“तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे!”
“तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे!”
“अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करितो.”—स्तोत्र ११९:९७.
१, २. (क) स्तोत्र ११९ च्या प्रेरित लेखकाला कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले? (ख) या परिस्थितीला तोंड देताना त्याची कशी मनोवृत्ती होती आणि का?
एकशे एकोणीसाव्या स्तोत्राच्या लेखकाला एकदा अतिशय कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागले. कारण देवाच्या नियमशास्त्राबद्दल जराही आदर नसलेले गर्विष्ठ शत्रू त्याची थट्टा व अपमान करत होते आणि त्याच्यावर खोटे आरोप लावत होते. अधिपतींनी एकत्र बसून त्याच्याविरुद्ध कट रचले व त्याचा छळ केला. दुष्ट लोकांनी त्याला चहूकडून वेढले होते. ते त्याच्या जिवावर उठले होते. या सर्व परिस्थितीने तो इतका बेजार झाला की त्याला रात्रीची झोप लागेनाशी झाली; त्याचा ‘जीव खेदाने गळून गेला.’ (स्तोत्र ११९:९, २३, २८, ५१, ६१, ६९, ८५, ८७, १६१) पण या कठीण परिस्थितीला तोंड देतानाही, स्तोत्रकर्त्याने आपल्या भजनात देवाला म्हटले: “अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करितो.”—स्तोत्र ११९:९७.
२ हे वाचल्यावर कदाचित तुमच्या मनात असा विचार आला असेल, की “देवाचे नियमशास्त्र कसे काय स्तोत्रकर्त्याला सांत्वन व दिलासा देऊ शकले?” देवाचे नियमशास्त्र वाचून त्याला ही खात्री पटली की यहोवाला आपल्याबद्दल कळकळ आहे. आणि यामुळे त्याला सर्व संकटांना तोंड देणे शक्य झाले. त्याचा विरोध करणाऱ्यांनी त्याच्यावर अनेक अडचणी आणल्या. पण नियमशास्त्राद्वारे देवाने केलेल्या प्रेमळ तरतुदींविषयी माहिती घेतल्यावर स्तोत्रकर्त्याला आनंद झाला. यहोवाने आपल्याशी किती चांगल्याप्रकारे व्यवहार केला आहे याची त्याला जाणीव झाली. शिवाय, देवाच्या नियमशास्त्रातल्या मार्गदर्शनाचे पालन केल्यामुळे स्तोत्रकर्ता आपल्या वैऱ्यांपेक्षा अधिक सुज्ञ झाला. या मार्गदर्शनामुळेच त्याला नवजीवन मिळाले होते. देवाच्या नियमशास्त्राचे पालन केल्यामुळे त्याला शांती मिळाली आणि तो शुद्ध विवेकाने देवाची सेवा करू शकला.—स्तोत्र ११९:१, ९, ६५, ९३, ९८, १६५.
३. आजच्या काळात ख्रिश्चनांना देवाच्या नीतिनियमांनुसार जगणे कठीण का जाते?
३ आजही देवाच्या सेवकांपैकी काहीजण अतिशय खडतर परिस्थितीला तोंड देत आहेत. ही खडतर परिस्थिती त्यांच्या विश्वासाची परीक्षा घेते. कदाचित आपल्यासमोर स्तोत्रकर्त्यासारखी जिवावर बेतणारी परिस्थिती नसेलही, पण तरीसुद्धा या ‘शेवटल्या काळातील कठीण दिवसात’ राहात असताना आध्यात्मिक गोष्टींत जराही रस नसणाऱ्या बहुतेक जणांशी आपला दररोज संबंध येतो. त्यांना फक्त स्वतःची ध्येये गाठण्याशी आणि आणखी पैसा कसा मिळवता येईल याच्याशी मतलब असतो. त्यांची वृत्ती अतिशय बेपर्वा, इतरांना तुच्छ लेखण्याची असते. (२ तीमथ्य ३:१-५) तरुण ख्रिश्चनांच्या बाबतीत पाहता, त्यांनाही अशा अनेक गोष्टींपासून सतत सांभाळून राहावे लागते की ज्यांमुळे त्यांचे नैतिक चारित्र्य भ्रष्ट होऊ शकते. अशा परिस्थितीत यहोवाबद्दल व योग्य आचरणाबद्दल प्रेम टिकवून ठेवणे आपल्याला जड जाऊ शकते. मग, या सर्व धोक्यांपासून आपण स्वतःचे संरक्षण कसे करू शकतो?
