स्वसंतोषाने केलेल्या त्यागाचे समाधानकारक व आनंदी जीवन
जीवन कथा
स्वसंतोषाने केलेल्या त्यागाचे समाधानकारक व आनंदी जीवन
मार्यो आणि होसा शुमिगा यांच्याद्वारे कथित
स्तोत्र ५४:६ म्हणते: “मी स्वसंतोषाने तुला यज्ञबलि अर्पीन.” फ्रान्समध्ये राहणारे मार्यो शुमिगा आणि त्यांची पत्नी होसा, यांनी या वचनानुसार आपले जीवन व्यतीत केले. अलिकडेच त्यांनी यहोवाच्या सेवेतील आपल्या दीर्घ, समाधानकारक जीवनातील काही ठळक घडामोडी सांगितल्या.
मार्यो: माझे आईवडील रोमन कॅथलिक होते; ते पोलंडहून आले होते. बाबा गरीब होते. त्यांना शाळेत जायला मिळाले नाही. परंतु, पहिल्या महायुद्धाच्या वेळी, सैनिकांचे संरक्षण करण्यासाठी बनवण्यात आलेल्या खंदकात त्यांची ड्यूटी लागायची तेव्हा त्या वेळेचा त्यांनी सदुपयोग करून ते लिहा-वाचायला लागले. ते देव-भीरू होते; परंतु चर्चच्या काही गोष्टी पाहून ते निराश झाले होते.
एक घटना त्यांच्या विशेष लक्षात राहिली. एकदा युद्धात असताना, लष्करातील एक ख्रिस्ती धर्माधिकारी, बाबा ज्या युनिटमध्ये होते त्या युनिटला भेट द्यायला आला होता. जवळच जेव्हा एक बॉम्बस्फोट झाला तेव्हा हा अधिकारी घाबरून पळाला आणि आपल्या घोड्यावर बसला. त्याच्या हातात क्रूस होता, त्या क्रूसाने तो घोड्याला हाकू लागला. देवाचा “प्रतिनिधी” घोड्याला हाकण्यासाठी एका “पवित्र” वस्तूचा उपयोग करतोय हे पाहून बाबांना धक्का बसला. या सारखे अनुभव आणि युद्धाचे भयानक अनुभव येऊनसुद्धा बाबांचा देवावरील विश्वास कमी झाला नाही. आपण देवाच्या कृपेमुळेच युद्धातून सुरक्षित घरी आलो असे ते म्हणायचे.
“छोटे पोलंड”
एकोणसशे अकरा साली बाबांनी शेजारच्या गावातील एका मुलीशी लग्न केलं. तिचं नाव होतं, ॲना त्सेसोव्हस्की. युद्धानंतर काही दिवसांतच म्हणजे १९१९ मध्ये बाबा आणि आई पोलंडहून फ्रान्सला राहायला गेले; तिथं बाबांना कोळशाच्या खाणीत काम मिळालं. एकोणसशे सव्वीस सालच्या मार्च महिन्यात फ्रान्सच्या नैऋत्याला असलेल्या कॉनयॉक-ले-मीन इथं माझा जन्म झाला. त्यानंतर, उत्तर फ्रान्समधील
लेन्सजवळील लोस-अन-गोईल येथे असलेल्या एका पोलीश वस्तीत आईबाबाही जाऊन राहू लागले. तिथला बेकरीवाला पोलीश होता, खाटीक पोलीश होता आणि पाळकही पोलीश होता. त्यामुळे या ठिकाणाला छोटे पोलंड असं नाव पडलं. आईबाबा सामाजिक कार्यात आवेशानं भाग घ्यायचे. बाबा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करायचे; यात एक नाटक, संगीत आणि गायन असायचे. पाळकांबरोबरही त्यांच्या अनेकदा चर्चा व्हायच्या; पण पाळकांचं नेहमीचं “अनेक गूढ गोष्टी आहेत,” हे ठरलेलं उत्तर ऐकून त्यांचं समाधान व्हायचं नाही.