प्रकाशमान होत चाललेल्या मार्गावर चालणे
प्रकाशमान होत चाललेल्या मार्गावर चालणे
“परंतु धार्मिकांचा मार्ग मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदयप्रकाशासारखा आहे.”—नीतिसूत्रे ४:१८.
१, २. उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या, यहोवाच्या आध्यात्मिक प्रकाशामुळे देवाच्या लोकांनी काय अनुभवले आहे?
उगवत्या सूर्याच्या किरणांचा रात्रीच्या काळोखावर कोणता परिणाम होतो, याचे वर्णन प्रकाशाचा स्रोत यहोवा देव याच्यापेक्षा चांगल्या रितीने कोण करू शकेल? (स्तोत्र ३६:९) तो म्हणतो, “मुद्रेच्या ठशाने जसा मातीला आकार येतो, तसा प्रभातीने पृथ्वीचा आकार व्यक्त होतो; सर्व वस्तु जशा काय त्याच्या पेहरावाप्रमाणे ठळक दिसतात.” (ईयोब ३८:१२-१४) मऊ मातीवर एखादे चिन्ह किंवा शिक्का मारल्यावर सुस्पष्ट आकार उमटावा तसेच, सूर्याचा प्रकाश जसजसा वाढत जातो तसतसे पृथ्वीवरील विविध आकार स्पष्ट होत जातात.
२ आध्यात्मिक प्रकाशाचाही स्रोत यहोवाच आहे. (स्तोत्र ४३:३) हे जग गर्द काळोखात असले तरीही आपल्या लोकांवर देव सतत प्रकाश टाकत आहे. यामुळे कोणता परिणाम घडून येतो? बायबल याचे उत्तर देते: “धार्मिकांचा मार्ग मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदयप्रकाशासारखा आहे.” (नीतिसूत्रे ४:१८) यहोवापासून येणारा प्रकाश उत्तरोत्तर वाढत आहे व त्याच्या लोकांच्या मार्गाला प्रज्वलित करत आहे. हा प्रकाश त्यांची संघटना, सिद्धान्त व नैतिक स्तर यांत सुधारणा घडवून आणत आहे.
प्रकाशामुळे संघटनेत सुधारणा
३. यशया ६०:१७ यात कोणते अभिवचन दिले आहे?
३ संदेष्टा यशया याच्याद्वारे यहोवाने असे भाकीत केले होते: “मी तांब्याच्या जागी सोने, लोखंडाच्या जागी रुपे आणीन; लाकडांच्या जागी तांबे व दगडांच्या जागी लोखंड आणीन.” (यशया ६०:१७) कमी मोलाच्या धातूऐवजी अधिक मोलाचे धातू वापरणे हे सुधारणेचे लक्षण आहे. त्याचप्रकारे यहोवाच्या साक्षीदारांनी ‘युगाच्या समाप्तीच्या’ किंवा ‘शेवटल्या दिवसांतील’ सबंध काळात त्यांच्या संघटनात्मक तरतुदींत सुधारणा घडून आल्याचे अनुभवले आहे.—मत्तय २४:३; २ तीमथ्य ३:१.
४. एकोणीसशे एकोणीस साली कोणती तरतूद करण्यात आली व ही कशाप्रकारे उपयुक्त ठरली?