४. स्तोत्रकर्त्याने देवाच्या नियमशास्त्राबद्दल कृतज्ञ मनोवृत्ती कशाप्रकारे दाखवली आणि आज आपणही असे करावे का?
४ स्तोत्रकर्त्यासमोर ज्या निरनिराळ्या समस्या आल्या त्यांना तोंड देणे त्याला शक्य झाले कारण तो कृतज्ञतापूर्वक देवाच्या नियमशास्त्रावर मनन करण्याकरता वेळ काढत असे. आणि असे केल्यामुळेच त्याला देवाचे नियमशास्त्र प्रिय वाटू लागले. म्हणूनच की काय, स्तोत्र ११९ यातील जवळजवळ प्रत्येक वचनात यहोवाच्या नियमशास्त्राच्या कोणत्या न कोणत्या पैलूचा उल्लेख आढळतो. * देवाने प्राचीन इस्राएल राष्ट्राला दिलेल्या मोशेच्या नियमशास्त्राच्या अधीन राहण्यास आज ख्रिस्ती लोक बांधील नाहीत. (कलस्सैकर २:१४) तरीपण त्यात दिलेली तत्त्वे मात्र आजही तितकीच उपयोगी आहेत. या तत्त्वांनी स्तोत्रकर्त्याला सांत्वन दिले होते आणि आज जीवनातील ताणतणावांना तोंड देणाऱ्या देवाच्या सेवकांनाही तीच तत्त्वे सांत्वन देऊ शकतात.
५. आपण मोशेच्या नियमशास्त्रातल्या कोणत्या गोष्टी विचारात घेणार आहोत?
५ आता आपण मोशेच्या नियमशास्त्रातल्या केवळ तीन गोष्टींचा विचार करू आणि यांतून आपल्याला कशाप्रकारे प्रोत्साहन मिळू शकते ते पाहू. या तीन गोष्टी आहेत, शब्बाथाची व्यवस्था, सरवा वेचण्याची तरतूद आणि लोभ करण्याविरुद्धची आज्ञा. या प्रत्येक गोष्टीचा विचार करताना आपल्याला हेच दिसून येईल की आधुनिक काळातल्या ताणतणावांना यशस्वीरित्या तोंड देण्याकरता या आज्ञांमागची तत्त्वे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
आपली आध्यात्मिक गरज तृप्त करणे
६. सर्व लोकांना कोणत्या मूलभूत गरजा असतात?
६ मनुष्याला उपजतच काही गरजा असतात. उदाहरणार्थ चांगले आरोग्य टिकवून ठेवण्याकरता अन्न-पाणी व निवारा मिळणे अतिशय महत्त्वाचे आहे. पण या गरजांसोबतच मनुष्याला ‘आध्यात्मिक गरजही’ असते. ही गरज तृप्त केल्याशिवाय तो खऱ्या अर्थाने आनंदी राहू शकणार नाही. (मत्तय ५:३, सुबोध भाषांतर) यहोवाच्या लेखी ही उपजत आध्यात्मिक गरज तृप्त करणे अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणूनच तर त्याने आपल्या लोकांना दर आठवड्यातल्या एका विशिष्ट दिवशी, दररोजची कामे बाजूला ठेवून आध्यात्मिक गोष्टींकडे लक्ष देण्याची आज्ञा दिली होती.
७, ८. (क) देवाने शब्बाथ दिवस इतर दिवसांपेक्षा कशाप्रकारे वेगळा केला? (ख) शब्बाथाच्या व्यवस्थेचा कोणता उद्देश होता?