एकदा, १९३० साली, दोन स्त्रिया आमच्या घरी आल्या. त्या बायबल विद्यार्थीनी होत्या; पूर्वी यहोवाच्या साक्षीदारांना हे नाव होतं. बाबांनी त्यांच्याकडून एक बायबल मिळवलं; खूप वर्षांपासून त्यांना बायबल वाचण्याची इच्छा होती. बाबांनी व आईने देखील, त्या दोन स्त्रियांनी दिलेली बायबल आधारित प्रकाशने उत्सुकतेने वाचून काढली. त्यांच्यावर याचा खोल परिणाम झाला. त्यांना बरीच कामं करावी लागत असली तरी ते बायबल विद्यार्थी चालवत असलेल्या सभांना उपस्थित राहू लागले. पाळकांबरोबरच्या चर्चा दिवसेंदिवस अधिकच वादग्रस्त होऊ लागल्या आणि मग एकदा तर त्यांनी आईबाबांना धमकी दिली, की ते जर बायबल विद्यार्थ्यांबरोबर असाच सहवास राखू लागले तर माझी धाकटी बहीण स्तिफॅनी हिला धर्मशिक्षणाच्या वर्गातून काढून टाकण्यात येईल. बाबा म्हणाले: “तुम्ही कशाला कष्ट घेता? इथून पुढं माझी मुलगी आणि माझी बाकीची मुलंही आमच्याबरोबर बायबल विद्यार्थ्यांच्या सभांना येतील.” बाबांनी चर्चला राजीनामा दिला आणि १९३२ सालच्या सुरवातीला आईबाबा दोघांचाही बाप्तिस्मा झाला. त्यावेळी फ्रान्समध्ये फक्त ८०० राज्य प्रचारक होते.
होसा: माझे आईवडील हंगेरीयन होते आणि मार्योच्या कुटुंबाप्रमाणेच तेही कोळशाच्या खाणीत काम करण्यासाठी म्हणून फ्रान्सच्या उत्तरेस राहायला आले होते. एकोणसशे पंचवीस साली माझा जन्म झाला. एकोणीसशे सदतीसमध्ये, यहोवाचे साक्षीदार असलेले ओग्सीश्ट बझॉ किंवा आम्ही ज्यांना पपा ओग्सीश्ट असे म्हणायचो ते आईवडिलांसाठी हंगेरीयन भाषेत टेहळणी बुरूज मासिक आणू लागले. त्यांना ही मासिकं आवडायची पण दोघांपैकी कोणीही यहोवाचे साक्षीदार झाले नव्हते.
मी लहान होते तरीपण, टेहळणी बुरूज मासिकात वाचलेल्या गोष्टींचा माझ्या अंतःकरणावर प्रभाव पडला आणि पपा ओग्सीश्ट यांची सून सुझॅना बझॉ माझ्यामध्ये आवड घेऊ लागली. मला सभांना घेऊन जाण्याची आईबाबांनी तिला परवानगी दिली. नंतर जेव्हा मी कामाला जाऊ लागले तेव्हा मी रविवारच्या दिवशीही सभांना जात होते हे पाहून बाबांना राग येऊ लागला. ते तसे चागंल्या स्वभावाचे होते, पण त्यांची तक्रार अशी होती: “एक तर संपूर्ण आठवडा तू घरात नसतेस, आणि रविवारी सुटीच्या दिवशी तू सभांना जातेस!” तरीपण मी सभांना जात राहिले. मग एकदा बाबा मला म्हणाले: “चल, सामान भर आणि या घरातनं चालती हो!” तेव्हा रात्र झाली होती. मी तेव्हा फक्त १७ वर्षांची होते; इतक्या रात्रीची मी कुठे जाऊ हे मला माहीत नव्हतं. शेवटी मी सुझॅनाच्या घरी गेले; रडून रडून माझे डोळे लाल झाले होते. सुझॅनाबरोबर मी एक आठवडा राहिले; त्यानंतर बाबांनी माझ्या मोठ्या बहिणीला मला पुन्हा घरी १ योहान ४:१८ मधील विचारामुळे मला दृढ राहण्यास मदत मिळाली. त्या वचनात म्हटलं आहे, की “पूर्ण [परिपूर्ण] प्रीति भीति घालवून देते.” एकोणीसशे बेचाळीस साली माझा बाप्तिस्मा झाला.
