व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सदसद्विवेकबुद्धीच्या आवाजाकडे कान द्या

सदसद्विवेकबुद्धीच्या आवाजाकडे कान द्या

सदसद्विवेकबुद्धीच्या आवाजाकडे कान द्या

“ज्यांना [देवाचे] नियमशास्त्र नाही असे परराष्ट्रीय . . . नियमशास्त्रात जे आहे ते स्वभावतः करीत असतात.”—रोमकर २:१४.

१, २. (क) अनेक जण, इतरांसाठी कशाप्रकारे धावून आले आहेत? (ख) इतरांच्या मदतीला धावून आलेल्या बायबलमधील व्यक्‍तींची उदाहरणे द्या.

भुयारी रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या एका वीस वर्षांच्या मनुष्याला घेरी आली आणि तो खाली रुळांवर पडला. तिथेच उभ्या असलेल्या एका मनुष्याने हे पाहिले आणि त्याने लगेच हाताशी धरलेल्या त्याच्या दोन लहान मुलींना सोडले आणि रुळांवर उडी टाकली. बेशुद्ध पडलेल्या मनुष्याला त्याने रुळांवरून बाजूला घेतले आणि तेवढ्यात तिथे कर्कश आवाज करीत ट्रेन येऊन थांबली. जीव वाचवणाऱ्‍या या मनुष्याला काही लोक हिरो म्हणतील. पण तो म्हणतो: “तुम्ही योग्य ती गोष्ट केली पाहिजे. मी मानवधर्म दाखवला. नाव आणि प्रतिष्ठा मिळण्यासाठी मी हे केलं नाही.”

तुम्ही कदाचित अशा कोणालातरी ओळखत असाल ज्यांनी इतरांना मदत करण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला होता. दुसऱ्‍या महायुद्धाच्या वेळी अनेकांनी असे केले. त्यांनी अगदी अनोळखी लोकांना आपल्या घरात लपवून ठेवले होते. प्रेषित पौल आणि २७५ लोकांची ती घटना आठवा. सिसिलीजवळील माल्टा येथे त्यांचे तारू फुटले तेव्हा स्थानीय लोक या परक्यांच्या मदतीला धावून आले व त्यांनी त्यांच्यावर “विशेष उपकार” केले. (प्रेषितांची कृत्ये २७:२७-२८:२) किंवा, ती इस्राएली मुलगी आठवते का, जिने आपला जीव धोक्यात घातला नाही पण, तिला पकडून नेणाऱ्‍या एका सिरियन अधिकाऱ्‍याच्या हितासाठी त्याच्याबद्दल दयाळुपणे काळजी दाखवली? (२ राजे ५:१-४) तसेच, येशूने दिलेल्या दयाळू शोमरोन्याच्या दृष्टांताचा विचार करा. एक याजक आणि एक लेवी अर्धमेल्या स्थितीत पडलेल्या एका यहुद्याकडे दुर्लक्ष करून जातात. पण एक शोमरोनी त्याला मदत करण्याचे खास प्रयत्न करतो. या दृष्टान्ताने अनेक शतकांपासून सर्व संस्कृतींच्या लोकांच्या मनावर जबरदस्त छाप पाडली आहे.—लूक १०:२९-३७.

३, ४. बहुतेक लोकांची, त्यांच्या जीवाला धोका असतानाही इतरांना मदत करायची मनोवृत्ती असते यावरून उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताविषयी आपल्याला काय कळते?

आपण ‘कठीण दिवस असलेल्या शेवटल्या काळांत राहात आहोत.’ बहुतेक माणसे “क्रूर” आणि “चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी” आहेत, हे खरे आहे. (१ तीमथ्य ३:१-३) तरीपण आपण लोकांना दयाधर्म दाखवताना पाहत नाही का? कदाचित आपल्यालाच कोणीतरी सुजनता दाखवली असेल. इतरांना मदत करण्याची प्रवृत्ती, मग त्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालावा लागत असला तरीसुद्धा, ही प्रवृत्ती इतकी सर्वसामान्य आहे, की काही लोक या प्रवृत्तीला “माणूसकी” असे संबोधतात.

