यहोवाच्या वचनावर भरवसा ठेवा
यहोवाच्या वचनावर भरवसा ठेवा
“तुझ्या वचनावर माझा भरवसा आहे.”—स्तोत्र ११९:४२.
१. स्तोत्र ११९ लिहिणाऱ्या स्तोत्रकर्त्याविषयी आणि त्याच्या एकंदर मनोवृत्तीविषयी काय म्हणता येईल?
स्तोत्र ११९ लिहिणाऱ्या स्तोत्रकर्त्याला यहोवाचे वचन प्रिय होते. कदाचित हा स्तोत्रकर्ता यहुदाचा राजकुमार हिज्किया असावा. या प्रेरित स्तोत्रात व्यक्त केलेल्या भावनांचा, हिज्कियाच्या एकंदर मनोवृत्तीशी मेळ बसतो. कारण यहुदाचा राजा असताना हिज्किया “परमेश्वराला धरून राहिला.” (२ राजे १८:३-७) एक गोष्ट अगदी खात्रीने म्हणता येते: हे स्तोत्र लिहिणारा आपल्या आध्यात्मिक गरजेविषयी जागरूक होता.—मत्तय ५:३.
२. स्तोत्र ११९ चा मुख्य विषय काय आहे आणि या स्तोत्राची कशाप्रकारे रचना केली आहे?
२ स्तोत्र ११९ यातील एक ठळक मुद्दा म्हणजे देवाच्या वचनाचे, किंवा संदेशाचे महत्त्व. * आठवणीत ठेवण्यास सोपे जावे म्हणून स्तोत्रकर्त्याने या स्तोत्राची रचना अक्षरांच्या क्रमानुसार केली आहे. यातील १७६ वचने इब्री वर्णमालेतील अक्षरांच्या क्रमानुसार रचलेली आहे. मूळ इब्री भाषेत या स्तोत्रातील एकूण २२ कडव्यांपैकी प्रत्येक कडव्यात ८ ओळी असून त्या एकाच अक्षरापासून सुरू होतात. या स्तोत्रात देवाचे वचन, नियमशास्त्र, निर्बंध, मार्ग, विधी, नियम, आज्ञा, न्याय्य, व वचनांचा उल्लेख आहे. या व पुढील लेखात इब्री बायबलमधील मजकुराच्या अचूक भाषांतरानुसार स्तोत्र ११९ याची चर्चा केली जाईल. गतकाळातल्या व सध्याच्या काळातल्या यहोवाच्या सेवकांना आलेल्या अनुभवांवर मनन केल्याने आपल्याला हे देवप्रेरित स्तोत्र अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यास व देवाचे लिखित वचन बायबल याबद्दल आपली कृतज्ञता वाढवण्यास मदत मिळेल.
देवाच्या वचनाचे पालन करा आणि आनंदी राहा
३. निर्दोष असण्याचा काय अर्थ होतो हे उदाहरणासहित स्पष्ट करा.
३ खरा आनंद देवाच्या नियमशास्त्रानुसार चालण्यावर अवलंबून आहे. (स्तोत्र ११९:१-८) जर आपण असे केले तर यहोवा, ‘आपले वर्तन निर्दोष ठेवणाऱ्यांमध्ये’ आपली गणना करेल. (स्तोत्र ११९:१, NW) निर्दोष असण्याचा अर्थ परिपूर्ण असणे असा होत नाही; तर आपण यहोवा देवाची इच्छा पूर्ण करण्यास झटतो असे त्यावरून सूचित होते. नोहा “आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक [“निर्दोष,” NW] मनुष्य होता” आणि तो “देवाबरोबर चालला.” हा विश्वासू कुटुंबप्रमुख आपल्या कुटुंबासोबत जलप्रलयातून जिवंत बचावला कारण त्याने यहोवाने सांगितलेल्या मार्गाने जीवन व्यतीत केले. (उत्पत्ति ६:९; १ पेत्र ३:२०) त्याचप्रकारे, या जगाच्या अंतातून आपले जिवंत बचावणे देखील, आपण ‘देवाचे विधि मन:पूर्वक पाळतो’ किंवा नाही, अर्थात त्याच्या इच्छेप्रमाणे चालतो किंवा नाही यावर अवलंबून आहे.—स्तोत्र ११९:४.
