व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“फ्रेंडली आयलंड्‌स” म्हटल्या जाणाऱ्‍या टाँगा बेटांवर देवाचे मित्र

“फ्रेंडली आयलंड्‌स” म्हटल्या जाणाऱ्‍या टाँगा बेटांवर देवाचे मित्र

“फ्रेंडली आयलंड्‌स” म्हटल्या जाणाऱ्‍या टाँगा बेटांवर देवाचे मित्र

१९३२ साली एका गलबतावरून अतिशय मौल्यवान बीजे टाँगात आणण्यात आली. या गलबताच्या खलाशाने “मृत कोठे आहेत?” ही पुस्तिका चार्ल्स वेटला दिली. पुस्तिका वाचल्यावर आपल्याला सत्य मिळाल्याची चार्ल्सला खात्री पटली. काही काळानंतर, यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयाने, आपल्याला आपल्या मायबोलीत या पुस्तिकेचे भाषांतर करू द्यावे, ही चार्ल्सची विनंती मान्य केली. हे कार्य पूर्ण झाल्यावर, चार्ल्सला १,००० छापील पुस्तिका पाठवण्यात आल्या व तो त्यांचे वितरण करू लागला. अशाप्रकारे, टाँगा राज्यात यहोवाच्या राज्याच्या बियांचा प्रसार व्हायला सुरुवात झाली.

दक्षिण पॅसिफिकच्या नकाशावर तुम्हाला टाँगा, आंतरराष्ट्रीय वार रेषा मकरवृत्ताला जेथे जाऊन मिळते तेथे पश्‍चिमेला असल्याचे दिसून येईल. टाँगाचे सर्वात मोठे बेट, टाँगाटापू आहे जे न्यूझीलंड, ऑक्लंडच्या ईशान्येकडे सुमारे २,००० किलोमीटरवर आहे. टाँगा १७१ बेटांचा समूह आहे; यांपैकी ४५ बेटांवर मनुष्यवस्ती आहे. १८ व्या शतकातला नामवंत ब्रिटिश संशोधक जेम्स कुक याने या दूरवर असलेल्या द्वीपसमूहाला फ्रेंडली आयलंड्‌स (मनमिळाऊ बेटे) हे नाव दिले.

टाँगातील लोकसंख्या १,०६,००० इतकी आहे; टाँगा तीन द्वीप गटांचे मिळून बनलेले आहे—यांत प्रामुख्याने टाँगाटापू, हापाई आणि वावाऊ ही आहेत. यहोवाच्या साक्षीदारांच्या पाच स्थानीय मंडळ्यांपैकी तीन मंडळ्या, सर्वात लोकप्रिय असलेल्या टाँगाटापू गटांत आहेत आणि एक हापाईत आहे व एक वावाऊत आहे. तेथील लोकांना देवाचे मित्र होण्यास मदत करण्यासाठी, टाँगाची राजधानी नुकुआलोफाच्याजवळ यहोवाच्या साक्षीदारांचे एक मिशनरी गृह आणि भाषांतर कार्यालय आहे.—यशया ४१:८.

१९६४ सालापर्यंत चार्ल्स वेट याने बाप्तिस्मा घेतला नव्हता तरीसुद्धा, १९३० च्या दशकापासूनच सर्व लोक त्याला यहोवाचा साक्षीदार म्हणून ओळखत होते. इतरही त्याच्याबरोबर साक्षकार्यात भाग घेऊ लागले होते आणि १९६६ साली ३० आसनांचे एक राज्य सभागृह बांधण्यात आले. १९७० साली नुकुआलोफात २० राज्य प्रचारक असलेली एक मंडळी स्थापन करण्यात आली.

तेव्हापासून, संदेष्टा यशयाच्या शब्दांची पूर्णता टाँगा बेटांवर होत असल्याचे स्पष्ट दिसते; यशयाने म्हटले होते: “ते परमेश्‍वराचे गौरव करोत, द्वीपद्वीपांतरी त्याचा गुणानुवाद करोत.” (यशया ४२:१२) तेथील राज्याचे कार्य वाढत चालले आहे, पुष्कळ लोकांना यहोवाबरोबर नातेसंबंध जोडण्यास मदत केली जात आहे. २००३ साली नुकुआलोफात झालेल्या प्रांतीय अधिवेशनातील सर्वाधिक उपस्थिती ४०७ होती आणि ५ जणांचा बाप्तिस्मा झाला. २००४ सालच्या स्मारकविधीसाठी ६२१ जण उपस्थित होते; यावरून तेथे वाढ होण्याची शक्यता आहे हे सूचित होते.