४ यहोवाच्या साक्षीदारांना पूर्वी बायबल विद्यार्थी म्हटले जात होते. तर या बायबल विद्यार्थ्यांच्या मंडळ्यांमध्ये, शेवटल्या काळाच्या सुरुवातीच्या भागात, वडील व अधिकाऱ्यांची लोकशाही पद्धतीने निवड केली जात असे. पण काही वडिलांना सुवार्तिक कार्याबद्दल मनापासून उत्साह नव्हता. त्यांच्यापैकी काहीजण या कार्यात स्वतः भाग घेण्यास तर उत्सुक नव्हतेच पण इतरांनाही मागे ओढत होते. त्यामुळे १९१९ साली प्रत्येक मंडळीत सेवा संचालक (सर्व्हिस डायरेक्टर) म्हणून एक नवे जबाबदारीचे पद स्थापण्यात आले. सर्व्हिस डायरेक्टर पदावर सेवा करणारा बंधू मंडळीतर्फे निवडला जात नसे; तर देवाच्या लोकांचे शाखा दप्तर त्याला या पदावर ईश्वरशासित पद्धतीने नियुक्त करत असे. या नियुक्त डायरेक्टरच्या जबाबदाऱ्या पुढील प्रमाणे होत्या: प्रचार कार्याचे नियोजन करणे, प्रचार कार्याकरता क्षेत्र-वाटप करणे व क्षेत्र सेवाकार्यात सहभाग घेण्यास बांधवांना प्रोत्साहन देणे. यानंतरच्या वर्षांत राज्य प्रचाराच्या कार्यात कमालीची वृद्धी झाली.
५. एकोणीसशे वीसच्या दशकात कोणती सुधारणा घडून आली?
५ संयुक्त संस्थानांतील सीडर पॉइंट, ओहायो येथे १९२२ साली झालेल्या बायबल विद्यार्थ्यांच्या अधिवेशनात, “राजा व त्याच्या राज्याची घोषणा करा, घोषणा करा, घोषणा करा” असे आवाहन करून मंडळ्यांतील सर्व बांधवांना आणखीनच उत्साहित करण्यात आले. १९२७ सालापर्यंत क्षेत्र सेवाकार्य सुनियोजित पद्धतीने केले जाऊ लागले होते, व रविवार हा घरोघरच्या प्रचार कार्याकरता सर्वात सोयीचा दिवस मानला जाऊ लागला. रविवारच का बरे? कारण रविवारी बहुतेकजणांना रजा असते. त्याच धर्तीवर आजही यहोवाचे साक्षीदार, बहुतेक लोक घरी सापडतील अशा वेळी, उदाहरणार्थ शनिवार-रविवारी व संध्याकाळी लोकांची भेट घेण्याकरता त्यांच्या घरी जातात.
६. एकोणीसशे एकतीस साली कोणता ठराव मंजूर करण्यात आला व यामुळे राज्य प्रचाराच्या कार्यावर कसा परिणाम झाला?
६ रविवार २६ जुलै, १९३१ रोजी दुपारी प्रथम संयुक्त संस्थानांतील कोलंबस, ओहायो येथे व नंतर सबंध जगात एक विशेष ठराव मंजूर करण्यात आला व यामुळे राज्य प्रचाराच्या कार्याला अतिशय मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. या ठरावाचा काही भाग पुढीलप्रमाणे होता: “आम्ही यहोवा देवाचे सेवक आहोत व त्याच्या नावाने एक कार्य करण्यास आम्हाला नियुक्त करण्यात आले आहे; त्याने आम्हाला येशू ख्रिस्ताविषयीची साक्ष देण्यास व यहोवा हाच खरा व सर्वशक्तिमान देव आहे हे जाहीर करण्याची आज्ञा दिली आहे; म्हणूनच आम्ही प्रभू परमेश्वराने स्वतः उच्चारलेले नाव आनंदाने धारण करत आहोत व याच नावाने आम्हाला ओळखले जावे अशी आमची इच्छा आहे, अर्थात, यहोवाचे साक्षीदार.” (यशया ४३:१०) हे नाव धारण करणाऱ्या सर्वांची प्रथम जबाबदारी काय आहे हे या नव्या नावावरून अगदीच स्पष्ट झाले! होय, यहोवाने आपल्या सर्व सेवकांवर एक कार्य सोपवले होते. बांधवांनी दिलेला प्रतिसाद खरोखर अतिशय उत्साहभरीत होता!
७. एकोणीसशे बत्तीस साली कोणते बदल करण्यात आले व का?