आणण्यासाठी पाठवलं. तशी मी स्वभावानं लाजाळू होते, पणअमूल्य आध्यात्मिक वारसा
मार्यो: एकोणसशे बेचाळीस साली, माझ्या बहिणी, स्तिफॅनी, मिलॅनी आणि माझा भाऊ स्तिफॅन यांच्याबरोबर माझाही बाप्तिस्मा झाला. आमच्या घरात देवाच्या वचनाला प्रथम स्थान असायचे. टेबलाभोवती आम्ही सर्व बसलेलो असायचो तेव्हा बाबा आम्हाला पोलीशमध्ये बायबल वाचून दाखवायचे. आमचा संध्याकाळचा बहुतेक वेळ, राज्य प्रचार कार्यात आईबाबांना आलेले अनुभव ऐकण्यात जायचा. या आध्यात्मिकरीत्या समृद्ध क्षणांनी आम्हाला यहोवावर प्रेम करायला आणि त्याच्यावर अधिकाधिक विश्वास ठेवायला शिकवलं. बाबांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांनी काम करण्याचं सोडून दिलं पण, आध्यात्मिकरीत्या व भौतिकरीत्या ते आमचं भरणपोषण करत राहिले.
बाबांकडे आता वेळ असल्यामुळे, आठवड्यातून एकदा ते मंडळीतील तरुणांबरोबर पोलीशमध्ये बायबलचा अभ्यास घ्यायचे. तिथेच मी पोलीश वाचायला शिकलो. बाबा इतर मार्गांनी देखील तरुणांना उत्तेजन देत असत. एकदा, फ्रान्समध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर देखरेख करणारे बंधू गिस्ताव्ह जोफर आमच्या मंडळीला भेट द्यायला आले होते तेव्हा बाबांनी एका कॉयरची योजना केली आणि बेलशस्सर राजाची मेजवानी आणि भिंतीवरील अक्षरे याच्या आधारवर एक बायबल नाटकही बसवलं. (दानीएल ५:१-३१) लुई केशुता यानं दानीएलची भूमिका केली; या बांधवानं नंतर नात्सींच्या वेळी दृढ भूमिका घेतली. * अशा वातावरणात आम्ही लहानाचं मोठं झालो. आम्ही पाहिलं, की आमचे आईवडील आध्यात्मिक गोष्टीत व्यग्र असायचे. आज मला कळतं, की आमच्या आईवडिलांनी किती अमुल्य वारसा आम्हाला दिला आहे!
एकोणीसशे एकोणचाळीस साली दुसऱ्या महायुद्धाला सुरवात झाली तेव्हा, फ्रान्समध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रचार कार्यावर बंदी होती. एकदा, आमच्या गावात धाड पडली. सर्व घरांना जर्मन सैनिकांनी घेरा घातला होता. बाबांनी, कपडे ठेवतात तिथं एक खड्डा खणून फरशी बसवली होती आणि त्या खड्ड्यात आम्ही विविध बायबल प्रकाशनं लपवून ठेवत असू. पण, फॅसिझम ऑर फ्रिडम या पुस्तिकेच्या पुष्कळ प्रती स्वयंपाक खोलीतल्या एका कपाटात होत्या. बाबांनी लगेच त्या प्रती काढून कॉरिडोरमध्ये अडकवून ठेवलेल्या एका कोटाच्या खिशात लपवल्या. दोन सैनिक आणि एक फ्रेन्च पोलिस आमच्या घराची झडती घ्यायला आले. आम्ही श्वास रोखून बघत होतो. एक सैनिक कॉरिडोरमध्ये लटकवलेल्या कपड्यांची झडती घेऊ लागला आणि लगेच स्वयंपाक खोलीत आला; आम्ही तिथं होतो आणि त्याच्या हातात त्या पुस्तिका होत्या. त्यानं आमच्याकडे पाहिलं, त्याच्या हातातल्या पुस्तिका टेबलावर ठेवल्या आणि पुन्हा झडती सुरू केली. मी लगेच टेबलावरून त्या पुस्तिका उचलल्या आणि सैनिकांनी आधीच धुंडाळलेल्या कपाटाच्या एका कप्प्यात त्या पुन्हा ठेवून दिल्या. तो सैनिक पुन्हा आला तेव्हा त्यानं टेबलावरच्या पुस्तिकांविषयी विचारलंच नाही—असं वाटतं, तो त्यांच्याविषयी पूर्णपणे विसरून गेला होता!
