हा नुसता खेळ नव्हे
हा नुसता खेळ नव्हे
मुलांना खेळायला आवडते. पण, वाढते मूल (इंग्रजी) नावाचे पुस्तक म्हणते: “क्रीडा ही, एक क्षुल्लक किंवा निरर्थक क्रिया नव्हे. याच क्रियेच्या आधारावर, मुलांच्या ज्ञानशक्तीचा विकास होत असतो.” खेळामुळे मुले आपल्या ज्ञानेंद्रियांचा वापर करायला, आपल्या भोवतालचा परिसर समजून घ्यायला आणि इतरांबरोबर दळणवळण करायला शिकतात.
मुले चार किंवा पाच वर्षांची झाल्यावर, खेळताना ती प्रौढांचे अनुकरण करू लागतात. येशू एकदा खेळत असलेल्या मुलांविषयी बोलला. काहींना ‘लग्न-लग्न’ खेळायचे होते तर काहींना ‘अंत्यसंस्कार विधी’ करायचा होता; तर काहींना खेळायचे नव्हते म्हणून मग त्यांच्यात नेहमीप्रमाणे भांडणे होत होती. (मत्तय ११:१६, १७) अशाप्रकारचे खेळ खेळल्याने वाढत असलेल्या मुलांच्या मनावर अर्थपूर्ण भूमिकांची छाप पडू शकते.
चित्रातल्या मुली, एक बायबल शिक्षिका आणि दुसरी विद्यार्थीनी असा खेळ खेळत आहेत. त्यांचा खरा बायबल अभ्यास चाललेला नाही, परंतु बायबलचा संदेश इतरांना सांगितला पाहिजे ही गोष्ट मात्र त्यांच्या मनात स्पष्ट आहे. हा धडा सर्वात महत्त्वाचा आहे कारण येशूने आपल्या सर्व अनुयायांना शिष्य बनवण्याची व शिकवलेल्या गोष्टी पाळण्यास इतरांना शिकवण्याची आज्ञा दिली आहे.—मत्तय २८:१९, २०.
बायबल अभ्यास संचालित करणे, भाषण देणे, घरोघरी जाऊन प्रचार करणे यांसारखे खेळ खेळायला आवडणाऱ्या मुलांच्या पालकांना अभिमान वाटला पाहिजे. प्रौढांचे अनुकरण करण्याची प्रवृत्ती मुलांमध्ये जात्याच असते. बायबलवर आधारित असलेले त्यांचे खेळ सिद्ध करतात, की त्यांना ‘प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवले’ जात आहे.—इफिसकर ६:४.
मुलांनी देखील खऱ्या उपासनेत भाग घ्यावा अशी यहोवाची इच्छा आहे. नियमशास्त्र वाचले जात असताना, ‘बालकांनाही’ जमवण्याची आज्ञा त्याने मोशेला दिली. (अनुवाद ३१:१२) आपल्यालाही सामील केले जाते, असे जेव्हा मुलांना जाणवते तेव्हा ते त्यांच्या खेळांवरून दिसून येते. शिवाय, देवाचा सेवक असल्याचा खेळ खेळणारे मूल, सेवक होण्याच्या मार्गावरील पहिले पाऊल उचलत असते.