जिवंत देवाचे मार्गदर्शन स्वीकारणे
जिवंत देवाचे मार्गदर्शन स्वीकारणे
“ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील अवघे निर्माण केले त्या जिवंत देवाकडे वळावे.”—प्रेषितांची कृत्ये १४:१५.
१, २. यहोवाला “जिवंत देव” म्हणून ओळखणे योग्य का आहे?
प्रेषित पौल व बर्णबा यांनी एका माणसाला बरे केल्यानंतर लुस्त्र येथे ती घटना पाहण्यास जमलेल्या लोकांना पौलाने असे आश्वासन दिले: “आम्ही व तुम्ही समभावनेची माणसे आहोत; तुम्ही ह्या निरर्थक गोष्टी सोडून ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील अवघे निर्माण केले त्या जिवंत देवाकडे वळावे अशी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगतो.”—प्रेषितांची कृत्ये १४:१५.
२ यहोवा एक निर्जीव मूर्ती नसून “जिवंत देव” आहे या गोष्टीत खरोखर किती सत्य आहे! (यिर्मया १०:१०; १ थेस्सलनीकाकर १:९, १०) स्वतः जिवंत असण्यासोबतच, यहोवा आपल्याही जीवनाचा उगम आहे. “जीवन, प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो.” (प्रेषितांची कृत्ये १७:२५) आपण सध्याच्याच नव्हे तर भविष्यातील जीवनाचाही आनंद लुटावा अशी त्याची इच्छा आहे. पौलाने पुढे म्हटले की देवाने “स्वतःस साक्षीविरहित राहू दिले नाही, म्हणजे त्याने उपकार केले, आकाशापासून पर्जन्य व फलदायक ऋतु तुम्हाला दिले, आणि अन्नाने व हर्षाने तुम्हाला मन भरून तृप्त केले.”—प्रेषितांची कृत्ये १४:१७.
३. देवाने पुरवलेल्या मार्गदर्शनावर आपण भरवसा का ठेवू शकतो?
३ देवाला आपल्या जीवनाविषयी आस्था आहे, त्यामुळे आपण त्याच्या मार्गदर्शनावर भरवसा ठेवू शकतो. (स्तोत्र १४७:८; मत्तय ५:४५) काहीजणांना बायबलमधील एखादी आज्ञा समजण्यास कठीण वाटली किंवा त्यांना ती फारच सक्तीची वाटली तर ते देवाचे मार्गदर्शन स्वीकारत नाहीत. तरीपण, यहोवाच्या मार्गदर्शनाचा स्वीकार करण्यातच शहाणपण आहे हे सिद्ध झाले आहे. उदाहरणार्थ: इस्राएलीयांच्या काळात एखाद्या व्यक्तीला मृत देहाला स्पर्श न करण्याविषयीचा नियम समजला नाही तरीसुद्धा त्याचे पालन करणे तिच्याच हिताचे होते. पहिली गोष्ट म्हणजे या आज्ञेचे पालन करण्याद्वारे ती व्यक्ती जिवंत देवाच्या अधिक जवळ येऊ शकत होती आणि दुसरा फायदा म्हणजे अनेक रोगांपासून तिचे रक्षण होऊ शकत होते.—लेवीय ५:२; ११:२४.
४, ५. (अ) ख्रिस्ती युगाआधी रक्ताविषयी यहोवाने कोणते मार्गदर्शन दिले होते? (ब) देवाने रक्ताविषयी दिलेले मार्गदर्शन ख्रिस्ती लोकांनाही लागू होते हे आपल्याला कसे कळते?