पूर्ण वेळेच्या सेवेत पदार्पण
एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली मी, पायनियर सेवेत पूर्ण वेळ सहभाग घेऊन यहोवाची सेवा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही दिवसांनी, मला फ्रान्समधील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तराकडून एक पत्र मिळालं. या पत्रात, बेल्जियम जवळील सीडन शहरातील मंडळीत पायनियर म्हणून सेवा करण्याची नेमणूक होती. अशाप्रकारे मी यहोवाची सेवा करत आहे हे पाहून आईबाबांना खूपच आनंद झाला. परंतु बाबांनी मला सांगितलं, की पायनियर सेवा ही सहलीला जाण्यासारखी नाही. या सेवेत कष्ट घ्यावे लागतात. परंतु, ते मला म्हणाले, की हे घर तुझ्यासाठी नेहमी खुले आहे आणि तुझ्यासमोर कोणत्याही समस्या आल्या तर तू बिनासंकोच माझ्याकडे येऊ शकतोस. आईबाबांकडे जास्त पैसे नव्हते तरीपण त्यांनी मला एक नवीन सायकल विकत घेऊन दिली. त्या सायकलीची पावती अजूनही मी जपून ठेवली आहे; कधीकधी मी ती पावती पाहतो तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी येतं. एकोणसशे एकसष्ठ साली आईबाबा दोघंही वारले; पण बाबांचे ते सुज्ञ शब्द अजूनही मला आठवतात; या शब्दांनी मला माझ्या सेवेत उत्तेजन आणि सांत्वन दिलं आहे.
उत्तेजनाचा आणखी एक स्रोत म्हणजे सीडन मंडळीतील एक ७५ वर्षीय भगिनी जिचे नाव होते एलीझा मॉट. उन्हाळ्यात मी शहरापासून दूर असलेल्या खेडोपाड्यात प्रचाराला जायचो आणि एलीझा ट्रेननं तिथं यायची आणि आम्ही दोघं प्रचाराला जायचो. एकदा ट्रेन इंजिनियरांचा संप चालला होता तेव्हा एलीझाला ट्रेननं घरी जाणं शक्य नव्हतं. माझ्या डोक्यात एक कल्पना आली; मी तिला माझ्या सायकलीवर मागच्या कॅरियरवर बसवून घरी नेलं; अर्थात सायकलीवरचा हा प्रवास आरामदायक नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी, मी माझ्यासोबत एक लहानशी उशी घेतली आणि एलीझाच्या घरी गेलो आणि मग आम्ही दोघं माझ्या सायकलीवर प्रचाराला जाऊ लागलो; मागच्या कॅरियरवर एलीझा उशी ठेवून बसायची. तिनं ट्रेननं जायचं थांबवलं आणि त्याच पैशात ती दुपारच्या जेवणाच्यावेळी आमच्या दोघांसाठी काहीतरी गरम-गरम प्यायला घ्यायची. माझी सायकल सार्वजनिक वाहतूक होईल, असा कुणी विचार देखील करू शकेल का?
