“तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे”
“तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे”
“तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे, आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतु होता तो तुम्ही पाहिला आहे, ह्यावरून प्रभु फार कनवाळू व दयाळू आहे हे तुम्हास दिसून आले.”—याकोब ५:११.
१, २. पोलंडमधील एका विवाहित जोडप्याने कोणत्या परीक्षेला तोंड दिले?
हारल्ट ऑप्ट याला यहोवाचा साक्षीदार बनून अद्याप वर्षही झाले नव्हते, तेव्हा हिटलरच्या सैन्याने उत्तर पोलंडमधील डॅन्झिग (आताचे डॅन्स्क) या शहरावर कब्जा केला. येथे राहणाऱ्या खऱ्या ख्रिश्चनांकरता ही समस्यांची सुरुवात होती. नव्हे, त्यांचे जीवनच धोक्यात आले होते. गेस्टापोने हारल्टला एका कागदावर सही करण्यास बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. आपण आपल्या विश्वासाचा त्याग करत आहोत असे त्या कागदावर लिहिले होते, पण हारल्टने त्यावर सही करण्यास नकार दिला. काही आठवडे तुरुंगात राहिल्यानंतर हारल्टला सॅक्सनहाउसन छळ छावणीत पाठवण्यात आले. येथे त्याला वारंवार धमकावण्यात आले व मारहाण करण्यात आली. भट्टीच्या धुराड्याकडे बोट दाखवून एका अधिकाऱ्याने हारल्टला धमकी दिली की “तू जर असाच तुझ्या विश्वासाला धरून राहिलास तर १४ दिवसांत त्या धुरातून तुझ्या यहोवाकडे जाशील.”
२ हारल्टला अटक करण्यात आली, तेव्हा त्याची पत्नी एल्सा ही अद्याप त्यांच्या दहा महिन्यांच्या बाळाला अंगावर पाजत होती. पण गेस्टापोंनी तिलाही सोडले नाही. लवकरच, तिला तिच्या बाळापासून वेगळे करण्यात आले आणि ऑश्विट्झ येथे असलेल्या निर्मूलन छावणीत पाठवण्यात आले. पण तीसुद्धा हारल्टप्रमाणेच अनेक वर्षे जिवंत राहिली. त्यांच्यासमोर आलेल्या परीक्षांना त्यांनी कशाप्रकारे तोंड दिले याबद्दल तुम्ही टेहळणी बुरूज एप्रिल १५, १९८० (इंग्रजी) अंकात वाचू शकता. हारल्ट याने लिहिले: “मी देवावरील माझ्या विश्वासामुळे जीवनातली एकूण १४ वर्षे छळ छावण्यांत व तुरुंगांत घालवली आहेत. मला बरेचजण विचारतात: ‘हे सर्व सहन करताना तुमच्या पत्नीनं तुम्हाला साहाय्य केलं का?’ होय, निश्चितच केलं! मला सुरुवातीपासून ही खात्री होती की ती कधीही आपल्या विश्वासासंबंधी हातमिळवणी करणार नाही आणि ही खात्री असल्यामुळे मलाही बळ मिळालं. मी आपला विश्वास त्यागून मुक्त झालो आहे हे पाहण्यापेक्षा ती मला मेलेला पाहणं पसंत करेल हे मला माहीत होतं . . . एल्सानं स्वतः जर्मन छळ छावण्यांत अतिशय खडतर परिस्थितीला तोंड दिलं.”
३, ४. (क) कोणती उदाहरणे ख्रिश्चनांना दुःख सहन करण्याचे प्रोत्साहन देऊ शकतात? (ख) बायबल आपल्याला ईयोबाच्या अनुभवाचे परीक्षण करण्याचे उत्तेजन का देते?
३ दुःख सहन करणे सोपे नाही. बरेच साक्षीदार स्वतःच्या अनुभवावरून हे सांगू शकतात. म्हणूनच बायबल सर्व ख्रिश्चनांना हा सल्ला देते: “बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुखःसहन व त्यांचा धीर ह्यांविषयीचा कित्ता घ्या.” (याकोब ५:१०) गेल्या अनेक शतकांत, कोणतेही कारण नसताना देवाच्या कित्येक सेवकांचा छळ करण्यात आला. या “मोठ्या साक्षीरूपी मेघाने” पुरवलेली असंख्य उदाहरणे आपल्याला ख्रिस्ती जीवनाच्या शर्यतीत धीराने धावत राहण्याचे प्रोत्साहन देतात.—इब्री लोकांस ११:३२-३८; १२:१.
