वाचकांचे प्रश्न
वाचकांचे प्रश्न
यहोवाचा विश्वासू सेवक दावीद याने आपली पत्नी मिखल हिला १ शमुवेल १९:१२, १३ मध्ये म्हटल्याप्रमाणे तेराफीम (गृहदेवतेची) मूर्ती, किंवा प्रतिमा बाळगण्यास परवानगी का दिली?
पहिल्यांदा आपण या वचनाच्या संदर्भाचा थोडक्यात विचार करू. दावीदाला ठार मारण्याचा राजा शौलाने कट रचला आहे ही बातमी जेव्हा दावीदाच्या पत्नीपर्यंत पोहंचली तेव्हा तिने लगेच प्रतिक्रिया दाखवली. बायबल म्हणते: “मिखलेने खिडकीतून दाविदास उतरविले, व तो पळून जाऊन निभावला. मिखलने तेराफीम (गृहदेवता) घेऊन ती पलंगावर निजवली व तिच्या डोक्याखाली बकरीच्या केसांची उशी ठेवून ती वस्त्राने झाकिली.” शौलाचा जासूद दावीदाला पकडण्यासाठी आला तेव्हा मिखलने त्याला सांगितले: “तो आजारी आहे.” मिखलच्या या युक्तीमुळे दावीदाला वेळ मिळाला आणि त्याला पळून जाण्यात यश मिळाले.—१ शमुवेल १९:११-१६.
उत्खननात मिळालेल्या वस्तूंवरून हे सूचित होते, की प्राचीन काळी तेराफीमच्या मूर्ती केवळ धार्मिक कारणांसाठीच नव्हे तर कायदेशीर उद्देशास्तव देखील ठेवल्या जात असत. आज जसे मालकी हक्क सिद्ध करणारे दस्तऐवज व लेखी इच्छापत्र वारसा हक्क ठरवू शकतात तसेच त्या काळी तेराफीम मूर्तींवरून ठरवले जात. स्पष्टपणे, विशिष्ट परिस्थितीत तेराफीमची मूर्ती बाळगल्यामुळे एखाद्या जावयाला त्याच्या मृत सासऱ्याच्या इस्टेटीचा कायदेशीर हक्क दाखवता येऊ शकत होता. यावरून, आपल्याला हे समजायला मदत होते, की एकदा, राहेलने आपल्या पित्याच्या तेराफीमच्या मूर्ती का घेतल्या होत्या आणि तिचा बाप त्या पुन्हा मिळवण्यास इतका उत्सुक का होता. त्या प्रसंगी, राहेलचा नवरा याकोब याला आपल्या पत्नीने काय केले होते हे माहीत नव्हते.—उत्पत्ति ३१:१४-३४.
इस्राएलांचे एक राष्ट्र बनले तेव्हा त्यांना दहा आज्ञा देण्यात आल्या आणि यांतील दुसरी आज्ञा स्पष्टपणे, प्रतिमा न करण्यास बजावते. (निर्गम २०:४, ५) नंतर, संदेष्टा शमुवेल याने राजा शौलाशी बोलताना या नियमशास्त्राचा अप्रत्यक्ष उल्लेख केला. तो म्हणाला: “अवज्ञा जादुगिरीच्या पातकासमान आहे, आणि हट्ट हा मूर्तिपूजा व कुलदेवतार्चन [“तेराफीम,” NW] यासारखा आहे.” (१ शमुवेल १५:२३) या कारणास्तव तेराफीम प्रतिमा इस्राएलमध्ये वारसाहक्कासाठी नव्हत्या. तरीपण, असे दिसते की हा प्राचीन यहुदी अंधश्रद्धेचा प्रकार काही इस्राएली घरांत चालत आला असावा. (शास्ते १७:५, ६; २ राजे २३:२४) मिखलने आपल्या संपत्तीबरोबर तेराफीमच्या प्रतिमा ठेवल्या होत्या यावरून तिचे मन पूर्णपणे यहोवाच्या बाजूने नव्हते हे सूचित होते. दावीदाला कदाचित या तेराफीम प्रतिमेविषयी काही माहीत नसावे किंवा ती राजा शौलाची मुलगी असल्यामुळे त्याने कदाचित तिला ती बाळगू दिली असावी.
यहोवाला एकमात्र भक्ती देण्याविषयी दावीदाचा दृष्टिकोन पुढील शब्दांवरून स्पष्ट होतो: “परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे; सर्व दैवताहून त्याचेच भय धरणे योग्य आहे. कारण राष्ट्रांची सर्व दैवते निरुपयोगी आहेत; परमेश्वर आकाशाचा निर्माणकर्ता आहे.”—१ इतिहास १६:२५, २६.
[२९ पानांवरील चित्र]
दहा आज्ञांतील दुसऱ्या आज्ञेने, चित्रात दाखवलेल्या तेराफीम प्रतिमेसारख्या मूर्ती बनवण्यास मनाई केली
[चित्राचे श्रेय]
The Holy Land, Vol. II, १८५९ या पुस्तकामधून