अर्थपूर्ण उद्देश शोधणे
अर्थपूर्ण उद्देश शोधणे
“प्रत्येक प्राणी परमेशाचे स्तवन करो.”—स्तोत्र १५०:६.
१. जीवनात अर्थपूर्ण उद्देश शोधण्यासाठी एका व्यक्तीने कोणकोणते प्रयत्न केले त्यांचे वर्णन करा.
“जनसेवेसाठी मला माझं जीवन वाहायचं होतं, त्यामुळे मी मेडिसीनचा अभ्यास केला. तसेच डॉक्टर बनल्यानं मिळणारी प्रतिष्ठा आणि आर्थिक लाभ यांमुळे मी आनंदी होईन, असं मला वाटलं,” असे कोरियात वाढलेल्या संग जीनने आठवून सांगितले. * “पण, लोकांना जितकी मदत लागते त्यापेक्षा कितीतरी कमी मदत एक डॉक्टर लोकांना देऊ शकतो, याची जेव्हा मला जाणीव झाली तेव्हा मी निराश झालो. मग मी, चित्रकलेकडे वळालो. पण माझ्या कलाकृतींचा इतरांना फार कमी लाभ झाला व मी किती स्वार्थी आहे असं मला वाटू लागलं. मग मी शिक्षक झालो. लवकरच मला जाणवलं, की मी केवळ ज्ञान देऊ शकतो, पण खरा आनंद कसा मिळवायचा याबद्दलचं मार्गदर्शन देऊ शकत नाही.” अनेक लोकांप्रमाणे संग जीन हा जीवनात अर्थपूर्ण उद्देश शोधत होता.
२. (क) जीवनात खरा उद्देश मिळवण्याचा काय अर्थ होतो? (ख) आपल्याला या पृथ्वीवर ठेवण्यामागे निर्माणकर्त्याच्या मनात नक्कीच एक चांगला उद्देश असावा हे आपल्याला कसे समजते?
२ जीवनात खरा उद्देश मिळवणे याचा अर्थ, जिवंत राहण्याकरता काहीतरी कारण असणे, जीवनात एक सुस्पष्ट ध्येय असणे आणि आपल्या प्रयत्नांसाठी एक केंद्रबिंदू असणे, असा होतो. मानवांना खरोखरच असा अर्थपूर्ण उद्देश मिळू शकतो का? हो, मिळू शकतो! ज्याअर्थी आपल्याला, बुद्धी, विवेक आणि तर्क करण्याची शक्ती बहाल करण्यात आली आहे त्याअर्थी, आपल्याला या पृथ्वीवर ठेवण्यामागे निर्माणकर्त्याच्या मनात नक्कीच एक चांगला उद्देश असावा. यास्तव, निर्माणकर्त्याच्या उद्देशानुरुप जीवन जगल्यानेच आपण जीवनातला खरा उद्देश प्राप्त करून तो पूर्ण करू शकतो.
३. मानवाला निर्माण करण्यामागे देवाच्या उद्देशात कोणत्या गोष्टींचा समावेश आहे?
३ आपल्याला निर्माण करण्यामागे निर्माणकर्त्याच्या उद्देशात अनेक गोष्टी अंतर्भूत आहेत, असे बायबलमध्ये म्हटले आहे. उदाहरणार्थ, आपल्याला ज्या अद्भुतरीतीने निर्माण करण्यात आले आहे तो देवाच्या निःस्वार्थ प्रेमाचा एक पुरावा आहे. (स्तोत्र ४०:५; १३९:१४) तेव्हा, देवाच्या उद्देशांनुरुप जगण्याचा अर्थ, देवाप्रमाणे इतरांवर निःस्वार्थ प्रेम करणे. (१ योहान ४:७-११) त्याचा अर्थ, देवाच्या सूचनांचे पालन करणे असाही होतो; कारण या सूचना आपल्याला देवाच्या प्रेमळ उद्देशांनुरुप जगण्यास मदत करतात.—उपदेशक १२:१३; १ योहान ५:३.
