व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

स्तोत्रसंहितेच्या दुसऱ्‍या पुस्तकातील ठळक मुद्दे

स्तोत्रसंहितेच्या दुसऱ्‍या पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

स्तोत्रसंहितेच्या दुसऱ्‍या पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोवाचे सेवक यानात्याने, आपल्यावर परीक्षा आणि अडीअडचणी येतील हे आपल्याला माहीत आहे. “ख्रिस्त येशूमध्ये सुभक्‍तीने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल,” असे प्रेषित पौलाने लिहिले. (२ तीमथ्य ३:१२) कोणती गोष्ट आपल्याला परीक्षा व छळ सहन करून देवाला आपली एकनिष्ठा सिद्ध करण्यास मदत करू शकेल?

स्तोत्रांच्या पाच संग्रहांतील दुसरा संग्रह आपल्याला ही मदत देऊ शकतो. यशस्वीपणे परीक्षा पार करण्याची आपली इच्छा असेल तर आपण यहोवावर पूर्ण भरवसा ठेवला पाहिजे आणि सुटका मिळण्यासाठी त्याच्यावर विसंबून राहण्यास शिकले पाहिजे, हे स्तोत्र ४२ ते ७२ मध्ये सांगितले आहे. हा आपल्यासाठी किती अमूल्य धडा आहे! स्तोत्रसंहितेच्या दुसऱ्‍या पुस्तकातील संदेश, देवाच्या वचनातील इतर संदेशांप्रमाणेच आजही “सजीव, सक्रिय” आहे.—इब्री लोकांस ४:१२.

यहोवा आपला ‘आश्रय व सामर्थ्य’

(स्तोत्र ४२:१–५०:२३)

एक लेवी परदेशात बंदिवान आहे. यहोवाच्या पवित्रस्थानी उपासनेसाठी जाऊ शकत नसल्याचे दुःख वाटत असल्यामुळे तो स्वतःला सांत्वन देत म्हणतो: “हे माझ्या जिवा, तू का खिन्‍न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर.” (स्तोत्र ४२:५, ११; ४३:५) ह्‍या वारंवार येणाऱ्‍या वचनामुळे स्तोत्रे ४२ आणि ४३ ची तीन कडवी जोडून एक कविता बनते. स्तोत्र ४४, हे यहुदाच्या वतीने केलेली एक विनंती आहे. राजा हिज्कियाच्या दिवसांत, यहुदा राष्ट्रावर संकट आले होते. अश्‍शूरी सैन्य येऊन चढाई करण्याची भीती होती.

पंचेचाळीसावे स्तोत्र, एका राजाच्या विवाहाविषयीचे गीत आहे. त्या गीतात मशिही राजाविषयीची भविष्यवाणी करण्यात आली आहे. यानंतरच्या तीन स्तोत्रांत, यहोवाचे ‘आश्रय व सामर्थ्य,’ “अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा,” आणि “आश्रयदुर्ग” असे वर्णन करण्यात आले आहे. (स्तोत्र ४६:१; ४७:२; ४८:३) स्तोत्र ४९ मध्ये अतिशय सुरेखपणे हे दाखवण्यात आले आहे की कोणाही मनुष्यास “आपल्या भावाला [देखील] मुक्‍त करिता येत नाही!” (स्तोत्र ४९:७) दुसऱ्‍या संग्रहातील पहिली आठ स्तोत्रे कोरहच्या पुत्रांनी लिहिली. नववे स्तोत्र अर्थात स्तोत्र ५०, आसाफाने रचले आहे.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

४४:१९—‘कोल्ह्यांचे ठिकाण’ म्हणजे काय? स्तोत्रकर्ता कदाचित रणभूमीविषयी बोलत असावा जेथे, युद्धात मरण पावलेल्यांची शवे, कोल्ह्यांसाठी खाद्य बनली.

४५:१३, १४अ—जिला “राजाकडे” आणले जाते ती “राजकन्या” कोण आहे? ती ‘सनातन राजाची’ अर्थात यहोवा देवाची कन्या आहे. (१ तीमथ्य १:१७) ती १,४४,००० ख्रिश्‍चनांच्या गौरवी मंडळीला चित्रित करते. यहोवाने या ख्रिश्‍चनांवर आपला पवित्र आत्मा ओतून त्यांना आपली मुले म्हणून दत्तक घेतले आहे. (रोमकर ८:१६) ‘नवऱ्‍यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजविलेल्या’ यहोवाच्या ‘राजकन्येला’ वराकडे अर्थात मशिही राजाकडे आणले जाईल.—प्रकटीकरण २१:२.