७ बऱ्याच मंडळ्यांतील वडिलांनी स्वतःला प्रचार कार्याला वाहून घेतले. पण काही ठिकाणी मात्र, निवडून दिलेल्या वडिलांनी मंडळीतल्या सर्वांनी सार्वजनिक सेवाकार्यात सहभाग घेतला पाहिजे या विचाराला बराच विरोध केला. पण लवकरच आणखी सुधारणा घडून येण्याच्या बेतात होत्या. १९३२ साली टेहळणी बुरूज नियतकालिकाद्वारे मंडळ्यांना मार्गदर्शन देण्यात आले की वडील व अधिकाऱ्यांना निवडून देण्याची प्रथा थांबवण्यात यावी. त्याऐवजी सार्वजनिक प्रचार कार्यात सहभाग घेणाऱ्या आध्यात्मिक प्रवृत्तीच्या पुरुषांची एक सेवा समिती (सर्व्हिस कमिटी) निवडावी असे त्यांना सांगण्यात आले. अशारितीने, मंडळीची देखरेख करण्याची जबाबदारी अशा बांधवांवर सोपवण्यात आली, की जे सेवाकार्यात सक्रिय सहभाग घेत होते व यामुळे कार्याला आणखी गती आली.
वाढत्या प्रकाशामुळे अधिक सुधारणा
८. एकोणीसशे अडतीस साली कोणती सुधारणा करण्यात आली?
८ प्रकाश ‘उत्तरोत्तर वाढत’ होता. १९३८ सालापासून निवडणूक पद्धत पूर्णपणे बंद करण्यात आली. यापुढे मंडळीतले सर्व सेवक ‘विश्वासू व बुद्धिमान दासाच्या’ देखरेखीखाली ईश्वरशासित पद्धतीने नियुक्त केले जाऊ लागले. (मत्तय २४:४५-४७) हा फेरबदल यहोवाच्या साक्षीदारांच्या जवळजवळ सर्वच मंडळ्यांनी आनंदाने स्वीकारला आणि परिणामस्वरूप साक्षकार्य फलदायी होत गेले.
९. एकोणीसशे बहात्तर साली कोणती नवी तरतूद करण्यात आली व ही एक सुधारणा का होती?
९ पूर्वीच्या प्रघातानुसार मंडळीची देखरेख केवळ एक काँग्रीगेशन सर्व्हंट किंवा पर्यवेक्षक करत असे. पण १ ऑक्टोबर, १९७२ पासून मंडळीच्या देखरेखीच्या संबंधाने आणखी एक फेरबदल अंमलात आला. यहोवाच्या साक्षीदारांच्या जगभरातील सर्व मंडळ्यांत देखरेख करण्याकरता वडील-वर्गाची तरतूद करण्यात आली. या नव्या तरतुदीमुळे परिपक्व ख्रिस्ती पुरुषांना मंडळीचे नेतृत्त्व करण्याकरता आवश्यक पात्रता मिळवण्याचे कमालीचे प्रोत्साहन मिळाले आहे. (१ तीमथ्य ३:१-७) यामुळे अनेक बांधवांना मंडळीच्या जबाबदाऱ्या पेलण्याकरता आवश्यक अनुभव मिळाला आहे. हे अनुभवी वडील, बायबल सत्याचा स्वीकार करणाऱ्या अनेक नवीन लोकांचे आध्यात्मिक पालनपोषण करण्याकरता किती मोलाचा हातभार लावू शकले!
१०. एकोणीसशे शहात्तरपासून कोणती तरतूद करण्यात आली?
१० नियमन मंडळाच्या सदस्यांना १ जानेवारी, १९७६ पासून सहा समितींमध्ये विभागण्यात आले. संघटनेचे व सबंध जगातील मंडळ्यांचे सर्व कार्य या समितींच्या देखरेखीखाली आले. राज्याच्या कार्याच्या सर्व पैलूंबद्दल “मसलत देणारे पुष्कळ” आहेत, हे खरोखर एक मोठे वरदान ठरले आहे!—नीतिसूत्रे १५:२२; २४:६.
