व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पतींनो—येशूच्या मस्तकपदाला मान द्या

पतींनो—येशूच्या मस्तकपदाला मान द्या

पतींनो—येशूच्या मस्तकपदाला मान द्या

“प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे.”—१ करिंथकर ११:३.

१, २. (क) चांगला पती कोणाला म्हणता येते? (ख) विवाहाची स्थापना देवाने केली हे ओळखणे महत्त्वाचे का आहे?

चांगला पती तुम्ही कोणाला म्हणाल? ज्याच्याजवळ उल्लेखनीय शारीरिक व बौद्धिक क्षमता आहे त्याला? जो अमाप पैसा कमावतो त्याला? की जो आपल्या पत्नी व मुलांसोबत प्रेमळ व दयाळूपणे वागतो त्याला? या शेवटच्या मापदंडानुसार चांगला पती फार कमी पुरुषांना म्हणता येते कारण बहुतेकांची वागणूक या जगाच्या आत्म्याने व मानवी विचारांनी प्रभावित असल्याचे आढळते. का? कारण ज्याने “[पुरुषाची] फासळी काढून तिची स्त्री बनविली आणि तिला [पुरुषाकडे] नेले,” त्या विवाह व्यवस्थेच्या जनकाचे मार्गदर्शन सहसा कोणी पाळत नाहीत.—उत्पत्ति २:२१-२४.

विवाहाची सुरुवात देवानेच अशाप्रकारे केली होती याला येशू ख्रिस्तानेही दुजोरा दिला. त्याच्या काळातल्या टीकाकारांना उत्तर देताना तो म्हणाला: “तुम्ही वाचले नाही काय की, उत्पन्‍नकर्त्याने सुरुवातीलाच नरनारी अशी ती निर्माण केली, व म्हटले ह्‍याकरिता पुरुष आईबापास सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील? ह्‍यामुळे ती पुढे दोन नव्हत तर एकदेह अशी आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.” (मत्तय १९:४-६) त्याअर्थी, यशस्वी वैवाहिक जीवनाची गुरुकिल्ली हीच आहे की विवाहाची स्थापना देवाने केली आहे हे आपण ओळखावे आणि कबूल करावे की यशस्वी वैवाहिक जीवन हे देवाचे वचन बायबल यातील मार्गदर्शनाचे पालन करण्यावर अवलंबून आहे.

चांगला पती बनण्यामागचे गुपीत

३, ४. (क) येशूला विवाहासंबंधी ज्ञान असण्यामागचे कारण कोणते? (ख) येशूची लाक्षणिक पत्नी कोण आहे आणि पतींनी आपल्या पत्नींशी कशाप्रकारे वागावे?

चांगला पती बनण्याकरता येशूने दिलेल्या मार्गदर्शनाचा अभ्यास करणे आणि त्याच्या कृतींचे अनुकरण करणे महत्त्वाचे आहे. जीवनाच्या या पैलूविषयी येशूला सखोल ज्ञान आहे कारण पहिल्या मानवी जोडप्याची निर्मिती करण्यात आली व त्यांचा विवाह झाला तेव्हा तो उपस्थित होता. यहोवा देवाने त्याला म्हटले: “आपल्या प्रतिरुपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करु.” (उत्पत्ति १:२६) होय, दुसरी कोणतीही व्यक्‍ती अथवा वस्तू निर्माण करण्याअगोदर देवाने ज्याला निर्माण केले होते, त्याच्याशी तो बोलत होता. आणि हाच “त्याच्यापाशी कुशल कारागीर” असा झाला. (नीतिसूत्रे ८:२२-३०) तो “सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे.” तो “देवाच्या सृष्टीचे आदिकारण” असून भौतिक विश्‍वाच्या निर्मितीपूर्वीच अस्तित्वात होता.—कलस्सैकर १:१५; प्रकटीकरण ३:१४.

