तुमच्या “शिकवण्याच्या कलेकडे” लक्ष द्या
तुमच्या “शिकवण्याच्या कलेकडे” लक्ष द्या
“वचनाची घोषणा कर, . . . सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने [“शिकवण्याच्या कलेने,” NW] दोष दाखीव, निषेध कर व बोध कर.”—२ तीम. ४:२.
१. येशूने आपल्या शिष्यांना कोणती आज्ञा दिली आणि त्याने आपल्यासाठी कोणते उदाहरण मांडले?
येशूने पृथ्वीवरील आपल्या सेवेदरम्यान लोकांना बरे करून अनेक महत्कृत्ये केली असली तरीसुद्धा त्याला, बरे करणारा किंवा चमत्कार करणारा म्हणून नव्हे तर शिक्षक म्हणून लोक ओळखत असत. (मार्क १२:१९; १३:१) देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करणे हे येशूचे प्रमुख कार्य होते आणि त्याच्या अनुयायांचे देखील ते आहे. येशूने आज्ञापिलेल्या सर्व गोष्टी लोकांना पाळावयास शिकवून त्यांना शिष्य बनवण्याचे काम करीत राहण्याची नेमणूक ख्रिश्चनांना मिळाली आहे.—मत्त. २८:१९, २०.
२. प्रचार कार्य करण्याची आपल्याला मिळालेली नेमणूक पूर्ण करण्याकरता आपण काय करण्याची गरज आहे?
२ शिष्य बनवण्याची आपल्याला मिळालेली नेमणूक पूर्ण करण्याकरता आपण, आपल्या शिकवण्याच्या कलेत सतत सुधारणा करणे आवश्यक आहे. प्रचार कार्यातील पौलाचा सोबती तीमथ्य याला पत्र लिहिताना पौलाने ही कला संपादन करण्याच्या महत्त्वावर जोर दिला. तो म्हणाला: “आपणाविषयी व आपल्या शिकवणीविषयी सावध ऐस. या गोष्टींमध्ये टिकून राहा, कारण हे केल्याने तू आपले वचन ऐकणाऱ्यांचेही रक्षण करशील.” (१ तीम. ४:१६, पं.र.भा.) पौलाने जेव्हा शिकवण म्हटले तेव्हा त्याच्या मनात, एकाने दुसऱ्याला केवळ ज्ञान देणे हा अर्थ नव्हता. प्रभावी ख्रिस्ती सेवक लोकांच्या हृदयापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना आपल्या जीवनात बदल करण्यास प्रवृत्त करतात. ही एक कला आहे. यास्तव, इतरांना देवाच्या राज्याची सुवार्ता सांगताना आपण ‘शिकवण्याची कला’ आपल्या अंगी कशी बाणवू शकतो?—२ तीम. ४:२.
‘शिकवण्याची कला’ अंगी बाणवणे
३, ४. (क) आपण ‘शिकवण्याची कला’ अंगी कशी बाणवू शकतो? (ख) ईश्वरशासित सेवा प्रशाला आपल्याला प्रभावी शिक्षक होण्यास कशाप्रकारे मदत करते?
३ एका शब्दकोशात कला या शब्दाची व्याख्या, “अभ्यास, सराव किंवा निरीक्षण” यांद्वारे प्राप्त केलेली कसब अशी करण्यात आली आहे. सुवार्तेचे प्रभावी शिक्षक होण्याकरता आपण या तिन्ही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्या विषयाची अचूक समज, त्या विषयाचा प्रार्थनापूर्वक अभ्यास केल्यावरच आपल्याला मिळू शकते. (स्तोत्र ११९:२७, ३४ वाचा.) प्रभावी सेवक इतरांना शिकवत असतात तेव्हा त्यांचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास आपण त्यांच्या पद्धती शिकू शकू आणि त्यांचे अनुकरण करू शकू. आणि शिकलेल्या गोष्टींचा नित्यनियमाने सराव केल्यानेच आपण आपल्या कौशल्यांत सुधारणा करू शकू.—लूक ६:४०; १ तीम. ४:१३-१५.
