व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सैतानाला विरोध करा आणि तो पळून जाईल!

सैतानाला विरोध करा आणि तो पळून जाईल!

सैतानाला विरोध करा आणि तो पळून जाईल!

“देवाच्या अधीन व्हा; आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हांपासून पळून जाईल.”—याकोब ४:७.

१, २. (क) यशयाच्या १४ व्या अध्यायातील एका घोषणेत दियाबलाचा कोणता गुण दिसून येतो? (ख) आपण कोणत्या प्रश्‍नांची चर्चा करणार आहोत?

 दियाबल म्हणजे गर्विष्ठपणाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. देवाचा संदेष्टा यशया याने लिहिलेल्या शब्दांत त्याचा हा गर्व दिसून येतो. बॅबिलोन जागतिक महासत्ता बनण्याच्या एक शतकापेक्षा अधिक काळाआधी देवाचे लोक, ‘बाबेलच्या राजाच्या’ विरोधात असे घोषित करत असल्याचे वर्णन करण्यात आले: “तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून [दाविदाच्या वंशातून आलेले राजे] माझे सिंहासन उच्च करीन, . . . मी परात्परासमान होईन.” (यशया १४:३, ४, १२-१५; गणना २४:१७) ‘बाबेलच्या राजाचा’ गर्व, ‘ह्‍या युगाच्या दैवताच्या’ अर्थात सैतानाच्या मनोवृत्तीसारखाच होता. (२ करिंथकर ४:४) पण ज्याप्रमाणे बॅबिलोनच्या राजघराण्याचा लाजिरवाणा अंत झाला त्याचप्रकारे सैतानाच्या गर्वामुळे त्याचाही अनर्थकारी शेवट होईल.

पण जोपर्यंत दियाबल अस्तित्वात आहे तोपर्यंत याप्रकारचे प्रश्‍न आपल्या मनात येऊ शकतात: आपण सैतानाला भ्यावे का? तो लोकांना ख्रिश्‍चनांचा छळ करण्यास का उद्युक्‍त करतो? दियाबलाचे आपल्यावर वर्चस्व होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो?

आपण दियाबलाला भ्यावे का?

३, ४. विश्‍वासू अभिषिक्‍त ख्रिश्‍चन व त्यांचे साथीदार सैतानाला का घाबरत नाहीत?

अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांकरता येशू ख्रिस्ताचे हे शब्द अतिशय दिलासा देणारे आहेत: “तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको; पाहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरूंगात टाकणार आहे; आणि तुमचे दहा दिवस हालअपेष्टांत जातील. मरेपर्यंत तू विश्‍वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुगूट देईन.” (प्रकटीकरण २:१०) अभिषिक्‍त जन व पृथ्वीवरील जीवनाची आशा असणारे त्यांचे साथीदार दियाबलाला भीत नाहीत. ते मुळातच धैर्यवान असल्यामुळे ते दियाबलाला भीत नाहीत अशातला भाग नाही. तर त्यांना देवाबद्दलचे आदरयुक्‍त भय असल्यामुळे आणि ते ‘त्याच्या पंखाच्या छायेचा आश्रय’ घेतात त्यामुळे त्यांना दियाबलाचे भय वाटत नाही.—स्तोत्र ३४:९; ३६:७.

येशू ख्रिस्ताच्या सुरुवातीच्या निर्भय शिष्यांना अनेक प्रकारे छळ सोसावा लागला तरीसुद्धा ते मृत्यूपर्यंत विश्‍वासू राहिले. दियाबल सैतानाच्या भीतीने ते हतबल झाले नाहीत, कारण त्यांना माहीत होते की जे यहोवाला एकनिष्ठ राहतील त्यांना तो कधीही सोडणार नाही. त्याचप्रकारे, आजच्या काळात अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना व त्यांच्या समर्पित साथीदारांनाही तीव्र छळाला तोंड द्यावे लागले तरीसुद्धा देवाला शेवटपर्यंत विश्‍वासू राहण्याचा त्यांचा निर्धार आहे. पण प्रेषित पौलाने असेही सूचित केले की दियाबल एखाद्याचा मृत्यू घडवून आणू शकतो. हे समजल्यावर आपल्याला भिती वाटायला नको का?

५. इब्री लोकांस २:१४, १५ यातून आपण काय शिकतो?