इतरांना मदत करण्याची स्वेच्छा मनोवृत्ती, मग त्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालावा लागत असला तरी, सर्व प्रकारच्या जातींत व संस्कृतींमध्ये दिसून येते. ही मनोवृत्ती, उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताचे खंडन करते. फ्रान्सीस एस. कॉलीन्स हे जनुकशास्त्रज्ञ आहेत. ते म्हणतात: “उत्क्रांतीवादावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या लोकांचे असे म्हणणे आहे, की प्राणी आणि मनुष्य फक्‍त स्वतःचाच [किंवा, आपल्याच कुटुंबाचा, जातीचा अथवा धार्मिक गटाचा] विचार करतात. परंतु वास्तविकतेत, लोकांची इतरांना मदत करण्याची मनोवृत्ती असते. त्यासाठी त्यांना स्वतःसाठी किंवा त्यांच्या गटात नसलेल्या व ज्या लोकांशी त्यांचे कोणत्याही बाबतीत साम्य नसते अशा लोकांसाठी त्याग करावे लागत असले तरीसुद्धा त्यांची मदत करण्याची वृत्ती असते. त्यामुळे ही निःस्वार्थ वृत्ती उत्क्रांतीवादाच्या अगदी विरोधात आहे.”

“आपली सदसद्विवेकबुद्धी”

५. लोकांमध्ये सहसा काय दिसून येते?

डॉ. कॉलिन्स निःस्वार्थपणाचा एक पैलू दाखवतात: “आपली सदसद्विवेकबुद्धी आपल्याला, कसल्याही प्रतिफळाची अपेक्षा न करता, इतरांना मदत करण्यास सांगते.” * डॉ. कॉलिन्स यांनी ‘सदसद्विवेकबुद्धीचा’ जो उल्लेख केला त्यावरून आपल्याला, प्रेषित पौलाने काय म्हटले त्याची आठवण होईल. त्याने म्हटले: “ज्यांना नियमशास्त्र नाही असे परराष्ट्रीय जेव्हा नियमशास्त्रात जे आहे ते स्वभावतः करीत असतात तेव्हा, त्यांना नियमशास्त्र नाही तरी, ते स्वतःच आपले नियमशास्त्र आहेत. म्हणजे ते नियमशास्त्रातील आचार आपल्या अंतःकरणात लिहिलेला आहे असे दाखवितात; त्यांच्याबरोबर त्यांची सद्‌सद्विवेकबुद्धिहि त्यांना साक्ष देते आणि त्यांचे एकमेकांविषयीचे विचार दोष लावणारे किंवा दोषमुक्‍त करणारे असे असतात.”—रोमकर २:१४, १५.

६. सर्व लोक देवाला जबाबदार का आहेत?

रोमकरांना लिहिलेल्या पत्रात पौलाने दाखवून दिले, की मानव देवाला जबाबदार आहेत कारण त्याचे अस्तित्व आणि त्याचे गुण दिसणाऱ्‍या गोष्टींतून प्रगट होते. हे “सृष्टीच्या निर्मितीपासून” चालू आहे. (रोमकर १:१८-२०; स्तोत्र १९:१-४) हे खरे आहे, की बहुतेक लोक त्यांच्या सृष्टीकर्त्याकडे दुर्लक्ष करतात व अनैतिक जीवनशैली आचरतात. तरीपण, देवाची अशी इच्छा आहे, की मानवांनी त्याची धार्मिकता कबूल करावी आणि पश्‍चात्ताप करून वाईट मार्गांचे आचरण सोडून द्यावे. (रोमकर १:२२–२:६) यहुद्यांकडे तर असे करण्याकरता ठोस कारण होते—मोशेद्वारे त्यांना देवाचे नियमशास्त्र देण्यात आले होते. परंतु, ज्या राष्ट्रांकडे “देवाची वचने” नव्हती त्यांनी देखील देवाचे अस्तित्व मान्य करायला हवे होते.—रोमकर २:८-१३; ३:२.