४ बायबलमध्ये ईयोबाचे उदाहरण हे धीराचे एक ज्वलंत उदाहरण आहे. याकोबाने लिहिले: “पाहा, ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो, तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे, आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतु होता तो तुम्ही पाहिला आहे ह्यावरून प्रभु फार कनवाळू व दयाळू आहे हे तुम्हास दिसून आले.” (याकोब ५:११) ज्यांच्यावर यहोवाचा आशीर्वाद आहे त्या विश्वासू जनांना कोणते प्रतिफळ मिळणार आहे याची झलक आपल्याला ईयोबाच्या अनुभवावरून मिळते. याहून महत्त्वाचे म्हणजे, ईयोबाचा अनुभव अशा सत्यांवर प्रकाश टाकतो, जी आपल्याला संकटांना तोंड देताना साहाय्य करतील. ईयोबाचे पुस्तक आपल्याला या प्रश्नांचे उत्तर देण्यास मदत करते: संकट सोसताना आपण मूलभूत वादविषय समजून घेण्याचा प्रयत्न का केला पाहिजे? कोणते गुण व कशाप्रकारची वृत्ती आपल्याला संकटांना तोंड देण्यास मदत करू शकते? संकटे सोसणाऱ्या आपल्या ख्रिस्ती बांधवांचे मनोबल आपण कसे वाढवू शकतो?
सर्व बाजूंनी विचार करणे
५. आपल्यासमोर परीक्षा व मोह येतात तेव्हा आपण कोणता सर्वात महत्त्वाचा वादविषय मनात बाळगला पाहिजे?
५ संकटांना तोंड देत असताना आध्यात्मिक स्थैर्य टिकवून ठेवण्याकरता आपण सर्व बाजूंनी विचार केला पाहिजे, अर्थात मूलभूत वादविषय समजून घेतले पाहिजेत. नाहीतर आपल्या वैयक्तिक समस्यांमुळे डोळ्यांवर पट्टी बांधल्यासारखी आपली स्थिती होईल आणि आपण आध्यात्मिक गोष्टींकडे लक्ष केंद्रित करू शकणार नाही. देवाला एकनिष्ठ राहण्यासंबंधीचा वादविषय हा सर्वात महत्त्वाचा आहे. आपला स्वर्गीय पिता विनवणी करतो: “माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्यास मी प्रत्युत्तर देईन.” (नीतिसूत्रे २७:११) ही विनवणी यहोवा मलाच करत आहे असा आपल्यापैकी प्रत्येकजण विचार करू शकतो. खरे पाहता हा आपल्याकरता किती मोठा बहुमान आहे! आपण अपरिपूर्ण, दुर्बल असूनही आपल्या निर्माणकर्त्या देवाला संतुष्ट करू शकतो. यहोवाबद्दलचे प्रेम जेव्हा आपल्याला परीक्षांना व मोहांना तोंड देण्याचे सामर्थ्य देते तेव्हा त्याला खरोखरच आनंद होतो. खरे ख्रिस्ती प्रेम, सर्व काही सहन करते. ते कधीही टळत नाही.—१ करिंथकर १३:७, ८.
६. सैतान कशाप्रकारे यहोवाची निंदा करतो आणि तो काय आरोप लावतो?
६ ईयोबाचे पुस्तक स्पष्टपणे दाखवते की यहोवाची निंदा करणारा हा सैतानच आहे. तसेच हा अदृश्य शत्रू मुळात किती दुष्ट आहे आणि कशाप्रकारे तो देवासोबतचा आपला नातेसंबंध नष्ट करू इच्छितो हे देखील या पुस्तकातून आपल्याला कळते. ईयोबाच्या उदाहरणावरून दिसून येते त्याप्रमाणे, सैतानाचा यहोवाच्या सर्व सेवकांवर असा आरोप आहे की ते केवळ स्वार्थबुद्धीने त्याची सेवा करतात आणि जीवनात परीक्षा येताच देवाबद्दल त्यांचे प्रेम हळू हळू कमी होते. हजारो वर्षांपासून सैतानाने हे आरोप लावून देवाची निंदा केली आहे. सैतानाला स्वर्गातून खाली टाकण्यात आले तेव्हा स्वर्गातून आलेल्या एका वाणीने “आमच्या बंधूंना दोष देणारा” या शब्दांत त्याचे वर्णन केले व असेही म्हटले की तो “आमच्या देवासमोर रात्रंदिवस” हे आरोप लावत असतो. (प्रकटीकरण १२:१०) पण आपण संकटांना तोंड देताना विश्वासूपणे धीर धरल्यास त्याचे हे आरोप निराधार आहेत हे आपण सिद्ध करू शकतो.
