“प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे”
“प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे”
“आपणातील प्रत्येक जण आपआपल्यासंबधी [देवाला] हिशेब देईल.”—रोमकर १४:१२.
१. तीन इब्री तरुणांनी कोणती जबाबदारी विश्वासूपणे स्वीकारली?
बॅबेलोनमध्ये राहणाऱ्या तीन इब्री तरुणांसमोर जीवनमरणाचा प्रसंग उद्भवला. राजाच्या हुकूमानुसार एका विशाल मूर्तीपुढे दंडवत घालावे का? की या मूर्तीपुढे नमन करण्यास नकार देऊन, धगधगत्या भट्टीत टाकले जाण्याची शिक्षा पत्करावी? शद्रख, मेशख व अबेदनगो यांच्याजवळ कोणाचाही सल्ला घेण्याकरता वेळ नव्हता; आणि त्यांना असे करण्याची गरजही भासली नाही. अगदी ठामपणे त्यांनी राजाला आपला निर्धार कळवला: “महाराज, हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या दैवतांची उपासना करणार नाही आणि आपण स्थापिलेल्या सुवर्णमूर्तीला दंडवत घालणार नाही.” (दानीएल ३:१-१८) त्या तीन इब्री तरुणांनी आपल्या जबाबदारीचा भार वाहिला.
२. येशू ख्रिस्ताविषयी पिलाताचा निर्णय वास्तविक पाहता कोणी घेतला आणि यामुळे हा रोमी सुभेदार आपल्या जबाबदारीतून सुटला का?
२ या घटनेनंतर, सुमारे सहा शतके उलटली आहेत. सुभेदाराने त्या माणसाविरुद्ध करण्यात आलेले आरोप ऐकले आहेत. त्याची चौकशी करताना सुभेदाराला खात्री पटते की हा माणूस निर्दोष आहे. पण जमाव मात्र त्याला मृत्यूदंड देण्याची मागणी करतो. काही वेळ तो त्यांच्या मागणीला थोपवून धरण्याचा प्रयत्न करतो, पण नंतर मात्र तो स्वतःची जबाबदारी झटकून त्यांच्या दबावापुढे नमते घेतो. आपले हात धूत तो म्हणतो: “मी ह्या मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे.” मग तो त्या माणसाला वधस्तंभावर खिळण्याकरता त्यांच्या स्वाधीन करतो. होय, येशू ख्रिस्ताच्या संबंधात निर्णय घेण्याची आपली जबाबदारी स्वीकारण्याऐवजी पंतय पिलात इतरांना स्वतःकरता निर्णय घेऊ देतो. त्याने कितीही वेळा पाण्याने हात धुतले तरी येशूविरुद्ध केलेल्या त्या अन्यायाबद्दलच्या जबाबदारीतून तो सुटू शकत नाही.—मत्तय २७:११-२६; लूक २३:१३-२५.
३. आपण इतरांना आपल्याकरता निर्णय का घेऊ देता कामा नये?
३ तुमच्याविषयी काय? तुमच्यावर जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही तीन इब्री तरुणांसारखे वागता का? की तुम्ही इतरांना तुमच्याकरता निर्णय घेऊ देता? निर्णय घेणे सोपे नाही. उचित निर्णय घेण्याकरता परिपक्वतेची गरज आहे. उदाहरणार्थ, वयाने लहान असलेल्या मुलांकरता पालकांना योग्य निर्णय घ्यावे लागतात. अर्थात, परिस्थिती गुंतागुंतीची असेल व अनेक गोष्टी विचारात घ्यायच्या असतील तर निर्णय घेणे साहजिकच सोपे जाणार नाही. पण निर्णय घेण्याची ही जबाबदारी इतकी भारावून टाकणारीही नाही की, “आध्यात्मिक पात्रता” असलेल्यांनी आपल्यासाठी वाहण्याजोग्या ओझ्यांमध्ये किंवा त्रासदायक गोष्टींमध्ये तिचा समावेश करता येईल. (गलतीकर ६:१, २, NW) उलट हा असा एक भार आहे की ज्याबद्दल, “आपणातील प्रत्येक जण आपआपल्यासंबंधी [देवाला] हिशेब देईल.” (रोमकर १४:१२) बायबल सांगते, “प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे.” (गलतीकर ६:५) तर मग आपण जीवनात सुजाण निर्णय कशाप्रकारे घेऊ शकतो? सर्वप्रथम आपण आपल्या मानवी उणिवा लक्षात घेतल्या पाहिजेत व या उणिवा भरून काढण्याकरता कशाची आवश्यकता आहे हे ओळखले पाहिजे.