७, ८. न्यायबुद्धी किती सर्वसामान्य आहे व यावरून काय सूचित होते?

सर्वांनी देवाचे अस्तित्व मान्य करून त्यानुसार जगण्याचे एक ठोस कारण, बरोबर आणि चूक यांतील फरक समजण्याची त्यांना देण्यात आलेली कुवत, हे आहे. आपल्यात न्यायबुद्धी आहे यावरून, आपल्याला एक सदसद्विवेकबुद्धी आहे हे सूचित होते. कल्पना करा: काही मुले शाळेच्या बसमध्ये चढण्यासाठी रांगेत उभे आहेत. एक मुलगा रांगेत उभ्या असलेल्यांकडे लक्ष न देता सरळ बसमध्ये चढतो. तेव्हा मागची बहुतेक मुले ओरडतात: ‘ए, हे बरोबर नाही हं!’ आता स्वतःला विचारा: ‘इतक्या मुलांनी एकाचवेळी व पटकन्‌ अशी न्यायबुद्धी कशी काय दाखवली?’ त्यांच्या या प्रतिक्रियेवरून त्यांना नैतिकतेची जाणीव आहे, हे दिसून येते. पौलाने लिहिले: “ज्यांना नियमशास्त्र नाही असे परराष्ट्रीय जेव्हा नियमशास्त्रात जे आहे ते स्वभावतः करीत असतात तेव्हा.” येथे त्याने “जेव्हा”च्या ऐवजी “जर कधी” असे म्हटले नाही. “जर कधी” म्हटले असते तर त्याचा अर्थ ‘कधीतरी’ असा झाला असता. जेव्हा जेव्हा किंवा “जेव्हा” असे म्हणण्याद्वारे पौल, ‘नेहमी’ असे सूचित करत होता. म्हणजे, लोक “नियमशास्त्रात जे आहे ते स्वभावतः करीत असतात” याचा अर्थ, देवाच्या लिखित नियमशास्त्रात आपण जे वाचतो त्यानुसार वागण्यास आपला अंतर्विवेक आपल्याला प्रेरणा देतो.

अशाप्रकारची नैतिक प्रवृत्ती अनेक देशांत दिसून येते. केम्ब्रीज विद्यापिठातील एका प्राध्यापकाने असे लिहिले, की बॅबिलोनी, ईजिप्शियन, ग्रीक, ऑस्ट्रेलियन ॲबोरिजन्स आणि नेटिव्ह अमेरिकन लोकांच्या आदर्शांत, “जाचजुलूम, हत्या, फितुरी व लबाडी यांचा धिक्कार केला जात असे. हे आदर्श, समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांना मग ते वृद्ध असोत, तरुण व दुर्बल असोत सर्वांना लागू होत होते.” डॉ. कॉलिन्स यांनी असे लिहिले: “मानवजातीच्या सर्व सदस्यांमध्ये बरोबर आणि चूक याची संकल्पना सार्वत्रिक आहे.” यावरून तुम्हाला रोमकर २:१४ या वचनाची आठवण होते का?

तुमची सदसद्विवेकबुद्धी कशी कार्य करते?

९. सदसद्विवेकबुद्धी म्हणजे काय आणि ती तुम्हाला कार्य करण्याआधी कशाप्रकारे मदत करू शकते?

