यहोवा न्यायप्रिय आहे
यहोवा न्यायप्रिय आहे
“मी यहोवा न्यायाची आवड धरतो.”—यशया ६१:८, पं.र.भा.
१, २. (क) “न्याय” व “अन्याय” या शब्दांचा काय अर्थ होतो? (ख) यहोवाबद्दल व त्याच्या न्यायीपणाबद्दल बायबल काय म्हणते?
न्यायाची व्याख्या “निःपक्षपाती, रास्त असण्याचा गुण, नैतिकदृष्ट्या जे योग्य व नेक त्यानुसार वागणे” अशी केली जाते. अन्याय म्हणजे पक्षपाती, पूर्वग्रहदूषित, दुष्ट असणे, व निर्दोष व्यक्तीला ईजा करणे.
२ जवळजवळ ३,५०० वर्षांपूर्वी मोशेने सबंध विश्वाचा सार्वभौम यहोवा याच्याविषयी असे लिहिले: “त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत; तो विश्वसनीय देव आहे; त्याच्या ठायी अनीति नाही.” (अनुवाद ३२:४) सात शतकांनंतर देवाने यशयाला हे शब्द लिहिण्यास प्रेरित केले: “मी यहोवा न्यायाची आवड धरतो.” (यशया ६१:८) मग पहिल्या शतकात पौलाने असे लिहिले: “देवाच्या ठायी अन्याय आहे का? कधीच नाही!” (रोमकर ९:१४) आणि त्याच शतकात पेत्राने असे उद्गार काढले: ‘देव पक्षपाती नाही, तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.’ (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५) खरोखरच “यहोवा न्यायाची आवड धरतो.”—स्तोत्र ३७:२८; मलाखी ३:६.
अन्यायाचे राज्य
३. पृथ्वीवर अन्यायाला सुरुवात कशी झाली?
३ आज न्यायीपणाचा सर्वत्र अभाव आहे. समाजातल्या कोणत्याही थरात, आपल्या कामाच्या ठिकाणी, शाळेत, सरकारी अधिकाऱ्यांशी व्यवहार करताना आणि इतर प्रकारे, अगदी आपल्या स्वतःच्या कुटुंबातही आपण अन्यायाला बळी पडू शकतो. अर्थात, अशाप्रकारची अन्यायी कृत्ये नवी नाहीत. दियाबल सैतान बनलेल्या एका विद्रोही स्वर्गदूताच्या सांगण्यावरून आपले पहिले आईवडील देवाविरुद्ध बंड करून अनाचारी झाले, तेव्हापासूनच अन्यायाला सुरुवात झाली. यहोवाने दिलेल्या इच्छास्वातंत्र्याच्या अद्भुत देणगीचा गैरफायदा उचलून आदाम, हव्वा व सैतानाने अन्यायच केला होता. त्यांच्या अयोग्य कृतींमुळे सबंध मानवजातीवर अकथनीय दुःख व मृत्यू ओढवला.—उत्पत्ति ३:१-६; रोमकर ५:१२; इब्री लोकांस २:१४.
४. अन्याय केव्हापासून मानव समाजात अस्तित्वात आहे?
४ एदेन बागेतील विद्रोहानंतरच्या जवळजवळ ६,००० वर्षांदरम्यान मानवी समाज अन्यायाने पोखरून निघाला आहे. आणि हे अपेक्षितच आहे कारण सैतान या जगाचे दैवत आहे. (२ करिंथकर ४:४) तो लबाड आणि लबाडीचा बाप असून यहोवाचा निंदक व विरोधक आहे. (योहान ८:४४) त्याने पूर्वीपासूनच घोर अन्यायाची कृत्ये केली आहेत. उदाहरणार्थ, नोहाच्या काळातील जलप्रलयाआधी, थोड्याफार प्रमाणात का होईना पण सैतानाच्याच प्रभावामुळे देवाला असे दिसून आले की “पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे, त्याच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात.” (उत्पत्ति ६:५) ही परिस्थिती येशूच्या काळातही अस्तित्वात होती. म्हणूनच त्याने म्हटले: “ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे.” प्रत्येक दिवशी सहन करावा लागणारा अन्याय व त्यासारख्या इतर दुःखद समस्यांविषयी तो असे म्हणाला. (मत्तय ६:३४) बायबल अगदी अचूकपणे सांगते, की “सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगीत आहे.”—रोमकर ८:२२.
५. पूर्वी कधीही घडला नव्हता इतका अन्याय आपल्या काळात का घडत आहे?