सगळ्यात आवश्यक गोष्ट
४. पहिल्या मानवी जोडप्याच्या आज्ञाभंगावरून आपण निर्णय घेण्याच्या संबंधाने कोणता महत्त्वाचा धडा शिकतो?
४ मानव इतिहासाच्या सुरुवातीला, पहिल्या मानवी जोडप्याने घेतलेल्या एका निर्णयामुळे अनर्थकारक परिणाम घडून आले. त्यांनी बऱ्यावाइटाचे ज्ञान करुन देणाऱ्या झाडाचे फळ खाण्याचा निर्णय घेतला. (उत्पत्ति २:१६, १७) हा निर्णय त्यांनी कशाच्या आधारावर घेतला? बायबल सांगते: “त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यास मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले; तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्याबरोबर आपल्या पतीसहि ते दिले; व त्याने ते खाल्ले.” (उत्पत्ति ३:६) हव्वेने घेतलेला निर्णय स्वार्थी इच्छेवर आधारित होता. आणि तिने जे केले ते पाहून आदामानेही तसेच केले. परिणामी, पाप व मृत्यू ‘सर्व माणसांमध्ये पसरले.” (रोमकर ५:१२) आदाम व हव्वेने केलेल्या आज्ञाभंगातून मनुष्याच्या स्वाभाविक उणिवांबद्दल एक महत्त्वाचा धडा आपल्याला शिकायला मिळतो: देवाच्या मार्गदर्शनाचे पालन न केल्यास मनुष्य सहसा चुकीचे निर्णय घेतो.
५. यहोवाने आपल्याकरता कोणते मार्गदर्शन पुरवले आहे आणि त्यापासून लाभ घेण्याकरता आपण काय केले पाहिजे?
५ यहोवाने आपल्याला या मार्गदर्शनापासून वंचित ठेवलेले नाही ही किती आनंदाची गोष्ट आहे! शास्त्रवचने आपल्याला सांगतात: “हाच मार्ग आहे; याने चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल; मग तुम्हाला उजवीकडे जावयाचे असो किंवा डावीकडे जावयाचे असो.” (यशया ३०:२१) यहोवा त्याच्या प्रेरित वचनाच्या अर्थात बायबलच्या माध्यमातून आपल्याशी बोलतो. म्हणूनच आपण शास्त्रवचनांचा अभ्यास करून त्यांचे अचूक ज्ञान मिळवले पाहिजे. योग्य निर्णय घेण्याकरता आपण ‘प्रौढांकरता असलेले जड अन्न’ ग्रहण केले पाहिजे. तसेच “वहिवाटीने,” म्हणजेच नित्य उपयोग केल्याने, ‘आपल्या ज्ञानेंद्रियांना चांगले आणि वाईट समजण्याचा सराव’ होतो. (इब्री लोकांस ५:१४) होय, देवाच्या वचनातून शिकलेल्या गोष्टी आचरणात आणण्याद्वारे आपण आपल्या ज्ञानेंद्रियांना हा सराव देऊ शकतो.
६. आपल्या विवेकाने नीट कार्य करावे म्हणून काय करण्याची आवश्यकता आहे?
६ निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आपला विवेक एक महत्त्वाची भूमिका निभावतो. आपल्या विवेकात न्याय करण्याचे सामर्थ्य असून तो आपल्याला एकतर ‘दोष लावतो किंवा दोषमुक्त करतो.’ (रोमकर २:१४, १५) पण विवेकाने नीट काम करावे म्हणून प्रथम त्याला देवाच्या वचनातील अचूक ज्ञानाने प्रज्वलित करणे आणि या ज्ञानानुसार आचरण करून त्यास संवेदनशील बनवण्याची गरज आहे. देवाच्या वचनातील ज्ञान नसलेला विवेक सहज लोकप्रिय प्रथांच्या किंवा चालीरितींच्या प्रभावात येऊ शकतो. आपली परिस्थिती व इतर लोकांचे अभिप्राय देखील आपली दिशाभूल करू शकतात. आपल्या विवेकाच्या ढोसणीकडे वारंवार दुर्लक्ष करून देवाच्या आदर्शांचे उल्लंघन केल्यास काय घडते? असे केल्यास, कालांतराने आपला विवेक ‘डाग दिल्यासारखा’ बनतो; म्हणजे, निबर झालेल्या त्वचेवरील व्रणासारखा असंवेदनशील व कोडगा बनतो. (१ तीमथ्य ४:२) दुसरीकडे, देवाच्या वचनाने प्रशिक्षित केलेला विवेक विश्वासार्ह मार्गदर्शक ठरू शकतो.