७ शब्बाथाची व्यवस्था, इस्राएल लोकांना आध्यात्मिक कार्यांच्या महत्त्वाची जाणीव करून देण्याकरता होती. “शब्बाथ” या शब्दाचा बायबलमध्ये पहिला उल्लेख, अरण्यात देवाने जो मान्ना पुरवला होता त्याच्या संदर्भात येतो. इस्राएल लोकांना सांगण्यात आले होते, की आठवड्यातील सहा दिवस त्यांनी हे चमत्कारिक अन्न गोळा करावे. सहाव्या दिवशी त्यांना “दोन दिवसांचे अन्न” गोळा करावे लागे. कारण सातव्या दिवशी मान्ना पुरवला जात नसे. सातवा दिवस “परमेश्वराचा पवित्र शब्बाथ” होता आणि या दिवशी ‘प्रत्येकाने आपआपल्या ठिकाणी स्वस्थ असावयाचे होते.’ (निर्गम १६:१३-३०) दहा आज्ञांपैकी एक आज्ञा अशी होती की शब्बाथ दिवशी कोणीही कसलेही काम करू नये. हा दिवस पवित्र होता. आणि ही आज्ञा मोडणाऱ्याला मृत्यूदंड दिला जाईल असे सांगण्यात आले होते.—निर्गम २०:८-११; गणना १५:३२-३६.
८ शब्बाथाच्या व्यवस्थेवरून दिसून आले की यहोवाला आपल्या लोकांच्या केवळ शारीरिकच नव्हे तर आध्यात्मिक आरोग्याचीही काळजी आहे. येशूने म्हटले: “शब्बाथ मनुष्यांसाठी झालेला आहे.” (मार्क २:२७) शब्बाथाच्या व्यवस्थेमुळे इस्राएल लोकांना केवळ विश्रांती घेण्याचीच नव्हे, तर आपल्या निर्माणकर्त्याच्या आणखी जवळ येण्याची आणि त्याच्याबद्दल प्रेम व्यक्त करण्याचीही संधी मिळत असे. (अनुवाद ५:१२) हा दिवस फक्त आध्यात्मिक कार्यांकरता, म्हणजेच, कौटुंबिक उपासना, प्रार्थना आणि देवाच्या नियमशास्त्रावर मनन करण्याकरता राखून ठेवलेला होता. या व्यवस्थेमुळे, आपला सगळा वेळ व शक्ती केवळ भौतिक गोष्टींकरताच खर्च करण्यापासून इस्राएल लोकांचे रक्षण झाले. शब्बाथाचा दिवस त्यांना याची आठवण करून देत असे, की त्यांच्या जीवनातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यहोवासोबतचा त्यांचा नातेसंबंध आहे. येशूनेही या त्रिकालाबाधित सत्याला पुष्टी दिली. त्याने म्हटले: “‘मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल,’ असा शास्त्रलेख आहे.”—मत्तय ४:४.
९. शब्बाथाच्या व्यवस्थेवरून आज ख्रिस्ती कोणता बोध घेऊ शकतात?
९ आज देवाच्या लोकांवर शब्बाथ पाळण्याचे, म्हणजेच आठवड्यातून एकदा २४ तास विश्रांती घेण्याचे बंधन नाही. पण, याचा अर्थ, प्राचीन काळातल्या शब्बाथाच्या आज्ञेशी आपला काहीही संबंध नाही असे मुळीच नाही. (कलस्सैकर २:१६) शब्बाथाची व्यवस्था आपल्याला याची आठवण करून देत नाही का, की आपणही जीवनात आध्यात्मिक कार्यांना सर्वात जास्त महत्त्व दिले पाहिजे? दररोजच्या कामांत किंवा मनोरंजनात सगळा वेळ व शक्ती खर्च करून देवाच्या उपासनेशी संबंधित कार्यांना आपण कधीही दुय्यम स्थान देऊ नये. (इब्री लोकांस ४:९, १०) या संदर्भात आपण स्वतःला हे प्रश्न विचारू शकतो: “मी कोणत्या गोष्टींना जीवनात सर्वात जास्त महत्त्व देतो? देवाच्या वचनाचा अभ्यास, प्रार्थना, ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे आणि राज्याची सुवार्ता इतरांना सांगणे या कार्यांना मी इतर कामांपेक्षा जास्त महत्त्व देत आहे का? की इतर कामांमुळे मला या महत्त्वाच्या कार्यांकरता वेळ मिळेनासा झाला आहे?” आपण जीवनात आध्यात्मिक गोष्टींना सर्वात जास्त महत्त्व दिल्यास, यहोवा आपल्याला आश्वासन देतो की आपल्याला कोणत्याही जीवनावश्यक गोष्टींची उणीव भासणार नाही.—मत्तय ६:२४-३३.