४ रक्ताविषयी देवाने दिलेल्या मार्गदर्शनाबद्दलही हेच म्हणता येते. देवाने नोहाला सांगितले की मानवांनी रक्त सेवन करू नये. त्यानंतर नियमशास्त्रात देवाने दाखवले की रक्ताचा एकच उचित उपयोग म्हणजे वेदीवर—पापांच्या क्षमेसाठी होता. या आज्ञा देण्याद्वारे देव खरे तर रक्ताचा एका परम श्रेष्ठ मार्गाने उपयोग करण्याकरता—अर्थात येशूच्या खंडणीद्वारे अनेकांच्या जिवांचे तारण करण्याकरता पार्श्वभूमी तयार करत होता. (इब्री लोकांस ९:१४) होय, देवाने आपल्या जीवनाचा व हिताचा विचार करूनच हे मार्गदर्शन पुरवले होते. उत्पत्ति ९:४ या वचनाविषयी चर्चा करताना १९ व्या शतकातील बायबल विद्वान ॲडम क्लार्क यांनी असे लिहिले: “[नोहाला] दिलेली ही आज्ञा आजही पौर्वात्य देशांतील ख्रिस्ती काटेकोरपणे पाळतात. . . . नियमशास्त्राधीन रक्त पूर्णतः वर्ज्य होते कारण, जगाच्या पापांकरता जे रक्त सांडले जाणार होते, त्याकडे ते संकेत करत होते; आणि शुभवर्तमानाच्या व्यवस्थेखाली देखील ते सेवन करण्यास मनाई आहे कारण पापांच्या निर्मूलनाकरता जे रक्त सांडण्यात आले आहे त्याचे प्रतीक म्हणून सदैव त्याकडे पाहणे आवश्यक आहे.”
५ हे विद्वान कदाचित येशूशी संबंधित असलेल्या मूलभूत शुभवर्तमानाविषयी बोलत असावेत. हे शुभवर्तमान असे की देवाने आपल्या पुत्राला आपल्याकरता प्राण देण्यासाठी, त्याचे रक्त सांडण्यासाठी पाठवले जेणेकरून आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावे. (मत्तय २०:२८; योहान ३:१६; रोमकर ५:८, ९) त्यांच्या विधानात ख्रिस्ताच्या अनुयायांनी रक्तापासून दूर राहावे या नंतर देण्यात आलेल्या आज्ञेचाही समावेश होता.
६. रक्तासंबंधी ख्रिश्चनांना कोणत्या सूचना देण्यात आल्या आणि का?
६ देवाने इस्राएल लोकांना शेकडो नियम दिले होते ते तुम्हाला माहीत आहे. येशूचा मृत्यू झाल्यानंतर मात्र त्याच्या शिष्यांवर या नियमांचे पालन करण्याचे बंधन उरले नाही. (रोमकर ७:४, ६; कलस्सैकर २:१३, १४, १७; इब्री लोकांस ८:६, १३) पण कालांतराने एका मूलभूत नियमासंबंधी—पुरुषांच्या सुंतेविषयी प्रश्न उपस्थित झाला. ख्रिस्ताच्या रक्तापासून फायदा मिळवू इच्छिणाऱ्या गैरयहुदी व्यक्तींना सुंता करण्याद्वारे, आपण अजूनही नियमशास्त्राधीन आहोत हे दाखवणे आवश्यक होते का? सा.यु. ४९ साली ख्रिस्ती नियमन मंडळाने हा प्रश्न हाताळला. (प्रेषितांची कृत्ये, अध्याय १५) देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने प्रेषित व वडील जन अशा निष्कर्षावर आले की सुंतेविषयीची आज्ञा नियमशास्त्रासोबतच संपुष्टात आली होती. तरीसुद्धा त्यांनी ठरवले की काही ईश्वरी आज्ञा अद्यापही ख्रिश्चनांकरता बंधनकारक होत्या. मंडळ्यांना पाठवलेल्या पत्रात नियमन मंडळाने असे लिहिले: “पुढे दिलेल्या जरूरीच्या गोष्टींशिवाय तुम्हावर जास्त ओझे लादू नये असे पवित्र आत्म्याला व आम्हाला योग्य वाटले; त्या म्हणजे मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी व जारकर्म ही तुम्ही वर्ज्य करावी; ह्यांपासून स्वतःला जपाल तर तुमचे हित होईल.”—प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९.
७. ख्रिश्चनांनी ‘रक्त वर्ज्य करावे’ हे किती महत्त्वाचे आहे?
७ नियमन मंडळाच्या लेखी ‘रक्त वर्ज्य करणे’ हे लैंगिक अनैतिकता किंवा मूर्तिपूजेपासून दूर राहण्याइतकेच महत्त्वाचे होते. यावरून दिसून येते, की रक्ताविषयीचा निर्बंध अतिशय गंभीरतेने घेण्याजोगा आहे. जे ख्रिस्ती मूर्तिपूजा किंवा लैंगिक अनैतिकता यांसारख्या गोष्टींत भाग घेतात व पश्चात्ताप दाखवत नाहीत, अशांना “देवाच्या राज्याचे वतन” मिळणार नाही; “ह्यांच्या वाट्यास . . . दुसरे मरण आहे.” (१ करिंथकर ६:९, १०; प्रकटीकरण २१:८; २२:१५) येथील विरोधाभास लक्षात घ्या: रक्ताच्या पवित्रतेविषयी देवाच्या मार्गदर्शनाचा अनादर केल्यास सार्वकालिक मृत्यू येऊ शकतो. पण येशूच्या बलिदानाविषयी आदर दाखवल्याने सार्वकालिक जीवन मिळते.