७. सुजाण निर्णय घेण्याकरता सगळ्यात आवश्यक गोष्ट कोणती?
७ तर मग, सुजाण निर्णय घेण्याची जबाबदारी स्वीकारण्याकरता सगळ्यात आवश्यक गोष्ट म्हणजे, शास्त्रवचनांचे अचूक ज्ञान व हे ज्ञान आचरणात आणण्याची कुवत असणे. निर्णय घेण्याचा प्रसंग येतो तेव्हा घाईगडबडीत अविचारीपणे काहीतरी निष्कर्ष काढण्याऐवजी, आपण पुरेसा वेळ काढून बायबलमधील तत्त्व त्या विषयावर काय प्रकाश टाकतात याचा अभ्यास केला पाहिजे व या तत्त्वांचा अवलंब करण्यासाठी आपल्या विचारशक्तीचा उपयोग केला पाहिजे. आपल्याजवळ देवाच्या वचनातील अचूक ज्ञान असेल व आपल्या विवेकास आपण या ज्ञानानुसार प्रशिक्षित केले असेल तर, शद्रख, मेशख व अबेद्नगो यांच्यासारखा तत्काळ निर्णय घेण्याचा प्रसंग आला तरी आपण सुसज्ज असू. प्रौढतेप्रत वाटचाल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आपली निर्णयक्षमता कशाप्रकारे सुधारते हे समजून घेण्याकरता आपण जीवनातल्या दोन क्षेत्रांचा विचार करू या.
मित्र म्हणून आपण कोणाला निवडू?
८, ९. (क) कुसंगती टाळणे किती महत्त्वाचे आहे हे कोणत्या तत्त्वांवरून दिसून येते? (ख) अनैतिक लोकांशी थेट संपर्क ठेवण्यालाच केवळ कुसंगती म्हणता येईल का? स्पष्ट करा.
८ प्रेषित पौलाने लिहिले: “फसू नका, कुसंगतीने नीति बिघडते.” (१ करिंथकर १५:३३) येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितले: “तुम्ही जगाचे नाही.” (योहान १५:१९) ही तत्त्वे समजल्यावर आपल्याला लगेच कळते की आपण व्यभिचारी, जारकर्मी, चोर, दारुडे व अशाप्रकारची इतर कामे करणाऱ्यांची सोबत टाळली पाहिजे. (१ करिंथकर ६:९, १०) पण बायबल सत्याच्या ज्ञानात आपण जसजसे वाढत जातो तसतशी आपल्याला जाणीव होते, की चित्रपट, टीव्ही किंवा कंप्युटरच्या स्क्रीनवर अशाप्रकारच्या व्यक्तींना पाहण्याद्वारे, किंवा त्यांच्याविषयी पुस्तकांत वाचण्याद्वारे त्यांची सोबत धरणेही तितकेच घातक आहे. इंटरनेटच्या चॅट रूम्समध्ये “कपटी” किंवा स्वतःची खरी ओळख लपवणाऱ्या व्यक्तींसोबत मैत्री करण्याच्या संदर्भातही हेच म्हणता येईल.—स्तोत्र २६:४.
९ जे नैतिकदृष्ट्या सात्त्विक आहेत पण ज्यांचा खऱ्या देवावर विश्वास नाही अशा लोकांसोबत जवळचे संबंध जोडण्याविषयी काय? शास्त्रवचने आपल्याला सांगतात: “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) यावरून आपल्याला समजते, की कुसंगती म्हणजे केवळ स्वैराचारी किंवा अनैतिक कामे करणारे लोक नव्हेत. म्हणूनच, आपण केवळ अशा व्यक्तींशीच जवळची मैत्री करतो की ज्यांचे यहोवावर प्रेम आहे.
१०. जगासोबत कितपत संपर्क ठेवावा यासंबंधी प्रौढ व्यक्तींसारखे निर्णय घेण्यास आपल्याला कशामुळे मदत होईल?