४५:१४ब, १५—‘कुमारीका’ कोणाला चित्रित करतात? त्या खऱ्‍या उपासकांचा “मोठा लोकसमुदाय” यांना चित्रित करतात. मोठ्या लोकसमुदायाचे सदस्य अभिषिक्‍त शेष वर्गाला साथ देतात आणि त्यांना सहकार्य करतात. हे सदस्य “मोठ्या संकटातून” जिवंत बाहेर आले असल्यामुळे मशिही राजाचा विवाह स्वर्गात पूर्ण होत असताना ते पृथ्वीवर असतील. (प्रकटीकरण ७:९, १३, १४) तेव्हा ते “आनंदाने व उत्साहाने” हा प्रसंग साजरा करतील.

४५:१६—राजाच्या वडिलांच्या ठिकाणी मुले येतील, हे कसे? येशू पृथ्वीवर जन्मला होता तेव्हा त्याला पृथ्वीवरले पूर्वज होते. यांना तो जेव्हा आपल्या हजार वर्षांच्या राजवटीत मरणातून पुनरुत्थित करेल तेव्हा ते त्याची मुले होतील. यांपैकी काही मुलांना ‘पृथ्वीवर अधिपती’ म्हणून नेमण्यात येईल.

५०:२—जेरुसलेमला ‘सौंदर्याचा कळस’ का म्हटले आहे? जेरुसलेम शहराच्या रूपामुळे तिला असे म्हटलेले नाही. तर, यहोवाने त्या शहराचा उपयोग करून घेतला त्यामुळे आणि जेरुसलेमला आपल्या मंदिराचे स्थळ व आपल्या अभिषिक्‍त राजांची राजधानी होण्यास निवडल्यामुळे या शहराचे वैभव वाढले होते.

आपल्याकरता धडे:

४२:१-३. कोरड असलेल्या प्रदेशातील एक हरिणी जशी पाण्यासाठी तहानलेली असते तसेच लेवी स्त्रोत्रकर्ता यहोवासाठी आसुसलेला होता. यहोवाच्या पवित्रस्थानी जाऊन त्याची उपासना करता येत नसल्याचे त्याला इतके अतीव दुःख झाले होते, की त्याचे अश्रू त्याचा आहार बनले होते. अर्थात, अन्‍नावरची त्याची वासनाच उडून गेली होती. सहविश्‍वासू बंधूभगिनींबरोबर यहोवाची उपासना करण्याची आपल्याला जी संधी मिळाली आहे तिच्याबद्दल आपण कृतज्ञता दाखवली पाहिजे, नाही का?

४२:४, ५, ११; ४३:३-५. आपल्या हातात नसलेल्या काही कारणास्तव आपल्याला ख्रिस्ती मंडळीपासून दूर जावे लागले असेल, तर गत काळात ख्रिस्ती मंडळीसोबत आपण राखलेल्या सहवासादरम्यानच्या आनंदाच्या क्षणांच्या आठवणी आपल्याला टिकून राहायला मदत करू शकतील. या आठवणी सुरुवातीला आपल्याला असहनीय वाटतील. पण त्या आपल्याला एका गोष्टीची आठवण करून देतील, की यहोवा आपला आश्रयदुर्ग आहे व सुटका मिळण्यासाठी आपल्याला त्याच्यावर विसंबून राहण्याची गरज आहे.

४६:१-३. आपल्यावर कोणतेही संकट आले तरी, “देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे” हा आपला अटळ विश्‍वास असला पाहिजे.

५०:१६-१९. खोटे बोलणाऱ्‍या व वाईट गोष्टी करणाऱ्‍या कोणालाही देवाचा प्रतिनिधी होण्याचा अधिकार नाही.

५०:२०. इतरांच्या चुका जगजाहीर करण्यापेक्षा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे.—कलस्सैकर ३:१३.

“हे माझ्या जिवा, तू मौन धरून केवळ देवाची वाट पाहा”

(स्तोत्र ५१:१–७१:२४)

या स्तोत्रांच्या संग्रहाची सुरुवात दाविदाच्या प्रार्थनेने होते. बथशेबाबरोबर पाप केल्यानंतर त्याने कळकळीने ही प्रार्थना केली होती. यहोवावर आपला भार टाकणाऱ्‍यांना व सुटका मिळण्यासाठी त्याची वाट पाहणाऱ्‍यांना तो सोडवतो, हे स्तोत्र ५२ ते ५७ यांतून पाहायला मिळते. या सर्व पीडामय काळात दावीदाने यहोवाला आपले शरणस्थान बनवले होते, असे तो स्तोत्र ५८-६४ मध्ये व्यक्‍त करतो. दावीद असे गातो: “हे माझ्या जीवा, तू मौन धरून केवळ देवाची वाट पाहा, कारण त्याच्यापासून माझी अपेक्षा पूर्ण व्हायची आहे.”—स्तोत्र ६२:५, पं.र.भा.