७. शारीरिक दुर्बलतेची उणीव आपण कशी भरून काढू शकतो?
७ आपण हे आठवणीत ठेवले पाहिजे की सैतान आपल्यावर येणाऱ्या कोणत्याही कठीण परिस्थितीचा फायदा घेऊन आपल्याला यहोवापासून दुरावण्याचा प्रयत्न करू शकतो. येशूला मोहात पाडण्याचा त्याने केव्हा प्रयत्न केला होता, तुम्हाला आठवते का? अनेक दिवसांपासून उपवास केल्यानंतर जेव्हा येशू भुकेने व्याकूळ झाला होता, तेव्हा. (लूक ४:१-३) पण येशूच्या आध्यात्मिक सामर्थ्याने त्याला दियाबलाच्या मोहांचा खंबीरतेने प्रतिकार करण्यास मदत केली. त्याअर्थी, आपण आजारपणामुळे किंवा म्हातारपणामुळे शारीरिकदृष्ट्या दुर्बल असलो तरीही ही उणीव आपण आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याने भरून काढली पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचे आहे! आपला ‘बाह्य देह क्षय पावत असला’ तरी आपण धैर्य सोडत नाही, कारण आपला “अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे.”—२ करिंथकर ४:१६.
८. (क) निराशावादी भावनांमुळे कोणता वाईट परिणाम घडू शकतो? (ख) येशूने कशी मनोवृत्ती बाळगली?
८ शिवाय, निराशावादी भावना देखील आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या बरीच हानी पोहंचवू शकतात. कोणी आपले मन दुखवल्यास आपल्या मनात असे विचार येऊ शकतात, की ‘यहोवा असं का घडू देतो?’ किंवा ‘मंडळीतला एक भाऊ माझ्याशी अशारितीनं कसं वागू शकतो?’ अशाप्रकारच्या भावना आपल्याला मूलभूत वादविषयांकडे दुर्लक्ष करून, केवळ आपल्या वैयक्तिक समस्येकडे पूर्णतः लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त करू शकतात. ईयोब त्याची दिशाभूल करणाऱ्या तीन सांत्वनकर्त्यांमुळे इतका निराश झाला होता, की त्याच्या रोगामुळे त्याला शारीरिकरित्या जितकी हानी झाली तितकीच हानी त्याला भावनिकदृष्ट्या त्या निराशेच्या भावनांमुळे झाली. (ईयोब १६:२०; १९:२) त्याचप्रकारे, बऱ्याच काळापर्यंत मनात राग बाळगल्यामुळे आपण “सैतानाला वाव” देत असतो हे प्रेषित पौलानेही सांगितले होते. (इफिसकर ४:२६, २७) तेव्हा, आपल्याला वाटणारे वैफल्य किंवा राग इतरांवर काढण्याऐवजी, अथवा झालेल्या अन्यायावरच अवास्तव लक्ष केंद्रित करण्याऐवजी, ख्रिश्चनांनी येशूचे अनुकरण करून, म्हणजेच ‘यथार्थ न्याय करणाऱ्याकडे [अर्थात, यहोवा देवाकडे] स्वतःला सोपवून देणे’ जास्त योग्य ठरेल. (१ पेत्र २:२१-२३) येशूची ‘मनोवृत्ती’ बाळगणे हे सैतानाच्या हल्ल्यांविरुद्ध बचावाचे एक उत्तम साधन आहे.—१ पेत्र ४:१.
९. आपल्यावर असणाऱ्या ओझ्यांविषयी किंवा आपल्यासमोर येणाऱ्या मोहांविषयी देव आपल्याला कोणते आश्वासन देतो?
९ सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपल्या जीवनात समस्या आल्या याचा अर्थ यहोवा आपल्याला कशाचीतरी शिक्षा देत आहे असा आपण कधीही निष्कर्ष काढू नये. ईयोबाच्या नावापुरत्या सांत्वनकर्त्यांकडून त्याच्यावर कठोर शब्दांचा भडिमार होत असताना त्याला हाच गैरसमज झाला होता. आणि त्यामुळे त्याला साहजिकच खूप दुःख झाले. (ईयोब १९:२१, २२) बायबल आपल्याला हे आश्वासन देते: “देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहांत पाडीत नाही.” (याकोब १:१३) यहोवा तर आपल्याला असे वचन देतो की आपल्यावर कोणतीही ओझी असल्यास ती वाहण्यास तो आपली मदत करेल आणि आपल्यावर कोणताही मोह आल्यास तो आपल्याकरता त्यातून निभावण्याचा उपाय करेल. (स्तोत्र ५५:२२; १ करिंथकर १०:१३) दुःखद परिस्थितीला तोंड देताना आपण देवाच्या जवळ गेल्यास, आपल्या परिस्थितीविषयी योग्यप्रकारे विचार करणे व दियाबलाला यशस्वीरित्या तोंड देणे आपल्याला शक्य होईल.—याकोब ४:७, ८.
धीर धरण्यास साहाय्य करणाऱ्या गोष्टी
१०, ११. (क) ईयोबाला कोणत्या गोष्टींमुळे धीर धरण्यास मदत मिळाली? (ख) शुद्ध विवेक असणे हे कशाप्रकारे ईयोबाकरता हिताचे ठरले?
१० ईयोबावर आलेले संकट भयानक होते. त्यातच, त्याच्या “सांत्वनकर्त्यांनी” अविचारीपणे बोलून त्याचे मन दुखावले. शिवाय आपल्यावर अशी परिस्थिती का आली याचे खरे कारण माहीत नसल्यामुळे ईयोब स्वतः गोंधळात पडला होता. पण हे सर्व असूनही त्याने शेवटपर्यंत आपली सत्त्वनिष्ठा सोडली नाही. त्याने ज्याप्रकारे धीर धरला त्यावरून आपण काय शिकू शकतो? निश्चितच, ईयोब यहोवाप्रती त्याच्या विश्वासूपणामुळेच टिकून राहू शकला. ‘तो देवाला भिऊन वागला व पापापासून दूर राहिला.’ (ईयोब १:१) हीच त्याच्या जीवनाची रीत होती. अचानक आपल्या जीवनात इतकी संकटे का आली आहेत हे समजत नव्हते तरीसुद्धा ईयोबाने यहोवाकडे पाठ फिरवली नाही. ईयोबाचे असे मानणे होते की आपण चांगल्याच नव्हे तर वाईट परिस्थितीतही देवाची सेवा केली पाहिजे.—ईयोब १:२१; २:१०.
११ ईयोबाचा विवेक शुद्ध असल्यामुळेही त्याला बरेच सांत्वन मिळाले. आपण आता फार काळ जगणार नाही असे त्याला वाटू लागले तेव्हा त्याला या जाणिवेने दिलासा मिळाला, की आपण आजपर्यंत आपल्याने होईल तितकी इतरांना मदत केली, यहोवाच्या नीतिनियमांचे नेहमी पालन केले आणि कोणत्याही प्रकारे कधी खोटी उपासना केली नाही.—ईयोब ३१:४-११, २६-२८.
१२. एलीहूकडून मिळालेल्या मदतीला ईयोबाने कसा प्रतिसाद दिला?
१२ अर्थात, काही बाबतीत ईयोबाचा दृष्टिकोन योग्य नव्हता आणि योग्यप्रकारे विचार करण्यास त्याला मदत करण्यात आली. त्याने ती मदत नम्रपणे स्वीकारली. ही आणखी एक गोष्ट होती जिच्यामुळे त्याला शेवटपर्यंत धीर धरण्यास साहाय्य मिळाले. ईयोबाने एलीहूचा सुज्ञ सल्ला आदरपूर्वक ऐकून घेतला आणि यहोवाने दिलेल्या ताडनालाही चांगल्या मनोवृत्तीने प्रतिसाद दिला. त्याने कबूल केले की “मला समजत नाही ते मी बोललो. . . . म्हणून मी माघार घेऊन धूळराखेत बसून पश्चात्ताप करीत आहे.” (ईयोब ४२:३, ६) ईयोबाचे यातनादायी आजारपण अद्याप दूर झालेले नव्हते, तरीसुद्धा त्याचा दृष्टिकोन सुधारण्याकरता त्याला मिळालेल्या मदतीमुळे त्याला देवाच्या आणखी जवळ जाता आले याबद्दल त्याने आनंद मानला. “तुला सर्व काही करिता येते, असे मला कळून आले आहे.” (ईयोब ४२:२) यहोवाने आपल्या महानतेचे वर्णन केले तेव्हा ईयोबाला आपल्या निर्माणकर्त्याच्या संबंधाने आपले स्थान कोणते हे स्पष्टपणे ओळखता आले.
