देवाच्या वचनाने दाखवलेल्या मार्गात चाला
देवाच्या वचनाने दाखवलेल्या मार्गात चाला
“तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाश आहे.”—स्तोत्र ११९:१०५.
१, २. बहुतेक मानव शांती व समाधानाचा मार्ग शोधण्यास अपयशी ठरले आहेत याचे कारण काय?
तुम्हाला असा एखादा प्रसंग आठवतो का, जेव्हा तुम्हाला विशिष्ट ठिकाणी पोचण्यासाठी कसे जायचे हे एखाद्या व्यक्तीला विचारावे लागले होते? कदाचित, ज्या ठिकाणी तुम्हाला जायचे होते, त्या ठिकाणाच्या तुम्ही अगदी जवळ होता, पण शेवटल्या दोनचार वळणांत तुम्ही गोंधळला असाल. किंवा असेही असू शकते, की तुम्ही अगदीच चुकीच्या ठिकाणी जाऊन पोचला असाल आणि आता तुम्हाला अगदी उलट दिशेने जावे लागणार होते. यांपैकी कोणत्याही परिस्थितीत, ज्या व्यक्तीला त्या परिसराची पूर्ण माहिती आहे अशा व्यक्तीने दाखवलेल्या मार्गाने जाणेच शहाणपणाचे ठरणार नाही का? अशी व्यक्ती तुम्हाला तुमच्या इच्छित स्थानी पोचण्यास साहाय्य करू शकते.
२ हजारो वर्षांपासून, मानवजातीने देवाच्या मदतीशिवाय जीवनाचा प्रवास करण्याचा प्रयत्न केला आहे. पण स्वतःहून मार्ग काढण्यास, अपरिपूर्ण मानव अगदीच असमर्थ आहेत. खरी शांती व समाधानाचा मार्ग त्यांना अद्यापही गवसलेला नाही. पण याचे कारण काय आहे? २,५०० वर्षांपेक्षा जास्त काळाआधी संदेष्टा यिर्मया याने म्हटले: “मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्मया १०:२३) जो कोणी आपल्यापेक्षा ज्ञानी व्यक्तीची मदत न घेता पावले टाकण्याचा प्रयत्न करतो त्याच्या पदरी निराशाच पडेल. आज मानवजातीला मार्गदर्शनाची गरज आहे यात काहीही शंका नाही!
३. मानवजातीला मार्गदर्शन पुरवण्याकरता यहोवा देवच सर्वात योग्य का आहे आणि तो कोणते अभिवचन देतो?
३ यहोवा देव हे मार्गदर्शन पुरवण्याकरता सर्वात योग्य आहे. का? कारण मानवांची जडणघडण इतर कोणाहीपेक्षा तो अधिक चांगल्याप्रकारे समजू शकतो. मनुष्यजात कशाप्रकारे पथभ्रष्ट झाली याची त्याला पूर्ण कल्पना आहे. तसेच तिला परत मार्गावर येण्याकरता काय करण्याची आवश्यकता आहे हे देखील त्याला माहीत आहे. शिवाय, आपला निर्माणकर्ता असल्याकारणाने आपल्याकरता सर्वात उत्तम मार्ग कोणता हे नेहमी तोच सांगू शकतो. (यशया ४८:१७) तेव्हा स्तोत्र ३२:८ यात दिलेल्या अभिवचनावर आपण पूर्ण भरवसा ठेवू शकतो: “मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टि तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन.” यहोवाच सर्वात उत्तम मार्गदर्शन पुरवतो यात कोणतीही शंका नाही. पण तो कशाप्रकारे आपले मार्गदर्शन करतो?
४, ५. देवाची वचने आपले मार्गदर्शन कसे करू शकतात?
४ एका स्तोत्रकर्त्याने यहोवाला प्रार्थनेत असे म्हटले: “तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाश आहे.” (स्तोत्र ११९:१०५) बायबलमध्ये आपल्याला देवाची वचने व सूचना सापडतात व त्या आपल्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यावर मात करण्यास आपली मदत करू शकतात. आपण बायबल वाचतो आणि त्यातील मार्गदर्शनाचे पालन करतो तेव्हा यशया ३०:२१ यातील शब्दांची सत्यता आपण वैयक्तिकरित्या अनुभवतो. तेथे म्हटले आहे: “हाच मार्ग आहे; याने चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल.”
