व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

घरोघरचे सेवाकार्य—सध्याच्या काळात इतके महत्त्वाचे का आहे?

घरोघरचे सेवाकार्य—सध्याच्या काळात इतके महत्त्वाचे का आहे?

घरोघरचे सेवाकार्य—सध्याच्या काळात इतके महत्त्वाचे का आहे?

“दररोज मंदिरात व घरोघर शिकविण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही.”—प्रे. कृत्ये ५:४२.

१, २. (क) यहोवाच्या साक्षीदारांना प्रचाराच्या कोणत्या पद्धतीमुळे ओळखले जाते? (ख) या लेखात कोणत्या विषयावर चर्चा केली जाईल?

पृथ्वीवरील बहुतेक राष्ट्रांत हे दृश्‍य पाहायला मिळते. टापटीप दिसणाऱ्‍या दोन व्यक्‍ती एका घरी जातात आणि घरमालकाला बायबलमधून देवाच्या राज्याविषयी थोडक्यात सांगतात. घरमालकाने त्यांचे बोलणे ऐकण्यात आवड दाखवल्यास हे दोघे त्याला बायबल आधारित प्रकाशने वाचायला देतात व गृह बायबल अभ्यासाविषयी सांगतात. यानंतर मग ते दुसऱ्‍या घरी जातात. बहुतेक राष्ट्रांत, खरे तर लोक यहोवाच्या साक्षीदारांना, ते बोलायच्या आधीच ओळखतात. तुम्हालाही कदाचित असा अनुभव आला असेल. होय, घरोघरचे कार्य आपले ओळखचिन्ह बनले आहे.

प्रचार करण्याची व शिष्य बनवण्याची येशूने आपल्याला दिलेली कामगिरी पूर्ण करण्यासाठी आपण वेगवेगळ्या मार्गांचा उपयोग करतो. (मत्त. २८:१९, २०) बाजारात, रस्त्यांवर व इतर सार्वजनिक ठिकाणी आपण लोकांना साक्ष देतो. (प्रे. कृत्ये १७:१७) पत्राद्वारे व टेलिफोनद्वारे देखील आपण लोकांशी संपर्क साधतो. दररोज आपल्याला भेटणाऱ्‍या निरनिराळ्या लोकांनाही आपण बायबलमधील सत्यांविषयी सांगतो. आपले एक अधिकृत वेबसाईटही आहे. या वेबसाईटवर ३०० पेक्षा अधिक भाषांमध्ये बायबलवर आधारित माहिती उपलब्ध आहे. * या सर्वच पद्धतींमुळे आपल्याला चांगलेच परिणाम मिळतात. तरीपण, बहुतेक ठिकाणी देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याची आपली मुख्य पद्धत घरोघरचे प्रचार कार्यच आहे. पण या पद्धतीची सुरुवात कोठून झाली? आधुनिक काळातील देवाचे लोक या पद्धतीचा इतक्या सर्रासपणे कसा वापर करू लागले? आणि या पद्धतीचा उपयोग करणे आज इतके महत्त्वाचे का आहे?

प्रेषितांची पद्धत

३. प्रचाराविषयी येशूने आपल्या प्रेषितांना कोणत्या सूचना दिल्या व यावरून त्यांनी कशा प्रकारे प्रचार कार्य करावयाचे होते याबद्दल काय सूचित होते?

घरोघरी प्रचार करण्याच्या पद्धतीविषयी बायबलमध्ये सांगण्यात आले आहे. येशूने आपल्या प्रेषितांना प्रचार करण्यासाठी पाठवताना पुढील सूचना दिल्या: “ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा.” त्यांनी योग्य लोकांना कसे शोधायचे होते? येशूने त्यांना लोकांच्या घरी जा असे सांगून त्याने पुढे म्हटले: “घरात जाताना, तुम्हाला शांति असो, असे म्हणा; ते घर योग्य असले तर तुमची शांति त्याला प्राप्त होवो.” लोकांनी त्यांना आपल्या घरी बोलवूपर्यंत त्यांनी थांबून राहायचे होते का? येशूने पुढे काय म्हटले ते पाहा: “जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही व तुमची वचने ऐकणार नाही, त्याच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पायाची धूळ झटकून टाका.” (मत्त. १०:११-१४) येशूने दिलेल्या या सूचनांवरून हे स्पष्ट होते, की येशूच्या प्रेषितांनी ‘सर्वत्र सुवार्ता सांगत गावोगावी फिरत’ असताना स्वतःहून लोकांच्या घरी जायचे होते.—लूक ९:६.