५ अशारितीने, घोर अन्यायाची दुष्कृत्ये सबंध मानव इतिहासात घडत आली आहेत. आता तर परिस्थिती आणखीनच बिघडली आहे. का? कारण सध्याचे अधार्मिक जग बऱ्याच दशकांपासून ‘शेवटल्या काळात’ असून, जसजसा त्याचा अंत जवळ येतो तसतशी परिस्थिती अधिकच “कठीण” होत चालली आहे. या काळात माणसे “स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, . . . उपकार न २ तीमथ्य ३:१-५) यांसारखे दुर्गुण सर्व प्रकारच्या अन्यायास कारणीभूत ठरतात.
स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली” अशी होतील, असे बायबलमध्ये भाकीत करण्यात आले होते. (६, ७. आधुनिक काळात मानवांना कोणत्या मोठ्या अन्यायांना तोंड द्यावे लागले आहे?
६ मागच्या शंभर वर्षांत तर अभूतपूर्व पातळीवर अन्यायाची कृत्ये घडली आहेत. या काळादरम्यान सर्वात जास्त युद्धे लढली गेली आहेत. उदाहरणार्थ, काही इतिहासकारांचा असा अंदाज आहे की फक्त दुसऱ्या महायुद्धातच मृतांची संख्या जवळजवळ ५० ते ६० लाखांच्या घरात गेली. यांपैकी बहुतेकजण सैनिक नव्हे तर नागरिक होते. निर्दोष स्त्रीपुरुष व मुले. ते युद्ध संपल्यानंतर आजपर्यंत निरनिराळ्या संघर्षांत कोट्यवधी लोकांचा बळी गेला आहे आणि पुन्हा एकदा यांपैकी बहुतेकजण नागरिकच होते. सैतानच अशा अन्यायांना आज बढावा देत आहे. यहोवा लवकरच त्याला पूर्णपणे पराभूत करणार आहे हे माहीत असल्यामुळे तो सध्या अत्यंत संतप्त आहे. बायबलमध्ये असे भाकीत करण्यात आले होते: “सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हाकडे आला आहे.”—प्रकटीकरण १२:१२.
७ दर वर्षी सबंध जगात अब्जावधी डॉलर्स सैन्यावर व शस्त्रांवर खर्च केले जातात. पण दुसरीकडे पाहिल्यास, कोट्यवधी लोकांना जीवनाच्या मूलभूत गरजाही भागवता येत नाहीत. विचार करा, तो सर्व पैसा जर युद्धांऐवजी शांतीपूर्ण उद्देशांसाठी वापरण्यात आला, तर कितीतरी लोकांचे भले होऊ शकेल. शंभर कोटी लोकांना पोटभर अन्न मिळत नाही आणि इतरजण मात्र सुखात लोळत आहेत. संयुक्त राष्ट्राच्या एका माहितीसूत्रानुसार, उपासमारीमुळे वर्षाला जवळजवळ पन्नास लाख मुले दगावतात. हा किती घोर अन्याय आहे! शिवाय, गर्भपातामुळे ज्यांचा नाहक बळी जातो त्या निष्पाप बालकांचा विचार करा. काही अंदाजांनुसार दर वर्षी सबंध जगात ४ ते ६ कोटी गर्भपात केले जातात! खरोखर, किती भयंकर अन्याय!
८. मानवजातीला खरा न्याय कसा काय मिळेल?
२ तीमथ्य ३:१३) अन्याय, आज आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनला आहे आणि कोणीही हा अन्याय नाहीसा करू शकत नाही. फक्त न्यायप्रिय देव, यहोवाच त्याला काढून टाकण्यास समर्थ आहे. फक्त तोच सैतानाला, त्याच्या दुरात्म्यांना व दुष्ट मानवांना नाहीसे करेल.—यिर्मया १०:२३, २४.
८ मानवजातीला ग्रासणाऱ्या मोठाल्या समस्यांवर मानवी शासकांजवळ कोणतेही उपाय नाहीत आणि भविष्यातही ही परिस्थिती मानवांच्या प्रयत्नांनी कधीच बदलणार नाही. देवाच्या वचनात असे भाकीत करण्यात आले होते की आपल्या काळात “दुष्ट व भोंदू माणसे ही दुसऱ्यांस फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील.” (काळजी वाटणे रास्त
९, १०. आसाफ निराश का झाला?
