यहोवा सर्व मानवांस अजमावतो
यहोवा सर्व मानवांस अजमावतो
“[यहोवाचे] नेत्र मानवांस पाहतात, त्याच्या पापण्या त्यांस अजमावितात.”—स्तो. ११:४.
१. आपल्या सर्वांनाच कशा प्रकारच्या व्यक्ती आवडतात?
तुमच्याविषयी आस्था बाळगणाऱ्या व्यक्तींबद्दल तुम्हाला कसे वाटते? तुम्ही एखाद्या विषयावर त्यांचे मत विचारता तेव्हा ते तुम्हाला आपले मत प्रामाणिकपणे सांगतात. तुम्हाला मदतीची गरज असते तेव्हा ते तुमच्या मदतीला धावून येतात. तुमचे काही चुकत असल्यास ते प्रेमळपणे तुम्हाला सल्ला देतात. (स्तो. १४१:५; गल. ६:१) अशा व्यक्ती आपल्या सर्वांनाच आवडतात, नाही का? यहोवा व त्याचा पुत्र अशाच व्यक्तींसारखे आहेत. कोणत्याही मानवापेक्षा त्यांना तुमच्याबद्दल जास्त आस्था वाटते. शिवाय, तुमच्याविषयी आस्था बाळगण्यामागे त्यांचा कोणताही स्वार्थी हेतू नाही. तुम्हाला ‘खरे जीवन बळकट धरता यावे’ अशी त्यांची इच्छा आहे.—१ तीम. ६:१९; प्रकटी. ३:१९.
२. यहोवाला त्याच्या सेवकांबद्दल गहिरी आस्था आहे हे कशावरून म्हणता येईल?
२ यहोवाला आपल्याबद्दल किती गहिरी आस्था आहे हे स्तोत्रकर्त्या दाविदाने पुढील शब्दांत व्यक्त केले: “[यहोवाचे] नेत्र मानवांस पाहतात, त्याच्या पापण्या त्यांस अजमावितात.” (स्तो. ११:४) दाविदाने म्हटल्याप्रमाणे, यहोवा आपल्याला नुसतेच पाहत नाही तर तो आपल्याला अजमावतो किंवा आपले बारकाईने परीक्षण करतो. दाविदाने असेही लिहिले: “तू माझे हृदय पारखिले आहे, रात्री तू माझी झडती घेतली आहे, . . . तरी तुला काही [“कपट,” NW] आढळले नाही.” (स्तो. १७:३) यहोवाला आपल्याविषयी किती आस्था आहे याची दाविदाला जाणीव होती हे त्याच्या शब्दांवरून स्पष्ट दिसून येते. आपण मनात दुष्ट कल्पनांना थारा दिला किंवा कपटी मनोवृत्ती बाळगली तर यहोवाचे मन दुखावले जाईल आणि आपण त्याच्या मर्जीतून उतरू हे दाविदाला माहीत होते. दाविदाला ज्याप्रमाणे यहोवाच्या अस्तित्वाची सदोदित जाणीव होती त्याप्रमाणे तुम्हालाही आहे का?
यहोवा अंतःकरण पाहतो
३. यहोवा आपल्या चुकांकडे समंजस दृष्टिकोनाने कशा प्रकारे पाहतो?
३ यहोवा एखाद्या व्यक्तीकडे पाहतो तेव्हा तो प्रामुख्याने तिच्या आंतरिक व्यक्तिमत्त्वाकडे, म्हणजेच ती खरोखर कशा प्रकारची व्यक्ती आहे हे पाहतो. (स्तो. १९:१४; २६:२) त्याचे आपल्यावर प्रेम असल्यामुळे तो आपल्या लहानसहान उणिवांवर लक्ष केंद्रित करत नाही. उदाहरणार्थ, अब्राहामाची बायको सारा हिने, मनुष्याचे रूप धारण केलेल्या एका देवदूतापासून सत्य लपवले तेव्हा ती घाबरलेली व गोंधळलेली होती हे देवदूताने ओळखले आणि म्हणून त्याने सौम्यतेने तिचे ताडन केले. (उत्प. १८:१२-१५) कुलपिता ईयोब याने “देवाला निर्दोषी ठरविण्याचे सोडून स्वतःस निर्दोषी ठरवावयास पाहिले,” तरीपण यहोवाने त्याला आशीर्वादांपासून वंचित केले नाही. कारण सैतानाच्या हातून ईयोबाला ज्या भयंकर यातना सोसाव्या लागल्या होत्या त्यांची यहोवाला कल्पना होती. (ईयो. ३२:२; ४२:१२) त्याच प्रकारे सारफथची विधवा, संदेष्ट्या अलीयाशी अगदी सडेतोड शब्दांत बोलली तेव्हा यहोवाने तिला याबद्दल दोषी ठरवले नाही. तिचे एकुलते एक मूल मरण पावल्यामुळे ती दुःखाने व्याकूळ झाली होती हे देवाने समजून घेतले.—१ राजे १७:८-२४.
