रोमकरांस पत्र पुस्तकातील ठळक मुद्दे
यहोवाचे वचन सजीव आहे
रोमकरांस पत्र पुस्तकातील ठळक मुद्दे
तिसऱ्या मिशनरी दौऱ्यावर असताना, सा.यु. ५६ च्या सुमारास प्रेषित पौल करिंथ शहरात येतो. रोममधील यहुदी व गैर-यहुदी ख्रिश्चनांमध्ये मतभेद उत्पन्न झाल्याचे त्याच्या कानावर आले आहे. त्या बांधवांचे मतभेद मिटवून त्यांच्यामध्ये ख्रिस्ती ऐक्य आणण्यासाठी पौल पुढाकार घेऊन त्यांना पत्र लिहितो.
रोमी ख्रिश्चनांना लिहिलेल्या त्या पत्रात, मानवांना कशा प्रकारे नीतिमान ठरवले जाते आणि या नीतिमान ठरवलेल्या व्यक्तींनी कशा प्रकारे आचरण करावे यावर पौल प्रकाश टाकतो. हे पत्र देवाविषयी व त्याच्या वचनाविषयी आपल्या ज्ञानात भर घालते, देवाच्या कृपेवर जोर देते आणि आपल्या तारणामध्ये ख्रिस्ताच्या भूमिकेचे गौरव करते.—इब्री ४:१२.
नीतिमान ठरलेले—कसे?
पौलाने लिहिले: “सर्वांनी पाप केले व ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात.” पौलाने असेही म्हटले: “नियमशास्त्रातील कर्मावाचून मनुष्य विश्वासाने नीतिमान ठरतो.” (रोम. ३:२३, २४, २८) ‘एक न्यायीपणाच्या कृत्यावर’ विश्वास ठेवल्यामुळे, अभिषिक्त ख्रिस्ती तसेच ‘दुसऱ्या मेंढरांच्या’ ‘मोठ्या लोकसमुदायातील’ सदस्यांनाही “नीतिमत्त्व प्राप्त होते.” अभिषिक्त ख्रिश्चनांना ख्रिस्ताचे सहवारस या नात्याने स्वर्गातील जीवनाकरता, तर मोठ्या लोकसमुदायातील सदस्यांना देवाचे मित्र या नात्याने “मोठ्या संकटातून” जिवंत बचावण्याकरता नीतिमान ठरवले जाते.—रोम. ५:१८, पं.र.भा.; प्रकटी. ७:९, १४; योहा. १०:१६; याको. २:२१-२४; मत्त. २५:४६.
पौल विचारतो, “आपण नियमशास्त्राधीन नसून कृपेच्या अधीन आहो म्हणून पाप करावे काय?” तोच उत्तर देतो, “कधीच नाही!” “ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे . . . किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्व आहे अशा आज्ञापालनाचे तुम्ही गुलाम आहा,” असे पौल स्पष्ट करतो. (रोम. ६:१५, १६) तो म्हणतो, “जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारलीत तर जगाल.”—रोम. ८:१३.
शास्त्रवचनीय प्रश्नांची उत्तरे:
१:२४-३२—या ठिकाणी अशुद्ध आचरणाचे जे वर्णन केले आहे, ते यहुद्यांविषयी होते की गैर-यहुदी लोकांविषयी? हे वर्णन तसे दोन्ही गटांतील लोकांना लागू होऊ शकते, पण पौल या ठिकाणी पुरातन काळात ज्यांनी नियमशास्त्राचे पालन केले नाही, त्या इस्राएल राष्ट्रातील लोकांविषयी बोलत होता. देवाचे नीतिमान नियम त्यांना माहीत असूनही, “देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत.” त्यामुळे ते दोषी ठरले.
