“कळपाला कित्ते” असणारे मेंढपाळ
“कळपाला कित्ते” असणारे मेंढपाळ
‘तुम्हांमधील देवाच्या कळपाचे संतोषाने, उत्सुकतेने पालन करा; कळपाला कित्ते व्हा.’—१ पेत्र ५:२, ३.
१, २. (क) येशूने प्रेषित पेत्रावर कोणती महत्त्वाची जबाबदारी सोपवली आणि येशूने टाकलेला विश्वास अनाठायी का नव्हता? (ख) नियुक्त मेंढपाळांबद्दल यहोवाला काय वाटते?
पेत्र व आणखी सहा शिष्य, सा.यु. ३३ पेन्टेकॉस्टच्या काही काळाआधी गालील समुद्राच्या काठावर येशूने तयार केलेली न्याहारी करत होते. पुनरुत्थान झालेल्या येशूला पाहण्याची पेत्राची ही पहिली वेळ नव्हती. येशू जिवंत आहे हे कळल्यावर त्याला अत्यानंद झाला असेल यात शंका नाही. पण पेत्राला मनातल्या मनात भीतीही वाटली असेल. कारण काही दिवसांआधीच, त्याने येशूला आपण ओळखत असल्याचे सर्वांसमोर नाकारले होते. (लूक २२:५५-६०; २४:३४; योहान १८:२५-२७; २१:१-१४) आपल्या चुकीबद्दल पश्चात्ताप झालेल्या पेत्राला, येशूने अविश्वास दाखवल्याबद्दल दटावले का? नाही. उलट त्याने आपली “मेंढरे” पाळण्याची व त्यांना चारण्याची महत्त्वाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली. (योहान २१:१५-१७) पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीविषयी बायबलमधील अहवालावरून स्पष्ट होते, की येशूने पेत्रावर जो विश्वास टाकला होता तो अनाठायी नव्हता. इतर प्रेषितांसोबत व जेरूसलेममधील वडीलधारी पुरुषांसोबत मिळून पेत्राने, अतिशय कठीण परीक्षेच्या व जलद वृद्धीच्या काळात ख्रिस्ती मंडळीची देखरेख केली.—प्रेषितांची कृत्ये १:१५-२६; २:१४; १५:६-९.
२ आज येशू ख्रिस्ताद्वारे यहोवाने पात्र पुरुषांना आध्यात्मिक मेंढपाळ म्हणून सेवा करण्याकरता व मानव इतिहासातील सर्वात कठीण काळातून जाताना आपल्या मेंढरांचे नेतृत्त्व करण्याकरता नियुक्त केले आहे. (इफिसकर ४:११, १२; २ तीमथ्य ३:१) यहोवाने त्यांच्यावर अनाठायी विश्वास टाकला आहे का? निश्चितच नाही. आणि हे सबंध जगातील साक्षीदारांच्या ख्रिस्ती बंधुसमाजातील शांतीवरून सिद्ध होते. अर्थात पेत्रासारखेच, हे मेंढपाळ देखील मानव स्वभावानुसार वेळोवेळी चुका करतात. (गलतीकर २:११-१४; याकोब ३:२) पण तरीसुद्धा, यहोवाला त्यांच्याविषयी हा भरवसा आहे की त्याने ‘आपल्या पुत्राच्या रक्ताने विकत घेतलेल्या’ मेंढरांचे ते पालनपोषण करतील. (प्रेषितांची कृत्ये २०:२८) या मेंढपाळांवर यहोवाचे मनापासून प्रेम आहे आणि त्यांना तो “दुप्पट सन्मानास योग्य” समजतो.—१ तीमथ्य ५:१७.
३. आध्यात्मिक मेंढपाळ कशाप्रकारे संतोषाने व उत्सुकतेने सेवा करत राहतात?