अधिक जबाबदाऱ्या
एकोणसशे पन्नासमध्ये मला संपूर्ण उत्तर फ्रान्समध्ये विभागीय पर्यवेक्षक म्हणून सेवा करण्यास सांगण्यात आले. मी तेव्हा केवळ २३ वर्षांचा असल्यामुळे, सुरवातीला तर मला भीतीच वाटली. मला वाटलं, की शाखा दफ्तराचा काहीतरी गैरसमज झाला आहे. माझ्या डोक्यात नाना प्रश्न आले: ‘आध्यात्मिकरीत्या, शारीरिकरीत्या हे काम करण्यासाठी मी योग्य आहे का? दर आठवडी मला वेगवेगळ्या ठिकाणी राहायला जमेल का?’ शिवाय, वयाच्या सहाव्या वर्षापासून मला, डायव्हर्जंट स्ट्रॅबीस्मस नावाचा डोळ्यांचा विकार होता. या विकारामुळे माझा एक डोळा तिरळा आहे. लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील, याची मला सारखी काळजी वाटत असते. पण, गिलियडच्या मिशनरी प्रशालेचे पदवीधर बंधू स्तिफॅन बेह्युनीक यांनी मला खूप मदत केली, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. बंधू बेह्युनीक यांना प्रचार कार्य केल्यामुळे पोलंडहून हाकलून लावण्यात आले होते; त्यांना पुन्हा फ्रान्सला नेमण्यात आले. त्यांचे धैर्य पाहून मी प्रभावीत झालो. त्यांना यहोवाबद्दल आणि सत्याबद्दल खोल आदर होता. काहींना वाटतं होतं, की ते माझ्याशी खूप कडक वागत होते परंतु मी त्यांच्याकडून बरेच काही शिकू शकलो. त्यांच्या धैर्यातून मी विश्वासात आणखी मजबूत होऊ शकलो.
विभागीय कार्यामुळे मला क्षेत्र सेवेत अनेक सुरेख अनुभव आले. एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मला कोणा मिस्टर पाऊली यांची भेट घ्यायला सांगण्यात आले; ते पॅरिसच्या दक्षिण भागात राहात होते आणि त्यांनी टेहळणी बुरूज मासिकाची वर्गणी केली होती. आमची दोघांची भेट झाली; मला समजलं, की ते सैन्यदलातून निवृत्त झाले होते आणि त्यांना टेहळणी बुरूज मासिक खूपच आवडलं होतं. त्यांनी मला सांगितलं, की अलिकडच्याच अंकातून ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकविधीविषयीचा एक लेख वाचल्यानंतर त्यांनी एकट्यानं स्मारक साजरा केला होता आणि ती संपूर्ण संध्याकाळ त्यांनी स्तोत्रसंहितेचं पुस्तक वाचण्यात घालवली होती. दुपारभर आमची चर्चा चालू राहिली. निघण्याआधी आमची बाप्तिस्म्याविषयी थोडक्यात चर्चा झाली. काही दिवसांनंतर मी त्यांना १९५४ सालच्या सुरवातीला होणाऱ्या विभागीय संमेलनाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण पाठवलं. ते आले आणि संमेलनात बाप्तिस्मा घेणाऱ्या २६ उमेदवारांपैकी एक बंधू पाऊली होते. असे अनुभव मला मिळतात तेव्हा आजही मला खूप आनंद होतो.