सदसद्विवेकबुद्धी ही, तुमच्या कार्यांकडे पाहून त्यांचे परीक्षण करण्याची आंतरिक क्षमता आहे. तुमचे कार्य बरोबर आहे किंवा नाही हे सांगणारा तो तुमच्या आतला एक आवाज आहे. पौलाने त्याच्या आतल्या आवाजाविषयी असे लिहिले: “माझी सद्‌सद्‌विवेकबुद्धीहि पवित्र आत्म्यामध्ये माझ्याबरोबर साक्ष देते.” (रोमकर ९:१) उदाहरणार्थ, जिथे नैतिकतेचा प्रश्‍न येतो अशी एखादी गोष्ट करायची किंवा नाही याचा तुम्ही विचार करत असताना हा आवाज तुम्हाला कार्य करायच्या आधीच सांगतो. तुमची सदसद्विवेकबुद्धी तुम्हाला, तुम्ही जे कार्य करणार आहात त्याचे परीक्षण करण्यास मदत करू शकते आणि तुम्ही जर ते कार्य केले तर नंतर तुम्हाला कसे वाटेल हे सुचवू शकते.

१०. सदसद्विवेकबुद्धी कशी कार्य करते?

१० बहुतेकदा, तुम्ही एखादे कार्य केल्यानंतरही तुमची सदसद्विवेकबुद्धी तुम्हाला मदत करते. राजा शौलापासून आपला जीव वाचवण्यासाठी सतत भटकत असताना, दावीद देवाच्या अभिषिक्‍त राजाविरुद्ध काहीतरी करणार होता आणि त्याने ते कृत्य केले देखील. पण नंतर, “दाविदाचे मन त्याला खाऊ लागले.” (१ शमुवेल २४:१-५; स्तोत्र ३२:३,) येथे सदसद्विवेकबुद्धी हा शब्द वापरण्यात आलेला नाही; तरीपण दाविदाला काय वाटले अर्थात त्याच्या सदसद्विवेकबुद्धीची काय प्रतिक्रिया होती ते सांगण्यात आले आहे. आपण सर्वांनी सदसद्विवेकबुद्धीची ही प्रतिक्रिया अनुभवली आहे. आपण एक कृत्य केले असावे आणि मग, आपण कसे वागलो याबद्दल नंतर आपण अस्वस्थ व चिंतित झालो. काही लोक ज्यांनी कर बुडवला होता त्यांची सदसद्विवेकबुद्धी त्यांना इतकी छळू लागली की नंतर त्यांनी आपले कर्ज फेडले. काही लोक, आपल्या विवाहसोबत्याला त्यांच्या हातून व्यभिचाराचे पाप झाल्याचे कबूल करतात. (इब्री लोकांस १३:४) एक व्यक्‍ती जेव्हा सदसद्विवेकबुद्धीनुसार कार्य करते तेव्हा ती एकप्रकारचे मानसिक समाधान व शांती अनुभवते.

११. ‘आपल्या सदसद्विवेकबुद्धीला आपला मार्गदर्शक’ होऊ देण्यात कोणता धोका आहे? उदाहरण द्या.

११ पण मग आपण ‘आपल्या सदसद्विवेकबुद्धीला आपला मार्गदर्शक’ होऊ देऊ शकतो का? आपल्या सदसद्विवेकबुद्धीचे ऐकणे लाभदायक असले तरीसुद्धा, कधीकधी मात्र तिचे ऐकल्यामुळे आपली गंभीरपणे दिशाभूल होऊ शकते. होय, आपल्या ‘अंतरात्म्याचा’ आवाज कधीकधी आपली दिशाभूल करू शकतो. (२ करिंथकर ४:१६) हे समजायला या उदाहरणाचा विचार करा. स्तेफन ख्रिस्ताचा एक भक्‍तिमान अनुयायी होता. तो “कृपा व सामर्थ्य ह्‍यांनी पूर्ण” होता असे बायबल त्याच्याविषयी सांगते. काही यहुद्यांनी स्तेफनाला जेरूसलेमेबाहेर नेऊन दगडमार करून त्याला ठार मारले. शौल (जो नंतर प्रेषित पौल बनला) स्तेफनाला दगडमार होत असताना तेथेच जवळपास उभा होता. शौलाला “त्याचा वध मान्य होता.” असे दिसते, की त्या यहुद्यांना, आपण जे काही करत आहोत ते अगदी बरोबर आहे अशी पूर्ण खात्री होती त्यामुळेच त्यांचा विवेक त्यांना बोचत नव्हता. शौलाच्या बाबतीतही असेच असावे. कारण या घटनेनंतरही तो “प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे व त्यांचा घात करणे ह्‍याविषयींचे फूत्कार टाकीत होता.” त्याच्या सदसद्विवेकबुद्धीचा आवाज त्याला जे अचूक आहे ते सांगत नव्हता.—प्रेषितांची कृत्ये ६:८; ७:५७–८:१; ९:१.