१०. आध्यात्मिक गोष्टींना वेळ दिल्यामुळे आपल्याला कोणता फायदा होतो?
१० बायबलचा व बायबल आधारित प्रकाशनांचा अभ्यास करण्याकरता, तसेच त्यातून आपण जे शिकतो त्याविषयी मनन करण्याकरता वेळ दिल्यास, हळूहळू यहोवासोबतचा आपला नातेसंबंध आणखी घनिष्ट होईल. (याकोब ४:८) सूझन हिने जवळजवळ ४० वर्षांपासून नियमित बायबल अभ्यासाकरता काही वेळ राखून ठेवण्याचा नित्यक्रम पाळला आहे. ती कबूल करते की सुरुवातीला तिला हा अभ्यास कंटाळवाणा वाटायचा. अभ्यासाला बसायला तिला अक्षरशः जिवावर यायचे. पण नंतर, ती जितके जास्त वाचन करू लागली तितके जास्त तिला ते आवडू लागले. आता तर, काही कारणामुळे तिला वैयक्तिक अभ्यास करायला मिळाला नाही तर तिला काहीतरी चुकल्यासारखे वाटते. ती सांगते, “आपण यहोवाला आपला पिता म्हणतो, पण ते का म्हणतो हे मला या अभ्यासामुळे समजले आहे. त्याच्यावरचा माझा भरवसा वाढला आहे. मी पूर्णपणे त्याच्यावर विसंबून राहू शकते आणि प्रार्थनेत अगदी मोकळेपणाने आपल्या भावना त्याच्याजवळ व्यक्त करू शकते. खरंच, यहोवा आपल्या सर्व सेवकांवर किती प्रेम करतो, शिवाय, वैयक्तिकरित्या माझ्याबद्दल त्याला किती काळजी आहे आणि माझ्यासाठी त्याने काय काय केले आहे याचा विचार केल्यावर मन भरून येतं.” खरोखर, आपल्या आध्यात्मिक गरजा नियमितपणे तृप्त केल्यामुळे आपणही हा अवर्णनीय आनंद अनुभवू शकतो!
सरवा वेचण्यासंबंधी देवाचा नियम
११. सरवा वेचण्याच्या व्यवस्थेचे वर्णन करा.
११ देवाला आपल्या लोकांची किती काळजी आहे हे मोशेच्या नियमशास्त्रातल्या आणखी एका तरतूदीवरून दिसून येते. ही तरतूद म्हणजे सरवा वेचण्याची व्यवस्था. यहोवाने अशी आज्ञा दिली होती, की शेतातले पीक कापताना कामकऱ्यांकडून जे राहून गेले ते पीक पुन्हा गोळा केले जाऊ नये. ते गरजू लोकांना वेचू द्यावे. इस्राएली शेतकऱ्यांना सांगण्यात आले होते की त्यांनी आपल्या शेताची कापणी करताना शेताच्या कानाकोपऱ्यांतील सगळे पीक कापू नये. तसेच द्राक्षमळ्यात पडलेली किंवा जैतुनाच्या झाडावरून पडलेली सगळी फळे गोळा करू नयेत. धान्याच्या पेंढ्या शेतात चुकून राहिल्यास त्या परत आणू नयेत. ही गरीब लोकांसाठी, परक्या रहिवाशांसाठी तसेच अनाथ व विधवा यांच्यासाठी केलेली एक प्रेमळ व्यवस्था होती. अर्थात, सरवा वेचण्याकरता या गरजू लोकांना स्वतः मेहनत करावी लागे. पण या व्यवस्थेमुळे त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ येत नसे.—लेवीय १९:९, १०; अनुवाद २४:१९-२२; स्तोत्र ३७:२५.
१२. सरवा वेचण्याच्या व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना कोणती संधी मिळे?
