य आहे.” (इब्री लोकांस ११:६) होय, विश्वास मजबूत करण्याचा प्रयत्न करण्याद्वारे आणि यहोवाच्या इच्छेनुसार जीवन जगण्याद्वारे आपण त्याचे मन आनंदित करू शकतो. त्याच वेळी, आपण यहोवाचे मन दुखवू नये याची काळजी घ्यावी.
देवाचे मन दुखवू नका
नोहाच्या दिवसांसंबंधीच्या अहवालात यहोवाच्या भावना कशा दुखवल्या जाऊ शकतात याचे उदाहरण पाहायला मिळते. त्या वेळी, पृथ्वी “जाचजुलमांनी भरली होती. देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तो पाहा, ती भ्रष्ट होती; कारण पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांनी आपली चालचलणूक बिघडविली होती.” देवाने या भ्रष्टतेचे व हिंसेचे अवलोकन केले तेव्हा त्याला काय वाटले? बायबलमध्ये म्हटले आहे की, “मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला.” (उत्पत्ति ६:५, ६, ११, १२) परमेश्वराला अनुताप झाला कारण मानवांचे वर्तन इतके दुष्ट झाले होते की, प्रलयापूर्वीच्या दुष्ट पिढीविषयी त्याची मनोवृत्ती बदलली. त्यांच्या दुष्टाईने असंतुष्ट झाल्यामुळे देवाची मनोवृत्ती बदलली आणि तो मानवांच्या निर्माणकर्त्यापासून त्यांचा विनाशकर्ता बनला.
यहोवाच्या स्वतःच्या लोकांनी अर्थात प्राचीन इस्राएल राष्ट्राने त्याच्या भावनांची आणि त्याच्या प्रेमळ स्तोत्र ७८:३८-४१) बंडखोर इस्राएलांना स्वतःच्याच पापांचे परिणाम भोगावे लागले तेव्हा देखील बायबलमध्ये म्हटले आहे की, “त्यांच्या सर्व दुःखाने [देव] दुःखी झाला.”—यशया ६३:९.
मार्गदर्शनाची वारंवार कदर केली नाही तेव्हा देखील यहोवाचे मन दुखावले. स्तोत्रकर्त्याने अशाप्रकारे खेद व्यक्त केला: “किती वेळा तरी त्यांनी रानात त्याच्याविरुद्ध बंडाळी केली! किती वेळा तरी त्यांनी अरण्यात त्याला दु:ख दिले! पुन्हा पुन्हा त्यांनी देवाची परीक्षा पाहिली, व इस्राएलाच्या पवित्र प्रभूस चिडविले.” तरीही, ‘तो कनवाळू असल्यामुळे त्यांच्या अपराधाची क्षमा करीत असे आणि त्याने त्यांचा नाश केला नाही. त्याने आपला कोप वारंवार आवरला, आपला सगळा संताप भडकू दिला नाही.’ (देवाने इस्राएलींविषयी त्याला अतीव प्रेम असल्याचा कितीतरी पुरावा देऊनही ते “देवाच्या दूतांची टेर उडवून त्यांची वचने तुच्छ मानीत व त्यांच्या संदेष्ट्यांची निर्भर्त्सना करीत; शेवटी परमेश्वराचा कोप त्याच्या लोकांवर भडकला व त्यांचा बचाव करण्याचा काही उपाय राहिला नाही.” (२ इतिहास ३६:१६) शेवटी, त्यांच्या अशा हेकेखोरपणाने यहोवाच्या “पवित्र आत्म्यास [इतपत] खिन्न केले” की ते त्याच्या नजरेतून उतरले. (यशया ६३:१०) परिणाम? यहोवाने उचितपणे आपले संरक्षण त्यांच्यावरून काढून घेतले आणि बॅबिलोनी लोकांनी यहुदावर कब्जा केला व जेरूसलेमचा नाश केला तेव्हा त्यांच्यावर संकट कोसळले. (२ इतिहास ३६:१७-२१) निर्माणकर्त्याला वीट आणणाऱ्या आणि दुःखी करणाऱ्या पापी मार्गावर चालण्यास लोक निवडतात ही किती दुःखाची गोष्ट!