३:२४, २५—‘ख्रिस्त येशूने [दिलेल्या] खंडणीमुळे’ “पूर्वी झालेल्या पापांची” म्हणजेच, खंडणी देण्यापूर्वी झालेल्या पापांची क्षमा कशा प्रकारे मिळू शकली? उत्पत्ति ३:१५ यात नमूद असलेली मशीहाविषयीची पहिली भविष्यवाणी, सा.यु. ३३ साली येशूला वधस्तंभावर जिवे मारण्यात आले, तेव्हा पूर्ण झाली. (गलती. ३:१३, १६) पण यहोवाने ज्या क्षणी ही भविष्यवाणी विदीत केली, तेव्हाच त्याच्या दृष्टीत खंडणीचे मोल दिल्यासारखे होते. कारण, देवाने कोणताही संकल्प केल्यास तो अवश्य पूर्ण होतो. कोणतीही गोष्ट त्याच्या आड येऊ शकत नाही. त्यामुळे, भविष्यात येशू ख्रिस्त जे बलिदान देणार होता त्याच्या आधारावर, यहोवाने या प्रतिज्ञेवर विश्वास ठेवणाऱ्य आदामाच्या वंशजाच्या पापांची क्षमा केली. खंडणीमुळेच ख्रिस्तपूर्व काळातील देवाच्या सेवकांचे पुनरुत्थानही शक्य होते.—प्रे. कृत्ये २४:१५.
६:३-५—ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा आणि त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेण्याचा काय अर्थ होतो? यहोवा जेव्हा ख्रिस्ताच्या अनुयायांना पवित्र आत्म्याने अभिषिक्त करतो तेव्हा ते येशूसोबत जणू एका शरीराचे म्हणजेच मंडळीचे भाग बनतात. या शरीराचे मस्तक ख्रिस्त आहे. (१ करिंथ. १२:१२, १३, २७; कलस्सै. १:१८) अशा रीतीने त्यांचा ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा होतो. अभिषिक्त ख्रिश्चनांचा “[ख्रिस्ताच्या] मरणात बाप्तिस्मा” होतो असेही म्हणता येते, कारण ते आत्मत्यागाचे जीवन जगतात आणि पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची आशा त्यागतात. त्यामुळे येशू ख्रिस्ताच्या मृत्यूप्रमाणेच त्यांचाही मृत्यू एक बलिदानच आहे. अर्थात, त्यांच्या मृत्यूला खंडणीचे मोल नाही. अभिषिक्त ख्रिश्चनांचा मृत्यू होऊन त्यांना जेव्हा स्वर्गीय जीवनाकरता पुनरुत्थित केले जाते तेव्हा त्यांचा ख्रिस्ताच्या मरणात होणारा बाप्तिस्मा पूर्ण होतो.
७:८-११—‘पापाने आज्ञेच्या योगे संधी साधली’ ती कोणत्या अर्थाने? नियमशास्त्राने पाप म्हणजे काय, व त्यात कशाकशाचा समावेश होतो हे समजण्यास लोकांना साहाय्य केले. यामुळे आपण पापी आहोत याची लोकांना आणखी प्रकर्षाने जाणीव झाली. नियमशास्त्राने लोकांना, ज्यायोगे ते पापी ठरू शकतात असे अनेक मार्ग लक्षात आणून दिले आणि यामुळे पूर्वीपेक्षा जास्त लोकांना आपल्या पापी प्रवृत्तीची जाणीव झाली. या अर्थाने पापाने नियमशास्त्रायोगे संधी साधली असे म्हणता येते.
आपल्याकरता धडे:
१:१४, १५. सुवार्तेची उत्सुकतेने घोषणा करत राहण्याची अनेक कारणे आपल्याजवळ आहेत. त्यांपैकी एक कारण म्हणजे ख्रिस्ताच्या रक्ताने ज्यांना विकत घेण्यात आले आहे त्या लोकांचे आपण ऋणी आहोत. आणि त्याअर्थी, त्यांना आध्यात्मिक रीत्या साहाय्य करणे हे आपले कर्तव्य आहे.
१:१८-२०. अभक्त व अनीतिमान लोकांजवळ ‘कसलीहि सबब नाही’ कारण देवाचे अदृश्य गुण त्याच्या निर्मितीकृत्यांवरून अगदी स्पष्टपणे दिसून येतात.
२:२८; ३:१, २; ७:६, ७. यहुद्यांना अपमानास्पद वाटू शकतील अशी विधाने केल्यानंतर या विधानांची तीव्रता कमी करण्याकरता पौल काही सकारात्मक विधाने करतो. यावरून आपल्याला हा धडा शिकायला मिळतो, की ज्यांमुळे विवाद उत्पन्न होऊ शकतात असे संवेदनशील विषय आपण व्यवहारचातुर्याने व कुशलतापूर्वक हाताळले पाहिजेत.