१२ गरजू लोकांकरता शेतात काही पीक तसेच राहू द्यावे ही आज्ञा देताना, शेतकऱ्यांनी नेमके किती पीक राहू द्यावे हे देवाने स्पष्ट केले नव्हते. शेताच्या चारही बाजूला एक रुंद पट्टा कापणी न करता तसाच राहू द्यावा, की कसे, हे प्रत्येक शेतकऱ्यावर सोडण्यात आले होते. अशारितीने, या व्यवस्थेने लोकांना उदार व्हायला शिकवले. शेतातले उत्पन्न ज्याने पुरवले आहे त्या यहोवा देवाला आपली कृतज्ञता दाखवण्याची ही शेतकऱ्यांना एक संधी होती. कारण देवाचे वचन सांगते, की “जो गरजवंतावर दया करितो तो [आपल्या उत्पन्नकर्त्याचा] सन्मान करितो.” (नीतिसूत्रे १४:३१) बवाज याप्रमाणे करणाऱ्यांपैकी होता. त्याने त्याच्या शेतात सरवा वेचायला आलेल्या रूथ नावाच्या एका विधवेला भरपूर धान्य मिळावे म्हणून व्यवस्था केली. आणि यहोवाने बवाजाच्या या उदारतेचे त्याला चांगले प्रतिफळ दिले.—रूथ २:१५, १६; ४:२१, २२; नीतिसूत्रे १९:१७.
१३. सरवा वेचण्यासंबंधी देवाने प्राचीन काळात दिलेल्या आज्ञेवरून आपण काय शिकू शकतो?
१३ सरवा वेचण्यासंबंधी दिलेली आज्ञा ज्या तत्त्वावर आधारित होती ते तत्त्व आजही बदललेले नाही. यहोवा आजही आपल्या सेवकांकडून अशी अपेक्षा करतो की त्यांनी उदार असावे आणि विशेषतः गरजू लोकांना साहाय्य करावे. आपण जितके जास्त उदार असू तितकेच जास्त आशीर्वाद आपल्याला यहोवाकडून मिळतील. येशूने म्हटले होते: “द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल. चांगले माप दाबून, हालवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील; कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल.”—लूक ६:३८.
१४, १५. आपण उदारता कशी दाखवू शकतो आणि यामुळे आपल्याला आणि आपण ज्यांना मदत करतो त्यांनाही कशाप्रकारे फायदा होऊ शकतो?
१४ प्रेषित पौलाने असा सल्ला दिला की “जसा आपणाला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे, व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.” (गलतीकर ६:१०) अर्थात, आपल्या ख्रिस्ती बांधवांना जेव्हा अशा कठीण परीक्षांना तोंड द्यावे लागते की ज्यांत त्यांचा विश्वास पारखला जातो, तेव्हा आपण त्यांना आध्यात्मिक मदत पुरवण्याचा प्रयत्न करणे निश्चितच महत्त्वाचे आहे. पण कदाचित त्यांना व्यव्हारिकदृष्ट्या काही मदतीचीही गरज असू शकते का? उदाहरणार्थ, राज्य सभागृहांत सभेला जाण्याकरता किंवा घरातल्या आवश्यक सामानाची खरेदी करण्याकरता कदाचित त्यांना मदतीची गरज असू शकते का? तुमच्या मंडळीत जर काही वृद्ध, आजारी किंवा ज्यांना घरातून बाहेर पडता येत नाही असे बांधव असतील तर तुम्ही त्यांना जाऊन भेटल्यास व प्रोत्साहन दिल्यास त्यांना आनंद वाटणार नाही का? शिवाय, घरातल्या काही कामातही तुम्ही त्यांना मदत करू शकता का? आपण अशाप्रकारे आपल्या बांधवांच्या गरजा ओळखून त्यांना मदत केल्यास, यहोवा एखाद्या गरजू बांधवाच्या प्रार्थनांचे उत्तर देण्याकरता आपला उपयोग करू शकतो. एकमेकांची काळजी घेणे हे खरे तर एक ख्रिस्ती कर्तव्य आहे. पण आपण दुसऱ्यांची काळजी घेतो तेव्हा आपल्यालाही एका अर्थाने फायदा होतो. बांधवांबद्दल मनःपूर्वक प्रेम व्यक्त केल्यामुळे आपल्याला खूप आनंद व समाधान मिळू शकते. शिवाय, यहोवालाही आपल्याबद्दल संतोष वाटतो.—नीतिसूत्रे १५:२९.