१३. क्षमाशीलतेने वागणे हे कशाप्रकारे ईयोबाकरता हिताचे ठरले?
१३ शेवटी, ईयोबाचा अहवाल क्षमाशीलतेचेही उत्तम उदाहरण आपल्यासमोर ठेवतो. त्याच्या नाममात्र सांत्वनकर्त्यांनी त्याला खूप मानसिक यातना दिल्या, तरीसुद्धा यहोवाने जेव्हा त्यांच्याकरता प्रार्थना करण्यास सांगितले तेव्हा ईयोबाने तसेच केले. यानंतर, यहोवाने ईयोबाला त्याचे आरोग्य परत दिले. (ईयोब ४२:८, १०) यावरून हेच स्पष्ट होते की मनात राग बाळगल्याने नव्हे, तर प्रेमाने व क्षमाशीलतेने वागल्यामुळे आपल्याला धीर धरण्यास मदत मिळते. आपण मनातून राग काढून टाकतो तेव्हा आपल्याला आध्यात्मिक दृष्टीने नवा उत्साह आणि यहोवाचा आशीर्वाद मिळतो.—मार्क ११:२५.
धीर धरण्यास मदत करणारे सुज्ञ सल्लागार
१४, १५. (क) इतरांच्या जखमांवर फुंकर घालण्याकरता, सल्ला देणाऱ्याकडे कोणते गुण असले पाहिजेत? (ख) एलीहू ईयोबाला का मदत करू शकला हे स्पष्ट करा.
१४ ईयोबाच्या अहवालातून जो आणखी एक धडा आपण घेऊ शकतो तो सुज्ञतेने सल्ला देणाऱ्यांच्या महत्त्वाविषयी आहे. सुज्ञतेने सल्ला देणारे ‘विपत्कालासाठी बंधू म्हणून निर्माण झालेले’ असतात. (नीतिसूत्रे १७:१७) पण ईयोबाच्या अनुभवावरून दिसून येते त्याप्रमाणे काही सल्ला देणारे, दुखऱ्या जखमेवर फुंकर घालण्याऐवजी त्यावर मीठ चोळतात. सल्ला देणाऱ्यामध्ये एलीहूप्रमाणे सहानुभूती, आदर व दयाळूपणा यांसारखे गुण असले पाहिजेत. बरेचदा वडिलांना व इतर प्रौढ ख्रिश्चनांना, आधीच समस्यांच्या ओझ्याखाली दबलेल्या बांधवांचे चुकीचे दृष्टिकोन सुधारण्याची गरज पडते. अशा वेळी ते सल्ला देण्याविषयी ईयोबाच्या पुस्तकातून बरेच काही शिकू शकतात.—गलतीकर ६:१; इब्री लोकांस १२:१२, १३.
१५ एलीहू त्या विशिष्ट परिस्थितीत ज्याप्रकारे वागला, त्यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. ईयोब व त्याच्या तीन मित्रांनी व्यक्त केलेले चुकीचे दृष्टिकोन त्यांच्या लक्षात आणून देण्याआधी एलीहूने आधी बराच वेळपर्यंत शांतपणे त्यांचे बोलणे ऐकून घेतले. (ईयोब ३२:११; नीतिसूत्रे १८:१३) एलीहूने ईयोबाचे नाव घेऊन त्याला संबोधित केले आणि एखाद्या मित्राप्रमाणे तो त्याच्याशी बोलला. (ईयोब ३३:१) ईयोबाच्या तीन नावापुरत्या सांत्वनकर्त्यांप्रमाणे, एलीहूने स्वतःला ईयोबापेक्षा श्रेष्ठ समजून त्याला सल्ला दिला नाही. तो म्हणाला: “मीहि मातीच्या गोळ्याचा घडलेला आहे.” अविचारीपणे बोलून ईयोबाच्या दुःखात आणखी भर घालण्याची त्याची इच्छा नव्हती. (ईयोब ३३:६, ७; नीतिसूत्रे १२:१८) ईयोबाच्या पूर्वीच्या आचरणाविषयी त्याची टीका करण्याऐवजी एलीहूने त्याच्या नीतिमत्तेबद्दल त्याची प्रशंसा केली. (ईयोब ३३:३२) सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, एलीहूने देवाच्या दृष्टिकोनातून परिस्थितीकडे पाहण्याचा प्रयत्न केला. यहोवा कधीही अनितीने वागणार नाही या वस्तूस्थितीची खात्री बाळगण्यास त्याने ईयोबाला मदत केली. (ईयोब ३४:१०-१२) स्वतःची नीतिमत्ता सिद्ध करून दाखवण्याची धडपड करण्याऐवजी यहोवाच्या न्यायाकरता थांबून राहण्याचे एलीहूने ईयोबाला प्रोत्साहन दिले. (ईयोब ३५:२; ३७:१४, २३) ख्रिस्ती वडिलांकरता व इतरांकरताही हे धडे निश्चितच उपयुक्त आहेत.