४ यहोवा आपला महान शिक्षक आहे. त्याच्या संघटनेच्या दृश्य भागाद्वारे तो पृथ्वीवरील आपल्या सेवकांना, त्यांना देण्यात आलेली प्रचार कार्याची नेमणूक कशी पूर्ण करायची याबाबत मार्गदर्शन देतो. (यश. ३०:२०, २१) यासाठी, प्रत्येक मंडळीत दर आठवड्याला ईश्वरशासित सेवा प्रशाला चालवली जाते. ज्यांनी आपले नाव या प्रशालेत नोंदवले आहे त्यांना देवाच्या राज्याचे प्रभावी उद्घोषक होण्याकरता मदत केली जाते. या प्रशालेतील मुख्य पाठ्यपुस्तक बायबल आहे. आपण काय शिकवले पाहिजे हे यहोवाचे प्रेरित वचन आपल्याला सांगते. शिवाय, शिकवण्याच्या कोणत्या पद्धती प्रभावी व उचित आहेत, हेही ते सुचवते. आपण देवाच्या वचनावर आधारित शिकवण दिली, प्रश्नांचा प्रभावीपणे उपयोग केला, साध्यासोप्या पद्धतीत शिकवले आणि इतरांमध्ये खरी आस्था घेतली तर आपण अधिक कुशल शिक्षक होऊ अशी ईश्वरशासित सेवा प्रशालेत वारंवार आठवण करून दिली जाते. तेव्हा, वरील मुद्द्यांची आपण एकेक करून चर्चा करू या. यानंतर, विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत कसे पोहचायचे याची देखील चर्चा करूया.
देवाच्या वचनाच्या आधारावर शिकवण द्या
५. आपण कशाच्या आधारावर शिकवण दिली पाहिजे व का?
५ सर्व मानवी शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ असलेल्या येशूने शास्त्रवचनांच्या आधारावर शिकवण दिली. (मत्त. २१:१३; योहा. ६:४५; ८:१७) त्याने आपल्या मनची शिकवण दिली नाही तर ज्याने त्याला पाठवले होते त्या देवापासून मिळालेली शिकवण दिली. (योहा. ७:१६-१८) हेच उदाहरण आपणही अनुसरत आहोत. यास्तव, घरोघरच्या सेवेत अथवा गृह बायबल अभ्यासाच्या वेळी आपण जे काही बोलतो ते देवाच्या वचनाच्या आधारावर असले पाहिजे. (२ तीम. ३:१६, १७) आपण कितीही कुशलतेने एखादा मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी आपले प्रयत्न, ईश्वरप्रेरित शास्त्रवचनांच्या प्रभावीपणाच्या व शक्तीच्या समतुल्य ठरू शकणार नाहीत. बायबलमधील शिकवण वजनदार आहे. विद्यार्थ्याला आपण कोणताही मुद्दा समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असलो तरी, शास्त्रवचने त्याविषयी काय म्हणतात हे विद्यार्थी जेव्हा स्वतःच्या बायबलमधून वाचून पाहतो तेव्हा त्याच्या मनावर त्याचा अधिक प्रभाव पडतो.—इब्री लोकांस ४:१२ वाचा.
६. विद्यार्थ्याला शिकत असलेल्या गोष्टींचा नीट अर्थ कळत आहे, याची खात्री शिक्षक कसा करू शकतो?
६ याचा अर्थ, ख्रिस्ती शिक्षकाने बायबल अभ्यासाची तयारी करणे आवश्यक नाही, असा होत नाही. उलट, अभ्यासाच्या वेळी उल्लेखित शास्त्रवचनांपैकी कोणते वचन शिक्षक अथवा विद्यार्थी वाचेल, यावर आधी काळजीपूर्वक विचार करणे महत्त्वाचे आहे. सहसा, आपल्या विश्वासांना आधार देणारी वचने वाचणे उत्तम ठरेल. विद्यार्थी वाचत असलेल्या प्रत्येक वचनाचा अर्थ त्याला समजण्यास मदत करणे आवश्यक आहे.—१ करिंथ. १४:८, ९.
प्रभावी प्रश्नांचा उपयोग करा
७. प्रश्नांचा उपयोग करणे ही शिकवण्याची एक उत्तम पद्धत का आहे?