११. एकोणीसशे ब्याण्णव साली कोणती सुधारणा करण्यात आली व का?
११ आणखी एक सुधारणा १९९२ साली करण्यात आली. बॅबिलोनमधील बंदिवासातून मुक्त होऊन इस्राएल लोक व त्यांच्यासोबत इतरजण परत आले तेव्हा जे घडले त्यासोबत याची तुलना केली जाऊ शकते. त्या काळी मंदिरातील निरनिराळी कामे करण्याकरता पुरेसे लेवी नव्हते. त्यामुळे लेवियांना मदत करण्याकरता गैर इस्राएली नेथिनीम लोकांवर काही कामे सोपवण्यात आली. त्यानुसार, देवाच्या राज्याच्या पृथ्वीवरील कार्यांची देखरेख करण्यात विश्वासू व बुद्धिमान दासवर्गाला मदत करण्याकरता १९९२ साली ‘दुसऱ्या मेंढरांपैकी’ काहींवर अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. त्यांना नियमन मंडळाच्या समितींना साहाय्य करण्यास नेमण्यात आले.—योहान १०:१६.
१२. “तुजवर शांति सत्ता चालवील” हे शब्द यहोवाने आपल्याबाबतीत कशाप्रकारे पूर्ण केले आहेत?
१२ या सर्वामुळे कोणता परिणाम घडून आला आहे? यहोवा म्हणतो, “तुजवर शांति सत्ता चालवील व न्याय तुझा कारभार पाहील, असे मी करीन.” (यशया ६०:१७) आज यहोवाच्या सेवकांमध्ये “शांति” आहे व त्यांचा सर्व कारभार ‘न्यायप्रियतेवर’ आधारित आहे—हीच गोष्ट त्यांना देवाची सेवा करण्याचीही प्रेरणा देते. राज्य प्रचाराचे व शिष्य बनवण्याचे कार्य करण्याकरता ते सुसंघटित आहेत.—मत्तय २४:१४; २८:१९, २०.
सिद्धान्तांवर यहोवा प्रकाश टाकतो
१३. एकोणीसशे वीसच्या दशकात यहोवाने सिद्धान्तांच्या बाबतीत आपल्या लोकांचा मार्ग कशाप्रकारे प्रज्वलित केला?
१३ सिद्धान्तांच्या बाबतीतही यहोवा आपल्या लोकांच्या मार्गावर उत्तरोत्तर प्रकाश टाकत आहे. प्रकटीकरण १२:१-९ याचे एक उदाहरण आहे. या वृत्तान्तात तीन लाक्षणिक पात्रांचा उल्लेख आहे. “एक स्त्री” जी गरोदर आहे, एक “अजगर” आणि एक “पुत्र म्हणजे पुसंतान.” हे प्रत्येक पात्र कोणास सूचित करते हे तुम्हाला माहीत आहे का? टेहळणी बुरूज मार्च १, १९२५ अंकातील “राष्ट्राचा जन्म” या लेखात या पात्रांची ओळख करून देण्यात आली. या लेखात देवाच्या राज्याच्या जन्माविषयीच्या भविष्यवाणींचा अधिक सुस्पष्ट उलगडा करण्यात आला; या सुस्पष्ट माहितीमुळे देवाच्या लोकांना स्पष्टपणे समजले की दोन वेगवेगळ्या संघटना आज अस्तित्वात आहेत, एक यहोवाची तर दुसरी सैतानाची. मग १९२७/२८ दरम्यान, देवाच्या लोकांनी ओळखले की नाताळ व वाढदिवस साजरा करणे शास्त्रवचनांच्या सामंजस्यात नाही व तेव्हापासून त्यांनी या प्रथा बंद केल्या.