३ हे आध्यात्मिक मेंढपाळ संतोषाने व उत्सुकतेने सेवा करताना कशाप्रकारे कळपाला कित्ते होतात? पेत्र व पहिल्या शतकातील इतर मेंढपाळांप्रमाणेच ते देखील देवाच्या पवित्र आत्म्यावर अवलंबून राहतात आणि यामुळेच त्यांना आपल्या जबाबदारीचा भार वाहण्याकरता आवश्यक असलेले मनोबल मिळते. (२ करिंथकर ४:७) तसेच, पवित्र आत्मा त्यांच्यात आत्म्याचे फळ उत्पन्न करतो, अर्थात—प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन. (गलतीकर ५:२२, २३) आपण काही खास मार्गांचे परीक्षण करू, ज्याद्वारे देवाच्या कळपाचे पालन करत असताना मेंढपाळ आत्म्याचे फळ प्रदर्शित करण्याच्या बाबतीत मंडळीला कित्ते होऊ शकतात.
कळपावर व प्रत्येक मेंढरावर प्रेम करा
४, ५. (क) यहोवा व येशू कळपाबद्दल कशाप्रकारे प्रेम व्यक्त करतात? (ख) आध्यात्मिक मेंढपाळ कोणत्या काही मार्गांनी कळपाबद्दल प्रेम व्यक्त करतात?
४ देवाच्या आत्म्याद्वारे निष्पन्न होणारा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे प्रीती किंवा प्रेम. यहोवा विपुल प्रमाणात आध्यात्मिक अन्न पुरवण्याद्वारे सबंध कळपाबद्दल आपले प्रेम व्यक्त करतो. (यशया ६५:१३, १४; मत्तय २४:४५-४७) पण तो कळपाचे केवळ पालनपोषणच करत नाही. तर त्याला प्रत्येक मेंढराबद्दल आपुलकी वाटते. (१ पेत्र ५:६, ७) येशू देखील कळपावर प्रीती करतो. त्याने मेंढरांकरता आपला प्राण दिला आणि तो प्रत्येक मेंढराला वैयक्तिकरित्या “नावाने” ओळखतो.—योहान १०:३, १४-१६.
५ आध्यात्मिक मेंढपाळ यहोवा व येशू यांचे अनुकरण करतात. मंडळीला “शिक्षण” देण्याद्वारे ते सबंध कळपाबद्दल प्रेम व्यक्त करतात. त्यांची बायबलवर आधारित असलेली भाषणे कळपाचे पालनपोषण व संरक्षण करतात आणि ही भाषणे तयार व सादर करण्याकरता त्यांनी घेतलेले परिश्रम सर्वांना दिसून येतात. (१ तीमथ्य ४:१३, १६) पण त्यांची बरीचशी कामे व त्याकरता त्यांनी खर्च केलेला वेळ सर्वांना दिसून येत नाही. उदाहरणार्थ, मंडळीचे रेकॉड्र्स ठेवणे, पत्रव्यवहार, वेळापत्रके तयार करणे, आणि मंडळीच्या सभा व इतर कार्ये “शिस्तवार व व्यवस्थितपणे” होण्याकरता कित्येक बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष देणे. (१ करिंथकर १४:४०) यापैकी बरेचसे काम करताना त्यांना कोणी पाहू शकत नाही आणि त्यामुळे त्याबद्दल कदाचित त्यांची कधी प्रशंसाही केली जात नसेल. केवळ प्रेमापोटी ते ही निःस्वार्थ सेवा करतात.—गलतीकर ५:१३.
६, ७. (क) मेंढपाळ कोणत्या एका मार्गाने मेंढरांची चांगल्याप्रकारे ओळख करून घेऊ शकतात? (ख) वडिलांजवळ आपल्या भावना व्यक्त करणे कशाप्रकारे कधीकधी फायद्याचे ठरू शकते?