४, ५. अबीमलेखाशी यहोवाने कशा प्रकारे दयाळुपणे व्यवहार केला?
४ यहोवा हृदय पारखत असल्यामुळेच, त्याचे उपासक नसलेल्या लोकांशीही तो समंजसपणे वागतो. गरार या पलिष्टी शहराचा राजा अबीमलेख याच्यासोबत यहोवाने कशा प्रकारे व्यवहार केला ते पाहा. अब्राहाम व सारा नवराबायको आहेत हे माहीत नसल्यामुळे अबीमलेखाने साराला आपली पत्नी बनवायचे ठरवले. पण त्याने पुढचे पाऊल उचलण्याआधीच यहोवाने स्वप्नात त्याला असे म्हटले: “तू सात्विक मनाने हे केले हे मलाहि ठाऊक आहे, आणि मजविरुद्ध तुजकडून पाप घडू नये म्हणून मी तुला आवरिलेहि; म्हणून मी तुला तिला स्पर्श करू दिला नाही. आता त्या मनुष्याची बायको त्याला परत दे, कारण तो संदेष्टा आहे; तो तुजसाठी प्रार्थना करील आणि तू वाचशील.”—उत्प. २०:१-७.
५ खोट्या देवतांचा उपासक असलेल्या अबीमलेखाशी यहोवा कठोरतेने व्यवहार करू शकला असता. पण या प्रसंगी हा मनुष्य इमानीपणे वागला हे देवाने पाहिले. याची दयाळुपणे दखल घेऊन यहोवाने अबीमलेखाला सांगितले की क्षमा मिळवण्यासाठी व आपला जीव ‘वाचवण्यासाठी’ त्याने काय
केले पाहिजे. तुम्हाला अशाच देवाची उपासना करावीशी वाटत नाही का?६. येशूने आपल्या पित्याचे कोणत्या मार्गांनी अनुकरण केले?
६ येशूने आपल्या पित्याचे हुबेहूब अनुकरण केले. म्हणूनच त्यानेही आपल्या शिष्यांच्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्या लहानमोठ्या चुका क्षमा केल्या. (मार्क १०:३५-४५; १४:६६-७२; लूक २२:३१, ३२; योहा. १५:१५) येशूच्या या मनोवृत्तीचा, योहान ३:१७ यातील त्याच्या शब्दांशी मेळ बसतो: “देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले.” खरोखरच यहोवाला व येशूला आपल्याबद्दल अतिशय गहिरे प्रेम आहे. त्यांचे हे प्रेम कधी बदलत नाही. म्हणूनच, आपल्याला जीवन मिळावे अशी त्यांना उत्कंठा आहे. (ईयो. १४:१५) या प्रेमामुळेच यहोवा आपले बारकाईने परीक्षण करतो. तसेच, तो ज्या दृष्टिकोनाने आपल्याकडे पाहतो व त्यानुसार जी पावले उचलतो त्यावरूनही त्याचे प्रेमच दिसून येते.—१ योहान ४:८, १९ वाचा.
यहोवा प्रेमळपणे आपले परीक्षण करतो
७. यहोवा कोणत्या हेतूने आपले परीक्षण करतो?