१० जगातल्या लोकांशी पूर्णपणे संपर्क टाळणे शक्य नाही आणि आपण असे करावे अशी अपेक्षाही केली जात नाही. (योहान १७:१५) ख्रिस्ती सेवाकार्यात भाग घेताना, शाळेत शिकताना किंवा नोकरी करताना जगिक लोकांशी संपर्क हा येणारच. एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीचे, यहोवाच्या साक्षीदारांपैकी नसलेल्या व्यक्तीशी लग्न झालेले असल्यास, इतरांच्या तुलनेत तिचा साहजिकच जगिक लोकांशी जास्त संपर्क येईल. पण आपण आपल्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग केल्यास आपल्याला समजेल की या जगाशी कामापुरता संबंध ठेवणे आणि त्यासोबत जवळचा संबंध जोडणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. (याकोब ४:४) हे ओळखल्यास, आपण शाळेनंतरच्या अतिरिक्त उपक्रमांत, उदाहरणार्थ खेळक्रीडा किंवा नृत्य यांसारख्या कार्यक्रमांत भाग घ्यावा किंवा नाही, एकाच ठिकाणी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या पार्ट्यांना किंवा भोजनसमारंभाला उपस्थित राहावे किंवा नाही यासंबंधी प्रौढ व्यक्तींसारखे निर्णय घेऊ शकतो.
व्यवसाय निवडणे
११. नोकरीसंबंधी निर्णय घेताना विचारात घेण्याजोगी सर्वात पहिली गोष्ट कोणती?
११ “आपल्या घरच्यांची तरतूद” करण्याची जबाबदारी पूर्ण करताना, परिपक्वतेने बायबल तत्त्वांचा अवलंब केल्यास आपल्याला योग्य निर्णय घेता येतील. (१ तीमथ्य ५:८) कोणतीही नोकरी किंवा धंदा स्वीकारताना विचारात घेण्याची सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला कोणत्या प्रकारचे काम करावे लागेल? बायबलमध्ये ज्यांची थेटपणे निंदा करण्यात आली आहे अशा गोष्टी कराव्या लागणार असतील तर ते काम स्वीकारणे नक्कीच चुकीचे ठरेल. त्यामुळे मूर्तिपूजा, चोरी, रक्ताचा गैरवापर किंवा बायबलनुसार नसलेल्या इतर गोष्टी कराव्या लागतील अशी नोकरी खरे ख्रिस्ती कधीही स्वीकारत नाहीत. तसेच, मालकाने सांगितले तरीसुद्धा, आपण कधीही खोटे बोलणार नाही किंवा फसवेगिरी करणार नाही.—प्रेषितांची कृत्ये १५:२९; प्रकटीकरण २१:८.
१२, १३. नोकरीसंबंधी निर्णय घेताना कोणते काम करावे लागेल याशिवायही कोणत्या गोष्टी विचारात घेण्याजोग्या आहेत?
१२ आपल्या कामात कदाचित आपल्याला देवाच्या आज्ञेचे उल्लंघन होईल असे काहीही करावे लागणार नाही. पण सत्याविषयीचे आपले ज्ञान जसजसे वाढत जाते तसतसे आपण इतर गोष्टीही विचारात घेऊ लागतो. हे काम आपल्याला बायबलच्या विरोधात असणाऱ्या गोष्टींत भागीदार बनवेल का, उदाहरणार्थ, जेथे जुगार खेळला जातो अशा ठिकाणी टेलिफोन ऑपरेटरचे काम? आपल्याला पगार कोठून मिळतो आणि आपण कोणत्या ठिकाणी काम करतो याही विचारात घेण्याजोग्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीचा जर स्वतःचा पेंटिंगचा धंदा असेल, तर ख्रिस्ती धर्मजगताचे एखादे चर्च रंगवण्याचे काँट्रॅक्ट स्वीकारून त्याने खोट्या धर्माला पाठिंबा देण्यात सहभागी व्हावे का?—२ करिंथकर ६:१४-१६.
१३ पण, आपण ज्याच्या हाताखाली काम करतो त्या काँट्रॅक्टरने समजा खोट्या धर्माच्या एखाद्या प्रार्थनास्थळाचे रंगकाम करण्याचे काँट्रॅक्ट घेतले तर काय करावे? अशा परिस्थितीत हे काम करण्या न करण्यावर आपले कितपत नियंत्रण आहे तसेच आपण त्या कामात कितपत सहभागी असू यांसारखे मुद्दे विचारात घेण्याची गरज आहे. शिवाय, ज्यात काहीही गैर नाही अशाप्रकारचे एखादे काम, उदाहरणार्थ पत्रांचे वाटप करताना शहरातल्या सर्व ठिकाणांसोबतच खोट्या धार्मिक स्थळांचीही पत्रे पोचती करण्याविषयी काय? या परिस्थितीत मत्तय ५:४५ यातील तत्त्व आपल्या निर्णयावर परिणाम करणार नाही का? एखादे काम दररोज करत राहिल्याने आपल्या विवेकावर कसा परिणाम होईल हे ही लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. (इब्री लोकांस १३:१८) खरोखर, नोकरी-व्यवसायासंबंधी परिपक्व निर्णय घेण्याचा आपला स्वतःचा भार वाहण्याकरता आपल्या ज्ञानेंद्रियांना व देवाने दिलेल्या विवेकबुद्धीला सराव देण्याची अत्यंत गरज आहे.
“आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर”
१४. निर्णय घेताना आपण कोणती पावले उचलली पाहिजेत?
१४ इतर बाबतींत, उदाहरणार्थ, उच्च शिक्षण घेणे व विशिष्ट प्रकारचा वैद्यकीय उपचार स्वीकारणे अथवा न स्वीकारणे यांसारख्या निर्णयांविषयी काय? कोणताही निर्णय घ्यावा लागतो तेव्हा आपण प्रथम कोणती बायबल तत्त्वे या विषयाशी संबंधित आहेत हे शोधले पाहिजे आणि मग त्यांचा अवलंब करण्याकरता आपल्या विचारशक्तीचा उपयोग केला पाहिजे. प्राचीन इस्राएलचा बुद्धिमान राजा शलमोन याने म्हटले: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.”—नीतिसूत्रे ३:५, ६.
१५. निर्णय घेण्यासंबंधी पहिल्या शतकातील ख्रिश्चनांकडून आपण काय शिकू शकतो?
१५ सहसा, आपण घेतलेल्या निर्णयांचा इतरांवरही परिणाम होतो आणि आपण याकडे दुर्लक्ष करू नये. उदाहरणार्थ, पहिल्या शतकातील ख्रिश्चनांवर मोशेच्या नियमशास्त्रातील आहारासंबंधीचे नियम पाळण्याचे बंधन नव्हते. नियमशास्त्रात अशुद्ध समजले जाणारे व इतर कोणत्याही प्रकारे आक्षेपार्ह नसणारे काही अन्नपदार्थ खाण्याचा निर्णय घेण्यास ते मोकळे होते. पण प्रेषित पौलाने मूर्तिपूजक मंदिराशी संबंधित असलेल्या एखाद्या प्राण्याचे मांस खाण्याविषयी असे लिहिले: “अन्नामुळे माझ्या बंधुला अडखळण होत असेल तर मी आपल्या बंधूला अडखळवू नये म्हणून मी मांस कधीच खाणार नाही.” (१ करिंथकर ८:११-१३) अशारितीने पौलाने सुरुवातीच्या ख्रिश्चनांना इतरांच्याही विवेकाचा विचार करण्याचा सल्ला दिला, जेणेकरून त्यांना अडखळण्याचे कारण होऊ नये. आपल्या निर्णयांमुळे आपण कोणाला “अडखळविणारे” बनू नये, अशी आपणही काळजी घेतली पाहिजे.—१ करिंथकर १०:२९, ३२.
देवाच्या बुद्धीचा शोध घ्या
१६. निर्णय घेताना प्रार्थनेद्वारे आपल्याला कशाप्रकारे साहाय्य लाभू शकते?
१६ निर्णय घेण्याकरता सर्वात महत्त्वाचे साहाय्य प्रार्थनेद्वारे आपल्याला मिळू शकते. शिष्य याकोबाने म्हटले: “जर तुम्हांपैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो.” (याकोब १:५) तेव्हा आपण पूर्ण विश्वासाने यहोवाला प्रार्थना करू शकतो, की त्याने आपल्याला साहाय्य करावे आणि निर्णय घेण्याकरता आवश्यक असलेली बुद्धी द्यावी. जेव्हा आपण यहोवाला आपल्या विवंचना सांगतो आणि त्याच्या मार्गदर्शनाची विनंती करतो तेव्हा पवित्र आत्मा आपल्याला, ज्या वचनांवर आपण विचार करत आहोत ती आणखी स्पष्टपणे समजून घेण्यास मदत करू शकतो आणि ज्या वचनांकडे कदाचित आपले दुर्लक्ष झाले असेल त्यांची आपल्याला आठवण करून देऊ शकतो.
१७. निर्णय घेताना इतरजण आपल्याला कशाप्रकारे मदत करू शकतात?
