‘सर्व राष्ट्रांना साक्ष’
‘सर्व राष्ट्रांना साक्ष’
“पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.”—प्रेषितांची कृत्ये १:८.
१. शिष्यांनी मत्तय २४:१४ येथे लिहिलेली भविष्यवाणी पहिल्यांदा कोठे व कधी ऐकली होती?
मत्तय २४:१४ यात लिहिलेले येशूचे शब्द इतके ओळखीचे आहेत की आपल्यापैकी बऱ्याच जणांना ते तोंडपाठ आहेत. आणि खरोखरच ही भविष्यवाणी किती उल्लेखनीय आहे! शिष्यांनी पहिल्यांदा ती ऐकली, तेव्हा त्यांना काय वाटले असेल याची कल्पना करा! सा.यु. ३३ चे ते वर्ष होते. शिष्य आता जवळजवळ तीन वर्षांपासून येशूसोबत होते आणि आता ते जेरूसलेमला त्याच्यासोबत आले होते. त्यांनी त्याचे चमत्कार पाहिले होते आणि त्याने शिकवलेल्या गोष्टी ऐकल्या होत्या. येशूने त्यांना शिकवलेल्या अद्भुत सत्यांमुळे ते स्वतः आनंदित झाले असले तरी, त्यांच्यासारखा सर्वांनाच आनंद झाला नाही हेही त्यांना चांगले ठाऊक होते. येशूचे अनेक शक्तिशाली व प्रभावशाली शत्रू होते.
२. शिष्यांना कोणत्या संकटांना व आव्हानांना तोंड द्यावे लागणार होते?
२ जैतुनांच्या डोंगरावर चार शिष्य येशूसोबत बसले होते. येशू त्यांना येणाऱ्या दिवसांत कोणत्या संकटांना व आव्हानांना तोंड द्यावे लागेल याविषयी सांगत होता व ते लक्ष देऊन ऐकत होते. याआधी येशूने त्यांना सांगितले होते की त्याला जिवे मारले जाईल. (मत्तय १६:२१) आता त्याने त्यांना स्पष्टपणे सांगितले की त्यांनाही भयंकर छळाला तोंड द्यावे लागेल. त्याने म्हटले: “ते तुम्हास धरून देतील व तुम्हास जिवे मारतील. आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करितील.” इतकेच नव्हे. अनेकजण खोट्या संदेष्ट्यांकडून बहकवले जातील. इतरजण अडखळतील व एकमेकांस धरून देतील व एकमेकांचा द्वेष करतील. शिवाय, देवाबद्दल व त्याच्या वचनाबद्दल “पुष्कळांची” प्रीती थंडावेल.—मत्तय २४:९-१२.
३. मत्तय २४:१४ येथे आढळणारे येशूचे शब्द खरोखरच थक्क करणारे का आहेत?
३ अशा निराशाजनक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर येशूने असे एक विधान केले की जे ऐकून शिष्यांना आश्चर्य वाटले असेल. त्याने म्हटले: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) होय, येशूने इस्राएलात “सत्याविषयी साक्ष” देण्याचे जे कार्य सुरू केले होते ते पुढेही चालू राहणार होते, किंबहुना जागतिक पातळीवर त्याचा विस्तार होणार होता. (योहान १८:३७) खरोखर किती अद्भूत भविष्यवाणी होती ती! ‘सर्व राष्ट्रांपर्यंत’ हे कार्य विस्तारणे अतिशय आव्हानात्मक असणार होते; आणि ‘सर्व राष्ट्रांचा द्वेष’ पत्करून हे कार्य करणे म्हणजे निव्वळ चमत्कारच असणार होता. हे महान कार्य साध्य केल्यामुळे यहोवाचे श्रेष्ठत्व आणि सामर्थ्य तर गौरविले जाणारच होते पण त्यासोबतच त्याची प्रीती, दया आणि सहनशीलताही प्रकट होणार होती. शिवाय, या कार्यामुळे त्याच्या सेवकांना आपला विश्वास व भक्तिभाव व्यक्त करण्याची संधी मिळणार होती.
४. साक्षकार्य करण्यास कोणाला सांगण्यात आले होते आणि येशूने त्यांना कशाप्रकारे सांत्वन दिले?
