देवाच्या वचनाला तुमच्या मार्गाचा प्रकाश बनू द्या
देवाच्या वचनाला तुमच्या मार्गाचा प्रकाश बनू द्या
“तुझे वचन . . . माझ्या मार्गावर प्रकाश आहे.”—स्तोत्र ११९:१०५.
१, २. यहोवाचे वचन केव्हा आपल्या मार्गावरील प्रकाश बनेल?
यहोवाचे वचन आपल्या मार्गावर प्रकाश बनू शकते, पण हे आपल्यावर अवलंबून आहे. हा आध्यात्मिक प्रकाश अनुभवण्याकरता आपण देवाच्या लिखित वचनाचा मनःपूर्वक अभ्यास केला पाहिजे व त्याच्या मार्गदर्शनाचे पालन केले पाहिजे. मगच स्तोत्रकर्त्यासारखे आपल्यालाही म्हणता येईल की “तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाश आहे.”—स्तोत्र ११९:१०५.
२ आता आपण स्तोत्र ११९:८९-१७६ यावर विचार करू. ११ कडव्यांत रचलेली ही वचने म्हणजे जणू माहितीचा भांडारच आहेत! अशी माहिती की जी आपल्याला सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर टिकून राहण्यास साहाय्य करू शकते.—मत्तय ७:१३, १४.
देवाच्या वचनाची आवड का धरावी?
३. आपण देवाच्या वचनावर विसंबून राहू शकतो, हे स्तोत्र ११९:८९, ९० यावरून कसे कळते?
३ यहोवाच्या वचनाबद्दल आवड धरल्याने आध्यात्मिक स्थैर्य लाभते. (स्तोत्र ११९:८९-९६) स्तोत्रकर्त्याने म्हटले: “हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्वकाळ स्थिर आहे. . . . तू पृथ्वी स्थापिली व ती तशीच कायम आहे.” (स्तोत्र ११९:८९, ९०) देवाच्या वचनाद्वारे, म्हणजेच ‘आकाशमंडळाच्या नियमांद्वारे’ स्वर्गातील ज्योती आपापल्या कक्षेत परिभ्रमण करतात आणि पृथ्वी सर्वकाळ स्थिर राहते. (ईयोब ३८:३१-३३; स्तोत्र १०४:५) यहोवाच्या तोंडातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दावर आपण भाव ठेवू शकतो; देव जे काही बोलतो ते कधीही ‘विफल होणार नाही.’ त्याचा उद्देश अवश्य सफल होईल.—यशया ५५:८-११.
४. यांना संकटे सोसावी लागतात अशा देवाच्या सेवकांना देवाचे वचन प्रिय मानल्यामुळे कोणता फायदा होतो?
४ स्तोत्रकर्त्याला देवाच्या ‘नियमशास्त्रात आनंद नसता तर त्याच्या दु:खात त्याचा अंत कधीच झाला असता.’ (स्तोत्र ११९:९२) त्याला कोणी बाहेरचे लोक छळत नव्हते, तर इस्राएलमध्येच असणारे कायदेभंजक लोक त्याचा द्वेष करत होते. (लेवीय १९:१७) पण यामुळे तो खचून गेला नाही. देवाचे नियमशास्त्र त्याला प्रिय होते व या नियमशास्त्रानेच त्याचा संभाळ केला. करिंथमध्ये प्रेषित पौलाने “नामधारी बंधूंनी आणलेली संकटे” सोसली. त्याच्याविरुद्ध आरोप करू पाहणाऱ्या ‘अतिश्रेष्ठ प्रेषितांचा’ कदाचित यांत समावेश असावा. (२ करिंथकर ११:५, १२-१४, २६) तरीसुद्धा पौल आध्यात्मिकरित्या टिकून राहिला कारण त्याला देवाचे वचन प्रिय होते. आपल्याला यहोवाचे लिखित वचन व त्यात जे सांगितले आहे ते प्रिय वाटते, म्हणूनच आपण आपल्या बांधवांवरही प्रेम करतो. (१ योहान ३:१५) जग आपला द्वेष करते, पण यामुळे आपण देवाचे नियम विसरत नाही. आपल्या बांधवांसोबत एकतेने आपण त्याच्या इच्छेप्रमाणे करत राहतो आणि सर्वकाळ यहोवाची आनंदाने सेवा करत राहण्याच्या उज्ज्वल भवितव्याची आस धरतो.—स्तोत्र ११९:९३.