७ प्रश्नांचा चांगल्याप्रकारे उपयोग केल्यास विद्यार्थ्याच्या विचारांना चालना मिळते आणि शिक्षकाला, विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत पोहचणे शक्य होते. यास्तव, शास्त्रवचनांचे स्पष्टीकरण तुम्ही देण्याऐवजी त्याला द्यायला सांगा. कधीकधी वचन उचितरीत्या समजावे म्हणून तुम्हाला कदाचित त्याला अनेक प्रश्न विचारावे लागतील. अशाप्रकारे विद्यार्थ्याला शिकवण्याकरता तुम्ही जेव्हा प्रश्नांचा उपयोग करता तेव्हा खरे तर तुम्ही त्याला केवळ, दिलेल्या निष्कर्षांपर्यंत पोहचण्याची कारणे समजण्यास मदत करत नाही तर या निष्कर्षाची त्याला स्वतःलाही खात्री करून घेण्यास मदत करता.—मत्त. १७:२४-२६; लूक १०:३६, ३७.
८. विद्यार्थ्याच्या हृदयात काय आहे हे तुम्ही कशाप्रकारे माहीत करून घेऊ शकता?
८ आपल्या प्रकाशनांतील शिकवण्याची पद्धत, प्रश्न आणि उत्तरे यांच्या रूपात आहे. आपण ज्यांच्याबरोबर बायबलचा अभ्यास करतो अशा बहुतेक लोकांना, छापील प्रश्नांची परिच्छेदांतून उत्तरे देता येतील. तरीपण जो शिक्षक विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत पोहचू इच्छितो, तो विद्यार्थ्याने दिलेले अचूक उत्तर ऐकून तेवढ्यावरच समाधान मानणार नाही. उदाहरणार्थ, जारकर्माविषयी बायबल काय म्हणते ते विद्यार्थी बरोबर सांगेल. (१ करिंथ. ६:१८) परंतु, व्यवहार कुशलतेचा वापर करून, विद्यार्थ्याला विचार करायला लावणारे प्रश्न विचारल्यास, शिक्षकाला समजेल की तो जे काही शिकत आहे त्याबद्दल त्याला नेमके कसे वाटते. यास्तव शिक्षक त्याला विचारू शकतो: “विवाहबाह्य लैंगिक संबंधांचा बायबल निषेध का करते? देवाने लावलेल्या या प्रतिबंधाबद्दल तुम्हाला काय वाटते? देवाने ठरवून दिलेल्या नैतिक दर्जांनुसार जगण्यात फायदा आहे असे तुम्हाला वाटते का?” अशा प्रश्नांना तो ज्याप्रकारे उत्तर देईल त्यावरून तुम्हाला, विद्यार्थ्याच्या हृदयात काय आहे ते माहीत होईल.—मत्तय १६:१३-१७ वाचा.
साध्या भाषेचा उपयोग करा
९. शास्त्रवचनांतील माहिती सांगताना आपण कोणती गोष्ट मनात बाळगली पाहिजे?
९ देवाच्या वचनातील बहुतेक सत्ये समजायला सोपी आहेत. परंतु, ज्या लोकांबरोबर आपण अभ्यास करतो ते कदाचित, खोट्या धर्माने त्यांना शिकवलेल्या सिद्धांतांमुळे गोंधळून गेले असतील. त्यामुळे शिक्षक यानात्याने आपले काम आहे, त्यांना सोप्या शब्दांत बायबलचे ज्ञान समजावून सांगणे. प्रभावी शिक्षक साधीसोपी, स्पष्ट आणि अचूक माहिती देतील. यानुसार जर आपण शिकवले तर आपण बायबलमधील सत्य समजायला कठीण बनवणार नाही. आवश्यक नसलेली सविस्तर माहिती देणे टाळा. आपण वाचत असलेल्या शास्त्रवचनाच्या वाक्य न् वाक्यावर टिपणी देण्याची गरज नाही. ज्या मुद्द्यावर चर्चा होत आहे तो वचनातील मुद्दा स्पष्ट होईल तितक्या भागावर लक्ष केंद्रित करा. विद्यार्थ्याचे ज्ञान जसजसे वाढेल तसतसे त्याला शास्त्रवचनांतील गहन सत्येही समजू लागतील—इब्री ५:१३, १४.