१२. आपल्या सदसद्विवेकबुद्धीवर प्रभाव होण्याचा एक मार्ग कोणता?

१२ कोणत्या गोष्टीचा शौलाच्या सदसद्विवेकबुद्धीवर प्रभाव झाला असावा? तो ज्या लोकांबरोबर उठबस करत होता त्यांच्या विचारसरणीचा त्याच्यावर प्रभाव पडला असावा. आपण कधीकधी फोनवर अशा व्यक्‍तीशी बोलतो जिचा आवाज अगदी तिच्या वडिलांसारखा असतो. काही अंशी, या व्यक्‍तीचा आवाज तिला तिच्या वडिलांकडून वारशाने मिळालेला असू शकतो. पण, त्या व्यक्‍तीवर तिच्या वडिलांच्या बोलण्याच्या पद्धतीचा देखील प्रभाव झालेला असेल. तसेच, येशूची घृणा करणाऱ्‍या व त्याच्या शिकवणुकींचा विरोध करणाऱ्‍या यहुद्यांबरोबर उठबस करत असल्यामुळे शौलाच्या मनावर त्यांचा प्रभाव पडला होता. (योहान ११:४७-५०; १८:१४; प्रेषितांची कृत्ये ५:२७, २८, ३३) होय, शौलाच्या सोबत्यांनी शौलाच्या अंतर्विवेकावर अथवा सदसद्विवेकबुद्धीवर प्रभाव पाडला असावा.

१३. विशिष्ट प्रकारच्या वातावरणामुळे एखाद्याच्या सदसद्विवेकबुद्धीवर प्रभाव कसा पडू शकतो?

१३ एक व्यक्‍ती, ज्या भागात लहानाची मोठी होते त्या भागात बोलल्या जाणाऱ्‍या भाषेच्या पद्धतीचा ज्याप्रकारे तिच्या भाषेवर प्रभाव होतो त्याचप्रकारे एक व्यक्‍ती ज्या संस्कृतीमध्ये किंवा वातावरणात वाढते त्यानुसार तिच्या सदसद्विवेकबुद्धीला आकार लागू शकतो. (मत्तय २६:७३) प्राचीन अश्‍शूरी लोकांच्या बाबतीत असेच असावे. अश्‍शूरी लोक त्यांच्या लष्करासाठी प्रसिद्ध होते आणि त्यांच्या कोरलेल्या चित्रांत, ते बंदिवानांना कशाप्रकारे छळायचे ते दिसते. (नहूम २:११, १२; ३:१) योनाच्या दिवसांतील निनवेकरांचे वर्णन “उजव्याडाव्या हाताचा भेद ज्यांस कळत नाही” असे लोक, असे करण्यात आले आहे. याचा अर्थ, देवाच्या दृष्टीत काय उचित आहे आणि काय अनुचित आहे हे ठरवण्यास त्यांच्याकडे योग्य मोजमाप नव्हते. अशा वातावरणात निनवेत वाढलेल्या व्यक्‍तीच्या सदसद्विवेकबुद्धीवर कसा प्रभाव पडला असेल याची कल्पना करा. (योना ३:४, ५; ४:११) तसेच आजही, एखाद्याच्या सदसद्विवेकबुद्धीवर, तिच्या अवतीभवती असलेल्या लोकांच्या मनोवृत्तीचा प्रभाव पडू शकतो.