४. आपला आनंद व आपले यश कशावर अवलंबून आहे?
४ आपण यहोवाचे ‘सरळ मनाने स्तवन केले व त्याचे नियम पाळले’ तर तो कधीही आपला त्याग करणार नाही. (स्तोत्र ११९:७, ८) इस्राएल राष्ट्राचे नेतृत्त्व करणाऱ्या यहोशवाने, ‘नियमशास्त्राच्या ग्रंथात जे काही लिहिले आहे ते काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर’ या सल्ल्याचे पालन केले व यहोवाने त्याचा त्याग केला नाही. यामुळे तो सर्व कार्यांत यशस्वी झाला आणि बुद्धीने कार्य करू शकला. (यहोशवा १:८) आपल्या जीवनाच्या शेवटासही यहोशवा देवाची स्तुती करत होता आणि तो इस्राएलांना अशी आठवण करून देऊ शकला: “तुम्ही सर्व जण मनात विचार करा आणि लक्षात घ्या की, आपला देव परमेश्वर ह्याने तुमच्याबाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांतली एकहि निष्फळ झाली नाही; तुमच्याबाबतीत त्या सर्व सिद्धीस गेल्या; त्यातली एकहि व्यर्थ गेली नाही.” (यहोशवा २३:१४) यहोशवा व स्तोत्र ११९ चा लेखक यांप्रमाणे जर आपण यहोवाचे स्तवन केले व त्याच्या वचनावर भरवसा ठेवला तर आपणही आनंद व यश मिळवू शकतो.
यहोवाचे वचन आपल्याला शुद्ध राखते
५. (क) आध्यात्मिकरित्या स्वतःला शुद्ध राखणे कसे शक्य आहे? (ख) ज्याच्या हातून गंभीर पाप घडले आहे अशा तरुणाला कशामुळे मदत मिळू शकेल?
५ जर आपण देवाच्या वचनाप्रमाणे आपला वर्तनक्रम राखला तर आपण आध्यात्मिकरित्या शुद्ध राहू शकतो. (स्तोत्र ११९:९-१६) जरी आपल्या आईवडिलांचा उत्तम आदर्श आपल्यासमोर नसला तरीसुद्धा आपण असे करू शकतो. हिज्कियाचा पिता एक मूर्तिपूजक होता तरीसुद्धा, हिज्कियाने मूर्तिपूजक प्रभावांपासून आपला ‘वर्तनक्रम शुद्ध राखला’. आज देवाची सेवा करणाऱ्या एखाद्या तरुण व्यक्तीच्या हातून गंभीर पाप घडल्यास त्याने काय करावे? पश्चात्ताप, प्रार्थना, आईवडिलांची मदत आणि ख्रिस्ती वडिलांचे प्रेमळ साहाय्य यांमुळे त्यालाही हिज्कियासारखे होण्यास व आपला ‘वर्तनक्रम शुद्ध राखण्यास’ मदत मिळू शकेल.—याकोब ५:१३-१५.
६. कोणत्या स्त्रियांनी ‘देवाच्या वचनानुसार आपला वर्तनक्रम शुद्ध राखला?’