४. (क) जीवनात खरा उद्देश मिळण्याकरता कशाची गरज आहे? (ख) जीवनातला सर्वश्रेष्ठ उद्देश कोणता आहे जो आपण मिळवू शकतो?
४ देवाचा असाही उद्देश होता, की मानवांनी एकमेकांबरोबर आणि इतर सर्व सृष्टीबरोबर सुखाने व शांतीने नांदावे. (उत्पत्ति १:२६; २:१५) परंतु, आनंदी होण्याकरता, सुरक्षित वाटण्याकरता आणि मानसिक शांती मिळण्याकरता कशाची गरज आहे? आनंदी व सुरक्षित वाटण्याकरता जसे एका मुलाला आपल्या पालकांची उपस्थिती जाणवली पाहिजे त्याचप्रकारे, जीवनातील खरा अर्थ व उद्देश मिळण्याकरता आपल्या स्वर्गीय पित्याबरोबर आपले घनिष्ठ संबंध असावयास हवे. (इब्री लोकांस १२:९) देव आपल्याला त्याच्या जवळ जाण्याची परवानगी देऊन व आपल्या प्रार्थना ऐकून असा संबंध ठेवणे शक्य करतो. (याकोब ४:८; १ योहान ५:१४, १५) आपण जर विश्वासाने ‘देवाबरोबर चाललो’ आणि त्याचे मित्र बनलो तर आपण आपल्या स्वर्गीय पित्याला संतुष्ट करू शकतो आणि त्याची स्तुती करू शकतो. (उत्पत्ति ६:९; नीतिसूत्रे २३:१५, १६; याकोब २:२३) हा जीवनातला सर्वश्रेष्ठ उद्देश आहे जो आपण मिळवू शकतो. स्तोत्रकर्त्याने लिहिले: “प्रत्येक प्राणी परमेशाचे स्तवन करो.”—स्तोत्र १५०:६.
तुमच्या जीवनातला उद्देश काय आहे?
५. भौतिक गोष्टींना आपल्या जीवनात प्रथमस्थानी ठेवणे योग्य का नाही?
५ आपल्याबद्दल देवाचे जे उद्देश आहेत त्यापैकी एक आहे, की आपण स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची चांगली काळजी घ्यावी. यांमध्ये आपल्या शारीरिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही गरजा पूर्ण करणे समाविष्ट आहे. परंतु यासाठी संतुलनाची आवश्यकता आहे; नाहीतर, भौतिक गोष्टींची चिंता करता करता आपण ज्या अधिक महत्त्वाच्या आध्यात्मिक गोष्टी आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करू. (मत्तय ४:४; ६:३३) दुःखाची गोष्ट म्हणजे, अनेक लोकांनी फक्त आर्थिक गोष्टी मिळवण्यावरच आपले जीवन केंद्रित केले आहे. तरीपण, आपल्या सर्व गरजा भौतिक गोष्टींद्वारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही. आशियातील धनाढ्य लोकांच्या घेतलेल्या सर्व्हेतून दिसून आले, की बहुतेकांना “सामाजिक प्रतिष्ठा आणि धनसंपत्तीने मिळणारी साध्यतेची जाणीव असूनही, असुरक्षित व चिंता वाटत होती.”—उपदेशक ५:११.
६. धनसंपत्तीच्या मागे पळणाऱ्यांना येशूने कोणता सल्ला दिला?