सदसद्विवेकबुद्धीला सुधारणे

१४. उत्पत्ति १:२७ मध्ये जे म्हटले आहे त्यावरून आपली सदसद्विवेकबुद्धी काय प्रतिबिंबित करते?

१४ यहोवा देवाने आदाम आणि हव्वेला सदसद्विवेकबुद्धीची देणगी दिली आणि त्यांच्याकडून ती आपल्याला देखील मिळाली. उत्पत्ति १:२७ मध्ये असे सांगण्यात आले आहे, की मानवांना देवाच्या प्रतिरूपात निर्माण करण्यात आले आहे. याचा अर्थ, आपल्याला देवाच्या शारीरिक रूपात निर्माण करण्यात आले आहे असे नव्हे; कारण, देव आत्मा आहे आणि आपण हाडामांसाचे आहोत. आपण देवाच्या प्रतिरूपात आहोत याचा अर्थ आपल्यामध्ये त्याचे गुण आहेत; यात, नैतिकतेच्या जाणीवेचा अर्थात कार्य करणाऱ्‍या सदसद्विवेकबुद्धीचा समावेश होतो. यावरून असे सूचित होते, की आपण आपल्या सदसद्विवेकबुद्धीला बळकट करू शकतो, आणखी भरवसालायक बनवू शकतो. दुसऱ्‍या शब्दांत निर्माणकर्त्याविषयी अधिक शिकू शकतो आणि त्याच्या जवळ जाऊ शकतो.

१५. आपल्या पित्याला जवळून ओळखण्यामुळे आपल्याला एक फायदा कोणता होऊ शकतो?

१५ यहोवा आपल्या सर्वांचा पिता आहे, असे बायबल म्हणते. (यशया ६४:८) स्वर्गीय आशा अथवा पृथ्वीवरील नंदनवनात राहण्याची आशा असलेले सर्व विश्‍वासू ख्रिस्ती त्याला पिता म्हणून संबोधू शकतात. (मत्तय ६:९) आपण आपल्या पित्याच्या आणखी जवळ जाण्याची आणि त्याचे दृष्टिकोन व दर्जे आत्मसात करण्याची इच्छा बाळगली पाहिजे. (याकोब ४:८) पण बहुतेक लोक असे करू इच्छित नाहीत. ते त्या यहुदी लोकांसारखे आहेत ज्यांना येशूने असे म्हटले: “तुम्ही त्याची वाणी कधीही ऐकली नाही व त्याचे स्वरूपहि पाहिले नाही, आणि त्याचे वचन तुम्ही आपणामध्ये दृढ राखले नाही.” (योहान ५:३७, ३८) आपण देवाचा आवाज ऐकलेला नाही तरीपण त्याच्या वचनाचे वाचन करून तो कसा विचार करतो हे आपण जाणून घेऊ शकतो व अशाप्रकारे त्याच्यासारखे होऊ शकतो आणि त्याच्यासारख्या भावना राखू शकतो.

१६. आपल्या सदसद्विवेकबुद्धीला प्रशिक्षित करणे व सदसद्विवेकबुद्धीचा आवाज ऐकणे महत्त्वाचे आहे हे योसेफाच्या अहवालावरून आपल्याला कसे दिसते?