अधार्मिक वर्तनाने देवाचे मन दुखावते हे बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे. (स्तोत्र ७८:४१) देवाला नापसंत असलेल्या, इतकेच नव्हे तर घृणास्पद असलेल्या गोष्टी म्हणजे गर्विष्ठ असणे, लबाड बोलणे, हत्या करणे, जादूटोणा करणे, भविष्यकथन, पूर्वजांची उपासना, अनैतिक चालचलन, समलैंगिकता, विवाहबाह्य संबंध, गोत्रगमन आणि गरिबांची पिळवणूक.—लेवीय १८:९-२९; १९:२९; अनुवाद १८:९-१२; नीतिसूत्रे ६:१६-१९; यिर्मया ७:५-७; मलाखी २:१४-१६.
यहोवाला मूर्तिपूजेबद्दल काय वाटते? निर्गम २०:४, ५ येथे म्हटले आहे: “आपल्यासाठी कोरीव मूर्ति करू नको; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीहि प्रतिमा करू नको. त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करू नको.” का? कारण ‘यहोवाला मूर्तीचा वीट आहे.’ (अनुवाद ७:२५, २६) प्रेषित योहानाने असा इशारा दिला: “मुलांनो, तुम्ही स्वतःस मूर्तींपासून दूर राखा.” (१ योहान ५:२१) शिवाय प्रेषित पौलाने असे लिहिले: “माझ्या प्रिय बंधूनो, तुम्ही मूर्तिपूजेपासून दूर पळा.”—१ करिंथकर १०:१४.
देवाची कृपापसंती मिळवा
“सरळांबरोबर [देवाचे] रहस्य आहे.” “ज्यांचा मार्ग सात्विकतेचा आहे त्याबद्दल त्यास आनंद वाटतो.” (नीतिसूत्रे ३:३२; ११:२०) याच्या उलट, देवाच्या सात्विक भावनांकडे हेकेखोरपणे दुर्लक्ष करत राहून किंवा कदर नसल्याचे उघडउघड दाखवून देवाचे मन दुःखी करणारे लोक लवकरच त्याच्या नजरेतून उतरतील. (२ थेस्सलनीकाकर १:६-१०) आज सर्वत्र दिसणाऱ्या दुष्टाईचा तो निश्चितच लवकरात लवकर अंत करील.—स्तोत्र ३७:९-११; सफन्या २:२, ३.
बायबल असे स्पष्ट सांगते की, “कोणाचा नाश व्हावा अशी [यहोवाची] इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे.” (२ पेत्र ३:९) जे सुधारण्यापलीकडे आहेत अशांबद्दल नापसंती व्यक्त करण्याऐवजी नीतिमान लोकांबद्दल प्रेम व्यक्त करण्यास त्याला अधिक आवडेल. यहोवाला “कोणी दुर्जन मरावा यात . . . नाही तर त्याने आपल्या मार्गावरून मागे फिरून जगावे यात” संतोष आहे.—यहेज्केल ३३:११.
याकोब ५:११) देवाच्या भावनांमध्ये पूर्ण भरवसा ठेवून “त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो.” (१ पेत्र ५:७) देवाचे मन आनंदित करणाऱ्यांना त्याची पसंती आणि मैत्री अनुभवण्याची अद्भुत आशा आहे ही शाश्वती तुम्ही बाळगू शकता. म्हणूनच, “प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत” राहणे आता पूर्वीपेक्षा निकडीचे बनले आहे.—इफिसकर ५:१०.