८. सुरवातीच्या ख्रिश्चनांनी रक्ताविषयीचे देवाचे मार्गदर्शन गांभिर्याने घेतले हे कशावरून सूचित होते?
८ रक्ताविषयी देवाच्या मार्गदर्शनाला सुरवातीच्या ख्रिश्चनांनी किती महत्त्व दिले आणि कशाप्रकारे त्याचे पालन केले? क्लार्क यांचे विधान आठवा: “शुभवर्तमानाच्या व्यवस्थेखाली देखील ते सेवन करण्यास मनाई आहे कारण पापांच्या निर्मूलनाकरता जे रक्त सांडण्यात आले आहे त्याचे प्रतीक म्हणून सदैव त्याकडे पाहणे आवश्यक आहे.” ख्रिश्चनांनी ही बाब गांभिर्याने घेतली याला इतिहासही दुजोरा देतो. टर्टुलियनने लिहिले: “मिरगीचा रोग बरा करण्यासाठी . . . आखाड्यातल्या झुंजीत नुकत्याच मरण पावणाऱ्या गुन्हेगाराचे ताजे रक्त ते आधाशासारखे घेतात.” गैरख्रिस्ती रक्ताचे सेवन करीत होते पण ख्रिश्चनांविषयी टर्टुलियनने म्हटले की ते “प्राण्यांचे रक्त देखील आपल्या आहारात घेत नाहीत . . . ख्रिश्चनांच्या चौकशीच्या वेळी तुम्ही त्यांना रक्ताने भरलेले सॉसेज देता. तुम्हाला आधीच माहीत आहे की त्यांच्याकरता [ते] वर्ज्य आहे.” होय, मृत्यूचा धाक दाखवला तरीसुद्धा ख्रिस्ती रक्त सेवन करत नव्हते. देवाचे मार्गदर्शन त्यांच्याकरता अतिशय महत्त्वाचे होते.
९. रक्त वर्ज्य करण्यात ते न खाण्याव्यतिरिक्त इतर काय समाविष्ट होते?
९ काहीजण कदाचित असा विचार करतील की नियमन मंडळाच्या सूचनेचा केवळ असा अर्थ होता की ख्रिश्चनांनी रक्त खाऊ अथवा पिऊ नये, तसेच रक्त वाहू न दिलेले मांस किंवा रक्तासोबत मिसळलेले इतर खाद्य पदार्थ खाऊ नयेत. अर्थात, देवाने नोहाला दिलेल्या आज्ञेचा पहिला अर्थ तोच होता. तसेच प्रेषितांनी दिलेल्या आज्ञेतही ख्रिश्चनांना “गळा दाबून मारलेले प्राणी” म्हणजेच रक्त असलेले मांस वर्ज्य करण्यास सांगण्यात आले होते. (उत्पत्ति ९:३, ४; प्रेषितांची कृत्ये २१:२५) पण हे केवळ आहारापर्यंतच मर्यादित नव्हते हे त्या आरंभीच्या ख्रिश्चनांनाही ठाऊक होते. काही वेळा, रक्त हे वैद्यकीय उपचारांकरता वापरले जात. टर्टुलियनने सांगितल्याप्रमाणे मिरगीचा रोग बरा करण्यासाठी काही गैरख्रिस्ती लोक ताजे रक्त सेवन करीत. आणि इतर रोगांवर उपचार करण्याकरता किंवा आरोग्य सुधारण्याकरताही रक्ताचा वापर त्या काळी केला जात असावा. त्याअर्थी, ख्रिश्चनांकरता, रक्त वर्ज्य करण्याचा अर्थ ‘वैद्यकीय’ कारणांसाठीही ते न घेणे असा होतो. जीव धोक्यात घालावा लागला तरीसुद्धा त्यांनी त्या आज्ञेचे पालन केले.