५. राजा आसा याने कशाप्रकारे यहोवाचा शोध केला?
५ यहोवाला आपला भक्तिभाव व्यक्त करण्याकरता आपणही अशी प्रार्थना कदाचित करू: “मी तुझा आहे, माझे तारण कर, कारण मी तुझ्या विधींचा आश्रय केला आहे.” (स्तोत्र ११९:९४) राजा आसा याने देवाचा शोध केला आणि यहुदातून खोट्या धर्माचे उच्चाटन केले. आसाच्या कारकीर्दीच्या १५ व्या वर्षी झालेल्या एका मोठ्या सभेत यहुदाच्या रहिवाशांनी “असा करार केला की आम्ही जिवेभावे आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर यास शरण जाऊ.” तेव्हा देव “त्यांस पावला” आणि “परमेश्वराने त्यांस चोहोकडून स्वास्थ्य दिले.” (२ इतिहास १५:१०-१५) या उदाहरणावरून, जे ख्रिस्ती मंडळीपासून दूर गेले आहेत त्यांना नव्याने देवाचा शोध घेण्याचे प्रोत्साहन मिळाले पाहिजे. जे पुन्हा एकदा देवाच्या लोकांसोबत सक्रियपणे त्याच्या सेवेत सहभागी होतील त्यांना देव आशीर्वादित करेल व त्यांचे संरक्षण करेल.
६. कशामुळे आपले आध्यात्मिक नुकसानापासून संरक्षण होईल?
६ यहोवाचे वचन आपल्याला सुबुद्धी देते, जेणेकरून आपण आध्यात्मिक दृष्टीने सुरक्षित राहतो. (स्तोत्र ११९:९७-१०४) देवाच्या आज्ञा आपल्याला आपल्या वैऱ्यांपेक्षा सुज्ञ बनवतात. त्याच्या निर्बंधांचे पालन केल्यामुळे आपण समंजस बनतो आणि ‘त्याचे विधि पाळल्यामुळे, वयोवृद्धांपेक्षा आपल्याला अधिक कळते.’ (स्तोत्र ११९:९८-१००) जर यहोवाची वचने ‘आपल्या जिभेला मधुर लागत असतील, आपल्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागत असतील’ तर आपोआपच आपण ‘प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करू.’ (स्तोत्र ११९:१०३, १०४) यामुळे या शेवटल्या दिवसांत गर्विष्ठ, क्रूर, अधर्मी लोकांना तोंड देताना, आध्यात्मिकरित्या आपले संरक्षण होईल.—२ तीमथ्य ३:१-५.
आपल्या पावलांकरता दिव्यासारखे
७, ८. स्तोत्र ११९:१०५ अनुसार आपण काय केले पाहिजे?
७ देवाचे वचन सदोदीत आध्यात्मिक प्रकाश देते. (स्तोत्र ११९:१०५-११२) आपण अभिषिक्त ख्रिश्चनांपैकी असोत किंवा ‘दुसऱ्या मेंढरांपैकी’ अर्थात त्यांच्या सोबत्यांपैकी असोत, आपण सर्वजण असेच घोषित करतो: “तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाश आहे.” (योहान १०:१६; स्तोत्र ११९:१०५) देवाचे वचन आपल्या मार्गावर दिव्यासारखा प्रकाश पाडते. यामुळे आपण आध्यात्मिकरित्या ठेच लागून पडत नाही. (नीतिसूत्रे ६:२३) होय, आपण व्यक्तिशः यहोवाच्या वचनाला आपल्या पावलांकरता दिवा बनू द्यावे.