आपली सोडवणूक करणाऱ्‍या देवाबरोबर आपली जवळीक असल्यामुळे आपण ‘त्याच्या नावाचा महिमा गाण्यास’ प्रवृत्त झाले पाहिजे. (स्तोत्र ६६:२) स्तोत्रे ६५ मध्ये म्हटले आहे की यहोवा हाताचा सढळ आहे; स्तोत्रे ६७ व ६८ मध्ये म्हटले आहे, की तो अद्‌भुत कार्ये करणारा देव आहे; आणि स्तोत्रे ७० व ७१ मध्ये म्हटले आहे, की तो मुक्‍तीदाता आहे. या सर्व गुणांसाठी त्याची स्तुती करण्यात आली आहे.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

५१:१२—दावीद म्हणतो, की “उत्सुकतेच्या आत्म्याने” मला सावर; हा कोणाचा ‘उत्सुकतेचा आत्मा’ आहे? हा वाक्यांश, दावीदाला मदत करण्याची यहोवाची तयारी किंवा त्याचा पवित्र आत्मा याला सूचित होत नाही तर दावीदाच्या स्वतःच्या आत्म्याला अर्थात त्याच्या मानसिक प्रवृत्तीला सूचित होतो. जे बरोबर आहे ते करण्याची मला इच्छा दे, अशी दावीद देवाला विनंती करतो.

५३:१—देवाचे अस्तित्व नाकारणारी व्यक्‍ती कोणत्या अर्थाने “मूढ” किंवा मूर्ख आहे? येथे उल्लेखलेला मूर्खपणा, बुद्धीची कमतरता असलेल्या व्यक्‍तीस सूचित करत नाही तर, नैतिक मूर्खतेस सूचित करतो. नैतिक अर्थाने मूर्ख असलेली व्यक्‍ती, स्तोत्र ५३:१-४ मध्ये वर्णन केलेल्या अनैतिक गोष्टी करते.

५८:३-५—कोणत्या अर्थाने दुष्ट लोक सर्पाप्रमाणे आहेत? हे दुष्ट लोक इतरांविषयी सांगत असलेल्या खोट्या गोष्टी सर्पाच्या विषासारख्या असतात. ते इतर लोकांविषयी खोट्या गोष्टी बोलून त्यांच्या चांगल्या नावाचा जणू काय नाश करतात. साप जसे “आपले कान झाकतो” त्याप्रमाणे हे दुष्ट लोक, मार्गदर्शन किंवा सुधारणूक ऐकून घेत नाहीत.

५८:७—दुष्ट लोक कशाप्रकारे ‘वाहणाऱ्‍या लोंढ्याप्रमाणे वाहून जातात’? दावीदाच्या मनात वचनयुक्‍त देशांतील भरभरून वाहणारी विशिष्ट खोरी असतील. जोराचा पाऊस पडल्यानंतर अशा एखाद्या खोऱ्‍यातील पाण्याची पातळी वाढत असली तरी, हे पाणी लवकर ओसरून जणू काय नाहीसे होते. दुष्ट जनही असेच लवकर नाहीसे व्हावेत, अशी दावीद प्रार्थना करत होता.

६८:१३—कोणत्या अर्थाने कबुतराचे “पंख रुप्याने व पिसे पिवळ्या सोन्याने मंडित आहेत”? करड्या निळ्या रंगाच्या काही कबुतरांच्या पिसांवर धूप-छाव सारखा चमकदार रंग असतो. सोनेरी सूर्यप्रकाशात त्यांच्या पिसांना धातूसारखी चमक येते. दावीद कदाचित, युद्धातून विजय प्राप्त करून घरी परतणाऱ्‍या इस्राएली योद्ध्‌यांची तुलना, आकाशात भरारी मारणाऱ्‍या व दिसायला देखण्या कबुतरांशी करत असावा. काही विद्वानांच्या मते हे वर्णन, लूट म्हणून कलाकुसर केलेल्या एखाद्या वस्तूला अथवा विजयचिन्हाला देखील लागू होऊ शकते. काहीही असो, दावीद मात्र यहोवाने त्याच्या लोकांना त्यांच्या शत्रूंवर जो विजय मिळवून दिला होता त्याचा अप्रत्यक्ष उल्लेख करत होता.