९ देवाने आजपर्यंत मानवांच्या कारभारात हस्तक्षेप करून खरा न्याय व धार्मिकता का बरे स्थापन केली नाही असा प्रश्न गतकाळात बायबलच्या काही लेखकांनाही पडला होता. बायबल काळांत राहणाऱ्या एका मनुष्याचे उदाहरण घ्या. स्तोत्र ७३ याच्या उपरिलेखनात आसाफ हे नाव दिलेले आहे. हे नाव कदाचित राजा दाविदाच्या कारकीर्दीत हयात असलेल्या एखाद्या प्रमुख लेवी संगीतकाराला; किंवा आसाफ ज्याचा कुलपिता होता अशा संगीतकारांच्या एका सबंध घराण्याला सूचित करत असावे. आसाफ व त्याच्या वंशजांनी अनेक स्तोत्रांच्या चाली रचल्या होत्या व त्यांचा वापर सार्वजनिक उपासनेत केला जात असे. तरीसुद्धा, हे स्तोत्र रचणाऱ्या आसाफच्या जीवनात एक क्षण असा आला की जेव्हा तो आध्यात्मिक दृष्टीने अगदी निराश झाला. दुष्ट मनुष्यांची भरभराट होते आणि ते अगदी सुखाने जीवन जगतात; त्यांच्या दुष्कर्मांचे कोणतेही परिणाम त्यांना भोगावे लागत नाहीत, असे आसाफच्या पाहण्यात आले.
१० आसाफ लिहितो: “दुर्जनांचा उत्कर्ष पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो. त्यांना मरणयातना नसतात, स्तोत्र ७३:२-८) पण कालांतराने, या बायबल लेखकाला जाणीव झाली की त्याचा हा नकारात्मक दृष्टिकोन अयोग्य होता. (स्तोत्र ७३:१५, १६) स्तोत्रकर्त्याने आपली विचारसरणी बदलण्याचा प्रयत्न केला. पण दुष्ट लोक दुष्कर्म करूनही कसे काय सुटतात आणि चांगल्या मनाच्या लोकांना मात्र दुःख का सहन करावे लागते हे त्याला पूर्णपणे समजू शकले नाही.
ते शरीराने धडधाकट व पुष्ट असतात; इतर मनुष्याप्रमाणे त्यांना क्लेश होत नसतात. इतर लोकांप्रमाणे त्यांना पीडा होत नसतात.” (११. स्तोत्रकर्त्या आसाफाला काय समजले?
११ नंतर मात्र देवाच्या या विश्वासू सेवकाला दुष्टांच्या भविष्यात काय राखून ठेवले आहे हे समजले. एक न एक दिवशी यहोवा सर्व काही सुरळीत करेल हे त्याला कळले. (स्तोत्र ७३:१७-१९) दाविदाने लिहिले: “परमेश्वराची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर, म्हणजे तो तुझी उन्नति करून तुला पृथ्वीचे वतन देईल; दुर्जनांचा उच्छेद झालेला तू आपल्या डोळ्यांनी पाहशील.”—स्तोत्र ३७:९, ११, ३४.
१२. (क) दुष्टाई व अन्यायाच्या संबंधाने यहोवाचा काय उद्देश आहे? (ख) अन्यायाच्या समस्येवरील उपायाबद्दल तुम्हाला कसे वाटते?
१२ या पृथ्वीवरून दुष्टाई आणि सर्व प्रकारचा अन्याय पूर्णपणे काढून टाकण्याचा यहोवाचा उद्देश आहे. आपल्या नियुक्त वेळी तो असे अवश्य करेल, यात काहीही शंका नाही. या गोष्टीची एकनिष्ठ ख्रिश्चनांनीही स्वतःला वेळोवेळी आठवण करून दिली पाहिजे. जे यहोवाच्या इच्छेच्या विरोधात कार्य करतात त्यांना यहोवा नाहीसे करेल आणि जे त्याच्या इच्छेनुरूप वागतात त्यांना तो प्रतिफळ देईल. “त्याचे नेत्र मानवास पाहतात, त्याच्या पापण्या त्यांस आजमावितात. परमेश्वर नीतिमानाला कसास लावितो; त्याला दुर्जनाचा व आततायी माणसाचा वीट येतो. दुर्जनांवर तो पाशावर पाश टाकील. अग्नि, गंधक व दाहक वारा . . . त्यांच्या वाट्यास येईल. कारण परमेश्वर न्यायी आहे; त्याला नीतिमत्त्व प्रिय आहे.”—स्तोत्र ११:४-७.