६ येशू ‘द्रव्याच्या मोहाविषयी’ बोलला. (मार्क ४:१९) भौतिक संपत्ती ही एखाद्याला मोहीत कशी करते अथवा एखाद्याला कशाप्रकारे फसवते? पुष्कळ लोकांना वाटते, की भौतिक गोष्टींमुळे ते सुखी होतील, पण ते होत नाहीत. “ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ति होत नाही,” असे सुज्ञ राजा शलमोनाने लिहिले. (उपदेशक ५:१०) परंतु, भौतिक गोष्टी मिळवता मिळवता देवाची देखील पूर्ण मनाने सेवा करणे शक्य आहे का? नाही. येशूने म्हटले: “कोणीहि दोन धन्याची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीति करील; अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही.” येशूने आपल्या अनुयायांना, पृथ्वीवरील भौतिक गोष्टी नव्हे तर ‘स्वर्गात संपत्ती’ साठवण्यास आर्जवले. स्वर्गात संपत्ती साठवण्याचा अर्थ, जो ‘तुमच्या गरजा काय आहेत हे तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच जाणून आहे,’ त्या देवापुढे एक चांगले नाव कमवणे.—मत्तय ६:८, १९-२५.
७. आपण ‘खरे जीवन बळकट’ कसे धरू शकतो?
७ आपला सहकारी तीमथ्य याला पत्र लिहिताना प्रेषित पौलाने याबाबतीत काहीसा कडक सल्ला दिला. त्याने तीमथ्याला सांगितले: “धनवानांस निक्षून सांग की, तुम्ही . . . चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपल्या उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी; . . . परोपकारी व दानशूर असावे; जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल, असा साठा स्वतःसाठी करावा.”—१ तीमथ्य ६:१७-१९.
“खरे जीवन” म्हणजे नेमके काय?
८. (क) पुष्कळ लोक धनदौलत व प्रतिष्ठा मिळवण्याच्या मागे का लागले आहेत? (ख) असे लोक काय समजण्यास चुकतात?
८ पुष्कळ लोक असा विचार करतात, की समाधानकारक जीवन म्हणजे, चैनीचे व सुखविलासी जीवन. एका आशियाई बातमी नियतकालिकात असे म्हटले होते: “जे लोक चित्रपट व टीव्ही पाहतात ते पाहत असलेल्या गोष्टींची आकांक्षा बाळगू लागतात किंवा स्वप्न पाहू लागतात.” पुष्कळ लोक, धनदौलत व प्रतिष्ठा मिळवण्यालाच आपल्या जीवनाचा उद्देश बनवतात. या गोष्टी मिळवताना ते आपले तारुण्य, आरोग्य, कौटुंबिक जीवन आणि आध्यात्मिक मूल्ये यांचा त्याग करतात. चित्रपटांत किंवा टीव्हीवर दिसणारे सुख-चैनीचे जीवन हे दुसरे तिसरे काहीही नसून ‘जगाचा आत्मा’ अर्थात पृथ्वीच्या बहुसंख्य मानवजातीच्या विचारशक्तीला प्रभावित करणारी व आपल्यासाठी असलेल्या देवाच्या उद्देशाच्या विरोधात कार्य करण्यास त्यांना प्रवृत्त करणारी प्रचलित विचारशैली आहे, असा फार कमी लोक थांबून विचार करतात. (१ करिंथकर २:१२; इफिसकर २:२) म्हणूनच तर आज इतके लोक दुःखी आहेत!—नीतिसूत्रे १८:११; २३:४, ५.
९. मानव कधीही काय करण्यास यशस्वी होणार नाहीत, व का?
९ उपासमार, रोगराई आणि अन्याय यांचा समूळ नाश करण्याकरता इतरांच्या हितासाठी निःस्वार्थपणे झटणाऱ्यांबद्दल काय? त्यांच्या कौतुकास्पद व निःस्वार्थ प्रयत्नांचा अनेक लोकांना फायदा होतो. पण, त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी ते या संपूर्ण व्यवस्थीकरणाला न्याय्य व उत्तम बनवू शकणार नाहीत. का नाही? कारण, “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे” अर्थात सैतानाला वश झाले आहे आणि हे जग चांगले व्हावे अशी सैतानाची मुळीच इच्छा नाही.—१ योहान ५:१९.