म्हणजे यहोवाच्या क्रोधाचे लक्ष्य बनण्याची कोणाला गरज नाही. यहोवा “फार कनवाळू व दयाळू आहे.” (देवाने आपल्या अपात्र कृपेमुळे आपले भव्य गुण आणि भावना व्यक्त केल्या आहेत ही किती अद्भुत गोष्ट! शिवाय, त्याचे मन आनंदित करणे हे तुमच्या हातात आहे. असे करण्याची तुमची इच्छा असल्यास, तुमच्या परिसरातील यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधण्यास आम्ही तुम्हाला उत्तेजन देतो. देवाला संतुष्ट करण्याच्या त्यांच्या प्रयत्नात त्यांना कोणती गोष्ट व्यावहारिक आणि साध्य करण्यालायक वाटली आहे हे तुम्हाला ते आनंदाने दाखवतील.
[तळटीप]
^ परि. 3 “बायबल देवाचे वर्णन मानवी शब्दांत का करते?” ही पेटी पाहा.
[७ पानांवरील चौकट]
बायबल देवाचे वर्णन मानवी शब्दात का करते?
“देव आत्मा” असल्यामुळे आपण आपल्या डोळ्यांनी त्याला पाहू शकत नाही. (योहान ४:२४) त्यामुळे देवाची शक्ती, त्याचे ऐश्वर्य आणि त्याच्या कार्यहालचाली आपल्याला समजाव्यात म्हणून बायबलमध्ये उपमा, रूपक आणि मानवी स्वभाव देऊन अलंकारिक भाषेचा उपयोग करण्यात आला आहे. यास्तव, देवाचे आत्मिक शरीर कसे दिसते हे आपल्याला ठाऊक नसले तरी बायबलमध्ये देवाला डोळे, कान, हात, बाहू, बोटे, पाय आणि मन असल्याचे सांगितले आहे.—उत्पत्ति ८:२१; निर्गम ३:२०; ३१:१८; ईयोब ४०:९; स्तोत्र १८:९; ३४:१५.
अशा वर्णनात्मक भाषेचा अर्थ, देवाच्या आत्मिक शरीरालाही मानवी शरीराप्रमाणे अंग आहेत असा होत नाही. मानवी स्वभावाचे रूपक अक्षरशः अर्थाने घेतले जाऊ नये. त्यांनी केवळ देवाविषयी मानवांना अधिक चांगली समज मिळायला मदत होते. अशा अलंकारिक भाषेविना, क्षुद्र मानवांना देवाचे कोणतेही वर्णन समजून घेणे कठीण, नव्हे अशक्य झाले असते. परंतु याचा अर्थ, यहोवा देवाचे व्यक्तित्व मानवनिर्मित आहे असा होत नाही. बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, मनुष्याला देवाच्या प्रतिरूपात निर्माण केले होते; देवाला मनुष्याच्या प्रतिरूपात नव्हे. (उत्पत्ति १:२७) बायबलचे लेखक “परमेश्वरप्रेरित” होते म्हणून देवाच्या व्यक्तिमत्त्वाविषयी त्यांनी दिलेले वर्णन हे खरे पाहता देवाच्या व्यक्तिगत गुणांविषयीचे त्याचे स्वतःचेच वर्णन आहे; आणि हेच गुण त्याने आपल्या मानवी निर्मितीत विविध प्रमाणात घातले आहेत. (२ तीमथ्य ३:१६, १७) यास्तव, देवाला मनुष्यांचे गुण देण्याऐवजी देवाचे गुण खरेतर मानवांत आहेत.
[४ पानांवरील चित्र]
नोहाला देवाची कृपापसंती लाभली
[५ पानांवरील चित्र]
अब्राहामाला देवाच्या भावनांची जाणीव होती
[६ पानांवरील चित्र]
दावीदाने आपला पूर्ण भरवसा यहोवावर ठेवला
[७ पानांवरील चित्र]
तुम्ही बायबल वाचाल तसे देवाचे मन आनंदित करायला शिकू शकाल
[४ पानांवरील चित्राचे श्रेय]
Courtesy of Anglo-Australian Observatory, photograph by David Malin