१०. बायबल अभ्यासात किती परिच्छेदांचा अभ्यास करायचा हे कशाच्या आधारावर ठरवता येईल?
१० एका वेळी किती परिच्छेदांचा अभ्यास केला पाहिजे? यासाठी तुम्हाला समजदारीचा उपयोग करावा लागेल. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या क्षमतेत व परिस्थितीत फरक असेल. परंतु, शिक्षक या नात्याने आपला उद्देश विद्यार्थ्याचा विश्वास पक्का करणे हा आहे, ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. त्यामुळे आपण त्याला देवाच्या वचनातील सत्य गोष्टी वाचण्यासाठी, ती समजून घेण्यासाठी व स्वीकारण्यासाठी पुरेसा वेळ देतो. त्याला जितके आकलन होईल त्याच्यापेक्षा अधिक माहिती आपण अभ्यासणार नाही. आणि याचबरोबर आपण अभ्यासही पुढे चालू ठेवू. आपल्या विद्यार्थ्याला एकदा का एखादा मुद्दा समजला की आपण लगेच पुढच्या मुद्द्यावर जाऊ.—कलस्सै. २:६, ७.
११. शिकवण्याच्या बाबतीत प्रेषित पौलाकडून आपण कोणता धडा घेऊ शकतो?
११ नवीन लोकांबरोबर बोलताना प्रेषित पौलाने सुवार्तेचा संदेश अगदी सोप्या भाषेत सांगितला. तो खूप शिकलेला होता तरीपण त्याने मोठमोठ्या शब्दांचा उपयोग केला नाही. (१ करिंथकर २:१, २ वाचा.) शास्त्रवचनांतील सत्ये किती साधीसोपी आहेत हे पाहून प्रामाणिक लोक त्याकडे आकर्षित होतात व समाधानी होतात. ती समजण्यासाठी एखाद्याला उच्चशिक्षित असणे आवश्यक नाही.—मत्त. ११:२५; प्रे. कृत्ये ४:१३; १ करिंथ. १:२६, २७.
शिकत असलेल्या गोष्टींचे मूल्य जाणण्यास विद्यार्थ्यास मदत करा
१२, १३. विद्यार्थी जे शिकतो त्यानुसार आचरण करण्यास कोणती गोष्ट त्याला प्रवृत्त करेल? उदाहरण द्या.
१२ प्रभावीपणे शिकवण देण्याकरता आपली शिकवण विद्यार्थ्याच्या हृदयाला स्पर्शिली पाहिजे. अमूक माहिती आपल्याला कशाप्रकारे लागू होते, तिचा आपल्याला फायदा कसा होतो, शास्त्रवचनांतील मार्गदर्शनांनुसार आपण चाललो तर आपले जीवन कसे सुधारेल हे विद्यार्थ्याला समजले पाहिजे.—यश. ४८:१७, १८.
१३ समजा, आपण इब्री लोकांस १०:२४, २५ या वचनांची चर्चा करत आहोत. या वचनांत ख्रिश्चनांना, शास्त्रवचनांतील उत्तेजन व प्रेमळ सहवास लाभावा म्हणून सहउपासकांबरोबर एकत्र मिळण्याचे उत्तेजन देण्यात आले आहे. विद्यार्थी जर मंडळीच्या सभांना येत नसेल तर आपण, या सभा कशा चालवल्या जातात आणि तेथे कोणकोणत्या विषयांची चर्चा केली जाते हे थोडक्यात सांगू शकतो. मंडळीच्या सभा या आपल्या उपासनेचा एक भाग आहेत व आपल्याला व्यक्तिगतरीत्या त्यांतून फायदा मिळतो, हे आपण त्याला सांगू शकतो. मग आपण त्याला सभेला उपस्थित राहण्याचे उत्तेजन देऊ शकतो. शास्त्रवचनांतील आज्ञेचे पालन करण्यामागे, अभ्यास संचालकाला संतुष्ट करणे नव्हे तर यहोवाच्या आज्ञेचे पालन करण्याची इच्छा हा हेतू असला पाहिजे.—गलती. ६:४, ५.