६ राहाब व रूथ, स्तोत्र ११९ लिहिण्यात आले त्याच्या बऱ्याच काळाआधी होऊन गेल्या तरीसुद्धा त्यांनीही आपला ‘वर्तनक्रम शुद्ध’ केला होता. राहाब ही एक कनानी वेश्या होती, पण आज तिला यहोवावर विश्वास ठेवणारी व त्याची उपासना करणारी म्हणून ओळखले जाते. (इब्री ११:३०, ३१) मुळात मवाबी असणाऱ्या रूथने आपल्या देवतांचा त्याग केला, यहोवाची सेवा केली आणि इस्राएल राष्ट्राला त्याने दिलेल्या नियमशास्त्रानुसार ती वागली. (रूथ १:१४-१७; ४:९-१३) मुळात इस्राएली नसलेल्या या दोन्ही स्त्रियांनी ‘देवाच्या वचनानुसार आपला वर्तनक्रम शुद्ध राखला’ आणि त्यांना येशू ख्रिस्ताच्या पूर्वजांपैकी असण्याचा बहुमान लाभला.—मत्तय १:१, ४-६.
७. दानीएल व तीन इब्री तरुणांनी आध्यात्मिक शुद्धता राखण्याच्या संबंधाने कशाप्रकारे उत्तम उदाहरण पुरवले?
७ “मानवाच्या मनांतल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात,” शिवाय, आपण सैतानाच्या नियंत्रणाखाली असलेल्या या भ्रष्ट जगात राहात आहोत. पण तरीसुद्धा, तरुण आपले वर्तन शुद्ध राखू शकतात. (उत्पत्ति ८:२१; १ योहान ५:१९) बॅबिलोन येथे बंदिवान म्हणून नेण्यात आलेल्या दानिएलाने व त्याच्यासोबतच्या तीन इब्री तरुणांनी ‘देवाच्या वचनानुसार आपला वर्तनक्रम शुद्ध राखला.’ उदाहरणार्थ, ‘राजा खात असे त्या मिष्टान्नाने’ स्वतःला अशुद्ध करण्यास ते तयार झाले नाहीत. (दानीएल १:६-१०) बॅबिलोनी लोक मोशेच्या नियमशास्त्रात मना केलेले अशुद्ध पशू खात असत. (लेवी ११:१-३१; २०:२४-२६) त्यांच्यात जनावरांची कत्तल केल्यावर नेहमी रक्त वाहू देण्याची प्रथा नव्हती आणि असे हे रक्तमिश्रित मांस खाल्यामुळे ते रक्ताविषयी देवाच्या नियमाचे उल्लंघन करत होते. (उत्पत्ति ९:३, ४) साहजिकच, ते चार इब्री तरुण राजाच्या मेजावरील उत्तम पदार्थ खाऊ शकत नव्हते! या देवभीरू तरुणांनी आपली आध्यात्मिक शुद्धता राखली आणि अशारितीने एक उत्तम उदाहरण आपल्याकरता पुरवले.
देवाचे वचन विश्वासू राहण्यास मदत करते
८. देवाचे नियमशास्त्र समजून घेऊन त्यानुसार वागण्याकरता आपण कशी मनोवृत्ती बाळगावी व कसले ज्ञान प्राप्त करावे?
८ देवाचे वचन प्रिय मानणे हे यहोवाला विश्वासू राहण्याकरता महत्वाचे आहे. (स्तोत्र ११९:१७-२४) जर आपण देवाच्या प्रेरणेने लिहिणाऱ्या स्तोत्रकर्त्यासारखी मनोवृत्ती राखली तर आपणही देवाच्या नियमशास्त्रातील ‘अद्भुत गोष्टींची’ उत्कंठा धरू. आपण सतत यहोवाच्या ‘निर्णयांची उत्कंठा धरू’ आणि त्याचे ‘निर्बंध आपल्याला आनंददायी’ वाटतात हे दाखवू. (स्तोत्र ११९:१८, २०, २४) यहोवाला आपले जीवन समर्पित करून कदाचित आपल्याला काही काळच झाला असेल, पण तरीसुद्धा आपण देवाच्या वचनाच्या ‘निऱ्या दुधाची इच्छा धरायला’ शिकलो आहोत का? (१ पेत्र २:३) बायबलच्या मूलभूत शिकवणुकी आपण समजून घेतल्या पाहिजेत जेणेकरून देवाचे नियमशास्त्र समजून घेणे आणि त्यानुसार वागणे आपल्याला सोपे जाईल.
