व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या शासनाची बाजू घेण्याचा आम्ही पक्का निर्णय घेतला

देवाच्या शासनाची बाजू घेण्याचा आम्ही पक्का निर्णय घेतला

जीवन कथा

देवाच्या शासनाची बाजू घेण्याचा आम्ही पक्का निर्णय घेतला

मिखाल झोब्राक यांच्याद्वारे कथित

एकांतवासात एक महिना घालवल्यानंतर मला चौकशी करणाऱ्‍याकडे नेण्यात आलं. रागानं लालबुंद होऊन तो माझ्यावर खेकसला: “हेर कुठले! तुम्ही अमेरिकी हेर आहात!” पण तो इतका का चिडला होता? कारण, त्यानं मला जेव्हा विचारलं, की मी कोणत्या धर्माचा आहे, तेव्हा मी त्याला, ‘मी एक यहोवाचा साक्षीदार आहे,’ असं उत्तर दिलं होतं.

या गोष्टीला झाले आता पन्‍नासपेक्षा अधिक वर्षं. त्या काळी मी राहत असलेल्या देशावर कम्युनिस्टांचे राज्य होते. पण याआधी आमच्या ख्रिस्ती शैक्षणिक कार्याबद्दल आम्ही भयंकर स्वरूपाचा छळ सहन केला होता.

युद्धाचा वेदनादायक दंश

१९१४ साली पहिले महायुद्ध सुरू झाले; तेव्हा मी आठ वर्षांचा होतो. त्या काळी झॉलुझीट्‌स या माझ्या गावावर ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्याची राजसत्ता होती. युद्धानं फक्‍त जगाचेच दृश्‍य बदलले नाही तर माझं बालपणही कुरतडून टाकलं. सैनिक असलेले माझे बाबा युद्धाच्या पहिल्याच वर्षी मरण पावले. यामुळे, आई, माझ्या दोन लहान बहिणी आणि मी, आम्ही अगदी रस्त्यावरच आलो. मी घरात मोठा, त्यातल्या त्यात मुलगा असल्यामुळे शेतातील, घरातील कामं माझ्यावरच पडली. लहानपणापासून मी धार्मिक प्रवृत्तीचा होतो. आमच्या रिफॉर्म्ड (कॅल्व्हनिस्ट) चर्चचा पाळक तर मला, त्यांच्या गैरहजेरीत माझ्या शाळासोबत्यांचा वर्ग घेण्यासही सांगायचे.

१९१८ साली पहिलं महायुद्ध समाप्त झालं आणि आम्ही सुटकेचा निःश्‍वास टाकला. ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्याला उलथून टाकण्यात आलं होतं आणि आम्ही चेकोस्लोव्हाकियाच्या प्रजासत्ताकाचे नागरिक बनलो. आमच्या भागातले अमेरिकेला जाऊन राहिलेले पुष्कळ लोक मायदेशी परतले. यांपैकी एक होते मिखाल पेत्रिक; १९२२ साली ते आमच्या गावात आले. एकदा ते आमच्या शेजारच्या घरी आले होते तेव्हा आमच्या शेजाऱ्‍यांनी मला आणि आईला बोलवलं.

