एस्तेर पुस्तकातील ठळक मुद्दे
यहोवाचे वचन सजीव आहे
एस्तेर पुस्तकातील ठळक मुद्दे
एक कट शिजत आहे. सर्व यहुद्यांची कत्तल करण्याचा हा कट अतिशय काळजीपूर्वक रचला जात आहे जेणेकरून तो परिणामकारक ठरेल. एका ठरलेल्या दिवशी, भारतापासून इथियोपियापर्यंत पसरलेल्या साम्राज्यात राहणाऱ्या सर्व यहुद्यांचा समूळ नाश केला जाईल. कट रचणाऱ्याच्या मनात तर हेच आहे. पण, एक महत्त्वाची गोष्ट त्याच्या ध्यानातून निसटते. स्वर्गाचा देव आपल्या निवडलेल्या लोकांना कोणत्याही जीवघेण्या परिस्थितीतून सुखरूप बाहेर काढू शकतो. सुटकेविषयीचा हा अहवाल बायबलमधील एस्तेर नामक पुस्तकात आहे.
मर्दखय नावाच्या एका वृद्ध यहुदी मनुष्याने एस्तेर पुस्तकाचे लेखन केले आहे. या पुस्तकात, पर्शियाचा राजा अहश्वरोश अथवा झरक्सीस याच्या शासनकाळादरम्यानच्या १८ वर्षांच्या कालावधीचे वर्णन आहे. यहोवाचे लोक, एका विस्तीर्ण साम्राज्यात विखुरलेले असले तरी, तो आपल्या लोकांना त्यांच्या शत्रूंच्या दुष्ट कारस्थानांतून कसे सोडवतो हे या अहवालावरून दिसते. या ज्ञानामुळे आज २३५ देशांत यहोवाची सेवा करणाऱ्या त्याच्या लोकांचा विश्वास खरोखरच मजबूत होतो. शिवाय, एस्तेर पुस्तकात अशी पात्रे आहेत ज्यांचे आपण अनुकरण केले पाहिजे आणि अशीही पात्रे आहेत ज्यांचे अनुकरण आपण करू नये. निश्चितच, “देवाचे वचन सजीव, सक्रिय” आहे.—इब्री लोकांस ४:१२.
राणीने लोकांच्या वतीने बोलले पाहिजे
आपल्या शासनाच्या तिसऱ्या वर्षी (सा.यु.पू. ४९३), राजा अहश्वरोश एक शाही मेजवानी देण्याचे ठरवतो. सौंदर्यासाठी विख्यात असलेली राणी वश्ती, राजाचा रोष ओढवते व राणी म्हणून आपले पद गमावते. देशांतील सर्व देखण्या कुमारिकांपैकी यहुदी कुमारीका हदस्सा हिला तिच्या जागी निवडले जाते. आपला चुलत भाऊ मर्दखय याच्या सांगण्यावरून ती, आपण यहुदी आहोत ही ओळख लपवते आणि एस्तेर हे पर्शियन नाव धारण करते.
काही दिवसांनंतर, हामान नावाच्या एका गर्विष्ठ मनुष्याला प्रधान मंत्रीचे पद देऊन उंचावले जाते. पण मर्दखय हामानास “नमन करीत” नसल्यामुळे, हामानाला त्याचा राग येतो. त्यामुळे तो पर्शियन साम्राज्यातील सर्व यहुद्यांचे उच्चाटन करण्याचा बेत आखतो. (एस्तेर ३:२) हामान अहश्वरोशाला पटवतो आणि ही कत्तल घडवून आणण्याकरता राजाकडून एक हुकूमनामाही करवून घेण्यात यशस्वी होतो. मर्दखय मात्र ‘गोणताट नेसून राख फासतो.’ (एस्तेर ४:१) आता एस्तेरने मध्ये बोलणे आवश्यक आहे. ती राजाला आणि त्याच्या प्रधान मंत्र्याला एका खासगी मेजवानीचे आमंत्रण देते. ते जेव्हा आनंदाने येतात तेव्हा एस्तेर त्यांना दुसऱ्या दिवशी पुन्हा एका मेजवानीला येण्याची विनंती करते. हामानाला खूप आनंद होतो. पण, मर्दखय त्याचा आदर करत नाही याचा त्याच्या मनात राग असतो. त्यामुळे दुसऱ्या दिवसाच्या मेजवानीच्या आधी मर्दखयची कत्तल करण्याचा तो एक कट रचतो.