एक न्यायपूर्ण नवे जग
१३, १४. नव्या जगात धार्मिकता व न्याय असेल असे आपण का म्हणू शकतो?
१३ सैतानाच्या नियंत्रणात असलेल्या अन्यायी जगाचा यहोवाने नाश केल्यानंतर तो एक वैभवी नवे जग अस्तित्वात आणेल. या नव्या जगावर देवाच्या स्वर्गीय राज्याचे नियंत्रण असेल. याच राज्यासाठी प्रार्थना करायला येशूने आपल्या शिष्यांना शिकवले होते. दुष्टाई व अन्यायाऐवजी तेथे धार्मिकता व न्याय असेल. “तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छेप्रमाणे होवो,” या प्रार्थनेचे त्या नव्या जगात आपल्याला पूर्णार्थाने उत्तर मिळालेले असेल.—मत्तय ६:१०.
१४ देवाच्या राज्यात कशाप्रकारच्या शासनाची आपण अपेक्षा करू शकतो याविषयी बायबल आपल्याला सांगते. आजच्या जगात सर्व प्रामाणिक मनाचे लोक ज्याप्रकारच्या शासनाची अपेक्षा करतात त्याचप्रकारचे ते शासन असेल. स्तोत्र १४५:१६ तेव्हा पूर्णपणे खरे ठरेल: “तू [यहोवा देव] आपली मूठ उघडून प्राणिमात्राची इच्छा पुरी करितोस.” शिवाय, यशया ३२:१ म्हणते: “पाहा! राजा [ख्रिस्त येशू स्वर्गातून] धर्माने राज्य करील, त्याचे सरदार [ख्रिस्ताचे पृथ्वीवरील प्रतिनिधी] न्यायाने सत्ता चालवितील.” राजा येशू ख्रिस्ताविषयी यशया ९:७ असे भाकीत करते: “त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार; तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवील आणि तेथून पुढे ते सर्वकाळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.” तुम्ही स्वतःला या शासनाखाली जीवनाचा आनंद उपभोगताना पाहू शकता का?
१५. यहोवा नव्या जगात मानवजातीकरता काय करेल?
१५ देवाच्या नव्या जगात, उपदेशक ४:१ यात आढळतात त्याप्रकारचे उद्गार आपल्याला कधीही काढावे लागणार नाहीत: “ह्या भूतलावर चालू असलेल्या सर्व जुलुमांचे मी फिरून निरीक्षण केले; तो पाहा, गांजलेल्यांचे अश्रु गळत आहेत, पण त्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही, त्यांजवर जुलूम करणाऱ्यांच्या ठायी बळ आहे, पण गांजलेल्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही.” आपल्या अपरिपूर्ण बुद्धीच्या साहाय्याने ते धार्मिकतेचे नवे जग खरोखर कसे असेल याची कल्पना करणे कठीण आहे. तेव्हा कोणत्याही प्रकारच्या वाईट गोष्टी नसतील. दररोज केवळ चांगल्याच गोष्टी घडतील. आज जे काही बिघडलेल्या स्थितीत आहे, ते सर्वकाही यहोवा ठीक करेल. आपण कधी कल्पनाही केली नसेल अशाप्रकारे तो सर्वकाही व्यवस्थित करेल. म्हणूनच यहोवा देवाने प्रेषित पेत्राला असे लिहिण्यास प्रेरित केले: “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो!”—२ पेत्र ३:१३.
१६. “नवे आकाश” कोणत्या अर्थाने स्थापन झाले आहे आणि ‘नव्या पृथ्वीच्या’ स्थापनेची तयारी आज कशाप्रकारे केली जात आहे?
१६ खरे पाहता, “नवे आकाश,” अर्थात ख्रिस्ताच्या नियंत्रणाखाली देवाचे स्वर्गीय सरकार स्वर्गात आधीच स्थापन झाले आहे. आणि जे त्या ‘नव्या पृथ्वीचे’ म्हणजे योग्य मनोवृत्तीच्या लोकांच्या एका नव्या समाजाचे पहिले सदस्य असतील त्यांना या शेवटल्या काळात गोळा केले जात आहे. आज या समाजात, पृथ्वीवरील २३५ देशांतील जवळजवळ सत्तर लाख सदस्य आहेत व त्यांच्या जवळजवळ १,००,००० मंडळ्या आहेत. हे लाखो जण यहोवाचे धार्मिक व न्यायी मार्ग आत्मसात करत आहेत. आणि यामुळे त्यांच्यामध्ये ख्रिस्ती प्रीतीने निष्पन्न होणारी एकता आहे. ही एकता या जगाच्या इतिहासातील सर्वात उल्लेखनीय व सर्वात जास्त काळ टिकून राहिलेली एकता आहे. सैतानाच्या जगातील लोकांनी कधीही अनुभवली नाही अशाप्रकारची ही एकता आहे. आणि हे प्रेम व ही एकता देवाच्या धार्मिक व न्यायपूर्ण नव्या जगातील अद्भुत परिस्थितीची केवळ एक पूर्वझलक आहे.—यशया २:२-४; योहान १३:३४, ३५; कलस्सैकर ३:१४.