पौलाने म्हटले की येशूही ‘मनुष्यांसारखा रक्‍तमांसाचा झाला’, तो या हेतूने “की, मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान, ह्‍याला मरणाने शून्यवत करावे, आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्‍त करावे.” (इब्री लोकांस २:१४, १५) “मरणावर सत्ता गाजवणारा” या नात्याने सैतानाने यहुदा इस्कर्योत यास आपल्या कह्‍यात घेतले आणि मग यहुदी धर्मपुढारी व रोमी अधिकारी यांचा उपयोग करून येशूचा वध घडवून आणला. (लूक २२:३; योहान १३:२६, २७) पण, येशूने आपल्या बलिदानरूपी मृत्यूच्याद्वारे पापी मानवजातीला सैतानाच्या तावडीतून मुक्‍त करून सार्वकालिक जीवन मिळवण्याचा मार्ग मोकळा केला आहे.—योहान ३:१६.

६, ७. सैतानाला मरणावर कितपत सत्ता आहे?

दियाबलाला मरणावर कितपत सत्ता आहे? सैतानाने दुष्ट कृत्ये करण्यास सुरुवात केली तेव्हापासूनच त्याच्या लबाडीमुळे व बहकवण्यामुळे मानवांवर मरण आले आहे. कारण आदामाने पाप केले आणि अशारितीने मानवी कुटुंबाला पापाचा व मृत्यूचा वारसा दिला. (रोमकर ५:१२) शिवाय, सैतानाच्या पृथ्वीवरील सेवकांनी यहोवाच्या उपासकांना छळले आहे, कधीकधी तर मृत्यू होईपर्यंत छळले आहे. येशू ख्रिस्ताच्या बाबतीत त्यांनी असेच केले.

पण दियाबल, त्याला वाटेल त्या व्यक्‍तीला मारून टाकू शकतो असा आपण विचार करू नये. जे आपले आहेत त्यांचे देव संरक्षण करतो आणि तो सैतानाला या पृथ्वीवरून सर्व खऱ्‍या उपासकांना नष्ट करण्याची कधीही परवानगी देणार नाही. (रोमकर १४:८) यहोवा आपल्या सर्व लोकांचा छळ होऊ देतो आणि दियाबलाच्या हल्ल्यांमुळे काही जणांना मरणही येऊ देतो हे खरे आहे. पण देवाच्या ‘स्मरणवहीत’ ज्यांचे नाव आहे त्या सर्वांना पुनरुत्थानाची अद्‌भुत आशा आहे, असे बायबल सांगते—आणि या विश्‍वासू जनांचे पुनरुत्थान घडू नये म्हणून सैतान काहीही करण्यास समर्थ नाही.—मलाखी ३:१६; योहान ५:२८, २९; प्रेषितांची कृत्ये २४:१५.

सैतान छळ का करतो?

८. दियाबल देवाच्या सेवकांचा छळ का करतो?

जर आपण देवाचे एकनिष्ठ सेवक असू, तर दियाबल आपला एका मूलभूत कारणामुळे छळ करतो. आपल्याला आपल्या विश्‍वासासंबंधी हातमिळवणी करायला लावणे हा त्याचा मुख्य हेतू आहे. आपल्या स्वर्गीय पित्यासोबत आपला एक मोलवान नातेसंबंध आहे आणि सैतान हा नातेसंबंध तोडू इच्छितो. याचे आपल्याला नवल वाटण्याचे कारण नाही. एदेन बागेत यहोवाने स्वतःच भाकीत केले होते की त्याची लाक्षणिक “स्त्री” व ‘सर्प’ यांच्यात व त्यांच्या ‘संततीत’ वैर असेल. (उत्पत्ति ३:१४, १५) शास्त्रवचनांत दियाबलाला “जुनाट साप” म्हटले आहे आणि त्यांत हेही प्रकट केले आहे की आता सैतानाचा काळ थोडा राहिलेला आहे, ज्यामुळे तो अत्यंत संतप्त आहे. (प्रकटीकरण १२:९, १२) दोन ‘संततींमधील’ वैरभाव अद्याप कायम असल्यामुळे यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करणारे आपला छळ होण्याची अपेक्षा करू शकतात. (२ तीमथ्य ३:१२) सैतानाकडून होणाऱ्‍या या छळाचे खरे कारण तुम्हाला माहीत आहे का?

९, १०. दियाबलाने कोणता वादविषय उपस्थित केला आहे आणि मानवांच्या वर्तनाशी त्याचा काय संबंध आहे?