८ स्तोत्र ११९ लिहिणाऱ्या स्तोत्रकर्त्यासारखा दृढ निर्धार करणे आवश्यक आहे. त्याने देवाच्या नियमांपासून न बहकण्याचा निर्धार केला होता. त्याने म्हटले: “तुझे न्याय्य निर्णय पाळीन अशी शपथ मी वाहिली आहे, व ती निश्चित केली आहे.” (स्तोत्र ११९:१०६) नियमित बायबल अभ्यास आणि ख्रिस्ती सभांत सहभाग घेण्याचे महत्त्व आपण कधीही कमी लेखू नये.
९, १०. यहोवाला समर्पित असणाऱ्या व्यक्ती देखील ‘त्याच्या विधींपासून बहकू’ शकतात हे कशावरून समजते, पण हे कसे टाळता येईल?
९ स्तोत्रकर्ता तर ‘देवाच्या विधींपासून बहकला नाही’ पण यहोवाला समर्पित असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत हे घडू शकते. (स्तोत्र ११९:११०) राजा शलमोन हा एका समर्पित राष्ट्राचा सदस्य असूनही व सुरुवातीला त्याने देवाने दिलेल्या बुद्धीनुसार कार्य केलेले असूनही नंतर तो बहकला. “त्यालाहि अन्य जातींच्या स्त्रियांनी” खोट्या दैवतांची उपासना करण्यास भाग पाडून “पापात पाडिले.”—नहेम्या १३:२६; १ राजे ११:१-६.
१० ‘पारध्यासारखा’ असणारा सैतान अनेक सापळे रचतो. (स्तोत्र ९१:३) उदाहरणार्थ, पूर्वी आपल्यासोबत उपासना करणारा एखादा आपल्याला आध्यात्मिक प्रकाशाच्या मार्गातून बहकवून धर्मत्यागाच्या अंधाऱ्या मार्गात जाण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करू शकतो. थुवतीराच्या ख्रिश्चनांमध्ये ‘ईजबेल नावाची स्त्री’ होती. कदाचित ही संज्ञा स्त्रियांच्या एका समूहाला सूचित करत असावी. या स्त्रिया इतरांना मूर्तिपूजा व व्यभिचार करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत होत्या. येशूने अशी दुष्ट कार्ये खपवून घेतली नाही व आपणही तसे करू नये. (प्रकटीकरण २:१८-२२; यहूदा ३, ४) याकरताच, आपण यहोवाच्या मदतीकरता प्रार्थना करत राहावी, जेणेकरून आपण त्याच्या आज्ञांपासून बहकणार नाही, तर सदोदीत त्याच्या प्रकाशात राहू.—स्तोत्र ११९:१११, ११२.
देवाचे वचन आपला संभाळ करते
११. स्तोत्र ११९:११९ यानुसार देव दुष्टांना कसे लेखतो?
११ जर आपण देवाच्या नियमांपासून बहकलो नाही तर देव आपला संभाळ करेल. (स्तोत्र ११९:११३-१२०) कोमट मनोवृत्तीच्या नामधारी ख्रिश्चनांबद्दल ज्याप्रमाणे येशू नापसंती व्यक्त करतो, त्याचप्रमाणे आपण देखील “दुटप्पी” माणसांना पसंत करत नाही. (स्तोत्र ११९:११३; प्रकटीकरण ३:१६) आपण यहोवाची मनःपूर्वक सेवा करतो त्यामुळे तोच आपला “आश्रय” आहे आणि तोच आपला संभाळ करेल. कपटीपणा व खोटेपणाचा मार्ग अवलंबून त्याच्या ‘नियमांपासून बहकणाऱ्या सर्वांचा तो धिक्कार करितो.’ (स्तोत्र ११९:११४, ११७, ११८; नीतिसूत्रे ३:३२) अशा दुष्ट जनांना तो सोने व रूपे यांसारख्या मोलवान धातूंपासून अलग केल्या जाणाऱ्या “गाळासारखे” लेखतो. (स्तोत्र ११९:११९; नीतिसूत्रे १७:३) तेव्हा, आपण नेहमी देवाच्या निर्बंधांविषयी आवड दाखवावी कारण नाशात दुष्ट लोकांचा जो मळीचा ढीग बनेल त्यात निश्चितच आपण असू इच्छित नाही!