औषध म्हणून रक्ताचा वापर
१०. वैद्यकीय उपचारांकरता अलीकडे रक्ताचा कशाप्रकारे वापर केला जाऊ लागला आहे आणि यामुळे कोणता प्रश्न उपस्थित होतो?
१० रक्ताचा वैद्यकीय उपचाराकरता वापर आता सर्वसामान्य झाला आहे. सुरवातीला संपूर्ण रक्ताचे संक्रमण केले जात असे; हे रक्तदात्याच्या शरीरातून काढून, साठवले जात आणि गरज पडल्यावर आणीबाणीच्या परिस्थितीत, उदाहरणार्थ लढाईत जखमी झालेल्या रुग्णाला दिले जात. कालांतराने, संशोधकांना रक्ताच्या विविध मूलभूत घटकांचे विभाजन करण्यात यश आले. या घटकांचे संक्रमण केल्यामुळे रक्तदात्याचे रक्त एकापेक्षा अधिक रुग्णांना देणे शक्य झाले. उदाहरणार्थ, एका जखमी व्यक्तीला प्लास्मा तर दुसऱ्या एखाद्या रुग्णाला रक्तातल्या तांबड्या पेशी. पुढे आणखी संशोधनानंतर रक्तातल्या प्लास्माचेही विघटन करून त्यातील आणखी अंश वेगळे करता येतात व अधिक रुग्णांकरता वापरता येतात हे समजले. याच धर्तीवर संशोधन सुरू आहे आणि रक्त घटकांच्या अंशांचे नवनवीन उपयोग करण्यासंबंधी माहिती मिळत आहे. ख्रिस्ती व्यक्तीची प्रतिक्रिया काय असावी? रक्त संक्रमणास त्याने ठामपणे नकार दिला आहे, पण डॉक्टर त्याला एकच महत्त्वाचा घटक, उदाहरणार्थ तांबड्या पेशी घेण्यास गळ घालत आहे. किंवा विशिष्ट उपचारात एखाद्या रक्तघटकापासून वेगळा केलेला लहानसा अंश घेण्याचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. अशावेळी, रक्त हे पवित्र आहे आणि केवळ ख्रिस्ताचेच रक्त खऱ्या अर्थाने जीवनदायक आहे हे लक्षात ठेवून, देवाच्या सेवकाने या प्रश्नांचे कशाप्रकारे निरसन करावे?
११. रक्तासंबंधी साक्षीदारांनी बऱ्याच काळापासून कोणती वैद्यकीयदृष्ट्या अचूक भूमिका घेतली आहे?
११ कित्येक दशकांआधी, यहोवाच्या साक्षीदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. उदाहरणार्थ, त्यांनी द जर्नल ऑफ दि अमेरिकन मेडिकल असोसिएशन (नोव्हेंबर २७, १९८१; हाच लेख रक्ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते? पृष्ठे २७-९ वर पुनर्मुद्रित करण्यात आला) * या पत्रिकेतून एक लेख सादर केला होता. त्या लेखात उत्पत्ति, लेवीय व प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातील उतारे उद्धृत करण्यात आले होते. त्यात असे म्हटले होते: “ही वचने वैद्यकीय परिभाषेत मांडलेली नसली तरी त्यांच्यामुळे संपूर्ण रक्त, समूहित लाल पेशी, प्लास्मा तसेच पांढऱ्या पेशी व बिंबाणू यांचे संक्रमण देणे अशक्य असल्याचे साक्षीदार मानतात.” इमर्जन्सी केअर या २००१ पाठ्यपुस्तकात “रक्ताचे घटक” या शीर्षकाखाली असे म्हणण्यात आले: “रक्त हे बऱ्याच घटकांपासून बनलेले असते: प्लास्मा, तांबड्या व पांढऱ्या रक्त पेशी व बिंबाणू.” त्याअर्थी वैद्यकीय माहितीच्या सामंजस्यात, साक्षीदार संपूर्ण रक्ताचे अथवा त्याच्या चारपैकी कोणत्याही घटकांचे संक्रमण स्वीकारत नाहीत.
१२. (अ) रक्ताच्या मूलभूत घटकांपासून विलग केलेल्या अंशांविषयी कोणती भूमिका मांडण्यात आली आहे? (ब) यासंबंधी अधिक माहिती कोठे मिळू शकते?
