यहोवाची शिक्षा नेहमी स्वीकारा
यहोवाची शिक्षा नेहमी स्वीकारा
“यहोवाची शिक्षा अवमानू नको.”—नीतिसूत्रे ३:११, पं.र.भा.
१. आपण देवाकडून मिळणाऱ्या शिक्षेचा स्वीकार का केला पाहिजे?
प्राचीन इस्राएलचा राजा शलमोन आपल्यातील प्रत्येकाला, देवाकडून मिळणारी शिक्षा स्वीकारण्याची उत्तम प्रेरणा देतो. तो म्हणतो: “माझ्या मुला, यहोवाची शिक्षा अवमानू नको, आणि त्याच्या शासनाला कंटाळू नको, कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला शासन करतो, तसा यहोवा ज्याच्यावर प्रीती करतो त्याला शासन करतो.” (नीतिसूत्रे ३:११, १२, पं.र.भा.) होय, तुमचा स्वर्गीय पिता तुम्हाला शिक्षा देतो कारण त्याचे तुमच्यावर प्रेम आहे.
२. “शिक्षा” या शब्दाचा अर्थ काय आहे आणि एका व्यक्तीला कदाचित शिक्षा कशी मिळेल?
२ “शिक्षा” या शब्दाचा अर्थ, दंडन, सुधारणूक, बोध, शिक्षण असा होतो. प्रेषित पौलाने लिहिले: “कोणतीहि शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व व शांतिकारक फळ देते.” (इब्री लोकांस १२:११) देवाकडून मिळणाऱ्या शिक्षेचा स्वीकार करून तिचा आपल्या जीवनात अवलंब केल्यामुळे तुम्हाला धार्मिक जीवन जगण्यास व पवित्र देव यहोवा याच्या समीप येण्यास मदत होऊ शकेल. (स्तोत्र ९९:५) ही सुधारणूक कदाचित आपल्याला आपल्या सहउपासकांकडून, ख्रिस्ती सभांमध्ये शिकत असलेल्या गोष्टींतून, देवाचे वचन आणि ‘विश्वासू कारभाऱ्यांकडून’ मिळणाऱ्या प्रकाशनांतून मिळेल. (लूक १२:४२-४४) ज्याबाबतीत सुधारणा केली पाहिजे अशी एखादी गोष्टी जेव्हा तुमच्या नजरेस आणून दिली जाते तेव्हा तुम्ही किती आभारी असले पाहिजे! पण समजा कोणी गंभीर पाप केले असेल तर त्याला कोणत्याप्रकारची शिक्षा मिळाली पाहिजे?
काहींना बहिष्कृत का केले जाते?
३. एखाद्या व्यक्तीला बहिष्कृत केव्हा केले जाते?
३ देवाचे सेवक बायबल आणि ख्रिस्ती प्रकाशनांचा अभ्यास करतात. त्यांच्या सभांमध्ये, संमेलनांमध्ये आणि अधिवेशनांमध्ये यहोवाच्या दर्जांची चर्चा केली जाते. त्यामुळे यहोवा त्यांच्याकडून काय अपेक्षा करतो याची त्यांना जाणीव आहे. पण मंडळीतील एखादा सदस्य, अपश्चात्तापीपणे गंभीर पाप करीत असेल तरच त्याला बहिष्कृत केले जाते.
४, ५. बायबलमधील बहिष्कृतीकरणाचा कोणता अहवाल येथे उल्लेखण्यात आला आहे, व ज्याला बहिष्कृत करण्यात आले होते त्याला पुन्हा मंडळीत घेण्यास का आर्जवण्यात आले?