येशूला “देवाचा कोकरा” म्हणण्यात आले आहे आणि लाक्षणिक अर्थाने त्याला पती म्हणूनही संबोधण्यात आले आहे. एकदा एका देवदूताने म्हटले: “ये, नवरी म्हणजे कोकऱ्‍याची स्त्री मी तुला दाखवितो.” (योहान १:२९; प्रकटीकरण २१:९) तर मग ही नवरी किंवा स्त्री कोण आहे? “कोकऱ्‍याची स्त्री” ही आत्म्याने अभिषिक्‍त असणाऱ्‍या ख्रिस्ताच्या विश्‍वासू अनुयायांना सूचित करते. हे अनुयायी त्याच्यासोबत स्वर्गात राज्य करतील. (प्रकटीकरण १४:१, ३) त्यामुळे, येशूने पृथ्वीवर आपल्या शिष्यांसोबत असताना त्यांच्याशी ज्याप्रकारे व्यवहार केला त्यावरून पतींना आपल्या पत्नींशी कसे वागावे याकरता एक नमुना मिळतो.

५. येशू कोणाकरता आदर्श आहे?

बायबल सांगते की “ख्रिस्ताने तुम्हासाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हाकरिता कित्ता घालून दिला आहे.” (१ पेत्र २:२१) त्याअर्थी, त्याच्या सर्वच अनुयायांनी त्याचे अनुकरण केले पाहिजे. पण खासकरून तो पुरुषांकरता एक आदर्श आहे. बायबल सांगते, “प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे; स्त्रीचे मस्तक पुरुष आहे, आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे.” (१ करिंथकर ११:३) ख्रिस्त हा पुरुषाचे मस्तक असल्यामुळे पतींनी त्याच्या उदाहरणाचे अनुकरण केले पाहिजे. कौटुंबिक जीवन यशस्वी व आनंदी होण्याकरता मस्तकपदाच्या तत्त्वाचे पालन करणे अत्यावश्‍यक आहे. असे करण्याकरता, येशू ज्याप्रकारे आपल्या लाक्षणिक पत्नीशी अर्थात आपल्या अभिषिक्‍त शिष्यांशी वागला त्याचप्रकारे, पतींनी आपल्या पत्नींशी प्रेमळपणे व्यवहार केला पाहिजे.

वैवाहिक जीवनातील आव्हानांना तोंड देणे

६. पतींनी आपल्या पत्नींशी कशाप्रकारे सहवास ठेवावा?

आजच्या समस्यांनी भरलेल्या जगात, पतींनी सहनशीलता, प्रेम, व नीतिमान तत्त्वांचे खंबीरपणे समर्थन करणे यांसारख्या गुणांच्या बाबतीत येशूचे अनुकरण करणे अतिशय महत्त्वाचे आहे. (२ तीमथ्य ३:१-५) येशूच्या अनुकरणीय आदर्शाविषयी बायबल म्हणते: ‘पतींनो, तुम्हीहि आपल्या स्त्रियांबरोबर सुज्ञतेने सहवास ठेवा.’ (१ पेत्र ३:७) होय, येशूने ज्याप्रकारे खडतर परिस्थितीला तोंड दिले त्याचप्रकारे वैवाहिक जीवनात निर्माण होणाऱ्‍या समस्यांना पतींनीही सुज्ञतेने तोंड दिले पाहिजे. येशूला ज्याप्रकारच्या परीक्षांना तोंड द्यावे लागले तशा परीक्षांना कदाचित कोणत्याही मानवाला तोंड द्यावे लागले नसेल. पण येशूला माहीत होते की या परीक्षा सैतान, त्याचे दुरात्मे आणि या दुष्ट जगापासून येत होत्या. (योहान १४:३०; इफिसकर ६:१२) येशू कधीही आपल्यावर येणाऱ्‍या परीक्षांमुळे गोंधळून गेला नाही. तसेच वैवाहिक सोबत्यांनीही, वैवाहिक जीवनात काही “हालअपेष्टा” सहन कराव्या लागल्यास गोंधळून जाऊ नये. बायबल इशारा देते की लग्न केल्यास अशाप्रकारच्या हालअपेष्टा अपेक्षितच आहेत.—१ करिंथकर ७:२८.

७, ८. (क) पत्नीसोबत सुज्ञतेने सहवास ठेवण्यात काय समाविष्ट आहे? (ख) पत्नी पतीचा सन्मान मिळवण्यास योग्य का आहे?