होसा: एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालच्या ऑक्टोबर महिन्यात मी पायनियर म्हणून सेवा करू लागले. बेल्जियमजवळील
अनॉर येथे सेवा केल्यानंतर मला, इरेना कोलोंस्की (आता लोर्वा) या आणखी एका पायनियर भगिनीबरोबर पॅरिसला नेमण्यात आलं. आम्ही शहराच्या अगदी मध्यभागी सेंझरमा दिप्रे मध्ये एका लहानशा खोलीत राहायचो. मी खेड्यातली मुलगी असल्यामुळे पॅरिसच्या लोकांना पाहून मला खूप आश्चर्य वाटलं. मला वाटायचं, की हे सर्व लोक खूप श्रीमंत आणि हुशार आहेत. पण त्यांना प्रचार केल्यानंतर मला समजलं, की हे लोकही इतर लोकांपेक्षा काही वेगळे नाहीत. पुष्कळदा आम्हाला वॉचमन हाकलून द्यायचे; बायबल अभ्यास सुरू करणं खूप कठीण होतं. तरीसुद्धा काही लोकांनी आमचा संदेश स्वीकारला.एकोणीसशे एक्कावन्न साली एका विभागीय संमेलनाच्या वेळी आमच्या पायनियर सेवेविषयी इरेना आणि माझी मुलाखत होती. कोणी घेतली असेल बरे आमची मुलाखत! मार्यो शुमिगा नावाच्या एका तरुण विभागीय पर्यवेक्षकाने. आम्ही आधी एकदा भेटलो होतो पण या संमेलनानंतर आमचा पत्रव्यवहार सुरू झाला. मार्यो आणि माझ्यात पुष्कळ गोष्टींत साम्य होते; जसं की आमच्या दोघांचा एकाच वर्षी बाप्तिस्मा झाला होता आणि आम्ही दोघांनी एकाच वर्षी पायनियरींग सुरू केली होती. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्हा दोघांचीही पूर्ण वेळेच्या सेवेत राहण्याची इच्छा होती. त्यामुळे प्रार्थनापूर्वक विचार केल्यानंतर जुलै ३१, १९५६ रोजी आमचं लग्न झालं. लग्नानंतर माझं जीवन खूप बदललं. मला आता फक्त पत्नीचीच भूमिका करायची नव्हती तर मार्यो यांच्याबरोबर विभागीय कार्यात जावं लागणार होतं; याचा अर्थ दर आठवडी आमचं घर बदलणार होतं. सुरवातीला मला खूप त्रास झाला परंतु भविष्यात आमच्यासाठी पुष्कळ आशीर्वाद होते.
समृद्ध जीवन
मार्यो: अनेक अधिवेशनांची तयारी करण्यास मदत करण्याचा सुहक्क आम्हाला मिळाला आहे. एकोणीसशे सहासष्ट साली बॉर्दोत झालेलं अधिवेशन माझ्या खास लक्षात राहिलं आहे. त्यावेळी, पोर्तुगालमध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर बंदी होती. त्यामुळे फ्रान्सला येऊ शकणाऱ्या साक्षीदारांच्या लाभासाठी अधिवेशन कार्यक्रम पोर्तुगीज भाषेतही सादर करण्यात आला होता. पोर्तुगालहून शेकडो ख्रिस्ती बंधूभगिनी आले होते;
या सर्वांची राहण्याची सोय कुठं करायची हा मोठा प्रश्न होता. बॉर्दोतील साक्षीदारांची घरे मोठी नसल्यामुळे आम्ही एक रिकामं चित्रपट थिअटर भाड्यानं घेतलं. आम्ही आतल्या सर्व सीट्स काढल्या आणि स्टेजचा पडदा वापरून या थिअटरच्या दोन डॉर्मेट्री बनवल्या; एक बांधवांसाठी आणि दुसरी भगिनींसाठी. आम्ही तात्पुरते शॉवर, वॉश बेसीन लावले, खाली फरशीवर वाळलेलं गवत पसरवलं आणि त्यावर कॅन्वास पसरवलं. कोणीही या व्यवस्थेविषयी तक्रार केली नाही.अधिवेशन कार्यक्रमानंतर आम्ही डॉर्मेटरीतील आपल्या बंधूभगिनींना भेटायला गेलो. तिथलं वातावरण किती सुरेख होतं. कित्येक वर्षांपासून विरोधाचा सामना करून सुद्धा ते आनंदी होते हे पाहून आम्हाला खूप उत्तेजन मिळालं! संमेलन झाल्यानंतर ते जेव्हा आपापल्या घरी जाऊ लागले तेव्हा आमच्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं.