४ बायबलमधील बहिष्कृतीकरणाच्या अहवालाचा जरा विचार करूया. करिंथ मंडळीत, ‘परराष्ट्रीयांमध्ये देखील आढळत नाही असे जारकर्म’ खपवून घेतले जात होते. “म्हणजे त्यांच्यातील कोणी एकाने आपल्या बापाची बायको ठेवली” होती. पौलाने या करिंथकरांना असे आर्जवले: “त्या माणसाला . . . आपला प्रभु येशू ह्याच्या नावाने देहस्वभावाच्या नाशाकरिता सैतानाच्या स्वाधीन करावे, अशा हेतूने की, आत्मा प्रभु येशूच्या दिवशी तारला जावा.” (१ करिंथकर ५:१-५) ख्रिस्ती मंडळीतून बहिष्कृत केल्यानंतर व सैतानाच्या स्वाधीन केल्यानंतर पाप करणारी व्यक्ती पुन्हा दियाबलाच्या जगाचा भाग बनते. (१ योहान ५:१९) या पातक्याला बहिष्कृत केल्यामुळे मंडळीतून दुष्ट प्रभाव काढून टाकण्यात आला व मंडळीतील ‘आत्मा’ अर्थात देवाचे गुण प्रतिबिंबित करण्याची मनोवृत्ती टिकून राहिली.—२ तीमथ्य ४:२२; १ करिंथकर ५:११-१३.
५ ही घटना घडल्यानंतर जास्त काळ लोटला नव्हता, तेव्हा पौलाने करिंथ मंडळीतल्या ख्रिश्चनांना बहिष्कृत केलेल्या पातक्याला पुन्हा मंडळीत घेण्यास आर्जवले. का? जेणेकरून मंडळीतल्या ख्रिश्चनांवर “सैतानाचे वर्चस्व होऊ नये,” असे प्रेषिताने म्हटले. पाप करणाऱ्याने पश्चात्ताप केला होता व तो शुद्ध नैतिक जीवन जगू लागला होता. (२ करिंथकर २:८-११) करिंथकरांनी या पश्चात्तापी व्यक्तीला पुन्हा मंडळीत घेण्यास नकार दिला असता तर सैतानाने त्यांच्यावर वर्चस्व मिळवले असते. म्हणजे, सैतानाच्या इच्छेप्रमाणे ते कठोर आणि अक्षमाक्षील बनले असते. कारण सैतानाची हीच इच्छा आहे. परंतु असे दिसते, की प्रेषित पौलाचे म्हणणे ऐकून करिंथ मंडळीतल्या वडिलांनी पश्चात्तापी व्यक्तीला लगेच “क्षमा करून त्याचे सांत्वन” केले.—२ करिंथकर २:५-७.
६. बहिष्कृत केल्यामुळे काय साध्य होते?
६ एखाद्या व्यक्तीला बहिष्कृत केल्यामुळे काय साध्य होते? यहोवाच्या पवित्र नावावर कलंक लागत नाही आणि त्याच्या लोकांचा नावलौकिक टिकून राहतो. (१ पेत्र १:१४-१६) अपश्चात्तापी व्यक्तीला मंडळीतून काढून टाकल्यामुळे देवाचे दर्जे उंचावले जातात आणि मंडळीची आध्यात्मिक शुद्धता टिकून राहते. शिवाय, पाप करणारी व्यक्ती देखील शुद्धीवर येऊ शकते.
पश्चात्ताप करणे महत्त्वाचे आहे
७. आपल्या पापांची कबूली न दिल्यामुळे दाविदाची अवस्था कशी झाली?
७ गंभीर पाप करणारे बहुतेक जण जेव्हा मनापासून पश्चात्ताप करतात तेव्हा त्यांना मंडळीतून बहिष्कृत केले जात नाही. अर्थात काहींना मनापासून पश्चात्ताप करणे कठीण जाते. ज्याने ३२ व्या स्तोत्राचे लिखाण केले त्या इस्राएलच्या राजा दावीदाच्या उदाहरणाचा विचार करा. काही वेळापर्यंत दाविदाने बथशेबाबरोबर केलेली गंभीर पातके कबूल केली नव्हतीत, हे या स्तोत्रावरून दिसून येते. यामुळे, जसे उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे एखादे झाड कोमेजून जाते तसेच मानसिक यातनांमुळे दाविदाचा जोम नाहीसा झाला होता. त्याला शारीरिकरीत्या व भावनिकरीत्या पीडा झाल्या. पण जेव्हा त्याने “आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल” केले तेव्हा यहोवाने त्याच्या “पापदोषाची क्षमा केली.” (स्तोत्र ३२:३-५) त्यानंतर दाविदाने असे गायिले: “ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनीतीचा दोष लावीत नाही तो मनुष्य धन्य!” (स्तोत्र ३२:१, २) यहोवाच्या कृपेचा अनुभव घेणे किती सांत्वनदायक होते!