१०. विश्वासू लोक ‘खऱ्या जीवनाचा’ आनंद केव्हा लुटतील?
१० एखाद्या व्यक्तीला सद्य जगाशिवाय दुसरी आशा नसणे ही किती दुःखाची गोष्ट आहे! प्रेषित पौलाने लिहिले: “आपण ह्या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसांपेक्षा आपण लाचार आहो.” हेच जीवन सर्वकाही आहे, असा जे लोक विचार करतात त्यांची “चला, आपण खाऊ, पिऊ कारण उद्या मरावयाचे आहे,” अशी मनोवृत्ती असते. (१ करिंथकर १५:१९, ३२) पण भविष्यात “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो.” (२ पेत्र ३:१३) त्यावेळी ख्रिस्ती ‘खऱ्या जीवनाचा’ आनंद लुटतील; स्वर्गातील अथवा पृथ्वीवरील देवाच्या राज्य सरकारातील प्रेमळ शासनात परिपूर्ण अवस्थेत ‘युगानुयुगाचे जीवन’ उपभोगतील.—१ तीमथ्य ६:१२.
११. देवाची इच्छा पूर्ण करण्याला आपण आपल्या जीवनातील अर्थपूर्ण उद्देश का बनवला पाहिजे?
११ केवळ देवाच्या राज्यालाच, मानवजातीच्या सर्व समस्यांचे निरसन करण्यात पूर्णपणे यश मिळेल. यास्तव, देवाच्या राज्याला पाठींबा देऊन देवाची इच्छा पूर्ण करणे हाच, आपल्या जीवनातील सर्वात अर्थपूर्ण उद्देश असला पाहिजे. (योहान ४:३४) आपण जेव्हा देवाच्या राज्याच्या प्रचार कार्यात भाग घेतो तेव्हा आपण आपल्या स्वर्गीय पित्याबरोबर नातेसंबंध जोडू शकतो. जीवनात हाच उद्देश असलेल्या कोट्यवधी आध्यात्मिक प्रवृत्तीच्या बंधूभगिनींबरोबर सेवा करण्याचा आनंदही आपल्याला मिळू शकतो.
उचित त्याग करणे
१२. सद्याच्या व्यवस्थीकरणातील जीवन आणि “खरे जीवन” यांच्यातील फरक सांगा.
१२ सद्याचे “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत,” असे बायबल म्हणते. सैतानाच्या जगाचा कोणताही भाग, ज्यात प्रतिष्ठा आणि धनदौलत यांचाही समावेश होतो, त्या नाशापासून वाचणार नाही. फक्त, “देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ” राहील. (१ योहान २:१५-१७) देवाच्या राज्यातील सार्वकालिक जीवन अर्थात “खरे जीवन” हे जगातील चंचल धनासारखे, क्षणभंगुर गौरवासारखे व पोकळ आनंदासारखे नाही तर ते चिरकालिक आहे. आणि ते मिळवण्यासाठी आपण आता अनेक त्याग करत असलो तरी, आपल्याला त्यांचे फळ मिळेल. पण आपण जे त्याग करतो ते उचित त्याग असले पाहिजेत.
१३. एका जोडप्याने उचित त्याग कसे केले?