३:४. मनुष्याचे बोलणे जेव्हा देवाच्या वचनाच्या विरोधात जाते, तेव्हा आपण बायबलमधील संदेशावर भरवसा ठेवून व देवाच्या इच्छेनुसार वागून ‘देवाला खरे ठरवतो.’ राज्य प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कार्यात आवेशाने सहभाग घेण्याद्वारे, देवच खरा आहे हे जाणून घेण्यास आपण इतरांनाही मदत करू शकतो.
४:९-१२. नव्याण्णव वर्षांच्या वयात जेव्हा अब्राहामाची सुंता झाली, त्याच्या कितीतरी काळाआधीच त्याला त्याच्या विश्वासाच्या योगे नीतिमान गणण्यात आले होते. (उत्प. १२:४; १५:६; १६:३; १७:१, ९, १०) या प्रभावशाली मार्गाने, आपण कशाच्या आधारावर एका व्यक्तीला नीतिमान लेखतो हे देवाने दाखवले.
४:१८. आशा, विश्वासाचा एक अविभाज्य अंग आहे. किंबहुना आशेवरच आपला विश्वास आधारलेला आहे.—इब्री ११:१.
५:१९. येशू व आदाम यांच्यात साम्य आहे हे तर्कशुद्धपणे दाखवण्याद्वारे, एक मनुष्य “पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण [कसा] अर्पण” करू शकतो हे पौलाने अगदी थोडक्यात स्पष्ट केले. (मत्त. २०:२८) इतरांना शिकवताना, तर्कशुद्ध युक्तिवाद व एखादी गोष्ट थोडक्यात सांगण्याची कला हे अनुकरण करण्याजोगे गुण आहेत.—१ करिंथ. ४:१७.
७:२३. हात, पाय व जीभ यांसारखे आपल्या शरीरातील अवयव आपल्याला “पापाच्या नियमाच्या स्वाधीन” करू शकतात. म्हणूनच, आपण या अवयवयांचा गैरवापर करण्याचे टाळले पाहिजे.
८:२६, २७, सुबोध भाषांतर. काही प्रसंगी आपल्यासमोर असलेल्या समस्यांमुळे आपण अगदी गोंधळून जातो आणि कशी प्रार्थना करावी हे देखील आपल्याला सुचत नाही, अशा वेळी “आत्मा [आपल्यासाठी] विनवणी करतो.” तेव्हा, ‘प्रार्थना ऐकणारा’ यहोवा देव त्याच्या वचनात नमूद असलेल्या प्रार्थना जणू आपल्याच प्रार्थना आहेत असे मानून त्या स्वीकारतो.—स्तो. ६५:२.
८:३८, ३९. संकटे, दुष्ट आत्मिक प्राणी किंवा मानवी सरकारे यांपैकी कोणतीही गोष्ट यहोवाला आपल्यावर प्रेम करण्याचे सोडून देण्यास भाग पाडू शकत नाही; आणि आपणही कधी या गोष्टींमुळे त्याच्यावर प्रेम करण्याचे सोडू नये.
९:२२-२८; ११:१, ५, १७-२६. इस्राएलच्या पुनर्स्थापनेविषयीच्या अनेक भविष्यवाण्या अभिषिक्त ख्रिश्चनांच्या मंडळीच्या बाबतीत खऱ्या ठरल्या आहेत. या मंडळीतील सदस्यांचे “केवळ यहूद्यांतून नव्हे तर परराष्ट्रियांतूनहि पाचारण झाले.”
१०:१०, १३, १४. देवावर व सहमानवांवर प्रेम असण्यासोबतच, यहोवा व त्याच्या प्रतिज्ञांवर पक्का विश्वास असल्यास आपल्याला ख्रिस्ती सेवाकार्यात आवेशाने सहभाग घेण्याची प्रेरणा मिळेल.
११:१६-२४, ३३. “देवाची ममता व कडकपणा” दोन्ही अगदी अचूक प्रमाणात व एकमेकांस पूरक आहेत. खरोखरच, “तो दुर्ग आहे; त्याची कृति परिपूर्ण आहे; त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत.”—अनु. ३२:४.
नीतिमान ठरवलेल्यांस शोभेल असे वागणे
पौलाने म्हटले: “म्हणून बंधुजनहो, मी देवाच्या करुणेमुळे रोम. १२:१) “म्हणून,” म्हणजेच, ख्रिश्चनांना त्यांच्या विश्वासायोगे नीतिमान ठरवण्यात आले असल्यामुळे, स्वतःप्रती, इतरांप्रती व सरकारी अधिकाऱ्यांप्रती त्यांच्या मनोवृत्तीवर पौलाने पुढे दिलेल्या सल्ल्याचा प्रभाव पडला पाहिजे.