देवाचं राज्य आमच्यासाठी वास्तविक बनलं

मिखाल एक बायबल विद्यार्थी होते; यहोवाच्या साक्षीदारांना पूर्वी हे नाव होतं. ते अनेक महत्त्वपूर्ण बायबल विषयांवर बोलले ज्यांविषयी माझं कुतूहल वाढू लागलं. यांपैकी सर्वात महत्त्वाचा विषय होता, यहोवाच्या येणाऱ्‍या राज्याचा विषय. (दानीएल २:४४) येत्या रविवारी झाहोर गावात एक ख्रिस्ती सभा असेल असे जेव्हा ते म्हणाले तेव्हाच मी त्या सभेला उपस्थित राहण्याचा निश्‍चय केला. मी पहाटे ४ वाजता उठलो आणि माझ्या एका भावाच्या घरी त्याची सायकल घेऊन जाण्यासाठी म्हणून आठ किलोमीटर चालत गेलो. सायकलीचं पंक्चर दुरुस्त केल्यानंतर मग मी सायकलवरून झाहोरपर्यंत आणखी २४ किलोमीटर पुढे गेलो. सभा नक्की कुठं भरणार होती हे मला माहीत नसल्यामुळे, मी रस्त्यावरून हळूहळू सायकल चालवत होतो. इतक्यात मला एका घरात काही लोक राज्य गीत गात असल्याचा आवाज आला. मला खूप आनंद झाला. मी त्या घरात गेलो आणि मी का आलो होतो ते त्यांना सांगितलं. त्यानंतर त्या घरातल्या कुटुंबानं मला त्यांच्याबरोबर न्याहारी करण्याचं आमंत्रण दिलं आणि मग मला सभेलाही नेलं. मला सायकलवरून आणि मग पायी ३२ किलोमीटर पुन्हा परतीचा प्रवास करावा लागला होता तरीपण मी अजिबात थकलो नव्हतो.—यशया ४०:३१.

यहोवाच्या साक्षीदारांनी दिलेली स्पष्ट, बायबल आधारित स्पष्टीकरणे मला खूप आवडली. देवाच्या राज्यशासनात परिपूर्ण व समाधानकारक जीवन जगण्याच्या आशेचा माझ्यावर गहिरा प्रभाव पडला. (स्तोत्र १०४:२८) आईनं व मी चर्चला राजीनाम्याचं पत्र देण्याचं ठरवलं. यामुळे आमच्या गावात बरीच खळबळ माजली. काही लोकांनी आमच्याबरोबर काही काळपर्यंत बोलणंच सोडून दिलं; तरीपण आमच्या भागात राहणाऱ्‍या अनेक साक्षीदारांबरोबर आम्ही संगती करू शकलो. (मत्तय ५:११, १२) त्यानंतर काही दिवसांतच ऊ नदीत माझा बाप्तिस्मा झाला.

ख्रिस्ती सेवाकार्य आमचं जीवन बनलं

मिळेल त्या प्रत्येक संधीला आम्ही यहोवाच्या राज्याचा प्रचार करू लागलो. (मत्तय २४:१४) आम्ही खासकरून रविवारच्या दिवशी सुनियोजित प्रचार मोहिमांवर जास्त भर द्यायचो. पूर्वीचे लोक सकाळी लवकर उठत, त्यामुळे आम्हालाही आमचं प्रचार कार्य लवकर सुरू करता यायचं. मग दिवसा एक सार्वजनिक सभा भरवली जायची. तिथं भाषण देणारे बायबल शिक्षक बहुधा पूर्व तयारीशिवाय आयत्यावेळी भाषण द्यायचे. जमलेले आस्थेवाईक लोक कोण होते, त्यांची धार्मिक पार्श्‍वभूमी काय आहे, त्यांना कोणते विषय आवडतील, या सर्व गोष्टींचा विचार करूनच मग ते भाषण द्यायचे.

आम्ही प्रचार करत असलेल्या बायबल सत्यांमुळे पुष्कळ प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांचे डोळे उघडले. माझा बाप्तिस्मा झाल्यानंतर मी ट्रहोविश्‍ट या गावात प्रचार करू लागलो. एका घरात मी, मिसेस. सुझॅना मोस्कल नावाच्या एका अतिशय दयाळु व प्रेमळ स्त्रीशी बोललो. ती आणि तिचे कुटुंब माझ्याप्रमाणेच कॅल्व्हनिस्ट होते. तिला बायबलचे बऱ्‍यापैकी ज्ञान होते तरीपण तिच्या मनात बायबलविषयी अनेक प्रश्‍न होते ज्यांची उत्तरे तिला मिळाली नव्हती. एक तासभर आमची चर्चा चालली; त्यानंतर मी तिला देवाची वीणा (इंग्रजी) हे पुस्तक दिले. *