४. घरोघरच्या प्रचार कार्याचा उल्लेख बायबलमध्ये नेमका कोठे करण्यात आला आहे?

येशूच्या प्रेषितांनी घरोघरी प्रचार कार्य केल्याचा स्पष्ट उल्लेख बायबलमध्ये आहे. उदाहरणार्थ, प्रेषितांची कृत्ये ५:४२ मध्ये त्यांच्याविषयी असे म्हटले आहे: “दररोज मंदिरात व घरोघर शिकविण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही.” सुमारे २० वर्षांनंतर, प्रेषित पौलाने इफिसस मंडळीतल्या वडिलांना अशी आठवण करून दिली: “जे हितकारक ते तुम्हाला सांगण्यात आणि चार लोकात व घरोघरी शिकविण्यात मी कसूर केली नाही.” हे वडील ख्रिस्ती बनण्याआधी पौलाने त्यांना भेट दिली होती का? होय. कारण, त्याने त्यांना इतर गोष्टींव्यतिरिक्‍त “पश्‍चात्ताप करून देवाकडे वळणे व आपल्या प्रभु येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवणे ह्‍यासंबंधाने” शिकवले होते. (प्रे. कृत्ये २०:२०, २१) रॉबर्टसन यांच्या वर्ड पिक्चर्स इन द न्यू टेस्टामेन्ट या पुस्तकात, प्रेषितांची कृत्ये २०:२० या वचनावर करण्यात आलेल्या टिपणीत असे म्हटले आहे: “या सर्वात थोर प्रचारकाने घरोघरी प्रचार केला, ही गोष्ट नोंद घेण्याजोगी आहे.”

आधुनिक दिवसांतील टोळांचे सैन्य

५. योएलच्या भविष्यवाणीत प्रचार कार्याचे वर्णन कशा प्रकारे करण्यात आले आहे?

पहिल्या शतकातील साक्षकार्य हे आपल्या दिवसात होणाऱ्‍या महान कार्याची केवळ एक झलक होती. संदेष्टा योएल याने अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या प्रचार कार्याची तुलना टोळांचा समावेश असलेल्या नाशकारक कीडीशी केली. (योए. १:४) सैन्य जसे आगेकूच करते तसे टोळांची धाड मार्गातील प्रत्येक अडथळा पार करत, घरांत घुसत व रस्त्यात दिसेल ते फस्त करत पुढे जाते. (योएल २:२, ७-९ वाचा.) आधुनिक दिवसांत देवाचे लोक चिकाटीने व पूर्णपणे साक्ष कार्य करत असल्याचे, हे किती उत्तम चित्रण! हे भविष्यसूचक वर्णन पूर्ण करण्यासाठी अभिषिक्‍त ख्रिस्ती आणि त्यांच्या सोबत कार्य करणारी “दुसरी मेंढरे” वापरत असलेल्या पद्धतींत घरोघरचे कार्य सर्वात प्रमुख पद्धत आहे. (योहा. १०:१६) तर मग, यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपण प्रेषितांची प्रचार करण्याची ही पद्धत केव्हा उचलली?

६. सन १९२२ मध्ये, घरोघरी प्रचार करण्याविषयी कोणते उत्तेजन देण्यात आले व काहींनी याला कशी प्रतिक्रिया दाखवली?