तुम्हाला विनवितो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी.” (पौलाने लिहिले: “मी तुम्हापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की, आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका.” तो सल्ला देतो, “प्रीतीमध्ये ढोंग नसावे.” (रोम. १२:३, ९) “प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असावे.” (रोम. १३:१) ज्या विषयांत प्रत्येक जण स्वतःच्या विवेकानुसार निर्णय घेऊ शकतो, अशा विषयांसंबंधी ख्रिश्चनांनी “एकमेकांना दोष लावू नये” असे तो प्रोत्साहन देतो.—रोम. १४:१३.
शास्त्रवचनीय प्रश्नांची उत्तरे:
१२:२०—आपण शत्रूच्या “मस्तकावर निखाऱ्याची रास” कशी करू शकतो? प्राचीन काळात सहसा अशुद्ध धातू भट्टीत टाकून त्याच्या खाली व वरसुद्धा कोळशांचा थर ठेवला जात असे. वरून उष्णता मिळाल्यामुळे धातू सहजपणे वितळून अशुद्ध घटकांपासून वेगळा होत असे. त्याच प्रकारे, आपण आपल्या शत्रूशी प्रेमळपणे वागण्याद्वारे त्याच्या डोक्यावर जणू निखाऱ्याची रास करतो. यामुळे त्याची कठोर वृत्ती नरम होऊन त्याच्या व्यक्तिमत्त्वातील चांगल्या गुणांना प्रोत्साहन मिळेल.
१२:२१—आपण कशा प्रकारे ‘बऱ्याने वाइटाला जिंकू’ शकतो? असे करत राहण्याचा एक मार्ग म्हणजे, देवाने आपल्यावर सोपवलेले राज्य सुवार्तेच्या प्रचाराचे कार्य, तो जोपर्यंत पुरे झाले आहे असे म्हणत नाही तोपर्यंत निर्भयपणे करत राहणे.—मार्क १३:१०.
१३:१, NW—वरिष्ठ अधिकाऱ्यांना “त्यांच्या सापेक्ष स्थानी देवाने नेमले” आहे हे कोणत्या अर्थाने? सरकारी अधिकाऱ्यांना “त्यांच्या सापेक्ष स्थानी देवाने नेमले आहे” याचा असा अर्थ होतो की ते देवाच्या परवानगीने राज्य करत आहेत आणि त्यांच्यापैकी काही जणांच्या शासनाविषयी देवाने पूर्वभाकित केले होते. बायबलमध्ये अनेक शासकांविषयी केलेल्या भविष्यवाण्यांवरून हे दिसून येते.
आपल्याकरता धडे:
१२:१७, १९. आपल्याविरुद्ध केलेल्या वाईट गोष्टींबद्दल आपण सूड उगवतो तेव्हा जे यहोवाच्या हाती सोपून दिले पाहिजे ते आपण स्वतःच्या हातात घेत असतो. ‘वाइटाबद्दल वाईट अशी फेड’ करणे हे गर्विष्ठपणाचे लक्षण ठरेल.
१४:१४, १५. आपल्या भावाला ज्यामुळे दुःख होईल किंवा जे त्याला अडखळण्याचे कारण ठरेल अशा प्रकारचे खाद्यपदार्थ किंवा पेय आपण त्यास देऊ नये.
१४:१७. देवासोबत चांगला नातेसंबंध असणे हे मुख्यतः आपण काय खातोपितो किंवा काय वर्ज्य करतो यावर अवलंबून नाही. तर नीतिमत्त्व, शांती व आनंद याच्याशी ते संबंधित आहे.
१५:७. जे प्रामाणिकपणे सत्य शोधत आहेत अशा सर्वांचा आपण कोणतेही भेदभाव न बाळगता, ख्रिस्ती मंडळीत स्वीकार केला पाहिजे आणि सर्व प्रकारच्या लोकांना राज्याचा संदेश सांगितला पाहिजे.
[३१ पानांवरील चित्रे]
खंडणी देण्याअगोदर झालेल्या पापांची क्षमा मिळणे शक्य आहे का?