६ प्रेमळ ख्रिस्ती मेंढपाळ मंडळीतल्या प्रत्येक मेंढराबद्दल वैयक्तिक आस्था दाखवतात. (फिलिप्पैकर २:४) प्रत्येक मेंढराची चांगल्याप्रकारे ओळख होण्याकरता मेंढपाळ त्यांच्यासोबत सार्वजनिक प्रचार कार्यात सहभागी होतात. येशूच्या प्रचार कार्यातही सहसा त्याचे अनुयायी त्याच्यासोबत असायचे आणि या प्रसंगांचा तो त्यांना प्रोत्साहन देण्याकरता उपयोग करत असे. (लूक ८:१) एका अनुभवी ख्रिस्ती मेंढपाळाने असे म्हटले: “माझ्या मते, एखाद्या भावाची किंवा बहिणीची चांगल्याप्रकारे ओळख करून घेण्याचा आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे त्याच्या किंवा तिच्यासोबत क्षेत्र सेवाकार्य करणे.” जर तुम्हाला अलीकडे मंडळीतल्या एखाद्या वडिलांसोबत क्षेत्र सेवाकार्य करण्याची संधी मिळाली नसेल, तर लवकरात लवकर याची व्यवस्था करता येईल का?
७ प्रेमापोटी येशू आपल्या अनुयायांच्या सुखदुःखात सहभागी झाला. उदाहरणार्थ, त्याचे ७० शिष्य प्रचार कार्य संपवून आनंदाने परत आले तेव्हा येशू “उल्लसित” झाला. (लूक १०:१७-२१) पण लाजरच्या मृत्यूमुळे मरीया व तिच्या इतर कुटुंबीयांची व स्नेह्यांची झालेली शोकाकूल अवस्था पाहून येशू “रडला.” (योहान ११:३३-३५) त्याचप्रकारे, आजही आध्यात्मिक मेंढपाळ मेंढरांशी अंतर राखून वागत नाहीत. प्रेमापोटी, ते ‘आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करतात आणि शोक करणाऱ्या बरोबर शोक करतात.’ (रोमकर १२:१५) तुमच्या जीवनात आनंदाचे किंवा दुःखाचे क्षण येतात तेव्हा, आपला आनंद किंवा दुःख ख्रिस्ती मेंढपाळांजवळ व्यक्त करण्यास लाजू नका. तुमचा आनंद पाहून त्यांना प्रोत्साहन मिळेल. (रोमकर १:११, १२) तसेच, तुमच्या परीक्षांबद्दल समजल्यामुळे त्यांना तुम्हाला आध्यात्मिक बळ व सांत्वन देणे शक्य होईल.—१ थेस्सलनीकाकर १:६; ३:१-३.
८, ९. (क) एका वडिलाने आपल्या पत्नीबद्दल प्रेम कसे व्यक्त केले? (ख) मेंढपाळाने आपल्या कुटुंबीयांबद्दल प्रेम व्यक्त करणे किती महत्त्वाचे आहे?
८ मेंढपाळाला कळपाबद्दल वाटणारे प्रेम, तो आपल्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांशी कसे वागतो यावरून स्पष्टपणे दिसून येते. (१ तीमथ्य ३:१, ४) जर तो विवाहित असेल, तर तो आपल्या पत्नीवर कशाप्रकारे प्रेम करतो व तिचा आदर करतो हे पाहून इतर पतींना अनुकरण करण्याजोगे उदाहरण मिळते. (इफिसकर ५:२५; १ पेत्र ३:७) लिंडा नावाच्या एका ख्रिस्ती स्त्रीने व्यक्त केलेल्या अभिप्रायाकडे लक्ष द्या. लिंडा यांच्या पतीचा मृत्यू होण्याआधी २० वर्षे ते मंडळीत वडील म्हणून सेवा करत होते. त्या म्हणतात: “माझे पती मंडळीच्या कामांत सतत खूप व्यग्र राहायचे. पण आम्ही दोघे मिळून एक ‘टीम’ आहोत असा विचार करण्याचे ते मला नेहमी प्रोत्साहन द्यायचे. ते सहसा माझ्या सहकार्याबद्दल प्रशंसा व्यक्त करायचे आणि उरलेला वेळ माझ्यासोबत घालवायचे. त्यामुळे, त्यांचे माझ्यावर मनापासून प्रेम आहे याची मला नेहमी जाणीव असायची आणि मंडळीच्या कामांत त्यांचा बराच वेळ जातो याबद्दल मला कधीही राग आला नाही.”