७ तर मग, यहोवा एखाद्या पोलिसासारखा स्वर्गातून सतत आपल्यावर पाळत ठेवून असतो आणि केव्हा आपल्या हातून चूक होईल आणि केव्हा आपल्याला रंगेहाथ पकडता येईल याची जणू वाटच पाहत असतो, असा विचार करणे अगदी चुकीचे ठरेल! खरे तर, आपल्या चुका शोधणारा आणि आपल्यावर दोष लावण्यास उत्सुक असणारा यहोवा नव्हे, सैतान आहे. (प्रकटी. १२:१०) तो तर एखाद्याचा वाईट हेतू नसतानाही त्याला त्याबद्दल दोषी ठरवतो. (ईयो. १:९-११; २:४, ५) उलटपक्षी, देवाबद्दल स्तोत्रकर्त्याने असे लिहिले: “हे परमेशा, तू अधर्म लक्षात आणिशील, तर हे प्रभू, तुझ्यापुढे कोण टिकाव धरील?” (स्तो. १३०:३) अर्थातच, कोणीही नाही! (उप. ७:२०) त्याअर्थी, यहोवा आपल्याला दोषी ठरवण्यासाठी नव्हे, तर प्रेमळ आईवडील ज्या प्रकारे आपल्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्याकडे लक्ष देतात त्याच प्रकारे दयाळुपणे तो आपल्यावर नजर ठेवतो. आपण स्वतःवर संकट ओढावू नये म्हणून बरेचदा तो आपल्या चुका व अयोग्य प्रवृत्तींविषयी आपल्याला सावध करतो.—स्तो. १०३:१०-१४; मत्त. २६:४१.
८. यहोवा आपल्या सेवकांना कशा प्रकारे सल्ला व मार्गदर्शन देतो?
८ बायबलमध्ये तसेच ‘विश्वासू व बुद्धिमान दासाने’ पुरवलेल्या प्रकाशनांमध्ये सापडणारा सल्ला व मार्गदर्शन यांतूनही देवाचे प्रेम व्यक्त होते. (मत्त. २४:४५; इब्री १२:५, ६) तसेच, ख्रिस्ती मंडळी व त्यांतील ‘मानवरूपी देणग्या’ अर्थात वडील यांच्या माध्यमानेही यहोवा आपल्याला मदत देऊ करतो. (इफिस. ४:८, NW) शिवाय, या सर्व प्रेमळ प्रशिक्षणाला आपण कशा प्रकारे प्रतिसाद देतो याकडे यहोवा लक्ष देतो आणि आपल्याला आणखी मदत देण्याचा प्रयत्न करतो. स्तोत्र ३२:८ म्हणते: “मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टि तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन.” म्हणूनच, यहोवा जे सांगतो त्याकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण नेहमी नम्र मनोवृत्ती बाळगून, यहोवा आपला प्रेमळ शिक्षक व पिता आहे हे ओळखले पाहिजे.—मत्तय १८:४ वाचा.
९. आपण कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे?
९ याउलट गर्विष्ठपणामुळे, विश्वासाच्या अभावामुळे किंवा ‘पापाच्या फसवणुकीला’ बळी पडून आपले हृदय कधीही कठीण होता कामा नये. (इब्री ३:१३; याको. ४:६) सहसा एखादी व्यक्ती अयोग्य विचारांना किंवा इच्छांना आपल्या मनात घर करू देते तेव्हा असे घडते. कालांतराने ही व्यक्ती बायबलमधील योग्य सल्ला झिडकारून देण्याच्या थरापर्यंत पोचू शकते. अशा वाईट मनोवृत्तीत व वागणुकीत निर्ढावलेली व्यक्ती देवाची वैरी बनते. खरोखरच किती भयानक परिस्थिती! (नीति. १:२२-३१) आदाम व हव्वा यांचा पहिलाच मुलगा काइन याचे उदाहरण लक्षात घ्या.
यहोवा सर्वकाही पाहतो आणि त्यानुसार पाऊल उचलतो
१०. यहोवाने काइनाच्या अर्पणाविषयी नापसंती का व्यक्त केली आणि काइनाची प्रतिक्रिया काय होती?
१० काइन व हाबेल या दोघांनीही यहोवापुढे अर्पणे आणली तेव्हा यहोवाची दृष्टी केवळ त्यांच्या अर्पणांवरच नव्हे तर त्यांनी कोणत्या हेतूने ती अर्पणे आणली त्याकडे होती. म्हणूनच, देवाने हाबेलाचे अर्पण स्वीकारले कारण त्याने ते विश्वासाने प्रेरित होऊन दिले होते. पण काइनाच्या अर्पणाबद्दल यहोवाने नापसंती व्यक्त केली कारण यहोवाला त्याच्याठायी विश्वास नसल्याचे दिसून आले होते. (उत्प. ४:४, ५; इब्री ११:४) या घटनेतून धडा घेऊन आपल्या मनोवृत्तीत परिवर्तन करण्याऐवजी काइन आपल्या भावावर अतिशय संतापला. —उत्प. ४:६.
११. काइनाच्या हृदयातील कपट कशा प्रकारे दिसून आला आणि यातून आपण कोणता धडा घेऊ शकतो?