८, ९. पश्चात्ताप कसा दाखवला जातो आणि बहिष्कृत व्यक्तीला पुन्हा मंडळीत घेण्याचे ठरवताना तिने पश्चात्ताप दाखवणे महत्त्वाचे का आहे?
८ तेव्हा यावरून हेच स्पष्ट होते, की पाप करणाऱ्याला दया हवी असेल तर त्याने पश्चात्ताप केला पाहिजे. परंतु, पश्चात्ताप करण्याचा अर्थ केवळ लज्जित होणे किंवा आपले पाप सर्वांस कळून येईल अशी मनात भीति बाळगणे नव्हे. पश्चात्ताप करणे म्हणजे वाईट वर्तनावर खेद व्यक्त करून पश्चात्ताप करणे, असा होता. पश्चात्तापी व्यक्तीचे “भग्न व अनुतप्त हृदय” होते आणि शक्य असेल तर ‘चूक सुधारायची’ तिची इच्छा असते.—स्तोत्र ५१:१७; २ करिंथकर ७:११.
९ बहिष्कृत व्यक्तीला ख्रिस्ती मंडळीत पुन्हा घेण्याचे ठरवताना, पश्चात्ताप हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. विशिष्ट कालावधीनंतर बहिष्कृत व्यक्तीला आपोआप मंडळीत पुन्हा स्वीकारले जात नाही. तिला पुन्हा मंडळीत घेण्याअगोदर तिच्या हृदयाच्या स्थितीत आमूलाग्र बदल झाले पाहिजेत. तिने तिच्या पापाचे गांभीर्य ओळखले पाहिजे; आपल्या पापामुळे यहोवाच्या नावावर व मंडळीवर किती मोठा कलंक लागला याची तिला जाणीव झाली पाहिजे. पाप करणाऱ्याला खेद झाला पाहिजे, क्षमा मिळण्यासाठी त्याने कळकळीने प्रार्थना केली पाहिजे आणि पुन्हा एकवार आपले जीवन देवाच्या धार्मिक स्तरांनुसार आणले पाहिजे. मंडळीत पुन्हा स्वीकारावे म्हणून विनंती करताना त्याला, आपल्याला खरोखरच पश्चात्ताप झाला आहे व आपण “पश्चात्तापास शोभतील अशी कृत्ये” करत आहोत याचा पुरावा द्यावा लागेल.—प्रेषितांची कृत्ये २६:२०.
पापाची कबूली का दिली पाहिजे?
१०, ११. आपण पाप लपवून ठेवायचा प्रयत्न न करता ते कबूल का केले पाहिजे?
१० ज्यांनी पाप केले आहे त्यांना कदाचित असे वाटेल: ‘मी जर माझ्या पापाविषयी कुणाला सांगितलं तर मला संकोचजनक प्रश्न विचारले जातील आणि कदाचित मला मंडळीतून काढलं जाईल. पण मी जर गप्प राहिलो तर हे सर्व मला टाळता येईल आणि मंडळीतल्या कुणालाही काही कळणार नाही.’ अशाप्रकारे विचार करणारे काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी?
११ यहोवा “दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हजारो जणांवर दया करणारा, अन्याय, अपराध व पाप ह्यांची क्षमा करणारा” आहे. तरीपण तो आपल्या लोकांचे “योग्य शासन” करतो. (निर्गम ३४:६, ७; यिर्मया ३०:११) तुम्ही जर गंभीर पाप केले असेल आणि तुम्ही जर ते लपवून ठेवले तर तुम्हाला देवाची कृपा कशी मिळू शकेल? तुम्ही केलेले पाप यहोवाला माहीत आहे आणि तो त्याच्याकडे दुर्लक्ष करत नाही.—नीतिसूत्रे १५:३; हबक्कूक १:१३.
१२, १३. पाप लपवून ठेवण्याचा प्रयत्न केल्यास काय घडू शकते?