साधी जीवनशैली

परंतु राजधानीपासून दूर असलेल्या द्वीपांवर राज्य घोषकांची अद्यापही गरज आहे. उदाहरणार्थ, हापाई गटाच्या १६ द्वीपांवर राहणाऱ्‍या ८,५०० लोकांनी अजून बायबल सत्य ऐकलेले नाही. हापाईमध्ये प्रामुख्याने, समुद्रसपाटीहून कमी उंचीवर असलेली बेटे आहेत जेथे नारळाची झाडे आहेत; व या बेटांना पांढऱ्‍या शुभ्र वाळूचा किनारा लाभला आहे. येथील महासागराचे पाणी, इतके नितळ व स्वच्छ आहे की आपण ३० मीटरपेक्षा अधिक दूरपर्यंत पाहू शकतो. प्रवाळभित्ती असलेल्या व शंभरपेक्षा अधिक जातीच्या रंगीबेरंगी उष्णकटिबंधीय मासे असलेल्या या पाण्यात पोहण्याची मजा काही औरच आहे. येथील गावे लहान आहेत. घरे साधी असली तरी, उष्णकटिबंधीय वादळांत तग धरून राहतील अशी ती बांधण्यात आली आहेत.

विलायती फणसांची (ब्रेडफ्रुट) आणि आंब्याची झाडे सावलीही देतात आणि अन्‍नही. अन्‍न गोळा करून ते बनवण्यातच इथल्या लोकांचा अर्धाअधिक वेळ जातो. डुकराच्या मांसाव्यतिरिक्‍त द्वीपवासी महासागरातून मुबलक मिळणाऱ्‍या माशांवरही ताव मारतात. प्रत्येकाच्या बागेतून कंदमुळांचे व भाज्यांचे उत्पन्‍न निघते. लिंबू जातीची जंगली फळे आणि नारळ व केळी यांचे भरपूर पीक निघते. औषधी वनस्पती, पाने, साल, मुळे यांच्याबद्दलचे ज्ञान एक पिढी दुसऱ्‍या पिढीला देते.

पण, हापाईची सर्वात मौल्यवान संपत्ती आहे तिथले मैत्रीपूर्ण लोक. या लोकांनी, इथल्या शांत परिसराशी स्वतःला अगदी उत्तमरीत्या जुळवून घेतले आहे. त्यांची जीवनशैली अगदी साधीसुधी आहे. पुष्कळ स्त्रिया हस्तकलेच्या वस्तू बनवण्यात—टोपल्या, टापा कापड व चटाया बनवण्यात गर्क असतात. टाँगन स्त्रिया, एखाद्या झाडाच्या सावलीत बसून काम करता करता, गप्पा-टप्पा मारत, गाणी गात, हसत-खिदळत असतात; आजुबाजूला मुले-बाळे एकतर खेळत असतात किंवा झोपलेली असतात. स्त्रियाच सहसा, शिंपले, इतर मासे पकडण्यासाठी व ज्याची चवदार कोशंबीर बनवली जाते अशी कुरकूरीत लागणारी एकप्रकारची समुद्र वनस्पती काढण्यासाठी ओहोटीच्या वेळी समुद्रात जातात.

पुरुषांचा बहुतेक वेळ, शेतकाम, मासेमारी, कोरीवकाम, बोटी बनवण्यात आणि जाळे दुरुस्त करण्यात जातो. पुरुष, स्त्रिया, मुले, छप्पर असलेल्या लहान बोटींतून नातेवाईकांना भेटायला, दवाखान्यात किंवा मालाची खरेदी-विक्री करण्यासाठी जातात.

सर्वात दूर असलेल्या ठिकाणीही सुवार्ता पोहंचते

अशा या निसर्गरम्य परिसरात दोन मिशनरी आणि दोन पायनियर सेवक २००२ सालच्या स्मारकविधीच्या काळात आले. पूर्वी साक्षीदार असे अधूनमधून येत असत आणि हापाईतील लोकांना यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेली प्रकाशने मिळाली होती; शिवाय ते साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यासही करत असत.