१४, १५. (क) बायबल विद्यार्थी यहोवाविषयी काय शिकेल? (ख) यहोवाच्या व्यक्तिमत्त्वाचे ज्ञान घेतल्यावर बायबल विद्यार्थ्याला त्याचा फायदा कसा होईल?
१४ बायबलचा अभ्यास केल्याने व त्यांतील तत्त्वे आपल्या जीवनात लागू केल्याने विद्यार्थ्याला एक महत्त्वाचा फायदा होतो. तो म्हणजे, तो यहोवाला एक व्यक्ती म्हणून जाणू लागतो आणि त्याच्यावर प्रेम करू लागतो. (यश. ४२:८) यहोवा केवळ एक प्रेमळ पिता व या विश्वाचा निर्माणकर्ता आणि मालकच नव्हे तर, जे त्याच्यावर प्रेम करतात व त्याची सेवा करतात अशांना तो त्याचे व्यक्तिमत्त्व काय आहे व त्याच्या क्षमता काय आहेत हेही प्रकट करतो. (निर्गम ३४:६, ७ वाचा.) ईजिप्शियन बंदिवासातून इस्राएल राष्ट्राला मोशेने बाहेर नेण्याआधी यहोवाने अशा शब्दांत स्वतःची ओळख करून दिली: “मी जे होईन ते मी होईन.” (निर्ग. ३:१३-१५ NW) यावरून असे सूचित झाले, की आपल्या निवडलेल्या लोकांच्या संबंधाने असलेले आपले उद्देश पूर्ण करण्यासाठी यहोवाला जे काही व्हावे लागेल ते तो होईल. यामुळे, इस्राएली लोक यहोवाला, तारणकर्ता, योद्धा, त्यांच्या गरजा पुरवणारा, आपली अभिवचने पूर्ण करणारा आणि इतर मार्गांनी मदत करणारा म्हणून ओळखू लागले.—निर्ग. १५:२, ३; १६:२-५; यहो. २३:१४.
१५ मोशेला जसे यहोवाने चमत्कारिकरीत्या मार्गदर्शन दिले तसा अनुभव आपल्या विद्यार्थ्यांना कदाचित येणार नाही. तरीपण, आपल्या विद्यार्थ्यांचा शिकत असलेल्या गोष्टींवरचा विश्वास आणि गुणग्राहकता जसजशी वाढत जाते आणि ते या शिकलेल्या गोष्टी आपल्या जीवनात लागू करू लागतात तसतसे त्यांना, धैर्य, बुद्धी आणि मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी यहोवावर अवलंबून राहण्याची गरज जाणवू लागेल. ते जेव्हा असे करतील तेव्हा त्यांनाही यहोवा, बुद्धिमान व भरवसालायक सल्लागार, संरक्षक आणि आपल्या सर्व गरजा पुरवणारा देव आहे, हे दिसून येईल.—स्तो. ५५:२२; ६३:७; नीति. ३:५, ६.
प्रेमळ आस्था दाखवा
१६. शिक्षक म्हणून प्रभावी ठरण्याकरता नैसर्गिक क्षमता इतकी महत्त्वाची का नाही?
१६ आपण शिकवण्यात इतके निपुण नाही, असे जर तुम्हाला वाटत असेल तर निराश होऊ नका. आज संपूर्ण जगभर चाललेल्या शैक्षणिक कामावर यहोवा आणि येशू देखरेख करीत आहेत. (प्रे. कृत्ये १:७, ८; प्रकटी. १४:६) ते आपल्या प्रयत्नांना आशीर्वादित करतील जेणेकरून आपल्या शब्दांचा प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांवर सकारात्मक प्रभाव पडेल. (योहा. ६:४४) शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्याप्रती असलेले खरे प्रेम, शिक्षकामध्ये असलेल्या कोणत्याही नैसर्गिक क्षमतेची उणीव भरून काढेल. आपण ज्यांना शिकवतो त्यांच्यावर प्रेम करणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव प्रेषित पौलाला होती हे त्याने दाखवून दिले.—१ थेस्सलनीकाकर २:७, ८ वाचा.