१२ तुम्ही गंभीर पाप केले असेल तर पापाची कबुली दिल्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा शुद्ध विवेक बाळगता येईल. (१ तीमथ्य १:१८-२०) पण पाप कबूल न केल्यास विवेक अशुद्ध होऊ शकतो ज्यामुळे तुम्ही आणखी पाप करण्यात पुढे सरसावाल. तुम्ही केवळ कोणा दुसऱ्या मनुष्याविरुद्ध अथवा मंडळीविरुद्ध पाप करत नसता, हे लक्षात ठेवा. तर तुम्ही देवाविरुद्ध पाप करत असता. स्तोत्रकर्त्याने असे गायिले: “परमेश्वराचे राजासन स्वर्गात आहे; त्याचे नेत्र मानवास पाहतात, त्याच्या पापण्या त्यांस अजमावितात. परमेश्वर नीतिमानाला आणि दुष्टालाही कसास लावितो.”—स्तोत्र ११:४, ५.
१३ आपली पातके झाकून शुद्ध ख्रिस्ती मंडळीत राहण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना यहोवा आशीर्वाद देणार नाही. (याकोब ४:६) तुमच्या हातून पाप घडले असेल आणि आता जे बरोबर ते करण्याची तुमची इच्छा आहे तर मग विनाविलंब मनमोकळेपणे आपल्या पापाची कबुली द्या. नाहीतर, तुमचा विवेक हा दोषी विवेक राहील; खासकरून तुम्ही जेव्हा जेव्हा अशा गंभीर गोष्टींबद्दल वाचाल किंवा ऐकाल तेव्हा तेव्हा तुमचा विवेक तुम्हाला बोचत राहील. आणि समजा, राजा शौलाच्या बाबतीत झाले तसे यहोवाने तुमच्याकडून आपला आत्मा काढून घेतला तर? (१ शमुवेल १६:१४) देवाचा आत्मा निघाल्यानंतर तुमच्या हातून आणखी गंभीर पातके घडण्याची शक्यता असू शकते.
आपल्या विश्वासू बांधवांवर भरवसा ठेवा
१४. पाप करणाऱ्याने याकोब ५:१४, १५ मधील सल्ल्याचे पालन का करावे?
१४ तर मग पश्चात्ताप करणाऱ्याने काय केले पाहिजे? “त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओणवून प्रार्थना करावी. विश्वासाची प्रार्थना दुःखणाइतास वाचवील आणि प्रभु त्याला उठवील.” (याकोब ५:१४, १५) ‘पश्चात्तापास योग्य अशी फळे’ उत्पन्न करण्याचा एक मार्ग आहे, वडिलांशी बोलणे. (मत्तय ३:८) हे विश्वासू व दयाळू पुरुष पाप करणाऱ्याला ‘प्रभूच्या नावाने तेल लावून व त्याच्यावर ओणवून प्रार्थना करतील.’ तेलामुळे जसे हलके वाटू लागते तसे बायबलमधून हे वडीलजन देत असलेल्या सल्ल्यामुळे मनापासून पश्चात्ताप करणाऱ्याला सांत्वन मिळू शकते.—यिर्मया ८:२२.
१५, १६. यहेज्केल ३४:१५, १६ मध्ये लिहून ठेवण्यात आलेल्या अहवालात देवाने मांडलेल्या उदाहरणाचे अनुकरण ख्रिस्ती वडील कशाप्रकारे करतात?
१५ सा.यु.पू. ५३७ मध्ये यहुद्यांना बॅबिलोनच्या दास्यत्वातून सोडवून व सा.यु. १९१९ मध्ये आध्यात्मिक इस्राएलला ‘मोठ्या बाबेलीतून’ सोडवून आपला मेंढपाळ यहोवा देव याने एक प्रेमळ उदाहरण आपल्यापुढे मांडले आहे. (प्रकटीकरण १७:३-५; गलतीकर ६:१६) याद्वारे त्याने दिलेले वचन पूर्ण केले: “मी स्वतः माझा कळप चारीन व त्यांची निजण्याबसण्याची सोय करीन . . . मी हरवलेल्यांस शोधीन, हाकून दिलेल्यांस परत आणीन, घायाळास पट्टी बांधीन, रोग्यांस बळ देईन.”—यहेज्केल ३४:१५, १६.