९. मानवांच्या अपेक्षा देवाच्या नियमांच्या विरोधात असल्यास आपण काय करावे?
९ कदाचित आपण देवाच्या निर्बंधांविषयी आवड बाळगतही असू; पण काही कारणास्तव ‘अधिपती’ आपल्याविरुद्ध बोलू लागले तर काय? (स्तोत्र ११९:२३, २४) आज, अधिकारपदी असलेले बरेचदा देवापेक्षा मानवांचे नियम आपल्यावर लादण्याचा प्रयत्न करतात. मनुष्याच्या अपेक्षा देवाच्या इच्छेच्या विरोधात असल्यास आपण काय करावे? देवाच्या वचनाची आवड असल्यास आपल्याला यहोवाप्रती विश्वासू राहण्यास मदत मिळेल. येशू ख्रिस्ताच्या छळ सहन केलेल्या प्रेषितांप्रमाणे आपणही असेच म्हणू: “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.”—प्रेषितांची कृत्ये ५:२९.
१०, ११. सर्वात कठीण परिस्थितीतही आपण यहोवाला कसे विश्वासू राहू शकतो हे उदाहरण देऊन सांगा.
१० सगळ्यात कठीण परिस्थितीतही आपण यहोवाला विश्वासू राहू शकतो. (स्तोत्र ११९:२५-३२) देवाला सर्व परिस्थितीत विश्वासू राहायचे असेल तर आपण शिकून घेण्यास तयार असले पाहिजे आणि देवाच्या मार्गदर्शनाकरता कळकळीने प्रार्थना केली पाहिजे. तसेच आपण “विश्वासूपणाचा मार्ग” निवडला पाहिजे.—स्तोत्र ११९:२६, ३०, NW.
११ हिज्किया ज्याने कदाचित स्तोत्र ११९ लिहिले असावे, त्याने “विश्वासूपणाचा मार्ग निवडला होता.” त्याच्या अवतीभवती खोटे उपासक होते व राजाच्या दरबारातले सदस्य कदाचित त्याची थट्टाही करत असतील. अशा परिस्थितीमुळेच कदाचित, ‘त्याचा जीव निद्राहीन झाला’ असेल. (स्तोत्र ११९:२८, NW) पण हिज्कियाने देवावर भरवसा ठेवला, तो एक चांगला राजा होता आणि “परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक ते [तो] करी.” (२ राजे १८:१-५) देवावर विसंबून राहिल्याने आपणही आपल्या सर्व परीक्षांना धीराने तोंड देऊन देवाला विश्वासू राहू शकतो.—याकोब १:५-८.
यहोवाचे वचन आपल्याला धैर्य देते
१२. स्तोत्र ११९:३६, ३७ यातील शब्दांचे आपण व्यक्तिशः कसे पालन करू शकतो?
१२ देवाच्या वचनाच्या मार्गदर्शनाचे पालन केल्यास आपल्याला जीवनातल्या कठीण प्रसंगांना तोंड देण्याचे धैर्य मिळते. (स्तोत्र ११९:३३-४०) आपण नम्रपणे यहोवाचे मार्गदर्शन मागतो जेणेकरून आपल्याला “अगदी मनापासून” त्याच्या नियमांचे पालन करता येईल. (स्तोत्र ११९:३३, ३४) स्तोत्रकर्त्याप्रमाणे आपणही देवाला अशी विनंती करतो, “माझ्या मनाचा कल अन्याय्य लाभाकडे नको तर तुझ्या निर्बंधांकडे असू दे.” (स्तोत्र ११९:३६) प्रेषित पौलाप्रमाणे आपणही ‘सर्व बाबतीत चांगले वागतो,’ अर्थात प्रामाणिकपणे वागतो. (इब्री लोकांस १३:१८) नोकरीच्या ठिकाणी, जर आपला मालक आपल्याकडून काहीतरी अप्रामाणिक काम करून घेऊ इच्छित असेल, तर आपण देवाच्या नियमांना धरून राहण्याकरता धैर्य एकवटले पाहिजे—असा मार्ग आपण निवडल्यास यहोवा नक्कीच आपल्याला आशीर्वादित करेल. किंबहुना, सर्व प्रकारच्या वाईट इच्छांवर ताबा ठेवण्यास तो आपल्याला साहाय्य करतो. म्हणूनच आपण अशी प्रार्थना करावी: “निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टी वळीव.” (स्तोत्र ११९:३७) देव ज्या व्यर्थ गोष्टींचा तिरस्कार करतो अशा गोष्टी पाहण्याची आपली कधीही इच्छा असू नये. (स्तोत्र ९७:१०) अशाप्रकारे प्रार्थना केल्यास, सर्वात महत्त्वाचे म्हणजे अश्लील साहित्य व भूतविद्येशी संबंधित असलेल्या गोष्टी टाळण्यास आपण प्रेरित होतो.—१ करिंथकर ६:९, १०; प्रकटीकरण २१:८.