१४. एकोणीसशे तीसच्या दशकात कोणकोणती सैद्धान्तिक सत्ये स्पष्ट करण्यात आली?
१४ एकोणीसशे तीसच्या दशकात तीन सैद्धान्तिक सत्यांवर अधिक प्रकाश टाकण्यात आला. कित्येक वर्षांपासून बायबल विद्यार्थ्यांना माहीत होते, की प्रकटीकरण ७:९-१७ यांत उल्लेख केलेला “मोठा लोकसमुदाय” हा ख्रिस्तासोबत राजे व याजक म्हणून जे राज्य करतील त्या १,४४,००० जणांपासून वेगळा आहे. (प्रकटीकरण ५:९, १०; १४:१-५) पण हा मोठा लोकसमुदाय कोणाचा मिळून बनलेला आहे हे मात्र त्यांना अजूनही स्पष्ट नव्हते. पहाटेच्या प्रकाशात निरनिराळ्या वस्तूंचा आकार व रंग ज्याप्रकारे हळूहळू स्पष्ट होत जातो त्याप्रकारे १९३५ साली देवाच्या लोकांना कळले की मोठा लोकसमुदाय अशा लोकांनी बनला आहे की जे ‘मोठ्या संकटातून’ बचावून येतात व ज्यांना पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची आशा आहे. त्याच वर्षी आणखी एक स्पष्टीकरण देण्यात आले. याचा अनेक देशांतील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाळकरी मुलांवर परिणाम झाला. त्या काळी सबंध जगात राष्ट्रप्रेमाच्या भावना उफाळलेल्या असताना साक्षीदारांनी ओळखले की राष्ट्रध्वजाला वंदन करणे ही केवळ एक औपचारिक प्रथा नाही. याच्या पुढच्या वर्षी, ख्रिस्त क्रूसावर नव्हे तर वधस्तंभावर मरण पावला हे आणखी एक सैद्धान्तिक सत्य स्पष्ट करण्यात आले.—प्रेषितांची कृत्ये १०:३९.
१५. रक्ताच्या पावित्र्याचा विषय केव्हा व कशाप्रकारे स्पष्ट करण्यात आला?
१५ दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जखमी सैनिकांवर उपचार करताना रक्त संक्रमणे देण्याची पद्धत प्रचलित झाली होती. युद्ध संपल्यावर रक्ताच्या पावित्र्यावर अधिक प्रकाश टाकण्यात आला. टेहळणी बुरूजच्या जुलै १, १९४५ अंकाने “नीतिमान नव्या जगात सार्वकालिक जीवन मिळवण्यास इच्छुक असणाऱ्या सर्व यहोवाच्या उपासकांना रक्ताच्या पावित्र्याचा आदर करण्याचे व या महत्त्वाच्या विषयावर देवाच्या नीतिमान आज्ञांचे पालन करण्याचे” प्रोत्साहन देण्यात आले.
१६. पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर केव्हा प्रसिद्ध करण्यात आले आणि त्याची दोन वैशिष्ट्ये कोणती?
१६ एकोणीसशे शेहेचाळीस साली एका नव्या बायबल भाषांतराची गरज भासू लागली. आधुनिक विद्वत्तेच्या मार्गदर्शनाने तयार केलेले व ज्यात ख्रिस्ती धर्मजगताच्या पारंपरिक सिद्धान्तांची भेसळ केलेली नसेल असे एक नवे भाषांतर तयार करण्यास १९४७ सालच्या डिसेंबरमध्ये सुरुवात करण्यात आली. १९५० साली ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर इंग्रजीत प्रसिद्ध करण्यात आले. इब्री शास्त्रवचनांचे इंग्रजी भाषांतर १९५३ पासून, एकूण पाच खंडांच्या रूपात क्रमशः प्रसिद्ध करण्यात आले. शेवटला खंड १९६० साली म्हणजे भाषांतर कार्य सुरू झाल्यावर १२ वर्षांनंतर प्रसिद्ध करण्यात आला. संपूर्ण पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर एकाच खंडाच्या रूपात १९६१ साली प्रसिद्ध झाले. अनेक वैशिष्ट्ये असलेले हे भाषांतर आज अनेक भाषांतून उपलब्ध आहे. यात देवाचे नाव यहोवा योग्य ठिकाणी घालण्यात आले आहे. शिवाय मूळ भाषेनुसार शाब्दिक भाषांतर केल्यामुळे देवाच्या वचनातील सत्याची समज सातत्याने सुधारत जाण्यास मदत झाली आहे.