१६. ईयोबाचे तीन नावापुरते सांत्वनकर्ते कशाप्रकारे सैतानाच्या वतीने बोलणाऱ्यांप्रमाणे ठरले?
१६ एलीहूने दिलेला सुज्ञ सल्ला हा अलीफज, बिलदद व सोफर यांच्या खोचक शब्दांच्या अगदी उलट होता. यहोवाने त्यांना सांगितले: ‘मजविषयी तुम्ही यथार्थ बोलला नाही.’ (ईयोब ४२:७) त्यांच्या दृष्टीने जरी त्यांचे हेतू चांगले असले, तरीसुद्धा ते विश्वासू मित्रांसारखे वागण्याऐवजी सैतानाच्या वतीने बोलणाऱ्यांप्रमाणे ठरले. त्या तिघांनीही सुरुवातीपासूनच असे गृहीत धरले होते, की ईयोबावर आलेल्या संकटांकरता तो स्वतःच जबाबदार आहे. (ईयोब ४:७, ८; ८:६; २०:२२, २९) अलीफजने असे मत व्यक्त केले की देवाला त्याच्या सेवकांवर मुळीच भरवसा नाही आणि आपण नीतीने वागलो काय किंवा नाही काय, त्याला यामुळे काही फरक पडत नाही. (ईयोब १५:१५; २२:२, ३) अलीफजने ईयोबावर अनेक खोटे आरोप लावले. (ईयोब २२:५, ९) त्याउलट, एलीहूने ईयोबाला आध्यात्मिक दृष्ट्या सावरण्यास मदत केली. प्रेमळपणे सल्ला देणाऱ्याचा नेहमी हाच हेतू असतो.
१७. परीक्षांना तोंड देताना आपण काय आठवणीत ठेवले पाहिजे?
१७ ईयोबाच्या पुस्तकातून आपण धीर धरण्यासंबंधी आणखी एक गोष्ट शिकू शकतो. ती अशी, की आपला प्रेमळ देव आपल्या परिस्थितीकडे पाहतो. आणि आपल्याला निरनिराळ्या मार्गांनी मदत पुरवण्यास तो इच्छुक व समर्थ आहे. सुरुवातीला आपण एल्सा ऑप्ट हिचा अनुभव पाहिला. या अनुभवामुळे ती ज्या निष्कर्षावर आली त्यावर विचार करा: “मला अटक होण्यापूर्वी, एकदा मी एका बहिणीचं पत्र वाचलं होतं ज्यात तिनं म्हटलं होतं की आपण कठीण परीक्षेला तोंड देत असतो, तेव्हा यहोवाचा आत्मा आपोआपच आपल्याला एकप्रकारची मानसिक शांती देतो. ते वाचल्यावर मला वाटलं की ती थोडी अतिशयोक्ती करत असावी. पण जेव्हा मी स्वतः कठीण परिक्षांना तोंड दिलं तेव्हा मला कळलं की तिचे शब्द अगदी खरे होते. खरोखर, तिनं लिहिलंय तसंच घडतं. तुम्ही हे अनुभवलं नसेल तर याची कल्पना करणं कठीण आहे. पण माझ्याबाबतीत तर अगदी असंच घडलं. यहोवा खरोखरच मदत करतो.” यहोवा काय करू शकतो किंवा हजारो वर्षांपूर्वी ईयोबाच्या काळात त्याने काय केले होते याविषयी एल्सा येथे बोलत नव्हती. तर ती आपल्या काळाविषयी बोलत होती—होय, “यहोवा खरोखरच मदत करतो!”