बायबल सांगते की पतींनी आपल्या पत्नींशी ‘त्या अधिक नाजूक व्यक्‍ति आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवावा.’ (१ पेत्र ३:७) बायबलमध्ये भाकीत करण्यात आल्याप्रमाणे, आपल्या पत्नीवर कठोरपणे वर्चस्व गाजवण्याऐवजी पतींनी आपल्या पत्नीला सन्मान दिला पाहिजे. तरच ते देवाच्या संमतीची अपेक्षा करू शकतात. (उत्पत्ति ३:१६) पतीने आपल्या पत्नीला आपल्याजवळ असलेल्या एखाद्या अमूल्य वस्तूप्रमाणे लेखले पाहिजे. तिच्यापेक्षा जास्त शारीरिक ताकद आहे म्हणून त्याने कधीही तिला शारीरिक अथवा मानसिक दुःख देऊ नये. उलट त्याने तिच्या भावनांची कदर करून नेहमी तिला आदराने व मोठेपणाचा दर्जा देऊन वागवावे.

पतींनी आपल्या पत्नींचा अशाप्रकारे आदर का केला पाहिजे? बायबल याचे उत्तर देते: “तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे समाईक वतनदार आहा, म्हणून तुम्ही त्यांना मान द्या; म्हणजे तुमच्या प्रार्थनांत व्यत्यय येणार नाही.” (१ पेत्र ३:७) पतींनी हे ओळखले पाहिजे की यहोवा आपली उपासना करणाऱ्‍या पुरुषाला स्त्रियांच्या तुलनेत कोणत्याही प्रकारे वरचढ समजत नाहीत. ज्या स्त्रिया देवाची संमती मिळण्यास योग्य ठरतील त्यांना पुरुषांसारखेच सार्वकालिक जीवनाचे प्रतिफळ मिळेल—काही स्त्रियांना तर स्वर्गातील जीवनाचा विशेषाधिकारही मिळेल. तेथे “पुरुष व स्त्री, हा भेदच नाही.” (गलतीकर ३:२८) तेव्हा, पतींनी हे आठवणीत ठेवले पाहिजे की देवाच्या नजरेत मोलाचे जर काही आहे तर तो आहे एका व्यक्‍तीचा विश्‍वासूपणा. एक व्यक्‍ती स्त्री आहे की पुरुष, पती आहे की पत्नी किंवा एखादे मूल आहे हे देवाच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही.—१ करिंथकर ४:२.

९. (क) पेत्राने सांगितल्यानुसार, पतींनी आपल्या पत्नींना सन्मान का दिला पाहिजे? (ख) येशूने कशाप्रकारे स्त्रियांना सन्मान दिला?

पतीने आपल्या पत्नीशी सन्मानाने वागणे किती महत्त्वाचे आहे हे वरील वचनात प्रेषित पेत्राने शेवटी जे म्हटले त्यावरून अगदी स्पष्टपणे दिसून येते. त्याने म्हटले: “म्हणजे तुमच्या प्रार्थनांत व्यत्यय येणार नाही.” असे घडले तर ते किती नुकसानकारक ठरेल! कालांतराने, कदाचित यहोवा अशा पतीच्या प्रार्थना अजिबातच ऐकणार नाही. प्राचीन काळात देवाच्या आज्ञांकडे दुर्लक्ष करणाऱ्‍या त्याच्या काही सेवकांच्या बाबतीत असेच घडले होते. (विलापगीत ३:४३, ४४) तेव्हा, ख्रिस्ती पुरुष, मग ते विवाहित असोत अथवा विवाह करण्याच्या विचारात असोत, त्या सर्वांनी येशूने स्त्रियांशी कशाप्रकारे आदरपूर्वक व्यवहार केला याकडे लक्ष दिले पाहिजे. येशूने आपल्यासोबत सेवाकार्यात शिष्यांना नेले तेव्हा त्याने स्त्रियांचेही स्वागत केले. तो स्त्रियांशी दयाळूपणे व आदरपूर्वक वागत असे. एकदा तर येशूने एक अत्यंत आश्‍चर्यकारक सत्य सर्वप्रथम स्त्रियांना प्रकट केले आणि त्यांनी जाऊन ते पुरुषांना सांगावे असे त्याने त्यांना सांगितले.—मत्तय २८:१, ८-१०; लूक ८:१-३.