मोस्कल्स कुटुंबाने लगेच आपल्या नियमित बायबल-वाचन सत्राच्या वेळी हे पुस्तकही वाचायला सुरवात केली. या गावातील अनेक कुटुंबे आस्था दाखवू लागली आणि आमच्या सभांना उपस्थित राहू लागली. हे पाहून त्यांच्या कॅल्व्हनिस्ट सेवकानं आमच्याबद्दल आणि आमच्या साहित्याबद्दल त्यांना सक्‍त ताकीद दिली. मग काही आस्थेवाईक लोकांनी त्याला असं सुचवलं, की तुम्ही त्यांच्या सभांना जा आणि तिथं आपण एक सार्वजनिक वादविवाद ठेवू या, तिथं तुम्ही त्यांच्या शिकवणुकी खोट्या आहेत हे सिद्ध करून दाखवा.

सेवक आला खरा परंतु त्याला बायबलमधून आपल्या शिकवणुकींना आधार देणारा एकही वाद मांडता आला नाही. मग स्वतःची बाजू सावरण्यासाठी तो म्हणू लागला: “आपण बायबलमधल्या सर्वच गोष्टींवर विश्‍वास ठेवू शकत नाही. ते मानवांनी लिहिलं होतं आणि धार्मिक प्रश्‍नांचे वेगवेगळ्या प्रकारे स्पष्टीकरण दिले जाऊ शकते.” बस्स, हा अनेकांसाठी एक महत्त्वाचा क्षण ठरला. काहींनी या सेवकाला सांगून टाकलं, की तुम्ही बायबलवर विश्‍वास ठेवत नाही, मग आम्ही इथूनपुढे तुमचे उपदेश ऐकायला येणार नाही. अशाप्रकारे त्यांनी कॅल्व्हनिस्ट चर्चबरोबर आपले सर्व संबंध तोडून टाकले आणि या गावातील सुमारे ३० जणांनी बायबल सत्याच्या बाजूने खंबीर भूमिका घेतली.

राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करणं आमचा जीवनमार्ग बनला होता; त्यामुळे साहजिकच या कार्यात मला साथ देईल अशीच, एखाद्या आध्यात्मिकरीत्या मजबूत कुटुंबातली मुलगी मी शोधू लागलो. सेवेमध्ये माझ्याबरोबर बंधू यान पेत्रुश्‍का यायचे; त्यांना अमेरिकेत सत्य मिळाले होते. त्यांची मुलगी मारीया अगदी आपल्या वडिलांप्रमाणे सर्वांना साक्ष द्यायला तयार असायची; हे पाहून मी खूप प्रभावीत झालो होतो. १९३६ साली आमचं लग्न झालं आणि पुढील ५० वर्षांपर्यंत १९८६ साली तिचा मृत्यू होईपर्यंत मारीया माझी विश्‍वासू पत्नी राहिली. १९३८ साली आमच्या एकुलत्या एका पुत्राचा, एड्‌वर्टचा जन्म झाला. पण त्या वेळी युरोपमध्ये आणखी एका युद्धाचे ढग जमत होते. याचा आमच्या प्रचार कार्यावर कसा परिणाम होणार होता?

आमच्या ख्रिस्ती तटस्थेची कसोटी

दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा स्लोव्हाकिया जो एक वेगळा देश बनला, त्यावर नात्सींचा कब्जा होता. तरीपण यहोवाच्या साक्षीदारांवर संघटन या नात्याने कोणतीही विशिष्ट सरकारी कार्यवाही करण्यात आली नाही. अर्थात आम्हाला आमचं काम गुप्तपणे करावं लागायचं; आमच्या प्रकाशनांवर नियंत्रण (सेन्सर) केले जायचे. पण आम्ही अतिशय सावधगिरी बाळगून आमची कार्ये करत होतो.—मत्तय १०:१६.

युद्ध उग्र स्वरूप घेऊ लागलं तेव्हा मला सैन्यात भरती होण्याचा हुकूम देण्यात आला; मी ३५ वर्षांचा झालो होतो तरीसुद्धा. माझ्या ख्रिस्ती तटस्थतेमुळे मी युद्धात भाग घेण्यास नकार दिला. (यशया २:२-४) पण आनंदाची गोष्ट म्हणजे, माझ्या बाबतीत काय करावं याचा निर्णय घेण्याआधीच माझ्या वयोगटातल्या सर्वांना मुक्‍त करण्यात आलं.