आणखी एक सुहक्क, दोन वर्षांपूर्वी म्हणजे १९६४ साली मिळाला जेव्हा मला प्रांतीय पर्यवेक्षक म्हणून सेवा करण्यास सांगण्यात आले. पुन्हा एकदा मला, मी या कामासाठी पात्र आहे की नाही असं वाटलं. पण मग मी विचार केला की मी ही नेमणूक पूर्ण करण्यास पात्र आहे म्हणूनच तर नेमणूक देणाऱ्या बांधवांनी मला ही नेमणूक स्वीकारायला सांगितलं आहे. इतर प्रवासी पर्यवेक्षकांबरोबर जवळून कार्य करणं देखील एक उत्तम अनुभव होता. मी त्यांच्याकडून पुष्कळ काही शिकू शकलो. त्यांपैकी बहुतेक जण, यहोवाच्या नजरेत महत्त्वपूर्ण असलेले धीर आणि चिकाटी या गुणांची वास्तविक उदाहरणे आहेत. मला एक गोष्ट समजली आहे, ती म्हणजे आपण जर थांबून राहण्यास शिकलो तर आपला उपयोग कुठे करायचा ते यहोवाला बरोबर माहीत आहे.
एकोणसशे ब्याऐंशी साली, शाखा दफ्तराने आम्हाला पॅरिसच्या शहराबाहेर असलेल्या बुलोन्या-बियोंखूर येथील १२ पोलीश प्रचारकांच्या एका लहानशा गटाला मदत करण्यास सांगितलं. आम्हाला खूप आश्चर्य वाटलं. मला तशी पोलीश भाषा येत होती पण वाक्य रचना करायला जरा जड जायचं. तरीपण, या बांधवांच्या दयाळुपणामुळे व आनंदी सहकार्यामुळे मला खूप मदत मिळाली. आज या मंडळीत सुमारे १७० प्रचारक आणि जवळजवळ ६० पायनियर आहेत. नंतर, होसा आणि मी ऑस्ट्रिया, डेन्मार्क व जर्मनीतील पोलीश गटांना व मंडळ्यांनाही भेटी दिल्या.
आमची परिस्थिती बदलते
विविध मंडळ्यांना भेटी देणं, हेच आमचं जीवन होतं पण माझी तब्येत बिघडत चालल्यामुळे आम्हाला २००१ साली आमचं प्रवासी कार्य थांबवावं लागलं. माझी धाकटी बहीण रूथ जिथं राहते तिथं म्हणजे पितिव्येच्या शहरात आम्हाला एक घर मिळालं. शाखा दफ्तरानं तिथं आम्हाला खास पायनियर म्हणून नेमलं आणि आमच्या परिस्थितीमुळे आमचे तास देखील कमी केले.
होसा: विभागीय कार्य थांबवलं ते पहिले वर्ष तर मला खूप जड गेलं. हा माझ्यासाठी इतका मोठा बदल होता, की मी निरुपयोगी आहे, असं मला वाटू लागलं. पण मग मी स्वतःला आठवण करून दिली, की ‘पायनियर या नात्याने मी माझ्या वेळेचा आणि उरलेल्या शक्तीचा अजूनही उपयोग करू शकते.’ आज, आमच्या मंडळीतील इतर पायनियरांबरोबर कार्य करायला मला आनंद वाटतो.
यहोवानं नेहमी आमची काळजी घेतली
मार्यो: गेल्या ४८ वर्षांपासून होसा माझी सोबतीण आहे म्हणून मी यहोवाचे खूप आभार मानतो. प्रवासी कार्यातील सर्व वर्षांत तिनं मला खूप आधार दिला आहे. ‘आपलं स्वतःचं घर असतं तर किती बरं झालं असतं!’ असं तिनं एकदाही म्हटल्याचं मला आठवत नाही.
होसा: कधीकधी लोक मला म्हणायचे, “तुमचं सर्वसामान्य जीवन नाहीए. तुम्हाला नेहमी दुसऱ्याच्या घरी राहावं लागतं.” पण “सर्वसामान्य जीवन” नेमकं आहे तरी काय? पुष्कळदा आपण स्वतःभोवती इतक्या गोष्टी गोळा करून ठेवतो, की नंतर त्या आध्यात्मिक कार्यांत एक बाधा ठरू शकतात. आपल्याला लागतं तरी काय, एक चांगली खाट, एक टेबल आणि दररोज लागणाऱ्या काही किरकोळ वस्तू. पायनियर या नात्यानं आमच्याजवळ खूप कमी भौतिक वस्तू होत्या हे खरं आहे परंतु यहोवाची इच्छा पूर्ण स्तोत्र ३४:१० मधील शब्द सांगायचे, जिथं म्हटलं आहे: “परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याहि चांगल्या वस्तूची वाण पडत नाही.” यहोवानं नेहमी आमची काळजी घेतली आहे.