१२. यहोवाचे भय बाळगणे महत्त्वाचे का आहे?
स्तोत्र ११९:१२०) देवाबद्दल सुदृढ प्रकारचे भय बाळगल्यास त्याला न आवडणाऱ्या गोष्टी आपण करणार नाही; आणि त्याचे सेवक या नात्याने त्याने आपले संरक्षण करावे अशी इच्छा असल्यास आपण देवाचे असे भय बाळगलेच पाहिजे. यहोवाबद्दल आदरयुक्त भय असल्यामुळेच ईयोब नीतिमानपणे जगू शकला. (ईयोब १:१; २३:१५) देवाचे भय आपल्याला, त्याला स्वीकृत असलेल्या मार्गाने सातत्याने चालत राहण्यास मदत करते, मग यासाठी आपल्याला काहीही सहन करावे लागले तरीसुद्धा. पण अशी सहनशील वृत्ती दाखवण्याकरता आपल्याला पूर्ण विश्वासाने मनःपूर्वक प्रार्थना केल्या पाहिजेत.—याकोब ५:१५.
१२ “तुझ्या भयाने माझ्या अंगावर काटा उभा राहतो, तुझ्या निर्णयास मी भितो.” (विश्वासाने प्रार्थना करा
१३-१५. (क) आपल्या प्रार्थनांचे आपल्याला उत्तर मिळेल असा विश्वास आपण का बाळगू शकतो? (ख) प्रार्थनेत काय म्हणावे हे कळत नसल्यास काय घडू शकते? (ग) स्तोत्र ११९:१२१-१२८ यातील शब्द, प्रार्थनेत आपल्या ‘अनिर्वाच्य कण्हण्यात’ दडलेल्या भावना कशाप्रकारे व्यक्त करू शकतात हे उदाहरण देऊन सांगा.
१३ देव आपल्यावतीने कार्य करेल असा विश्वास बाळगून आपण प्रार्थना करू शकतो. (स्तोत्र ११९:१२१-१२८) स्तोत्रकर्त्याप्रमाणे आपल्याला पूर्ण खात्री आहे की आपल्या प्रार्थनांचे उत्तर दिले जाईल. का? कारण आपण देवाच्या आज्ञा “सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्यापेक्षा प्रिय मानितो.” शिवाय, ‘देवाचे सर्व विधि यथायोग्य आहेत असे आपण मानितो.’—स्तोत्र ११९:१२७, १२८.
१४ यहोवा आपल्या प्रार्थना ऐकतो कारण आपण विश्वासाने प्रार्थना करतो आणि त्याच्या नियमांचे काळजीपूर्वक पालन करतो. (स्तोत्र ६५:२) पण आपल्यासमोर असलेल्या समस्या अगदी गोंधळून टाकणाऱ्या असल्यामुळे जर प्रार्थनेत काय म्हणावे हेही आपल्याला कळत नसेल तर काय? अशावेळी, “आत्मा स्वतः अनिर्वाच्य कण्हण्याने मध्यस्थी करितो.” (रोमकर ८:२६, २७) अशाप्रसंगी, देवाच्या वचनातील शब्दांकरवी आपल्या गरजा व्यक्त केल्यास तो आपल्या प्रार्थना स्वीकारतो.