४ शिष्यांवर एक अतिशय प्रचंड कार्य सोपवले जात होते याविषयी येशूने त्यांच्या मनात कोणतीही शंका राहू दिली नाही. स्वर्गारोहण होण्याआधी येशू त्यांना प्रकट झाला व म्हणाला: “पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.” (प्रेषितांची कृत्ये १:८) अर्थात, इतरजणही लवकरच त्यांच्यासोबत सामील होणार होते. तरीपण, शिष्यांची संख्या अगदी बोटांवर मोजण्याइतकी होती. तेव्हा, देवाने त्यांच्यावर सोपवलेले हे कार्य साध्य करण्याकरता त्याचा शक्तिशाली पवित्र आत्मा त्यांना सामर्थ्य पुरवणार होता हे जाणून त्यांना किती सांत्वन मिळाले असेल!
५. साक्षकार्यासंबंधी शिष्यांना काय माहीत नव्हते?
५ शिष्यांना माहीत होते की त्यांना सुवार्ता सांगायची होती आणि “सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य” बनवायचे होते. (मत्तय २८:१९, २०) पण हे कार्य नेमके किती प्रमाणात केले जाणार होते आणि शेवट केव्हा होणार होता हे मात्र त्यांना माहीत नव्हते. आणि आज आपल्यालाही ते माहीत नाही. हे ठरवणे सर्वस्वी यहोवाच्या हाती आहे. (मत्तय २४:३६) कार्य पूर्ण झाले आहे असे यहोवाला जेव्हा वाटेल, तेव्हा तो या दुष्ट जगाचा शेवट करेल. आणि फक्त तेव्हाच ख्रिश्चनांना समजेल की यहोवाच्या उद्देशानुसार कार्य साध्य झाले आहे. या शेवटल्या काळात ज्या भव्य प्रमाणात साक्षकार्य केले जात आहे त्याची त्या सुरुवातीच्या शिष्यांनी कल्पनाही केली नसेल.
पहिल्या शतकात देण्यात आलेली साक्ष
६. सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी व त्यानंतर लगेच काय घडले?
६ पहिल्या शतकात, राज्याचा प्रचार व शिष्य बनवण्याच्या कार्यामुळे अतिशय आश्चर्यकारक परिणाम घडून आले. सा.यु. ३३ साली पेन्टेकॉस्टच्या दिवशी जेरूसलेममध्ये एका माडीवरच्या खोलीत जवळजवळ १२० शिष्य उपस्थित होते. त्यांच्यावर देवाचा पवित्र आत्मा ओतण्यात आला, प्रेषित पेत्राने या चमत्काराचा अर्थ समजावून सांगण्याकरता एक हृदयस्पर्शी भाषण दिले आणि सुमारे ३,००० जणांनी विश्वास ठेवला व बाप्तिस्मा घेतला. ही केवळ सुरुवात होती. सुवार्ता प्रचाराच्या कार्याला खीळ घालण्याचा धर्मपुढाऱ्यांनी चंग बांधला तरीसुद्धा, “प्रभु तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे.” लवकरच, “पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार झाली.” यानंतर, “विश्वास ठेवणारे पुष्कळ पुरुष व स्त्रिया ह्यांचे समुदाय प्रभूला मिळत गेले.”—प्रेषितांची कृत्ये २:१-४, ८, १४, ४१, ४७; ४:४; ५:१४.
७. कर्नेल्याचे मतपरिवर्तन ही एक महत्त्वाची घटना का होती?
७ आणखी एक महत्त्वाची घटना सा.यु. ३६ साली घडली. गैरयहुदी कर्नेल्याचे मतपरिवर्तन व बाप्तिस्मा. प्रेषित पेत्राला या देवभीरू माणसाकडे निर्दिष्ट करताना यहोवाने सूचित केले की येशूने “सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य” बनवण्याची जी आज्ञा दिली होती ती केवळ निरनिराळ्या देशांत राहणाऱ्या यहुद्यांपुरती सीमित नव्हती. (प्रेषितांची कृत्ये १०:४४, ४५) हे समजल्यावर प्रचार कार्यात पुढाकार घेणाऱ्यांची काय प्रतिक्रिया होती? परराष्ट्रीयांना अर्थात गैरयहुदी लोकांनाही सुवार्ता सांगावयाची आहे हे यहुदियातील प्रेषितांना व वडीलांना समजले तेव्हा त्यांनी देवाचे गौरव केले. (प्रेषितांची कृत्ये ११:१, १८) त्यादरम्यान, यहुद्यांमध्ये प्रचार कार्याचे उत्तम फळ मिळत होते. काही वर्षांनंतर, सा.यु. ५८ च्या सुमारास परराष्ट्रीय अनुयायांसोबतच “ज्यांनी विश्वास ठेवला आहे असे हजारो लोक यहूद्यांमध्ये” होते.—प्रेषितांची कृत्ये २१:२०.