१३. येशूच्या छळ सोसणाऱ्या शिष्यांना निर्भयतेने साक्ष देण्याचे धैर्य कोठून मिळाले?
१३ देवाच्या वचनाचे अचूक ज्ञान घेतल्याने आपल्याला धैर्याने साक्ष देण्याकरता आत्मविश्वास मिळतो. (स्तोत्र ११९:४१-४८) तसेच, ‘आपली निंदा करणाऱ्याला उत्तर देण्याकरता’ धैर्याची आवश्यकता आहे. (स्तोत्र ११९:४२) कधीकधी आपल्यालाही येशूच्या छळ सोसणाऱ्या शिष्यांसारखी अशी प्रार्थना करावी लागू शकते: “हे प्रभो, . . . आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर.” त्यांनी अशी प्रार्थना केली तेव्हा काय घडले? “ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले.” तोच सार्वभौम प्रभू आपल्याला, त्याचे वचन धैर्याने बोलण्याचे धाडस देतो.—प्रेषितांची कृत्ये ४:२४-३१.
१४. पौलाप्रमाणेच धैर्याने साक्ष देण्यास कोणती गोष्ट आपले साहाय्य करेल?
१४ जर आपण देवाचे “सत्यवचन” प्रिय मानले व ‘देवाचे नियमशास्त्र सतत पाळीत राहिलो’ तर आपोआपच आपल्याला निर्भयतेने व न लाजता साक्ष देण्याचे धैर्य मिळेल. (स्तोत्र ११९:४३, ४४) देवाच्या लिखित वचनाचा मनःपूर्वक अभ्यास केल्याने आपल्याला ‘राजांसमोरसुद्धा त्याचे निर्बंध सांगण्यास संकोच वाटणार नाही.’ (स्तोत्र ११९:४६) प्रार्थना व यहोवाचा आत्मा आपल्याला योग्य गोष्टी योग्य प्रकारे बोलण्यास मदत करेल. (मत्तय १०:१६-२०; कलस्सैकर ४:६) पौलाने पहिल्या शतकातील शासकांना मोठ्या धैर्याने देवाच्या निर्बंधांविषयी सांगितले. उदाहरणार्थ त्याने रोमी सुभेदार फेलिक्स याला साक्ष दिली व फेलिक्सने “ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी त्याच्यापासून ऐकून घेतले.” (प्रेषितांची कृत्ये २४:२४, २५) तसेच, सुभेदार फेस्त व राजा अग्रिप्पा यांच्यासमोरही पौलाने साक्ष दिली. (प्रेषितांची कृत्ये २५:२२-२६:३२) यहोवाच्या पाठिंब्याने आपणही ज्यांना “सुवार्तेची लाज वाटत नाही” असे धैर्याने साक्ष देणारे साक्षीदार बनू शकतो.—रोमकर १:१६.
देवाचे वचन आपले सांत्वन करते
१५. आपला उपहास केला जातो तेव्हा देवाचे वचन आपले सांत्वन कसे करू शकते?