९ ख्रिस्ती मेंढपाळाला मुले असल्यास, तो कशाप्रकारे आपल्या चिमुकल्यांना प्रेमळपणे शिस्त लावतो आणि वेळोवेळी त्यांची प्रशंसा करतो हे पाहून मंडळीतल्या इतर पालकांना एक उत्तम आदर्श लाभतो. (इफिसकर ६:४) किंबहुना, एखादा मेंढपाळ आपल्या कुटुंबीयांबद्दल ज्याप्रकारे प्रेम व्यक्त करतो, त्यावरून हेच दिसून येते की पवित्र आत्म्याद्वारे नियुक्त करण्यात आल्यामुळे त्याच्यावर जो भरवसा टाकण्यात आला आहे त्याकरता तो पात्र आहे.—१ तीमथ्य ३:४, ५.
मनमोकळा संवाद करून आनंदाचे व शांतीचे वातावरण निर्माण करा
१०. (क) कशामुळे मंडळीतील आनंद व शांती नष्ट होऊ शकते? (ख) कोणत्या मुद्द्यावरून पहिल्या शतकातील मंडळीची शांती भंग होण्याची भीती निर्माण झाली आणि हा वाद कसा सोडवण्यात आला?
१० पवित्र आत्मा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या हृदयात, वडील वर्गामध्ये व सबंध मंडळीतही आनंद व शांती उत्पन्न करण्यास समर्थ आहे. पण मनमोकळा संवाद नसल्यास हा आनंद व शांती नष्ट होऊ शकते. पुरातन काळात शलमोनाने असे म्हटले: “मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात.” (नीतिसूत्रे १५:२२) पण आदरपूर्वक व मनमोकळा सुसंवाद घडून आल्यास आनंदात व शांतीत भर पडते. उदाहरणार्थ, पहिल्या शतकात जेव्हा सुंतेविषयीच्या वादामुळे मंडळीतील शांती भंग होण्याची भीती निर्माण झाली तेव्हा जेरूसलेममधील नियमन मंडळाने पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन मिळवण्याकरता पावले उचलली. तसेच या विशिष्ट मुद्द्यावर त्यांनी आपापली विभिन्न मते व्यक्त केली. बरीच चर्चा झाल्यानंतर ते एका निष्कर्षास पोचले. आणि त्या सर्वांनी मिळून घेतलेला हा निर्णय त्यांनी मंडळ्यांना कळवला तेव्हा बांधवांना “आनंद झाला.” (प्रेषितांची कृत्ये १५:६-२३, २५, ३१; १६:४, ५) आनंद व शांतीला पोषक असे वातावरण निर्माण झाले.
११. वडील मंडळीतील शांती व आनंदात कशी भर पाडू शकतात?
११ त्याचप्रकारे आज, मेंढपाळ आपले विचार मनमोकळेपणाने एकमेकांजवळ व्यक्त करण्याद्वारे मंडळीतील शांतीत व आनंदात भर पाडतात. समस्यांमुळे मंडळीतील शांती भंग होण्याची भीती निर्माण झाल्यास, ते एकत्र भेटतात आणि मोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त करतात. प्रत्येकजण दुसऱ्याचे बोलणे आदरपूर्वक ऐकून घेतो. (नीतिसूत्रे १३:१०; ) पवित्र आत्म्याच्या साहाय्याकरता प्रार्थना केल्यावर ते बायबल तत्त्वांच्या व ‘विश्वासू व बुद्धिमान दासाने’ प्रकाशित केलेल्या सूचनांच्या आधारावर निर्णय घेतात. ( १८:१३मत्तय २४:४५-४७; १ करिंथकर ४:६) वडीलवर्गाने शास्त्रवचनांच्या आधारावर निर्णय घेतल्यावर प्रत्येक वडील या निर्णयाला सहयोग देतो; मग जरी, त्याचे वैयक्तिक मत स्वीकारण्यात आलेले नसेल तरीसुद्धा वडीलवर्गाच्या निर्णयाला सहयोग देण्याद्वारे तो पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रती आपली अधीनता दाखवतो. अशाप्रकारच्या विनयशील वृत्तीमुळे मंडळीत शांती व आनंदाचे वातावरण राहते आणि देवासोबत चालण्याचा काय अर्थ होतो याबाबतीत कळपातील मेंढरांना अनुकरण करण्याजोगे एक उत्तम उदाहरण मिळते. (मीखा ६:८) तुम्ही मंडळीतल्या मेंढपाळांनी बायबलच्या आधारावर घेतलेल्या निर्णयांना विनयशीलपणे सहयोग देत आहात का?