६८:१८—‘मनुष्यांमध्ये नजराणे’ कोण होते? वचनयुक्‍त देशावर विजय मिळवताना ज्या लोकांना बंदिवान म्हणून घेण्यात आले होते त्यांपैकी काही पुरुष, मनुष्यरुपी नजराणे होते. या पुरुषांना नंतर लेव्यांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी नेमण्यात आले.—एज्रा ८:२०.

६८:३०—‘लव्हाळ्यामध्ये राहणाऱ्‍या वनपशूला धमकाव,’ ह्‍या विनंतीचा काय अर्थ होतो? दावीद यहोवाच्या लोकांच्या शत्रूंना लाक्षणिक अर्थाने वनपशू म्हणतो. तू त्यांना धमकाव अर्थात हानी करण्याच्या त्यांच्या शक्‍तीवर आळा घाल, अशी विनंती दावीद करत होता.

६९:२३—शत्रूंची ‘कंबर खचीव’ याचा काय अर्थ होतो? कमरेचे स्नायू, जड कामे, जसे की वजनदार वस्तू उचलणे यासारख्या कामांसाठी आवश्‍यक असतात. कंबर खचल्यावर एखाद्या व्यक्‍तीची शक्‍ती नाहीशी होते. आपल्या शत्रूंची कंबर खचीव अर्थात त्यांची शक्‍ती नाहीशी कर, अशी प्रार्थना दावीद करत होता.

आपल्याकरता धडे:

५१:१-४, १७. आपण जर पाप केले तर त्यामुळे यहोवा देवाबरोबरचा आपला नातेसंबंध लगेचच संपुष्टात येत नाही. आपण जर पश्‍चात्ताप केला तर आपल्यावर तो निश्‍चितच दया दाखवेल, ही खात्री आपण बाळगू शकतो.

५१:५, ७-१०. आपण जर पाप केले आहे तर, वारशाने मिळालेल्या आपल्या पापी प्रवृत्तीसाठी यहोवाकडे क्षमेची याचना करू शकतो. आपल्याला शुद्ध करावे, पुन्हा उभे करावे, आपल्या हृदयातून पापी प्रवृत्ती काढून टाकण्यास आपल्याला मदत करावी आणि खंबीर आत्मा द्यावा, अशी देखील आपण प्रार्थना केली पाहिजे.

५१:१८. दावीदाने पाप केल्यामुळे संपूर्ण राष्ट्राचे कल्याण धोक्यात आले. त्यामुळे सीयोनावर देवाने आपला चांगुलपणा दाखवावा अशी त्याने प्रार्थना केली. आपण एखादे गंभीर पाप केले तर त्यामुळे बहुदा यहोवाच्या आणि मंडळीच्या नावावर कलंक लागतो. आपल्यामुळे जी हानी झाली आहे ती दुरुस्त करण्यासाठी आपण देवाला प्रार्थना केली पाहिजे.

५२:८. यहोवाच्या आज्ञांचे पालन करून व त्याच्याकडून मिळणारे ताडन आनंदाने स्वीकारून आपण “देवाच्या घरी” अर्थात त्याच्या समीप राहून व त्याच्या सेवेत फलदायी होऊन, ‘हिरव्यागार जैतूनाच्या झाडासारखे’ होऊ शकतो.—इब्री लोकांस १२:५, ६.

५५:४, ५, १२-१४, १६-१८. दावीदाचा पोटचा मुलगा अबशालोम आपल्याच बापाविरुद्ध कट रचतो आणि दावीदाचा भरवशाचा सल्लागार अहीथोफेल दावीदाला दगा देतो. दावीदाच्या अगदी जवळच्या लोकांनी त्याच्याशी असा व्यवहार केल्यामुळे हे त्याच्या जिव्हारी लागते. परंतु, देवावरील त्याचा भरवसा उडत नाही. आपल्यावरही जेव्हा असा एखादा मानसिक आघात होतो तेव्हा देवावरील आपण आपला भरवसा कमी करता कामा नये.

५५:२२. आपण यहोवावर आपला भार कशाप्रकारे टाकतो? तीन गोष्टी करण्याद्वारे: (१) आपल्याला ज्या गोष्टीची चिंता लागली आहे तिच्याविषयी त्याला प्रार्थना करण्याद्वारे, (२) आपल्याला मार्गदर्शन व पाठींबा मिळावा म्हणून त्याच्या वचनाकडे व त्याच्या संस्थेकडे वळण्याद्वारे, आणि (३) परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्या हातात जितके आहे तितका प्रयत्न करण्याद्वारे आपण यहोवावर आपला भार टाकू शकतो.—नीतिसूत्रे ३:५, ६; ११:१४; १५:२२; फिलिप्पैकर ४:६, ७.