५ पण स्तोत्र ११९:१०५ यात देवाच्या वचनाच्या दोन कार्यांचा उल्लेख करण्यात आला आहे जे एकमेकांशी संबंधित आहेत. एकतर ते आपल्या पावलांकरता दिव्यासारखे आहे. दैनंदिन जीवनात आपल्यासमोर कठीण प्रसंग येतात तेव्हा आपण बायबलमधील तत्त्वांच्या अनुषंगाने पावले टाकली पाहिजेत, जेणेकरून आपल्याला सुज्ञ निर्णय घेता येतील आणि या जगातील मोहपाश टाळता येतील. दुसरी गोष्ट म्हणजे, देवाच्या सूचना आपल्या सबंध मार्गाला प्रज्ज्वलित करतात. त्या आपल्याला असे निर्णय घेण्यास मदत करतात की जे देवाने भाकीत केलेल्या नंदनवनात सर्वकाळ जगण्याच्या आपल्या आशेशी सुसंगत आहेत. आपल्यासमोरचा मार्ग देवाच्या वचनाने प्रज्ज्वलित झाल्यामुळे आपल्याला विशिष्ट निर्णय घेतल्याने चांगले परिणाम घडून येतील की वाईट हे ओळखण्यास साहाय्य मिळते. (रोमकर १४:२१; १ तीमथ्य ६:९; प्रकटीकरण २२:१२) बायबलमध्ये सापडणारी देवाची वचने आपल्या पावलांकरता दिव्यासारखी आणि आपल्या मार्गावर प्रकाशासारखी कशी ठरू शकतात याचे आता आपण आणखीन बारकाईने परीक्षण करूया.
“माझ्या पावलांकरता दिव्यासारखे”
६. देवाची वचने कशाप्रकारच्या परिस्थितीत आपल्या पावलांकरता दिव्यासारखी ठरू शकतात?
६ दररोज आपण निर्णय घेतो. काही निर्णय अगदी क्षुल्लक असतात, पण कधीकधी आपल्यासमोर असे प्रसंग येतात की जे आपल्या नैतिकतेची, आपल्या प्रामाणिकतेची किंवा आपल्या तटस्थतेची परीक्षा घेतात. अशाप्रकारच्या परीक्षांना यशस्वीरित्या तोंड देण्याकरता आपल्या “ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव” झालेला असला पाहिजे. (इब्री लोकांस ५:१४) देवाच्या वचनातून अचूक ज्ञान मिळवण्याद्वारे आणि त्यातील तत्त्वे समजून घेण्याद्वारे आपण आपल्या विवेकाला प्रशिक्षण देत असतो जेणेकरून आपल्याला असे निर्णय घेता येतील की ज्यांमुळे यहोवाला संतोष वाटेल.—नीतिसूत्रे ३:२१.
७. एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीला विश्वासात नसलेल्या सहकर्मचाऱ्यांसोबत परिचय वाढवण्याचा मोह होऊ शकतो अशा परिस्थितीचे वर्णन करा.
७ एक उदाहरण घ्या. तुम्ही यहोवाचे मन आनंदित करू इच्छिणारी एक प्रौढ व्यक्ती आहात का? (नीतिसूत्रे २७:११) तुम्ही असे करू इच्छिता हे कौतुकास्पद आहे. पण कल्पना करा की तुमच्या सहकर्मचाऱ्यांपैकी काहीजण तुम्हाला त्यांच्यासोबत एखाद्या खेळाच्या सामन्याला येण्याकरता तिकीट देतात. कामाच्या ठिकाणी त्यांना तुमचा सहवास आवडतो आणि म्हणून ते इतर वेळी तुमच्यासोबत ओळख वाढवू इच्छितात. तुम्हाला मनापासून असे वाटत असेल की हे लोक वाईट नाहीत. किंबहुना, ते देखील जीवनात काही चांगल्या तत्त्वांचे पालन करतात. अशा परिस्थितीत तुम्ही काय करणार? त्यांचे निमंत्रण स्वीकारण्यात काही धोका आहे का? देवाचे वचन तुम्हाला या बाबतीत चांगला निर्णय घेण्यास कशाप्रकारे मदत करू शकेल?