विशेषतः पतींकरता एक उदाहरण

१०, ११. (क) पतींनी येशूच्या उदाहरणाचे परीक्षण करणे इतके महत्त्वाचे का आहे? (ख) पतींनी कशाप्रकारे आपल्या पत्नींबद्दल प्रेम व्यक्‍त करावे?

१० याआधी सांगितल्याप्रमाणे, ख्रिस्ताचा त्याच्या अभिषिक्‍त अनुयायांच्या मंडळीशी जो नातेसंबंध आहे त्याची तुलना बायबलमध्ये, पती पत्नींच्या नातेसंबंधाशी करण्यात आली आहे. अभिषिक्‍तांच्या मंडळीला ख्रिस्ताची “वधू” म्हटले आहे. बायबल म्हणते: “जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पति पत्नीचे मस्तक आहे.” (इफिसकर ५:२३) हे वाचल्यावर पतींना, मस्तक या नात्याने ख्रिस्ताने आपल्या अनुयायांचे कशाप्रकारे नेतृत्त्व केले याचे परीक्षण करण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे. तरच ते येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करू शकतील आणि त्याच्यासारखेच आपल्या पत्नींना मार्गदर्शन देऊ शकतील, त्यांच्यावर प्रेम करू शकतील व त्यांची काळजी वाहू शकतील.

११ बायबल ख्रिश्‍चनांना असा आग्रह करते, “पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली तशी तुम्हीहि आपआपल्या पत्नीवर प्रीति करा, ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले.” (इफिसकर ५:२५) इफिसकरांच्या पुस्तकातील चवथ्या अध्यायात ‘मंडळीला’ ‘ख्रिस्ताचे शरीर’ म्हटले आहे. या लाक्षणिक शरीरात बरेच अवयव आहेत. अर्थात, मंडळीत अनेक स्त्रिया व पुरुष आहेत. आणि हे सर्व सदस्य, किंवा अंग शरीराचे कार्य सुरळीत चालण्याकरता हातभार लावतात. येशू हा “शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे.”—इफिसकर ४:१२; कलस्सैकर १:१८; १ करिंथकर १२:१२, १३, २७.

१२. येशूने आपल्या लाक्षणिक शरीराबद्दल कशाप्रकारे प्रेम व्यक्‍त केले?

१२ येशूने आपल्या लाक्षणिक शरीराबद्दल म्हणजेच ‘मंडळीबद्दल’ कशारितीने प्रेम व्यक्‍त केले? जे या मंडळीचे सदस्य बनणार होते त्यांच्या हिताकरता कार्य करण्याद्वारे आणि अतिशय कोमलतेने त्यांची काळजी वाहण्याद्वारे त्याने आपले प्रेम व्यक्‍त केले. उदाहरणार्थ, एकदा त्याचे शिष्य खूप थकले होते. तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “तुम्ही रानात एकांती चला व थोडा विसावा घ्या.” (मार्क ६:३१) येशूला वधस्तंभावर जिवे मारण्यात आले त्याच्या काही तासांआधी येशूने कायकाय केले त्याविषयीच्या वृत्तान्तात त्याच्या प्रेषितांपैकी एकाने असे लिहिले: “स्वकीयांवर [म्हणजे, त्याच्या लाक्षणिक शरीरातील सदस्यांवर] त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले.” (योहान १३:१) पतींनी आपल्या पत्नींशी कशाप्रकारे वागावे याकरता येशूने खरच किती उत्तम अनुकरणीय उदाहरण पुरवले आहे!

१३. पतींना आपआपल्या पत्नींवर कशारितीने प्रेम करण्याचा आदेश देण्यात आला आहे?

१३ पतींकरता येशूने पुरवलेल्या आदर्शाविषयी पुढे सांगताना प्रेषित पौलाने त्यांना असा आदेश दिला: “पतींनी आपआपली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीति करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीति करितो तो स्वतःवरच प्रीति करितो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही, तर तो त्याचे पालनपोषण करितो, जसे ख्रिस्तहि मंडळीचे पालनपोषण करितो तसे तो करितो.” पौल पुढे म्हणतो, “तुम्हांपैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी.”—इफिसकर ५:२८, २९, ३३.