११ काइनाच्या अशा मनोवृत्तीमुळे अनर्थ ओढवेल हे ओळखून यहोवा त्याच्याशी दयाळुपणे बोलला आणि त्याने जर चांगले करण्याचा निश्चय केला तर यामुळे त्याचे भले होईल हे त्याच्या लक्षात आणून दिले. पण दुःखाची गोष्ट म्हणजे काइनाने आपल्या निर्माणकर्त्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या भावाचा घात केला. काइनाचे हृदय किती वाईट होते हे त्याने देवाला उर्मटपणे दिलेल्या उत्तरावरूनही दिसून येते. “तुझा भाऊ हाबेल कोठे आहे?” असे यहोवाने विचारले असता, काइन म्हणाला, “मला ठाऊक नाही; मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे?” (उत्प. ४:७-९) खरेच मनुष्याचे हृदय किती कपटी असू शकते! खुद्द देवाने दिलेला सल्ला देखील तुच्छ लेखण्याइतपत ते जाऊ शकते. (यिर्म. १७:९) अशा अहवालांतून धडा घेऊन आपण आपल्या मनात येणाऱ्या अयोग्य विचारांना व इच्छांना वेळीच आळा घातला पाहिजे. (याकोब १:१४, १५ वाचा.) बायबलमधून आपल्याला सल्ला देण्यात आल्यास आपण कृतज्ञपणे तो स्वीकारला पाहिजे आणि हा यहोवाच्या प्रेमाचाच एक पुरावा आहे असा दृष्टिकोन आपण बाळगला पाहिजे.
कोणतेही पाप यहोवापासून लपलेले नाही
१२. यहोवा अयोग्य वर्तन करणाऱ्यांशी कशा प्रकारे व्यवहार करतो?
१२ एखादे अयोग्य कृत्य करताना जर आपल्याला कोणी पाहिले नाही तर आपल्याला त्याची शिक्षा भोगावी लागणार नाही असे काहींना वाटू शकते. (स्तो. १९:१२) पण खरे पाहिल्यास, गुप्त असे पाप मुळी नसतेच! कारण, “ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे [“आपल्याला ज्याला हिशेब द्यायचा आहे,” NW] त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रगट केलेले आहे.” (इब्री ४:१३) यहोवा आपले अगदी मनातील हेतू पारखणारा न्यायाधीश आहे. आणि अयोग्य वर्तन करणाऱ्यांशी तो परिपूर्ण न्यायबुद्धीनेच व्यवहार करतो. तो “दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर” आहे. तरीसुद्धा, जे पश्चात्तापी वृत्ती दाखवत नाहीत, “बुद्धिपुरस्सर पाप” करतात, किंवा दुष्ट व कपटी वृत्तीने वागतात, त्यांची तो ‘मुळीच गय करत नाही.’ (निर्ग. ३४:६, ७; इब्री १०:२६) ही गोष्ट, आखान तसेच हनन्या व सप्पीरा यांच्याशी यहोवाने ज्या प्रकारे व्यवहार केला त्यावरून दिसून येते.
१३. अयोग्य विचारांमुळे आखान पाप करण्यास कशा प्रकारे प्रवृत्त झाला?
१३ देवाच्या आज्ञेच्या अगदी उलट वागून, आखानाने यरीहो शहरातील लुटीमधून काही वस्तू आपल्यासाठी घेतल्या आणि त्या आपल्या तंबूत लपवून ठेवल्या. त्याच्या कुटुंबाचे सदस्यही यात सामील असण्याची शक्यता आहे. आखानाचे पाप उघडकीस आले तेव्हा आपल्या पापाच्या गांभीर्याची जाणीव असल्याचे त्याने दाखवले कारण तो म्हणाला: “मी खरोखर इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याविरुद्ध पाप केले आहे.” (यहो. ७:२०) काइनाप्रमाणेच आखानाचेही हृदय दुष्ट बनले होते. त्याच्या लोभी वृत्तीमुळे तो कपटीपणे वागण्यास प्रवृत्त झाला. यरीहो शहरातील लूट यहोवाची असल्यामुळे आखानाने खरे तर देवाच्या मालकीच्या वस्तू चोरल्या होत्या आणि यामुळे त्याला व त्याच्या कुटुंबाला भारी किंमत मोजावी लागली. —यहो. ७:२५.
१४, १५. हनन्या व सप्पीरा यांनी देवाचा रोष कसा ओढवून घेतला आणि यावरून आपल्याला काय शिकायला मिळते?