१७ इतरजणही आपल्याला निर्णय घेण्यास मदत करू शकतात का? होय, यहोवाने मंडळीत अनेक प्रौढ व अनुभवी व्यक्तींच्या माध्यमाने आपल्याला साहाय्य करण्याची तरतूद केली आहे. (इफिसकर ४:११, १२) निर्णय घेताना, विशेषतः जर एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर आपण त्यांच्याशी विचारविनिमय करू शकतो. ज्यांना सखोल आध्यात्मिक ज्ञान आहे आणि जीवनात बराच अनुभव आहे अशा व्यक्ती आपल्या निर्णयाशी संबंधित असलेल्या बायबलमधील आणखी काही तत्त्वांकडे आपले लक्ष वेधू शकतात आणि अशारितीने ‘जे श्रेष्ठ ते पसंत करण्यास’ आपली मदत करू शकतात. (फिलिप्पैकर १:९, १०) पण याठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आठवणीत ठेवणे गरजेचे आहे: दुसरी कोणती व्यक्ती आपल्याकरता निर्णय घेणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. या जबाबदारीचा भार आपण स्वतःच वाहिला पाहिजे.
परिणाम—नेहमीच चांगला?
१८. चांगल्या निर्णयाच्या परिणामाबद्दल काय म्हणता येईल?
१८ बायबलमधील तत्त्वांवर पुरेसा विचार करून त्यांच्या आधारावर निर्णय घेतल्यावर परिणाम नेहमीच चांगलाच असेल असे म्हणता येते का? होय, दीर्घकालीन परिणाम नेहमीच चांगला असेल. पण कधीकधी निर्णय घेतल्यावर लगेच आपल्याला कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागू शकते. शद्रख, मेशख व अबेद्नगो यांना माहीत होते, की राजाने बांधलेल्या मूर्तीला नमन न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला तर त्याचा परिणाम मृत्यूही असू शकतो. (दानीएल ३:१६-१९) त्याचप्रकारे, प्रेषितांनी जेव्हा सन्हेद्रिनापुढे स्पष्ट केले की आम्ही मनुष्यापेक्षा देवाच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत तेव्हा त्यांना आधी फटके मारण्यात आले व मग त्यांना सोडून देण्यात आले. (प्रेषितांची कृत्ये ५:२७-२९, ४०) शिवाय, “समय व प्रसंग” यांमुळे कोणत्याही निर्णयाचा अनिष्ट परिणाम होऊ शकतो. (उपदेशक ९:११, पं.र.भा.) योग्य निर्णय घेतल्यावर आपल्याला या ना त्या प्रकारे कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागले तरी आपण ही खात्री बाळगू शकतो की यहोवा आपल्याला सहनशक्ती देईल आणि शेवटी तो आपल्याला निश्चितच आशीर्वाद देईल.—२ करिंथकर ४:७.
१९. सुजाण निर्णय घेण्याच्या जबाबदारीचा आपला भार आपण स्वतः धैर्याने कसा वाहू शकतो?
१९ तर मग, निर्णय घेताना आपण बायबलमधील तत्त्वांचे संशोधन करून, त्यांचा कसा अवलंब करता येईल याविषयी विचार करण्याकरता आपल्या बौद्धिक क्षमतेचा वापर केला पाहिजे. यहोवा पवित्र आत्म्याद्वारे व मंडळीतल्या अनुभवी व्यक्तींच्या माध्यमाने आपल्याला मदत पुरवतो याबद्दल आपण किती कृतज्ञ असले पाहिजे! या मार्गदर्शनाच्या व तरतुदींच्या साहाय्याने, सुजाण निर्णय घेण्याच्या जबाबदारीचा आपला भार आपण स्वतः धैर्याने वाहू या. (w०६ ३/१५)
तुम्हाला काय शिकायला मिळाले?
• उत्तम निर्णय घेण्याकरता सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती?
• परिपक्वतेपर्यंत उन्नती केल्यामुळे मित्र निवडण्याच्या आपल्या निर्णयावर कसा परिणाम होतो?
• नोकरी व्यवसायासंबंधी निर्णय घेताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत?
• निर्णय घेण्याकरता आपल्याला कोणती मदत उपलब्ध आहे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[८ पानांवरील चित्र]
आदाम व हव्वेच्या आज्ञाभंगावरून आपण एक महत्त्वाचा धडा शिकू शकतो
[१० पानांवरील चित्र]
कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना देवाच्या वचनातून समर्पक तत्त्वे शोधून काढा