१२ या वैद्यकीय लेखात पुढे असे म्हटले आहे: “साक्षीदारांचा धार्मिक समज, अल्ब्यूमिन, इम्यून ग्लोब्युलिन [यांसारख्या अंशांना] व हिमोफिलियाच्या औषधांना संपूर्ण मनाई करत नाही. यांचा स्वीकार आपण करू शकतो किंवा नाही ते प्रत्येक साक्षीदाराने व्यक्तिगतरित्या ठरवावे.” १९८१ पासून, वैद्यकीय वापरासाठी अनेक अंश (चार मुख्य घटकांपैकी कोणत्याही एकापासून विघटित केलेले भाग) वेगळे करण्यात आले आहेत. त्यानुसार, जून १५, २००० च्या टेहळणी बुरूज नियतकालिकात “वाचकांचे प्रश्न” या लेखात सदर विषयावर उपयुक्त अशी माहिती प्रकाशित करण्यात आली. सध्याच्या आमच्या वाचकवर्गाच्या फायद्यासाठी त्या उत्तराचा सारांश या अंकाच्या पृष्ठ २९-३१ वर देण्यात आला आहे. यात बरेच तपशील व तर्कवाद सादर केले आहेत; तरीसुद्धा यातील माहिती १९८१ साली सादर केलेल्या मूलभूत माहितीच्या एकमतात असल्याचे तुम्हाला आढळेल.
तुमच्या विवेकाची भूमिका
१३, १४. (अ) विवेक म्हणजे काय आणि रक्ताच्या संबंधाने त्याची काय भूमिका आहे? (ब) देवाने इस्राएलाकरता मांस खाण्याबाबत कोणते मार्गदर्शन दिले होते, पण कोणते प्रश्न उद्भवणे साहजिक होते?
१३ अशाप्रकारच्या माहितीचा रोख एका व्यक्तीच्या विवेकावर येतो. का? ख्रिस्ती, देवाच्या मार्गदर्शनाचा स्वीकार करण्याचे महत्त्व ओळखतात, पण विशिष्ट परिस्थितीत वैयक्तिक निर्णय घेणे भाग असल्याने प्रत्येकाला आपल्या विवेकानुसार कार्य करावे लागते. विवेक म्हणजे निरनिराळ्या विषयांचे, खासकरून नैतिक प्रश्नांचे परीक्षण करून त्यांवर निर्णय घेणे. (रोमकर २:१४, १५) पण प्रत्येक व्यक्तीचा विवेक वेगवेगळा असू शकतो. * बायबल सांगते की काहींची ‘सद्सद्विवेकबुद्धी दुर्बळ’ असू शकते; याचा अर्थ काहींची विवेकबुद्धी प्रबळ असते. (१ करिंथकर ८:१२) देवाचे वचन काय म्हणते हे शिकून घेण्यात, त्याच्या विचारांप्रती संवेदनशील असण्यात आणि याच्या आधारावर आपल्या जीवनातील निर्णय घेण्यात वेगवेगळ्या ख्रिस्ती व्यक्तींनी वेगवेगळ्या पातळीपर्यंत प्रगती केलेली असते. ही गोष्ट यहूद्यांच्या व मांस खाण्याविषयीच्या उदाहरणावरून स्पष्ट करता येईल.
१४ देवाला आज्ञाधारक असणारी व्यक्ती रक्तासकट मांस खाणार नाही याविषयी बायबल अगदी स्पष्ट आहे. ही आज्ञा इतकी महत्त्वाची होती की आणीबाणीच्या प्रसंगी देखील अनुवाद १२:१५, १६; १ शमुवेल १४:३१-३५) तरीसुद्धा या विषयावर अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकत होते. इस्राएली माणसाने कोकरू मारल्यानंतर किती वेळात त्याचे रक्त काढून टाकावे? रक्त वाहू देण्याकरता प्राण्याचा गळा कापणे आवश्यक होते का? मागचे पाय बांधून त्याला उलटे टांगणे आवश्यक होते का? किती वेळपर्यंत असे करावयाचे होते? मोठा प्राणी असल्यास काय करावयाचे होते? रक्त वाहू दिल्यानंतरही काही रक्त मांसात राहणे साहजिक होते. मग असे मांस तो खाऊ शकत होता का? याविषयी कोणी निर्णय घ्यावयाचा होता?
इस्राएल सैनिकांनी रक्तासकट मांस खाल्ले तेव्हा ते गंभीर अपराधाचे किंवा पापाचे दोषी बनले. (१५. मांस खाण्याविषयी काही यहुद्यांनी कशी प्रतिक्रिया दाखवली पण देवाने त्यांना कोणते मार्गदर्शन दिले?