८. इतरांसोबत परिचय वाढवण्याच्या बाबतीत शास्त्रवचनांतील कोणती तत्त्वे आपल्याला तर्कवाद करण्यास मदत करतात?
१ करिंथकर १५:३३ यात दिलेले तत्त्व असू शकते: “कुसंगतीने नीति बिघडते.” या तत्त्वानुसार तुम्ही विश्वासात नसलेल्या सगळ्याच लोकांपासून फटकून राहिले पाहिजे का? शास्त्रवचनांनुसार, या प्रश्नाचे उत्तर, नाही असे आहे. कारण प्रेषित पौलाने स्वतः ‘सर्वांबद्दल’ अर्थात विश्वासात नसलेल्या लोकांबद्दलही प्रेम व्यक्त केले. (१ करिंथकर ९:२२) आपण इतरांबद्दल, जे आपले विश्वास मानत नाहीत त्यांच्याबद्दलही आस्था व्यक्त करावी हाच तर ख्रिस्ती विश्वासाचा गाभा आहे. (रोमकर १०:१३-१५) ज्यांना आपल्या मदतीची गरज आहे अशा लोकांपासून आपण फटकून राहिलो तर मग ‘सर्वांचे बरे करावे’ या सल्ल्याचे आपण पालन कसे काय करू शकू?—गलतीकर ६:१०.
८ शास्त्रवचनांतील काही तत्त्वांवर विचार करा. आपल्या मनात येणारे पहिले तत्त्व कदाचित९. बायबलमधील कोणता सल्ला आपल्याला, आपल्या सहकर्मचाऱ्यासोबतच्या नातेसंबंधात संतुलन बाळगण्यास मदत करतो?
९ पण एखाद्या सहकर्मचाऱ्यासोबत मैत्रिपूर्ण व्यवहार करणे आणि त्या व्यक्तीचा जवळचा मित्र असणे यात अर्थातच बराच फरक आहे. यासंबंधाने शास्त्रवचनांतील आणखी एक तत्त्व लक्षात घेण्याजोगे आहे. प्रेषित पौलाने ख्रिश्चनांना अशी ताकीद दिली: “तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांसोबत संबंध जोडून विजोड होऊ नका.” (२ करिंथकर ६:१४) “संबंध जोडून विजोड होऊ नका” या वाक्यांशाचा काय अर्थ आहे? काही अनुवादांत हा वाक्यांश पुढीलप्रमाणे घातलेला आहे: “जोडी बनवू नका,” “समान दर्जाने कार्य करण्याचा प्रयत्न करू नका,” किंवा “अनुचित संबंध जोडू नका.” सहकर्मचाऱ्यासोबतचा संबंध नेमका केव्हा अनुचित बनतो? मर्यादेची रेषा पार करून तो विजोड होण्याच्या स्थितीला केव्हा पोचतो? देवाचे वचन, बायबल या बाबतीत तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकते.
१०. (क) येशूने आपले सोबती कशाप्रकारे निवडले? (ख) आपल्या संगतीविषयी सुज्ञ निर्णय घेण्यास कोणते प्रश्न एखाद्या व्यक्तीला मदत करू शकतात?