१४. पती आपल्या अपरिपूर्ण शरीराशी कशाप्रकारे व्यवहार करतो आणि यावरून त्याने आपल्या पत्नीशी कसे वागावे याबद्दल काय समजते?

१४ पौलाच्या शब्दांवर थोडा विचार करा. कोणताही शहाणा माणूस कधी जाणूनबुजून आपल्या शरीराला इजा करेल का? एखादा माणूस पायाला ठेच लागून पडतो तेव्हा ‘तू मला पाडले’ असे म्हणून तो आपल्याच पायाला मारतो का? अर्थातच कोणीही असे करत नाही! पती आपल्या मित्रांसमोर स्वतःचा अपमान करतो का किंवा स्वतःच्या दुर्गुणांबद्दल त्यांना सांगतो का? नाही! तर मग पत्नीच्या हातून एखादी चूक होते तेव्हा त्याने तिच्याशी अपमानास्पदरितीने बोलणे किंवा त्याहीपेक्षा वाईट वागणूक तिला देणे योग्य ठरेल का? पतींनी फक्‍त स्वतःचे हित पाहू नये तर आपल्या पत्नीचाही त्यांनी विचार केला पाहिजे.—१ करिंथकर १०:२४; १३:५.

१५. (क) येशूच्या शिष्यांनी मानवी अपरिपूर्णतेमुळे चुका केल्या तेव्हा येशूने काय केले? (ख) या उदाहरणावरून काय शिकता येते?

१५ येशूच्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्याच्या शिष्यांनी मानवी अपरिपूर्णतेमुळे चुकीची मनोवृत्ती दाखवली तरीसुद्धा त्याने त्यांच्याबद्दल कशाप्रकारे काळजी व्यक्‍त केली ते पाहा. गेथशेमाने बागेत, येशूने शिष्यांना वारंवार विनंती केली होती की त्यांनी प्रार्थना करत राहावे. तरीसुद्धा ते तीन वेळा झोपी गेले. अचानक, सशस्त्र जमावाने त्यांना घेरले. येशूने त्या माणसांना विचारले: “तुम्ही कोणाला शोधिता?” त्यांनी “नासरेथकर येशूला” असे उत्तर दिले तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “मीच तो आहे.” आपल्या मृत्यूची घटका आली आहे हे जाणून तो त्यांना म्हणाला: “तुम्ही मला शोधीत असला तर ह्‍यांना जाऊ द्या.” आपल्या शिष्यांच्या, अर्थात आपल्या लाक्षणिक वधूवर्गातील सदस्यांच्या हिताचा विचार करण्यास येशू कधीही विसरला नाही. त्यांना पळ काढता यावा म्हणून त्याने त्यांच्याकरता मार्ग मोकळा केला. येशूने आपल्या शिष्यांशी कशाप्रकारे व्यवहार केला याचे परीक्षण केल्यास पतींना असे अनेक तत्त्व सापडतील की ज्यांचा उपयोग ते आपल्या पत्नींशी वागताना करू शकतील.—योहान १८:१-९; मार्क १४:३४-३७, ४१.

येशूचे प्रेम केवळ भावनांवर आधारित नव्हते

१६. येशूच्या मार्थेबद्दल कशा भावना होत्या आणि तरीसुद्धा त्याने कशाप्रकारे तिची चूक तिच्या लक्षात आणून दिली?