शास्त्रवचनीय प्रश्नांची उत्तरे:
१:३-५—मेजवानी १८० दिवस चालली का? मेजवानी इतके दिवस चालली असे वचनात तर सांगितलेले नाही; पण, राजाने १८० दिवसांपर्यंत अधिकाऱ्यांना आपल्या वैभवशाली राज्याची दौलत आणि वैभव दाखवले. अनेक दिवस चाललेल्या या मेळाव्यात राजाने कदाचित, सरदारांवर छाप पाडण्यासाठी व बेत सफल करण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे ही खात्री देण्यासाठी आपल्या राज्याच्या वैभवाची फुशारकी मारली असावी. असे आहे तर मग, वचन ३ आणि ५, सात दिवस चाललेल्या मेजवानीविषयी सांगत असावे की जी १८० दिवसांच्या मेळाव्याच्या अंतास झाली.
१:८—कोणत्या अर्थाने, ‘पिणे नियमानुसार होते, कोणी कोणास आग्रह करीत नसे’? अशा मेळाव्यांमध्ये काही ठराविक प्रमाणात मद्य प्राशन करण्यास एकमेकांना आग्रह करण्याच्या पर्शियन रीतीच्या बाबतीत जो नियम होता तो या प्रसंगी राजा अहश्वरोशाने रद्द केला. “आपल्या मनात वाटेल तितके ते कमी अथवा जास्त पिऊ शकत होते,” असे एका संदर्भ ग्रंथात म्हटले आहे.
१:१०-१२—राणी वश्ती राजासमोर येण्यास नकार का देत राहिली? मद्यप्राशन केलेल्या राजाच्या पाहुण्यांसमोर येऊन स्वतःचा अपमान करून घेण्याची इच्छा नसल्यामुळे ती राजासमोर येण्यास नकार देत राहिली, असे काही विद्वानांचे म्हणणे आहे. किंवा कदाचित, बाहेरून सुंदर असलेली ही राणी खरोखरच आज्ञाधारक नव्हती. तिने राजासमोर येण्यास नकार देण्यामागे तिचा काय हेतू होता याविषयी बायबल काही सांगत नाही; पण, बायकोने आपल्या नवऱ्याच्या अधीन राहणे खरोखरच महत्त्वाचे होते व वश्तीच्या वाईट उदाहरणाचा पर्शिया प्रांताच्या सर्व बायकांवर परिणाम होऊ शकतो, असे त्या दिवसांतील ज्ञानी पुरुषांना वाटले.