१० येशूच्या उदाहरणाचा विचार करा. मानवांची निर्मिती करण्यात आली तेव्हापासून त्याला त्यांच्याविषयी प्रेम आहे. (नीतिसूत्रे ८:३१) पृथ्वीवर असताना, त्याने आपल्या अनुयायांसोबत जवळचा नातेसंबंध जोडला. (योहान १३:१) धार्मिक गैरसमज बाळगणाऱ्या एका मनुष्यावर तर त्याने “प्रीति केली.” (मार्क १०:१७-२२) पण जवळचे सोबती निवडताना मात्र येशूने अगदी सुस्पष्ट मर्यादांचे पालन केले. त्याच्या पित्याच्या इच्छेनुसार करण्याची प्रामाणिक आस्था नसलेल्या लोकांशी त्याने कोणत्याही प्रकारे जवळीक साधली नाही. एकदा येशूने म्हटले: “मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहा.” (योहान १५:१४) तुमच्या सहकर्मचाऱ्यांपैकी एखाद्याशी कदाचित तुमचे चांगले जमत असेल. पण स्वतःला हे प्रश्न विचारा: ‘ही व्यक्ती येशूने सांगितले ते करण्यास तयार आहे का? येशूने आपल्याला ज्याची उपासना करण्यास सांगितले त्या यहोवा देवाबद्दल जाणून घेण्याची त्याला किंवा तिला इच्छा आहे का? ख्रिस्ती या नात्याने मी ज्या नैतिक दर्जांचे पालन करतो त्यांचे तो किंवा ती देखील पालन करते का?’ (मत्तय ४:१०) तुमच्या सहकर्मचाऱ्यांसोबत तुम्ही याविषयी बोलता, आणि बायबलच्या दर्जांना जडून राहण्याचा अट्टहास करता तेव्हा या प्रश्नांची उत्तरे आपोआपच तुमच्यासमोर स्पष्ट होतील.
११. देवाची वचने आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या परिस्थितींत मार्ग दाखवू शकतात?
११ इतरही अनेक गोष्टी आहेत ज्यांच्याबाबतीत देवाची वचने आपल्या पावलांकरता दिव्यासारखी ठरतात. उदाहरणार्थ, नोकरीची अत्यंत गरज असलेल्या एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीला नव्या नोकरीची ऑफर दिली जाते. पण ही नोकरी स्वीकारल्यास त्याला बरेच तास काम करावे लागेल, बऱ्याच सभा चुकवाव्या लागतील आणि खऱ्या उपासनेशी संबंधित इतर कार्यांतही सहभागी होता येणार नाही. (स्तोत्र ३७:२५) दुसऱ्या एखाद्या ख्रिस्ती बांधवाला कदाचित बायबलच्या तत्त्वांच्या स्पष्टपणे विरोधात असलेला एखादा चित्रपट किंवा टीव्हीवरचा कार्यक्रम पाहण्याचा मोह होत असेल. (इफिसकर ४:१७-१९) किंवा एखाद्या ख्रिश्चनाला इतर बांधवांच्या अपरिपूर्णतांमुळे लगेच रागावण्याची सवय असेल. (कलस्सैकर ३:१३) या सर्व परिस्थितींत आपण देवाच्या वचनाला आपल्या पावलांकरता दिवा होऊ दिले पाहिजे. खरे पाहता, बायबलच्या तत्त्वांचे पालन केल्याने आपण जीवनातल्या कोणत्याही आव्हानाला तोंड देऊ शकतो. देवाचे वचन, “सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्याकरिता उपयोगी आहे.”—२ तीमथ्य ३:१६.
“माझ्या मार्गावर प्रकाश”
१२. देवाची वचने कोणत्या अर्थाने आपल्या मार्गावर प्रकाश आहेत?
१२ स्तोत्र ११९:१०५ यात असेही म्हटले आहे की देवाची वचने आपल्या मार्गावर प्रकाश आहेत अर्थात ती आपल्या पुढच्या मार्गास प्रज्ज्वलित करतात. भविष्यासंबंधी आपण अंधारात नाही कारण बायबल आजच्या जगातल्या दुःखदायक परिस्थितीचे कारण स्पष्ट करते आणि पुढे काय होणार आहे हे देखील सांगते. त्यावरून आपल्याला हे समजले आहे की आज आपण या जगाच्या ‘शेवटल्या काळात’ जगत आहोत. (२ तीमथ्य ३:१-५) पुढे काय होणार आहे हे माहीत असल्यामुळे त्याचा आज आपल्या जीवनशैलीवर गहिरा प्रभाव पडला पाहिजे. प्रेषित पेत्राने लिहिले: “ही सर्व अशी लयास जाणारी आहेत म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?”—२ पेत्र ३:११, १२.