८. निरनिराळ्या व्यक्तींवर सुवार्तेचा कसा परिणाम होतो?
८ पहिल्या शतकातील ख्रिस्ती अनुयायांच्या संख्येत झालेली वाढ प्रभावित करणारी असली तरीसुद्धा या संख्या ज्या व्यक्तींचे प्रतिनिधीत्व करतात त्यांना आपण विसरता कामा नये. त्यांनी ऐकलेला बायबलमधील संदेश अतिशय प्रभावशाली होता. (इब्री लोकांस ४:१२) ज्यांनी त्याचा स्वीकार केला त्यांच्या जीवनात या संदेशाने अनेक लक्षणीय बदल घडवून आणले. कित्येक व्यक्तींनी आपली पूर्वीची अनैतिक कामे सोडून दिली, नवे मनुष्यत्व धारण केले आणि देवाशी समेट केला. (इफिसकर ४:२२, २३) आजही हेच घडताना दिसते. आणि सुवार्ता स्वीकारणाऱ्या सर्वांना, सर्वकाळ जगण्याची अद्भुत आशा लाभते.—योहान ३:१६.
देवाचे सहकारी
९. आपल्याला कोणता बहुमान व जबाबदारी मिळाल्याचे सुरुवातीच्या ख्रिश्चनांना माहीत होते?
९ आरंभीच्या ख्रिश्चनांनी प्रचार कार्यात मिळणाऱ्या यशाचे श्रेय स्वतः घेतले नाही. सेवक या नात्याने आपण जे कार्य करत आहोत, त्याला ‘पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा’ पाठिंबा आहे हे त्यांनी ओळखले. (रोमकर १५:१३, १९) आध्यात्मिक वृद्धीचे सर्व श्रेय यहोवाचे होते. पण आपल्याला “देवाचे सहकारी” म्हणून कार्य करण्याचा बहुमान व जबाबदारी मिळालेली आहे हे या ख्रिश्चनांना माहीत होते. (१ करिंथकर ३:६-९) त्यामुळे, येशूने दिलेल्या आज्ञेनुसार, त्यांनी आपल्याला नेमलेले कार्य पूर्ण करण्याचा नेटाने यत्न केला.—लूक १३:२४.
१०. सर्व राष्ट्रांना साक्ष देण्याकरता सुरुवातीच्या काही ख्रिश्चनांनी कशाप्रकारे परिश्रम घेतले?
१० “परराष्ट्रीयांचा प्रेषित” या नात्याने पौलाने समुद्रावर व जमिनीवर हजारो मैलांचा प्रवास केला. आशियाच्या रोमी प्रांतात व ग्रीसमध्ये त्याने कित्येक मंडळ्यांची स्थापना केली. (रोमकर ११:१३) तो रोमला व कदाचित स्पेनपर्यंतही गेला असावा. त्यादरम्यान, “सुंता झालेल्या लोकांना सुवार्ता” सांगण्याचे काम ज्याच्यावर सोपवण्यात आले होते त्या प्रेषित पेत्राने उलट दिशेने अर्थात बॅबिलोनच्या दिशेने प्रवास केला व तेथे सेवाकार्य केले. त्याकाळी बॅबिलोनमध्ये बरेच यहुदी वसले होते. (गलतीकर २:७-९; १ पेत्र ५:१३) प्रभूच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतलेल्या इतरांमध्ये त्रुफैना व त्रुफासा या स्त्रिया देखील होत्या. तसेच पर्सिस नावाच्या स्त्रीनेही “प्रभूमध्ये फार श्रम केले” असे म्हणण्यात आले.—रोमकर १६:१२.
११. यहोवाने शिष्यांच्या परिश्रमावर कशाप्रकारे आशीर्वाद दिला?
११ या व इतर आवेशी प्रचारकांच्या परिश्रमावर यहोवाने विपूल आशीर्वाद दिला. सर्व राष्ट्रांना साक्ष दिली जाईल असे येशूने भाकीत केले होते त्याला अद्याप ३० वर्षेही पूर्ण झाली नव्हती तेव्हा पौलाने असे लिहिले की ‘आकाशाखालच्या सर्व सृष्टीत सुवार्तेची घोषणा झाली’ आहे. (कलस्सैकर १:२३) मग तेव्हा शेवट झाला का? एका अर्थाने, होय. सा.यु. ७० साली रोमी सैन्याने जेरूसलेम व त्यातील मंदिराचा नाश केला तेव्हा यहुदी व्यवस्थेचा शेवट झाला. तरीपण, सैतानाच्या जागतिक व्यवस्थेचा नाश करण्याआधी आणखी कितीतरी मोठ्या प्रमाणात साक्ष दिली जाईल, असे यहोवाने ठरवले होते.