१५ ख्रिस्ती इतरांबद्दल आणखी एका महत्त्वाच्या मार्गाने निःस्वार्थ प्रेम व्यक्त करतात. अर्थात, देवाच्या उद्देशांबद्दल सांगण्याकरता आपला वेळ व शक्ती खर्च करण्याद्वारे. (मत्तय २८:१९, २०) दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला आपले जीवन यहोवाला समर्पित करण्याइतपत प्रगती करण्याकरता मदत करणे खरोखर आनंददायक आहे. हा आनंद ज्याने अनुभवला आहे, तो येशूच्या या शब्दांशी निश्चितच सहमत होईल की “घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे.”—प्रेषितांची कृत्ये २०:३५.
लोभीपणापासून सांभाळून राहणे
१६, १७. दहावी आज्ञा काय होती आणि ही आज्ञा का देण्यात आली होती?
१६ देवाने इस्राएल राष्ट्राला दिलेल्या नियमशास्त्रातली जी तिसरी गोष्ट आपण विचारात घेणार आहोत ती आहे, दहा आज्ञांपैकी शेवटली आज्ञा. लोभीपणाविरुद्ध असलेल्या या आज्ञेत नियमशास्त्राने असे म्हटले: “आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नको, आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नको, आपल्या शेजाऱ्याचा दास, दासी, बैल, गाढव अथवा त्याची कोणतीहि वस्तु ह्यांचा लोभ धरू नको.” (निर्गम २०:१७) कोणताही मनुष्य अशी आज्ञा देऊ शकत नाही, किंवा ती तोडल्यावर शिक्षा देऊ शकत नाही, कारण एखादा मनुष्य मनातल्या मनात लोभ करतो किंवा नाही हे कोणीही पाहू शकत नाही. पण या आज्ञेमुळे दिसून आले की इस्राएल राष्ट्राला देण्यात आलेले नियमशास्त्र हे मानवी न्यायबुद्धीपेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. या आज्ञेने प्रत्येक इस्राएली व्यक्तीला ही जाणीव करून दिली की त्याला आपल्या कृत्यांचा थेट हिशेब यहोवाला द्यायचा आहे. कारण यहोवा प्रत्येकाच्या मनात काय आहे हे जाणतो. (१ शमुवेल १६:७) शिवाय, बहुतेक अनैतिक कृत्यांची सुरुवात कोठून होते हे या आज्ञेने दाखवून दिले.—याकोब १:१४.
१७ लोभीपणाविरुद्ध दिलेल्या या आज्ञेमुळे देवाच्या लोकांना हे समजण्यास मदत झाली की त्यांनी धनसंपत्तीचा हव्यास टाळावा. आणि जीवनात आपल्याजवळ जितके आहे त्याविषयी कुरकूर न करता त्यात समाधान मानावे. तसेच, या आज्ञेने चोरी किंवा अनैतिक कृत्ये करण्यापासून त्यांचे संरक्षण केले. वेळोवेळी आपण अशा लोकांना भेटतो, की ज्यांच्याजवळ आपल्याला हव्या असणाऱ्या भौतिक वस्तू असतात किंवा जे आपल्यापेक्षा जास्त सुखात आहेत, यशस्वी आहेत असे आपल्याला वाटते. अशा परिस्थितीत जर आपण आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवले नाही, तर आपण दुःखी होऊ व इतरांचा हेवा करायला लागू. बायबल म्हणते की लोभीपणा हे ‘विपरीत मनाचे’ लक्षण आहे. निश्चितच, अशी मनोवृत्ती आपल्यापैकी कोणीही उत्पन्न करू इच्छित नाही.—रोमकर १:२८-३०.
१८. आज जगात कशाप्रकारची प्रवृत्ती दिसून येते आणि यामुळे कोणते वाईट परिणाम घडू शकतात?
१८ आजच्या जगात लोकांना अधिकाधिक पैसा कमवण्याचे आणि इतरांशी स्पर्धा करण्याचे प्रोत्साहन दिले जाते. जाहीरातदार, लोकांना सतत नवनवीन वस्तूंची भुरळ पाडण्याच्या प्रयत्नात असतात. आणि सहसा ते असे भासवतात की तुम्ही अमुक वस्तू विकत घेतली, तरच तुम्ही आनंदी होऊ शकता, नाहीतर तुमचे जगणे व्यर्थ. यहोवाच्या नियमशास्त्रात अगदी हीच प्रवृत्ती टाळण्याची आज्ञा दिली होती. अशा प्रवृत्तीच्या लोकांना कसेही करून जीवनात प्रगती करण्याची, श्रीमंत होण्याची मनोकामना असते. प्रेषित पौलाने असे सांगितले: “जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशांत आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्या अशा मुर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे; त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत; आणि त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.”—१ तीमथ्य ६:९, १०.