१३ हेन्री आणि सूझॅन यांच्या उदाहरणाचा विचार करा. देवाच्या अभिवचनांवर त्यांचा असा पूर्ण विश्वास आहे, की जो कोणी राज्याला आपल्या जीवनात प्रथम स्थान देतो त्याला देव निश्चित मदत करतो. (मत्तय ६:३३) त्यामुळे, महागडे घर घेण्यासाठी दोघेही पतीपत्नी नोकरी करण्याऐवजी त्यांनी एका साध्याशा घरात राहण्याचे ठरवले आहे जेणेकरून आपल्या दोन मुलींबरोबर त्यांनाही राज्य प्रचार कार्यात आणि इतर ख्रिस्ती कार्यात आपला जादा वेळ खर्च करता येईल. (इब्री लोकांस १३:१५, १६) हेन्री आणि सूझॅनने असे का ठरवले हे त्यांच्या सद्हेतू बाळगणाऱ्या एका मैत्रिणीला समजले नाही. ती सूझॅनला म्हणाली: “अगं, तुम्हाला जर एखादं चांगलं घर हवं असेल, तर तुम्हाला थोडेफार त्याग करावे लागतील!” पण हेन्री आणि सूझॅनने हे जाणले होते, की यहोवाला प्रथम स्थान दिल्याने “आताच्या व पुढच्याहि जीवनाचे अभिवचन” मिळते. (१ तीमथ्य ४:८; तीत २:१२) हेन्री आणि सूझॅनच्या दोन्ही मुली मोठ्या होऊन पूर्ण वेळेच्या आवेशी सुवार्तिक बनल्या. कुटुंब या नात्याने त्यांना काहीही गमावल्याची खंत नाही; उलट, “खरे जीवन” साध्य करण्याला आपल्या जीवनाचा उद्देश बनवून त्यांना बराच लाभ मिळाला आहे, असे त्यांना वाटते.—फिलिप्पैकर ३:८; १ तीमथ्य ६:६-८.
‘या जगाचा पूर्णपणे उपयोग’ करू नका
१४. जीवनातील खऱ्या उद्देशापासून आपले लक्ष दुसरीकडे भरकटल्यामुळे कोणत्या दुःखद परिणामांना आपल्याला तोंड द्यावे लागू शकते?
१४ परंतु, आपण जर आपला खरा उद्देश विसरून ‘खऱ्या जीवनावरील’ आपली पकड ढीली केली तर त्यात खरा धोका आहे. आपण “संसाराच्या चिंता, धन व विषयसुख ह्यात” वाहवत जाण्याचा धोका आहे. (लूक ८:१४) भौतिक गोष्टी मिळवण्याची हाव आणि “संसाराच्या चिंता” यांमुळे आपण या व्यवस्थीकरणात गुरफटून जाऊ. (लूक २१:३४) आज, श्रीमंत बनण्याचे लोकांना वेडच लागले आहे आणि दुःखाची गोष्ट म्हणजे आपल्यातील काहींवर याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे ते “विश्वासापासून बहकले आहेत; आणि त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.” एवढेच नव्हे तर, यहोवाबरोबरील अमूल्य नातेसंबंध त्यांनी गमावला आहे. ‘युगानुयुगाच्या जीवनाला बळकट न धरल्याची’ किती मोठी किंमत यांना मोजावी लागत आहे.—१ तीमथ्य ६:९, १०, १२; नीतिसूत्रे २८:२०.
१५. ‘या जगाचा पूर्णपणे उपयोग’ न केल्यामुळे एका कुटुंबाला कोणते फायदे झाले आहेत?
१५ “जे ह्या जगाचा उपयोग करितात” त्यांना पौलाने असा सल्ला दिला, की “त्यांनी त्याचा उपयोग पूर्णपणे करीत नसल्यासारखे असावे.” (१ करिंथकर ७:३१) कीथ आणि बॉनीने या सल्ल्याकडे लक्ष दिले. कीथ आठवून सांगतात: “दंतशास्त्र महाविद्यालयाचे शिक्षण पूर्ण होण्याच्या बेतात असताना मी एक यहोवाचा साक्षीदार बनलो. मला निवड करायची होती. अनेक रूग्णांवर उपचार करून मी भरपूर पैसा कमवू शकत होतो; पण तसे केल्याने देवाच्या माझ्या उपासनेत अनेक अडथळे आले असते. मला पाच मुली आहेत. तर माझ्या कुटुंबाच्या आध्यात्मिक आणि भावनिक आरोग्यासाठी मला अधिक वेळ देता यावा म्हणून मी, माझी प्रॅक्टिस मर्यादित ठेवली. आमच्याजवळ, आम्हाला लागतात तितकेच पैसे असले तरी, आम्ही काटकसर करायला शिकलो आणि आम्हाला जे हवं असायचं ते आम्हाला मिळायचं. आम्ही कुटुंब मिळून एकमेकांच्या जवळ होतो; आमच्यात प्रेम व आनंद होता. कालांतरानं आम्ही सर्वच जण पूर्ण वेळेच्या सेवेत उतरलो. आता आमच्या पाचही मुलींची लग्न झाली आहेत; सर्व जणी सुखी आहेत; तिघींना मुलं आहेत. त्यांची कुटुंबंही सुखी आहेत कारण तेही सर्व यहोवाच्या उद्देशाला आपल्या जीवनात प्रथम स्थानी ठेवतात.”