१३. आपण शेवटल्या काळात राहात आहोत या जाणीवेने आपल्या विचारसरणीवर आणि जीवनशैलीवर कशाप्रकारे प्रभाव पडला पाहिजे?
१३ आपल्या विचारसरणीवरून व आपल्या जीवनशैलीवरून हे दिसून आले पाहिजे की “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत” याची आपल्याला पूर्ण खात्री आहे. (१ योहान २:१७) बायबलमधील सल्ल्याचे पालन केल्याने आपल्याला भविष्यातील आपल्या ध्येयांसंबंधी सुज्ञ निर्णय घेण्यास साहाय्य मिळेल. उदाहरणार्थ, येशूने म्हटले: “तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.” (मत्तय ६:३३) बरेच तरुण-तरुणी पूर्ण वेळेच्या सेवेत उतरून, येशूच्या या शब्दांवर त्यांना पूर्ण भरवसा असल्याचे दाखवत आहेत ही किती कौतुकास्पद गोष्ट आहे! इतरजण, आणि काही तर सबंध कुटुंबे राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या देशांत राहण्यास गेली आहेत.
१४. एका ख्रिस्ती कुटुंबाने आपले सेवाकार्य कशारितीने वाढवले आहे?
१४ एका ख्रिस्ती कुटुंबाचे उदाहरण पाहा. या कुटुंबात चार सदस्य आहेत आणि ते चौघेही अमेरिकेतून ५०,००० लोकसंख्या असलेल्या एका शहरातील मंडळीसोबत सेवा करण्यास डोमिनिकन रिपब्लिक या देशात राहायला गेले. या मंडळीत १३० राज्य प्रचारक आहेत. पण १२ एप्रिल, २००६ रोजी ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकविधीला जवळजवळ १,३०० लोक उपस्थित होते! या भागात कापणीसाठी शेते इतकी “पांढरी” आहेत की येथे आल्यावर फक्त पाच महिन्यांच्या आत या कुटुंबातील वडील, आई, मुलगा आणि मुलगी या सर्वांजवळ एकूण ३० बायबल अभ्यास होते. (योहान ४:३५) वडील सांगतात: “या मंडळीत ३० भाऊ बहिणी आहेत जे इथल्या मंडळीला मदत करण्यासाठी इतर ठिकाणांहून आले आहेत. २० तर अमेरिकेहून आलेले आहेत आणि बाकीचे बहामा, कॅनडा, इटली, न्यूझीलंड व स्पेन येथून आले आहेत. सेवाकार्यात सहभाग घेण्यासाठी अतिशय उत्सुक असलेल्या या बांधवांमुळे स्थानिक मंडळीतल्या बांधवांतही नवा उत्साह संचारला आहे.”
१५. राज्याच्या कार्यांना जीवनात प्राधान्य दिल्यामुळे तुम्हाला कोणते आशीर्वाद अनुभवण्यास मिळाले आहेत?
१५ अर्थात, सगळेच जण जास्त गरज असलेल्या ठिकाणी राहायला जाण्याच्या स्थितीत नसतात. पण जे आहेत, किंवा जे या कार्याकरता पुढे येण्यासाठी आपल्या परिस्थितीत थोडेफार बदल करू शकतात त्यांना असे केल्याने निश्चितच अनेक आशीर्वाद मिळतील. आणि तुम्ही कोठेही सेवा करत असला तरी, आपल्या पूर्ण शक्तीनिशी यहोवाची सेवा केल्याने जो आनंद मिळतो तो निश्चितच तुम्हीही अनुभवू शकता. जर तुम्ही राज्याच्या कार्यांना जीवनात प्राधान्य दिले, तर यहोवाची ही प्रतिज्ञा आहे की तो ‘आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षील.’—मलाखी ३:१०.
यहोवाच्या मार्गदर्शनापासून फायदा घ्या
१६. देवाच्या वचनांचे मार्गदर्शन स्वीकारल्याने आपल्याला कशाप्रकारे फायदा होतो?