२:१४-१७—एस्तेरने राजाबरोबर अनैतिक संबंध ठेवले का? या प्रश्नाचे उत्तर नाही, असे आहे. राजाकडे आणणलेल्या इतर स्त्रियांना सकाळी, “उपपत्नीचा रक्षक” अर्थात राजाचा जो खोजा होता त्याच्या देखरेखीखाली दुसऱ्या एका घरात आणण्यात आले, असे अहवाल म्हणतो. ज्या स्त्रियांनी राजाबरोबर रात्र घालवली त्या त्याच्या उपपत्नी बनल्या. पण एस्तेरला राजाला भेटल्यानंतर उपपत्नींच्या घरात नेण्यात आले नाही. एस्तेरला जेव्हा राजा अहश्वरोशासमोर आणले तेव्हा “राजाने एस्तेरवर इतर सर्व स्त्रियांहून अधिक प्रीति केली आणि वरकड सर्व कुमारींपेक्षा तिजवर त्याचा अनुग्रह व कृपादृष्टि विशेष झाली.” (एस्तेर २:१७) तिने अहश्वरोशाचा “अनुग्रह व कृपादृष्टि” कशी मिळवली? जशी तिने इतरांचा अनुग्रह व कृपादृष्टी मिळवली होती त्याचप्रकारे. “ती तरुण स्त्री [हेगे याला] पसंत पडली व तो तिजवर प्रसन्न झाला.” (एस्तेर २:८, ९) हेगेने जे पाहिले होते अर्थात तिचे स्वरुप आणि तिचे उत्तम गुण केवळ यांच्याच आधारावर तिला पसंत केले. वास्तविक पाहता, “ज्याने ज्याने एस्तेरला पाहिले त्या सर्वांची तिजवर कृपादृष्टि झाली.” (एस्तेर २:१५) अशाचप्रकारे, राजाने एस्तेरमध्ये जे पाहिले होते त्यामुळे तो प्रभावीत झाला होता आणि त्यामुळे तिच्यावर त्याचे प्रेम बसले.
३:२; ५:९—मर्दखयने हामानास नमन करण्यास नकार का दिला? इस्राएली लोक, मोठ्या हुद्यावर असलेल्या व्यक्तीपुढे वाकून त्याला आदर करायचे; हे यहोवाच्या नियमांच्या विरोधात नव्हते. परंतु, हामानाच्या बाबतीत आणखी पुष्कळ गोष्टी होत्या. हामान एक आगागी, कदाचित एक अमालेकी होता आणि यहोवाने अमालेकी लोकांना नाशास पात्र ठरवले होते. (अनुवाद २५:१९) मर्दखयने हामानाला नमन केले असते तर तो यहोवाशी बेईमानी करतोय असा अर्थ झाला असता. आपण एक यहुदी आहोत असे म्हणून त्याने त्याला नमन करण्यास बेधडकपणे नकार दिला.—एस्तेर ३:३, ४.
आपल्याकरता धडे:
२:१०, २०; ४:१२-१६. एस्तेरने यहोवाच्या एका प्रौढ उपासकाकडून मिळणारे मार्गदर्शन व सल्ला स्वीकारला. आपणही ‘आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेत व अधीन राहून’ सुज्ञता दाखवतो.—इब्री लोकांस १३:१७.
२:११; ४:५. आपण केवळ ‘आपलेच हित पाहू नये, तर दुसऱ्याचेहि पाहिले पाहिजे.’—फिलिप्पैकर २:४.
२:१५. हेगेने जितके दिले होते त्याच्या व्यतिरिक्त आणखी दागिने किंवा उत्तम पोषाख न मागण्याद्वारे एस्तेरने सभ्यपणा व आत्म-संयम दाखवला. एस्तेरने ‘सौम्य व शांत आत्मा व . . . अंतःकरणांतील गुप्त मनुष्यपण’ प्रदर्शित करून राजाचे मन जिंकले.—१ पेत्र ३:४.
२:२१-२३. एस्तेर व मर्दखय हे दोघेही, “वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन” असण्याच्या बाबतीत उत्तम उदाहरण आहेत.—रोमकर १३:१.
३:४. एस्तेरने जशी आपली ओळख लपवून ठेवली तसेच काही प्रसंगी आपण आपली ओळख लपवून ठेवणे उचित ठरू शकते. पण यहोवाचे सार्वभौमत्व आणि आपली एकनिष्ठा यासारखे महत्त्वपूर्ण वादविषय उभे राहतात तेव्हा, आपण यहोवाचे साक्षीदार आहोत अशी आपली ओळख देण्यास घाबरू नये.
४:३. आपल्यासमोर परीक्षा येतात तेव्हा शक्ती व बुद्धीसाठी आपण यहोवाला प्रार्थना केली पाहिजे.