आम्ही जे ग्रामीण भागात राहात होतो त्यापेक्षा शहरात राहणाऱ्‍या बांधवांचे हाल होत होते, हे आम्हाला कळलं. त्यामुळे आमच्याजवळ जे होतं त्यातलं त्यांनाही देण्याची आमची इच्छा होती. (२ करिंथकर ८:१४) त्यामुळे, आम्हाला होईल तितके अन्‍न पदार्थ घेऊन आम्ही ५०० पेक्षा अधिक किलोमीटरचा प्रवास करून ब्रॅटीस्लावाला जात असू. त्या युद्धाच्या वर्षांमध्ये आमचे जे ख्रिस्ती मैत्रीचे व प्रीतीचे बंध तयार झाले ते येणाऱ्‍या कठीण काळांत आम्हाला टिकवून ठेवणार होते.

आवश्‍यक उत्तेजन मिळणं

दुसऱ्‍या महायुद्धानंतर, स्लोव्हाकिया पुन्हा चेकोस्लाव्हाकियाचा एक भाग बनले. १९४६ पासून १९४८ पर्यंत, संपूर्ण राष्ट्रांत, बर्नो अथवा प्रागमध्ये यहोवाच्या साक्षीदारांची अधिवेशने भरवण्यात आली. पूर्वेकडील स्लोव्हाकियातील आम्ही अधिवेशन प्रतिनिधींसाठी ठरवण्यात आलेल्या खास ट्रेनने प्रवास केला. तुम्ही या ट्रेनना गाणाऱ्‍या ट्रेन म्हणू शकता कारण संपूर्ण प्रवासात आम्ही गात होतो.—प्रेषितांची कृत्ये १६:२५.

बर्नोत १९४७ साली झालेले अधिवेशन मला अजूनही आठवते जेव्हा मुख्यालयातून आलेले बंधू नेथन नॉर यांच्यासहित तीन ख्रिस्ती पर्यवेक्षक उपस्थित होते. जाहीर भाषणाची जाहिरात करण्याकरता आमच्यातील अनेकजण भाषणाचा विषय लिहिलेले प्लाकाड्‌र्स गळ्यात अडकवून शहरातून फिरत होतो. आमचा मुलगा एड्‌वर्ट तेव्हा नऊ वर्षांचा होता; आपल्याला प्लाकार्ड मिळाले नाही म्हणून तो तेव्हा रुसला होता. त्यामुळे मग बांधवांनी लहान आकाराचे प्लाकार्ड बनवले आणि फक्‍त एड्‌वर्टलाच नव्हे तर बऱ्‍याच मुलांना दिले. मग काय, भाषणाच्या जाहिरातीचे प्लाकार्ड गळ्यात अडकून अगदी उत्साहनं मुलांनी देखील भाषणाची जाहिरात केली!

१९४८ सालच्या फेब्रुवारी महिन्यात कम्युनिस्ट सत्तेवर आले. आम्हाला माहीत होतं, की आमची सेवा थांबवण्यासाठी सरकार आज ना उद्या पाऊल उचलेलच. १९४८ सालच्या सप्टेंबर महिन्यात प्रागमध्ये एक अधिवेशन भरवण्यात आले; एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य मिळून तीनच वर्ष झाली असताना, पुन्हा आमच्या सार्वजनिक मेळाव्यांवर एक बंदी येणार हे माहीत असल्यामुळे आम्ही सगळेच भावनाविवश होतो. अधिवेशनाहून निघण्याआधी आम्ही एक करार केला; ज्याच्या एका भागात असे म्हटले होते: “आम्ही येथे जमलेल्या यहोवाच्या साक्षीदारांनी . . . ही पवित्र सेवा आणखी वाढवत राहण्याचे ठरवले आहे आणि प्रभूच्या दयेने, यात सुवेळी-अवेळी आणि परीक्षेतही टिकून राहण्याचे व अधिक जोमाने देवाच्या राज्याच्या शुभवर्तमानाची घोषणा करण्याचे ठरवले आहे.”