करण्यासाठी लागणारं सर्व काही आमच्याजवळ होतं. कधीकधी मला विचारलं जायचं: “स्वतःचं घर नाही, पेन्शन नाही मग म्हातारं झाल्यावर तुमचं कसं होणार?” तेव्हा मी त्यांनामार्यो: होय. यहोवानं खरंच आमची काळजी घेतली आहे. उलट, आम्हाला जितकं लागतं त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक त्यानं आम्हाला दिलं आहे. जसं की, १९५८ साली न्यूयॉर्क मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनासाठी आमच्या विभागाचा प्रतिनिधी म्हणून मला निवडण्यात आलं. परंतु, होसाचं तिकीट काढण्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते. एके संध्याकाळी एका बांधवानं आम्हाला एक पाकीट दिलं ज्यावर “न्यूयॉर्क” असं लिहिलं होतं. त्या पाकीटातल्या पैशामुळे होसा माझ्याबरोबर अधिवेशनाला येऊ शकली!
होसा आणि मला, यहोवाच्या सेवेत आम्ही खर्च केलेल्या वर्षांचा मुळीच पस्तावा नाही. आम्ही काहीच गमावले नाही पण सर्व मिळवले—पूर्ण वेळेच्या सेवेतील समाधानकारक व आनंदी जीवन. यहोवा खरोखरच एक अद्भुत देव आहे. आम्ही त्याच्यावर पूर्णपणे भरवसा ठेवायला शिकलो आहोत आणि त्याच्याबद्दलचं आमचं प्रेम वाढलं आहे. आपल्या काही ख्रिस्ती बांधवांना त्यांच्या विश्वासूपणाबद्दल आपल्या जीवास मुकावं लागलं. परंतु, मला वाटतं, की एक व्यक्ती दररोज यहोवाच्या सेवेत आपल्या जीवनाचं थोडं थोडं बलिदान देऊ शकते. होसा आणि मी आतापर्यंत हेच करायचा प्रयत्न केला आहे आणि भविष्यातही करीत राहू असं आम्ही ठरवलं आहे.
[तळटीप]
^ परि. 14 “मी ‘मृत्यू मोर्चातून’ जिवंत वाचलो” ही लुई केशुताची जीवन कथा, टेहळणी बुरूज (इंग्रजी) ऑगस्ट १५, १९८० च्या अंकात छापण्यात आली आहे.
[२० पानांवरील चित्र]
सुमारे १९३० साली, फ्राँस्वा आणि ॲना शुमिगा, स्तिफॅनी, स्तिफॅन, मिलॅनी आणि मार्यो या आपल्या मुलांसमवेत. मार्यो स्टूलावर उभा आहे
[२२ पानांवरील चित्र]
वर: १९५० साली उत्तर फ्रान्सच्या आर्मोख्येरमधील बाजारातील एका गाडीवर बायबल प्रकाशनांचे प्रदर्शन करताना
[२२ पानांवरील चित्र]
डावीकडे: १९५० साली स्तिफॅन बेह्युनीक मार्यो यांच्याबरोबर
[२३ पानांवरील चित्र]
मार्यो आणि होसा आपल्या लग्नाच्या आदल्या दिवशी
[२३ पानांवरील चित्र]
होसा (डावीकडून पहिली) आपली पायनियर सोबतीण इरेन (डावीकडून चवथी), दोघी १९५१ मध्ये एका संमेलनाची जाहीरात करताना
[२३ पानांवरील चित्र]
विभागीय भेटींच्या वेळचा प्रवास सहसा सायकलींवरच असायचा