दियाबलाने विश्‍वाच्या सार्वभौमत्त्वासंबंधी वादविषय उपस्थित केला आहे. त्याच संदर्भात, त्याने मनुष्याच्या देवाप्रती असलेल्या एकनिष्ठतेवरही शंका घेतली आहे. सैतानाने ईयोब या सात्त्विक मनुष्याचा छळ केला. का? तर ईयोबाने यहोवाला सोडून द्यावे या हेतूने. ईयोबाची पत्नी व त्याचे तीन “भिकार सांत्वनकर्ते” त्यावेळी सैतानाच्या उद्देशाला हातभार लावत होते. ईयोबाच्या पुस्तकात सांगितल्यानुसार, दियाबलाने देवाला आव्हान केले व असा दावा केला की त्याला जर कोणत्याही व्यक्‍तीची परीक्षा घेण्याची परवानगी देण्यात आली तर एकही मानव देवाला विश्‍वासू राहणार नाही. पण ईयोबाने शेवटपर्यंत देवाला सोडले नाही आणि अशाप्रकारे त्याने सिद्ध केले की सैतानाचा दावा खोटा आहे. (ईयोब १:८-२:९; १६:२; २७:५; ३१:६) दियाबल आज यहोवाच्या साक्षीदारांचा छळही याच हेतूने करतो की त्यांनी यहोवाला सोडून द्यावे आणि त्याला आपला दावा खरा करून दाखवण्याची संधी मिळावी.

१० दियाबल आपल्याला कसेही करून देवाला सोडून देण्यास प्रवृत्त करण्याच्या इराद्याने आपला छळ करतो हे समजल्यावर खरे तर आपल्याला त्याच्याविरुद्ध धैर्यवान व खंबीर राहण्यास साहाय्य मिळते. (अनुवाद ३१:६) आपला देव सबंध विश्‍वाचा सार्वभौम आहे आणि तो आपल्याला शेवटपर्यंत विश्‍वासू राहण्यास मदत करेल. तेव्हा आपण नेहमी यहोवाला विश्‍वासू राहण्याद्वारे त्याचे मन आनंदित करण्याचा प्रयत्न करत राहू या, जेणेकरून त्याची निंदा करणाऱ्‍या दियाबल सैतानाला तो उत्तर देऊ शकेल.—नीतिसूत्रे २७:११.

“आम्हाला त्या दुष्टापासून सोडीव”

११. “आम्हाला परीक्षेत आणू नको,” अशी विनंती करण्याचा काय अर्थ होतो?

११ कोणत्याही परिस्थितीत देवाला जडून राहणे, ही काही साधी गोष्ट नाही; यासाठी मनःपूर्वक प्रार्थना करण्याची गरज आहे. या संदर्भात, येशूने आपल्या शिष्यांना शिकवलेल्या प्रार्थनेतील शब्द अतिशय उपयुक्‍त ठरतात. इतर गोष्टींसोबत येशूने या प्रार्थनेत असेही म्हटले: “आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला त्या दुष्टापासून सोडीव.” (मत्तय ६:१३, इजी टू रीड व्हर्शन) यहोवा आपल्यासमोर पाप करण्याचा मोह आणून आपली परीक्षा घेत नाही. (याकोब १:१३) पण शास्त्रवचनांत काही ठिकाणी देव काही गोष्टी करतो किंवा घडवून आणतो असे म्हटलेले आहे, मुळात तो फक्‍त या गोष्टी घडण्याची अनुमती देतो. (रूथ १:२०, २१) तेव्हा, येशूने सुचवल्याप्रमाणे प्रार्थना करण्याचा असा अर्थ होतो की आपल्यासमोर एखादी वाईट गोष्ट करण्याचा मोह आला तर आपण त्या मोहाला बळी पडू नये म्हणून आपण यहोवाची मदत मागत असतो. आणि तो आपली ही प्रार्थना जरूर ऐकेल कारण शास्त्रवचनांत आपल्याला हे आश्‍वासन दिले आहे: “देव विश्‍वसनीय आहे तो तुमची परीक्षा तुमच्या शक्‍तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायहि करील, ह्‍यासाठी की, तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे.”—१ करिंथकर १०:१३.

१२. “आम्हाला त्या दुष्टापासून सोडीव” अशी प्रार्थना आपण का करतो?