१७. एकोणीसशे बासष्ट साली कोणत्या विषयावर अधिक प्रकाश टाकण्यात आला?
१७ रोमकर १३:१ यात उल्लेख केलेल्या ‘वरिष्ठ अधिकाऱ्यांविषयीचे’ व ख्रिश्चनांनी त्यांना कितपत अधीनता दाखवावी याविषयीचे स्पष्टीकरण १९६२ साली देण्यात आले. रोमकर अध्याय १३ तसेच तीत ३:१, २ व १ पेत्र २:१३, १७ या वचनांचा सखोल अभ्यास केल्यावर हे स्पष्ट झाले की ‘वरिष्ठ अधिकारी’ ही संज्ञा यहोवा देव व येशू ख्रिस्त यांना नव्हे तर सरकारी अधिकाऱ्यांना सूचित करते.
१८. एकोणीसशे ऐंशीच्या दशकात कोणत्या काही सत्यांवर प्रकाश टाकण्यात आला?
१८ यानंतरच्या वर्षांत धार्मिकांचा मार्ग उत्तरोत्तर प्रज्वलित होत गेला. १९८५ साली, काहींना “जीवनदायी नीतिमत्व” कशाप्रकारे प्राप्त होते व देवाचे मित्र यानात्याने काहींना कशाप्रकारे नीतिमान म्हणून गणण्यात येते यावर प्रकाश टाकण्यात आला. (रोमकर ५:१८; याकोब २:२३) १९८७ साली ख्रिस्ती योबेल याविषयी सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आले.
१९. अलीकडील वर्षांत यहोवाने आपल्या लोकांकरता कशाप्रकारे अधिक आध्यात्मिक प्रकाश पुरवला आहे?
१९ “शेरडांपासून मेंढरे” वेगळी केली जाण्याबाबत १९९५ साली अधिक स्पष्टीकरण देण्यात आले. १९९८ साली यहेज्केलच्या मंदिराच्या दृष्टान्ताविषयी सविस्तर खुलासा करण्यात आला. या दृष्टान्ताची पूर्णता सध्या सुरू आहे. १९९९ साली ‘अमंगळ पदार्थ पवित्रस्थानात’ केव्हा व कसा ‘उभा होतो’ याविषयी स्पष्टीकरण मिळाले. (मत्तय २४:१५, १६; २५:३२) व २००२ साली देवाची उपासना “आत्म्याने व खरेपणाने” करण्याचा काय अर्थ होतो याविषयी अधिक माहिती प्रकाशित करण्यात आली.—योहान ४:२४.
२०. देवाच्या लोकांनी आणखी कोणत्या क्षेत्रात सुधारणा अनुभवली आहे?
२० संघटनेच्या कारभारांत व सिद्धान्तांच्या बाबतीत सुधारणा होण्यासोबतच ख्रिस्ती आचरणासंबंधीही काही सुधारित माहिती पुरवण्यात आली. उदाहरणार्थ, १९७३ साली तंबाखूचा वापर केल्याने ‘देहाची अशुद्धता’ येते हे स्पष्ट करण्यात आले व तेव्हापासून ही सवय गंभीर पातक म्हणून लेखण्यात येऊ लागली. (२ करिंथकर ७:१) एका दशकानंतर टेहळणी बुरूज जुलै १५, १९८३ अंकात, बंदूक किंवा पिस्तूल वापरण्यासंबंधी आपली काय भूमिका आहे याविषयी स्पष्टीकरण देण्यात आले. ही आपल्या काळातील उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या प्रकाशाची केवळ काही उदाहरणे आहेत.