१५ शास्त्रवचनांत कितीतरी प्रार्थना व विचार दिलेले आहेत की जे ‘अनिर्वाच्य कण्हण्यात’ दडलेल्या भावना व्यक्त करू शकतात. उदाहरणार्थ, स्तोत्र ११९:१२१-१२८ यातील उतारा घ्या. यात ज्याप्रकारे भावना व्यक्त केल्या आहेत त्या कदाचित आपल्या परिस्थितीला जुळत असतील. उदाहरणार्थ जर आपल्याला फसवणूक केली जाण्याची भीती असेल तर आपण स्तोत्रकर्त्यासारखीच देवाची मदत मागू शकतो. (१२१-१२३ वचने) समजा आपल्याला एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे. मग आपण अशी प्रार्थना करू शकतो की यहोवाच्या आत्म्याने आपल्याला त्याचे निर्बंध आठवणीत आणून द्यावेत व त्यांचे पालन करण्यास मदत करावी. (१२४, १२५ वचने) आपण ‘प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष’ करत असलो तरीसुद्धा, एखाद्या मोहाला बळी पडून आपण त्याच्या नियमाचे उल्लंघन करू नये म्हणून आपण देवाला आपल्या वतीने कार्य करण्याची विनंती केली पाहिजे. (१२६-१२८ वचने) जर आपण दररोज बायबलचे वाचन केले तर यहोवाला प्रार्थना करताना आपल्याला अशी वचने आठवू शकतात.
यहोवाच्या निर्बंधांचे साहाय्य
१६, १७. (क) देवाच्या निर्बंधांची आठवण करून दिली जाण्याची आपल्याला का गरज आहे? (ख) इतरजण कशाप्रकारे कदाचित आपला तिरस्कार करतील पण कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे?
१६ आपल्या प्रार्थना ऐकल्या जाव्यात व आपल्याला देवाची कृपा प्राप्त व्हावी म्हणून आपण देवाच्या निर्बंधांकडे लक्ष दिले पाहिजे. (स्तोत्र ११९:१२९-१३६) मनुष्य स्वभावतःच विसराळू असल्यामुळे आपल्याला यहोवाच्या अद्भुत निर्बंधांची आठवण करून दिली जाण्याची गरज आहे जेणेकरून त्याचे शिक्षण व आज्ञा आपल्या मनात ताज्या राहतील. अर्थात, आध्यात्मिक प्रकाशामुळे प्रकट होणाऱ्या देवाच्या प्रत्येक वचनाबद्दल आपण कृतज्ञ आहोत. (स्तोत्र ११९:१२९, १३०) तसेच, इतरजण देवाच्या नियमांचे उल्लंघन करत असल्यामुळे, जरी ‘आपल्या डोळ्यातून अश्रूंचे प्रवाह वाहतात,’ तरीसुद्धा, यहोवाने ‘आपला मुखप्रकाश’ आपल्यावर पाडला अर्थात आपली संमती आपल्याला दिली म्हणून आपण कृतज्ञ आहोत.—स्तोत्र ११९:१३५, १३६; गणना ६:२५.
१७ जर आपण देवाच्या नीतिमान निर्बंधांनुसार चालत राहिलो तर देवाची संमती पुढेही आपल्याला मिळत राहील याची आपण खात्री बाळगू शकतो. (स्तोत्र ११९:१३७-१४४) यहोवाचे सेवक या नात्याने आपण हे कबूल करतो की तो त्याच्या नीतिमान निर्बंधांची आपल्याला आठवण करून देतो आणि त्यांना आपल्याकडून या आज्ञांचे पालन करण्याची अपेक्षा करतो हे योग्यच आहे. (स्तोत्र ११९:१३८) स्तोत्रकर्त्याने देवाच्या विधींचे पालन केले, मग तो असे का म्हणाला की “मी क्षुद्र व तुच्छ मानिलेला आहे?”(स्तोत्र ११९:१४१) कदाचित, त्याचे शत्रू त्याला कशा दृष्टीने पाहतात याच्या संदर्भात त्याने असे म्हटले असावे. जर आपण सर्व परिस्थितीत नीतिमत्तेने वागण्याचा निर्धार केला तर इतरजण कदाचित आपला तिरस्कार करू लागतील. पण लोक काय विचार करतात ते महत्त्वाचे नाही. आपण यहोवाच्या नीतिमान निर्बंधांनुसार जगतो व यामुळे तो आपल्याबद्दल संतुष्ट आहे हे आपल्याकरता सर्वात महत्त्वाचे आहे.
