‘तिने आम्हाला तिच्या धर्माचा आदर करायला शिकवले’
‘तिने आम्हाला तिच्या धर्माचा आदर करायला शिकवले’
ईटलीच्या रोविगो प्रांतातील एका यहोवाच्या साक्षीदार बहिणीला कळाले की, तिला ट्यूमर आहे व तिची स्थिती गंभीर आहे. हॉस्पिटलमध्ये कित्येक दिवस राहून तिच्यावर रक्ताविना उपचार करण्यात आल्यानंतर घरी परतल्यावर एका स्थानीय कॅन्सर नर्सिंग सर्व्हिसमधील नर्सेस तिची काळजी घेत होते.
या ३६ वर्षीय रुग्णाचा भक्कम विश्वास आणि सहकार्य देण्याची इच्छा पाहून तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर आणि नर्सेस खूप प्रभावित झाले. कॅन्सरमुळे या रुग्णाचा मृत्यू होण्याआधी तिची काळजी घेतलेल्या एका पुरुष नर्सने या रुग्णाच्या अनुभवाविषयी एका नर्सिंग पत्रिकेत लिहिले जिचे नाव त्याने अँजेला ठेवले.
“अँजेला अतिशय उत्साही आहे आणि तिला जगण्याची तीव्र इच्छा आहे. आपल्याला गंभीर आजार झाला आहे हे तिला ठाऊक आहे आणि आपल्यातील कोणाप्रमाणेही ती उपायाच्या किंवा औषधाच्या शोधात आहे. . . . आम्ही नर्सेस तिच्या जीवनात एक-एक करून आलो. तिने आमचा प्रतिकार केला नाही. उलट, अँजेलाच्या मनमोकळेपणामुळे आमचं काम सोपं झालं. तिच्याकडे जायला आम्हाला नेहमी आवडायचं कारण तिला भेटणे म्हणजे एका प्रामाणिक व्यक्तीला भेटण्यासारखे होते आणि याचा दोघांनाही फायदा होत असे. . . . तिचा धर्म तिच्या आजारपणात समस्या उभा करणार हे आम्हाला लगेच कळले.” त्याला असे वाटण्याचे कारण अँजेलाने रक्त संक्रमण नाकारले होते जे त्याच्या मते तिला द्यायला हवे होते.—प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९.
“आरोग्य कर्मचारी या नात्याने आम्ही तिच्या निर्णयाशी सहमत नाही हे आम्ही अँजेलाला सांगितले पण तिने आम्हाला जीवन तिच्याकरता किती मोलाचे आहे हे पटवून दिले. तिला आणि तिच्या कुटुंबाला तिचा धर्म किती महत्त्वाचा आहे हे देखील आम्हाला समजले. अँजेलाने हार मानली नाही. ती आपल्या आजारपणामुळे खचली नाही. ती खंबीर आहे. तिला जगायचे आहे, संघर्ष करायचा आहे आणि जगत राहायचे आहे. तिने आपला निर्धार आणि आपला विश्वास व्यक्त केला आहे. तिचा जो निर्धार आहे तो सहसा आपल्यामध्ये दिसत नाही, तिच्या विश्वासाइतका आपला विश्वास खंबीर नाही. . . . अँजेलाने आम्हाला तिच्या धर्माचा आदर करण्याचे महत्त्व शिकवले आहे; पण आमच्या पेशात याच्या अगदी वेगळे शिकवले जाते. . . . अँजेलाने आम्हाला शिकवलेली गोष्ट फार महत्त्वाची आहे असे आम्हाला वाटते कारण आम्ही विविध लोकांच्या, विविध परिस्थितींच्या आणि विविध धर्मांच्या संपर्कात येतो व आम्ही भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून काही शिकू शकतो आणि तिला काही देऊ शकतो.”
त्या पत्रिकेतील लेखात, १९९९ मध्ये संमत करण्यात आलेल्या इटालियन नर्सेसच्या पेशातील नीतिमूल्यांवर जोर देऊन म्हटले होते: “एका व्यक्तीची धार्मिक, नैतिक आणि सांस्कृतिक मूल्ये त्याचप्रमाणे जात आणि लिंग विचारात घेऊन एक नर्स कार्य करतो/करते.” काही वेळा, डॉक्टरांना आणि नर्सेसना रुग्णाच्या धार्मिक विश्वासांचा आदर करणे कठीण जात असेल परंतु जे आदर दाखवतात ते निश्चितच प्रशंसेच्या योग्य आहेत.
आरोग्यासंबंधी व वैद्यकीय उपचारासंबंधी यहोवाचे साक्षीदार जे निर्णय घेतात ते विचारपूर्वक घेतलेले निर्णय असतात. शास्त्रवचने काय म्हणतात याचा ते गांभिर्याने विचार करतात आणि अँजेलाच्या उदाहरणावरून दिसून येते त्याप्रमाणे ते धर्मवेडे नाहीत. (फिलिप्पैकर ४:५) संपूर्ण जगभरात, आता अधिकाधिक वैद्यकीय कर्मचारी त्यांच्या साक्षीदार रुग्णांच्या विवेकाचा आदर करण्यास तयारी दाखवत आहेत.