प्रकाशमान होत जाणाऱ्या मार्गावर चालत राहा
२१. कशाप्रकारची मनोवृत्ती आपल्याला प्रकाशमान होत जाणाऱ्या मार्गावर चालत राहण्यास मदत करेल?
२१ अनेक वर्षांपासून सेवा करणाऱ्या एका वडिलाने म्हटल्यानुसार, “बदल केले जातात तेव्हा ते स्वीकारणे व स्वतःला त्यांसोबत जुळवून घेणे नेहमीच सोपे नसते.” राज्य प्रचारक म्हणून त्यांच्या ४८ वर्षांच्या काळात ज्या अनेक सुधारणा घडून आल्या त्यांचा स्वीकार करण्यास त्यांना कशामुळे साहाय्य मिळाले? ते सांगतात: “सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग्य मनोवृत्ती असणे. तुम्ही एखादी सुधारणा स्वीकारली नाही, तर संघटना पुढे निघून जाईल व तुम्ही मागेच राहाल. मला काही बदल स्वीकारणे अवघड वाटते तेव्हा मी पेत्राने येशूला काय म्हटले होते याची आठवण करतो: ‘प्रभुजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.’ मग मी स्वतःला हा प्रश्न विचारतो: ‘आपण कुठे जाणार—जगातल्या अंधकारात?’ अशाप्रकारे विचार केल्यामुळेच मला देवाच्या संघटनेला जडून राहण्यास मदत मिळाली आहे.”—योहान ६:६८.
२२. प्रकाशात चालत राहिल्यामुळे आपल्याला कोणता फायदो होतो?
२२ आपल्या सभोवतालचे जग निश्चितच गर्द काळोखात आहे. यहोवा आपल्या लोकांवर जसजसा प्रकाश टाकत जातो तसतशी त्यांच्यामध्ये व जगिक लोकांमध्ये असलेली दरी रुंदावत जाते. या प्रकाशामुळे आपल्याला कोणता फायदा होतो? ज्याप्रकारे अंधाऱ्या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यावर प्रकाश टाकल्यामुळे तो खड्डा नाहीसा होत नाही, त्याचप्रकारे देवाचे वचन आपल्या मार्गातील धोके काढून टाकत नाही. पण देवाच्या वचनातील प्रकाश आपल्याला हे धोके टाळण्यास मदत करतो जेणेकरून आपण सदोदीत प्रकाशमान मार्गावर चालत राहावे. तेव्हा “काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे” असलेल्या यहोवाच्या भविष्यसूचक वचनाकडे आपण लक्ष देत राहू या.—२ पेत्र १:१९. (w०६ २/१५)
तुम्हाला आठवते का?
• यहोवाने आपल्या लोकांच्या संघटनेत कोणत्या सुधारणा घडवून आणल्या आहेत?
• सिद्धान्तांच्या बाबतीत, उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या प्रकाशामुळे कोणत्या सुधारणा घडून आल्या?
• तुम्ही कोणते बदल स्वतः अनुभवले व हे बदल स्वीकारण्यास तुम्हाला कशामुळे मदत मिळाली?
• उत्तरोत्तर वाढणाऱ्या प्रकाशात तुम्ही का चालत राहू इच्छिता?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१९ पानांवरील चित्रे]
सीडर पॉइंट, ओहायो येथे १९२२ साली झालेल्या अधिवेशनाने बायबल विद्यार्थ्यांना देवाचे कार्य करण्याकरता उत्साहित केले
[२० पानांवरील चित्र]
एन. एच. नॉर, १९५० साली “पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर” प्रसिद्ध करताना
[१७ पानांवरील चित्राचे श्रेय]
© २००३ BiblePlaces.com