भेट द्यायला आलेल्या या चार बायबल शिक्षकांचे तीन उद्देश होते: बायबल साहित्य देणे, गृह बायबल अभ्यास सुरू करणे आणि आस्था दाखवणाऱ्‍या लोकांना प्रभूच्या सांजभोजन विधीचे आमंत्रण देणे. तिन्हीच्या तिन्ही उद्देश साध्य करण्यात आले. ९७ लोकांनी येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा करण्याचे आमंत्रण स्वीकारले व ते उपस्थित राहिले. यातील काही जण तर जोराचा पाऊस व वारा वाहत असूनही उघड्या बोटींतून प्रवास करून आले होते. हवामान चांगले नसल्यामुळे पुष्कळ जणांनी, स्मारकविधी जेथे साजरा करण्यात आला होता त्या ठिकाणी रात्री मुक्काम केला आणि मग दुसऱ्‍या दिवशी ते आपापल्या घरी गेले.

स्मारकविधीचे भाषण देणाऱ्‍या बांधवाला देखील बरेच परिश्रम करावे लागले होते. ज्या मिशनरी बांधवाने हे भाषण दिले तो म्हणतो: “एका विदेशी भाषेत एकाच संध्याकाळी दोन स्मारकविधीची व्याख्याने देणे किती कठीण आहे, हे कदाचित मला तुम्हाला सांगायची गरज नाही. मला किती काळजी वाटत असावी याची तुम्ही कल्पना करा. पण प्रार्थनेनं मला खूप बळ दिलं! मला असे शब्द आणि अशी वाक्ये आठवत गेली की हे सर्व मी केव्हा शिकलो होतो, याचेच मला आश्‍चर्य वाटत होते!”

सुवार्तिकांनी, हापाई बेटांवरील लोकांची आस्था आणखी वाढवल्यामुळे त्या क्षेत्रातील दोन विवाहित जोडप्यांचा बाप्तिस्मा झाला. यांपैकी एका पतीने, स्थानीय चर्चमध्ये सेवकाचे प्रशिक्षण घेत असताना साक्षीदारांच्या साहित्यात आवड घ्यायला सुरुवात केली होती.

या मनुष्याची व त्याच्या पत्नीची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती तरीसुद्धा ते, वार्षिक वर्गणी गोळा करण्याच्या सेवेदरम्यान आपले नाव घोषित केले जायचे तेव्हा बरीच मोठी रक्कम चर्चला दान करत असत. पूर्वी एकदा आलेल्या एका साक्षीदाराने या मनुष्याला आपल्या बायबलमधून १ तीमथ्य ५:८ हे वचन काढून वाचायला सांगितले. त्या वचनात पौलाने लिहिले आहे: “जर कोणी स्वकीयांची व विशेषेकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्‍वास नाकारला आहे; तो माणूस विश्‍वास न ठेवणाऱ्‍या माणसापेक्षा वाईट आहे.” बायबलमधील हे तत्त्व या मनुष्याच्या हृदयाला भावले. चर्चच्या मोठ्या मागण्या पुऱ्‍या करत असल्यामुळे आपण आपल्या कुटुंबाच्या दररोजच्या गरजा भागवू शकत नव्हतो, हे त्याला कळले. पुढील वार्षिक वर्गणी गोळा करण्याच्या वेळी त्याच्याजवळ पैसे होते तरी तो १ तीमथ्य ५:८ विसरला नव्हता. त्याचे नाव घोषित करण्यात आले तेव्हा त्याने धैर्य एकवटून पाळकाला सांगितले, की आपल्या कुटुंबाच्या गरजा अधिक महत्त्वाच्या होत्या. यामुळे, चर्चमधील वडिलांनी या जोडप्याची सर्वांसमक्ष निंदा केली. त्यांच्याविषयी अपशब्द वापरण्यात आले.

यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास केल्यानंतर हा मनुष्य आणि त्याची पत्नी सुवार्तेचे प्रचारक बनले. पती म्हणतो: “बायबल सत्यामुळे माझं जीवन बदललं. आता मी माझ्या कुटुंबाला क्रूर व कठोर वागणूक देत नाही. शिवाय मी पूर्वीसारखा खूप दारू पित नाही. मी माझ्या जीवनात केलेले बदल माझ्या गावातल्या लोकांनाही दिसून येतात. माझ्याप्रमाणे तेही एक ना एक दिवशी सत्यावर प्रेम करू लागतील अशी मला आशा आहे.”