सहनशील व दयाळू असा
१२. येशूला आपल्या प्रेषितांशी व्यवहार करताना सहनशीलतेने व दयाळूपणे का वागावे लागले?
१२ येशूच्या प्रेषितांनी वारंवार चुका केल्या तरीसुद्धा तो आपल्या प्रेषितांशी वागताना सहनशील व दयाळू होता. उदाहरणार्थ, नम्र असणे किती महत्त्वाचे आहे हे त्याने त्यांना वेळोवेळी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. (मत्तय १८:१-४; २०:२५-२७) तरीपण, येशूच्या पृथ्वीवरील जीवनाच्या शेवटल्या रात्री त्याने त्यांचे पाय धुऊन नम्रतेविषयी त्यांना नुकताच एक धडा दिलेला असूनही, “आपणांमध्ये कोण मोठा मानला जात आहे, ह्याविषयीहि त्यांच्यामध्ये वाद झाला.” (लूक २२:२४; योहान १३:१-५) येशूने प्रेषितांना खडसावले का? नाही, त्याने दयाळूपणे त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला: “मोठा कोण? भोजनास बसणारा किंवा सेवा करणारा? भोजनास बसणारा की नाही? मी तर तुम्हांमध्ये सेवा करणाऱ्यासारखा आहे.” (लूक २२:२७) येशूची ही सहनशीलता व दयाळूपणा—आणि जोडीला त्याचे उत्तम उदाहरण यामुळे शेवटी हा धडा प्रेषितांच्या अंतःकरणाला भिडला.
१३, १४. कोणत्या परिस्थितीत मेंढपाळांना विशेषतः दयाळू असले पाहिजे?
१३ त्याचप्रकारे, आध्यात्मिक मेंढपाळांनाही एखाद्या व्यक्तीला तिची विशिष्ट कमजोरी लक्षात आणून देण्याकरता वारंवार सल्ला देण्याची गरज पडू शकते. एखादा मेंढपाळ कदाचित त्या व्यक्तीवर चिडेल. पण “अव्यवस्थित लोकांना ताकीद [देताना]” त्याने स्वतःच्या उणिवांची आठवण ठेवल्यास त्याला आपल्या बांधवांबद्दल सहनशीलता व दयाळूपणा दाखवणे शक्य होईल; असे केल्यामुळे तो येशू व यहोवा यांचे अनुकरण करेल कारण ते मेंढपाळांसहित सर्व ख्रिश्चनांशी व्यवहार करताना सहनशीलता व दयाळूपणा दाखवतात.—१ थेस्सलनीकाकर ५:१४; याकोब २:१३.
१४ कधीकधी, एखादे गंभीर पातक करणाऱ्या व्यक्तीची कडक शब्दांत कानउघाडणी करण्याची गरज उद्भवू शकते. जर ही व्यक्ती अपश्चात्तापी असेल तर मेंढपाळांनी तिला मंडळीतून बहिष्कृत केले पाहिजे. (१ करिंथकर ५:११-१३) तरीसुद्धा, ते ज्याप्रकारे त्या व्यक्तीशी वागतात त्यावरून हे दिसून आले पाहिजे की त्यांना मुळात त्या व्यक्तीबद्दल नव्हे तर तिने केलेल्या पापाबद्दल द्वेष वाटतो. (यहुदा २३) मेंढपाळांच्या दयाळू वागणुकीमुळे या भटकलेल्या मेंढराला पुन्हा कळपात परत येणे सोपे जाईल.—लूक १५:११-२४.
विश्वासाने प्रवृत्त झालेली सत्कर्मे
१५. कोणत्या एका मार्गाने मेंढपाळ यहोवाच्या चांगुलपणाचे अनुकरण करतात आणि कोणती गोष्ट त्यांना असे करण्यास प्रवृत्त करते?