सुरक्षितता व शांती अनुभवणे
१८, १९. देवाचे निर्बंध अनुसरल्याने काय परिणाम घडून येतो?
१८ देवाचे निर्बंध अनुसरल्याने आपण त्याच्यासोबत घनिष्ट नाते ठेवू शकतो. (स्तोत्र ११९:१४५-१५२) यहोवाच्या निर्बंधांकडे लक्ष दिल्यामुळे आपण मनःपूर्वक व अगदी मोकळेपणाने आपल्या भावना त्याच्याजवळ व्यक्त करू शकतो आणि तो आपले ऐकेल अशी आपण अपेक्षा करू शकतो. कधीकधी तर पहाट “उजाडण्यापूर्वी उठून” आपण त्याच्या मदतीकरता याचना करू शकतो! प्रार्थना करण्याकरता ही किती उत्तम वेळ असू शकते. (स्तोत्र ११९:१४५-१४७) तसेच आपण अनैतिक वर्तन टाळतो आणि येशूने केले त्याप्रमाणे देवाच्या वचनाला सत्य मानतो या कारणांमुळेही देव आपल्या जवळ राहतो. (स्तोत्र ११९:१५०, १५१; योहान १७:१७) यहोवासोबतचा आपला नातेसंबंध या अशांत जगात आपला संभाळ करतो आणि हर्मगिदोनाच्या महान लढाईदरम्यानही तो आपल्याला सुरक्षित ठेवेल.—प्रकटीकरण ७:९, १४; १६:१३-१६.
१९ देवाच्या वचनाबद्दल आपल्याला मनःपूर्वक आदर असल्यामुळे आपण खरी सुरक्षितता अनुभवतो. (स्तोत्र ११९:१५३-१६०) दुष्टांप्रमाणे, आपण यहोवाच्या “निर्बंधांपासून ढळलो नाही.” उलट देवाच्या विधी आपण प्रिय मानतो आणि त्यामुळे आपण त्याच्या वात्सल्यात सुरक्षित राहतो. (स्तोत्र ११९:१५७-१५९) यहोवाचे निर्बंध आपल्या स्मरणशक्तीला चालना देऊन, विशिष्ट परिस्थितीत आपण काय करावे याची आपल्याला आठवण करून देतात. तर देवाच्या विधी, या त्याच्या आज्ञा आहेत आणि आपण त्यांचा मनापासून स्वीकार करतो कारण आपला निर्माणकर्ता या नात्याने त्याला या आज्ञा देण्याचा अधिकार आहे हे आपण ओळखतो. ‘देवाचे वचन संपूर्णपणे सत्य आहे’ आणि आपण आपल्या बुद्धीने योग्य पावले टाकू शकत नाही याची जाणीव बाळगून आपण आनंदाने देवाचे मार्गदर्शन स्वीकारतो.—स्तोत्र ११९:१६०; यिर्मया १०:२३.
२०. आपल्याला “फार शांति” का मिळते?