“राष्ट्राचे शत्रू”

प्राग अधिवेशनाच्या फक्‍त दोनच महिन्यांनंतर गुप्त पोलिसांनी प्रागजवळील बेथेल गृहावर धाड टाकली. त्यांनी मालमत्ता आणि मिळेल ते साहित्य जप्त केले आणि सर्व बेथेल सदस्यांना व इतर काही बांधवांना अटक केली. एवढ्यावरच हे थांबले नाही.

१९५२ सालच्या फेब्रुवारी ३-४ च्या रात्री, सुरक्षा दलाने देश पिंजून काढला आणि १०० पेक्षा अधिक साक्षीदारांना अटक केली. मी त्यांच्यापैकी एक होतो. पहाटे तीन वाजता पोलिस आमच्या घरी आल्यामुळे आम्ही सर्व जागे झालो. कसलेही स्पष्टीकरण न देता त्यांनी मला त्यांच्याबरोबर यायला सांगितलं. हातात बेड्या घालून व डोळ्यावर पट्टी बांधून त्यांनी मला इतर अनेकांबरोबर ट्रकच्या मागच्या बाजूला टाकलं. अशाप्रकारे मला त्यांनी एकांतवासात टाकलं.

एक संपूर्ण महिना मी कुणाबरोबरही बोललो नव्हतो. मला फक्‍त एक रक्षक दिसायचा जो दाराच्या एका फटीतून माझं जेवणाचं ताट आत सरकवायचा; जेवणसुद्धा किती कमी असायचं. मग मला, मी लेखाच्या सुरवातीला सांगितल्याप्रमाणे चौकशी करणाऱ्‍या अधिकाऱ्‍यासमोर हजर राहण्याचा हुकूम देण्यात आला. मला हेर म्हटल्यानंतर तो पुढे म्हणाला: “धर्म म्हणजे निव्वळ अडाणीपणा आहे. देव-बीव काही नसतं! आम्ही तुम्हाला असं आमच्या कर्मचारी वर्गाला फसवू देणार नाही. तुम्हाला एकतर फाशी होईल नाहीतर तुरुंगातच तुम्ही खितपत पडाल. आणि तुमचा देव जर आला तर आम्ही त्यालाही ठार मारू!”

आमची ख्रिस्ती कार्ये थांबवण्यासाठी कोणताही विशिष्ट कायदा नाही हे या अधिकाऱ्‍यांना माहीत असल्यामुळे, त्यांनी आमच्या कार्यांना दुसरं नाव देण्याचा प्रयत्न केला जेणेकरून आहेत ते कायदे त्यांना लागू करता येतील; जसे की त्यांनी, आम्ही “राष्ट्राचे शत्रू,” किंवा विदेशी हेर आहोत असं आमचं चित्रं रेखाटण्याचा प्रयत्न केला. असं करण्यासाठी त्यांना आमची इच्छाशक्‍ती तोडावी लागणार होती आणि मग आमच्याविरुद्ध लावलेले आरोप केल्याची “कबुली” आमच्याकडून त्यांना हवी होती. त्या रात्रीच्या चौकशीनंतर त्यांनी मला झोपू दिलं नाही. काही तासांनंतर पुन्हा त्यांनी माझी चौकशी सुरू केली. यावेळी चौकशी करणाऱ्‍या अधिकाऱ्‍याची अशी इच्छा होती, की मी एका दस्तऐवजावर सही करावी ज्यावर असे लिहिले होते: “मी पिपल्स डेमोक्रॅटिक चेकोस्लोव्हाकियाचा शत्रू असल्यामुळे [कम्युनिस्ट सरकारात] सामील झालो नाही कारण मी अमेरिकन लोकांची वाट पाहत होतो.” या खोट्या विधानावर सही करण्यास मी नकार दिला तेव्हा त्यांनी माझी सुधारकोठडीत रवानगी केली.