१५ यहोवाचे वचन आपल्याला सर्वप्रसंगी सांत्वन देते. (स्तोत्र ११९:४९-५६) कधीकधी आपल्याला सांत्वनाची खास गरज असते. यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपण धैर्याने साक्ष देत असलो तरी, कधीकधी ‘गर्विष्ठ’ लोक—जे देवाप्रती गर्विष्ठपणे वागतात—ते आपला “फार उपहास” करतात. (स्तोत्र ११९:५१) पण प्रार्थना करताना आपल्याला देवाच्या वचनात सांगितलेल्या चांगल्या गोष्टींची आठवण होते व त्याद्वारे आपले ‘समाधान होते.’ (स्तोत्र ११९:५२) परमेश्वराला याचना करताना, आपल्याला कदाचित शास्त्रवचनांतील एखादा नियम किंवा तत्त्व आठवू शकते, ज्यामुळे आपल्याला एखाद्या कठीण प्रसंगाला तोंड देण्याकरता आवश्यक सांत्वन व धैर्य प्राप्त होते.
१६. छळ झाला तरी देवाच्या सेवकांनी काय केले नाही?
१६ स्तोत्रकर्त्याचा उपहास करणारे गर्विष्ठ लोक इस्राएली लोकच होते, जे देवाला समर्पित असलेल्या राष्ट्राचे सदस्य होते. ही खरोखर किती लज्जास्पद गोष्ट होती! आपण मात्र देवाच्या नियमांपासून कधीही न बहकण्याचा निर्धार केला पाहिजे. (स्तोत्र ११९:५१) नात्झींच्या अंमलाखाली छळ झाला व अशाच प्रकारचा छळ इतिहासात इतरवेळी सहन करावा लागला तेव्हा देवाच्या हजारो सेवकांनी त्याच्या वचनात सापडणाऱ्या नियमांपासून व तत्त्वांपासून परावृत्त होण्यास साफ नकार दिला. (योहान १५:१८-२१) आणि यहोवाच्या आज्ञांचे पालन करणे मुळात कठीण नाही, कारण त्याचे नियम तर आपल्याकरता सांत्वनदायक ‘गीतांसारखे’ आहेत.—स्तोत्र ११९:५४; १ योहान ५:३.
यहोवाच्या वचनाकरता कृतज्ञ असा
१७. देवाच्या वचनाबद्दल वाटणारी कदर आपल्याला काय करण्यास प्रवृत्त करेल?
१७ देवाच्या वचनाबद्दल आपल्याला वाटणारी कृतज्ञता आपण त्याचे पालन करण्याद्वारे दाखवतो. (स्तोत्र ११९:५७-६४) स्तोत्रकर्त्याने यहोवाची ‘वचने पाळण्याचा निश्चय केला;’ इतकेच काय, तर ‘देवाच्या न्याय्य निर्णयांबद्दल त्याचे उपकारस्मरण करावयास तो मध्यरात्री उठत’ असे. आपल्याला कधी रात्री जाग आल्यास, देवाला प्रार्थना करून त्याला आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची किती उत्तम संधी ती ठरू शकते! (स्तोत्र ११९:५७, ६२) देवाच्या वचनाबद्दल आपल्याला कदर वाटल्यास आपण आपोआपच देवाचे मार्गदर्शन मिळवण्यास प्रवृत्त होऊ, आणि यामुळे यहोवाचे ‘भय धरणाऱ्या सर्वांची’—अर्थात देवाबद्दल भक्तिभाव व आदर वाटणाऱ्या व्यक्तींची आपण आनंदाने ‘सोबत धरू.’ (स्तोत्र ११९:६३, ६४) यापेक्षा चांगले सोबती कोण असू शकतील?
१८. ‘दुर्जनांचे पाश आपल्याला वेष्टितात’ तेव्हा यहोवा आपल्या प्रार्थनांचे कशाप्रकारे उत्तर देतो?