१५ एखाद्या आवेशी यहुदी मनुष्याला हे प्रश्न भेडसावत आहेत अशी कल्पना करा. त्याने कदाचित मांस विकले जाते त्या बाजारातून मांस घ्यायचेच नाही असा निर्णय घेणे सर्वात उत्तम असे ठरवले असेल. दुसऱ्या यहुदी व्यक्तीने कदाचित मूर्तिला वाहिलेले मांस असल्याची शक्यता असल्यास ते मांस न खाण्याचा निर्णय घेतला असेल. असेही काही यहुदी असतील की जे प्राण्याचे रक्त पूर्णपणे काढण्याकरता विशिष्ट विधी पाळल्याशिवाय ते मांस खात नसतील. * (मत्तय २३:२३, २४) या वेगवेगळ्या प्रतिक्रियांबद्दल तुम्हाला काय वाटते? शिवाय, यांपैकी काहीही करण्यासंबंधी देवाने आज्ञा दिलेली नसल्यामुळे या यहुद्यांनी रब्बींच्या मंडळीला यांपैकी प्रत्येकाविषयी निर्णय द्यावा म्हणून असंख्य प्रश्न सादर करणे सर्वात उत्तम ठरले असते का? यहुदी धर्मात हेच घडले, पण यहोवाने आपल्या खऱ्या उपासकांना अशाप्रकारे रक्ताविषयीचे निर्णय घेण्यास सांगितले नाही ही आनंदाची गोष्ट आहे. देवाने उचित प्राण्यांना मारण्याविषयी व त्यांचे रक्त वाहू देण्याविषयी मूलभूत मार्गदर्शन पुरवले पण त्यापलीकडे तो गेला नाही.—योहान ८:३२.
१६. रक्त घटकाच्या लहान अंशापासून तयार केलेले इंजेक्शन घेण्याबाबत ख्रिश्चनांचे वेगवेगळे विचार का असू शकतात?
१६ परिच्छेद ११ व १२ यांत सांगितल्यानुसार यहोवाचे साक्षीदार रक्ताचे किंवा त्यातील चार मूलभूत घटकांचे—प्लास्मा, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी आणि बिंबाणू यांचे संक्रमण स्वीकारत नाहीत. पण यांपैकी एखाद्या घटकातून विलग केलेल्या लहान अंशांविषयी काय, उदाहरणार्थ, एखाद्या रोगाचा प्रतिकार करण्याकरता अथवा सापाच्या विषावरील प्रतिजैव असलेल्या सिरम्सविषयी काय? (पृष्ठ ३० वरील परिच्छेद ४ पाहावा.) काहींचे म्हणणे आहे की या सूक्ष्म अंशांना रक्त म्हणता येणार नाही आणि त्यामुळे ‘रक्त वर्ज्य करण्यासंबंधी’ असलेली आज्ञा या बाबतीत लागू होत नाही. (प्रेषितांची कृत्ये १५:२९; २१:२५; पृष्ठ ३१, परिच्छेद १) या निर्णयाकरता ते स्वतः जबाबदार आहेत. इतरांचा विवेक मात्र त्यांना, रक्तापासून (प्राण्यांच्या अथवा मनुष्यांच्या) मिळवलेले काहीही, मग ते एखाद्या घटकापासून काढलेला लहानसा अंश असला तरीसुद्धा तो घेण्यास परवानगी देत नाही. * असेही काही असू शकतात, जे प्लास्मा प्रथिने असलेल्या रोगप्रतिबंधक अथवा सापाच्या विषावरील औषध असलेले इंजेक्शन स्वीकारतील पण इतर लहान अंश कदाचित ते घेणार नाहीत. शिवाय, चार घटकांपैकी एकापासून तयार केलेले काही पदार्थ त्या सबंध घटकाच्या कार्याशी इतके मिळतेजुळते असतात आणि शरीरात त्यांची जीवनरक्षक भूमिका इतकी महत्त्वाची असते की बहुतेक ख्रिश्चनांना असे पदार्थ स्वीकारणे योग्य वाटत नाही.
१७. (अ) रक्ताच्या अंशांविषयी आपण निर्णय घेतो तेव्हा आपला विवेक कशाप्रकारे आपले साहाय्य करू शकतो? (ब) या बाबतीत निर्णय घेणे इतके गंभीर का आहे?