१६ बायबल म्हणते: “मार्था, तिची बहीण व लाजर ह्‍यांच्यावर येशूची प्रीति होती.” त्यांनी अनेकदा येशूचे आपल्या घरात स्वागत केले. (योहान ११:५) तरीपण, मार्थाने येशूकडून आध्यात्मिक बोध घेण्याकरता वेळ देण्याऐवजी त्याचे आगतस्वागत करण्याकडे जास्त लक्ष दिले तेव्हा त्याने तिची चूक तिच्या लक्षात आणून देण्यास मागेपुढे पाहिले नाही. तो म्हणाला: “मार्थे, मार्थे तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करितेस. परंतु थोडक्याच गोष्टींचे किंबहूना एकच गोष्टीचे अगत्य आहे.” (लूक १०:४१, ४२) अशाप्रकारे प्रेमळपणे बोलल्यामुळे मार्थेलाही तो सल्ला स्वीकारणे कठीण गेले नसेल. त्याचप्रकारे पतींनी आपल्या पत्नींशी दयाळू, प्रेमळ पद्धतीने वागले पाहिजे व त्यांच्याशी बोलताना विचारपूर्वक शब्द निवडले पाहिजेत. अर्थात, त्यांची एखादी चूक दुरुस्त करण्याची गरज असल्यास येशूप्रमाणेच त्यांनी योग्य सल्ला देण्यास कचरू नये.

१७, १८. (क) पेत्राने येशूला कशारितीने रागावले आणि पेत्राचा चुकीचा दृष्टिकोन सुधारणे का महत्त्वाचे होते? (ख) पतीवर कोणती जबाबदारी आहे?

१७ दुसऱ्‍या एका प्रसंगी, येशूने आपल्या शिष्यांना समजावून सांगितले की त्याला जेरूसलेमला जावे लागेल आणि तेथे त्याने “मुख्य याजक व शास्त्री ह्‍यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जिवे मारले जावे व तिसऱ्‍या दिवशी उठविले जावे ह्‍याचे अगत्य आहे.” हे ऐकताच पेत्राने येशूला बाजूला नेऊन जवळजवळ रागावूनच त्याला म्हटले: “प्रभुजी, आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही.” पेत्र केवळ भावनांच्या आहारी जाऊन विचार करत होता. याप्रसंगी त्याची चूक दुरुस्त करणे आवश्‍यक होते. त्यामुळे येशू त्याला म्हणाला: “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा; तू मला अडखळण आहेस. कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टींकडे आहे.”—मत्तय १६:२१-२३.

१८ येशूनेच नुकतीच देवाची इच्छा काय आहे हे स्पष्ट केले होते—ती अशी की त्याला दुःखे सोसावी लागतील व त्याला जिवे मारले जाईल. (स्तोत्र १६:१०; यशया ५३:१२) तेव्हा पेत्राने येशूला रागावणे योग्य नव्हते. म्हणूनच त्याप्रसंगी येशूने पेत्राला कडक शब्दांत खडसावणे आवश्‍यक होते. आणि बरेचदा आपल्या सर्वांना अशाप्रकारच्या कानउघाडणीची गरज पडते. कुटुंबाचा प्रमुख या नात्याने पतीला आपल्या कुटुंबातील सदस्यांची, व आपल्या पत्नीचीही अशाप्रकारे कानउघाडणी करण्याचा अधिकार व जबाबदारी आहे. कडक शब्दांत सल्ला देण्याची गरज असली तरीपण हा सल्ला देताना पतीने दयाळू व प्रेमळपणे बोलले पाहिजे. ज्याप्रकारे, येशूने पेत्राला आपला चुकीचा दृष्टिकोन सुधारण्यास मदत केली त्याचप्रकारे पतींना आपल्या पत्नींच्या बाबतीत करावे लागू शकते. उदाहरणार्थ, शास्त्रवचनात सांगितल्यानुसार स्त्रियांनी संतुलित व मर्यादशील पद्धतीने पेहराव व शृंगार केला पाहिजे. पण या बाबतीत पत्नी शास्त्रवचनांतील तत्त्वांकडे दुर्लक्ष करू लागल्यास पतीला प्रेमळपणे तिचा दृष्टिकोन बदलण्यास मदत करावी लागू शकते.—१ पेत्र ३:३-५.

पतीने धीर धरणे हिताचे आहे

१९, २०. (क) येशूच्या प्रेषितांमध्ये कोणती समस्या निर्माण झाली आणि येशूने ही समस्या कशी हाताळली? (ख) येशूच्या प्रयत्नांना लगेच यश आले का?