५६:८. यहोवाला केवळ आपल्या परिस्थितीचीच नव्हे, तर त्या परिस्थितीमुळे आपल्या मनावर होत असलेल्या परिणामांची देखील जाणीव आहे.

६२:११. देवाला कोणत्याही बाहेरच्या शक्‍तीवर अवलंबून राहावे लागत नाही. तो स्वतःच शक्‍तीचा स्रोत आहे. “सामर्थ्य देवाचे आहे.”

६३:३. देवाचे “वात्सल्य जीवनाहून उत्तम आहे,” कारण त्याच्याशिवाय जीवन अर्थहीन व उद्देशहीन झाले असते. आपण यहोवाबरोबर मैत्री करण्याद्वारे सुज्ञता दाखवतो.

६३:६. रात्रीचे शांत वातावरण मनन करण्यासाठी उत्तम वेळ आहे कारण तेव्हा आपले लक्ष विचलित करणाऱ्‍या गोष्टी नसतात.

६४:२-४. हानीकारक गप्पांमुळे एखाद्याचे चांगले नाव खराब होऊ शकते. त्यामुळे आपण अशा गप्पा ऐकू नयेत अथवा पसरू नयेत.

६९:४. आपली काही चूक नाही, याची आपल्याला खात्री असते अशावेळी शांती राखण्याकरता कधीकधी आपण क्षमा मागण्याद्वारे परत ‘देऊन’ सुज्ञता दाखवू शकतो.

७०:१-५. मदतीसाठी आपण यहोवाकडे तातडीची याचना करतो तेव्हा तो आपल्या प्रार्थना ऐकतो. (१ थेस्सलनीकाकर ५:१७; याकोब १:१३; २ पेत्र २:९) देव कदाचित आपल्यावर आलेले संकट दूर करणार नाही पण तरी, त्या परीक्षेला तोंड देण्याकरता आपल्याला लागणारी बुद्धी आणि ती परीक्षा सहन करण्यासाठी लागणारी शक्‍ती तो देईल. आपल्या सहनशक्‍तीपलिकडे तो आपली परीक्षा पाहणार नाही.—१ करिंथकर १०:१३; इब्री लोकांस १०:३६; याकोब १:५-८.

७१:५, १७. दावीदाने तरुण वयातच—पलिष्टी राक्षस गल्याथ याचा सामना करायच्या आधीच त्याने यहोवाला आपला भरवसा बनवून धैर्य आणि शक्‍ती मिळवली होती. (१ शमुवेल १७:३४-३७) तरुण जन जे काही करतात ते त्यांनी यहोवावर अवलंबून करणे हितावह आहे.

“त्याच्या महिम्याने सर्व पृथ्वी भरो”

स्तोत्रांच्या दुसऱ्‍या संग्रहातील शेवटले गीत अर्थात ७२ वे स्तोत्र, शलमोनाच्या शासनाविषयी आहे. मशिही राजवटीत कोणत्या प्रकारची परिस्थिती असेल याविषयी ते भाकीत करते. तेथील वर्णन अतिशय सुरेख आहे—विपुल शांती, जाचजुलूम आणि हिंसाचार याचा अंत, पृथ्वीवर भरपूर अन्‍नधान्य! या आणि राज्यातील इतर आशीर्वादांचा जे उपभोग घेणार आहेत त्या लोकांमध्ये आपणही असू का? आपणही असू शकतो; पण त्यासाठी आपली, स्तोत्रकर्त्याप्रमाणे यहोवावर अवलंबून राहण्याची तसेच यहोवाला आपला आश्रय व शक्‍ती बनवण्याची तयारी असली पाहिजे.

या शब्दांनी ‘दावीदाच्या प्रार्थना . . . समाप्त’ होतात: “यहोवा देव, इस्राएलाचा देव, जो मात्र आश्‍चर्यकर्मे करतो तो धन्यवादित असो. आणि त्याचे गौरवी नाव सर्वकाल धन्यवादित असो, आणि सारी पृथ्वी त्याच्या गौरवाने भरो. आमेन, आमेन.” (स्तोत्र ७२:१८-२०, पं.र.भा.) तेव्हा, आपणही पूर्ण मनाने यहोवाचा महिमा करू या आणि त्याच्या गौरवी नावाची स्तुती करू या. (w०६ ६/१)