जो धीर धरतो तो धन्य
१८. धीर धरल्यामुळे ईयोबाला कोणते आशीर्वाद मिळाले?
१८ ईयोबाला सोसावे लागले तितके भयानक संकट कदाचित आपल्यापैकी कोणाला सोसावे लागणार नाही. पण या जगात आपल्याला जी काही संकटे सोसावी लागतील, ती सोसताना आपण ईयोबाप्रमाणे आपली सत्त्वनिष्ठा धरून ठेवली पाहिजे. असे करण्याकरता आपल्याजवळ काही ठोस कारणे आहेत. ईयोबाने धीर धरल्यामुळे त्याचे जीवन अधिक अर्थपूर्ण बनले. त्याच्यावर आलेल्या संकटांमुळे त्याला अखंड परिपूर्णता प्राप्त झाली. (याकोब १:२-४) देवासोबतचा त्याचा नातेसंबंध दृढ झाला. ईयोबाने स्वतः हे कबूल केले: “मी तुजविषयी कर्णोपकर्णी ऐकले होते. आता तर प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तुला पाहत आहे.” (ईयोब ४२:५) सैतान ईयोबाची सत्त्वनिष्ठा भंग करू शकला नाही आणि अशारितीने त्याच्याविरुद्धचे सर्व दावे खोटे असल्याचे सिद्ध झाले. शेकडो वर्षांनंतरही यहोवाने धार्मिकतेचे ज्वलंत उदाहरण म्हणून ईयोबाचा उल्लेख केला. (यहेज्केल १४:१४) त्याच्या निष्ठेचा व धीराचा अहवाल वाचून आजही देवाच्या लोकांना प्रेरणा मिळते.
१९. तुमच्या मते धीर धरणे व्यर्थ का नाही?
१९ पहिल्या शतकातील ख्रिस्ती बांधवांना धीराविषयी लिहिताना याकोबाने, धीर धरल्यामुळे मिळणाऱ्या समाधानाविषयी सांगितले. आणि यहोवा आपल्या विश्वासू सेवकांना कशाप्रकारे समृद्ध प्रतिफळ देतो याची त्यांना आठवण करून देण्याकरता याकोबाने ईयोबाच्या उदाहरणाचा उपयोग केला. (याकोब ५:११) ईयोब ४२:१२ यात म्हटल्याप्रमाणे: “परमेश्वराने ईयोबाचे उत्तरवय पूर्ववयाहून अधिक सुखसंपन्न केले.” ईयोबाने जे काही गमावले होते त्याच्या दुप्पट देवाने त्याला दिले आणि त्याला आनंदी दीर्घायुष्य लाभले. (ईयोब ४२:१६, १७) त्याचप्रकारे, या जगाच्या अंतकाळात आपल्याला सहन कराव्या लागणाऱ्या सर्व वेदना, दुःख व कष्ट देवाच्या नव्या जगात नाहीसे केले जाईल, व कोणाला त्यांची आठवणसुद्धा राहणार नाही. (यशया ६५:१७; प्रकटीकरण २१:४) ईयोबाच्या धीराविषयी ऐकल्यानंतर आपणही यहोवाच्या साहाय्याने, त्याच्या उत्तम उदाहरणाचे अनुकरण करण्याचा निर्धार करू या. बायबल वचन देते, की “जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीति करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुगूट, परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल.”—याकोब १:१२. (w०६ ८/१५)
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• आपण यहोवाचे मन कसे आनंदित करू शकतो?
• आपल्यासमोर समस्या येतात तेव्हा देव आपल्याला शिक्षा देत आहे असा निष्कर्ष आपण का काढू नये?
• ईयोबाला धीर धरण्यास कशामुळे मदत मिळाली?
• आपल्या बांधवांना उत्तेजन देताना आपण एलीहूचे कशाप्रकारे अनुकरण करू शकतो?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१६ पानांवरील चित्र]
सल्ला देणाऱ्यामध्ये सहानुभूती, आदर व दयाळूपणा यांसारखे गुण असले पाहिजेत
[१७ पानांवरील चित्रे]
एल्सा व हारल्ड ऑप्ट