१६ यहोवाने आपल्या लाक्षणिक मेंढरांना चारले, त्यांना सुरक्षित वातावरणात निजण्याबसण्याची सोय केली आणि हरवलेल्यांस शोधले. तसेच, ख्रिस्ती मंडळीतले मेंढपाळ, देवाच्या कळपातील प्रत्येकाला पुरेपूर आध्यात्मिक भोजन मिळत आहे व तो सुरक्षित आहे याची खात्री करतात. हे वडील, मंडळीपासून भरकटलेल्या मेंढरांना शोधतात. देवाने जसे ‘घायाळास पट्टी बांधली’ तसेच इतरांच्या शब्दांमुळे किंवा स्वतःच्याच कार्यांमुळे घायाळ झालेल्या मेंढरांना मंडळीतले हे पर्यवेक्षक ‘पट्टी बांधतात.’ देवाने जसे ‘रोग्यांस बळ दिले’ त्याप्रमाणे स्वतःच्या चुकीमुळे आध्यात्मिकरीत्या आजारी पडलेल्यांना हे पर्यवेक्षक मदत करतात.
मेंढपाळांची मदत
१७. वडिलांकडून आध्यात्मिक साहाय्य प्राप्त करण्यास आपण का कचरू नये?
१७ “भीतभीत दया करा” या सल्ल्याचे पालन वडीलजन अतिशय आनंदाने करतात. (यहूदा २३) लैंगिक अनैतिकतेत गुरफटून काही ख्रिश्चनांनी गंभीर पाप केले आहे. पण ते जर खरोखरच पश्चात्तापी असतील तर, आध्यात्मिकरीत्या त्यांना मदत करण्यास आतुर असलेल्या वडिलांकडून त्यांना दयाळुपणे व प्रेमळपणे मदत दिली जाईल, अशी खात्री ते बाळगू शकतात. स्वतःविषयी आणि या वडिलांविषयी पौलाने असे म्हटले: “आम्ही तुमच्या विश्वासावर सत्ता गाजवितो असे नाही, तर तुमच्या आनंदात साहाय्यकारी आहो.” (२ करिंथकर १:२४) यास्तव, वडिलांकडून आध्यात्मिक साहाय्य प्राप्त करण्यास केव्हाही कचरू नका.
१८. पाप करणाऱ्या बंधू अथवा बहिणीशी वडीलजन कसे वागतात?
१८ तुम्ही जर गंभीर पाप केले असेल तर तुम्ही वडिलांवर भरवसा का ठेवू शकता? कारण ते प्रामुख्याने देवाच्या कळपाचे मेंढपाळ आहेत. (१ पेत्र ५:१-४) कोणताही प्रेमळ मेंढपाळ, गरीब व स्वतःच्या चुकीमुळे जखमी झालेल्या व यातनेमुळे ओरडणाऱ्या मेंढराला फटके मारणार नाही. यास्तव, चूक करणाऱ्या सहविश्वासू बंधू अथवा बहिणीला वडील जन मदत करतात तेव्हा ते, या पापासाठी कोणती शिक्षा द्यावी यावर आपले लक्ष केंद्रित करत नाहीत तर ते पाप किती गंभीर स्वरुपाचे आहे आणि पाप करणाऱ्या बंधू अथवा बहिणीला कोणत्याप्रकारची आध्यात्मिक मदत देता येईल, यावर आपले लक्ष केंद्रित करतात. (याकोब ५:१३-२०) वडिलांनी धार्मिकतेने न्याय केला पाहिजे आणि ‘कळपावर दयामाया’ केली पाहिजे. (प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३०; यशया ३२:१, २) इतर सर्व ख्रिश्चनांप्रमाणे वडिलांनी देखील ‘नीतीने वागले पाहिजे, आवडीने दया केली पाहिजे व आपल्या देवासमागमे राहून नम्रभावाने चालले पाहिजे.’ (मीखा ६:८) यहोवाच्या “कुरणातील” मेंढरांच्या जीवनाच्या संबंधाने व पवित्र सेवेच्या संबंधाने निर्णय घेताना अशाप्रकारचे गुण अत्यंत महत्त्वाचे आहेत.—स्तोत्र १००:३.