सन १९१९ पासून पुढे, प्रत्येक ख्रिश्‍चन व्यक्‍तीवर साक्षकार्यात व्यक्‍तिशः भाग घेण्याची जबाबदारी आहे यावर जोर देण्यात आला आहे. उदाहरणार्थ, ऑगस्ट १५, १९२२ च्या टेहळणी बुरूज अंकातील “सेवा महत्त्वपूर्ण आहे” असे शीर्षक असलेल्या एका लेखात अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना, “छापील संदेश लोकांपर्यंत अगदी आवेशाने घेऊन जाणे, लोकांच्या दारांत उभे राहून त्यांच्याशी बोलणे व स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे ही साक्ष देणे” किती महत्त्वाचे आहे याची आठवण करून देण्यात आली. बुलेटीन (आता आमची राज्य सेवा) यामध्ये सविस्तर सादरीकरणे दिली जायची. तरीपण सुरुवातीला, घरोघरी जाऊन प्रचार करणाऱ्‍यांची संख्या कमीच होती. काही जण या कार्यात भाग घ्यायला तयार नव्हते. ते विविध कारणे सांगायचे. पण खरे कारण हे होते, की घरोघरी जाऊन प्रचार केल्याने आपली प्रतिष्ठा कमी होईल असे त्यांना वाटायचे. क्षेत्र सेवेत भाग घेण्यावर जसजसा जोर देण्यात येऊ लागला तसतसे या लोकांनी यहोवाच्या संघटनेशी संबंध तोडले.

७. एकोणीसशे पन्‍नासच्या दशकाच्या सुरुवातीला समर्पित ख्रिश्‍चनांना कोणती मदत देण्याची गरज भासली?

नंतरच्या दशकांत, अधिकाधिक जण प्रचार कार्यात सहभाग घेऊ लागले. पण घरोघरच्या प्रचार कार्यात सहभाग घेणाऱ्‍या प्रत्येक व्यक्‍तीला या कार्यासाठी तयार करणे गरजेचे आहे हे स्पष्ट झाले. अमेरिकेतील परिस्थितीचे उदाहरण घ्या. १९५० च्या दशकाच्या सुरुवातीला त्या देशातील २८ टक्के साक्षीदार फक्‍त हस्तपत्रिकांचे वाटप करायचे किंवा रस्त्यांवर हातात मासिके घेऊन उभे राहायचे. ४० टक्क्यांपेक्षा अधिक जण प्रचार कार्यात अनियमित होते; कित्येक महिन्यांपर्यंत ते कसल्याही प्रकारच्या साक्षकार्यात भाग घेत नव्हते. या सर्व समर्पित ख्रिश्‍चनांना घरोघरच्या कार्यात भाग घेण्यासाठी कशा प्रकारे मदत करण्यात आली?

८, ९. एकोणीसशे त्रेपन्‍न साली कोणत्या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व यामुळे कोणते परिणाम घडून आले?

न्यू यॉर्क सिटीत १९५३ साली झालेल्या एका आंतरराष्ट्रीय अधिवेशनात घरोघरच्या सेवा कार्यावर अधिक जोर देण्यात आला. घरोघरच्या कार्यात नियमितरीत्या भाग घेणारा सेवक बनण्यास प्रत्येक साक्षीदाराला मदत करणे ही सर्व ख्रिस्ती पर्यवेक्षकांची जबाबदारी आहे, असे बंधू नेथन एच. नॉर यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले: “प्रत्येकाला घरोघरी जाऊन सुवार्तेचा प्रचार करणे जमले पाहिजे.” या दिशेने एका विश्‍वव्यापी प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. घरोघरी जाऊन प्रचार करण्यास ज्यांनी अद्याप सुरुवात केली नव्हती त्यांना, लोकांबरोबर संभाषण कसे सुरू करायचे, बायबलमधून त्यांच्याशी तर्कवाद करून त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे कशी द्यायची याबद्दलचे प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचे परिणाम थक्क करणारे होते. केवळ एका दशकाच्या अवधीत संपूर्ण जगभरात प्रचारकांची संख्या १०० टक्क्यांनी वाढली, पुनर्भेटींची संख्या १२६ टक्क्यांनी तर बायबल अभ्यासांची १५० टक्क्यांनी वाढली. आज, जवळजवळ सत्तर लाख राज्य प्रचारक संपूर्ण जगभरात सुवार्तेचा प्रचार करत आहेत. ही उल्लेखनीय वाढ, घरोघरच्या सेवेमध्ये आपल्या लोकांच्या परिश्रमांवर असलेल्या यहोवाच्या आशीर्वादांचा केवळ एक पुरावा आहे.—यश. ६०:२२.