१२ येशूने शिकवलेल्या प्रार्थनेत परीक्षांविषयी उल्लेख केल्यावर येशूने उचितपणे म्हटले: “आम्हाला त्या दुष्टापासून सोडीव.” काही बायबल भाषांतरांत असे म्हटले आहे: “आम्हास वाईटापासून सोडीव” (द होली बायबल मराठी—आर. व्ही.; किंग जेम्स व्हर्शन; रिव्हाइज्ड स्टॅन्डर्ड व्हर्शन) किंवा काहींमध्ये: “दुष्टाईपासून आमचे संरक्षण कर” (कंटेमप्ररी इंग्लिश व्हर्शन) असे म्हटले आहे. पण शास्त्रवचनांत, ‘सोडीव’ हा शब्द सहसा लोकांच्या संदर्भात वापरला जातो आणि मत्तयाच्या शुभवर्तमानात दियाबलाला “परीक्षक” अर्थात एक व्यक्‍ती म्हणून संबोधले आहे. (मत्तय ४:३, ११) तेव्हा “त्या दुष्टापासून” म्हणजेच सैतानापासून सोडीव अशी प्रार्थना करणे महत्त्वाचे आहे. तो आपल्याला देवाविरुद्ध पाप करण्यास प्रवृत्त करण्याच्या प्रयत्नात असतो. (१ थेस्सलनीकाकर ३:५) “आम्हाला त्या दुष्टापासून सोडीव” अशी आपण प्रार्थना करतो, तेव्हा आपण खरे तर आपल्या स्वर्गीय पित्याला मार्गदर्शनाकरिता व साहाय्याकरिता विनंती करत असतो जेणेकरून दियाबलाने आपल्यावर वर्चस्व मिळवू नये.

आपल्यावर दियाबलाचे वर्चस्व होऊ नये

१३, १४. करिंथकरांना, मंडळीतल्या एका अनैतिक माणसाशी व्यवहार करण्याच्या त्यांच्या पद्धतीत बदल का करावा लागला?

१३ पौलाने करिंथ मंडळीतल्या ख्रिस्ती बांधवांना क्षमाशील असण्याचा आग्रह करताना असे लिहिले: “ज्या कोणाला तुम्ही एखाद्या गोष्टीची क्षमा करिता त्याला त्याबाबत मीहि क्षमा करितो, कारण मी क्षमा केली असली तर ज्या कशाची क्षमा केली ती तुम्हाकरिता ख्रिस्तासमक्ष केली आहे; अशा हेतूने की, आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये; त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही.” (२ करिंथकर २:१०, ११) दियाबल अनेकप्रकारे आपल्यावर वर्चस्व मिळवू शकतो, पण पौलाने वरीलप्रमाणे का म्हटले?

१४ करिंथकरांनी एका अनैतिक माणसाला मंडळीत राहू दिल्यामुळे पौलाने त्यांना ताकीद दिली होती. ‘परराष्ट्रीयांमध्ये देखील आढळत नाही असले जारकर्म’ खपवून घेतल्याबद्दल मंडळीवर दोष आला हे पाहून सैतानाला साहजिकच फार आनंद झाला असेल. शेवटी, त्या दुष्कर्मी व्यक्‍तीला बहिष्कृत करण्यात आले. (१ करिंथकर ५:१-५, ११-१३) या मनुष्याने नंतर पश्‍चात्ताप केला. आता जर करिंथकरांनी त्याला क्षमा करण्यास व मंडळीत परत घेण्यास नकार दिला असता तर दियाबल एका वेगळ्या प्रकारे त्यांच्यावर वर्चस्व मिळवू शकत होता. ते कसे? सैतानासारखेच ते ख्रिस्ती देखील निष्ठूर व निर्दय ठरले असते. जर या पश्‍चात्तापी व्यक्‍तीने “दुःखसागरात बुडून” देवाची उपासना करण्याचेच सोडून दिले असते, तर विशेषतः मंडळीतले वडील दयाळू असणाऱ्‍या यहोवा देवासमोर याबद्दल काही अंशी जबाबदार ठरले असते. (२ करिंथकर २:७; याकोब २:१३; ३:१) अर्थात, क्रूर, निष्ठूर व निर्दय होऊन सैतानाचे अनुकरण करावेसे कोणत्याही खऱ्‍या ख्रिस्ती व्यक्‍तीला वाटणार नाही.

देवाकडील शस्त्रसामग्रीपासून मिळणारे संरक्षण

१५. आपण कोणती लढाई लढत आहोत आणि विजयी होणे कशावर अवलंबून आहे?