१९. ख्रिस्ती वडील कोणती मनोवृत्ती बाळगून पाप करणाऱ्याला ताळ्यावर आणतात?
१९ पवित्र आत्म्याने ख्रिस्ती वडिलांची नियुक्ती होत असल्यामुळे ते पवित्र आत्म्याचे साहाय्य घेण्याचा प्रयत्न करतात. “कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला”—अनपेक्षितपणे त्याच्या हातून पाप घडले असेल तर आध्यात्मिकरीत्या प्रौढ असलेले वडीलजन ‘अशा माणसाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणतात.’ (गलतीकर ६:१; प्रेषितांची कृत्ये २०:२८) एक समंजस डॉक्टर, ज्याप्रमाणे सांध्यातून निखळेला हात अथवा पाय पुन्हा जागी बसवतो त्याचप्रमाणे वडील जन सौम्यतेने परंतु त्याचबरोबर देवाच्या दर्जांच्या बाबतीत दृढ राहून पाप करणाऱ्या व्यक्तीच्या विचारसरणीत सुधार करायचा प्रयत्न करतात. अशाप्रकारे डॉक्टर आणि वडील जन हे दोघेही, रुग्णाला अथवा सहविश्वासू भावाला अथवा बहिणीला अनावश्यक यातना होण्यापासून वाचवू पाहत असतात पण त्याचबरोबर त्यांना त्या व्यक्तीची समस्या सोडवायची असते. (कलस्सैकर ३:१२) वडील जन, प्रार्थना आणि शास्त्रवचने यांच्या आधारावरच पाप करणाऱ्या व्यक्तीला दया दाखवायची की नाही हे ठरवत असल्यामुळे, त्यांचे निर्णय देवाच्या दृष्टिकोनानुसारच असतील.—मत्तय १८:१८.
२०. एका व्यक्तीची न्यायदान समितीकडून कानउघडणी करण्यात आली आहे याविषयीची घोषणा मंडळीत केव्हा करण्याची गरज पडू शकेल??
२० पाप करणाऱ्याने कोणते पाप केले आहे किंवा आज नाही तर उद्या ते पाप उघडकीस येणारच असले तरी, मंडळीत घोषणा करणे उचित राहील जेणेकरून मंडळीचे नाव बदनाम होणार नाही. मंडळीला सांगण्याची गरज असेल तर एक घोषणा करण्यात यावी. न्यायदान समितीकडून जिची कानउघडणी करण्यात आली आहे ती व्यक्ती आध्यात्मिकरीत्या बरी होण्याच्या काळाची तुलना जखमी झालेली एक व्यक्ती बरी होण्याच्या काळाशी करता येईल. ही जखमी झालेली व्यक्ती तात्पुरत्या काळासाठी काही काम करू शकत नसते. त्याचप्रकारे, पश्चात्ताप केलेल्या व्यक्तीने सभांमध्ये काही काळापुरते उत्तरे न देता केवळ लक्ष देऊन कार्यक्रम ऐकणे हे त्या व्यक्तीसाठी फायदेकारक ठरू शकेल. या व्यक्तीबरोबर बायबलचा अभ्यास करण्यासाठी वडीलजन कोणाची तरी व्यवस्था करू शकतात जेणेकरून ज्या बाबतीत तिची कमजोरी आहे त्याबाबतीत तिला सुधारणा करता येऊन ती पुन्हा ‘विश्वासांत दृढ’ होऊ शकेल. (तीत २:२) हे सर्व प्रेमाने केले जाते. पाप करणाऱ्याला शिक्षा देण्याच्या आर्विभावात केले जात नाही.
२१. काही चुकांची प्रकरणे कशी हाताळता येतात?