बचावाकरता चिन्ह लावणे

१०, ११. (क) यहेज्केलाच्या ९ व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे यहेज्केलाला कोणता दृष्टांत देण्यात आला होता? (ख) हा दृष्टांत आपल्या दिवसांत कशा प्रकारे पूर्ण होत आहे?

१० घरोघरच्या कार्यात भाग घेण्याचे महत्त्व, संदेष्टा यहेज्केल याला दिलेल्या एका दृष्टांतातून दिसून येते. या दृष्टांतात यहेज्केल, हत्यारे घेऊन उभ्या असलेल्या सहा पुरुषांना पाहतो. तसेच तो शुभ्र तागाचे वस्त्र ल्यालेल्या व कमरेस कारकुनाची दऊत असलेल्या सातव्या मनुष्याला पाहतो. या सातव्या मनुष्याला, “नगरामधून . . . जाऊन जी माणसे आपल्यात होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप करीत आहेत त्यांच्या कपाळावर चिन्ह कर,” असे सांगितले जाते. चिन्ह लावण्याचे काम संपल्यानंतर ज्यांच्या हातात हत्यारे होती त्या सहा पुरुषांना, कपाळावर चिन्ह नसलेल्या सर्वांचा संहार करण्याची आज्ञा दिली जाते.—यहेज्केल ९:१-६ वाचा.

११ या भविष्यवाणीत, “शुभ्र तागाचे वस्त्र ल्यालेला” मनुष्य पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त केलेल्या ख्रिश्‍चनांच्या शेष जणांना चित्रित करतो. हा अभिषिक्‍त वर्ग प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कार्याद्वारे ख्रिस्ताच्या ‘दुसऱ्‍या मेंढरांचा’ भाग बनणाऱ्‍यांवर लाक्षणिक चिन्ह लावतो. (योहा. १०:१६) हे चिन्ह काय आहे? कपाळावर म्हणजेच सर्वांना दिसू शकेल अशा ठिकाणी लावलेले हे चिन्ह याचा पुरावा आहे, की ही मेंढरे येशू ख्रिस्ताचे समर्पित, बाप्तिस्मा घेतलेले शिष्य आहेत व त्यांनी ख्रिस्तसदृश्‍य नवे मनुष्यत्व धारण केले आहे. (इफिस. ४:२०, २४) मेंढरांसमान असलेल्या या लोकांचा व अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा मिळून एक कळप बनतो व चिन्ह लावण्याच्या महत्त्वपूर्ण कामात हे मेंढरासमान लोक अभिषिक्‍तांना मदत करतात.—प्रकटी. २२:१७.

१२. कपाळांवर चिन्ह लावण्याविषयी यहेज्केलाच्या दृष्टांतात, मेंढरांसमान लोकांना शोधणे महत्त्वाचे का आहे यावर कशा प्रकारे अधिक जोर देण्यात आला आहे?

