व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तरुणांनो, तुमच्या वागण्याचा तुमच्या आईवडिलांच्या मनावर परिणाम होतो

तरुणांनो, तुमच्या वागण्याचा तुमच्या आईवडिलांच्या मनावर परिणाम होतो

तरुणांनो, तुमच्या वागण्याचा तुमच्या आईवडिलांच्या मनावर परिणाम होतो

वयोवृद्ध प्रेषित योहानाने लिहिले: “माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसऱ्‍या कशानेहि होत नाही.” (३ योहान ४) बायबलच्या या वचनात, योहानाच्या ख्रिस्ती शिष्यांना त्याची मुले म्हणण्यात आले आहे. पण तरीसुद्धा, योहानाने व्यक्‍त केलेल्या भावना कोणतेही देवभीरू पालक चांगल्याप्रकारे समजू शकतात. आईवडिलांचा ज्याप्रमाणे त्यांच्या अपत्याच्या जीवनावर प्रभाव असतो त्याचप्रमाणे मुले देखील आपल्या आईवडिलांच्या जीवनावर बराच प्रभाव पाडू शकतात.

मुलांच्या वागणुकीचा त्यांच्या पालकांवर किती गहिरा प्रभाव पडू शकतो हे ओळखूनच इस्राएलचा राजा शलमोन याने असे लिहिले: “मुलगा शहाणा तर बाप सुखी, मुलगा मूर्ख तर आई दुःखी.” (नीतिसूत्रे १०:१) तेव्हा सर्व मुलांनी, जी आता प्रौढ झाली आहेत त्यांनी देखील, याचा विचार केला पाहिजे की आपल्या वागण्याचा आपल्या आई व वडिलांवर कसा परिणाम होईल. असा विचार करणे उचित का आहे?

तुमच्या देवभीरू पालकांनी तुम्हाला किती प्रेमाने लहानाचे मोठे केले आहे याचा विचार करा! तुमच्या जन्माच्या आधीपासूनच त्यांनी तुमच्याविषयी काळजी करण्यास व तुमच्याकरता प्रार्थना करण्यास सुरुवात केली होती. तुमचा जन्म झाल्यानंतर तुमच्या आई व वडिलांनीही तुमच्यावर वात्सल्याचा वर्षाव केला. आईवडील या नात्याने एक अद्‌भूत पण गंभीर जबाबदारी आपल्यावर सोपवल्याबद्दल नक्कीच त्यांनी देवाचे आभार मानले असतील. एक चिमुकला असहाय्य जीव त्यांच्या ताब्यात देण्यात आला होता, त्याची काळजी वाहण्यासाठी, त्याला मोठे करण्यासाठी. आणि यहोवाचे उपासक या नात्याने त्यांनी या जबाबादारीकडे गांभिर्याने पाहिले.

तुमचे आईवडील खरे ख्रिस्ती असल्यामुळे त्यांनी तुम्हाला वाढवताना भरवशालायक मार्गदर्शनाकरता बायबलची व बायबल-आधारित साहित्याची मदत घेतली. तसेच अनुभवी आईवडिलांचा सल्ला त्यांनी घेतला. यासोबतच ते प्रार्थनेत देवाजवळ आपल्या काळज्या व विवंचना व्यक्‍त करत राहिले. (शास्ते १३:८) तुम्ही जसजसे मोठे झाला तसतशी तुमच्या अंगी असलेल्या चांगल्या गुणांची त्यांना जाणीव होऊ लागली. पण तुमच्या व्यक्‍तिमत्त्वातले दोषही त्यांच्यापासून लपलेले नव्हते. (ईयोब १:५) तुम्ही किशोरवयात पदार्पण केले तेव्हा त्यांच्यापुढे नवी आव्हाने येऊ लागली. कधीकधी तुम्ही अतिशय विद्रोहीपणे वागला असाल. तेव्हा तुमच्या आईवडिलांनी यहोवाला अधिकच आवर्जून प्रार्थना केल्या असतील, अधिक वाचन केले असेल आणि आपल्या स्वर्गीय पित्या यहोवाची तुम्ही उपासना करत राहावी म्हणून तुम्हाला कशी मदत करता येईल याविषयी सतत विचार केला असेल.

मुले मोठी झाली तरी आईवडील हे आईवडीलच राहतात. तुम्ही कितीही मोठे झाला तरी ते तुमच्या शारीरिक, मानसिक, भावनिक व आध्यात्मिक कल्याणाबद्दल काळजी करतच राहतात. पण तुमच्याविषयी काळजी करतानाच पालकांना याचीही जाणीव असते की प्रत्येक व्यक्‍तीप्रमाणे तुम्हालाही इच्छास्वातंत्र्य आहे. आणि त्याअर्थी, तुमचे जीवन पुढे चालून कसे असेल याची हमी देता येत नाही. जीवनात कोणता मार्ग निवडायचा हा निर्णय शेवटी तुम्हाला स्वतःलाच घ्यायचा असतो.

तेव्हा, दुसऱ्‍या कशाहीपेक्षा, आपली मुले “सत्यात चालतात” हे ऐकून जर आईवडिलांना “आनंद होतो” तर मग साहजिकच याच्या उलट विधानही तितकेच खरे नाही का? हो, मूर्खपणे वागणारी मुले आपल्या आईवडिलांना अतीव दुःख देतात. शलमोनाने म्हटले: “मूर्ख मुलगा आपल्या बापाला दुःख देतो आणि आपल्या जन्मदात्रीला क्लेश देतो.” (नीतिसूत्रे १७:२५) आपले मूल खऱ्‍या देवाची उपासना सोडून देते तेव्हा आईवडिलांना अकथनीय दुःख होते!

तुमच्या कुटुंबीयांवर आणि इतरांवरही तुमच्या वागण्याचा बराच प्रभाव पडतो, हे स्पष्टच आहे. विशेषतः तुमच्या आईवडिलांच्या मनावर तुमच्या वागणुकीचा सर्वात जास्त परिणाम होतो. तुम्ही देवाकडे व त्याच्या तत्त्वांकडे पाठ फिरवली तर तुमचे आईवडील दुःखी होतील. पण त्याऐवजी, जर तुम्ही विश्‍वासू राहिलात व यहोवाला आज्ञाधारक राहिलात तर ते आनंदित होतील. आपल्या आईवडिलांना आनंदित करण्याचा निश्‍चय करा! ज्यांनी तुम्हाला लहानाचे मोठे केले, कितीतरी वाईट गोष्टींपासून तुमचे संरक्षण केले, आणि तुमच्यावर भरभरून प्रेम केले त्यांना तुम्ही यापेक्षा मोलवान असे काय देऊ शकाल? (w०७ ५/१)