४:६-८. हामानाने रचलेल्या कटावर मात करण्यासाठी मर्दखयने कायद्याचे साहाय्य घेतले.—फिलिप्पैकर १:७.
४:१४. मर्दखयने यहोवावर दाखवलेला भरवसा अनुकरण करण्याजोगा आहे.
४:१६. यहोवावर पूर्ण भरवसा ठेवून एस्तेर विश्वासूपणे व धैर्याने अशा एका परिस्थितीला सामोरी गेली ज्यात तिचा मृत्यू झाला असता. आपणही स्वतःवर नव्हे तर यहोवावर विसंबून राहायला शिकले पाहिजे.
५:६-८. अहश्वरोशाची मर्जी प्राप्त करण्याकरता एस्तेरने त्याला दुसऱ्या एका मेजवानीचे आमंत्रण दिले. तिने चलाखीने कार्य केले; आपणही असेच केले पाहिजे.—नीतिसूत्रे १४:१५.
चक्र उलटे फिरू लागते
जसजशा घटना घडू लागतात तसतसे हामानावर बाजू उलटू लागते. मर्दखयसाठी त्याने बनवून घेतलेल्या खांबावर त्यालाच टांगले जाते व ज्याचा प्राण जाणार होता त्याला प्रधान मंत्री बनवले जाते! यहुद्यांची कत्तल करण्याच्या कटाविषयी काय? यातही नाट्यमय बदल होतो.
विश्वासू एस्तेर पुन्हा बोलते. आपला जीव धोक्यात घालून ती राजासमोर येऊन, हामानाने रचलेला कट थांबवण्यासाठी काहीतरी मार्ग शोधण्याची त्याला विनंती करते. अहश्वरोशाला काय करायचे हे माहीत असते. त्यामुळे तो ठरलेला दिवस उजाडतो तेव्हा, यहुदी नव्हेत तर जे त्यांना ठारू मारू इच्छित होते त्यांचीच एस्तेर १०:३.
कत्तल केली जाते. दर वर्षी हा मुक्ती दिन साजरा करण्याकरता मर्दखयने पुरीम सणाची आज्ञा दिली. राजा अहश्वरोशाच्या खालोखाल असलेला मर्दखय “आपल्या लोकांचे कल्याण करण्यास झटे व आपल्या सर्व लोकांचे कुशल कसे होईल याकडे त्याचे लक्ष असे.”—शास्त्रवचनीय प्रश्नांची उत्तरे:
७:४—सर्व यहुद्यांचा नायनाट झाला असता तर ‘राजाचे नुकसान’ कसे झाले असते? यहुदी लोकांना दास म्हणून विकता येते, त्यामुळे त्यांचा जर नाश झाला तर त्यात राजाचेच नुकसान आहे, ही गोष्ट एस्तेर अतिशय चलाखीने राजाच्या नजरेस आणून देते. हामानाने जे १०,००० चांदीचे नाणे देण्याचे वचन दिले होते ते, त्याने सर्व यहुद्यांना दास म्हणून विकून जे पैसे मिळाले असते त्याच्या तुलनेत खूपच कमी होते; त्यांच्यामुळे राजाच्या संपत्तीत इतकी काही भर पडली नसती. हामानाचे कारस्थान सफल आले असते तर राणी देखील त्यात मरण पावली असती.
७:८—अधिकाऱ्यांनी हामानाचे तोंड का झाकले? लज्जा अथवा विनाश दर्शवण्यासाठी असे करण्यात आले असावे. “प्राचीन काळातले लोक कधीकधी, ज्यांना फासावर चढवले जाणार आहे अशांचे डोके झाकीत,” असे एक संदर्भ ग्रंथ म्हणतो.