देवाच्या उद्देशाला आपल्या जीवनात प्रथम स्थान देणे
१६, १७. बायबलमध्ये कोणकोणत्या कुशल लोकांची उदाहरणे आहेत आणि कोणत्या गोष्टींसाठी त्यांची आपण आठवण करतो?
१६ देवाच्या उद्देशाला आपल्या जीवनात प्रथम स्थान देणाऱ्या व न देणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या लोकांची उदाहरणे बायबलमध्ये आहेत. ही उदाहरणे, सर्व युगांतील, समाजातील व परिस्थितीतील लोकांना लागू होतात. (रोमकर १५:४; १ करिंथकर १०:६, ११) निम्रोदने मोठमोठी शहरे बांधली पण ते यहोवाच्या विरोधात जाऊन. (उत्पत्ति १०:८, ९) पण बाकीची उत्तम उदाहरणे आहेत. जसे की, मोशे. त्याने मिस्री अधिकारी म्हणून आपली प्रतिष्ठा जपण्याला आपल्या जीवनाचा उद्देश बनवला नाही. तर, देवाकडून आलेल्या जबाबदाऱ्यांना त्याने ‘मिसर देशातील धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ति असे गणिले.’ (इब्री लोकांस ११:२६) वैद्य असलेल्या लूकने कदाचित पौल आणि इतरांवर औषधोपचार केले असावेत. पण लूकने सुवार्तिक बनून व बायबलचा एक लेखक म्हणून इतरांसाठी सर्वात उत्तम सत्कार्य केले. पौलाला, कायद्याचा तज्ज्ञ म्हणून नव्हे तर “परराष्ट्रीयांचा प्रेषित” अर्थात एक मिशनरी म्हणून ओळखले जाते.—रोमकर ११:१३.
१७ दाविदाची प्रामुख्याने, लष्करी अधिकारी किंवा संगीतकार अथवा कवी म्हणून नव्हे तर ‘परमेश्वराच्या मनासारखा मनुष्य’ म्हणून आठवण केली जाते. (१ शमुवेल १३:१४) दानीएलने बॅबिलोनी सरकारी अधिकारी म्हणून जी कार्ये केली ती आपल्याला माहीत नाहीत पण त्याने यहोवाचा एकनिष्ठ संदेष्टा म्हणून जी सेवा केली ती आपल्याला माहीत आहे. एस्तेरला आपण पर्शियाची राणी म्हणून नव्हे तर धैर्य आणि विश्वासाचे उदाहरण म्हणून ओळखतो. पेत्र, आंद्रिया, याकोब आणि योहान यांना आपण यशस्वी मच्छीमार म्हणून नव्हे तर येशूचे प्रेषित म्हणून ओळखतो. आणि सर्वात उत्तम उदाहरण आहे येशूचे, ज्याला आपण “सुतार” म्हणून नव्हे तर “ख्रिस्त” म्हणून ओळखतो. (मार्क ६:३; मत्तय १६:१६) या सर्वांना एक गोष्ट अगदी चांगल्याप्रकारे समजली होती. त्यांच्याजवळ कोणतीही कौशल्ये, संपत्ती किंवा प्रतिष्ठा असली तरी, जीवनात त्यांचे लक्ष, त्यांच्या लौकिक करिअर्सवर केंद्रित नव्हते तर देवाच्या सेवेवर होते. त्यांना माहीत होते, की देवाला भिऊन वागणारा पुरूष अथवा स्त्री बनणे, हाच जीवनातला सर्वात उत्तम व सर्वात प्रतिफलदायी उद्देश आहे.