शोधकामात वापरलेले क्वेस्ट

२००२ सालच्या स्मारकविधीनंतर काही महिन्यांनी, आणखी एका गलबतावरून दूरवरील हापाई द्वीपावर काही मौल्यवान माल आला. १८ मीटरची क्वेस्ट ही शिडाची नौका टाँगा बेटांमधून मार्ग काढत आली होती. गॅरी व हेटी आपली मुलगी केटी हिच्याबरोबर या नौकेवर होते. त्यांच्याबरोबर नऊ टाँगन बंधूभगिनी आणि दोन मिशनरी दोन सफरींवर गेले. स्थानीय साक्षीदारांनी त्यांना वाट दाखवली; कधीकधी तर त्यांना अज्ञात प्रवाळांच्या खडकांतून मार्ग काढावा लागत होता. सहलीला निघालेल्या या सफरी नव्हत्या. नौकेवरील प्रवासी बायबल सत्य शिकवण्यासाठी आले होते. महासमुद्रावरील १४ द्वीपांवर त्यांनी सुवार्ता पोहंचवली. यांपैकी काही द्वीपांवरील लोकांनी यापूर्वी सुवार्ता कधीच ऐकली नव्हती.

तिथल्या लोकांनी कसा प्रतिसाद दिला? सहसा, समुद्रप्रवास करून आलेल्या प्रचारकांचे कुतूहल, आपुलकी आणि पारंपरिक आतिथ्य सत्कार, अशा संमिश्र भावनांनी स्वागत केले जायचे. या पाहुण्यांचा हेतू लक्षात आल्यावर द्वीपवासी मनापासून त्यांचे आभार व्यक्‍त करत. भेट देणाऱ्‍या साक्षीदारांना स्पष्टपणे समजले, की द्वीपवासींना देवाच्या वचनाबद्दल आदर आहे व आपल्या आध्यात्मिक गरजांची जाणीव देखील आहे.—मत्तय ५:३.

पुष्कळदा, भेट देणारे पाहुणे झाडांखाली बसायचे आणि त्यांच्या अवतीभोवती बसलेले लोक त्यांना शास्त्रवचनांवरील प्रश्‍नांनी भंडावून सोडायचे. रात्रीच्या वेळी कुणाच्या तरी घरात बायबलवर चर्चा चालायच्या. एका द्वीपावरील लोक तर चाललेल्या साक्षीदारांना असेही म्हणाले: “नका जाऊ तुम्ही! तुम्ही गेल्यावर आमच्या प्रश्‍नांची कोणं उत्तरं देईल?” एका साक्षीदार बहिणीने सांगितले: “सत्यासाठी आसूसलेल्या मेंढरांसारख्या इतक्या लोकांना मागे सोडून जायला आम्हाला मन व्हायचं नाही. पुष्कळ लोकांच्या हृदयात सत्याचे बी पेरण्यात आले आहे.” एका द्वीपावर साक्षीदारांची क्वेस्ट नौका पोहंचली तेव्हा त्यांनी पाहिले, की सर्व द्वीपवासीयांनी शोकवस्त्र घातले होते. तिथे म्हणे, नगरप्रमुखाची पत्नी नुकतीच वारली होती. बायबलमधून सांत्वन देणारा संदेश आणल्याबद्दल या नगरप्रमुखाने स्वतः बांधवाचे आभार मानले.

काही द्वीपांवर सहज उतरता येत नव्हते. हेटी म्हणतात: “एका द्वीपाचा किनारा व्यवस्थित नव्हता; कित्येक मीटर उंचीचे उंचवटे सरळ समुद्रातून बाहेर डोकावत होते. आणि आमच्या लहानशा रबरी बोटीनेच तिथे जाता येत होते. पहिल्यांदा आम्हाला आमच्या बॅगा किनाऱ्‍यावर हात पुढे करून उभ्या असलेल्यांकडे फेकाव्या लागायच्या. मग, पाण्याची लाट जेव्हा बोटीला उंचवट्याइतकी वर उचलायची तेव्हा आम्हाला लगेच उडी मारावी लागायची, नाहीतर आम्हाला दुसरी अशी मोठी लाट येईपर्यंत थांबावे लागायचे.”