२० यहोवाच्या नियमशास्त्राबद्दल प्रेम वाटत असल्यामुळे आपल्याला उदंड शांती लाभते. (स्तोत्र ११९:१६१-१६८) ही “देवाने दिलेली शांति” अतुलनीय आहे आणि आपला छळ झाला तरीही कोणीही तिला आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. (फिलिप्पैकर ४:६, ७) यहोवाच्या न्याय्य निर्णयांना आपण इतके मोलवान जाणतो की आपण सतत—“दिवसातून सात वेळा” त्याची स्तुती करत राहतो. (स्तोत्र ११९:) स्तोत्रकर्त्याने या स्तोत्रात पुढे म्हटले: “तुझे नियमशास्त्र प्रिय मानणाऱ्यांना फार शांति असते. त्यांना अडखळण्याचे कारण पडणार नाही.” ( १६१-१६४स्तोत्र ११९:१६५) जर आपण व्यक्तीशः यहोवाच्या नियमशास्त्रास प्रिय मानून त्याचे अनुसरण केले तर इतरजण काय करतात किंवा इतर कोणत्याही गोष्टीमुळे आपण आध्यात्मिकरित्या अडखळणार नाही.
२१. शास्त्रवचनांतील कोणती उदाहरणे दाखवतात की मंडळीत समस्या निर्माण झाल्या तरीसुद्धा आपण अडखळून जाऊ नये?
२१ बायबलमध्ये ज्यांच्या उल्लेख आहे अशा कित्येक व्यक्तींनी कोणत्याही गोष्टीला आपल्या मार्गात कायमचे अडखळण बनू दिले नाही. उदाहरणार्थ, गायस नावाचा ख्रिस्ती पुरुष दियत्रफेस याच्या अधार्मिक वर्तनाने अडखळला नाही तर ‘सत्याने चालला.’ (३ योहान १-३, ९, १०) युवदिया व सुंतुखे या ख्रिस्ती स्त्रियांमध्ये काहीतरी समस्या निर्माण झाल्यामुळे पौलाने त्यांना “प्रभूच्या ठायी एकचित्त” होण्याचा सल्ला दिला. पण त्यांना त्यांची समस्या सोडवण्यास मदत करण्यात आली आणि त्यांनी पुन्हा पूर्वीसारखेच यहोवाची विश्वासूपणे सेवा करण्यास सुरुवात केली. (फिलिप्पैकर ४:२, ३) तेव्हा मंडळीत काही समस्या निर्माण झाल्यास आपण अडखळून जाऊ नये. तर यहोवाच्या विधींवर आपण आपले लक्ष लावावे व हे आठवणीत ठेवावे की ‘आपला सर्व वर्तनक्रम त्याच्यापुढे आहे.’ (स्तोत्र ११९:१६८; नीतिसूत्रे १५:३) मग कोणतीही गोष्ट आपल्याकडून आपली “शांती” हिरावून घेऊ शकणार नाही.
२२. (क) जर आपण देवाच्या आज्ञा पाळल्या तर आपल्याला कोणता बहुमान मिळू शकतो? (ख) ख्रिस्ती मंडळीतून हरवलेल्या काहींबद्दल आपण कसा दृष्टिकोन बाळगावा?
२२ जर आपण नेहमी यहोवाच्या आज्ञा पाळल्या तर आपल्याला त्याची स्तुती करत राहण्याचा बहुमान मिळेल. (स्तोत्र ११९:१६९-१७६) देवाच्या नियमांच्या सामंजस्यात वागल्याने आपल्याला केवळ आध्यात्मिक सुरक्षितताच मिळत नाही, तर ‘आपल्या मुखातून त्याची स्तुति बाहेर पडते.’ (स्तोत्र ११९:१६९-१७१, १७४) या शेवटल्या काळात यापेक्षा मोठा बहुमान कोणता असू शकतो? स्तोत्रकर्त्याने आजीवन यहोवाची स्तुती करत राहण्याची इच्छा व्यक्त केली पण तो म्हणतो की “हरविलेल्या मेंढरासारखा मी हरवलो आहे.” तो नेमका कोणत्या अर्थाने हरवला होता हे सांगण्यात आलेले नाही. (स्तोत्र ११९:१७५, १७६) ख्रिस्ती मंडळीतून हरवलेल्या काही व्यक्ती अजूनही देवावर प्रेम करत असतील आणि त्याची स्तुती करण्याची अजूनही त्यांची इच्छा असेल. तेव्हा अशा व्यक्तींना मदत करण्याचा आपण हरप्रकारे प्रयत्न करू जेणेकरून त्यांना पुन्हा एकदा आध्यात्मिक सुरक्षितता मिळावी व त्यांनाही यहोवाच्या लोकांसोबत त्याची स्तुती करण्याची आनंददायक सुसंधी लाभावी.—इब्री लोकांस १३:१५; १ पेत्र ५:६, ७.