१८. एका तरुण ख्रिश्चनाने आपल्या जीवनाचा कशाप्रकारे उपयोग करण्याचे ठरवले आणि त्याला कोणत्या गोष्टीची जाणीव झाली?
१८ लेखाच्या सुरुवातीला संग जीनचा उल्लेख करण्यात आला होता. त्यालाही कालांतराने या गोष्टीची जाणीव झाली. तो म्हणतो: “मेडिसीन, चित्रकला किंवा शिक्षण क्षेत्रात माझी सर्व शक्ती खर्च करण्यापेक्षा मी माझं जीवन, देवाला मी केलेल्या समर्पणाच्या सुसंगतेत घालवण्याचं ठरवलं. मी आता बायबल शिक्षकांची जिथं जास्त गरज आहे
तिथं सेवा करत आहे आणि लोकांना सार्वकालिक जीवनाकडे जाणाऱ्या मार्गावर येण्यास मदत करत आहे. पूर्ण वेळेच्या सेवकाचं जीवन इतकं काही प्रेरणादायक नसतं, असा पूर्वी मी विचार करायचो. परंतु आता माझं जीवन अधिक प्रेरणादायक झालं आहे; कारण मी, माझ्या व्यक्तिमत्त्वात आणि वेगवेगळ्या समाजाच्या लोकांना शिकवण्यास माझ्या क्षमतेत सुधार करायचा प्रयत्न करत आहे. यहोवाच्या उद्देशाला आपला उद्देश बनवणे हा जीवनाचा एकमेव अर्थपूर्ण मार्ग आहे याची मला खात्री पटली आहे.”१९. जीवनाचा खरा उद्देश आपल्याला कसा सापडू शकतो?
१९ ख्रिस्ती या नात्याने आपल्याला जीवन वाचवणारे ज्ञान मिळाले आहे आणि तारणाची आशा मिळाली आहे. (योहान १७:३) तेव्हा आपण “देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये.” (२ करिंथकर ६:१) त्यापेक्षा, आपल्या अमूल्य जीवनाचे दिवस आणि वर्ष आपण यहोवाची स्तुती करण्यात घालवू या. ज्या ज्ञानाने आता खरा आनंद मिळतो आणि भविष्यात सार्वकालिक जीवन मिळू शकते त्या ज्ञानाचा आपण प्रसार करू या. असे केल्याने आपल्याला येशूच्या शब्दांची सत्यता पटेल: “घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे.” (प्रेषितांची कृत्ये २०:३५) आणि अशा रीतीने आपल्याला जीवनाचा खरा उद्देश सापडेल. (w०७ १०/१)
[तळटीप]
^ परि. 1 काही नावे बदलण्यात आली आहेत.
तुम्हाला समजावून सांगता येईल का?
• आपल्या जीवनाचा सर्वोच्च उद्देश काय आहे?
• भौतिक गोष्टींसाठी जगणे सुज्ञपणा का नाही?
• देवाने वचन दिलेले “खरे जीवन” म्हणजे नेमके काय?
• देवाचा उद्देश पूर्ण करण्याकरता आपण आपल्या जीवनाचा उपयोग कशाप्रकारे करू शकतो?
[अभ्यासाचे प्रश्न]
[२१ पानांवरील चित्रे]
ख्रिश्चनांनी उचित त्याग केले पाहिजे