आज दिली जाणारी साक्ष
१२. प्रचार करण्याच्या आज्ञेचा सुरुवातीच्या बायबल विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे अर्थ घेतला?
१२ बऱ्याच काळाच्या धर्मत्यागानंतर, एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात शुद्ध उपासनेची पुन्हा एकदा स्थापना झाली. ज्यांना आज यहोवाचे साक्षीदार व त्याकाळी बायबल विद्यार्थी म्हटले जायचे, त्यांना सर्व जगात शिष्य बनवण्याची आज्ञा अगदी स्पष्टपणे समजली होती. (मत्तय २८:१९, २०) १९१४ सालापर्यंत, प्रचार कार्यात सक्रिय असणाऱ्यांची संख्या जवळजवळ ५,१०० इतकी होती आणि सुमारे ६८ देशांत सुवार्ता पोचवण्यात आली होती. पण त्या सुरुवातीच्या बायबल विद्यार्थ्यांना मत्तय २४:१४ या वचनाची पूर्ण अर्थसूचकता समजली नव्हती. एकोणीसाव्या शतकाच्या शेवटापर्यंत, अनेक बायबल संस्थांनी सबंध जगात बायबलचे अनेक भाषांत भाषांतर करून वितरण केले होते. आणि बायबलमध्ये सुवार्ता, किंवा शुभवर्तमान असल्यामुळे, काही दशकांपर्यंत बायबल विद्यार्थ्यांचा असा तर्कवाद होता की बायबलच्या रूपात, राष्ट्रांना साक्ष मिळाली आहे.
१३, १४. १९२८ सालच्या एका टेहळणी बुरूज अंकात देवाच्या इच्छेविषयी व उद्देशाविषयी कोणते स्पष्टीकरण देण्यात आले?
१३ हळूहळू यहोवाने आपल्या इच्छेविषयी व उद्देशाविषयी आपल्या लोकांना सुस्पष्ट समज दिली. (नीतिसूत्रे ४:१८) टेहळणी बुरूज डिसेंबर १, १९२८ (इंग्रजी) अंकात असे म्हणण्यात आले: “बायबलचे वितरण झाले त्याअर्थी राज्याच्या सुवार्तेच्या प्रचाराविषयी जे भाकीत करण्यात आले होते ते पूर्ण झाले आहे असे आपण म्हणू शकतो का? निश्चितच नाही! बायबलचे वितरण करण्यात आले असले तरीही पृथ्वीवर असलेल्या देवाच्या साक्षीदारांच्या लहानशा गटाने देवाच्या उद्देशाविषयी स्पष्टीकरण देणारे साहित्य छापणे आणि ज्या लोकांना बायबल देण्यात आले आहेत त्यांना जाऊन भेटणे अजूनही आवश्यक आहे. नाहीतर आपल्या काळात स्थापन झालेल्या मशीहाच्या राज्याविषयी लोक अंधारातच राहतील.”
१४ त्याच टेहळणी बुरूज अंकात पुढे असे म्हटले होते: “१९२० साली . . . बायबल विद्यार्थ्यांना मत्तय २४:१४ यात प्रभूने केलेल्या भविष्यवाणीचा अर्थ पूर्णपणे समजला. तेव्हा त्यांना जाणीव झाली की “ही सुवार्ता” जी सर्व जगात परराष्ट्रीयांना म्हणजेच सर्व राष्ट्रांना साक्षीसाठी म्हणून गाजविली जाणार होती ती भविष्यात येणार असलेल्या राज्याची सुवार्ता नव्हती. तर मशीहाच्या राज्याने या पृथ्वीवर शासन करण्यास सुरुवात केली आहे याविषयी ही सुवार्ता होती.”
१५. एकोणीसशे वीसच्या दशकापासून साक्षकार्य कितपत विस्तारले आहे?