८:१७—कोणत्या अर्थाने “त्या देशचे पुष्कळ लोक यहूदी झाले”? असे दिसते, की पुष्कळ पर्शियन लोक यहुदी बनले; राजाने दिलेला उलट हुकूम, यहुद्यांवर देवाची मर्जी असल्याचे चिन्ह होते असे त्यांना वाटले. याच तत्त्वानुसार आज जखऱ्याच्या पुस्तकातील भविष्यवाणी पूर्ण होताना दिसते. भविष्यवाणीत म्हटले आहे: “सर्व भाषा बोलणाऱ्या राष्ट्रांपैकी दहा जण यहूदी माणसाचा पदर धरून म्हणतील, ‘आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.’”—जखऱ्या ८:२३.
९:१०, १५, १६—राजाने दिलेल्या हुकूमात, लूटीस परवानगी देण्यात आली होती तरीपण यहुद्यांनी लुटीस हात का लावला नाही? त्यांनी दिलेल्या नकारावरून, त्यांचा हेतू संपत्ती मिळवण्याचा नव्हे तर जीव वाचवणे होता हे स्पष्टपणे दिसून आला.
आपल्याकरता धडे:
६:६-१०. “गर्व झाला की नाश ठेवलेला; मनाचा ताठा अधःपाताचे मूळ होय.”—नीतिसूत्रे १६:१८.
७:३, ४. आपण यहोवाचे साक्षीदार आहोत असे सांगितल्यामुळे आपला छळ होण्याची शक्यता असताना देखील आपण धैर्याने आपली तशी ओळख देतो का?
८:३-६. शत्रूंपासून संरक्षण मिळवण्याकरता आपण सरकारी अधिकाऱ्यांकडे व न्यायालयात धाव घेऊ शकतो नव्हे घेतली पाहिजे.
८:५. एस्तेरने व्यवहारचातुर्याचा उपयोग करून, तिच्या लोकांचा नाश करण्याकरता काढलेल्या फर्मानात राजाची जबाबदारी काय आहे, हे सांगितले नाही. तसेच, आपणही उच्च अधिकाऱ्यांना साक्ष देताना व्यवहारचातुर्याचा उपयोग केला पाहिजे.
९:२२. आपल्यातील गरीब बंधूभगिनींना आपण विसरू नये.—गलतीकर २:१०.
यहोवा “सुटका व उद्धार” देईल
एस्तेरला शाही मान मिळतो यात देवाचा काहीतरी उद्देश आहे, असे मर्दखय सुचवतो. यहुद्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते तेव्हा ते उपास-तापास व मदतीसाठी प्रार्थना करतात. राजाने न बोलवताच राणी त्याच्यासमोर हजर होते आणि प्रत्येक वेळी राजा तिचे स्वागत करतो. या महत्त्वपूर्ण रात्री राजाला झोप लागत नाही. होय एस्तेरचे पुस्तक, यहोवा आपल्या लोकांच्या हितास्तव घटना कशाप्रकारे घडवून आणतो त्यासंबंधाने आहे.
एस्तेरचा मनोरंजक अहवाल, आपण जे ‘अंतसमयात’ जगत आहोत त्यांच्यासाठी विशेष उत्तेजनात्मक आहे. (दानीएल १२:४) “शेवटल्या दिवसांत” म्हणजे शेवटल्या काळाच्या शेवटल्या दिवसांत, मागोगचा गोग—दियाबल सैतान—यहोवाच्या लोकांवर शेवटला हल्ला करील. त्याचा हेतू दुसरा तिसरा काही नसून, खऱ्या उपासकांचे नामोनिशाण मिटवणे केवळ इतकाच असेल. पण, एस्तेरच्या दिवसांत झाले त्याप्रमाणे यहोवा आपल्या उपासकांना “सुटका व उद्धार” देईल.—यहेज्केल ३८:१६-२३; एस्तेर ४:१४. (w ०६ ३/१)
[४ पानांवरील चित्र]
एस्तेर व मर्दखय अहश्वरोश राजासमोर हजर आहेत