१६ पोटीफरच्या घरात काम करणाऱ्‍या योसेफाच्या उदाहरणावरून हे दिसून येते. पोटीफरची बायको योसेफाला तिच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करीत होती. योसेफ ज्या काळात हयात होता त्या काळात बायबलमधील कोणत्याही पुस्तकाचे लेखन झालेले नव्हते, दहा आज्ञा देण्यात आलेल्या नव्हत्या. तरीपण तो असे म्हणाला: “एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू?” (उत्पत्ति ३९:९) आपल्या घरातील लोक नाराज होऊ नये म्हणून तो अशी प्रतिक्रिया दाखवत नव्हता. ते तर त्याच्यापासून खूप दूर राहत होते. त्याला प्रामुख्याने देवाला संतुष्ट करायचे होते. विवाहासाठी देवाचा काय दर्जा आहे हे योसेफाला माहीत होते. एका पुरुषासाठी एकच स्त्री. आणि विवाह झाल्यावर ते “एकदेह” होतात. त्याने कदाचित अबीमलेखाविषयी ऐकले असावे. अबीमलेखाला जेव्हा समजले, की रिबका ही विवाहित आहे तेव्हा त्याला खूप वाईट वाटले. अबीमलेखाला माहीत होते, की विवाहित रिबकेला घेणे चूक आहे व यामुळे त्याच्या लोकांवर शाप आला असता. यहोवाने त्यांना आशीर्वादित करून व्यभिचाराविषयी आपला काय दृष्टिकोन आहे हे दाखवले. योसेफाला या सर्व गोष्टी माहीत असल्यामुळे, त्याच्या सदसद्विवेकबुद्धीने त्याला लैंगिक अनैतिकतेपासून पळून जाण्यास प्रवृत्त केले.—उत्पत्ति २:२४; १२:१७-१९; २०:१-१८; २६:७-१४.

१७. आपल्या पित्याप्रमाणे बनण्याचा प्रयत्न करत असताना आपण आज योसेफापेक्षा चांगल्या स्थितीत का आहोत?

१७ अर्थात आपण योसेफापेक्षा चांगल्या स्थितीत आहोत. आपल्याजवळ संपूर्ण बायबल आहे. यातून आपण आपल्या पित्याचे विचार, त्याच्या भावना, कोणत्या गोष्टी त्याला आवडतात, कोणत्या आवडत नाहीत हे शिकून घेऊ शकतो. आपण शास्त्रवचनांचे जितके वाचन करू तितके आपण देवाच्या जवळ जाऊ शकतो आणि त्याच्यासारखे होऊ शकतो. असे करत असताना, आपल्या सदसद्विवेकबुद्धीचा आवाज आपल्या पित्याच्या विचारसरणीच्या अधिक सामंजस्यात येण्यास आर्जवेल. आणि जेव्हा आपण या आर्जवांकडे लक्ष देतो तेव्हा आपली विचारसरणी अधिकाधिक आपल्या पित्यासारखी होईल.—इफिसकर ५:१-५.

१८. भूतकाळात आपल्या सदसद्विवेकबुद्धीवर चांगला प्रभाव पडलेला नसला तरीसुद्धा आपण आपल्या सदसद्विवेकबुद्धीला भरवशालायक बनण्यासाठी कसे सुधारू शकतो?