१५ एकोणीसशे वीसच्या दशकात तो ‘लहानसा गट’ लहानसा राहिला नाही. पुढील दशकांत ‘दुसऱ्या मेंढरांपैकी’ असलेल्या ‘मोठा लोकसमुदायाविषयी’ स्पष्टीकरण देण्यात आले आणि या लोकसमुदायातील सदस्यांना एकत्र करण्यास सुरुवात झाली (प्रकटीकरण ७:९; योहान १०:१६) आज पृथ्वीवरील २३५ देशांत सुवार्तेचे सुमारे ६६,१३,८२९ उद्घोषक आहेत. भविष्यवाणीची किती आश्चर्यकारक पूर्णता झाली आहे! “राज्याची ही सुवार्ता” पूर्वी कधीही इतक्या मोठ्या प्रमाणावर गाजवण्यात आली नाही. पूर्वी कधीही, पृथ्वीवर यहोवाचे इतके विश्वासू सेवक हयात नव्हते.
१६. गत सेवा वर्षात काय साध्य करण्यात आले?
१६ साक्षीदारांच्या या समुदायाने २००५ सेवा वर्षादरम्यान एकत्र मिळून बरेच कार्य केले आहे. त्यांनी २३५ देशांत सुवार्तेची घोषणा करण्यात एक अब्जापेक्षा जास्त तास खर्च केले. कोट्यवधी लोकांना पुनर्भेटी देण्यात आल्या आणि लाखो बायबल अभ्यास चालवण्यात आले. हे कार्य यहोवाच्या साक्षीदारांनी, इतरांना देवाच्या वचनातील संदेश सांगण्याकरता उदारपणे आपला वेळ व साधने खर्च करण्याद्वारे साध्य केले आहे. (मत्तय १०:८) यहोवा आपल्या सामर्थ्यशाली पवित्र आत्म्याच्या माध्यमाने त्याच्या सेवकांना त्याची इच्छा पूर्ण करण्याकरता सदोदीत शक्ती पुरवत आहे.—जखऱ्या ४:६.
साक्ष देण्याकरता परिश्रम घेणे
१७. सुवार्ता गाजविण्याविषयी येशूच्या शब्दांना यहोवाचे लोक कसा प्रतिसाद देत आहेत?
१७ सुवार्ता गाजवण्याविषयी येशूने जे सांगितले होते त्याला आता जवळजवळ २,००० वर्षे होत आली आहेत तरीसुद्धा देवाच्या लोकांचा या कार्याकरता असलेला आवेश मंदावलेला नाही. आपल्याला माहीत आहे, की हे चांगले कार्य आपण धीराने करत राहतो तेव्हा आपण खरे तर यहोवाच्या प्रीती, दया व सहनशीलता यांसारख्या गुणांचे अनुकरण करत असतो. त्याच्यासारखीच आपलीही अशीच इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये तर सर्वांनी पश्चात्ताप करावा आणि यहोवाशी समेट करावा. (२ करिंथकर ५:१८-२०; २ पेत्र ३:९) देवाच्या आत्म्यात उत्सुक असलेले यहोवाचे साक्षीदार पृथ्वीच्या टोकापर्यंत आवेशाने सुवार्ता गाजवत आहेत. (रोमकर १२:११) परिणामस्वरूप, पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांत लोक सत्याचा स्वीकार करत आहेत व यहोवाच्या प्रेमळ मार्गदर्शनानुसार आपल्या जीवनात बदल करत आहेत. याची काही उदाहरणे पाहा.
१८, १९. सुवार्तेला चांगला प्रतिसाद देणाऱ्या काही व्यक्तींचे अनुभव तुम्हाला माहीत आहेत का?
१८ चार्ल्स हा पश्चिम केनियात राहणारा एक शेतकरी होता. १९९८ साली त्याने ८,००० पेक्षा जास्त किलो तंबाखू विकली आणि त्यामुळे त्याला सर्वोत्कृष्ट तंबाखू शेतकरी हा किताब व पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी त्याने बायबलचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. लवकरच त्याला जाणीव झाली की तंबाखूच्या उत्पादनात सामील असणारी व्यक्ती, आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करण्याविषयी येशूने दिलेल्या आज्ञेचे उल्लंघन करते. (मत्तय २२:३९) ‘सर्वोत्कृष्ट तंबाखू शेतकरी’ खरे तर ‘सर्वोत्कृष्ट खूनी’ आहे या निष्कर्षावर येऊन, चार्ल्सने आपल्या शेतातील तंबाखूच्या रोपांवर विषाची फवारणी केली. यानंतर त्याने प्रगती केली, आपले जीवन समर्पित केले व बाप्तिस्मा घेतला आणि आज तो एक सामान्य पायनियर व सेवा सेवक आहे.