२१ वडील जन विविध मार्गांनी आध्यात्मिक मदत देऊ शकतात. उदाहरणार्थ, ज्याला पूर्वी पिण्याची सवय होती असा एखादा बांधव घरी एकटा असताना, एखाद दोन वेळा पुन्हा नशा चढेपर्यंत प्यायला असेल. किंवा कदाचित, ज्याला पूर्वी धूम्रपान करायची सवय होती त्याने आपल्या मनावरील ताबा सुटल्यामुळे लपून एखाद दोन वेळा झुरका मारला असेल. याबाबतीत त्याने प्रार्थना केली आहे आणि देवाने आपल्याला क्षमा केली आहे असा विश्वास तो बाळगत असला तरीपण त्याने एखाद्या वडिलांची मदत घेतली पाहिजे जेणेकरून अशाप्रकारच्या पापाची त्याला सवय लागणार नाही. एक अथवा दोन वडील ही बाब हाताळू शकतात. परंतु, या वडिलांनी अध्यक्षीय पर्यवेक्षकांना याविषयी सांगितले पाहिजे कारण यात इतरही गोष्टी समाविष्ट असू शकतील.
देवाकडून मिळणाऱ्या शिक्षणाचा स्वीकार करीत राहा
२२, २३. देवाकडून मिळणाऱ्या शिक्षणाचा स्वीकार तुम्ही का करीत राहिला पाहिजे?
२२ देवाची संमती मिळण्याकरता प्रत्येक ख्रिश्चनाने त्याच्याकडून मिळणाऱ्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. (१ तीमथ्य ५:२०) त्यामुळे शास्त्रवचनांच्या व ख्रिस्ती प्रकाशनांच्या अभ्यासातून जेव्हा सुधारशिक्षण मिळते किंवा यहोवाच्या लोकांच्या सभा, संमेलने व अधिवेशने येथे तुम्ही सल्ला ऐकता तेव्हा तो आपल्या जीवनात लागू करा. यहोवाची इच्छा पूर्ण करण्याची जाणीव सतत बाळगा. मग देवाकडून मिळणारे शिक्षण तुमची आध्यात्मिक तटबंदी टिकवून ठेवण्यास मदत करेल. आध्यात्मिक तटबंदी एका मजबूत भिंतीप्रमाणे असते जी पाप करण्यापासून तुमचे संरक्षण करेल.
२३ देवाकडून मिळणाऱ्या शिक्षणाचा स्वीकार केल्यास तुम्ही देवाच्या प्रीतीत राहाल. हे खरे आहे की काहींना ख्रिस्ती मंडळीतून बहिष्कृत करावे लागले आहे. परंतु तुम्ही जर आपल्या ‘अंतःकरणाचे रक्षण’ केले आणि ‘ज्ञान्यासारखे जपून चाललात’ तर तुमच्यावर अशी पाळी येणार नाही. (नीतिसूत्रे ४:२३; इफिसकर ५:१५) परंतु तुम्हाला जर बहिष्कृत करण्यात आले आहे तर पुन्हा मंडळीत येण्याकरता पावले उचलायला काय हरकत आहे? देवाची अशी इच्छा आहे की ज्याने ज्याने त्याला आपले जीवन समर्पण केले आहे त्या प्रत्येकाने त्याची उपासना विश्वासूपणे व “उल्हासित मनाने” करावी. (अनुवाद २८:४७) तुम्ही जर यहोवाकडून मिळणाऱ्या शिक्षणाचा नेहमी स्वीकार करीत राहिलात तर असे तुम्ही सदासर्वकाळ करीत राहू शकाल.—स्तोत्र १००:२. (w०६ ११/१५)
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• काहींना ख्रिस्ती मंडळीतून बहिष्कृत का केले जाते?
• खऱ्या पश्चात्तापात काय काय गोवलेले आहे?
• गंभीर पापाची कबुली का दिली पाहिजे?
• ख्रिस्ती वडील कोणकोणत्या मार्गांनी पाप केलेल्या पश्चात्तापी व्यक्तींना मदत करतात?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१६ पानांवरील चित्र]
प्रेषित पौलाने करिंथमधील ख्रिश्चनांना बहिष्कृत करण्याविषयीच्या सूचना का पाठवल्या?
[१९ पानांवरील चित्र]
प्राचीन मेंढपाळांप्रमाणे ख्रिस्ती वडील देवाच्या जखमी मेंढरांना ‘मलमपट्टी’ लावतात