१५ यहोवा “सगळ्यांना चांगला आहे.” जे त्याच्या उपकारांची जाण ठेवत नाहीत अशा लोकांच्याप्रतीही तो चांगुलपणा दाखवतो. (स्तोत्र १४५:९; मत्तय ५:४५) यहोवाचा चांगुलपणा विशेषकरून यावरून दिसून येतो की तो आपल्या लोकांना ‘राज्याची सुवार्ता’ घोषित करण्याकरता पाठवतो. (मत्तय २४:१४) मेंढपाळ या प्रचार कार्यात पुढाकार घेण्याद्वारे देवाचा चांगुलपणा प्रतिबिंबित करतात. आणि या कार्यात अथक परिश्रम घेण्यास त्यांना कोणती गोष्ट प्रवृत्त करते? यहोवावर व त्याच्या प्रतिज्ञांवर त्यांना असलेला अढळ विश्वास.—रोमकर १०:१०, १३, १४.
१६. मेंढपाळ कशाप्रकारे मेंढरांचे ‘बरे’ करू शकतात?
१६ प्रचार करण्याद्वारे ‘सर्वांचे बरे करण्यासोबतच,’ मेंढपाळांवर, ‘विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करण्याची’ जबाबदारी आहे. (गलतीकर ६:१०) आणि हे करण्याचा एक मार्ग म्हणजे मेंढरांना प्रोत्साहन देण्याकरता त्यांना मेंढपाळ भेटी देणे. एक वडील असे म्हणतात: “मला मेंढपाळ भेटी द्यायला मनापासून आवडते. कारण यामुळे मला बांधवांच्या मेहनतीबद्दल त्यांची प्रशंसा करण्याची संधी मिळते, त्यांना याची आठवण करून देण्याची संधी मिळते की त्यांच्या परिश्रमांची आम्ही किती मनापासून कदर करतो.” कधीकधी या भेटींदरम्यान मेंढपाळ एखाद्या व्यक्तीला काही मार्ग सुचवू शकतात की ज्यांद्वारे तो किंवा ती यहोवाच्या सेवेत आणखी प्रगती करू शकेल. असे करताना समंजस मेंढपाळ प्रेषित पौलाचे अनुकरण करतात. पाहा, त्याने थेस्सलनीकाच्या बांधवांना कशाप्रकारे विनवले: “तुम्हाविषयी प्रभूमध्ये आमचा असा भरवसा आहे की, आम्ही तुम्हास जे सांगतो ते तुम्ही करीत असता व पुढेहि करीत जाल.” (२ थेस्सलनीकाकर ३:४) अशाप्रकारे भरवसा व्यक्त केल्यामुळे मेंढरांच्या मनात योग्य कृती करण्याची प्रेरणा जागृत होते आणि मंडळीत पुढाकार घेणाऱ्या ‘अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहणे व त्यांच्या अधीन असणे’ त्यांना तितकेच सोपे जाते. (इब्री लोकांस १३:१७) तुम्हाला जेव्हा प्रोत्साहन देण्याकरता मेंढपाळ भेट दिली जाते, तेव्हा तुम्ही आठवणीने त्याबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करता का?
सौम्यतेने वागण्याकरता आत्मसंयम असणे आवश्यक
१७. पेत्राला येशूकडून कोणता बोध मिळाला?
१७ येशू मनाचा सौम्य होता. तणावाच्या परिस्थितीतही तो सौम्यतेने वागला. (मत्तय ११:२९) त्याला धरून देण्यात आले व अटक करण्यात आली तेव्हा त्याच्या वागण्यातून हा सौम्यपणा व विलक्षण आत्मसंयम स्पष्टपणे दिसून आला. उदाहरणार्थ, पेत्राने मागचा पुढचा विचार न करता, तरवार उपसली आणि शत्रूवर वार केला. पण येशूने त्याला आठवण करून दिली: “तुला असे वाटते काय की, मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही, आणि आताच्या आता तो मला देवदूतांच्या बारा सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही?” (मत्तय २६:५१-५३; योहान १८:१०) येशूचे शब्द पेत्राच्या अंतःकरणाला भिडले आणि म्हणूनच तो नंतर ख्रिस्ती बांधवांना अशी आठवण करून देऊ शकला: “ख्रिस्तानेहि तुम्हांसाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हांकरिता कित्ता घालून दिला आहे. . . . त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही; दुःख भोगीत असता त्याने धमकाविले नाही.”—१ पेत्र २:२१-२३.