१६ आपण पाहिल्याप्रमाणे यहोवाची वचने, एकमेकांशी संबंधित असलेल्या दोन मार्गांनी आपले मार्गदर्शन करतात. ते आपल्या पावलांकरता दिव्यासारखे आहेत. आपल्याला निर्णय घ्यावे लागतात तेव्हा ती आपल्या योग्य दिशेने पाऊल टाकण्यास मदत करतात. आणि देवाचे वचन आपल्या मार्गास प्रज्ज्वलित करते; भविष्यात काय घडणार आहे हे स्पष्टपणे पाहण्यास आपल्याला साहाय्य करतात. आणि त्यामुळे आपल्याला पेत्राच्या या आदेशाचे पालन करणे शक्य होते: “तुम्ही आपली मनरूपी कंबर बांधा व सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळी तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा.”—१ पेत्र १:१३.
१७. बायबलचा अभ्यास केल्याने आपल्याला देवाच्या मार्गदर्शनाचे पालन करण्यास कशारितीने साहाय्य मिळेल?
१७ यहोवा आपल्याला मार्गदर्शन पुरवतो यात शंका नाही. पण प्रश्न हा आहे की तुम्ही ते स्वीकाराल का? यहोवा आपल्याला कोणत्या मार्गाने जाण्यास सांगत आहे हे समजून घेण्याकरता दररोज बायबलचा निदान काही भाग वाचण्याचा निर्धार करा. वाचलेल्या माहितीवर मनन करा. निरनिराळ्या गोष्टींसंबंधी यहोवाची काय इच्छा आहे हे समजून घेण्याचा यत्न करा. आणि त्या माहितीचा आपल्या जीवनात कोणकोणत्या परिस्थितींत उपयोग करता येईल यावर विचार करा. (१ तीमथ्य ४:१५) मग आपल्या विचारशक्तीचा उपयोग करून या माहितीच्या आधारावर निर्णय घ्या.
१८. आपण देवाच्या वचनाचे मार्गदर्शन स्वीकारतो तेव्हा आपल्याला कोणते आशीर्वाद लाभतात?
१८ देवाच्या वचनातील तत्त्वांना आपण वाव दिल्यास, ते आपल्याला ज्ञानाचा प्रकाश देतील आणि निर्णय घेताना कोणता मार्ग योग्य आहे हे आपल्याला दाखवतील. आपण ही खात्री बाळगू शकतो की यहोवाने बायबलमध्ये जतन केलेली त्याची वचने “अज्ञान्यांस ज्ञानी” करतात. (स्तोत्र १९:७, पं.र.भा.) आपण बायबलचे मार्गदर्शन स्वीकारतो तेव्हा आपल्याला शुद्ध विवेकच नव्हे तर यहोवाला संतोषविल्याचे समाधानही लाभते. (१ तीमथ्य १:१८, १९) जर आपण देवाच्या वचनांना दररोज आपल्या पावलांना मार्गदर्शित करू दिले तर यहोवा आपल्याला प्रतिफळाच्या रूपात सर्वात मोठा आशीर्वाद अर्थात, सार्वकालिक जीवन देईल.—योहान १७:३. (w०७ ५/१)
तुम्हाला आठवते का?
• यहोवा देवाला आपल्या पावलांना मार्गदर्शित करू देणे इतके महत्त्वाचे का आहे?
• देवाची वचने कशाप्रकारे आपल्या पावलांकरता दिव्यासारखी होऊ शकतात?
• देवाची वचने कशाप्रकारे आपल्या मार्गावर प्रकाश ठरू शकतात?
• बायबलचा अभ्यास केल्याने आपल्याला देवाच्या मार्गदर्शनाचे पालन करण्यास कशाप्रकारे साहाय्य मिळू शकते?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१९ पानांवरील चित्र]
विश्वासात नसलेल्या व्यक्तीसोबतची संगती केव्हा अनुचित ठरते?
[२० पानांवरील चित्र]
येशूचे जवळचे सोबती यहोवाची इच्छा पूर्ण करण्यास उत्सुक असणारेच होते
[२१ पानांवरील चित्रे]
आपण राज्याच्या कार्यांना प्राधान्य देत आहोत हे आपल्या जीवनशैलीवरून दिसून येते का?