१५ दियाबलापासून सुटका मिळण्याकरता आपल्याला दुष्ट आत्मिक शक्‍तींशी आध्यात्मिक लढाई लढावी लागेल. जर आपण “देवाची [“संपूर्ण”] शस्त्रसामग्री धारण” केली तरच आपल्याला या लढाईत विजयी होता येईल. (इफिसकर ६:११-१८, NW) या शस्त्रसामग्रीत “नीतिमत्वाचे उरस्त्राण” देखील सामील आहे. (इफिसकर ६:१४) प्राचीन इस्राएलातील शौल राजाने देवाच्या आज्ञांचे उल्लंघन केले आणि त्यामुळे तो देवाचा पवित्र आत्मा गमावून बसला. (१ शमुवेल १५:२२, २३) पण जर आपण नीतिमत्त्वाने चाललो व संपूर्ण आध्यात्मिक शस्त्रसामग्री धारण केली, तर आपल्याला देवाचा पवित्र आत्मा, आणि सैतान व त्याचे दुष्टात्मे यांच्यापासून आवश्‍यक संरक्षण देखील मिळेल.—नीतिसूत्रे १८:१०.

१६. दुष्ट आत्मिक शक्‍तींविरुद्ध आपण सतत संरक्षण कसे मिळवू शकतो?

१६ दुष्ट आत्मिक शक्‍तींविरुद्ध सतत संरक्षण मिळण्याकरता आपण देवाच्या वचनाचे नियमितपणे वाचन व त्याचा अभ्यास केला पाहिजे; तसेच, ‘विश्‍वासू कारभाऱ्‍याने’ पुरवलेल्या प्रकाशनांचा चांगला उपयोग केला पाहिजे. (लूक १२:४२) अशारितीने आपण पौलाच्या सल्ल्याप्रमाणे आपली मने आरोग्यकारक आध्यात्मिक गोष्टींनी भरत असू. पौलाने म्हटले: “बंधूंनो, . . . जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्‌गुण, जी काही स्तुति, त्यांचे मनन करा.”—फिलिप्पैकर ४:८.

१७. सुवार्तेचा प्रचार परिणामकारकरित्या करण्याकरता आपल्याला कशाचे साहाय्य मिळू शकते?

१७ यहोवा आपल्याला ‘सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवण्यास’ साहाय्य करतो. (इफिसकर ६:१५) ख्रिस्ती सभांमध्ये नियमित उपस्थित राहिल्यामुळे आपण देवाच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्याकरता सुसज्ज होतो. देवाच्या सत्याविषयी शिकून घेण्यास व आध्यात्मिक स्वातंत्र्य अनुभवण्यास इतरांना मदत करताना आपल्याला किती आनंद वाटतो! (योहान ८:३२) खोट्या शिकवणुकींपासून स्वतःस सुरक्षित ठेवण्यास व ‘तटबंदी जमीनदोस्त करण्यासाठी,’ “आत्म्याची तरवार म्हणजे देवाचे वचन” अत्यावश्‍यक आहे. (इफिसकर ६:१७; २ करिंथकर १०:४, ५) देवाच्या वचनाचा अर्थात बायबलचा निपुणतेने वापर केल्यामुळे आपण इतरांना सत्याचे शिक्षण देऊ शकतो आणि दियाबलाच्या कुयुक्‍त्‌यांपासून स्वतःचा बचाव करू शकतो.

१८. आपल्याला कशाप्रकारे ‘सैतानाच्या डावपेचांपुढे टिकाव धरता’ येईल?

१८ आपल्या आध्यात्मिक शस्त्रसामग्रीविषयीचे वर्णन पौलाने अशाप्रकारे सुरू केले: “प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा.” (इफिसकर ६:१०, ११) या ठिकाणी ‘टिकाव धरणे’ असे भाषांतर केलेल्या ग्रीक शब्दाचा संबंध सैनिकाने आपल्या नेमलेल्या स्थानी खंबीरतेने उभे राहण्याशी आहे. सैतान आपल्या एकतेचा भंग करण्याचा, आपल्या शिकवणुकींत भेसळ करण्याचा किंवा आपल्याला देवाविरुद्ध जाण्यास प्रवृत्त करण्याचा निरनिराळ्या कपटी मार्गांनी प्रयत्न करत असला तरी आपण मात्र आध्यात्मिक लढाईत आपल्या स्थानी खंबीर राहतो. पण दियाबलाचे हल्ले आजपर्यंत यशस्वी झालेले नाहीत आणि पुढेही कधीच होणार नाहीत! *

दियाबलाला विरोध करा म्हणजे तो पळून जाईल

१९. दियाबलाला विरोध करण्याचा एक मार्ग कोणता?