१८, १९. (क) मेंढपाळांनी खासकरून कोणत्या परिस्थितीत सौम्यपणे व आत्मसंयम राखून वागले पाहिजे? (ख) पुढच्या लेखात आपण कोणते प्रश्न विचारात घेणार आहोत?
१८ कोणी अपमानास्पद वागणूक दिली तरीसुद्धा, मेंढरांना परिणामकारक पद्धतीने बोध करण्याकरता मेंढपाळांनी सौम्यतेने वागले पाहिजे. उदाहरणार्थ, मंडळीत एखाद्याला मदत करण्याचा प्रयत्न करत असताना कदाचित ती व्यक्ती चांगला प्रतिसाद देणार नाही. जर ही व्यक्ती आध्यात्मिकरित्या दुर्बळ किंवा आजारी असेल तर तिला दिलेल्या सल्ल्याला ती “तरवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण” करून प्रतिसाद देईल. (नीतिसूत्रे १२:१८) पण येशूचे अनुकरण करून, मेंढपाळ निष्ठूरपणे बोलून किंवा सूड घेण्यासाठी काहीतरी कृती करून अशा वागणुकीचे प्रत्युत्तर देत नाहीत. तर ते आत्मसंयमाने वागतात व सातत्याने बंधूप्रेम दाखवतात आणि त्यांची अशाप्रकारची वागणूक मदतीची गरज असलेल्या व्यक्तीकरता एक आशीर्वाद ठरू शकते. (१ पेत्र ३:८, ९) वडिलांच्या उदाहरणावरून धडा घेऊन तुम्ही देखील, तुम्हाला सल्ला दिला जातो तेव्हा सौम्यतेने व आत्मसंयमाने वागता का?
१९ निश्चितच यहोवा व येशू, सबंध जगातील कळपाचे उत्सुकतेने पालन करणाऱ्या हजारो मेंढपाळांच्या परिश्रमांची कदर करतात. आणि ‘पवित्र जनांची सेवा’ करण्यात या वडिलांना सहयोग देणाऱ्या हजारो सेवा सेवकांवरही यहोवा व त्याच्या पुत्राला मनापासून प्रेम आहे. (इब्री लोकांस ६:१०) पण मग, बाप्तिस्मा घेतलेले काही बांधव या ‘चांगल्या कामाकरता’ पुढे येण्यास का कचरतात? (१ तीमथ्य ३:१) आणि ज्यांना यहोवा मेंढपाळ म्हणून नेमतो त्यांना तो कशाप्रकारे प्रशिक्षण देतो? या प्रश्नांची आपण पुढच्या लेखात चर्चा करू या. (w०६ ५/१)
तुम्हाला आठवते का?
• कोणत्या काही मार्गांनी मेंढपाळ कळपाबद्दल आपले प्रेम व्यक्त करतात?
• मंडळीत सर्वजण शांती व आनंदाच्या वातावरणाला कसा हातभार लावू शकतात?
• सल्ला देताना मेंढपाळ सहनशील व दयाळू का असतात?
• वडील आपल्या कृतींतून चांगुलपणा व विश्वास कशाप्रकारे दाखवतात?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१८ पानांवरील चित्र]
वडील प्रेमापोटी मंडळीची सेवा करतात
[१८ पानांवरील चित्रे]
ते आपल्या कुटुंबालाही वेळ देतात, मनोरंजनाकरता . . .
. . . तसेच सेवाकार्याकरताही
[२० पानांवरील चित्र]
वडीलांचा आपसांत मनमोकळा सुसंवाद असल्यास मंडळीत शांती व आनंद टिकून राहतो