१८ आपण यहोवाची कृपा मिळवण्याकरता “याचना” करतो, म्हणजेच आपण पूर्ण मनापासून त्याला प्रार्थना करतो आणि आपल्याला शिकवण्याची त्याला विनंती करतो. विशेषतः ‘दुर्जनांचे पाश आपल्याला वेष्टितात’ तेव्हा आपण प्रार्थना केली पाहिजे. (स्तोत्र ११९:५८, ६१) आपल्या शत्रूंनी आपल्यावर आणलेल्या प्रतिबंधाचे पाश तोडून, यहोवा आपल्याला राज्य प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कार्याकरता मोकळे करू शकतो. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) आपल्या कार्यावर जेथे बंदी आणण्यात आली अशा राष्ट्रांत ही गोष्ट वारंवार प्रत्ययास आली आहे.
देवाच्या वचनावर विश्वास ठेवा
१९, २०. पिडीत झाल्याने बरे झाले असे केव्हा म्हणता येते?
१९ देवावर व त्याच्या वचनावर विश्वास ठेवल्यामुळे आपल्याला कठीण परिस्थितीला धीराने तोंड देण्यास व त्याच्या इच्छेप्रमाणे करत राहण्यास मदत मिळते. (स्तोत्र ११९:६५-७२) स्तोत्रकर्त्यावर गर्विष्ठांनी “आळ घेतला” तरीसुद्धा त्याने या स्तोत्रात म्हटले: “मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले.” (स्तोत्र ११९:६६, ६९, ७१) पीडित झाल्यास आपले बरे झाले, असे यहोवाचे सेवक का म्हणू शकतात?
२० आपल्यावर संकटे येतात तेव्हा साहजिकच आपण यहोवाला कळकळीने प्रार्थना करतो आणि यामुळे आपण त्याच्या आणखी जवळ येतो. कदाचित आपण देवाच्या लिखित वचनाचा अभ्यास करण्यात जास्त वेळ खर्च करायला लागू आणि त्याचे पालन करण्याचा जास्त प्रयत्न करू. यामुळे जीवन आनंदी होते. पण जर संकटाना तोंड देताना, आपल्या व्यक्तिमत्त्वात, उतावीळपणा किंवा गर्व यांसारखे वाईट गुण प्रत्ययास आले तर काय? मग मनःपूर्वक प्रार्थना करण्याद्वारे व देवाच्या वचनाच्या व आत्म्याच्या मदतीने आपण अशा अवगुणांवर मात करून, ‘नवा मनुष्य’ धारण करण्याचा अधिक प्रयत्न करावा. (कलस्सैकर ३:९-१४) शिवाय, आपण संकटांना तोंड देतो तेव्हा आपला विश्वास अधिक मजबूत होतो. (१ पेत्र १:६, ७) पौलाला ज्या संकटांना तोंड द्यावे लागले त्यामुळे त्याला लाभच झाला कारण तो यहोवावर पूर्वीपेक्षा जास्त विसंबून राहण्यास शिकला. (२ करिंथकर १:८-१०) आपणही संकटांना आपल्यावर असा चांगला परिणाम होऊ देण्याची संधी देतो का?
यहोवावर नेहमी भरवसा ठेवा
२१. देव गर्विष्ठांना फजीत करतो तेव्हा काय घडते?
२१ देवाचे वचन आपल्याला यहोवावर भरवसा ठेवण्याकरता एक उत्तम आधार देते. (स्तोत्र ११९:७३-८०) आपण आपल्या निर्माणकर्त्यावर खरोखर भरवसा ठेवला तर आपल्याला कधीही लज्जित व्हावे लागणार नाही. इतरजण जे करतात त्यामुळे कदाचित आपल्याला सांत्वनाची गरज भासू शकते, कदाचित पुढीलप्रमाणे प्रार्थना करावीशी वाटेल: “गर्विष्ठ फजीत होवोत.” (स्तोत्र ११९:७६-७८) अशा व्यक्तींना यहोवा फजीत करतो तेव्हा त्यांची दुष्ट कार्ये उघडकीस येतात आणि यहोवाचे नाव पवित्र केले जाते. आपण खात्री बाळगू शकतो की देवाच्या लोकांचा छळ करणारे खरे पाहता काहीही मिळवत नाहीत. उदाहरणार्थ, देवावर पूर्ण मनाने भरवसा ठेवणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांना ते कधीही नष्ट करू शकले नाहीत व पुढेही करू शकणार नाहीत.—नीतिसूत्रे ३:५, ६.