आपल्या मार्गाकरता कायमचा प्रकाश
२३, २४. स्तोत्र ११९ पासून तुम्हाला कोणता फायदा झाला आहे?
२३ स्तोत्र ११९ अनेक मार्गांनी आपल्याकरता हितावह ठरू शकते. उदाहरणार्थ, हे स्तोत्र दाखवते की खरा आनंद ‘परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे’ चालल्याने मिळतो. त्यामुळे आपण देवावर जास्त विसंबून राहण्यास शिकतो. (स्तोत्र ११९:१) स्तोत्रकर्ता आपल्याला आठवण करून देतो की देवाचे “वचन संपूर्णपणे सत्य आहे.” (स्तोत्र ११९:१६०) यामुळे निश्चितच, देवाच्या सबंध लिखित वचनाबद्दल आपली कदर वाढते. स्तोत्र ११९ वर मनन केल्याने आपल्याला शास्त्रवचनांचा मनःपूर्वक अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे. स्तोत्रकर्त्याने वारंवार देवाला विनंती केली की “तुझे नियम मला शिकीव.” (स्तोत्र ११९:१२, ६८, १३५) तसेच त्याने यहोवाला अशी याचना केली: “विवेक व ज्ञान मला दे, कारण तुझ्या आज्ञांवर माझी निष्ठा आहे.” (स्तोत्र ११९:६६) आपणही अशीच प्रार्थना करावी.
२४ देवाचे शिक्षण आपल्याला यहोवासोबत घनिष्ट नाते जोडण्यास मदत करते. स्तोत्रकर्त्याने वारंवार स्वतःला देवाचा सेवक म्हटले. किंबहुना, “मी तुझा आहे,” या हृदयस्पर्शी शब्दांत त्याने यहोवाला प्रार्थना केली. (स्तोत्र ११९:१७, ६५, ९४, १२२, १२५; रोमकर १४:८) खरोखर यहोवाचे साक्षीदार या नात्याने त्याची सेवा व स्तवन करणे हा आपल्याकरता किती मोठा बहुमान आहे! (स्तोत्र ११९:७) तुम्ही एक राज्य उद्घोषक या नात्याने देवाची आनंदाने सेवा करत आहात का? तर मग तुम्ही खात्री बाळगू शकता की जर तुम्ही नेहमी देवाच्या वचनावर भरवसा ठेवला आणि त्याला आपल्या मार्गावरील प्रकाश बनू दिले तर यहोवा त्याच्या बहुमोल सेवेत सतत तुम्हाला आधार देत राहील व तुम्हाला आशीर्वादित करत राहील. (w०५ ४/१५)
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• आपण देवाच्या वचनाची आवड का धरावी?
• देवाचे वचन कशाप्रकारे आपला संभाळ करते?
• यहोवाच्या निर्बंधांपासून आपल्याला कशाप्रकारे साहाय्य प्राप्त होते?
• यहोवाचे लोक सुरक्षितता व शांती का अनुभवतात?
[अभ्यासाचे प्रश्न]
[२८ पानांवरील चित्र]
जर आपण यहोवाचे निर्बंध प्रिय मानले तर तो कधीही आपल्याला “गाळासारखे” लेखणार नाही
[२९ पानांवरील चित्रे]
आपण दररोज बायबल वाचले तर प्रार्थना करताना उपयुक्त उताऱ्यांची आपोआप आपल्याला आठवण होईल