१९ पत्नीचे काहीतरी चुकत असल्यास, आपल्या प्रामाणिक प्रयत्नांनी आपण लगेच तिला सुधारू शकतो अशी पतीने अपेक्षा करू नये. येशूला आपल्या प्रेषितांचे चुकीचे दृष्टिकोन बदलण्यास बराच वेळ लागला व बरेच प्रयत्नही करावे लागले. उदाहरणार्थ, शिष्यांमध्ये एकप्रकारची चढाओढ निर्माण झाली होती. येशूच्या सेवाकार्याच्या अगदी शेवटासही शिष्यांनी हीच मनोवृत्ती दाखवली. आपल्यापैकी सर्वात मोठा कोण याविषयी त्यांच्याच चर्चा चालली होती. (मार्क ९:३३-३७; १०:३५-४५) दुसऱ्‍यांदा जेव्हा त्यांच्यात हा वाद उठला त्याच्या काही कालानंतरच येशूने आपले शेवटले वल्हांडणाचे भोजन एकांतात त्यांच्यासोबत घेण्याचे ठरवले. त्याप्रसंगी, नेहमीच्या रितीनुसार इतरांचे पाय धुण्याचे जे काहीसे हलक्या दर्जाचे काम होते ते करण्यास त्यांच्यापैकी कोणीही पुढाकार घेतला नाही. येशूने स्वतः त्यांचे पाय धुतले. मग तो त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे.”—योहान १३:२-१५.

२० जे पती येशूसारखे नम्र मनोवृत्तीने वागतात त्यांच्या पत्नी त्यांच्यासोबत सहकार्य करण्यास व त्यांना पाठिंबा देण्यास स्वेच्छेने तयार होण्याची जास्त शक्यता आहे. पण याकरता धीर धरण्याची गरज आहे. त्याच वल्हांडणाच्या रात्री काही वेळानंतर प्रेषितांमध्ये पुन्हा एकदा आपल्यापैकी मोठा कोण याविषयी वाद झाला. (लूक २२:२४) स्वभाव व मनोवृत्ती बदलण्यास बरेचदा पुष्कळ वेळ लागतो आणि हे बदल एकदम नाही क्रमाक्रमाने होतात. तरीपण प्रेषितांच्या बाबतीत घडले त्याप्रमाणे, कालांतराने का होईना पण चांगले बदल घडून येतात तेव्हा ते किती आनंददायक ठरते!

२१. आजच्या काळातील बिकट आव्हाने लक्षात घेता, पतींना काय आठवणीत ठेवण्याचा व काय करण्याचा सल्ला देण्यात आला आहे?

२१ आज विवाह संस्था कधी नव्हे इतक्या बिकट आव्हानांना तोंड देत आहे. बरेचजण विवाहाच्या वेळी घेतलेल्या शपथांना क्षुल्लक लेखतात. म्हणूनच पतींनो, विवाहाची मूळ स्थापना कशी झाली याचा विचार करा. विवाहाची स्थापना ही आपल्या प्रेमळ देवाने, यहोवाने केलेली आहे हे कधीही विसरू नका. त्याने आपला पुत्र येशू यास केवळ खंडणीचे बलिदान देणारा तारणकर्ता म्हणून आपल्याकरता दिले नाही तर पतींनी अनुकरण करावे असा आदर्श म्हणूनही दिले.—मत्तय २०:२८; योहान ३:२९; १ पेत्र २:२१. (w०७ २/१५)

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• विवाहाची स्थापना कशी झाली हे जाणून घेणे का महत्त्वाचे आहे?

• पतींना आपल्या पत्नीबद्दल कशाप्रकारे प्रेम व्यक्‍त करण्याचे प्रोत्साहन देण्यात आले आहे?

• मस्तक या नात्याने पतींनी ख्रिस्ताचे अनुकरण कसे करावे हे येशूने त्याच्या शिष्यांशी ज्याप्रकारे व्यवहार केला त्यावरून कशाप्रकारे दिसून येते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१० पानांवरील चित्र]

येशू स्त्रियांशी कशाप्रकारे वागला याचे पतींनी परीक्षण का केले पाहिजे?

[१२ पानांवरील चित्र]

आपल्या पत्नीला सल्ला देताना पतीने दयाळूपणे व विचारपूर्वक शब्दांची निवड करून बोलले पाहिजे