२२. स्तोत्रकर्ता कोणत्या अर्थाने ‘धुरात ठेविलेल्या बुधल्यासारखा’ झाला होता?
२२ आपला छळ केला जातो तेव्हा देवाच्या वचनामुळे आपला त्याच्यावरचा भरवसा आणखी पक्का होतो. (स्तोत्र ११९:८१-८८) गर्विष्ठ जनांकडून छळ केला जात असल्यामुळे स्तोत्रकर्त्याला आपली स्थिती, ‘धुरात ठेविलेल्या बुधल्यासारखी’ वाटली. (स्तोत्र ११९:८३, ८६) प्राचीन काळात, जनावरांच्या कातडीपासून तयार केलेल्या बुधल्या किंवा पिशव्यांमध्ये पाणी, द्राक्षारस किंवा इतर पातळ पदार्थ ठेवले जायचे. वापरात नसताना, या पिशव्या धुराडे नसलेल्या एखाद्या खोलीत, विस्तवाजवळ लटकवून ठेवल्यास त्यांवर सुरकुत्या पडायच्या. कठीण परिस्थितीत किंवा छळाला तोंड देताना कधी तुम्हाला ‘धुरात ठेवलेल्या बुधल्यासारखे’ वाटते का? तर मग यहोवावर भरवसा ठेवून अशी प्रार्थना करा: “तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे, म्हणजे मी तुझ्या तोंडचे निर्बंध पाळीन.”—स्तोत्र ११९:८८.
२३. स्तोत्र ११९:१-८८ पर्यंतची वचने विचारात घेताना आपण काय शिकलो आणि स्तोत्र ११९:८९-१७६ याचे परीक्षण करण्याआधी आपण स्वतःला काय विचारावे?
२३ स्तोत्र ११९ च्या पहिल्या भागात आपण जे काही विचारात घेतले आहे त्यावरून हेच दिसून येते, की यहोवा आपल्या एकनिष्ठ सेवकांना प्रेमदया दाखवतो कारण ते त्याच्या वचनावर भरवसा ठेवतात आणि त्याच्या आज्ञा, निर्बंध, व नियम त्यांना प्रिय वाटतात. (स्तोत्र ११९:१६, ४७, ६४, ७०, ७७, ८८) यहोवाचे उपासक त्याच्या वचनाप्रमाणे आपले वर्तन राखतात तेव्हा त्याला आनंद वाटतो. (स्तोत्र ११९:९, १७, ४१, ४२) या सुरेख स्तोत्राच्या उर्वरित भागाचे परीक्षण करण्यास तुम्ही निश्चितच उत्सुक असाल. मग तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारावा: ‘मी खरोखरच यहोवाच्या वचनाला माझ्या मार्गावरील प्रकाश बनू देतो का?’ (w०५ ४/१५)
[तळटीप]
^ परि. 2 येथे यहोवाच्या संदेशाबद्दल सांगितले आहे, सबंध बायबल—देवाचे वचन यातील मजकुराच्या संदर्भात सांगितलेले नाही.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• खरा आनंद कशावर अवलंबून आहे?
• यहोवाचे वचन आपल्याला आध्यात्मिकरित्या शुद्ध कसे राखते?
• देवाचे वचन कशाप्रकारे धैर्य व सांत्वन देते?
• आपण यहोवावर व त्याच्या वचनावर विश्वास का ठेवला पाहिजे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[२४ पानांवरील चित्र]
पौलाने धैर्याने, ‘राजांसमोरसुद्धा देवाचे निर्बंध सांगितले’