१४ हनन्या व सप्पीरा हे जेरूसलेम येथील आरंभीच्या ख्रिस्ती मंडळीचे सदस्य होते. सा.यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टनंतर दूरदूरच्या देशांतून आलेले काही नवे शिष्य जेरूसलेम शहरातच थांबले. त्यांच्या पालनपोषणाकरता एक निधी उभारण्यात आला होता. जो तो आपल्या ऐपतीप्रमाणे या निधीला हातभार लावत असे. हनन्यानेही एक शेत विकले आणि मिळालेल्या पैशातील काही पैसे या निधीकरता दान केले आणि असे भासवले जणू काही त्याने मिळालेली पूर्ण रक्कम दान केली आहे. त्याच्या बायकोलाही याविषयी माहीत होते. या जोडप्याला कदाचित मंडळीत सर्वांनी आपली वाहवा करावी असे वाटत असावे. तरीसुद्धा, त्यांचे कृत्य हे कपटीपणाचे होते. यहोवाने चमत्कारिक रीत्या हा गैरप्रकार प्रेषित पेत्राला प्रकट केला, तेव्हा पेत्राने हनन्याला याविषयी विचारणा केली. त्यानंतर लगेच हनन्या खाली पडला व मरण पावला. त्याच्या पाठोपाठ सप्पीरा देखील मरण पावली.—१५ हनन्या व सप्पीरा हे एका क्षणाच्या मोहाला बळी पडले नव्हते. तर त्यांनी हेतूपुरस्सर खोटे बोलून प्रेषितांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी ‘पवित्र आत्म्याशी लबाडी केली’ होती. यहोवाने या प्रसंगी जे पाऊल उचलले त्यावरून अगदी स्पष्टपणे दिसून येते की तो ढोंगी मनोवृत्तीच्या व्यक्तींपासून मंडळीचे संरक्षण करण्यास समर्थ आहे. खरोखर, “जिवंत देवाच्या हाती सापडणे हे भयंकर आहे.”—इब्री १०:३१.
नेहमी यहोवाला विश्वासू राहा
१६. (क) सैतान आज कशा प्रकारे देवाच्या लोकांना पाप करण्यास प्रवृत्त करण्याच्या प्रयत्नात आहे? (ख) तुमच्या परिसरात दियाबल कोणत्या मार्गांनी लोकांना भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे?
१६ आज सैतान आपल्याला पापास प्रवृत्त करून यहोवाच्या मर्जीतून उतरवण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे. (प्रकटी. १२:१२, १७) दियाबलाचे दुष्ट हेतू, अनैतिकता व हिंसाचाराने झपाटलेल्या या जगात स्पष्ट दिसून येतात. अश्लील साहित्य आजकाल कंप्युटर्स किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या साहाय्याने सहज मिळवता येते. सैतानाच्या अशा डावपेचांना आपण कधीही बळी पडू नये. उलट आपल्या भावना स्तोत्रकर्त्या दाविदासारख्या असल्या पाहिजेत, ज्याने असे लिहिले: “मी सूज्ञतेने, सरळ मार्गाने चालेन. . . . मी आपल्या घरी सरळ अंतःकरणाने वागेन.”—स्तो. १०१:२.
१७. (क) यहोवा गुप्त गोष्टी आज न उद्या उजेडात का आणतो? (ख) आपण कोणता निश्चय केला पाहिजे?
१७ गतकाळाप्रमाणे आज यहोवा गंभीर पाप व बेइमान कृत्ये चमत्कारिक रीत्या उघडकीस आणत नाही. तरीसुद्धा, त्याला सर्वकाही दिसते आणि त्याला योग्य वाटेल त्या वेळी व त्याला योग्य वाटेल त्या मार्गाने तो अशा गुप्त गोष्टी उजेडात आणतो. पौलाने म्हटले: “कित्येक माणसांची पापे उघड असून ती अगोदर न्यायनिवाड्याकरिता जातात, आणि कित्येकांची मागून जातात,” म्हणजेच नंतर उघडकीस येतात. (१ तीम. ५:२४) वाईट कृत्ये उजेडात आणण्यामागचा यहोवाचा हेतू त्याचे प्रेमच आहे. मंडळीवर त्याचे प्रेम आहे आणि या मंडळीचे पावित्र्य त्याला टिकवून ठेवायचे आहे. शिवाय, ज्यांनी पाप केले पण आता मनापासून पश्चात्ताप केला आहे, अशा व्यक्तींशी तो क्षमाशीलपणे वागतो. (नीति. २८:१३) म्हणूनच, आपण नेहमी पूर्ण हृदयाने यहोवाची उपासना करण्याचा व सर्व प्रकारच्या दुष्प्रभावांचा प्रतिकार करण्याचा निश्चय करू या.