१७. प्रत्येक बायबल विद्यार्थ्यामध्ये आपण खरी आस्था कशी घेऊ शकतो?
१७ तसेच, प्रत्येक बायबल विद्यार्थ्याला चांगल्याप्रकारे ओळखण्याकरता वेळ काढून आपण त्याच्यामध्ये खरी आस्था घेऊ शकतो. त्याच्याबरोबर शास्त्रवचनांतील तत्त्वांची चर्चा करताना आपल्याला कदाचित त्याची परिस्थिती समजेल. आपल्याला दिसून येईल, की तो बायबलमधून शिकलेल्या काही तत्त्वांनुसार जगत आहे. इतर बाबतीत त्याला अजून बदल करावे लागतील. बायबल अभ्यासादरम्यान तो जे काही शिकला त्याचा आपल्या व्यक्तिगत जीवनात अवलंब कसा करायचा हे पाहण्यास व ख्रिस्ताचा एक खरा शिष्य बनण्यास आपण त्याला मदत करू शकतो.
१८. विद्यार्थ्यासोबत आणि त्याच्यासाठी प्रार्थना करणे महत्त्वाचे का आहे?
१८ सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण आपल्या विद्यार्थ्याबरोबर आणि त्याच्यासाठी प्रार्थना करू शकतो. आपल्या बायबल विद्यार्थ्याने निर्माणकर्त्याला अगदी जवळून ओळखावे, त्याच्या समीप जावे आणि त्याच्याकडून येणाऱ्या मार्गदर्शनातून लाभ मिळवावेत म्हणून आपण त्याला मदत करू इच्छित आहोत, हे त्याला स्पष्टपणे जाणवले पाहिजे. (स्तोत्र २५:४, ५ वाचा.) विद्यार्थी करत असलेल्या प्रयत्नांवर यहोवाने आशीर्वाद द्यावा अशी जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा विद्यार्थ्याला, “वचनाप्रमाणे आचरण” करणे किती महत्त्वाचे आहे हे दिसून येईल. (याको. १:२२) आणि विद्यार्थी जेव्हा आपल्या प्रांजळ प्रार्थना ऐकेल तेव्हा तोही अशाचप्रकारे प्रार्थना करण्यास शिकेल. बायबल विद्यार्थ्यांना यहोवाशी घनिष्ठ नातेसंबंध जोडण्यास मदत करण्यात किती आनंद आहे, नाही का?
१९. पुढील लेखात कोणत्या विषयावर चर्चा करण्यात आली आहे?
१९ संपूर्ण जगभरात, साडेसहासष्ट लाखांपेक्षा अधिक साक्षीदार ‘शिकवण्याची कला’ अंगी बाणवण्यात गुंग आहेत. येशूने आज्ञापिलेल्या गोष्टी प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना पाळावयास मदत करण्याचा त्यांचा उद्देश आहे. आपल्या प्रचार कार्यामुळे कोणते परिणाम होत आहेत? या प्रश्नाचे उत्तर पुढील लेखात देण्यात आले आहे.
तुम्हाला आठवते का?
• ख्रिश्चनांनी ‘शिकवण्याची कला’ आपल्या अंगी का बाणवली पाहिजे?
• आपण आपली शिकवण्याची पद्धत आणखी प्रभावी कशी करू शकतो?
• आपल्यात असलेल्या कोणत्याही नैसर्गिक क्षमतेची उणीव कशाने भरून निघेल?
[अभ्यासाचे प्रश्न]
[९ पानांवरील चित्र]
ईश्वरशासित सेवा प्रशालेत तुम्ही आपले नाव नोंदवले आहे का?
[१० पानांवरील चित्र]
आपल्या विद्यार्थ्याला त्याच्या बायबलमधून वचन वाचायला सांगणे महत्त्वाचे का आहे?
[१२ पानांवरील चित्र]
आपल्या विद्यार्थ्यासोबत आणि त्याच्यासाठी प्रार्थना करा