१२ “उसासे टाकून विलाप करीत” असलेल्या लोकांना शोधत राहणे सध्याच्या काळात इतके महत्त्वाचे का आहे त्याच्या एका कारणावर यहेज्केलाच्या दृष्टांतात अधिक जोर देण्यात आला आहे. लोकांच्या जगण्यामरण्याचा प्रश्‍न आहे. हातात हत्यारे असलेले सहा पुरुष ज्यांना सूचित करतात ती यहोवाची स्वर्गीय सैन्ये लवकरच, कपाळावर चिन्ह नसलेल्यांचा नाश करणार आहेत. या येऊ घातलेल्या न्यायदंडाविषयी प्रेषित पौलाने असे लिहिले, की प्रभु येशू ‘आपल्या सामर्थ्यवान दूतांसह, जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभु येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा सूड उगवील.’ (२ थेस्सलनी. १:७, ८) लोक सुवार्तेला ज्या प्रकारे प्रतिसाद देतात त्यानुसार त्यांचा न्याय केला जाईल, याची नोंद घ्या. त्यामुळे आपण शेवट येईपर्यंत देवाच्या संदेशाची तेजीने घोषणा करीत राहणे अगत्याचे आहे. (प्रकटी. १४:६, ७) तेव्हा, यहोवाच्या सर्व समर्पित सेवकांवर एक भारी जबाबदारी आहे.यहेज्केल ३:१७-१९ वाचा.

१३. (क) आपले काय कर्तव्य आहे असे पौलाला वाटत होते व का? (ख) तुमच्या क्षेत्रातल्या लोकांच्या बाबतीत तुम्हाला काय वाटते?

१३ इतरांना सुवार्ता सांगणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रेषित पौलाला वाटले. त्याने लिहिले: “हेल्लेणी व बर्बर, ज्ञानी व अज्ञानी, ह्‍यांचा मी ऋणी आहे. ह्‍याप्रमाणे रोम शहरात राहणाऱ्‍या तुम्हालाही सुवार्ता सांगण्यास मी अगदी उत्सुक आहे.” (रोम. १:१४, १५) पौलाला दाखवण्यात आलेल्या दयेबद्दल तो कृतज्ञ होता. यामुळे, देवाच्या ज्या अपात्र दयेचा त्याला फायदा झाला होता त्याचा फायदा इतरांनाही मिळावा म्हणून त्यांना मदत करणे आपले कर्तव्य आहे असे पौलाला वाटत होते. (१ तीम. १:१२-१६) जणू काय त्याला भेटत असलेल्या प्रत्येक व्यक्‍तीचे त्याच्यावर कर्ज होते आणि त्या व्यक्‍तीला सुवार्ता सांगूनच तो ते कर्ज फेडू शकत होता. तुमच्या क्षेत्रातल्या लोकांचेही तुमच्यावर कर्ज आहे असे तुम्हाला वाटते का?प्रेषितांची कृत्ये २०:२६, २७ वाचा.

१४. सार्वजनिक ठिकाणी व घरोघरी जाऊन प्रचार करण्यामागचे मुख्य कारण काय आहे?

१४ येणाऱ्‍या संकटातून लोकांचा बचाव होणे महत्त्वाचे असल्यामुळे आपण घरोघरी जाऊन प्रचार करतो हे खरे आहे. पण हे कार्य करण्यामागे याहीपेक्षा जास्त महत्त्वाचे कारण आहे. मलाखी १:११ मधील भविष्यवाणीत यहोवा असे म्हणतो: “सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत राष्ट्रांमध्ये माझे नाम थोर आहे, माझ्या नामाप्रीत्यर्थ . . . निर्दोष बलि अर्पितात; कारण माझे नाम राष्ट्रांमध्ये थोर आहे.” ही भविष्यवाणी आज पूर्ण होत आहे. यहोवाचे समर्पित सेवक त्यांना मिळालेली सेवा नम्रपणे पूर्ण करण्याद्वारे विश्‍वभरात त्याच्या नावाची जाहीरपणे स्तुती करत आहेत. (स्तो. १०९:३०; मत्त. २४:१४) यहोवाला “स्तुतीचा यज्ञ” अर्पण करणे, हे सार्वजनिक ठिकाणी व घरोघरी जाऊन प्रचार करण्यामागचे आपले मुख्य कारण आहे.—इब्री १३:१५.

भविष्यातील महत्त्वाच्या घडामोडी

१५. (क) सातव्या दिवशी इस्राएल लोकांनी आपले कार्य कशा प्रकारे वाढवले? (ख) यावरून आपल्या प्रचार कार्याविषयी काय सूचित होते?