१९ दियाबल व त्याच्या नियंत्रणात असलेल्या दुष्ट आत्मिक शक्‍तींविरुद्ध आपल्या आध्यात्मिक लढाईत आपण विजयी होऊ शकतो. सैतानाला भिण्याचे काहीच कारण नाही. शिष्य याकोबाने लिहिले: “देवाच्या अधीन व्हा; आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हांपासून पळून जाईल.” (याकोब ४:७) सैतानाला व त्याला सहकार्य करणाऱ्‍या दुष्टात्म्यांना विरोध करण्याचा एक मार्ग म्हणजे जादूटोणा व त्याच्याशी संबंधित कोणत्याही गोष्टीत सामील न होणे आणि जे अशा गोष्टींत भाग घेतात त्यांच्याशीही संबंध न ठेवणे. शास्त्रवचनांत स्पष्टपणे सांगितले आहे की यहोवाच्या सेवकांनी शकुन पाहणे, ज्योतिषशास्त्र, भविष्य सांगणे व भूतविद्या यांसारख्या गोष्टींत भाग घेऊ नये. जर आपण आध्यात्मिकरित्या सक्रिय व सुदृढ असू, तर कोणी आपल्यावर जादूटोणा करेल अशी भिती बाळगण्याची गरज नाही.—गणना २३:२३; अनुवाद १८:१०-१२; यशया ४७:१२-१५; प्रेषितांची कृत्ये १९:१८-२०.

२०. आपण दियाबलाला कशाप्रकारे विरोध करू शकतो?

२० आपण बायबलच्या तत्त्वांना व सत्यांना जडून राहण्याद्वारे व दियाबलाविरुद्ध टिकाव धरण्याद्वारे त्याला ‘अडवतो.’ या जगाचे सैतानाशी संगनमत आहे कारण सैतानच त्याचे दैवत आहे. (२ करिंथकर ४:४) म्हणूनच आपण या जगाची ज्यांत झाक आहे अशा गोष्टींचा उदाहरणार्थ गर्व, स्वार्थीपणा, अनैतिकता, हिंसाचार व भौतिकवाद यांचा धिक्कार करतो. आपल्याला माहीत आहे की दियाबलाने अरण्यात येशूची परीक्षा घेतली व येशूने त्याच्या हल्ल्यांचे प्रत्युत्तर देण्याकरता शास्त्रवचनांचा उपयोग केला तेव्हा तो पळून गेला. (मत्तय ४:४, ७, १०, ११) त्याचप्रकारे, आपण यहोवाच्या पूर्णपणे अधीन राहिलो व प्रार्थनापूर्वक त्याच्यावर विसंबून राहिलो तर सैतान आपल्यापासूनही ‘पळून जाईल.’ (इफिसकर ६:१८) यहोवा देव व त्याचा परमप्रिय पुत्र आपल्या पाठीशी असताना कोणीही—दियाबलसुद्धा—आपले कायमचे नुकसान करू शकत नाही!—स्तोत्र ९१:९-११. (w०६ १/१५)

[तळटीप]

^ परि. 18 देवाकडील आध्यात्मिक शस्त्रसामग्रीवर अधिक माहितीकरता टेहळणी बुरूज सप्टेंबर १५, २००४, अंकातील पृष्ठे १५-२० पाहावीत.

तुमचे उत्तर काय?

• आपण दियाबल सैतानाला भ्यावे का?

• सैतान ख्रिश्‍चनांचा छळ का करतो?

• “त्या दुष्टापासून सोडीव” अशी आपण प्रार्थना का करतो?

• आध्यात्मिक लढाई लढताना आपण विजयी कसे होऊ शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१७ पानांवरील चित्र]

ख्रिस्ताचे सुरुवातीचे निर्भय अनुयायी मृत्यूपर्यंत विश्‍वासू राहिले

[१८ पानांवरील चित्र]

जे यहोवाच्या स्मरणात आहेत त्यांचे पुनरुत्थान होण्यापासून दियाबल थांबवू शकत नाही

[१९ पानांवरील चित्र]

“त्या दुष्टापासून” सोडव अशी तुम्ही देवाला प्रार्थना करता का?

[२० पानांवरील चित्र]

तुम्ही ‘देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री’ परिधान केली आहे का?