मला झोपायची, खाली पडायची किंवा बसायची सुद्धा बंदी होती. फक्‍त उभं राहून इकडे तिकडे फिरायची परवानगी मला होती. मी जेव्हा पार थकून गेलो तेव्हा मी सिमेंटच्या जमिनीवर खाली झोपलो. तेव्हा रक्षकांनी मला पुन्हा चौकशी करणाऱ्‍या अधिकाऱ्‍याकडे नेलं. “आता तरी करशील का सही?” असं या अधिकाऱ्‍यानं मला विचारलं. मी जेव्हा पुन्हा नकार दिला तेव्हा त्यानं माझ्या तोंडावरच एक ठोसा मारला. माझ्या तोंडातून रक्‍त येऊ लागलं. मग रक्षकांना गुरगुरत म्हणाला: “हा स्वतःचा जीव घेऊ पाहतोय. याच्यावर कडक नजर ठेवा!” मला पुन्हा एकांतवासात टाकण्यात आलं. सहा महिन्यांपर्यंत वेगवेगळ्या प्रसंगी अनेकदा अशाप्रकारचे चौकशी सत्र चालू होते. मी राष्ट्राचा शत्रू आहे असं मला कबूल करायला लावणाऱ्‍या कोणत्याही प्रकारच्या मतपरिवर्तनाच्या प्रयत्नांमुळे, यहोवाशी एकनिष्ठ राहण्याचा माझा निश्‍चय कमी झाला नाही.

न्यायचौकशीसाठी जाण्याच्या एक महिना आधी प्रागहून एक प्रॉसिक्यूटर आले आणि १२ बांधवांचा एक गट असलेल्या आमच्या प्रत्येकाची त्यांनी चौकशी केली. त्यांनी मला विचारलं: “पाश्‍चिमात्य राष्ट्रांच्या गटानं आपल्या राष्ट्रावर हल्ला केल्यास तुम्ही काय कराल?” मी त्यांना उत्तर दिलं: “या राष्ट्रानं हिटलरसोबत मिळून युएसएसआरवर जेव्हा हल्ला तेव्हा मी जे केलं तेच. तेव्हाही मी लढलो नाही आणि आताही मी लढणार नाही कारण मी एक ख्रिस्ती आहे आणि तटस्थ आहे.” मग ते मला म्हणाले: “आम्ही यहोवाच्या साक्षीदारांना खपवून घेऊ शकत नाही. आम्हाला सैनिकांची गरज आहे, पाश्‍चिमात्य राष्ट्रांच्या गटानं आमच्यावर हल्ला केला तर? शिवाय पाश्‍चिमात्य देशांत असलेल्या आमच्या कर्मचारी वर्गाला सोडवण्यासाठी आम्हाला सैनिक हवेत!”

जुलै २४, १९५३ रोजी, आम्हाला न्यायालयात नेण्यात आलं. एकापाठोपाठ एक असे आम्हा १२ जणांना न्यायाधीशांच्या मंडळासमोर उभं करण्यात आलं. प्रत्येकानं आपल्या विश्‍वासाची साक्ष देण्यासाठी आलेल्या संधीचा फायदा घेतला. आमच्यावर लादलेल्या खोट्या आरोपांवर आम्ही आमची बाजू मांडल्यानंतर, एक वकील उभे राहिले आणि म्हणाले: “मी या न्यायालयात अनेकदा खटले लढलो आहे. सहसा, कबुलीजबाब, पश्‍चात्ताप, अश्रू गाळणे यासर्व गोष्टी इथं बहुतप्रमाणात होतात. पण हे लोक इथून जातील तर ते पहिल्यापेक्षा अधिक निगरगट्ट होतील असं मला वाटतं.” नंतर, आम्हा १२ जणांवर राज्याविरुद्ध कट रचण्याचा आरोप लावण्यात आला. मला तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आणि माझी सर्व मालमत्ता मला राष्ट्राला सुपूर्त करावी लागली.