१९ जगभरात चाललेल्या साक्षकार्याद्वारे यहोवा सर्व राष्ट्रांना हालवून सोडत आहे यात शंका नाही. आणि परिणामस्वरूप सर्व राष्ट्रांतील निवडक वस्तू—अर्थात लोक येत आहेत. (हाग्गय २:७) पोर्तुगालमध्ये राहणारा पेद्रू १३ वर्षांचा असताना एका सेमिनरीत दाखल झाला. त्याला मिशनरी बनून लोकांना बायबलचे शिक्षण द्यायचे होते. पण काही काळातच त्याने सेमिनरी सोडून दिली कारण त्यांच्या वर्गांत बायबलचा क्वचितच उल्लेख केला जाई. सहा वर्षांनंतर तो लिस्बन विद्यापीठात मानसशास्त्राचा अभ्यास करू लागला. तो आपल्या मावशीकडे राहात होता. ती यहोवाची साक्षीदार आहे, आणि तिने त्याला बायबलचा अभ्यास करण्याचे प्रोत्साहन दिले. त्यावेळी, पेद्रूला देवाच्या अस्तित्वाविषयी खात्री नव्हती. बायबल अभ्यास करावा की नाही? तो बुचकळ्यात पडला. त्याने निर्णय घेण्याच्या असमर्थतेविषयी आपल्या मानसशास्त्राच्या प्राध्यापकाशी चर्चा केली. त्याच्या प्राध्यापकांनी त्याला सांगितले की मानसशास्त्रानुसार, जी व्यक्ती निर्णय घेऊ शकत नाही तिची आत्मघाती प्रवृत्ती असते. त्याक्षणी पेद्रूने बायबल अभ्यास करण्याचे ठरवले. अलीकडेच त्याने बाप्तिस्मा घेतला आणि आता तो स्वतः बायबल अभ्यास चालवतो.
२०. राष्ट्रांना इतक्या मोठ्या प्रमाणात साक्ष दिली जात आहे ही आपल्याकरता एक आनंदाची गोष्ट का आहे?
२० सर्व राष्ट्रांना आणखी किती प्रमाणावर साक्ष दिली जाईल हे अजूनही आपल्याला माहीत नाही; शिवाय अंत येण्याचा नेमका दिवस व घटकाही आपल्याला माहीत नाही. आपल्याला इतकेच माहीत आहे की हे लवकरच घडणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर केले जात असलेले प्रचार कार्य त्या अनेक चिन्हांपैकी केवळ एक चिन्ह आहे, जी दाखवतात की सर्व मानवी सरकारे नाहीशी होऊन देवाचे राज्य स्थापन होण्याची वेळ जवळ आली आहे. ही आपल्याकरता आनंदाची गोष्ट आहे. (दानीएल २:४४) दर वर्षी कोट्यवधी लोकांना सुवार्तेला प्रतिसाद देण्याची संधी दिली जात आहे आणि यामुळे आपला देव यहोवा याचे गौरव होते. तेव्हा जगभरातील आपल्या बांधवांसोबत विश्वासूपणे, सर्व राष्ट्रांना साक्ष देण्याच्या कार्यात व्यग्र राहण्याचा आपण सारे मिळून संकल्प करू या. असे केल्यामुळे आपलेच नव्हे तर आपले ऐकणाऱ्यांचेही तारण होईल.—१ तीमथ्य ४:१६. (w०६ २/१)
तुम्हाला आठवते का?
• मत्तय २४:१४ ही एक उल्लेखनीय भविष्यवाणी आहे असे का म्हणता येईल?
• सुरुवातीच्या ख्रिश्चनांनी प्रचार कार्यात कोणते परिश्रम घेतले आणि याचा काय परिणाम झाला?
• सर्व राष्ट्रांना साक्ष देण्याची गरज बायबल विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे ओळखली?
• यहोवाच्या लोकांनी गत सेवा वर्षांत केलेल्या कार्याकडे पाहताना तुम्हाला कोणती गोष्ट प्रभावित करते?
[अभ्यासाचे प्रश्न]
[२८ पानांवरील चित्र]
यहोवाने पेत्राला कर्नेल्य व त्याच्या कुटुंबाला साक्ष देण्याकरता निर्दिष्ट केले
[२९ पानांवरील चित्र]
पौलाने सुवार्तेच्या प्रचाराकरता समुद्रात व जमिनीवर हजारो मैलांचा प्रवास केला