१९, २०. (क) ज्याला यहोवाचे नियम प्रिय वाटतात, त्याच्या दृष्टीने कोणत्या गोष्टी सर्वात मोलाच्या आहेत? (ख) पुढच्या लेखात आपण कशाविषयी चर्चा करणार आहोत?
१९ ज्यांना देवाचे नियम प्रिय वाटतात ते धनसंपत्तीच्या मागे लागण्याची प्रवृत्ती किती धोकेदायक आहे हे ओळखतात आणि यामुळे त्यांचे संरक्षण होते. स्तोत्रकर्त्याने यहोवाला प्रार्थनेत अशी विनंती केली, की “माझ्या मनाचा कल अन्याय्य लाभाकडे नको तर तुझ्या निर्बंधांकडे असू दे. सोन्यारुप्याच्या लक्षावधि नाण्यांपेक्षा तुझ्या तोंडचे नियमशास्त्र मला मोलवान आहे.” (स्तोत्र ११९:३६, ७२) हे शब्द अगदी खरे आहेत, अशी जर आपल्याला खात्री असेल, तर आपण जीवनात एक समतोल दृष्टिकोन बाळगून भौतिकवादी व लोभी प्रवृत्तीच्या पाशात अडकण्याचे टाळू शकू. शिवाय, जीवनात आपल्याजवळ जे आहे त्यातच आपण समाधान मानू. सर्वात मोठा लाभ हा धनसंपत्ती गोळा करून नव्हे तर यहोवाची “भक्ति” केल्यामुळे मिळू शकतो.—१ तीमथ्य ६:६.
२० यहोवाने प्राचीन काळातल्या इस्राएल राष्ट्राला दिलेले नियमशास्त्र ज्या तत्त्वांवर आधारित होते, ती तत्त्वे आजही या कठीण काळात जगताना आपल्याकरता मोलवान ठरू शकतात. आपण या तत्त्वांचा आपल्या जीवनात जितक्या जास्त प्रमाणात अवलंब करू तितकेच आपल्याला त्यांचे मोल कळेल; तितकीच जास्त ती आपल्याला प्रिय वाटू लागतील आणि तितकाच आपल्या जीवनातला आनंद वाढत जाईल. नियमशास्त्रातल्या तत्त्वांतून आजही आपण अनेक महत्त्वाचे धडे शिकू शकतो. आणि ही तत्त्वे खरोखरच किती मोलाची आहेत हे बायबलमधील निरनिराळ्या व्यक्तींच्या जीवनावरून व अनुभवांवरून दिसून येते. पुढच्या लेखात आपण अशाच काही अहवालांकडे लक्ष देणार आहोत. (w०६ ६/१५)
[तळटीप]
^ परि. 4 या स्तोत्राच्या एकूण १७६ वचनांपैकी ४ वचने सोडून बाकीच्या सर्व वचनांत एकतर यहोवाच्या आज्ञा, न्याय्य निर्णय, नियमशास्त्र, विधी, नियम, निर्बंध, वचने, मार्ग किंवा वचन यांचा उल्लेख आढळतो.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• स्तोत्र ११९ च्या लेखकाला यहोवाचे नियमशास्त्र प्रिय का वाटत होते?
• शब्बाथाच्या व्यवस्थेतून ख्रिस्ती काय शिकू शकतात?
• सरवा वेचण्यासंबंधीच्या देवाच्या नियमाचे मोल कधीही कमी होणार नाही असे आपण का म्हणू शकतो?
• लोभ धरण्याविरुद्धच्या आज्ञेमुळे कशाप्रकारे आपले संरक्षण होऊ शकते?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१३ पानांवरील चित्र]
शब्बाथासंबंधीच्या नियमाने इस्राएल लोकांना कशाची जाणीव करून दिली?
[१५ पानांवरील चित्र]
सरवा वेचण्यासंबंधीच्या नियमातून आपण काय शिकतो?