१७ अशाप्रकारचे निर्णय आपण घेतो त्यावेळी विवेकाबद्दल बायबलमध्ये दिलेली माहिती सहायक ठरू शकते. पहिले पाऊल म्हणजे देवाचे वचन काय म्हणते हे जाणून घेणे व त्यानुसार आपल्या विवेकाचे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणे. असे केल्यामुळे तुम्हाला इतरांना तुमच्याकरता निर्णय घेण्यास विनंती करण्याऐवजी स्वतः देवाच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेण्यास मदत होईल. (स्तोत्र २५:४, ५) रक्तातील अंश घेण्याविषयी काहींनी असा विचार केला, ‘हा ज्याने त्याने आपल्या विवेकानुसार घ्यावयाचा निर्णय आहे, त्यामुळे काही फरक पडत नाही.’ अशाप्रकारे विचार करणे चुकीचे आहे. एखादी बाब विवेकावर सोडली आहे याचा अर्थ ती महत्त्वाची नाही असे नाही. तीसुद्धा अत्यंत गंभीर असू शकते. एक कारण म्हणजे ज्यांचा विवेक आपल्यापेक्षा वेगळा आहे त्यांच्यावर याचा परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, जे मांस कदाचित एखाद्या मूर्तिला अर्पण केल्यावर नंतर बाजारात विकले जात असावे अशा मांसाविषयी पौलाने जो सल्ला दिला त्यावरून हे कळते. त्याने ख्रिश्चनांना इतरांच्या ‘दुर्बळ सद्सद्विवेकबुद्धीला धक्का’ न देण्याविषयी सावध असण्यास सांगितले. जर ते इतरांना अडखळण होईल असे वागले तर, ‘ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला अशा बंधूचा नाश’ होण्यास कारण बनू शकतात आणि त्याअर्थी ते ख्रिस्ताविरुद्ध पाप करतात. त्यामुळे, रक्ताच्या लहान अंशांविषयीचे निर्णय हे वैयक्तिक निर्णय असले तरीसुद्धा ते अतिशय गंभीर लेखले पाहिजेत.—१ करिंथकर ८:८, ११-१३; १०:२५-३१.
१८. रक्ताच्या निर्णयासंबंधाने आपला विवेक असंवेदनशील होऊ नये म्हणून एक ख्रिस्ती व्यक्ती काय करू शकते?
१८ एक संबंधित मुद्दा रक्ताविषयी निर्णय घेण्याच्या गांभिर्यावर भर देतो. हा मुद्दा, अशाप्रकारचे निर्णय घेतल्यामुळे तुमच्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामासंबंधी आहे. जर रक्ताचा लहान अंश घेतल्याने तुमच्या बायबल प्रशिक्षित विवेकाला बोचणी होणार असेल तर त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये. तसेच, “हे घ्यायला काही हरकत नाही, बऱ्याच जणांनी घेतले आहे,” असे कोणीतरी सांगितले म्हणून तुम्ही तुमच्या विवेकाच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करू नये. आठवणीत असू द्या, आज लाखो लोक त्यांच्या विवेकाकडे दुर्लक्ष करतात, आणि त्यामुळे त्यांचा विवेक असंवेदनशील बनतो, जेणेकरून ते खोटे बोलतात व इतर अयोग्य गोष्टी करतात, आणि त्याविषयी त्यांना काहीही वाटत नाही. ख्रिश्चनांना असा मार्ग पत्करण्याची इच्छा निश्चितच नाही.—२ शमुवेल २४:१०; १ तीमथ्य ४:१, २.
१९. रक्तासंबंधी वैद्यकीय बाबतीत निर्णय घेताना कोणती गोष्ट आपण सर्वात आधी लक्षात घेतली पाहिजे?