पूर्ण हृदयाने यहोवाची उपासना करा
१८. आपल्या पुत्राने देवाबद्दल कोणती गोष्ट समजून घ्यावी असे दावीद राजाला वाटत होते?
१८ दावीद राजाने आपला पुत्र शलमोन याला असे म्हटले: “तू आपल्या बापाच्या देवाला जाण, आणि पूर्ण हृदयाने व उत्सुक मनाने त्याची सेवा कर; कारण यहोवा सर्व अंतःकरणे शोधून पाहतो व विचारांच्या सर्व कल्पना समजतो.” (१ इति. २८:९, पं.र.भा.) दाविदाची अशी इच्छा होती की त्याच्या पुत्राने केवळ देवावर विश्वास ठेवू नये, तर आपल्या सेवकांबद्दल देवाला किती आस्था आहे हेही त्याने समजून घ्यावे. यहोवा आपल्या सेवकांबद्दल जी आस्था व्यक्त करतो, त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात का?
१९, २०. स्तोत्र १९:७-११ या वचनांनुसार दाविदाला कोणत्या गोष्टीने देवासोबत घनिष्ट नातेसंबंध जोडण्यास मदत केली आणि आपण दाविदाचे अनुकरण कसे करू शकतो?
१९ यहोवाला माहीत आहे की योग्य मनोवृत्तीचे लोक त्याच्याकडे येतील आणि त्याच्या अद्भुत गुणांमुळे त्यांना मनोभावे त्याची उपासना करण्याची प्रेरणा मिळेल. म्हणूनच, यहोवाची अशी इच्छा आहे की आपण त्याची चांगल्या प्रकारे ओळख करून घ्यावी आणि त्याच्या अद्भुत व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घ्यावे. हे आपल्याला कसे करता येईल? त्याच्या वचनाचा अभ्यास करण्याद्वारे व जीवनात त्याचे आशीर्वाद अनुभवण्याद्वारे आपण हे करू शकतो.—नीति. १०:२२; योहा. १४:९.
२० बायबल देवाचे वचन आहे हे ओळखून तुम्ही दररोज ते प्रार्थनापूर्वक मनोवृत्तीने वाचता का? त्यातील तत्त्वांनुसार जगणे फायद्याचे आहे याची तुम्हाला खात्री पटली आहे का? (स्तोत्र १९:७-११ वाचा.) असल्यास, यहोवावरील तुमचा विश्वास आणि त्याच्याबद्दल तुम्हाला वाटणारे प्रेम दिवसेंदिवस वाढत जाईल. आणि तोसुद्धा तुमच्या जवळ येईल, जणू तुमचा हात धरून तो तुमच्याबरोबर चालेल. (यश. ४२:६; याको. ४:८) सार्वकालिक जीवनाकडे नेणाऱ्या संकोचित मार्गावरून तुम्ही चालत असताना, यहोवा नक्कीच तुम्हाला अनेक आशीर्वाद देऊन व आध्यात्मिक रीत्या तुमचे संरक्षण करून तुमच्यावर असलेले आपले प्रेम सिद्ध करेल.—स्तो. ९१:१, २; मत्त. ७:१३, १४.
तुमचे उत्तर काय असेल?
• यहोवा आपले परीक्षण का करतो?
• काही व्यक्ती कशा प्रकारे देवाचे वैरी बनले?
• आपल्याला यहोवाच्या अस्तित्वाची सदोदित जाणीव असल्याचे आपण कसे दाखवू शकतो?
• आपण कशा प्रकारे पूर्ण हृदयाने देवाची उपासना करत राहू शकतो?
[अभ्यासाचे प्रश्न]
[४ पानांवरील चित्र]
यहोवा कशा प्रकारे एका प्रेमळ पित्याप्रमाणे आपल्याकडे लक्ष देतो?
[५ पानांवरील चित्र]
हनन्याच्या उदाहरणावरून आपण कोणता धडा घेऊ शकतो?
[६ पानांवरील चित्र]
पूर्ण हृदयाने यहोवाची उपासना करत राहण्यास कोणती गोष्ट आपल्याला साहाय्य करेल?