वृद्धावस्था मला थांबवू शकली नाही

तुरुंगातून सुटून मी घरी आलो तरीपण गुप्त पोलीस माझ्यावर कडक पाळत ठेवायचे. असे असूनही मी माझी ईश्‍वरशासित कार्ये चालू ठेवली; आमच्या मंडळीत आध्यात्मिक देखरेख करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. आमच्या जप्त केलेल्या घरात आम्हाला राहण्याची परवानगी दिली होती; कम्युनिस्ट राज्याच्या पाडावानंतर म्हणजे जवळजवळ ४० वर्षांनंतर कायदेशीररीत्या आम्हाला हे घर पुन्हा मिळालं.

आमच्या कुटुंबात फक्‍त मलाच तुरुंगाचा अनुभव आला असे नाही. मला घरी येऊन तीनच वर्ष झाली होती तेव्हा एड्‌वर्टला सैन्यात भरती होण्याचा हुकूम देण्यात आला. त्याच्या बायबल-प्रशिक्षित विवेकामुळे त्याने याला नकार दिल्यामुळे त्याला तुरुंगात डांबण्यात आलं. अनेक वर्षांनंतर, माझा नातू, पीटर याची तब्येत चांगली नसायची तरीसुद्धा त्याला असाच अनुभव आला.

१९८९ साली चेकोस्लोव्हाकियातील कम्युनिस्ट सरकार पडले. चाळीस वर्षांच्या बंदीनंतर मी मुक्‍तपणे घरोघर प्रचार करू शकलो, तेव्हा मला किती आनंद झाला होता! (प्रेषितांची कृत्ये २०:२०) माझ्या तब्येतीनं मला साथ दिली तोपर्यंत मी अशा सेवेचा आनंद लुटला. आता मी ९८ वर्षांचा आहे; माझी तब्येत आता पहिल्यासारखी नाही पण निदान, भवितव्यासाठी यहोवाने दिलेल्या गौरवशाली अभिवचनांची मी लोकांना अजूनही साक्ष देऊ शकतो म्हणून मला आनंद वाटतो.

मी मोजून पाहिले, तर पाच वेगवेगळ्या राष्ट्रांच्या १२ प्रमुखांनी माझ्या गावावर राज्य केले. यांत, हुकूमशाही, अध्यक्ष आणि एक राजा यांचा समावेश होता. पण यांपैकी एकालाही, त्यांच्या शासनातील लोक ज्या समस्यांनी जर्जर झाले होते त्या समस्यांवर कायमचा उपाय करता आला नाही. (स्तोत्र १४६:३, ४) यहोवानं माझ्या तरुणपणीच मला त्याची ओळख घडवल्याबद्दल मी त्याचे शतशः आभार मानतो. यामुळेच मी, त्याच्या मशिही राज्याद्वारे तो पुरवत असलेल्या उपायांविषयी समजू शकलो आणि देवाविना असलेले व्यर्थ जीवन जगण्याचे टाळू शकलो. ७५ पेक्षा अधिक वर्षांपासून मी सर्वोत्तम सुवार्तेचा सक्रियपणे प्रचार करत आलो आहे; यामुळे माझ्या जीवनात एक उद्देश आहे; माझं जीवन समाधानी झालं आहे आणि मला पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची उज्जवल आशा मिळाली आहे. याव्यतिरिक्‍त मी देवाजवळ आणखी काय मागू? *

[तळटीपा]

^ परि. 14 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले, परंतु सध्या छापले जात नाही.

^ परि. 38 दुःखाची गोष्ट म्हणजे, हा लेख प्रकाशित करण्यासाठी तयार होत असताना, बंधू मिखाल झोब्राक यांची जीवनयात्रा संपली. ते शेवटपर्यंत विश्‍वासू होते; आणि पुनरुत्थानाच्या आशेवर त्यांचा भक्कम विश्‍वास होता.

[२६ पानांवरील चित्र]

आमच्या लग्नानतंर

[२६ पानांवरील चित्र]

१९४० सालच्या सुरवातीला एड्‌वर्टबरोबर

[२७ पानांवरील चित्र]

१९४७ साली बर्नोतील अधिवेशनाची जाहिरात करताना