१५ प्रचार कार्याच्या संबंधाने निकट भविष्यात कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत? यहोशवाच्या पुस्तकात यरीहोला पडलेल्या वेढ्यातून भविष्यात घडणाऱ्‍या महत्त्वाच्या घडामोडींची एक झलक मिळते. देवाने यरीहोचा नाश करण्याआधी इस्राएल लोकांना दिवसातून एकदा, असे सहा दिवसांसाठी संपूर्ण शहराभोवती प्रदक्षिणा घालण्याची सूचना दिली. परंतु सातव्या दिवशी त्यांना फक्‍त एकदाच नव्हे, तर सात वेळा शहराभोवती प्रदक्षिणा घालायला सांगण्यात आले. यहोवाने यहोशवाला असे म्हटले: “नगराला सात प्रदक्षिणा घालाव्या आणि याजकांनी रणशिंगे फुंकावी. रणशिंगे फुंकली जात असताना . . . सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा, म्हणजे नगराचा तट जागच्या जागी कोसळेल.” (यहो. ६:२-५) आपल्या प्रचार कार्याची तीव्रता देखील अशीच वाढण्याची शक्यता आहे. एवढे मात्र खरे, की सद्य व्यवस्थीकरणाचा नाश होईपर्यंत आपल्याला या जगाच्या इतिहासात देवाच्या नावाची व त्याच्या राज्याची सर्वात मोठ्या प्रमाणावर साक्ष देण्यात आल्याचे पाहायला मिळालेले असेल.

१६, १७. (क) ‘मोठे संकट’ समाप्त होण्याआधी कोणते कार्य साध्य केले जाईल? (ख) पुढील लेखात आपण कोणत्या विषयावर चर्चा करणार आहोत?

१६ एक अशी वेळ येऊ शकते जेव्हा आपण घोषणा करत असलेल्या संदेशाचा “मोठा जयघोष” होईल. प्रकटीकरण पुस्तकातील न्यायदंडाच्या जोरदार संदेशांचे “एक मण वजनाच्या मोठ्या गारा” असे वर्णन करण्यात आले आहे. आणि प्रकटीकरण १६:२१ मध्ये म्हटले आहे, की “त्या गारांची पीडा अतिभयंकर होती.” त्या अंतिम न्यायदंडाच्या संदेशांची घोषणा करण्याकरता घरोघरच्या सेवाकार्याचा कितपत उपयोग केला जाईल हे तर येणारा काळच सांगेल. पण आपण ही खात्री बाळगू शकतो, की ‘मोठे संकट’ समाप्त होण्याआधी यहोवाचे नाव, मानव इतिहासात पूर्वी कधी नव्हते तितक्या मोठ्या प्रमाणावर जाहीर करण्यात आलेले असेल.—प्रकटी. ७:१४; यहे. ३८:२३.

१७ भविष्यात होणाऱ्‍या महत्त्वाच्या घडामोडींची वाट पाहत असताना आपण देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा आवेशाने प्रचार करीत राहू या. पण तोपर्यंत आपल्याला घरोघरच्या कार्यात कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागेल व या अडचणींवर आपण कशी मात करू शकतो? या प्रश्‍नांची चर्चा पुढील लेखात करण्यात आली आहे.

[तळटीप]

^ परि. 2 अधिकृत वेबसाईट www.watchtower.org आहे.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• घरोघरच्या प्रचार कार्याविषयी बायबलमध्ये कोठे सांगण्यात आले आहे?

• आधुनिक दिवसांत घरोघरच्या सेवेवर कशा प्रकारे जोर देण्यात आला?

• यहोवाच्या समर्पित सेवकांवर प्रचार करण्याची जबाबदारी का आहे?

• भविष्यात कोणत्या महत्त्वाच्या घटना घडणार आहेत?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[४ पानांवरील चित्रे]

प्रेषित पौलाप्रमाणे इतरांना सुवार्ता सांगणे हे आपले कर्तव्य आहे, असे तुम्हालाही वाटते का?

[५ पानांवरील चित्र]

बंधू नॉर, १९५३ साली