१९ पृष्ठे २९-३१ वर दिलेल्या उत्तराच्या सारांशात शेवटी असे म्हटले आहे: “या प्रश्नावर दोन ख्रिस्ती व्यक्तींचे आपापल्या विवेकानुसार वेगवेगळे मत आणि निर्णय असू शकतात हे कबूल आहे. पण याचा अर्थ, या बाबतीत काहीही निर्णय घेतला तरी फरक पडत नाही असा आहे का? नाही. हा एक गंभीर विषय आहे.” हा खासकरून गंभीर विषय आहे कारण ‘जिवंत देवासोबतचा’ तुमचा नातेसंबंध यात गोवलेला आहे. केवळ हा नातेसंबंधच एका व्यक्तीला येशूच्या सांडलेल्या रक्ताच्या आधारावर सार्वकालिक जीवन मिळवून देण्यास समर्थ आहे. देव रक्ताच्या माध्यमाने पुष्कळांच्या जिवांचे तारण करत आहे हे ओळखून व याबद्दल आदर बाळगून, रक्ताविषयी मनःपूर्वक आदर उत्पन्न करा. पौलाने म्हणूनच लिहिले: “[तुम्ही] आशाहीन व देवविरहित असे जगात होता, परंतु जे तुम्ही पूर्वी ‘दूर’ होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठायी ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे ‘जवळचे’ झाला आहा.” (तिरपे वळण आमचे.)—इफिसकर २:१२, १३.
[तळटीपा]
^ परि. 11 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.
^ परि. 13 एकदा पौल, चार ख्रिस्ती बांधवांसोबत व्रतस्थ होण्याकरता मंदिरात गेला. नियमशास्त्राचे त्यांच्यावर बंधन नव्हते तरीपण जेरूसलेमेतील वडीलजनांच्या शब्दाला मान देऊन पौल मंदिरात गेला. (प्रेषितांची कृत्ये २१:२३-२५) पण काही ख्रिश्चनांना तेव्हा देखील कदाचित मंदिरात जाणे किंवा असा कोणताही विधी पाळणे योग्य वाटले नसेल. तेव्हा देखील प्रत्येकाचा विवेक वेगवेगळा होता आणि आज देखील तसेच आहे.
^ परि. 15 ‘यहुदी धर्मनियमांनुसार असण्याकरता’ मांसांवर कोणत्या प्रक्रिया कराव्यात याविषयी एन्सायक्लोपिडिया जुडायका यात “तपशीलवार व काटेकोर” नियम दिलेले आहेत. यात मांस किती मिनिटांपर्यंत पाण्यात बुडवून ठेवावे, त्यातील रक्त वाहून जाण्याकरता ते पाट्यावर कशाप्रकारे ठेवावे, त्यावर कोणत्याप्रकारचे मीठ चोळावे आणि मग ते थंड पाण्यात किती वेळा धुवावे यासंबंधी अनेक नियम त्यात आहेत.
^ परि. 16 अलीकडे, काही इंजेक्शनांमधील महत्त्वाचा अथवा सक्रिय घटक हा रक्तापासून तयार केलेला नसून कृत्रिम पदार्थ असतो. पण काही इंजेक्शन्समध्ये रक्ताचा लहानसा अंश, उदाहरणार्थ अल्बुमिन वापरलेला असण्याची शक्यता आहे.—टेहळणी बुरूज, ऑक्टोबर १, १९९४ अंकातील “वाचकांचे प्रश्न” हे सदर पाहावे.
तुम्हाला आठवते का?
• देवाने रक्ताविषयी नोहाला, इस्राएलांना व ख्रिश्चनांना कोणते मार्गदर्शन पुरवले?
• रक्ताच्या संदर्भात, यहोवाचे साक्षीदार काय घेण्यास पूर्णपणे नकार देतात?
• रक्तघटकातील अंश घेणे हे एखाद्याच्या विवेकावर कोणत्या अर्थाने अवलंबून आहे, पण याचा काय अर्थ होत नाही?
• निर्णय घेताना आपण देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधाला सर्वाधिक महत्त्व का द्यावे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[२२ पानांवरील तक्ता]
(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)
रक्ताविषयी मूलभूत भूमिका
संपूर्ण रक्त
अस्वीकार्य
तांबड्या पेशी
पांढऱ्या पेशी
बिंबाणू
प्लास्मा
ख्रिस्ती व्यक्तीने स्वतः ठरवावे
तांबड्या पेशींपासून
पांढऱ्या पेशींपासून
बिंबाणूंपासून
प्लास्मापासून
[२० पानांवरील चित्र]
नियमन मंडळ अशा निष्कर्षावर आले की ख्रिश्चनांनी ‘रक्त वर्ज्य करावे’
[२३ पानांवरील चित्र]
रक्ताच्या अंशाविषयी निर्णय घेण्याची वेळ आल्यास आपल्या विवेकाकडे दुर्लक्ष करू नका