सैतानाचा हल्ला निष्फळ ठरेल
१७. यहोवाच्या लोकांवर सैतानाचा शेवटला हल्ला निष्फळ ठरेल असे आपण खात्रीने का म्हणू शकतो?
१७ लवकरच, सैतान व त्याचे अनुयायी यहोवाच्या उपासकांचे अस्तित्व मिटवून टाकण्याच्या इराद्याने त्यांच्यावर हल्ला करतील. (यहेज्केल ३८:१४-२३) येशूने म्हटले होते की “जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही, व पुढे कधीहि येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल.” हा हल्ला याच मोठ्या संकटाचा एक भाग असेल. (मत्तय २४:२१) सैतानाचा हा हल्ला यशस्वी ठरेल का? नाही. देवाचे वचन आपल्याला हे आश्वासन देते: “परमेश्वराला न्याय प्रिय आहे; तो आपल्या भक्तांस सोडीत नाही; त्यांचे रक्षण सर्वकाळ होते; पण दुर्जनांच्या संततीचा उच्छेद होतो. नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.”—स्तोत्र ३७:२८, २९.
१८. (क) सैतान देवाच्या लोकांवर हल्ला करेल तेव्हा देवाची काय प्रतिक्रिया असेल? (ख) न्यायाचा कशाप्रकारे विजय होईल हे दाखवणाऱ्या बायबल आधारित माहितीची उजळणी केल्यामुळे तुम्हाला कशाप्रकारे फायदा झाला आहे?
१८ सैतान व त्याच्या सैन्याने यहोवाच्या सेवकांवर केलेला हल्ला हा खरे तर यहोवाचाच अपमान असेल आणि तो हा अपमान खपवून घेणार नाही. यहोवाने जखऱ्या संदेष्ट्याद्वारे असे भाकीत केले: “जो कोणी तुम्हास स्पर्श करतो तो माझ्या डोळ्याच्या बुब्बुळालाच स्पर्श करतो.” (जखऱ्या २:८, NW) कोणीतरी जणू यहोवाच्या डोळ्यात बोट घालत असल्यासारखे हे असेल. यहोवा लगेच प्रतिक्रिया दाखवेल व त्याच्या लोकांवर हल्ला करणाऱ्यांना नष्ट करेल. यहोवाचे सेवक हे पृथ्वीवर राहत असलेले सर्वात प्रेमळ, एकजूट, शांतीप्रिय, व कायद्याचे पालन करणारे लोक आहेत. त्यामुळे त्यांच्यावर असा हल्ला होणे हा सरासर अन्याय असेल. ‘न्यायाची आवड धरणारा’ हे खपवून घेणार नाही. तो आपल्या लोकांच्या वतीने लढेल व त्यांच्या शत्रूंना कायमचे नष्ट करेल. न्यायाचा विजय होईल आणि जे एकाच खऱ्या देवाची उपासना करतात त्यांचे तारण होईल. आपल्या निकट भविष्यात खरोखर किती अद्भुत, रोमांचक घटना घडणार आहेत!—नीतिसूत्रे २:२१, २२. (w०७ ८/१५)
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• अन्याय, इतका का बोकाळला आहे?
• पृथ्वीवरील अन्याय यहोवा कशाप्रकारे मिटवून टाकेल?
• न्यायाच्या विजयाबद्दल या अभ्यासात तुम्हाला कोणता मुद्दा विशेष आवडला?
[अभ्यासाचे प्रश्न]
[९ पानांवरील चित्र]
जलप्रलयाआधी पृथ्वी दुष्टाईने भरली होती आणि या ‘शेवटल्या काळातही’ तीच स्थिती आहे
[१० पानांवरील चित्र]
देवाच्या नव्या जगात दुष्टाईऐवजी न्याय व धार्मिकता असेल