परंतु, नौकेवर असलेले सर्वचजण धाडसी दर्यावर्दी नव्हते. दोन आठवड्यांच्या समुद्रप्रवासानंतर, टाँगाटापूच्या मुख्य द्वीपाकडे परतीच्या सफरीबद्दल खलाशाने असे लिहिले: “आम्हाला आणखी १८ तास प्रवास करावा लागणार आहे. आमच्यापैकी पुष्कळांना समुद्रप्रवास मानवला नसल्यामुळे आम्ही हा प्रवास एकाच पल्ल्यात पूर्ण करू शकणार नाही. आम्हाला घरी यायला आनंद होतोय खरा, परंतु राज्य संदेश ऐकलेल्या त्या अनेक लोकांना सोडून यायलाही आम्हाला वाईट वाटत आहे. आम्ही त्यांना यहोवाच्याच हाती सोपवलं आहे; त्याच्या पवित्र आत्म्याच्या व देवदूतांच्या मदतीनेच ते आध्यात्मिक प्रगती करतील.”

द्वीपांवर वाढ होण्याचे सुचिन्ह

क्वेस्ट नौका जाऊन जवळजवळ सहा महिन्यांनंतर, स्टीवन आणि मलाकी या दोन खास पायनियर सुवार्तिकांना हापाई बेट गटांवर प्रचार करण्यासाठी नेमण्यात आले. तेथे आधीपासून अलिकडेच बाप्तिस्मा घेतलेले दोन विवाहित जोडपी होती; मग त्यांच्याबरोबर या दोघांनी बायबल शिकवायला सुरवात केली. आता तेथे सैद्धांतिक विषयांवर उत्साहपूर्ण चर्चा होत आहेत आणि प्रचारक बायबलचा कुशलतेने उपयोग करीत आहेत.

डिसेंबर १, २००३ रोजी हापाईमध्ये एक मंडळी स्थापन करण्यात आली; टाँगामधील ही पाचवी मंडळी आहे. उपस्थित असणाऱ्‍यांमध्ये पुष्कळ मुले आहेत. ती सभांमध्ये लक्ष देऊन ऐकायला शिकली आहेत. ती शांत बसतात आणि जेव्हा प्रश्‍नोत्तर असते तेव्हा उत्तरे द्यायला उत्सुक असतात. विभागीय पर्यवेक्षकांच्या असे पाहण्यात आले आहे, की बायबल कथांचं माझं पुस्तक यांतील अनेक गोष्टी मुलांना माहीत आहेत. यावरून हेच दिसून येते, की पालक आपल्या मुलांच्या मनावर बायबल सत्य बिंबवण्याची जबाबदारी गंभीरपणे घेत आहेत.” द्वीपांवर अधिक कापणीचे सुचिन्ह दिसत आहे; याचा अर्थ यहोवाचे आणखी मित्र होण्याची शक्यता दिसते, हे स्पष्ट आहे.

सत्तरपेक्षा अधिक वर्षांआधी, चार्ल्स वेटने मृत कोठे आहेत? (इंग्रजी) या पुस्तिकेचे टाँगन या आपल्या मातृभाषेत भाषांतर केले तेव्हा, आपल्या देशवासीयांच्या हृदयात राज्याचे बी इतक्या मोठ्या प्रमाणावर मूळ धरेल, याची त्याला जरा देखील जाणीव नसावी. त्या लहानशा सुरवातीपासून यहोवा, पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यात सुवार्तेची घोषणा करण्याच्या सतत वाढत चाललेल्या कार्यावर आशीर्वाद देत राहिला आहे. आज, टाँगा हे यहोवाकडे वळणाऱ्‍या द्वीपांपैकी समुद्रावरील दूरवरील द्वीप आहे असे म्हणता येते. (स्तोत्र ९७:१; यशया ५१:५) “फ्रेंडली आयलंड्‌स” (मनमिळाऊ बेटे) असे नाव असलेल्या या बेटांवर आज खरोखरच यहोवाचे अनेक मित्र आहेत.

[८ पानांवरील चित्र]

चार्ल्स वेट, १९८३

[९ पानांवरील चित्र]

टापा कापड बनवताना

[१० पानांवरील चित्र]

टाँगात सुवार्तेचा प्रचार करण्याकरता “क्वेस्ट” नौकेचा वापर करण्यात आला

[११ पानांवरील चित्र]

नुकुआलोफा येथील भाषांतर गट

[९ पानांवरील चित्राचे श्रेय]

टापा कापड बनवताना: © Jack Fields/CORBIS; पृष्ठ ८ आणि ९ पानावरचे पार्श्‍वचित्र, आणि मासेमारी: © Fred J. Eckert