“जागृत राहा”
“जागृत राहा”
पुरातन काळात द्वारपाल शहराच्या वेशीजवळ किंवा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ सेवा करत, आणि काही वेळा ते खासगी घरांच्या दाराजवळही आढळत. रात्रीच्या वेळी फाटके बंद आहेत की नाही यांची ते खात्री करायचे आणि पहारेकऱ्याचे कामही करायचे. हे काम अतिशय जबाबदारीचे होते. कारण येणाऱ्या धोक्याबद्दल लोकांना वेळेवर सावध करण्यावर शहराची सुरक्षा निर्भर होती.
पहारेदारांना द्वारपालही म्हणत. द्वारपाल करत असलेल्या कामगिरीशी येशू ख्रिस्त परिचित होता. एके प्रसंगी, त्याने आपल्या शिष्यांची तुलना द्वारपालांशी केली व त्यांना यहुदी व्यवस्थीकरणाच्या शेवटाविषयी जागृत राहण्याचे प्रोत्साहन दिले. तो म्हणाला: “सावध असा, जागृत राहा; कारण तो समय केव्हा येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. प्रवासाला जात असलेल्या कोणा एका माणसाने आपले घर सोडतेवेळी . . . द्वारपाळास जागृत राहण्याची आज्ञा करावी तसे हे आहे. म्हणून जागृत राहा; कारण घरधनी केव्हा येईल, . . . हे तुम्हाला माहीत नाही.”—मार्क १३:३३-३५.
याचप्रमाणे, टेहळणी बुरूज, हे नियतकालिक गेल्या १२५ वर्षांपासून, “जागृत राहा” हे येशूने दिलेले उत्तेजन देत आहे. ते कसे? या नियतकालिकाच्या पृष्ठ २ वर सांगितले आहे, की “बायबलमधील भविष्यवाणींची पूर्ती करणाऱ्या जागतिक घटनांवर ते नजर ठेवते. देवाचे राज्य लवकरच सहमानवास जाचणाऱ्या लोकांचा नाश करील व या पृथ्वीचे रूपांतर परादीसमध्ये करील, या सुवार्तेद्वारा ते सर्व लोकांचे सांत्वन करते.” संपूर्ण जगभरात टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या २,६०,००,००० पेक्षा अधिक प्रतींचे १५० भाषांत वितरण होत आहे. हे जगातले सर्वात मोठ्या प्रमाणावर वाटप केले जाणारे धार्मिक नियतकालिक आहे. या नियतकालिकाद्वारे यहोवाचे साक्षीदार, पुरातन काळाच्या पहारेदारांप्रमाणे सर्वत्र राहणाऱ्या लोकांना आध्यात्मिकरीत्या ‘जागृत राहण्याचे’ प्रोत्साहन देत आहेत. कारण घरधनी अर्थात येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे व या व्यवस्थीकरणाविरुद्ध न्यायदंड बजावणार आहे.—मार्क १३:२६, ३७.