१८ आपल्या सदसद्विवेकबुद्धीवर आपण ज्या वातावरणात वाढलो त्याचा प्रभाव होण्याविषयी काय? आपल्या नातेवाईकांच्या आणि आपण ज्या सर्वसामान्य वातावरणात वाढलो त्याचा आपल्या विचारसरणीवर व कार्यांवर प्रभाव पडला असेलच. त्यामुळे आपल्या सदसद्विवेकबुद्धीकडून मिळणारा संदेश क्षीण झाला असेल अथवा विकृत झाला असेल. आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांच्या ‘पद्धतीनुसार’ आपला विवेक बोलत असेल. आपण आपला भूतकाळ बदलू शकत नाही हे खरे आहे. पण, भविष्यात तरी निदान आपण असे सोबती व वातावरण निवडण्याचा निश्‍चय करू शकतो, की ज्यांचा चांगला प्रभाव आपल्या सदसद्विवेकबुद्धीवर पडू शकतो. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपण अशा आध्यात्मिक मनोवृत्तीच्या ख्रिस्ती बंधूभगिनींबरोबर नियमित सहवास राखू शकतो जे कित्येक वर्षांपासून आपल्या पित्यासमान बनण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे आपल्याला ख्रिस्ती सभांमध्ये करण्याची उत्तम संधी मिळते; मंडळीतील बंधूभगिनींबरोबर सभांच्या आधी आणि नंतर संगती करू शकतो. सहख्रिस्ती बंधूभगिनींची बायबल आधारित विचारशैली आणि त्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहू शकतो. त्यांची सदसद्विवेकबुद्धी त्यांना देवाचा दृष्टिकोन आणि त्याचे मार्ग अवलंबविण्यास सांगते तेव्हा ते कसे लगेच ऐकतात, ते आपण पाहू शकतो. हळूहळू आपणही मग आपली सदसद्विवेकबुद्धी बायबल तत्त्वांच्या अनुषंगात आणू लागू. यामुळे आपण आणखी जवळून देवाचे प्रतिरूप प्रतिबिंबित करू लागू. आपण जेव्हा आपल्या सदसद्विवेकबुद्धीला आपल्या पित्याच्या तत्त्वांच्या अनुषंगात आणतो व उत्तम ख्रिस्ती बंधूभगिनींच्या उदाहरणांचे अनुकरण करतो तेव्हा आपली सदसद्विवेकबुद्धी अधिक भरवशालायक बनते आणि आपण या बुद्धीचा आवाज ऐकण्यास प्रेरित होतो.—यशया ३०:२१.

१९. सदसद्विवेकबुद्धीचे इतर कोणते पैलू आहेत ज्यांच्याकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे?

१९ तरीसुद्धा काहींना दररोज आपल्या सदसद्विवेकबुद्धीचा आवाज ऐकणे कठीण वाटते. पुढच्या लेखात अशा काही परिस्थितींची चर्चा करण्यात आली आहे ज्यांचा ख्रिश्‍चनांना सामना करावा लागतो. या परिस्थितींचे परीक्षण केल्यावर आपल्याला, सदसद्विवेकबुद्धीची भूमिका, वेगवेगळ्या व्यक्‍तींची सदसद्विवेकबुद्धी, आणि सदसद्विवेकबुद्धीच्या आवाजाला लगेच प्रतिसाद कसा देऊ शकतो हे अधिक स्पष्टपणे समजेल.—इब्री लोकांस ६:११, १२. (w०७ १०/१५)

[तळटीप]

^ परि. 5 तसेच, हार्वर्ड विद्यापीठात खगोलशास्त्राचे संशोधन करणारे प्राध्यापक ओअन जिंगरीच यांनी असे लिहिले: ‘निःस्वार्थ वृत्तीमुळे एक प्रश्‍न उभा राहतो ज्याचे वैज्ञानिक उत्तर, प्राणी जगताचे परीक्षण करून देता येत नाही. कदाचित त्याचे अधिक खात्री पटवणारे उत्तर अगदीच वेगळ्या अशा दुसऱ्‍या एखाद्या विचारात असू शकेल आणि त्याचा संबंध, माणूसकीच्या देवाने दिलेल्या गुणांशी ज्यांत सदसद्विवेकबुद्धीचा देखील समावेश होतो, यांजशी असेल.’

तुम्ही काय शिकलात?

• सर्व संस्कृतींमध्ये बरोबर व चूक यात फरक करण्याची जाणीव आहे, असे का?

• आपल्या सदसद्विवेकबुद्धीला आपला मार्गदर्शक होऊ देण्याच्या बाबतीत आपण खबरदारी का बाळगली पाहिजे?

• आपल्या सदसद्विवेकबुद्धीचा आवाज सुधारण्याचे काही मार्ग कोणते आहेत?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[८ पानांवरील चित्र]

आपण आपल्या सदसद्विवेकबुद्धीला प्रशिक्षित करू शकतो